Monday, February 13, 2017

विद्यार्थी साहित्य संमेलन

घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'

घनश्याम पाटील यांचे अध्यक्षीय भाषण

व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो,
सस्नेह नमस्कार!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं साहित्य संमेलन होतंय ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. यानिमित्ताने आजचे जे अनेक उत्तमोत्तम लेखक आहेत ते जोमाने फुलतील, पुढे येतील, अशी मला आशा वाटते. भारत हा असा एक देश आहे जिथे सध्या सर्वाधिक तरूणांचं प्रमाण आहे. ‘तरूणांचा देश’ अशी आपल्या राष्ट्राची ओळख आहे आणि इथली आदर्श संस्कृती आपणा सर्वांना माहीतच आहे. साहित्य संमेलनं ही अखिल भारतीय स्तरावरची होतात, विभागीय, उपनगरीय होतात. वेगवेगळ्या प्रांतांची, जाती-धर्माची आणि भाषेचीही होतात. या सगळ्या साहित्य संमेलनातून साहित्यच हरवत चाललंय, अशी खंत जाणकारांकडून व्यक्त केली जातेय. म्हणूनच अशा वातावरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे येते आणि विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेते ही खूप कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे.
मित्रांनो, मगाशी साठे सरांनी ‘चपराक’ काय आहे हे सांगितलं. तर आपली चपराक ही फक्त चुकीच्या प्रवृत्तीला आहे. आमच्या संस्थेची ‘चपराक’ ही आद्याक्षरे आहेत. चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष! आज या व्यासपीठावर आल्यावर मला अतीव आनंद वाटला; कारण माझ्याच वयाची मुलं पुढं येऊन साहित्यासाठी काहीतरी करत आहेत. खरंतर आपण कायम विद्यार्थीच असतो. आपल्या शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच असते. मी आठवीच्या वर्गात असताना दै. ‘तरूण भारत’ला वार्ताहर होतो. दहावीत शिकत असताना दै. ‘संध्या’ला उपसंपादक होतो आणि बारावीच्या वर्गात शिकत असताना ‘चपराक’ सुरू केलाय. हा विद्यार्थी शक्तीचा विजय आहे. हे यश माझ्या एकट्याचे नाही. आज ‘चपराक’चे सहा राज्यात सभासद आहेत. ‘चपराक’मुळे अनेक प्रतिभावंत महाराष्ट्रासमोर आलेत. त्यातलं एक उदाहरण याच व्यासपीठावर आपल्या समोर आहे, ते म्हणजे सागर कळसाईत! सागरने वयाच्या बावीसाव्या वर्षी ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. पुण्यातल्या प्रकाशकांनी अर्थातच नेहमीप्रमाणे दोन कारणे सांगितली. बावीस हे काही कादंबरी लिहिण्याचे वय नाही आणि दुसरे म्हणजे तू पुण्यातला नाहीस! ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली आणि प्रकाशक या नात्याने, सागरचा मित्र या नात्याने सांगायला अभिमान वाटतोय की, मागच्या चार वर्षात या कादंबरीच्या चार आवृत्या संपल्या असून आता पाचवी आवृत्ती येतेय. लवकरच सागरच्या कादंबरीवर चित्रपटही येतोय. इतकंच नाही, तर ‘सकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मध्यंतरी एक सर्व्हे केला की, ‘आजचे तरूण वाचतात तरी काय?’ आणि त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या महाविद्यालयात तरूणांशी संपर्क साधून त्यांच्या सर्व आवृत्यांना त्याचे निष्कर्ष पहिल्या पानावर छापले होते. त्यात पहिल्या क्रमांकाला सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ होती, दुसर्‍या क्रमांकाला ‘शाळा’ होती आणि तिसर्‍या क्रमांकाला आमच्या सागरची ‘कॉलेज गेट’ होती. आजचे तरूण काय वाचतात, काय लिहितात यासाठी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
आता आपण थोडंसं मागं जाऊया! 12 जानेवारी 1863! या दिवशी एका महान युगपुरूषाचा आपल्याकडे बंगालमध्ये जन्म झाला. त्यांच्या प्रतिमेचं आत्ताच पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. 1880 चा तो कालखंड. हा तरूण त्याच्या गुरूकडे गेला. गुरू कालिकादेवीच्या पूजेत मग्न होते. त्याने गुरूंना वंदन करून सांगितलं, ‘‘गुरूवर्य, सध्या मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या वडिलांचं निधन झालंय. मला प्रचंड नैराश्य आलंय. हे जग सोडून कुठंतरी दूर निघून जावंसं वाटतं.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘का तुला असं वाटतं? तू तर एक संन्यस्त वृत्तीचा राष्ट्रप्रेमी तरूण आहेस... हा विचार तुझ्या मनात का यावा?’’
