Sunday, March 19, 2017

जातीय गंडाची शोकांतिका!

दिलीप कांबळे नावाचे एक गृहस्थ महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत. त्यांचा लातूरात एक कार्यक्रम झाला. तो आटोपून परत गेल्यानंतर त्याठिकाणी काही लोकांनी घोषणाबाजी केली. मंत्री महोदयांना हे कळताच ते म्हणाले, ‘काही लोकांची दलाली बंद झाल्याने ते सरकारची बदनामी करत आहेत; पण हे सरकार दलाली बंद करण्यावर ठाम असून माझ्यासमोर ते आंदोलन केले असते तर त्यांचे मुस्काट रंगवले असते. अशा लोकांना घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?’
त्यांच्या ‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे काय?’ या प्रश्‍नाने अनेकजण दुखावले गेले. काही ब्राह्मण संघटना रस्त्यावर उतरल्या. कांबळेंच्या नेहरू स्टेडिअम जवळील कार्यालयात आंदोलन केले गेले. त्यांच्यावर दबाव वाढवला आणि त्यांना जाहीर माफी मागायला लावली. ‘माझा तसा उद्देश नव्हता पण मी बोलून गेलो. आईच्या हृदयाने मला माफ करा’ असे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर या गावी केलेले काम, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर घेतलेली भूमिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेळोवळी झालेल्या आरोपानंतर त्यांची केलेली पाठराखण या सर्वांची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. हे सर्व पाहता ब्राह्मण समाजाने आपल्याला माफ करावे, असेही सांगितले.
दिलीप कांबळे यांचे ते वक्तव्य निश्‍चितच आक्षेपार्ह, चुकीचे आणि निंदाजनक होते. मात्र त्याचा जो बागुलबुवा केला गेला आणि त्यांच्यावर ज्या प्रमाणात टीका झाली ते पाहता आपल्या जातीय अस्मिता किती टोकदार झाल्यात हे पुन्हा एकदा दिसून आले. एखाद्या मंत्र्याला माफी मागायला लावेपर्यंतची झुंडशाही आणि त्यांच्याबाबत केलेली मस्तवाल भाषा हा सरळसरळ जातीय गंड आहे. ‘फुले, शाहू, आंबेडकर’ यांच्या नावाने आजवर जे घाणेरडे राजकारण केले गेले, त्यांचे नाव घेत ज्या जातीय अस्मिता जपल्या, समाजात दुही माजवताना जी विषवल्ली पेरली गेली त्याचीच ही सुधारीत आवृत्ती आहे. जातीजातीचे कळप टोळ्यांच्या रूपात एकत्र येऊन त्यांचा दबाव वाढवत आहेत. मराठा, दलित, मुस्लीम, ब्राह्मण अशी कोणतीही जात घ्या; प्रत्येकाचा आविर्भाव सारखा दिसतो आणि तो अत्यंत घातक आहे.
दिलीप कांबळे यांनी आंदोलकांचे ‘मुस्काट’ फोडण्याची भाषा केली होती. त्यांच्या या विधानातील मग्रुरी कुणालाच दिसली नाही. खरा आक्षेप तर त्या वाक्यावर घेतला जायला हवा होता. मात्र ‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?’ हेच वाक्य अनेकांना झोंबले! आणि ज्या संघटीतपणे त्यांच्यावर दबाव आणला गेला ते पाहता ब्राह्मण समाज खर्‍याअर्थी घाबरलाय हे त्यांच्या कृतीतून दिसून आले. तसे नसते तर भारतीय सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आमदार प्रशांत परिचारक यांनाही ब्राह्मण समाजाकडून असाच विरोध झाला असता.
राजकारण्यांची अपरिपक्व आणि अप्रगल्भ विधाने ही बाब आपल्याकडे नवीन नाही. ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असे यशवंतराव चव्हाणांनी सांगितले होते. ‘आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची असते’ असे तेव्हाचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले म्हणाले होते. ‘भगवा दहशतवाद देशासाठी घातक’ असे तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोललेे होते. शरद पवार यांनी तर आयुष्यभर जातीय राजकारणालाच खतपाणी घातले. बाकी, जातीय आंदोलने उभारणार्‍या, त्या जीवावर मतांचा जोगवा मागणार्‍या  फुटकळ नेत्यांची तर आपल्याकडे मुळीच कमतरता नाही. मात्र आता यात ब्राह्मण समाजही मोठ्या प्रमाणात सहभागी होतोय. ही बाब निश्‍चितच चिंतेची आणि चिंतनाची आहे.
सूर्यप्रकाशावर काय कुणा एकाचा अधिकार असतो? त्याप्रमाणेच ज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही. ब्राह्मण समाजाने ज्ञानाच्या बळावर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. काळानुसार बदलत या समाजाने जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले. भारताचा स्वातंत्र्यलढा असेल किंवा त्या आधीच्या, नंतरच्या सामाजिक, शैक्षणिक चळवळी असतील! त्या प्रत्येकात ब्राह्मण समाजाचे योगदान मोठे होते, आहे! पण हे योगदान त्या मान्यवरांनी ‘जात’ म्हणून दिले नाही. त्यातील कर्तव्यभावना, राष्ट्रप्रेम, समाजाविषयीची कळकळ यातून हे महानकार्य घडले. त्या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी आपण जे जातीय राजकारण करतोय ते अतिशय घाणेरडे आणि आपला विवेक संपुष्टात आल्याचे दाखवून देणारे आहे.
‘पूर्वी छत्रपती पेशव्यांची निवड करायचे; आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात’ असे थेट वक्तव्य करून शरद पवारांनी त्यांची मळमळ यापूर्वी व्यक्त केली होतीच. म्हणजे कोणताही नेता, कोणतीही जात आपापला स्वार्थ साधण्यासाठी पुढाकार घेत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यावर सर्वाधिक टीका जातीवरून होतेय. त्यांचे पळी-पंचपात्र, पीतांबर आणि जाणवे यावरून असंख्य कोट्या होताना दिसतात. त्याउलट सध्याच्या राजकारणात हा या कळपापेक्षा वेगळा नेता दिसतोय. त्यांच्यावर मर्यादा सोडून, जातीय अहंकारातून कितीही टीका झाली तरी त्यांनी कुणाची ‘जात’ काढल्याचे स्मरत नाही. फडणवीस केवळ ‘ब्राह्मण’ आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणे ही विरोधकांची हतबलता आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून, त्यांच्या भूमिकांवरून, त्यांच्या वक्तव्यावरून टीका करणे शक्य नसल्याने मग ते कसे ‘भटजी’ आहेत, त्यांच्या पत्नी कसा पेहराव करतात अशा निरर्थक गोष्टीवरून किळसवाणी टीका केली जाते. हे मानसिक आरोग्य बिघडल्याचे आणि समाजस्वास्थ्य खराब झाल्याचे लक्षण आहे.
दुसरीकडे फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणजे ‘ब्राह्मण’ समाज फार मोठा झाला असेही नाही. आजही खेड्यापाड्यातील ब्राह्मण समाजाची बेकारी भयंकर आहे. एकीकडे ब्राह्मण समाज जागतिक पातळीवर गेलेला असताना अनेक गावातील ब्राह्मणांची खायची मारामार आहे. दोन वेळचे पोट कसे भरेल याची भ्रांत असणारे ब्राह्मण कमी नाहीत. तरीही फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून ते सुखावतात. जातीय भावना लक्षात घेतल्या तरी त्यातून वाढलेला सुप्त अहंकार हा या समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे.
धनगर, वंजारी, माळी, मराठा, ब्राह्मण, दलित, तेली, शिंपी अशा सर्व जातींच्या संघटना जोरकसपणे काम करतात. त्यातूनच महात्मा फुले माळ्यांचे, छत्रपती शिवाजीराजे मराठ्यांचे, डॉ. आंबेडकर दलितांचे, सावरकर-टिळक ब्राह्मणांचे, होळकर धनगरांचे अशी वाटणी सुरू आहे. या सर्व महापुरूषांनी जे बलिदान दिले त्या सर्वांची ही हत्याच आहे. हे पातक आजची पिढी करतेय. जातीअंत, जातीनिर्मूलन अशा गोंडस नावाने आपण ही विषवल्ली वाढवतोय. त्यामुळेच मध्यंतरी कमी झालेला जातीयवाद पुन्हा उफाळून येतोय. कधी नव्हे इतक्या आपल्या जातीय अस्मिता टोकदार बनत चालल्यात. जातीमुळे आपल्याला काहीही मिळणार नाही, हे पुरते ठाऊक असूनही जातीय संस्थांचे काम वाढत चालले आहे. जातीयवाद करणे हे घटनाविरोधी  कृत्य आहे हे ठाऊक असूनही दिलीप कांबळे यांच्यावर लोकशाही मार्गाने गुन्हा दाखल न करता त्यांच्यावर दबाव वाढवण्यात आला. त्यांना माफी मागायला भाग पाडले. हे करताना ‘तुम्ही (म्हणजे संपूर्ण दलित समाज) आरक्षणाच्या कुबड्या घेऊन कशी ‘भीक’ मागता?’ इथपासून ते ‘यांना ‘ब्राह्मण’ हा शब्द नीट लिहिता आणि उच्चारता तरी येतो का?’ इथपर्यंतची शेरेबाजी झाली. ‘जय परशुराम’चा उल्लेख करत प्रथमच सर्वत्र निषेध नोंदवला जात होता.
एखाद्या विधायक कामासाठी एकत्र येणे हा ब्राह्मणांच्या रक्तातला गुण आहे; मात्र सध्या जातीसाठी एकत्र येणारेच अधिक दिसत आहेत. जात कोणतीही असेल, त्यात सगळेच चांगले किंवा सगळेच वाईट असे असूच शकत नाहीत. याचे भान प्रत्येकाला असले तरी लक्षात कोण घेतो? सर्व जातीच्या लोकांच्या मनात वाढत चाललेली जातीय जळमटं आपल्याला मागं खेचणारी आहेत. वैचारिक, नैतिक, सामाजिक गोष्टीवरून, भल्या-बुर्‍यावरून विरोध करणे, राजकारण करणे याऐवजी वैयक्तिक स्तरावर येणे आणि जातीय गंड जपणे ही आपली सर्वांचीच शोकांतिका आहे.
- घनश्याम पाटील
7057292092

7 comments:

  1. सर खूपच छान चपराक दिलीत

    ReplyDelete
    Replies
    1. जबरदस्त. सर, आपल्या लेखणीची ताकद वारंवार दिसते.

      Delete
    2. जबरदस्त. सर, आपल्या लेखणीची ताकद वारंवार दिसते.

      Delete
    3. धन्यवाद भयवाळ सर

      Delete
  2. सर्वच थरातून माणूस हरवत असुन टोळ्या व ठराविक समूह स्वत:चीअस्मीता जपता जपला देश ,समाज गाव आणि त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या माणसाला विसरत आहेत .त्यामुळे भविष्यकाळातील समस्या वाढत जातील कि काय ?हीच चिंतेची बाब आहे सर् !

    ReplyDelete