Sunday, November 11, 2018

‘राहिलेलं’ राहूच द्या!

ज्यानं खूप काही उभं केलंय, सोसलंय, अनुभवलंय त्याचं बरंच काही करायचं राहून जातं! कारण त्याची स्वप्नं, त्याची ध्येयं, त्याचं क्षितिज सगळं काही अवाढव्य असतं. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याचा परिघ असून असून केवढा? इवलंसं आयुष्य! त्यात काय करणार आणि काय राहणार? तरीही ‘राहून गेलेल्या गोष्टीं’ची विचारणा होतेच...! कोणी एकदम असं काही विचारलं की आयुष्याचं सिंहावलोकन सुरू होतं. काय राहून गेलंय याचा शोध घेताना काय काय करामती केल्यात याही डोळ्यासमोर येतात आणि मग गंमत वाटते. असो. आज फक्त राहिलेल्या गोष्टीच सांगायच्यात.

मराठवाड्यातल्या चाकूर तालुक्यातलं हिंप्पळनेर हे माझं गाव. गाव तसं छोटसंच पण आडवळणाचं. सातवीत असताना ते सोडावं लागलं. त्यानंतर आयुष्याची दिशाच बदलली. संघर्षाशिवाय काही मिळत नाही, हे परिस्थितीनुरूप बसणार्‍या चटक्यांनी शिकवलं होतं. त्यामुळं भविष्यात काय करायचंय हे त्या नकळत्या वयातच ठरलं होतं.

हिंप्पळनेरला असताना घराजवळ असलेल्या विठ्ठल-रूकमाई मंदिरातील काकडआरतीच्या आवाजानं जाग यायची. मग ‘मंजन’ घेऊन दात घासायचे, चपलात पाय ढकलायचे आणि रानाकडं पळत निघायचं. पाच-सहा किलोमीटर पळत गेल्यावर कधी विहिरीत किंवा कधी डोहात मस्तपैकी पोहायचं. त्यानंतर रानातले ताजे अंजीर, बोरं, चारं, बिब्याची फुलं, जांब (पुणेरी भाषेत पेरू), मक्याची कणसं, कोवळ्या काकड्या, भुईमुगाच्या शेंगा, उडदाच्या-मुगाच्या शेंगा, ऊस असं काहीतरी घ्यायचं आणि ते खात सावकाश घर गाठायचं. घरी आल्याआल्या चुलीवरची गरमागरम भाकरी दुधात चुरायची आणि शेंगदाणा चटणीसोबत हादडायची. त्यानंतर शाळा. आमच्या गावाजवळ असलेल्या हणमंतजवळगा या गावाजवळ असलेले वीर हनुमान विद्यालय हे चार-पाच किलोमीटर अंतरावर! अर्थात तिथपर्यंत चालतच जायचं आणि चालतच यायचं. सुटीच्या दिवशी रानातील माळवं (भाजीपाला) काढायचा आणि आठवडी बाजारात विकायचा. सगळं काही सुरळीत चाललं होतं. त्याचवेळी आमची जमीन गावकीच्या भांडणात गेली. क्षणार्धात सगळं होत्याचं नव्हतं झालं. निसर्गाच्या कुशीत वावरताना अचानक घाव बसला आणि गावाची नाळच तुटली. अजूनही हे बंध जोडता आले नाहीत. गावातलं ते मनसोक्त जगणं राहूनच गेलं. गावात काही कटू अनुभव नक्की आले. त्यामुळं मन विटलं... पण चांगुलपणाची शिदोरीही भक्कम होती. मायेच्या पदरात घेणारं गाव तुटलं ते तुटलंच!

त्यावेळची एक गंमत सांगाविशी वाटते. तेव्हा श्रीकृष्णा, रामायण या मालिकांनी सर्वांनाच भुरळ घातली होती. मीही त्याला अपवाद नव्हतो. जंगलात, डोंगरात जाऊन जप-तप केलं की देवबाप्पा प्रसन्न होतो आणि मागेल तो वर देतो हे त्यामुळं ठाऊक होतं. मग काय! एकेदिवशी जवळच्या डोंगरावर गेलो. चालून थकल्यावर डोंगराच्या सपाट भागावरील एक मोठा दगड पकडला. त्यावर बैठक मारून रामनामाचा जप सुरू केला. ‘श्रीराम जयराम जयजयराम’च्या घोषात घशाला कोरड पडली. अन्न-पाण्याचा विषयच नव्हता. मग मनातल्या मनात जप सुरू केला. त्यात तल्लीन झालो. सांच्यापार झाली, काळोख दाटला तरी घरी न आल्यानं सगळे परेशान! मग झाली शोधाशोध सुरू. नको नको त्या चर्चा. त्यावेळी मुलं पळविणारी टोळी सक्रिय होती म्हणे! सगळा गाव धुंडाळून झाल्यावर पोलिसांकडं तक्रार द्यायची ठरलं. काहींनी तर ‘नदी, डोह, विहिर इकडंही शोध घ्या’ असं सुचवलं. मग आईची रडारड. वडिलांचं उद्वेगानं चिडणं... तेवढ्यात एका गुराख्यानं सांगितलं, ‘‘मी बंटीभैय्याला माळावर जाताना बघितलं...’’

