प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी असते. समृद्ध
जीवनानुभव असल्यास आयुष्यातील असंख्य घडामोडी काव्यात्म रूप घेतात आणि
लेखणीतून पाझरू लागतात. हे झरे अविरतपणे वाहत असतात. आयुष्याची कादंबरी
कवितांच्या ओळीत विरघळून जाते आणि या सर्वोत्कृष्ट भावनांचा आविष्कार दिसून
येतो. त्यासाठी लागते फक्त थोडीशी सजगता, डोळसता आणि अर्थातच कल्पकता. जो
समाजाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो, शोधक नजरेने बरेवाईट टिपू शकतो, ज्याचा
विवेक कायम जागृत असतो तो नेहमीच संस्कारशील साहित्य जन्मास घालतो. आमच्या
‘चपराक’च्या उपसंपादिका
सौ. चंद्रलेखा बेलसरे त्यापैकीच एक.
त्यांचे हे साहित्यातले पाचवे आणि कवितांचे तिसरे पुस्तक. यासोबतच
‘सत्याभास’ हा गूढ कथांचा संग्रहही प्रकाशित होतोय. ‘माणूसपण’ ही त्यांच्या
साहित्याची जातकुळी आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून भावभावनांच्या
प्रगटीकरणाबरोबरच सत्याचा कैवार हे त्यांच्या लेखणीचे अंगभूत सामर्थ्य आहे.
प्रस्तुत संग्रहातील अनेक रचना त्याची साक्ष पटवून देतील.
‘आदिमाया,
आदिशक्ती’ या पहिल्याच कवितेतून त्यांनी स्त्रीशक्तीचा जागर घातलाय.
व्यवस्थेपुढे, निसर्गापुढे, दैववादापुढे त्या हतबल नाहीत! तर न केलेल्या
गुन्ह्याची शिक्षा देणार्या ब्रह्मा, विष्णु, महेशालाही त्या चक्क
‘निर्लज्ज’ ठरवत स्त्रीमुक्तीचा एल्गार पुकारतात. सृष्टीच्या निर्मितीचे
मूळ असलेल्या एका मातेचा हा हुंकार आहे. जुलमी शोषकांच्या विरूद्ध आवाज
उठवताना इथल्या पुरूषी मानसिकतेच्या विषवल्ली कशा फोफावल्यात हे त्या
सप्रमाण सांगतात आणि म्हणूनच आता कोणताही राम-कृष्ण आपल्या मदतीसाठी धावून
येणार नाही हे सत्य अधोरेखित करतात.
अरूण म्हणजे सूर्य आणि
‘अरूणिमा’ म्हणजे सूर्याची किरणे. ही किरणे अंधार चिरत जातात. अंधार नष्ट
करण्याचे सामर्थ्य ज्याप्रमाणे प्रकाशात असते अगदी तसेच इथले हलाहल दूर
करायचे असेल तर आपल्या लेखणीचा लखलखीत आविष्कार दाखवून द्यायलाच हवा.
चंद्रलेखाताई बेलसरे यांनी ही किमया यशस्वीरित्या साधलीय. आशयसंपन्नता,
वास्तवावर ठेवलेले नेमके बोट, दुष्ट-दुर्जनांवर ओढलेले कठोर कोरडे आणि
सज्जनांचा, सद्गुणांचा गौरव हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. आजची
मराठी कविता छंदापासून मात्र दूर चाललीय. या संग्रहातीलही बहुतेक रचना
मुक्त छंदातल्या आहेत. तंतकाव्य, पंतकाव्य आणि संतकाव्य यापुढे जाऊन आधुनिक
मराठी कवितांचा विचार केला तर अनेक प्रतिभासंपन्न कवी छंदाला, व्याकरणाला
महत्त्व द्यायचे; त्यामुळे मराठी कविता समृद्ध झाली. चंद्रलेखाताई बेलसरे
यांनी छंदाकडे विशेष लक्ष दिले नसले तरी या कवितांचे महत्त्व अजिबात कमी
होत नाही. कारण या कविता आशय आणि भावनांनी ओथंबलेल्या आहेत.
