Sunday, March 19, 2017

व्यवस्थापन कौशल्यातला उत्तुंग मनोरा


टिमटाला हे अमरावती जिल्ह्यातील एक छोटेसे खेडे. 11 नोव्हेंबर 1914 रोजी या गावात एकनाथजी रानडे यांचा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणून एकनाथजींनी आपल्या कामाची छाप उमटवली होती. 1960 च्या सुमारास मद्रासमध्ये विवेकानंदांचे स्मारक उभारण्याची तयारी सुरू होती; मात्र त्याला प्रचंड विरोध होत होता. त्या अडचणीतून मार्ग काढून स्वामीजींचे भव्य स्मारक उभारले जावे यासाठी एखाद्या कर्तव्यकठोर, निस्पृह, त्यागी, सर्वसमावेशक देशभक्ताची गरज होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री. गुरूजींनी या कामासाठी एकनाथजींची नियुक्ती केली. संघकार्यातून त्यांना मुक्त केल्यानंतर कन्याकुमारीच्या श्रीपाद शिलेवर विवेकानंदांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्याच्या कामात सहभागी होण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या आणि एक अद्भूत इतिहास निर्माण झाला. शिलास्मारकाबरोबरच विवेकानंद केंद्राची स्थापना करून एकनाथजींनी राष्ट्रनिर्माणाबरोबरच मनुष्य निर्माणाला महत्त्व दिले.
‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’ ही एकनाथजींच्या कामामागची संकल्पना होती. वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून केंद्रासाठीच काम करणार्‍या व्रतस्थ कार्यकर्त्यांचा शोध, त्यांचे प्रशिक्षण, देशभरात महत्त्वाच्या आणि आवश्यक ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या अशा सर्व बाबींचं सर्वंकष, सर्वव्यापी, सर्वसमावेशक दर्शन घडतं ते एकनाथजींच्या पत्रातून! अशी हजारो पत्रं विवेकानंद केंद्रानं जपून ठेवलीत. त्यांचा अभ्यास करून अनेक पुस्तके प्रकाशित करणे अभ्यासकांना शक्य आहे. सुभाष वामन भावे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि ‘लर्निंग फॉर मॅनेजर’ हे पुस्तक जन्माला आले. ज्येष्ठ पत्रकार दत्ता पंचवाघ यांनी ‘एकनाथजी आणि व्यवस्थापन कौशल्य
या नावाने त्याचा मराठीत अनुवाद केला असून विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने ते दर्जेदार स्वरूपात प्रकाशित केले आहे.
एकनाथजींच्या जन्मशताब्दी वर्षात (2014) विवेकानंद केंद्रातर्फे देशभर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकनाथजींच्या जीवनकार्यावर, विचार मौक्तिकांवर, कार्यपद्धतीवर आधारित तीन पुस्तकांचा संकल्प करण्यात आला होता. या पुस्तकांमुळे तो पूर्णत्वाकडे जात आहे. एकनाथजींनी जीवनव्रती कार्यकर्त्यांसमोर मांडलेले विचार, त्यांची दिनचर्या, केंद्र कार्यकर्त्यांसाठी आणि पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे एकनाथजींच्या सर्वोत्तम भाषणावरच दीनचर्या हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झालेलं आहे. केंद्राची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथजींनी ती कशी पार पाडली, त्यासाठी केलेला पत्रव्यवहार, केलेला प्रवास आणि घेतलेल्या गाठीभेटी, खर्चाचे नियोजन, योजलेल्या मोहिमा, त्यांचं कार्यान्वयन, सर्वोत्तम काम होण्यासाठी घातलेलं लक्ष, ग्रॅनाईटच्या स्मारकावर समाधानी न राहता हे स्मारक जिवंत कसं होईल, भावी पिढ्यांना प्रेरणा देणारं कसं बनेल याची घेतलेली काळजी अशा अनेक पैलूंचा अभ्यास व्यवस्थापन शास्त्राच्या अंगाने त्यांनी केला. प्रा. सुभाष भावे यांनी लिहिलेल्या आणि दत्ता पंचवाघ यांनी मराठीत अनुवाद केलेल्या या पुस्तकात आपण हे सारे वाचू शकाल.
मा. एकनाथजी यांचा जीवनपट, त्यांचा अल्पपरिचय, दृष्टी आणि ध्येय, नियोजन आणि व्यूहरचना, संघटन, प्रकल्प व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, संपर्क, केंद्र प्रार्थना आणि सेवा कार्य अशा प्रकरणांमधून हे पुस्तक उलगडत जाते. कन्याकुमारीला सागराच्या मध्यभागी स्मारक उभारण्याचे काम म्हणजे सत्त्वपरीक्षाच! त्यासाठी मनुष्यबळ कार्यरत करणं, प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवणं, निधीची उभारणी हे सगळंच जिकिरीचं. एकनाथजींनी हे  शिवधनुष्य लिलया पेललंच पण सुयोग्य कार्यशक्तीची बांधणी केली. देशाच्या राजकीय नेतृत्वाचं मन वळवलं आणि हे स्मारक अनुकरणीय ठरेल याची व्यवस्थाही लावली. हे सारं सारं वाचकांपर्यंत साध्यासोप्या आणि प्रभावी भाषेत आणण्याचं आव्हानात्मक काम या पुस्तकाच्या निमित्तानं झालं आहे. त्यासाठी भावे यांनी सुमारे दहा महिने अभ्यास केला. समर्पक व्यवस्थापन क्षेत्रे निश्‍चित केली. वीसेक हजार पत्रे अभ्यासली. एखाद्या पीएचडीसाठी जे कष्ट घ्यावेत तितकेच किंबहुना त्याहून अधिक कष्ट प्रा. भावे यांनी या पुस्तकासाठी घेतलेत.
