महाराष्ट्रात गेली सातशे-आठशे वर्षे सामाजिक समतेचा संदेश वारकर्यांनी पोहोचवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रकार्याला आणि हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीला त्याचा मोठा उपयोग झाला. मात्र सध्या वारकरी संप्रदायातील तो उद्देश शिल्लक राहिला आहे का? हे एकदा तटस्थपणे पडताळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या क्षेत्रात घुसलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा याबद्दल कोणी काही बोलले की लगेच त्याला धर्मद्रोही, समाजद्रोही ठरवणे हे पांडुरंगाला तरी पसंत पडेल का?
शरद तांदळे नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी ‘राक्षसांचा राजा रावण’ ही कादंबरी लिहिली. ते तरूणांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करत असतात. अडीच-तीन वर्षांपूर्वी त्यांनी ‘पैसे कमावण्याचे उद्योग’ या विषयावर एक व्याख्यान दिले. त्यात ते म्हणाले की, ‘‘कीर्तन करणे हाही एक उद्योग झालाय. कीर्तनकाराला टॅक्स भरावा लागत नाही. चार अभंग पाठ केले की त्याचे भागते. हरीपाठासारखा एखादा ‘डायलॉग’ आला की रामकृष्ण हरी म्हणत विषय बंद करता येतो.’’
त्यांची ही क्लिप आत्ता कोणीतरी शोधून काढली आणि अनेक तथाकथित वारकरी त्यांचा आईबहिणीवरून उद्धार करत आहेत. त्यांना मारण्याच्या, कापण्याच्या धमक्या येत आहेत. शरद तांदळे यांच्या या विचारांचे समर्थन करणारा एक व्हिडिओ मी ‘द पोस्टमन’ या यू ट्यूब चॅनलवरून प्रसारित केला तर मलाही असंख्य लोकांनी भंडावून सोडले आहे. ‘‘तुमचा हिंदू धर्माशी काय संबंध? तुम्ही पाकिस्तानात जा,’’ असाही सल्ला त्यांच्याकडून देण्यात येतोय. यातले पाच-पन्नास फोन माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. त्यातला एखादा अपवाद वगळता कोणीही तात्त्विक चर्चा केली नाही. आजच्या वारकरी संप्रदायात किती कुविचारी लोक घुसले आहेत याचेच हे द्योतक आहे.
आळंदीत जोग महाराजांसारख्या जाणत्यांनी ज्या संस्था चालू केल्या त्यांचा उद्देश सफल झाला का असाच प्रश्न ही सगळी दहशत पाहून पडतो. आज गावागावात बुवा-बाबांचे पेव फुटले आहे. त्यांनी या क्षेत्राची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. नुकतेच बीड जिल्ह्यातील एका मठपतीने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे असो किंवा एका महाराजाने तीन लग्ने करून केलेले पलायन असो याला काय म्हणावे? अनेक मांसाहारी हॉटेलांची उद्घाटने करण्यासाठी काही महाराज सुपार्या घेतात. पुण्यात गेल्याच महिन्यात ‘अंडा सिंग’ या हॉटेलचे उद्धाटन एका कीर्तनकाराच्या हस्ते झाल्याचे समोर आले होते.
गळ्यात माळ घातली आणि हातात टाळ घेतला की आपण वारकरी झालो या समजातून यांनी या क्षेत्राचे वाटोळे केले आहे. अनेकांच्या दहाव्याला-बाराव्याला, वाढदिवसालाही पैसे घेऊन कीर्तनसेवा देणारे आपल्याकडे कमी नाहीत. यू ट्युबवरील अशा भामट्यांची कीर्तने ऐकली ते एकपात्री कार्यक्रमच वाटतात. त्यासाठी हे महाराज लोक लाखो रूपये घेतात. त्यांच्यासोबतचे टाळ, वीणा, मृदंग वाजवणारे सहकलाकारही दणकून बिदागी घेतात. कीर्तनसेवेसाठी धन घेणे किंवा यजमानाच्या घरी अन्नग्रहण करणे याला जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कठोर शब्दात फटकारले आहे. आजच्या स्पर्धेच्या आणि महागाईच्या काळात अशा महाराज लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचा विचार करता तेही स्वीकारता येण्यासारखे आहे. या लोकांच्या दोन-दोन, तीन-तीन वर्षाच्या तारखा कीर्तनासाठी बुक असतात. ते त्यांची कीर्तने ठेवा म्हणून कुणावर जबरदस्ती करत नाहीत. मात्र त्यांच्या कीर्तनातून नेमका कोणता सामाजिक संदेश दिला जातो, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने ते काय प्रबोधन करतात याचा विचार केल्यास पदरात निराशाच पडते.