त्या तरूणानं सांगितलं, ‘‘हे दुःख, या वेदना फक्त माझ्यासाठी नाहीत. मला माझ्या आईच्या वेदना पाहवत नाहीत. बहिणीच्या डोळ्यातले अश्रू अस्वस्थ करतात. त्यातून मी प्रचंड बेचैन झालोय.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘ठीक आहे. आत कालिकादेवीच्या समोर जा आणि तुला हवं ते माग. तुझं हे दुःख दूर व्हावं यासाठी कालिकामातेकडे साकडं घाल. ही माता तुला दुःखमुक्त करेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.’’
हा तरूण पुढं गेला. डोळे भरून कालिकादेवीला बघितलं. त्याला स्वत्वाचा विसर पडला आणि भारावून जात त्यानं मागणं मागितलं, ‘‘माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’
गुरूंनी विचारलं, ‘‘काय रे, आईचं, बहिणीचं दुःख दूर कर, असं तू देवीला सांगितलंस का?’’
तो म्हणाला, ‘‘मी हे विसरूनच गेलो.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘पुन्हा आत जा. तुला जे हवं ते माग...’’
पुन्हा हा तरूण आत गेला. कालिकादेवीकडं पाहत त्याच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडले, ‘‘माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ आणि त्यातूनच भगवान रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं, ‘‘नरेंद्रा, तुझा जन्म मानवी कल्याणासाठी आहे. तू राष्ट्राला नवा विचार देऊ शकतोस. अनेकांचा उद्धारकर्ता होऊ शकतोस. तू नेहमी स्वतःचा नाही तर समाजाचा, राष्ट्राचाच विचार करशील...’’ आणि आपण सर्वांनी त्यांनी पुढे घालून दिलेला आदर्श बघितलाच आहे.
मगाशी संस्काराचा विषय निघाला. साठे सरांनी सांगितलं, आजचे हे विद्यार्थी संस्कार जिवंत ठेवत आहेत. खरंय हे! ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात. काहीवेळा माणसंही मरतात! मात्र जिथं संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हा संस्कारांचा दुष्काळ पडू नये यासाठी आपण तरूणांनीच पुढं येणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थी परिषदेनं एक पाऊल पुढं टाकलंय ही म्हणूनच आत्यंतिक अभिमानाची बाब आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या येरवडा शाखेचं हे पहिलंच साहित्य संमेलन आहे. ही परंपरा पुढं कायम चालू रहायला हवी. यात सातत्य रहायला हवं. पुढच्या वर्षी तुम्ही या संमेलनाचं आणखी चांगलं नियोजन करा. आमचं ‘चपराक‘चं पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल. एक मोठ्ठं साहित्य संमेलन, राज्यस्तरीय, ज्यात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी सहभागी होताहेत आणि येरवडा शाखा त्यासाठी पुढाकार घेतेय असं चित्र दिसायला हवं. आपल्यापैकी जे लिहिते हात आहेत त्यांना बळ मिळायला हवं. त्यांची पुस्तकं या विद्यार्थी साहित्य संमेलनात प्रकाशित व्हायला हवीत. प्रकाशक या नात्यानं मी नक्कीच त्यात पुढाकार घेईन, हे या निमित्तानं सांगतो.
आपण सारेजण विद्यार्थी आहोत म्हणून काही गोष्टी मांडतो. आता ग्रीस देशाकडे वळूया. ग्रीसमध्ये उत्तमोत्तम नाटके व्हायची. ही नाटकं करताना पात्र कुणाचं आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे राजा कोण, प्रधान कोण, राणी कोण, सेवक कोण हे कसं ओळखायचं? मग त्यासाठी ‘पर्सोने’ तयार केले गेले. पर्सोना म्हणजे मुखवटा. हे मुखवटे सगळ्यांना दिले गेले. हा राजाचा मुखवटा, हा राणीचा मुखवटा, हा प्रधानाचा तर हा शिपायाचा मुखवटा. त्यातून कळायला लागलं की हे पात्र नक्की कुणाचं आहे ते! हा जो ‘पर्सोना’ आहे त्यातूनच पुढं ‘पर्सनॅलिटी’ हा शब्द आला. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्त्व! आपल्या सगळ्यांना एक व्यक्तिमत्त्व असतं. ते वैचारिक, बौद्धिक तर असतंच पण शारीरिकही असतं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्त्व असतं. एक चेहरा, मुखवटा असतो. इथं जमलेल्या प्रत्येकाला एक मुखवटा आहे, व्यक्तिमत्त्वही आहे. त्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार अशा संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त होतो. यातून तुमचं व्यक्तिमत्त्व पुढं यायला हवं. यातूनच चांगले लेखक, कलाकार भेटतील.
साठे सर बीएमसीसीला प्राध्यापक आहेत. कालच मला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांचा फोन आला. त्यांना बोलताना मी सहज सांगितलं की, ‘‘उद्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं साहित्य संमेलन आहे आणि मी संमेलनाध्यक्ष आहे.’’ त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी माझं अभिनंदन केलं. तेही बीएमसीसीला प्राचार्य होते. आजचे त्यांचे वय 88! आजही ते सातत्याने उत्तमोत्तम लिहितात. त्यांनी सांगितलं, ‘‘संदीप खर्डेकरला माझा नमस्कार सांगा...’’ आता संदीप खर्डेकर राजकारणात सक्रिय होऊन खूप दिवस झालेत. आज ते विद्यार्थी परिषदेतही नाहीत, पण ही ओळख विद्यार्थी परिषदेमुळे अशा नेत्यांना मिळते. यातूनच अनेक नेते तयार होतात. हे या विद्यार्थी परिषदेचं यश आहे. म्हणूनच यातून आणखी प्रज्ञावंत, कलावंत पुढे यायला हवेत. तुमचं क्षेत्र कोणतंही असेल, तुम्ही कुठलंही काम करा. माणूस म्हणून असलेलं ‘चांगुलपण‘च तुम्हाला तारून नेणार आहे एवढं लक्षात ठेवा. असं चांगूलपण ही खरी गौरवाची बाब असते.
आज याठिकाणी तुम्ही कवी संमेलन ठेवलं आहे. पथनाट्य सादर करत आहात. लघुचित्रपट आणि चित्रांची आर्ट गॅलरीही आहे. ही खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. यानिमित्तानं मुलांमधलं टॅलेंट पुढं येतं. तुम्ही लिहित रहा, वाचत रहा, नाचावंसं वाटतं नाचत रहा, गावंसं वाटतं गात रहा. ज्याला जे जमेल त्याने ते करावे. क्षमता असूनही काहीच न करणे हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे आणि आपण सर्वजण तो सातत्यानं करतोय. गाणं सुंदर गाता येतं पण गात नाही. वेळच नाही आपल्याकडं. छान कविता करता येते पण करत नाही. उत्तम कादंबरी लिहिता येते पण लिहित नाही. मग आपण दोष कुणाला देणार?
मगाशी सरांनी सांगितलं की, इथं असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची क्षमता आहे. हो, आहे! निश्‍चितच आहे! पण ती क्षमता दिसायला हवी ना? त्याची अभिव्यक्ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं तुमच्या क्षमता दाखवून द्यायला हव्यात. संस्कार जिवंत ठेवायचं पवित्र कर्तव्य आपण सार्‍यांनी मिळून पार पाडायला हवं. तरूणाई म्हणजे एक जाज्ज्वल्य आविष्कार, जबरदस्त उन्मेष! आपल्यात खूप काही आहे. प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेचा आपण राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा. सध्या हे चित्र दुर्मीळ दिसतंय. आपल्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. धर्माधर्मात आपण वाटले गेलोय. देश विकलांग होत चाललाय. म्हणजे आपण हे जातीय मोर्चे पाहतोय. कुणाचा थांगपत्ता कुणाला नाही. सगळ्या विचारधारा... त्याही लादल्या जातात. शब्दशः कुठल्याही विचारधारेला बळी पडू नकात. सगळे काही पडताळून पहा आणि मग अनुनय करा. म्हणजे, स्वामीजीच म्हणायचे, ‘‘आपल्या राष्ट्राला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही.’’ तर असे बौद्धिक क्षत्रिय खरोखर निर्माण व्हायला हवेत. म्हणजे धर्म कशात आहे? खरा धर्म कोणता? स्वामीजीच सांगतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’ स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणं तो खरा धर्म! स्वतःतल्या क्षमता ओळखायला हव्यात. त्या आणखी विकसित करायला हव्यात आणि त्यातून व्यापक राष्ट्राची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास आणायला हवी. म्हणजे अब्दुल कलामांनी सांगितलं, 2020 ला आपला भारत हा महासत्ता असेल. अरे, कसा असेल? आपण त्यासाठी निश्‍चित काय करतोय? आपले काय प्रयत्न आहेत? कोण कुठला कन्हैया कुमार उगवतो आणि राष्ट्रविरोधी घोषणा देतो. सैनिकांवर आरोप करतो. देश पेटवतो. त्याचे पडसाद पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत उमटतात. हे कसले भिकार लक्षण आहे? हे सगळं थांबायला हवं. आपली प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी आहे.