आता मात्र सगळ्यांनाच धस्स झालं! गावकर्‍यांनी कंदील घेतले आणि सगळे डोंगराच्या दिशेनं निघाले. वरपर्यंत आल्यावर बघतात तर काय, एका मोठ्या धोंड्यावर बसून एक ‘दगड’ रामनामाचा जप करत होता... मग कशा पद्धतीनं जोरदार स्वागत झालं असेल आणि कसली भारी वरात निघाली असेल हे वेगळं सांगायला हवंय का? पण मिसुरडंही न फुटलेल्या वयात साधना पूर्ण करून परमेश्‍वराकडून वरदान मागून घेणं राहूनच गेलं...

त्यानंतर नारंगवाडी गाठली. ही वाडी उमरगा तालुक्यात येते. भूकंपग्रस्त भाग. सास्तूर आणि किल्लारी या दोन महत्त्वाच्या भूकंपकेंद्रांचा मध्यबिंदू म्हणजे नारंगवाडी. तिथल्या भारत शिक्षण संस्थेच्या जयराम विद्यालयात आठवीला प्रवेश घेतला. इथलं वातावरण मात्र एकदम वेगळं होतं. आपण घर सोडून, गाव सोडून इथं आलोय याची जाणीव होती. शिवाय झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचं भूत मानगुटावर घट्ट बसलं होतं. मग कराटेचं प्रशिक्षण सुरू झालं. कधी नव्हे तो जोरदार अभ्यास सुरू झाला. अवांतर विषयांवरील वाचन झपाट्यानं वाढवलं. कुटुंबाला हातभार लावायचा म्हणून रोज पहाटे वृत्तपत्र विक्री सुरू केली. सायकलवर घरोघरी जायचं आणि पेपर टाकायचे हा दिनक्रम सुरू झाला. त्यातून माणसं कळू लागली. जगरहाटी समजली. बरे-वाईट अनुभव आले. 

या नारंगवाडीत आठवीच्या वर्गात असताना प्रारंभी मी वाचकपत्रं लिहायला सुरूवात केली. नंतर कविता, लेख, कथा छापून यायला लागल्या. गाव आणि परिसरातील छोट्या-मोठ्या बातम्या पाठवू लागल्यानं ‘तरूण भारत‘सारख्या दैनिकानं त्यांचा ‘वार्ताहर’ म्हणून जबाबदारी दिली. आपण लिहिलेलं साहित्य, आपल्या बातम्या नावासह छापून येत आहेत आणि तो अंक आपणच घरोघर वाटप करतोय याचा आनंद असायचा. सुरूवातीला काही काळ वाटायचं, परिस्थितीनं आपल्यावर ही वेळ आणलीय. विशेषतः मैत्रिणींच्या घरी पेपर टाकताना संकोचल्यासारखं व्हायचं. मात्र त्यात आपलं नाव छापून येतंंय म्हटल्यावर मग तोच अभिमानाचा विषय झाला.  या परिसरातील जमीन एकदम भुसभुशीत, काळीशार! इथं थोडी जागा घ्यावी, रानातच शेड उभारून रहावं, जनावरं पाळावीत, छान शेती करत आनंदानं जगावं असं वाटायचं! पण ते शक्य नव्हतं. ही सगळी स्वप्नं स्वप्नच राहिली. असं मस्तमौला जगणं राहूनच गेलं. 

पुढं किल्लारीतील महाराष्ट्र महाविद्यालयात दाखल झालो. तेव्हा नव्या किल्लारीत मुख्य बसस्थानकाजवळ ‘पाटील न्यूजपेपर एजन्सी’ची सुरूवात केली. स्थानिक विषयांवर जोरदार हल्लाबोल करायचा, शाब्दिक फटकेबाजी करताना कुणाचाच मुलाहिजा राखायचा नाही या वृत्तीमुळं अनेक वाद आणि वितंडवाद ओढवून घेतले. नवनव्या जबाबदार्‍या पेलल्या. हरतर्‍हेच्या आव्हानांना सामोरा गेलो. हे सगळं करताना बालपण कसं सरलं ते कळलंच नाही. सगळ्यांसोबत खेळायला जाणं, मौजमजा करणं, मोठ्यांकडून कोडकौतुक करून घेणं असलं काही वाट्याला आलं नाही. आपण भले आणि आपले काम भले असाच खाक्या! घरातील आणि नात्यातील ‘मोठ्यां’नाही माझ्या या सर्व उचापत्यांचं कौतुक वाटायचं. आज यशाचे नवनवीन उच्चांक गाठताना, व्यावसायिक विक्रम रचनाता लक्षात येतंय की, अरेच्चा! आपण तर बालपण जगलोच नाही. परिस्थितीच्या ओझ्यानं असेल किंवा महत्त्वाकांक्षेच्या ध्येयवादानं असेल पण बालपण अनुभवणंच राहून गेलं... आयुष्यातली ही महत्त्वाची वर्षे नियतीनं माझ्या आयुष्यातून बहुधा वजा केली असावीत असंच आता वाटतंय.

पुढं पुण्यात आलो. पुणे शहर आणि जिल्ह्यातील ‘संध्या’ या पहिल्या सायंदैनिकात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा वय होतं सोळा! काम करत करत शिकावं म्हणून टिळक रस्त्यावरून जवळच असलेल्या ‘गरवारे महाविद्यालयात’ बारावीच्या कला शाखेसाठी प्रवेश घेतला. तेव्हा मी पुणे महानगरपालिकेचं वार्तांकन करायचो. ‘संध्या’चा अग्रलेख लिहायची जबाबदारीही माझ्याकडं आली होती. त्यामुळं आत्मविश्‍वास दुणावला होता. त्याचकाळी ‘पत्रकारितेतील भीष्माचार्य’ अशी ओळख असलेल्या दैनिक संध्याचे संस्थापक संपादक वसंतराव तथा तात्या काणे यांनी संध्या हे दैनिक पिंपरीतील कांबळे नावाच्या एका गृहस्थास विकले. नव्या व्यवस्थापनाशी माझं काही जुळलं नाही आणि मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘वयाने कमी, पुण्यातील नाही आणि अजून शिक्षणही पूर्ण नाही’ म्हणून इतर वृत्तपत्रांनी कामाची संधी काही दिली नाही. एखादा मासा पाण्याबाहेर राहू शकेल काय? अगदी तशीच माझी तडफड सुरू झाली आणि मग त्या उद्रेकातून मी स्वतःचीच संस्था सुरू करण्याचा घाट घातला. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ‘मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक’ असं बिरूद माझ्या नावामागं लागलं. मग सगळ्यांच्या अपेक्षा कैकपटींनी वाढल्या आणि एका नव्या अध्यायाची सुरूवात झाली.

एकीकडं संपादक, लेखक आणि प्रकाशक म्हणून लौकिक मिळत होता तर दुसरीकडं मोरपंखी दिवसांची चाहूलही स्वस्थ बसू देत नव्हती. बेभान होऊन प्रियतमेसोबत पतंगप्रीती करावी असं या वयात कुणाला बरं वाटणार नाही? आपलं वय आपल्या हातून काही प्रमाद घडवून आणतं. दुर्मीळात दुर्मीळ अपवाद वगळला तर हा निसर्गनियमच आहे. मी  अपवाद नव्हतो, हे काय वेगळं सांगायला हवं? मीही एका पुणेरी छोकरीच्या प्रेमात पडलो. पुण्यातल्याच पोट्ट्या या! आमचं बिनसलं आणि माझ्या लक्षात आलं की, भाऊ हे आपलं काम नाही. मुळात कुटुंबासाठी आपण वेळच देऊ शकत नाही तर कुणाचं आयुष्य का बरबाद करा? आपल्या समाजात बाबा आमटेंची कमतरता नाही, त्यांची ‘साधना’ बनायला मात्र आजकालच्या मुली तयार नसतात. मग त्या विषयाला मी कायमचा पूर्णविराम दिला. अविवाहीत रहायचा निर्णय पक्का केला आणि माझ्या कामाचा रथ अजून जोरात दामटला. त्या निर्णयाचं आज समाधान वाटतंय. लग्न करणं, मुलांचं संगोपन, त्यांचे लाडप्यार ही सगळी स्वप्नं मी बघितली होती पण त्या सगळ्यांचा ‘खेळखंडोबा’ होऊन बसला. जबाबदार्‍यांच्या ओझ्यांनी जसं बालपण गेलं तसं परिस्थितीच्या प्रवाहात तारूण्यही संपत आलंय. आईवडिलांची काळजी घेणं, त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणं, त्यांना हवं-नको ते बघणं हे सोडलं तर कुटुंबाच्या, परिवाराच्या अन्य जबाबदार्‍या माझ्यावर पडल्या नाहीत. त्यामुळं हे असले सगळे ‘उद्योग’ करणं राहूनच गेलं...

‘करून दाखवलं’ या सदरातली काम विचाराल तर ती ढिगभर होतील. ‘करायची कामं’ विचाराल तर मग पर्वतच! त्याच्यापुढं राहून गेलेल्या गोष्टी नगण्यच! म्हणून त्याचं वैषम्य वाटत नाही. 

श्री, म्हणजे श्रीराम हा माझा सख्खा छोटा भाऊ! त्याच्या लग्नाला जाण्याइतका वेळही माझ्याकडं नव्हता. माझ्या व्यवसायाची ही हतबलता आहे. चुलत भाऊ-बहिणी, आते-मावस भाऊ-बहिणी ही तर फारच दूरची गोष्ट. बाहेर खंडीभर माणसं जोडलीत. अवतीभोवती माणसांचाच सागर असतो. मात्र आईवडील सोडले तर बाकी रक्ताच्या कुठल्याच नात्याशी कसलेच पाश राहिले नाहीत. त्यामुळं गर्विष्ठ, अहंकारी, कूपमंडूक, एकलकोंडा अशी माझ्याविषयी मतं बनणं यात नवल नाही. पहाटे साडेतीनला सुरू झालेला माझा दिवस रात्री अकरा-साडेअकराला संपतो तर मग हे सगळं कसं सांभाळणार? प्रत्येकांचे रूसवे-फुगवे कसे काढणार? नातेवाईकांच्या सुख-दुःखात सहभागी कसा होणार? त्यामुळं सगळ्यांविषयी हृदयात व्यापक, उदात्त भावना असून, प्रेमाचा सागर ओथंबून वाहत असूनही या सर्वांपासून दूर लोटला गेलो. या सगळ्यांसोबत ‘जगणं’ राहूनच गेलं की!

आम्हा मराठवाड्यातल्या लोकांवर भूकंपानं एक उपकार केलाय. कितीही मोठं संकट आलं तरी आम्हाला ते कस्पटासमान वाटतं. मृत्युचं तांडव बघितलंय आम्ही! या वेदनेपेक्षा मोठी भळभळती जखम अजून कोणती असू शकते? त्यामुळं कितीही संकटं आली, प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, काही कारणानं होत्याचं नव्हतं झालं तरी आम्ही खचत नाही, डगमगत नाही. पुन्हा नव्यानं तितक्याच जोमात, दमदारपणे सुरूवात करतो. ‘चार द्यायचे आणि चार घ्यायचे’ इतकं साधं सूत्र! मग कसलाच त्रास होत नाही. कितीही गोष्टी राहून गेल्या तरी नवनवीन आव्हानं आम्हाला खुणावत राहतात. म्हणूनच वैयक्तिक आयुष्याची राखरांगोळी झाली तरी मी त्यावर आनंदानं तुळशीपत्र ठेऊ शकलो. जे घडणारच नाही त्याचा शोक का बाळगावा? 

साहित्य, ग्रंथ प्रकाशन आणि पत्रकारिता क्षेत्रातील खूप मोठी स्वप्नं मी बघितलीत. ती सगळीच पूर्ण होतील असं अजिबात नाही! पण मोठी स्वप्नं पाहणं आणि ती पूर्णत्वास आणण्यासाठी धडपडणं हे मला माझं प्राथमिक कर्तव्य वाटतं. मराठी भाषेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, या क्षेत्रातील नकारात्मकता हटवण्यासाठी, प्रतिभावंतांना त्यांची हक्काची दालनं उभी करून देण्यासाठी कुणी ‘मसीहा’ येणार नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. जे काही चांगलं घडेल ते आपणच घडवू. जे काही चुकीचं आहे ते आपणच थोपवू! भलेही हे करताना हजार चुका करू पण एकच चूक हजारवेळा होणार नाही याचीही काळजी घेऊ! युगपुरूष स्वामी विवेकानंदांना त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी शंभर युवकांची गरज होती. कशावरून त्या शंभरातला मी एक नसेन? मग माझ्यावरील जबाबदारी किती पटीनं वाढली असेल याचा विचार करा मित्रांनो! 

हास्य, विरोध आणि स्वीकृती अशा परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या असतात. आम्ही लढत होतो, पडत होतो. त्यावर अनेकजण हसत होते. त्यांना डोईजड जाईल असे वाटल्यावर प्राणपणानं विरोधही करत होते. त्या कशालाच न जुमानता, काय कमावले, काय गमावले याचा हिशोब न ठेवता आम्ही आमची ध्येयमार्गानुयात्रा सुरूच ठेवली. त्यामुळं हा विरोधही आम्ही हसत-हसत मोडून काढला. ती अवस्थाही  पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. त्यामुळं आता आमची पुढची वाटचाल अधिक वेगानं होईल. म्हणूनच ‘करायच्या राहून गेलेल्या गोष्टीं’चे तपशील मनात आणि हृदयात साठवत पुढच्या मोहिमेसाठी आम्ही सज्ज आहोत. 

आजवर अनेक गोष्टी केल्या आहेत. करण्यासारखी चिक्कार कामं डोळ्यासमोर आहेत. काहीवेळा पानगळ झाली तरी नव्यानं फुटणार्‍या पालवीची चाहूल सातत्यानं जाणवते. म्हणून ‘राहून गेलेल्या गोष्टी’पेक्षा ‘करायच्या गोष्टी’ मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. कोणीतरी म्हटलं आहे की, गाडीची समोरची काच मोठी असते आणि मागचा रस्ता दाखवणारा आरसा मात्र इवलासा! त्यामुळं मागून कोणी ठोकू नये यासाठी भूतकाळावर आरशाद्वारे लक्ष जरूर असावं पण लांबचा पल्ला गाठण्यासाठी समोरच्या काचेतून दूरवर पहावं... रस्त्यावरील खाचखळगे, छोटे-मोठे अपघात, आलेल्या तांत्रिक अडचणी, क्वचित प्रसंगी जाणवलेला शिणवटा या सर्वांवर यशस्वी मात करत प्रवाशानं पुढे पुढे जायला हवं. मीही तेच तर करतोय. चालकानं गाडी चालवायची असते. प्रवासी त्यांचं इच्छित स्थळ आलं की उतरतात. चालकानं त्याची तमा बाळगू नये! अर्थात, ही गाडी चालवताना काहीजण इंजिनाप्रमाणं घट्ट चिकटूनही राहतात. त्यांची समर्थ साथ आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देत असते. असे इंजिनाप्रमाणे जोडलेले अनेक मित्र, सहकारी मला प्रेरणा देतात, जगण्याचं बळ देतात. त्यामुळंच राहून गेलेल्या गोष्टी मांडणं माझ्यासाठी जिकिरीचं आहे. काही प्रश्‍न सोडले की सुटतात! अगदी त्याच न्यायानं राहून गेलेल्या काही गोष्टी तशाच राहू द्याव्यात! त्यातच सगळ्यांचं भलं असतं.
(साहित्य स्वानंद दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

Sunday, September 2, 2018

शांतीदूत!


