Saturday, February 11, 2017

आपण 'समजदार' आहोत!

आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेले तर ते ‘गद्दार’; मग जे दुसर्‍या पक्षातून आपल्याकडे येतात त्यांचं काय?
‘ते त्यांचं ‘हृदयपरिवर्तन’ होय!’
अशीच काहीशी अवस्था सध्या सर्वत्र निर्माण झालीय. सकाळी ‘राष्ट्रवादी’चा प्रचार करणारा कार्यकर्ता संध्याकाळी ‘भाजप’च्या उमेदवारीचे ‘तिकिट’ घेऊन आलेला असतो. हे सारे आजच्या काळात आश्‍चर्यकारक नसले तरी नैतिकतेच्या मात्र सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. पक्षनिष्ठा, श्रद्धा, विचारधारा हे व असे सारे निकष कधीच मातीमोल झाले आहेत. राजकारण म्हणजे पैसा खाण्याचा अड्डा झाल्याने कुणालाच कसली चाड राहिली नाही. आपल्या लोकशाहीप्रधान देशाचं हे दुर्दैवच खरं!
‘पार्टी विथ डिफरंट’ अशी जाहिरात करणार्‍यांना सांगावेसे वाटते, बाबांनो, वेश्येने पतीव्रता धर्म शिकवू नये! तुम्हाला ज्या काही खटपटी करायच्या आहेत, त्या करा! फक्त आता समाजसेवेचा, राष्ट्रनिष्ठेचा आव आणू नकात! नीतिमत्तेचे धडे आता तुमच्याकडून घ्यायची आम्हाला गरज नाही. ‘देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला’ अशी काहीशी या लोकांची अवस्था झालीय. ज्या पक्षात नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर असे चारित्र्यसंपन्न नेते आहेत त्याच पक्षाची ही साठमारी पाहून कोणत्याही सामान्य माणसाला आत्यंतिक वेदना झाल्यावाचून राहणार नाहीत.
मागे मी एका उमेदवाराचे उदाहरण दिले होते. तो निवडणुकीतील प्रचारसभेत भाषण देत असतो. तो म्हणतो, ‘मित्रांनो, मागच्या खेपेला तुम्ही मला निवडून दिलं त्यायेळी माझ्याकडं काई बी नव्हतं. अंगावरच्या कपड्यानिशी मी गावाकडून आलतो. तुमचे आशीर्वाद मिळाले अन् नगरसेवक झालो. आज मला कशाचीबी कमतरता नाय. दोनशे एकर जमीन हाय, तीन चार बंगले हाईत, गाड्या हाईत. आख्खा पेट्रोल पंप हाय, हॉटेल हाय. तुमच्याकडं रोज पाण्याचा टँकर बी म्याच पाठवतो. म्हणून तुम्हास्नी इनंती हाय, यंदाबी मलेच निवडून द्या. म्हंजी मी आता तुमची कामं करू शकंल... अन् ध्यानात ठेवा, तुम्ही माझ्याबिगर कुणालाबी निवडून दिलं तरी त्याला माझ्याएवढं संमध करण्यात पुढची पाच वर्षे अशीच निघून जातील. त्यामुळं तुम्ही मला अजून एक संधी द्या... आता तर मी तुमची कामं करू शकंल...’
अशीच काहीशी आपली अवस्था झालीय. कालपर्यंत जे गावगुंड म्हणून आपल्याला माहीत होते, ज्यांच्या नावाचाही तिरस्कार वाटत होता ते सारेच्या सारे आज ‘कमळाबाई’ सोबत आहेत. हातातलं घड्याळ काढून त्यांनी कमळाचा पंचा गळ्यात अडकवलाय. ‘अर्ध्या चड्डीतले आणि दंड हातात घेऊन संचलनात सहभागी झालेले’ फोेटोही त्यांनी गावभर लावलेत. याला काय म्हणावे?
लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. जी कामं आपल्याला वेळेअभावी करता येत नाहीत, ती करावीत म्हणून आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो. त्यांनी यंत्रणेकडे पाठपुरावा करावा, जनहिताचे, लोककल्याणकारी निर्णय घ्यावेत अशी आपली रास्त अपेक्षा असते. मात्र होतेय उलटेच. हे ‘सेवक’च ‘मालक’ बनू पाहत आहेत. ज्याच्याकडून ‘दान’ घेतलं त्या धन्याला लुबाडण्याचे उद्योग सातत्याने सुरू आहेत. आम्हालाही त्याची ना खंत, ना खेद. दरवर्षी पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
सातत्याने ‘बौद्धिक’ वर्गात गुंतलेल्या आणि संस्कारांचा टेंभा मिरवणार्‍या भाजपात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतले सारे गुंड गोळा झालेत. इतर पक्षातली जी संघटीत गुन्हेगारांची टोळी होती ती सारीच्या सारी आता भाजपमध्ये दाखल झालीय. ज्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली, ज्यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढून टाकला ते आज भाजपसोबत आहेत. एकेकाळी ‘हुसेनभाई बिफ मार्केट’चे उद्घाटन करणारे गिरीश बापट आज पुण्याचे पालकमंत्री आहेत. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात किती शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्या, किती जनावरे मेली’ याचे पाढे ते जनतेसमोर वाचत आहेत. भारतीय जनता पक्षाचा खरा चेहराच यामुळे पुढे येत आहे.
