Saturday, December 10, 2016

‘स्वप्तातलं पुणं’

होय, आपला देश झपाट्याने बदलतोय. आपल्या राष्ट्राची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरू आहे. येथील समाजकारण, राजकारण अधिक प्रगल्भ होताना दिसतेय. प्रशासकीय यंत्रणा आणखी जोमाने काम करतेय. विज्ञान-तंत्रज्ञानाचा पुरेपुर उपयोग करून घेतला जातोय. अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध झाल्याने एकेक पाऊल झपाट्याने पुढे पडतेय. पोपटराव पवार यांच्यासारख्या एका दृष्ट्या माणसाने नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावचा चेहरामोहरा बदलला! त्याचप्रमाणे आपले पंतप्रधानही कार्यरत आहेत. त्यांनी काही महानगरांना ‘स्मार्ट’ करण्याचा विडा उचललाय. त्यांच्या खासदारांनी गावंच्या गावं दत्तक घेतलीत. सर्वजण खडबडून कामाला लागलेत. ‘कॅशलेस’ आणि ‘कास्टलेस’ समाज व्हावा यासाठी सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातून आर्थिक विषमतेची दरी दूर व्हावी, जातीभेद नष्ट व्हावेत असे प्रयत्न सुरू आहेत. हे सारे सुरू असतानाच येथील सामान्य माणूस आपल्या राष्ट्राबाबत, आपल्या शहराबाबत नेमका काय विचार करतो? त्याच्या स्वप्नातले शहर नेमके आहे तरी कसे? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एखाद्या राष्ट्राची प्रगती पहायची झाल्यास तेथील युवकांच्या तोंडात कोणती गाणी आहेत हे पहावे म्हणजे त्या राष्ट्राचा चेहरा तुमच्या समोर येईल असे म्हटले जाते. तद्वतच त्या राष्ट्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, लेखक, कवी आपल्या शहराबाबत काय विचार करतात याचा अभ्यास झालाच पाहिजे. दत्तात्रय वायचळ हे अशाच लेखकांचे प्रतिनिधीत्व करणारे व्यक्तिमत्त्व. संवेदनशील मनाचे वायचळ सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांचा ‘गजरा’ हा कथासंग्रह ‘चपराक‘ने प्रकाशित केलाय. त्यांच्या प्रस्तुत दुसर्‍या पुस्तकात त्यांनी भविष्यातील पुणे शहराचा वेध घेतला आहे. सध्या ‘स्मार्ट सिटी’बाबत जी चर्चा सुरू आहे त्याचा प्रभाव वायचळ यांच्या लेखणीवर पडलेला दिसतो. पुण्याचे ‘पुणेरीपण’ जिवंत ठेवत अजून पाच-पंचवीस वर्षांनी हे शहर कसे असेल, कसे असावे याबाबतचे स्वप्नरंजन त्यांनी केले आहे. मुख्य म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वेध घेताना त्यांनी केवळ चांगल्या बाजूच मांडल्या आहेत. या पुस्तकात राजेश राजाराम रेळेकर हा युवक त्याच्या काकांना पुणे शहर फिरून दाखवतो. काका अनेक वर्षापासून विदेशात स्थिरस्थावर झाल्याने त्यांना या बदलत्या शहराचे मोठे कुतूहल वाटते. रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजा तर आहेतच; मात्र शहराच्या विकासात हातभार लावणार्‍या वाहतूक व्यवस्थेपासून ते अगदी उद्याने, रस्ते, पोलीस ठाणे, विविध सेवा केंद्रे, खेळाची मैदाने, शाळा, महाविद्यालये, स्वयंचलीत बस स्थानके, पदपथ, सायकलपथ, हॉटेल्स, अन्य सेवा या सर्वांचे वर्णन वाचताना आपण एखाद्या पाश्‍चिमात्य शहरात आहोत की काय असेच वाटते. दत्तात्रय वायचळ यांनी स्थानिक महापालिका प्रशासन आणि आपल्या सत्ताधार्‍यांसमोर शहराच्या विकासाचा आरसाच ठेवला आहे. बदलते पुणे कसे असावे यासाठीचे मार्गदर्शन म्हणून या छोटेखानी पुस्तकाकडे पाहता येईल. बाहेरून येणारे लोंढे कसे थोपवायचे, येथील भूमीपुत्रांना कसा न्याय द्यायचा आणि तरीही प्रशासनाचे थोरण सर्वसमावेशक कसे असावे याचाही उहापोह वायचळ यांनी या पुस्तकात केला आहे. ‘स्वप्तातलं पुणं’ म्हटल्यावर लेखकाने पाच-पन्नास वर्षापूर्वीच्या स्मृतीची पाने चाळली आहेत की काय; असे कुणासही वाटावे मात्र त्यांनी भविष्याचा वेध घेऊन या शहराच्या विकासाचे चित्रच स्पष्ट केले आहे. लवकरच म्हणजे येत्या फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील महानगरापैकी पुणे हे एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराने सांस्कृतिक वारसाही नेटाने जपलाय. त्यामुळे या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसाठी हा खजिनाच आहे. शहराच्या विकासाचे नियोजन करताना त्यांना या पुस्तकाचा मोठा उपयोग होऊ शकतो. मुख्य म्हणजे यातील कोणतीही गोष्ट ‘अशक्यप्राय’ पठडीतील नाही. ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे ते कोणीही हे सगळे काही अंमलात आणू शकतात. आजचे हे स्वप्नरंजन उद्याचे ‘वास्तव’ असणार आहे. दत्तात्रय वायचळ हे सरकारी कर्मचारी आहेत; तसेच उत्तम ललित लेखक आणि कथाकार आहेत. त्यामुळे त्यांनी या शहराबाबत केलेले मूलभूत चिंतन शहर नियोजनात निश्‍चितच मोलाचे ठरेल. कोणतीच भूमिका घ्यायची नाही, अशी एकच भूमिका सध्याचे साहित्यिक घेत असताना वायचळांनी आपल्या शहराबाबत रंगवलेले चित्र समाधानकारक आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. मुख्य म्हणजे या पुस्तकाचे मुुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक आणि तंत्रज्ञ समीर नेर्लेकर यांनी साकारले असून तेही तितकेच बोलके आहे. आजूबाजूच्या मोठमोठ्या इमारतीपुढे ‘शनिवारवाडा’ एकदमच छोटा वाटतोय. हे आपल्याला पटण्यासारखे नसले तरी भविष्यातील वास्तव आहे. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करणारा ‘रोबोट’ दाखवून त्याला घातलेली ‘पुणेरी पगडी’ हेही कलात्मक, सूचक आणि अर्थपूर्ण आहे. हे शहर कितीही बदलले तरी त्याचा मूळचा स्वभाव जाणार नाही, साहित्य, संस्कृती, संस्कार जपण्यात पुणे कायम अग्रेसर असेल हे त्यातून स्पष्टपणे नोंदवले जाते. वायचळ यांच्या भावी लेखन प्रवासास शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांच्याकडून आणखी दर्जेदार ललित व माहितीपूर्ण साहित्यकृती निर्माण होवोत अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- घनश्याम पाटील
'चपराक प्रकाशन', पुणे 
७०५७२९२०९२

1 comment:

  1. व्वा! खूपच अप्रतिम! आपला लेख वाचून सदर पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली आहे!

    ReplyDelete