सध्या सगळ्या क्षेत्रांचं बाजारीकरण झालंय. हे बाजारीकरण थांबायलाच हवं. म्हणजे मी अनेक ठिकाणी फिरत असतो. बरेचजण मला विचारतात, ‘‘तुमचे आईवडिल तुमच्याकडेच राहतात का?’’ मी सांगतो, ‘‘नाही, मी माझ्या आईवडिलांकडे राहतो.’’ स्वतःचे कुटुंब, आईवडील यांचीही आपण पर्वा करत नाही आणि जगाशी संपर्क वाढवायला निघालोय. मग भाजी बिघडलीय असं नवर्‍यानं सांगितलं तर बायको म्हणणारच, ‘‘असं कसं, याच भाजीला मला 300 लाईक आणि 102 कमेंट आल्यात. अनेकांच्या तोंडाला पाणीही सुटलंय.’’ घरात काय चाललंय, आजुबाजूला काय चाललंय, गावात काय चाललंय हे माहीत नसतं आणि यांच्या जगभरच्या चर्चा सुरू असतात. बराक ओबामानं असं करावं, नरेंद्र मोदींनी हे केलं, मायावती हे करताहेत, ममता बॅनर्जी ते करताहेत! अरे, आता तू काय करतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे आपलं पडणारं प्रत्येक पाऊल विकासाच्या दृष्टिनं जायला हवं. आपण आधी ‘माणूस‘ म्हणून संपन्न व्हायला हवं. त्यासाठी आपले मुळात काय प्रयत्न आहेत? आपण सर्वजण विद्यार्थी आहोत म्हणून बोलतो... सगळ्यात मोठं ज्ञानकेंद्र कोणतं? तर विद्यापीठ!! महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या फक्त कुलगुरूंची नावं तुमच्यापैकी एकानं जरी सांगितली तरी मी माझं भाषण इथंच थांबवतो. एकही शब्द मी पुढं बोलणार नाही. कसले सल्ले देणार नाही, युवा पिढीची चिंता करणार नाही. कितीजण ही सगळी नावं सांगू शकतील? आहे तुमच्यापैकी कुणाला माहीत? मग ही शोकांतिका नाही का? यादृष्टिने काही विचार होणार का? ज्ञानकेंद्र दुर्लक्षित आहेत... इंग्लंडसारख्या राष्ट्रात तुम्ही गेलात तर ते सांगतील, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू; पण आमचा शेक्सपिअर आणि आमचं क्रिकेट आम्ही कुणालाच देणार नाही...’ याला म्हणतात अस्मिता! आपली भाषा, आपली संस्कृती, आपले खेळ यासाठी आपण काय करतोय? इथले मराठमोळे खेळ जिवंत रहावेत यासाठी कोणी काही प्रयत्न करतंय का? क्रिकेटवर तुम्ही जरूर प्रेम करा पण कबड्डीची काय अवस्था आहे हेही बघा. आपल्या खेळाडूंची, इथल्या मातीतल्या कलावंतांची काय उपेक्षा आहे ती बघा. याला कोणीच काही उत्तर देत नाही तर ही जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. म्हणजे ही माझी जबाबदारी नाहीच! पण तसं नाही मित्रांनो! आपलं टॅलेंट ओळखायला हवं. आपल्यातल्या क्षमता जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात. एक चांगलं राष्ट्र, एक चांगलं राज्य, एक चांगलं गाव आणि एक चांगलं कुटुंब निर्माण व्हायला हवं. अर्थात याची सुरूवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी. मला खात्री आहे, तुम्ही नक्कीच या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकाल. उत्तमोत्तम लिहित रहा. अभिव्यक्ती महत्त्वाची. तुमच्या साहित्याला ‘चपराक‘च्या माध्यमातून एक सशक्त व्यासपीठ मिळेल. साठे सर, मगाशी तुम्ही आजच्या विविध ‘डे’ज विषयी जे सांगितलं त्याचा मला अनुभव नाही. दहावीत असताना मी उत्तम वार्तांकन करत होतो आणि बारावीत असताना मी ‘चपराक’ सुरू केला. त्यामुळं परीक्षेपुरताच कॉलेजात गेलो. कॉलेजशी तसा काही फारसा संपर्कच नव्हता. म्हणून या सर्व ‘डे’ज पासून दूर राहिलो.
तुम्ही जर चांगलं शिकलात तर अशा उत्तमोत्तम संमेलनांचं आयोजन करू शकाल! आणि शिकण्याबरोबरच स्वतःतल्या क्षमता विकसित केल्या तर तुम्हाला माझ्यासारखं अध्यक्ष म्हणून या खुर्चिवर बसता येतं. अर्थात, शिक्षण महत्त्वाचंच आहे. विनोदाचा भाग सोडून द्या पण स्वतःला घडवा. आजकाल कुणीही तुमच्यासाठी काहीही करणार नाही. आता कोणताही परमेश्‍वर तुमच्या भल्यासाठी येणार नाही. आपण जे काही उत्तमोत्तम करू तेच सत्य आणि चिरंतन असणार आहे. ‘राष्ट्र’ ही संकल्पना खूप व्यापक असते. ती आपण सातत्याने समजून घेऊ! सुरूवात स्वतःपासून करू!
आपल्यापैकी कितीजण रोज किमान दहा मिनिट व्यायाम करतात? म्हणजे श्‍वासोच्छ्वास आपण कुणाला विचारून करतो का? तो ठरवून करत नाही तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच रोज व्यायाम ही सुद्धा एक गरज आहे. रोज किमान अर्धा तास अवांतर वाचन ही गरज आहे. याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. सगळ्या जगाचा ठेका माझ्याकडेच आहे, मलाच जग सुधारायचंय अशा आविर्भावात आपण असताना आपण स्वचिंतन करत नाही. स्वविकास साधत नाही. स्वतःकडं आपण लक्षच देत नाही, ही शोकांतिका आहे. ती थांबवायला हवी. या संमेलनातून ते साध्य होईल, तुमच्यात ती जागृती निर्माण होईल, अनेक कलाकार पुढे येतील, त्यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या तरूणाईचा हा हुंकार आहे. तो सर्वदूर पोहोचेल. यातून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी अशी संमेलने होतील अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या येरवडा शाखेला धन्यवाद देतो आणि थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

6 comments:

  1. घनश्याम जी, भाषण खूपच अभ्यासपूर्ण झाले आहे.

    ReplyDelete
  2. सडेतोड,मोजकं व प्रभावी नेहमीप्रमाणेच "दखलपात्र"

    ReplyDelete
  3. घनश्याम सर खूपच प्रगल्भ भाषण होते तुमचे हे. तरुणाईला साद घालणारे व कष्टाने मिळविलेल्या एका यशस्वी प्रकाशक संपादकाचे हे नुसतेच भाषण नाही तर ह्या विद्यार्थ्यांना विचार करायला लावून आचरणात आणयला नक्कीच उद्युक्त करेल. अभिनंदन सर.

    ReplyDelete
  4. विचारांची स्पष्टता आणि प्रगल्भता केवळ प्रशंसनीय .विद्यार्थाना केलेले मार्गदर्शन डोळस तर आहेच पण अंतर्मुख करणारे सुध्दा . ही तुमची वाटचाल आमच्यासाठी अभिमानास्पदच

    ReplyDelete
  5. अल्प वयात सुरु केलेली पत्रकारिता त्यातून आलेली साहित्यक प्रगल्भता,विचारांची स्पस्टता,वडील भावाच्या नात्याने विद्यार्थ्यांना केलेले बहुमोल मारगदर्शन पुढील संमेलने भरविण्यास प्रेरणादायी ठरेल

    ReplyDelete
  6. सर आपले मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी होते

    ReplyDelete