एकनाथजींनी शिलास्मारकाच्या कामाविषयी सल्लामसलत करण्यासाठी सहा जणांची भेट घ्यायचे ठरवले. त्यात डॉ. राधाकृष्णन, पं. जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, एम. सी. छागला, रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष आणि कांची कामकुटी पीठाचे शंकराचार्य यांचा समावेश होता. पं. जवाहरलाल नेहरू वगळता सर्वांची त्यांनी भेट घेतली. लालबहाद्दूर शास्त्री एकनाथजींना म्हणाले, ‘‘तुम्ही एकटे पंडितजींना भेटू नकात. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होता, त्यामुळे ते तुम्हाला योग्यप्रकारे समजून घेणार नाहीत. हे लक्षात घेऊन मी तुम्हाला योग्यवेळी त्यांच्याकडे घेऊन जातो!’’ पण ती वेळच आली नाही. पं. नेहरू कॉंग्रेसच्या बैठकीसाठी भुवनेश्‍वरला गेले, आजारी पडले आणि.....
शंकराचार्यांनी त्यांना सांगितले, ‘‘देव-देवतांसाठी जसे मंदिराचे आराखडे, रेखांकने बनवली जातात तसे या स्मारकाबाबत तुम्ही करू शकत नाही. तुम्ही मंदिरसदृष्य वास्तू उभारू शकता; पण ती वेगळ्या प्रकारची असावी. विवेकानंद हे देव नव्हते, ते एक मनुष्य होते.’’
स्वामी विवेकानंदांची ‘मनुष्यनिर्माण’ ही संकल्पना एकनाथजींनी प्रत्यक्षात आणली. त्यासाठी प्रामुख्याने त्यांनी अभ्यास केला तो शिवचरित्राचा! छ. शिवाजी महाराजांनी पुणे आणि परिसरातील चोवीस मावळांमधील, एकमेकांशी भांडत असलेल्या समुहांना एकत्र आणले. लोकसंग्रहाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून एकनाथजींनी तो आदर्श डोळ्यासमोर ठेवला. महाराजांचे संघटनकौशल्य आणि प्रेरणा देण्याचे कौशल्य एकनाथजींच्या जीवनकार्यातून दिसून येते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक किल्ल्यांची उभारणी करणारे छ. शिवाजी महाराज त्यांचे आदर्श होते.
एकनाथजी रानडे व्यावसायिक अभियंता किंवा लेखापाल नव्हते. तीन सागरांनी वेढलेल्या शिला खडकावर स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारणे म्हणूनच सोपी गोष्ट नव्हती. बांधकामाबाबत तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध ज्ञान असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, जेट्टींच्या बांधकामाबाबत मरीन इंजिनिअर्सशी चर्चा करून, विविध श्रेणीच्या अभियंत्यांशी विचारविनिमय करून एकनाथजींनी स्मारक उभारणीचा सखोल आणि पद्धतशीर अभ्यास केला. कामाची एक निश्‍चित दिशा ठरवली आणि तसे प्रयत्न केले. शिस्तबद्धता, आर्थिक नियोजनाबाबतची सतर्कता, लोकांना प्रेरीत करण्याची क्षमता, संपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे ते कधीही विचलित झाले नाहीत. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान एकनाथजींनी खर्‍या अर्थाने आचरणात आणले.
एका मराठी माणसाने अमराठी भागात जाऊन जगाला आदर्श ठरावे असे प्रचंड प्रेरणादायी स्मारक उभारणे, विवेकानंद केंद्राची स्थापना करून भारतभर समाजकार्याची ज्योत तेवत ठेवणे हे सोपे काम नाही. ही किमया साध्य करण्यासाठी एकनाथजी रानडे यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला, निस्वार्थ आणि खमक्या माणूसच हवा. सगळ्यांचा विरोध झुगारून देत राज्यव्यवस्थेला या कामात सहभागी करून घेणारे, विरोधकांना आपलेसे करत लोकसहभाग वाढवणारे आणि सेवा व साधना ही तत्त्वे रूजवणारे एकनाथजी रानडे म्हणूनच आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची ओळख करून देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे.
लेखक - प्रा. सुभाष भावे, अनुवाद - दत्ता पंचवाघ
प्रकाशन - विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे (020-24432342)
पाने - 200, मूल्य 150

- घनश्याम पाटील
7057292092

1 comment:

  1. खूपच छान परीक्षण केले आहे घनश्याम सर तुम्हीं. हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी असणार हे तुमच्या परीक्षणामुळे जाणवते. धन्यवाद

    ReplyDelete