Sunday, January 8, 2017

गडकरींचे नाटक आणि ब्रिगेडचा ‘ड्रामा!’

आपल्या समाजाला सध्या एक मोठी कीड लागलीय. सर्व महापुरूषांना आपण जातीपातीत वाटतोय. बरे, त्यांचे काही विचार अंमलात आणतोय असेही नाही. आचार्य विनोबा भावे म्हणायचे की, ‘महापुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात.’ त्यांच्या या विचाराची सत्यता गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. आमच्या जातीय अस्मिता अधिक टोकदार होत चालल्यात. यातून किमान त्या त्या समाजाचे भले होतेय असेही नाही. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने ‘समाजशास्त्रीय भूमिका’ म्हणून जातीवादाला खतपाणी घातले. त्या-त्या जातीपातीतील लोक एकत्र आल्यास त्यांच्या समस्या सुटायला हातभार लागेल अशी त्यांची भाबडी समजूत; मात्र आपण स्वार्थाच्या आणि विविध विचारधारांच्या इतके आहारी गेलोय की आपले स्वत्वच हरवत चाललेय.
पुण्यात संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही समाजकंटकांनी रात्रीतून काढून टाकला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही या दुष्कृत्याची जबाबदारी घेतली. एखादी अतिरेकी, दहशतवादी संघटना एखादा घातपात घडल्यानंतर तो आपण घडवल्याचे ज्या आविर्भावात सांगते तोच आवेश ही जबाबदारी घेणार्‍यांचा होता. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच घटना अभिमानाने मिरवणार्‍यांना काय म्हणावे? यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडणार्‍यांनी, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढणार्‍यांनी, वाघ्याचा पुतळा फोडणार्‍यांनीच राम गणेश गडकरींचा पुतळा काढून टाकला आहे. साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील धुरिणांनी या घटनेचा निषेध केला असला तरी या गुन्हेगारी कृत्याची आणि त्यांच्या निगरगट्ट मानसिकतेची गंभीर नोंद घ्यायलाच हवी.
‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेचे नुकतेच राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे. यापूर्वीही या मंडळींनी एक राजकीय पक्ष काढला होता. त्यावेळीही सपशेल तोंडावर आपटल्यानंतर त्यांनी हाच प्रयत्न पुन्हा केला आहे. सध्या पुण्या-मुंबईसह काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जनतेचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून त्यांचे असे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. नवनिर्मितीची क्षमता नसल्याने हे लोक विध्वंसच घडवणार हे पुन्हा पुन्हा त्यांच्या कृत्यातून दिसून येतच आहे. आजवर या लोकांचे भरणपोषण ज्यांनी केले त्यांच्यासाठीही ही मोठी डोकेदुखी झाली आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्यांनी काढून टाकल्यानंतर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ‘लवकरच तो त्या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्यात येईल’ असे सांगितले आहे. मुख्य म्हणजे दादोजींचा पुतळा हटवला त्यावेळीही मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच महापौर होते. जगतापही राष्ट्रवादीचेच आहेत. त्याहीवेळी ‘दादोजींचा पुतळा आठ दिवसाच्या आत पुन्हा बसवण्यात येईल,’ अशी घोषणा राजपालांनी राणा भीमदेवी थाटात केली होती. अजूनही त्याचे काय झाले हे कळले नाही.
राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक लिहिले. खरेतर ते अपूर्णच होते. त्यातील जिवाजी कलमदाने हे एक खलपात्र आहे. दुष्ट वृत्तीचे हे पात्र शिवाजी महाराजांविषयी चुकीचे बोलते. मुख्य म्हणजे याच पात्राने समर्थ रामदास स्वामी यांचीही निंदानालस्ती केली आहे. गडकरी हे काही इतिहासकार नाहीत. त्यांनी हे चरित्रात्मक लेखन केले नाही. रावणाने रामाचे गोडवे गावेत किंवा अफजलखानाने शिवाजीराजांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवताच येणार नाही. हे खलपात्र ज्या भाषेचा वापर करते ते चूक की बरोबर हा वाद होऊ शकतो. मात्र ‘महाराष्ट्र गीत’ लिहिणारे आणि लक्षवेधी साहित्य संपदा असणारे गडकरी ‘व्हिलन’च होते असा निष्कर्ष काढणे अविवेकी आहे. 1907 साली लिहिलेल्या या नाटकावरून 2017 साली ‘ड्रामा’ करणे हे निव्वळ राजकारण आहे.
चार तरूण कार्यकर्त्यांनी संभाजी उद्यानातून हा पुतळा काढला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. ही चारही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय, याचा पत्ता असणे शक्य नाही. देशभक्ती काय असते हेही यांना सांगून उपयोग नाही. मात्र हे अविचारी, तालिबानी वृत्तीचे, दहशतवादी स्वरूपाचे कृत्य आहे इतकेही कळू नये याचे आश्‍चर्य वाटते. संभाजी ब्रिगेडच्या चिथावणीवरून ज्या तरूणांनी भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड केली त्यांचे काय हाल झाले हे एकदा मुद्दामहून बघायला हवे. या कुणालाही कसल्याही नोकर्‍या मिळत नाहीत. त्यांना धड व्यवसाय-उद्योग करता येत नाही. कोर्टाच्या तारखा पडल्यानंतर उपस्थित राहण्यासाठी, प्रवासासाठीही यांच्याकडे पैसे नसतात. बाहेरचे सोडा पण कुटुंबातील सदस्यही यांच्याशी परकेपणे वागतात. अशावेळी कोणतेही ‘माफीवीर’, ‘शिवीश्री’ त्यांच्याबाजूने उभे राहत नाहीत. यांची होणारी ससेहोलपट पाहिल्यानंतर असे गुन्हेगारी कृत्य करायला कोणीही धजावणार नाही. तरूणांचा ‘ब्रेन वॉश’ करून राजकारण करणारे मात्र नामानिराळे राहतात.
पुतळ्यामुळे कुणाला फार स्फूर्ती मिळते असेही नाही. मात्र आपल्या देशात पुतळ्यांचे ‘फॅड’ आहे. त्यात सर्वाधिक पुतळे राजकारण्यांचे आहेत. काही राज्यात साहित्यिक, विचारवंत,  संतमहात्मे, समाजसुधारक, शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत; पण त्यामुळे कुणी फार प्रेरणा घेतलीय आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिलेय असेही नाही. उलट पुतळ्यांची सुरक्षा, त्यांची विटंबना यामुळे अनेक वाद निर्माण होतात. शिवसागरात तयार करण्यात येणारा शिवरायांचा पुतळा असेल, बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील पुतळा असेल किंवा आता इंदू मिलमध्ये संकल्पित असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल... या प्रत्येक पुतळ्यावर, त्या प्रकल्पावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते. पैशाचा असा बाजार मांडण्याऐवजी त्या त्या महापुरूषांचे विचार जपण्यासाठी काही करता आले तर अवश्य विचार व्हावा.
इतिहासाची तोडफोड हा तर अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय झालाय. आपल्याला हवे ते वाक्य घ्यायचे, त्याचे मागचे-पुढचे संदर्भ न लावता त्याचा अर्थ लावायचा आणि श्रद्धास्थानांना तडा देऊन राजकारण पेटवायचे हे इथल्या व्यवस्थेत काहीजणांच्या ‘उपजिविकेचे’ साधन झालेय. उदाहरणच घ्यायचे झाले तर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’चे घेता येईल. बाबासाहेबांनी लिहिले, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच...’ या वाक्यावरून आऊसाहेबांची बदनामी झाली म्हणून काहींनी महाराष्ट्र पेटवला. ते मूळ वाक्य असे होते, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच... ते म्हणजे सह्याद्री!’ यातील ‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढून टाकायचे आणि आपणच आपल्या श्रद्धास्थानांची बदनामी करायची असे निलाजरेपण काहीजण करतात.
गडकरींच्या ‘एकच प्याला’तले तळीराम शोभावेत असे काही लोक कोणत्याही काळात असतात. त्यांना पर्याय नसतो. त्यांच्या विकृत मानसिकतेचा राष्ट्राला मात्र मोठा फटका बसतो. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. रोजच्या भाकरीचा प्रश्‍न बिकट असताना आपण पुतळ्यासारख्या विषयावरून राजकारण करतोय, राज्य पेटवतोय याचे काहीच सोयरसुतक अशांना नसते. त्यांच्या बोलबच्चनगिरीला बळी पडलेल्यांची मात्र पुढे केविलवाणी अवस्था होते. ‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे मात्र अशा प्रकारानंतर मूग गिळून गप्प बसतात. त्यांचा ‘निषेध’, ‘प्रतिक्रिया’ हे सर्व काही सोयीस्कर असते.
महापुरूषही काळाच्या रेट्यात कसे दुर्लक्षित राहतात याबाबत रॉय किणीकर यांनी त्यांच्या एका रूबाईत सांगितलेय,
कोरून शिळेवर जन्म मृत्युची वार्ता
जा ठेवा त्या जागेवर पणती आता
वाचेल कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा? कशास याचे स्मरण?

गडकरींचा पुतळा काढल्याने थोडेसे विस्मृतीत गेलेले त्यांचे साहित्य पुन्हा चर्चेत आले आहे. जे ‘राजसंन्यास’ फार कुणी वाचले नव्हते ते यानिमित्ताने पुन्हा घराघरात पोहोचले आहे. गडकरींच्या नाटकावरून ‘ड्रामा’ करणार्‍यांचे हे यश आहे की अपयश आहे हे त्यांचे त्यांनीच पडताळून पहावे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

3 comments:

  1. घनश्यामसर अतिशय योग्य व संयुक्तिक विचार मांडलेत । बघुयात ह्यातरुणाईवर त्याचा कितपत परिणाम होतो ते । तुम्ही तुमच्या लेखणीच्या सहाय्याने समाजप्रबोधनाचे चांगले काम करता आहात ।
    एक आशावादी
    रविंद्र कामठे

    ReplyDelete
  2. घनश्यामसर अतिशय योग्य व संयुक्तिक विचार मांडलेत । बघुयात ह्यातरुणाईवर त्याचा कितपत परिणाम होतो ते । तुम्ही तुमच्या लेखणीच्या सहाय्याने समाजप्रबोधनाचे चांगले काम करता आहात ।
    एक आशावादी
    रविंद्र कामठे

    ReplyDelete
  3. आजच्या समाजाचे विशेषत: तरूणाईचे प्रबोधन करणारा सडेतोड लेख!

    ReplyDelete