चंद्रलेखाताईंचे
यापूर्वी ‘आर्यमा’ आणि ‘अनुभूती’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत.
त्यातील ‘अनुभूती’ हा संग्रह तर भावनांच्या पातळीवर अव्वल आणि काव्याच्या
कसोटीवर चिरंतर टिकणारा आहे. स्त्रीला दिवस गेल्यापासून ते बाळाचा जन्म आणि
नंतर काही काळ आईची जी मनोवस्था असते त्या अनुभूतीचे सशक्त चित्रण त्यांनी
केले आहे. ‘अरूणिमा’ या संग्रहातीलही काही कविता त्यांनी त्यांच्या
मुलीलाच केंद्रस्थानी ठेवून केल्या आहेत. असे असले तरी या कविता त्यांच्या
वैयक्तिक किंवा कौटुंबिक ठरत नाहीत. त्या वैश्विक झाल्यात. प्रतिकात्मक
झाल्यात. सूर्यकिरणांवर काय कुण्या एकाचा अधिकार असतो? तो नित्यनेमाने
प्रकाश पेरत जातो. या प्रकाशात आपण काय ‘उजेड’ पाडायचा हे आपल्या
इच्छाशक्तीवर व कर्तबगारीवर अवलंबून असते. सूर्य त्याचे काम चोखपणे पार
पाडतो. चंद्रलेखाताईंनीही समाजाला जागृत करण्याचे काम त्यांच्या
लेखणीद्वारे केलेय. आपल्या मुलीमध्ये आपले प्रतिरूप दिसते असे सांगत त्या
लिहितात,
अशाच गौरी, दुर्गा, अंबा
अवतरू दे या पृथ्वीतलावर
शक्तीपीठाचा जागर होता
स्वर्ग अवतरे भूतलावर!
सर्व
अनिष्ठ दूर सारून पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती
या कवयित्रीची आहे. आजची पुरूषी मानसिकता सांगताना त्या लिहितात,
असा कोणताच दिवस उगवत नाही
ज्या दिवशी स्त्री मरत नाही
सावित्री, अहिल्या, सीते
अजूनही तुमची अग्निपरीक्षा टळत नाही
माणसाने
निसर्गाची प्रचंड हानी केली. स्वार्थापायी आपण वृक्षसंहार केला. धरणी
बोडकी केली. मग निसर्गही कोपला. दुष्काळांच्या झळांनी माणूस होरपळला. सगळीच
दैन्यावस्था झाली. त्यामुळे या वरूणराजाला कवयित्रीने विनवणी केली,
निसर्गाचा समतोल
आम्ही जीवापाड जपू
नाही तोडणार झाडे
त्यांचे जतनही करू
माझ्या पोरांच्या डोळ्यातील
आता अश्रू तू थांबव
दे दे जीवदान आम्हा
आता रूसवा संपव
शेवटी त्या म्हणतात
या सृष्टीची निर्माती
आज विनविते तुला
कर आम्हावर कृपा
अन् वाचव विश्वाला
आपण
सारे निसर्गाचा समतोल जपू याची सर्वांच्या वतीने ग्वाही देतानाच त्या
विश्वाला वाचवण्याची विनंती सृष्टीच्या निर्मात्याकडे करतात. यात कुठेही
वैयक्तिक स्वार्थाची जळमटे नाहीत. ही सर्वात्मकतेची भावना रूजवण्याचे कार्य
सौ. चंद्रलेखा बेलसरे यांच्यासारखे संवेदनशील साहित्यिक जोमाने करीत आहेत.
म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. विचारांचा असा हा यज्ञ नेहमीच विवेक
पेरतो. त्याची मधूर फळे समाजात ऐक्य, सामंजस्य, शांती, सुजलाम्-सुफलाम्ता
निर्माण करतात.