समाजप्रबोधनाच्या या अत्यंत प्रभावी माध्यमांचा वापर स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही अनेक कीर्तनकारांनी केला. राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धनबुवा यांचं चरित्र आम्ही ‘चपराक प्रकाशन’कडून प्रकाशित केलं. निष्णात वैद्य असलेल्या पटवर्धनबुवांना लोकमान्य टिळकांनी सांगितलं की, ‘‘देशासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर लोकांचं प्रबोधन करा. त्यांच्या शारीरिक आरोग्याच्या दुरूस्तीसाठी अनेक वैद्य आहेत मात्र त्यांच्या मानसिक आरोग्याच्या सुदृढतेसाठी काम करा.’’ त्यासाठी पटवर्धनबुवांनी कीर्तनाचं माध्यम निवडलं. एकही रूपया न घेता कीर्तनसेवा दिल्यानं त्यांच्या कुटुंबाची जी परवड झाली ती वाचूनही उचंबळून येतं. महाराष्ट्राला अशा निस्पृह कीर्तनकारांची परंपरा असताना ज्यांनी या क्षेत्राचा बाजार मांडलाय ते पाहून माझ्यासारखा कुणीही संवेदनशील माणूस व्याकूळ झाल्याशिवाय राहणार नाही.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्याकडे चमत्कार म्हणून न पाहता त्यामागचे नेमके विज्ञान काय होते याबाबतचे ‘विज्ञानमूर्ती ज्ञानोबा तुकोबा’ हे दत्तात्रेय गायकवाडांचे पुस्तकही आम्ही प्रकाशित केले. पटवर्धनबुवांचे ‘आर्यांची दिनचर्या’ हे दुर्मीळ पुस्तक तब्बल साठ वर्षांनी पुन्हा उपलब्ध करून दिले. शरद तांदळे यांनी रावण या विषयावर लिहिले असेल पण आम्ही नरहरी पत्तेवारांचे ‘श्रीराम एक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित केले. सध्या संत नामदेव महाराजांच्या 750 व्या जन्मवर्षानिमित्त त्यांच्यावरील काही पुस्तके प्रकाशित करीत आहोत. आध्यात्मिक मार्गावरून चालताना संत साहित्यात असा खारीचा वाटा उचलूनही आजचे तथाकथित वारकरी ‘वारकरी संप्रदायाशी तुमचा काय संबंध?’ असा प्रश्न विचारत असतील तर त्यांच्या अज्ञानाचे आश्चर्य वाटते.
तांदळे यांनी ‘रावण’ विषयावर लिहिले. त्यांनी काय लिहावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचे साहित्य न वाचणे किंवा त्यांच्या लेखनाचा वैचारिक प्रतिवाद करणे हे तुमच्या हातात आहे. मात्र त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अभ्यास करावा लागतो. शिवाजी सावंतांनी कर्णाचे केलेले उदात्तीकरण असेल किंवा तांदळेंनी रावणाची केलेली मांडणी असेल हा त्यांच्या लेखनस्वातंत्र्याचा भाग आहे. ते लेखक आहेत, आपले शत्रू नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. तसे न होता सामाजिक झुंडीचे प्रदर्शन करत वारकरी संप्रदायाचा पाया नेस्तनाबूत करणारे असे आततायी अतिरेकी हेच वारकरी संप्रदायाचे खरे शत्रू आहेत.
कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणार्या काहींनी सामाजिक कामाचा संदेश देत अनुकरणप्रियताही दाखवली. कालच्या माझ्या व्हिडोओबद्दल विशेष अभिनंदन करताना अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी यांनी बंडातात्या कराडकर यांच्या समाजकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘बंडातात्यांनी राजीव दीक्षित यांच्या नावाने शाळा सुरू केली. जे काम संघ-भाजपवाल्यांना, पतंजलीवाल्यांना करता आले नाही ते तात्यांनी करून दाखवले. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं संघटन करणार्या बंडातात्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.’’
निवृत्ती महाराज इंदोरीकर हेही शेतकर्यांच्या मुलांसाठी एक सुसज्ज शाळा चालवतात. या माध्यमातून असे जे काही प्रयोग होतात त्याचे कौतुकच करायला हवे.
महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद यादव यांची निवड झाली. त्यावेळी त्यांचे ‘संतसूर्य तुकाराम’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यातील लेखनावर वारकर्यांनी आक्षेप घेतला. आनंद यादव यांनी देहूला तुकाराम महाराजांच्या मंदिरात येऊन नतमस्तक होत वारकर्यांची, मराठी माणसाची क्षमायाचना केली. त्या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ‘मेहता प्रकाशन’नेही पुस्तक माघारी घेतले. इतके सारे होऊनही काही वारकर्यांनी टोकाची भूमिका घेतली. यादव लोकशाही मार्गाने संमेलनाध्यक्षपदी निवडून आले होते, मात्र त्यांना संमेलनाला जाता आले नाही. वारकर्यांची ही वाढती दहशत त्यांची असहिष्णुता दाखवून देते.
कोणताही वारकरी कुणालाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणार नाही. वैश्विकतेची शिकवण देणार्या या संप्रदायात काही कुप्रथा निर्माण झाल्या असतील तर यातील ज्येष्ठांनी पुढाकार घेत योग्य ती चिकित्सा करायला हवी. धर्म आणि आध्यात्माच्या पायावर आपल्या समाजाची उभारणी झालीय. देव, देश आणि धर्मावर प्रेम करणार्यांना जर शत्रू समजून दूर लोटण्याचा अतिरेकी प्रयत्न झाला तर त्यात समाजाचेच नुकसान आहे. आपल्या कोणत्याही संतांनी, आपल्या परंपरेनं ही शिकवण दिली नाही. आध्यात्माचा मार्ग माणसे जोडण्याचे काम करतो. माणसे दुरावणारे, एकमेकांची मने दुखावणारे अध्यात्म असूच शकत नाही. त्या सगळ्या बोगस आणि अविचारी प्रवृत्ती आपण भागवत संप्रदायाचे कसे पाईक आहोत म्हणून सर्वत्र मिरवत आहेत.
तांदळे यांनी हरीपाठालाही ‘डायलॉग’ म्हटल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. ‘डायलॉग’ म्हणजे संवाद. माणसामाणसाला जोडण्याचे कामच कोणताही डायलॉग करतो. संवाद आणि संघर्षाची भूमिका घेताना म्हणूनच आपला विवेक शाबूत ठेवणे गरजेचे आहे. त्यापुढे जाऊन सांगावेसे वाटते की तांदळे यांच्यासारख्या अन्य कुणीही काही चुकीचे विधान केेलेच तर त्यामुळे वारकरी संप्रदायाला धोका पोहचेल, त्याचा पाया नष्ट होईल इतका आपला संप्रदाय दुबळा नाही. आपण सर्वजण जातीपातीच्या, धर्माच्या राजकारणाला सामोरे जात असताना हा कट्टरतावाद घातक आहे एवढंच.
- घनश्याम पाटील
7057292092
खूप छान विवेचन
ReplyDeleteसंतुलित
ReplyDeleteगंभीरपणे विचार करायला भाग पाडणारा वैचारिक लेख!
ReplyDeleteसविस्तर अभ्यासपूर्ण असे विवेचन केले आहे. वारकरी संप्रदायातील लोकांनीच नव्हे तर इतर अभ्यासकांनी हा लेख वाचायला हवा.
ReplyDeleteभुमिकेशी ठाम रहात आपण विषय प्रतिपादन छान केलंय.
ReplyDeleteवारकरी समुहाचं कार्य अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे मात्र त्यात घुसूपाहणारी विकृती चिंताजनक आहे आणि म्हणून तिचा विरोध व्हायलाच हवा.
तुमच्या परखडपणा आवडतो.
योग्य शब्दात कान उघडणी आणि समज देणेही, रास्तच
ReplyDeleteअतिशय अभ्यासपूर्ण लेख. शेकडो वर्षांपासून पायी पंढरपूर ला जाणारा वारकरी आणि त्यांचा समुदाय असलेला 'वारकरी संप्रदाय' निश्चितच विचाराने प्रगल्भ आहे. त्यामुळे घनश्याम पाटील सरांना आलेल्या प्रतिक्रिया संबंधितांना अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत!
ReplyDeleteकट्टरतावाद नकोच. भागवतधर्माची पताका आजवर मिरवणारा वारकरी संप्रदाय. वारकरी दिसला की माउली हाच शब्द पहिल्यांदा ओठांवर येतो. अशी अध्यात्ममाउली काही कंटकांमुळे आपला समाज उद्बोधनाची वाटचाल विसरू नये. वारकरी संप्रदाय हा समाजातल्या प्रबोधनकारी विचारांचा पाया आहे. पण त्यातील जन्म घेऊ पाहणारी विक्रुती मात्र चिंताजनक आहे.
ReplyDeleteतुमची परखड मत मांडणी आवडली.
शरद तांदळे यांच्या ज्या व्हिडीओ किंवा भाषणामुळे हा प्रसंग निर्माण झाला तो व्हिडीओ विरोध करणाऱ्यांना दाखवण्यात यावा.
खूप छान व मुद्देसूद 👌👌
ReplyDeleteग्रामीण भागात गावागावात सध्या सांप्रदायिक अवस्था खूपच बिकट होत चालली आहे.सांगोला तालुक्यातील चोपडी सारख्या गावात तेथील माळकरी लोकांमध्ये केवळ वैचारिक मतभेद असल्या कारणाने चार ठिकाणी हरिपाठ केला जातो या वरुन गावाची सांप्रदाय स्थिती लक्षात येते. घनश्याम पाटील यांनी मांडलेली सध्याची सांप्रदाय स्थिती खूपच भयावह आहे. रावण निश्चितपणे ग्रेट असणार कारण त्यामुळेच तर सीतामाई पवित्र राहिली हे संप्रदायाने विसरता कामा नये.. कुणी काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जर असा आळा घातला जात असेल तर निश्चितपणे ही बाब खेदजनक आहे.या बाबी वरती घनश्याम पाटील सर यांनी उठवलेला आवाज सार्थ आहे.
ReplyDeleteरावण ग्रेट नव्हता शापित होता कोणाची स्त्री अबला तिला पळविले तिथेच ग्रेटपणा संपला व सीतामाई ही पतिव्रतेच्या बलामुळे पवित्र राहिली. वाल्मिकी रामायण पुर्ण वाचावे मगच रावणाला ग्रेट का म्हणू नये ते समजेल उगी डाव्यांच्या रावणाने दाखविलेल्या अर्धसत्य विचारांवर मत बनवू नये!
Deleteछान लिहिलंय घनश्यामजी.. कोणत्याही बाबतीत अतिरेक नेहमीच वाईट. प्रत्येकाला आपले एक वेगळे अस्तित्व, वेगळे मत असते अन् ते मांडण्याचा दाखविण्याचा अधिकारसुध्दा. त्यामुळे मला हवे तसे बोलावे मला हवे तसे वागावे हा दुराग्रही हट्टीपणा सर्वथा निंदनीय आहे. आपण आपले काम मत आपल्या पद्धतीने मांडलेत याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. असेच मनमोकळे, स्पष्ट आणि रोखठोक लिहित रहा, बोलत रहा. कायमच आपल्यासोबत...
ReplyDeleteसुभाष सबनीस
हल्ली कोणत्याही एका विचारधारेचे लोक एकत्र जमले की संवाद, परीसंवाद,मंथन याऐवजी सवंग , लोकानुनयी विषयांवर चर्चा, चर्वितचर्वण सुरू होते आणि समुदायाची झुंड होते. पांडुरंग , भक्ती, वारीचं पावित्र्य या सगळ्या गोष्टी दुय्यम होतात आणि उरतात फक्त भिन्न भिन्न जातींचे नाग,साप,अजगर विंचू वा उंदीर घुशी !
ReplyDeleteवारीमध्येही हौशे,नवशे आणि गवशे पुर्वीही काही प्रमाणात असायचे पण भक्तांची मांदियाळी व्यापक आणि प्रभावी होती.आता भक्त शक्यतो वारीत राहून अलीप्त राहतात आणि हौशे गवशे राज्य करतात.
तांदळे यांनीही आनंद यादव यांच्या अनुभवाचा धडा घेणे आवश्यक होते. विशेषतः कीर्तन हा व्यवसाय अंगिकारण्याचा सल्ला देणारे त्यांचे भाषण या मौल्यवान परंपरेची हेटाळणी करणारे होते हेही आक्षेपार्ह म्हणावे लागेल.
दहशतवाद कुठलाही असो तो वाईटच...
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअगदी योग्य विचार मांडलेय.संतानी दिलेली शिकवण वारकरी म्हणवणारांनी अंगी बाळगावी.
ReplyDelete