आमच्या पुणेकरांनी आठ आमदार आणि एक खासदार भाजपचा दिला. ज्यांच्याविरूद्ध हा रोष प्रकट झाला ते सारेच्या सारे आज भाजपमध्ये आहेत. आमदार अनिल भोसले, त्यांच्या पत्नी, बावधनचे दिलीप वेडे, किरण दगडे अशी काही उदाहरणे प्रातिनिधिक म्हणून घेता येतील. बावधन आणि परिसरात गोरख दगडे नावाचा एक उमदा कार्यकर्ता आहे. जेव्हा इथले आमदार, खासदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य सर्व काही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले होते तेव्हापासून हा पठ्ठ्या भाजपचे निस्पृहपणे काम करतोय. हा माणूस मोठ्या मताधिक्याने नगरसेवक होणार असा सगळ्यांचा समज होता. मात्र पुण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असलेला, ज्याची दारूची दुकाने हाच मुख्य धंदा आहे, ज्याने सेना-भाजपला कायम कडवा विरोध केला असा उमेदवार काही दिवस आधी भाजपात आला. पक्षाच्या आणि स्थानिक नेतृत्वाच्या ‘सर्व’ मागण्या मान्य केल्या आणि आज त्याला उमेदवारीही मिळाली. हाच प्रकार कित्येक ठिकाणी घडलाय. त्यामुळे यंदा सर्वत्र भाजपची मोठ्या प्रमाणात वाट लागेल हे सांगायला कुण्या भविष्यवेत्याची गरज नाही.
मुख्यमंत्री रोज प्रचाराच्या आखाड्यात सहभागी होत आहेत. खरेतर घटनात्मकदृष्ट्या विचार केल्यास ते एका राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना राज्यातील सर्वच लेकरे सारखी. मात्र रोज ते घसा ताणून ताणून भाजपचा प्रचार करत आहेत. भाषण करताना किती घोट पाणी प्यालो हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आणि शिवसेनेला सांगत आहेत. हा सारा पोरखेळ पाहून लोक यंदा त्यांना ‘पाणी’ पाजणार हे मात्र नक्की! असे म्हणतात की, माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये! लोकांनी चूक केली. ती पुन्हा घडणार नाही, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने यांची ‘नौटंकी’ रोज रोज पहायला मिळत आहे. पुढचे काही दिवस मनोरंजनाचे हे केंद्र सुरूच राहील. आता मात्र आपण सावध व्हायला हवे. आपले एक मत आपल्या परिसराचा, देशाचा चेहरा बदलू शकते. सुशिक्षित, सुसंस्कृत, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या, जाती-धर्माचे राजकारण न करणार्‍या, तळागाळातील लोकांशी संबध ठेवून असलेल्या, निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न उमेदवारालाच निवडून द्या! तुमचे एक मत पुढच्या पिढीच्या भवितव्याची नांदी असणार आहे हे लक्षात ठेवा.
या व्यवस्थेवर चिडलेले आणि मतदानाचे गांभीर्य नसलेले अनेकजण मतदानच करत नाहीत. असेही करू नकात. तुम्ही हतबल न होता योग्य उमेदवाराला मतदान करणे हाच राष्ट्राच्या संपन्नतेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्या शहरातील, गावातील विविध कामांचे नियोजन करणारे, विकासकामे पूर्णत्वास नेणारे आपले लोकप्रतिनिधी कणखर आणि स्वच्छ चारित्र्याचे असायला हवेत. त्यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे. वर्षानुवर्षे आपण ज्यांच्या नावाने खापर फोडतोय ते सर्वजण आपल्यातूनच निवडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना नावे ठेवण्याऐवजी आपण आपल्यात आधी बदल घडवू आणि परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल टाकू. शेवटी एकच सांगावेसे वाटते,
आपण आमदार नाही, खासदार नाही; मात्र ‘समजदार’ आहोत!
ही समज योग्य ठिकाणी दाखवली तर आणि तरच हे चित्र बदलू शकेल!
- घनश्याम पाटील, पुणे 

7057292092

1 comment: