Saturday, December 24, 2016

टाटायन आणि सारस्वतायन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तोंडावर आलेले असताना ‘कोण हे संमेलनाध्यक्ष?’ असे म्हणण्याची एक ‘फॅशन’ रूढ होत आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या ‘खुज्या’ अध्यक्षांनी या फॅशनला खतपाणीच घातले आहे. मात्र लोकशाही व्यवस्थेत साहित्यिक मतांच्या बळावर निवडून आलेल्या अध्यक्षांबाबत हा प्रश्‍न अप्रस्तुत वाटतो. साहित्यिकांच्या या क्षेत्रातील योगदानाबाबत, त्यांच्या विचार आणि भूमिकेबाबत मतभेद असू शकतात; किंबहुना ते असावेत! मात्र ‘कोण हे संमेलनाध्यक्ष?’ असा खुळचट सवाल करणे हे त्यांचे नाही तर आपले अज्ञान आहे. संबंधितांच्या साहित्यिक कारकिर्दीचा अभ्यास करून हे अज्ञान कुण्याही वाचकाला प्रयत्नपूर्वक दूर करता येईल.
नव्वदाव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे निवडून आलेले अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्याबाबतही एका वृत्तपत्राने ‘कोण हे?’ हा प्रश्‍न त्यांच्या स्वभाववृत्तीप्रमाणे केला. काळे यांनीही त्यांना समर्पक उत्तर दिले. ‘टाटायन लिहिणार्‍यांना सारस्वतायन वाचायला वेळ मिळत नसेल’ असे एका वाक्यात त्यांनी सर्वकाही सांगितले आहे. लेखकांच्या लेखनाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यासाठी निदान त्यांचे साहित्य तरी वाचायला हवे. इतकी तसदीही संमेलनाध्यक्षांवर टीका करणारी मंडळी घेत नाहीत. महाराष्ट्रात जवळपास तीनशे वृत्तपत्रे रोज प्रकाशित होतात. त्यातील अनेकांचा खप किमान काही हजारात आहे. मात्र तो परिसर वगळता बहुसंख्य महाराष्ट्राला या वृत्तपत्रांची नावेही माहीत नाहीत. रोज प्रकाशित होणार्‍या आणि काही हजारांच्या घरात खप असलेल्या वृत्तपत्रांची ही अवस्था! मग पाचपन्नास उत्तम पुस्तके लिहूनही ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहचली नसतील तर हा दोष कोणाचा?
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनेक मोठमोठे लेखक होते हे सत्य आहे. टीका करणार्‍यांच्या आरोपाप्रमाणे असे ‘मानदंड’ ठरणारे अध्यक्ष कदाचित आज होणारही नाहीत. हे सत्य स्वीकारताना आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आज आचार्य अत्रे, पु. भा. भावे, ग. वा. बेहेरे, प्रबोधनकार ठाकरे, गेला बाजार गोविंदराव तळवलकर असे संपादकही होणार नाहीत. त्या त्या क्षेत्रात अनेकांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरावे असे नेत्रदीपक काम केले आहे. त्यामुळे आधीच्या पिढीची तुलना समकालीन कुणाशीही होणार नाही. हे म्हणजे छत्रपती शिवरायांची तुलना त्यांच्या आजच्या वंशजाशी करण्यासारखे हास्यास्पद झाले. प्रत्येकाचे एक वेगळे महत्त्व असते. स्वयंभू प्रतिभा असते. काही क्षमता असतात. त्या ध्यानात घेतल्यास असे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. ‘केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा’ हे सांगायला आणि ऐकायला बरे वाटत असले तरी देवानंद होणेही केस वाढवण्याइतके सोपे नाही हेच आम्ही लक्षात घेत नाही. इतके साधे सुत्र कळल्यास साहित्य आणि प्रकाशन व्यवहारास आणखी गती मिळेल आणि माय मराठीची पताका सर्वदूर डौलात फडकेल.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारास या क्षेत्रातील लोकच निवडून देतात. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ, परिषदेच्या घटक संस्था, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, आयोजक समिती असा सर्वांचा त्यात समावेश असतो. अध्यक्षांना निवडून देणारी साहित्यिक आणि वाचक मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर आक्षेप घेता येणार नाही. मुख्य म्हणजे ज्यांचा साहित्याशी किंवा साहित्य संस्था, साहित्यिक उपक्रम यांच्याशी काहीही संबंध नाही अशी मंडळी अध्यक्षांवर आणि निवड प्रक्रियेवर टीका करतात. त्यांनी किमान एका साहित्य संस्थेचे सभासदत्व घ्यावे. निवडून आलेल्या अध्यक्षांची पुस्तके पहावित आणि मग खुशाल हवी तितकी टीका करावी.
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

(प्रसिद्धी : दैनिक 'लोकमत', नाशिक)


No comments:

Post a Comment