‘अरूणिमा’तील कवितात विषयांचे वैविध्य जबरदस्त
आहे. प्रेमविवाहापूर्वीची आणि नंतरची अवस्था, पंचवीस वर्षापूर्वी ज्याला
नकार दिलाय त्या प्रेमवीराची जाणीव, भरभरून प्रेम करण्याचा केलेला गुन्हा,
मर्यादांची लक्ष्मणरेषा, आपटे विद्यालयाजवळील आनंदयात्रींच्या स्मृती,
तारूण्याचा कालानुरूप कुचकामी ठरणारा जोश, ब्रह्मांडाच्या साक्षात्काराचे
गणित, युगुलांचा श्रावण-वसंत असे असंख्य विषय या संग्रहात आलेत. एक चिमुकली
आपल्या अशिक्षित आईला शिकून मोठ्ठं झाल्यावर काय करणार हेही सांगते.
चंद्रलेखा
बेलसरे यांनी त्यांच्या कवितेत शेतकर्यांविषयी कनवाळाही व्यक्त केलाय.
एकेकाळी शरद जोशी यांच्या कांदा आंदोलनात सक्रीय असलेल्या कवयित्रीला
शेतकर्यांच्या व्यथा-वेदना चांगल्याच ज्ञात आहेत. म्हणूनच त्या म्हणतात,
नाही पोटामध्ये अन्न
नाही प्यावयास पाणी
अशी कशी रे शेतकर्या
तुझी करूण कहाणी
तू तर पोशिंदा जगाचा
धान्य पिकवून देई
तुझे तुलाच न उरे
अशी कशी दैना होई?
या संग्रहातील ‘वेदना’ ही शेवटची कविता तर मनाचा थरकाप उडवते.
बालपणी कधीच जाणवले नाहीत
वेदनेचे डंख
मोकळ्या अवकाशात विहरत होते
लेवून स्वातंत्र्याचे पंख
असे सांगणार्या कवयित्री लिहितात,
मृत्युलाही नाही पहावले
सर्वांगावरील ते असंख्य डंख
घातली मायेची गोधडी
वेदनांचे मिटले पंख
यातील
‘वेदनांनी पंख मिटणे’ ही वाटते तितकी सोपी कल्पना नाही. त्यासाठी परपीडा
अनुभवता यायला हव्यात. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक संदर्भांचे
वस्तुनिष्ठ दर्शन घडवताना भावनाही समजून घ्यायला हव्यात. चंद्रलेखा बेलसरे
यांची ही समज त्यांच्या अंत:करणातून आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या रचनात
मानवी भावभावनांचे प्रतिबिंब चकाकत असते.
सूर्याची किरणे
ज्याप्रमाणे प्रकाशाची पेरणी करतात त्याप्रमाणेच ‘अरूणिमा’ मानवी मनातील
अंधार, जळमटं, किल्मिषं दूर सारेल असा आशावाद व्यक्त करतो आणि त्यांना भावी
लेखन प्रवासास भरभरून शुभेच्छा देतो.
घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
कवितासंग्रह - अरुणिमा
कवयित्री - सौ. चंद्रलेखा बेलसरे
प्रकाशक - 'चपराक प्रकाशन', पुणे (०२०-२४४६०९०९)
पाने - ८८, मूल्य - ८०
प्रभावी व आशयसंपन्न परीक्षण!
ReplyDeleteघनश्याम सर अतिशय काव्यमय अशी प्रस्तावना आपण अरुणिमा ह्या सौ. चंद्रलेखा बेलसरे ताईंच्या काव्यसंग्रहास लिहून तुमच्यातील एक कवी जागृत ठेवलेला आहे. हा काव्यसंग्रह मी नक्कीच वाचणार आहे.
ReplyDeleteमाझ्या ह्या काव्यसंग्रहास शुभेछ्या आणि बेलसरे ताईंचे हार्दिक अभिनंदन.
रविंद्र कामठे