प्रभाकर तुंगार हे ‘कलापिनी’ या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक, नाट्य आणि साहित्य क्षेत्रात ते ‘अप्पा’ या नावाने सुपरिचित आहेत.
कधी काळी सहकार खात्याच्या मुख्यालयात नोकरी करत असताना त्यांनी शांतीदूत लालबहादूर शास्त्री यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं. (1966) सरकारी नोकरीत असल्यानं ते छापण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीची ते वाट पाहत होते. एकानं सांगितलं, ‘‘बॉस किती खडूस आहेत हे माहिती आहे ना? वेळेचा अपव्यय करू नकोस!’’
हे बॉस म्हणजे तेव्हाचे सहकार आयुक्त श्री. व्ही. सुब्रह्मण्यम! त्यांना मराठीचा गंध असण्याची शक्यता नव्हती. तरीही तुंगारांनी धाडस करायचं ठरवलं. ते त्यांच्याकडे गेले. पुस्तकाच्या लेखनाविषयी सांगून प्रकाशनाची परवानगी मागितली.
बॉस खूश झाले. अस्खलित मराठीत त्यांनी सांगितलं की, ‘‘शास्त्रीजींसारखे प्रामाणिक लोक सध्या आहेत कुठं? अशा चरित्रांची आज खरी गरज आहे. हे पुस्तक लवकर छापा आणि नंतर माझ्याकडे या.’’
तुंगारांना अतिशय आनंद झाला. हा प्रतिसाद अनपेक्षित आणि उत्साहवर्धक होता. मग त्यांनी पुस्तक प्रकाशित केले. त्याची प्रत या ‘साहेबांना’ दिली. ती पाहून ते खूश झाले. हे पुस्तक सर्वांनी विकत घ्यायचे फर्मानच त्यांनी काढले. मग काय! सुब्रह्मण्यम साहेबांच्या गुणग्राहकतेमुळे ती आवृत्ती लगेचच संपली.
त्यानंतर थोडा-थोडका नव्हे तर अठ्ठेचाळीस वर्षांहून अधिक काळ उलटला. हे पुस्तक विस्मरणात गेलं. तुंगारांनी बोलता-बोलता या आठवणी जागवल्या आणि ‘‘हे पुस्तक पुन्हा बाजारात येऊ शकेल का?’’ याची विचारणा आमच्याकडे केली. त्याची एकच प्रत त्यांच्याकडे शिल्लक होती. ती त्यांनी आमच्याकडे दिली.
ती आम्ही वाचली आणि लगेचच प्रकाशनाचा निर्णयही घेतला. पुस्तक आकाराने छोटे असल्याने लगेचच निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. अठ्ठेचाळीस वर्षानंतर या पुस्तकाची नवी आवृत्ती ‘चपराक’कडून आली.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, श्रीराम पचिंद्रे, मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले आणि या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक केले. ‘चपराक’कडून आलेली नवी आवृत्ती हातोहात संपली.
सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रभाकर तुंगार यांचे वर्गमित्र! त्यामुळे या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते केले. एका आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘चपराक साहित्य महोत्सवा’त झाले. पुढची आवृत्ती ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित झाली. दुर्देवाने तो धारिया यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. अशाप्रकारे या पुस्तकाने अफाट वाचकप्रियता मिळवली. याचे सारे श्रेय लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारख्या निस्पृह नेत्याच्या लोकप्रियतेत आणि तुंगार यांच्या साध्यासोप्या भाषाशैलीत आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने तर या पुस्तकावर एक स्पर्धाच घेतली. म्हणजे या पुस्तकावर आधारित एक प्रश्नपत्रिका तयार केली. ती प्रश्नपत्रिका आणि पुस्तकाची एक प्रत प्रतिष्ठानतर्फे सहभागी शाळांना भेट दिली. त्यावर शिक्षकांनी तयारी करून घ्यायची! प्रश्न माहीत असल्याने आणि पुस्तक हाताशी असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शास्त्रीजींचे चरित्र विद्यार्थ्यांपर्यंत जावे इतकाच उद्देश त्यामागे होता. तो तर साध्य झालाच पण आमच्या या पुस्तकाची आणखी एक आवृत्ती हातोहात संपली. हे पुस्तक घेण्यासाठी मुलांची आणि पालकांची अक्षरश: झुंबड उडायची.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर जोशी यांनी या पुस्तकाचा ‘इंग्रजी’ तर चंद्रलेखा बेलसरे यांनी ‘हिंदी’ अनुवाद केलाय. या दोन्ही भाषेतही हे पुस्तक ‘चपराक’तर्फे लवकरच उपलब्ध करून देतोय.
अठ्ठेचाळीस वर्षांच्या कालावधीनंतर एखादे पुस्तक पुन्हा प्रकाशित होणे आणि त्याने वाचकांच्या मनावर गारुड घालणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. एक प्रकाशक या नात्याने याचा मला अतिशय आनंद होतो. मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवहारात असे प्रयोग व्हायला हवेत. जुन्या संस्कारशील साहित्याचा ठेवा नव्या रुपात प्रकाशित केल्यास वाचकांची त्याला आजही मोठी पसंती मिळते हे प्रभाकर तुंगार यांच्या ‘शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री’ या पुस्तकाने सिद्ध केले आहे.
प्रभाकर तुंगार यांच्यासारखी साधी-भोळी माणसं हेच तर आपल्या शहराचं खरं वैभव आहे. त्यांचे वडील पाली, अर्धमागधी आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्याकाळी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुंगारांच्या घरी येत. पाली भाषेबाबत त्यांना काहीही शंका असतील तर त्याचं निरसन करून घेत. डॉ. आंबेडकरांचं तुंगारांच्या वडिलांना आलेलं हस्तलिखित पत्रही त्यांच्याकडं आहे. जाताजाता याबाबतचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.
डॉ. न. म. जोशी त्यावेळी पुण्यात वृत्तपत्र वाटपाचं काम करीत. डॉ. आंबेडकर तुंगारांना भेटायला त्यांच्या घरी येतात हे कळल्यावर त्यांनी त्यांच्याकडं आंबेडकरांची भेट घालून देण्याचा लकडा लावला. एकदा आंबेडकर तुंगारांच्या घरी आले होते. त्यावेळी न. म. जोशी वृत्तपत्र टाकायला आले होते. तुंगारांनी त्यांची ओळख आंबेडकरांना करून दिली. त्यावेळी आंबेडकरांनी त्यांच्याकडून काही वृत्तपत्रं विकत घेतली. त्याचे पैसेही दिले. ते पैसे वृत्तपत्रांच्या किंमतीपेक्षा जास्त होते. जोशी सरांनी ते पैसे घेण्यास नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘हे पैसे घे आणि यातून एखादे पुस्तक विकत घे...’’
अशा संस्कारशील वातावरणात आणि थोरामोठ्यांच्या सहवासात वाढलेल्या प्रभाकर तुंगारांना लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारखं निस्पृह व्यक्तिमत्त्व खुणावत असेल तर ते स्वाभाविक आहे. त्यामुळं तुंगारांनी हे पुस्तक नेमकेपणे आणि साध्या-सोप्या शैलीत लिहिलं आहे. म्हणूनच विद्यार्थी आणि पालकांनी या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद दिला. आता या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ‘चपराक’कडून प्रकाशित होत असल्यानं ते आणखी सर्वदूर पोहोचणार आहे. शास्त्रीजींसारख्या शांतीदूताची देशाला आज खरी गरज आहे. किमान त्यांचं चरित्र आणि चारित्र्य समजून घेणं हे तरी आपलं कर्तव्य आहे आणि हे पुस्तक त्याचीच पायाभरणी करणारं आहे.
(दैनिक 'पुण्य नगरी', २ सप्टेंबर २०१८)
- घनश्याम पाटील
7057292092
Attachments area

Monday, August 20, 2018

कॉलेज गेट



पुण्यातलं मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय; म्हणजेच आपलं एमएमसीसी! इथं व्यवस्थापन शास्त्र पदवीचं शिक्षण घेणारे काही तरूण-तरूणी! त्यातील बहुतेक ग्रामीण भागातून आलेले. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न रंगवताना वर्तमानात मात्र ते वेगळ्याच विश्‍वात रमत होते. साधारणतः महाविद्यालयीन जीवनात जी हुल्लडबाजी करणं अपेक्षित असतं ते सगळं या पोरा-पोरींनी केलं. वाद घातले, मारामार्‍या केल्या, मैत्री निभावली, लफडी केली, खरंखुरं प्रेम केलं, हौसमौज केली आणि जमलाच तर थोडाफार अभ्यासही केला. हे सगळं करताना स्वतःचा प्रामाणिकपणा आणि माणुसकी मात्र सोडली नाही.

एखाद्या चित्रपटात दाखवतात तसे इथेही दोन ग्रुप होते. दोन्हीही ग्रुप एकमेकांना पाण्यात पाहत. त्यातल्या एका ग्रुपनं ट्रॅडिशनल डेला चक्क महाभारतातलं पात्र साकारलं. ते पाहून दुसरा ग्रुप बेचैन झाला. यापेक्षा भारी आपल्याला काय करता येईल यावर डोकेफोड झाली. मग महाभारताला आव्हान देऊ शकेल असं काही करायचं असेल तर त्यांच्यापुढं अर्थातच एक आणि एकच पर्याय होता. तो कोणता हे वेगळं सांगावं लागेल का? भीम, अर्जुन, कृष्ण या कुणाहीपेक्षा मराठी माणसाला ज्याची भुरळ पडते असं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे युगपुरूष छत्रपती शिवाजीराजांचं! 

ठरलं तर मग! त्यातल्याच एका राजबिंड्या तरूणानं शिवाजी महाराज साकारावेत यासाठी सगळ्यांनी लकडा लावला. त्याचा दबाव आल्यानं तो पठ्ठ्या काही तयार होईना. मग अशावेळी एक नायक लागतो. तो तत्परतेनं पुढं आला. त्या नायकाचं खरंखुरं नाव सागर कळसाईत! या उमद्या तरूणानं त्याच्या दोस्ताला शिवाजीमहाराजांची भूमिका करण्यासाठी पटवलं. आता कुणालाही पटवायचं तर काही आश्‍वासनं द्यावी लागतात. काही आमिषं दाखवावी लागतात. सागरनं सांगितलं, ‘‘मित्रा, तुझं व्यक्तिमत्त्व भारदस्त आहे. समोरच्या ग्रुपवाल्यांची जिरवायची तर तुच महाराजांची भूमिका केली पाहिजे. माझ्या शब्दासाठी हे कर! त्याबदल्यात भविष्यात तू सांगशील ते एक काम मी करेन. तो शब्द माझ्याकडं उधार राहिला.’’

आता इतक्या मिनतवार्‍या केल्यावर तोही तयार झाला. 

त्यानं राजांची भूमिका केली. सगळ्या कॉलेजमध्ये हवाच हवा. मग काय? सगळे खूश! 

काळाच्या रेट्यात सगळ्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता सगळे जगरहाटीला सामोरे जाणार! आपापल्या नोकर्‍या, व्यवसाय, कुटुंबकबीला यात गुरफटणार! हे कॉलेजचं गेट आपल्या सगळ्यांसाठी बंद होणार... सगळेच भावविभोर झाले. या दरम्यान केलेली दंगामस्ती, एकमेकांची काढलेली खोड, जीवापाड केलेलं प्रेम, वसतीगृहातील साहचर्य, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील सर्वांशी निर्माण झालेले संबंध, रेक्टरपासून पहारेकर्‍यांपर्यंत आणि वर्गशिक्षकांपासून प्राचार्यापर्यंत सर्वांशीस निर्माण झालेले ऋणानुबंध...! कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून सर्वजण या दरम्यानच्या आठवणी जागवू लागले. भविष्यातही ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असं सांगू लागले.

हे सर्व चालू असतानाच ज्यानं सागरच्या आग्रहावरून शिवाजीराजांची भूमिका केली होती तो पुढं आला. त्यानं सांगितलं, ‘‘साग्या, माझा शब्द तुझ्याकडे उधार आहे. आता कर्जफेड कर...’’ कुणालाच काही कळेना. तो काय मागणार?

मग त्यानं व्याकूळ होत सांगितलं, ‘‘कॉलेज लाईफनंतरही आपण सर्वजण एकत्र राहू असं काहीतरी कर...’’
आता आली का पंचाईत? हे कसं करता येईल? सागरनं तर शब्द दिला होता. तो विचारात पडला.

विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या असतात. सागरनं विचार केला. कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि प्रामाणिकपणे तो विचार अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि तशी कृतीही केली. ही कृती महाराष्ट्रातल्या तरूणांना वेड लावून गेली. मरगळलेल्या मराठी साहित्याला या कृतीनं ऊर्जा दिली. 

या सगळ्यांना एकत्र बांधुन ठेवायचं तर कॉलेज लाईफचे हे दिवस शब्दबद्ध करणं गरजेचं होतं. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी सागरनं हे आव्हान स्वीकारलं आणि सगळे अनुभव जशास तसे उतरवले. प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते. इथं तर अनुभवाचा खजिनाच होता. त्यानं तो कादंबरीद्वारे शब्दांकित केला. त्याला शीर्षक दिलं, ‘कॉलेज गेट-नाण्याची तिसरी बाजू.’

या कादंबरीनं अनेक विक्रम केले. प्रत्येकाला ही आपलीच कथा वाटते. बघता-बघता या कादंबरीच्या पाच आवृत्या झाल्या. आज नाशिकच्या आयएमए सभागृहात या कादंबरीची सहावी आवृत्ती सन्मानपूर्वक प्रकाशित होतेय. बाबुराव भोर यांच्याच्यासारख्या रत्नपारखी चित्रपट निर्मात्यानं या कादंबरीवर चित्रपट निर्मितीचं काम सुरू केलंय. सागरच्या या प्रयत्नाला दाद देत बाबुराव भोर यांनी ही कलाकृती जिवंत केलीय. आता या कादंबरीवर चित्रपट येतोय.

मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एका सर्वात मोठ्या दैनिकानं एक सर्वेक्षण केलं होतं. वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन त्यांनी तरूणांच्या आवडत्या पुस्तकांसंबंधी विचारणा केली. ती यादी त्यांच्या सर्व आवृत्त्यांना पहिल्या पानांवर प्रकाशित केली. त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘टॉप टेन’ पुस्तकात पहिल्या क्रमांकावर शिरवळकरांची ‘दुनियादारी’ होती. दुसर्‍या क्रमांकावर ‘शाळा’  तर तिसर्‍या क्रमांकावर आमच्या सागरची ‘कॉलेज गेट.’ महाराष्ट्रातील बहुतेक वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी या कादंबरीची प्रचंड दखल घेतली. साहित्य संमेलनात, पुस्तक विक्रेत्यांकडे या कादंबरीची मागणी वाढली. राज्यभरातून ‘कॉलेज गेट’चा चाहता वर्ग निर्माण झाला. 
प्रकाशक असूनही सागरच्या आग्रहाखातर या कादंबरीला मीच प्रस्तावना लिहिली होती. त्यात मी म्हटलं होतं, ‘‘एखाद्या रसिकप्रिय चित्रपटाला शोभेल असे सशक्त कथानक या कलाकृतीला निश्‍चितपणे लाभले आहे. महाविद्यालयीन जीवनातील विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचा चिकित्सक उलगडा करणारी, शब्दाशब्दाला उत्सुकता वाढवणारी आणि मैत्रीच्या नात्याचे चिरंतन मूल्य ताकदीने सिद्ध करणारी ही कलाकृती आहे.’’
सुदैवानं आज हे सारं काही खरं ठरलंय. आजचे तरूण लिहित नाहीत, वाचत नाहीत अशा सगळ्या अंधश्रद्धा या कादंबरीनं खोडून काढल्यात. सागरच्या कसदार लेखणीचं हे यश आहे. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी ही एक कादंबरी आहे. किंबहुना तमाम युवकांच्या मनात आणि हृदयात ‘चपराक’चं नाव पोहोचवण्यात या कादंबरीचं योगदान मोठं आहे. सागरचं संवादी लेखन, स्वभावातील नम्रता आणि मृदुता यामुळं तसाही तो सगळ्यांच्या हृदयावर राज्य करतो. दोन व्यक्तींची तुलना अनाठायी असते असं माझं मत असलं तरी आज सांगावंसं वाटतं की, सागर कळसाईत हा मराठीतला चेतन भगत आहे. 

लेखनातही भवितव्य घडवता येतं हे सिद्ध करणार्‍या सागरची ‘लायब्ररी फे्रंड’ ही दुसरी कादंबरीही ‘चपराक’ने प्रकाशित केली. आता एक मोठा राजकीय पट उलगडून दाखविणारी ‘काशिनाथ-विश्‍वनाथ’ ही कादंबरी लिहिण्यात सागर व्यग्र आहे. बाबुराव भोर यांच्यासारखे समर्थ हात त्याच्या पाठीशी आहेत. ‘चपराक’ परिवाराचा ‘आयडॉल’ म्हणून सागरचं मला नेहमीच कौतुक वाटतं. भविष्यात तो नवनवीन विक्रम नोंदवेल हे वेगळं सांगायला नकोच. त्याच्या लेखनप्रवासाला मित्र म्हणून, प्रकाशक म्हणून माझ्या ‘जी जान से’ शुभेच्छा! 
- घनश्याम पाटील
7057292092

Sunday, August 5, 2018

भरकटलेलं आंदोलन



महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमांची परंपरा जपणारी भूमी आहे. इथल्या मराठ्यांनी मराठी माणसाचं अस्तित्व टिकवून ठेवलंय. ‘जो मराठी बोलतो तो मराठा’ हे चित्र गेल्या काही काळात संपुष्टात आलं आणि कमालीच्या टोकदार अस्मिता निर्माण झाल्या. अनेकजण जातीपातीच्या जळमटातून बाहेर पडायला तयार नाहीत. ‘कोणताही कट्टरतावाद वाईटच’ ही शिकवण विसरल्यानं माणसामाणसात फूट पाडण्याचे उद्योग सध्या भरात आलेत. 

असं म्हणतात की वाफ फार काळ कोंडून ठेवता येत नाही. ती तशी ठेवली तर स्फोट अटळ असतो. मराठ्यांचंही तसंच झालं. त्यांच्या अनेक न्याय मागण्या गेल्या कित्येक वर्षात प्रलंबित आहेत. त्यामुळं त्यांच्या भावना उफाळून आल्या. सुरूवातीला जे मूक मोर्चे निघाले त्याची दखल न घेतल्यानं आता ठोक मोर्चे सुरू झाले आहेत. त्यातूनच आत्महत्यांसारखं दुर्दैवी सत्रही सुरू झालंय. हे सर्वच अत्यंत क्लेशकारक आणि अनेकांच्या मुळावर उठणारं आहे. राजकारणी या सर्वांचा फायदा घेत आहेत. समाजासमाजात फूट पाडण्याचं त्यांचं कारस्थान सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही याचा पुरेपूर लाभ घेत आहेत. मात्र या सर्वात हे आंदोलन त्यांच्या उद्दिष्ठापासून भरकटत चाललंय हे वास्तव आपण समजून घ्यायला हवं. भावनेच्या भरात घेतलेले कोणतेही निर्णय दीर्घकालिक यश मिळवू शकत नाहीत. त्यातून काही तात्पुरते फायदे दिसून येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. हे न कळण्याइतका आपला समाज दूधखुळा नसला तरी एक मोठा वर्ग याचं राजकारण करण्यात यशस्वी ठरतोय. आपल्या भावनांचा बाजार मांडून त्याला आंदोलनाचं रूप दिलं जात असेल तर त्यातील डाव वेळीच ओळखायला हवेत. ज्या आंदोलनात प्रारंभी राजकारण्यांना कटाक्षानं दूर ठेवण्यात आलं होतं तिथं आज सगळेच राजकारणी दिसत आहेत. इतकंच नाही तर या सर्वांचं नेतृत्व करण्याचं श्रेय घेण्याच्या त्यांच्या खटपटी-लटपटी सुरू आहेत. 

काकासाहेब शिंदे या तरूणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतली. निरपराध तरूणांचे असे बळी जाऊन आरक्षण मिळणार नाही. त्यानंतर हे सत्रच सुरू झालंय. आपली व्यवस्था मात्र ढिम्मच आहे. उलटपक्षी यांच्या बलिदानाचं राजकारणच करण्यात येत आहे. आजवर असंख्य शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांचं पुढं काय झालं? शेतकर्‍यांच्या समस्या सुटल्या का? शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळं व्यथित होणारे राजकारणी एकेकाळी होते. आता कुणालाच त्याचं सोयरसुतक नाही. काकासाहेब शिंदेंच्या बलिदानाच्या बातम्या झाल्या. त्यांच्यावर अग्रलेख झाले. वृत्तवाहिन्यांनी कार्यक्रम केले. आणखी काही दिवसांनी या बातत्या एखाद्या कॉलमच्या होतील. कुणावरही काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत जगायला हवं. आपण संपून प्रश्न संपणारे नाहीत. खरंतर हे सत्य मांडणंही जीवावर आलंय, मात्र यावर बोलायला हवं. आपल्याकडील पोपटपंची करणारे सर्व तथाकथित विद्वान हजार किलो मूग गिळून गप्प आहेत. हरी नरके यांच्यासारखा विचारवंत ‘मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळू शकणार नाही, त्यांच्या आर्थिक विकासाच्या योजना राबवायला हव्यात’ हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय. मुख्यमंत्री तर ‘काही संघटना वारीत साप सोडणार होत्या’ असे विधान करत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारखी मंडळी आजवर मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही असे मत मांडत होत्या. आता तेही या विषयावरून राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री न्यायव्यवस्थेकडं बोट दाखवत आहेत. 

‘आजवर बहुसंख्य ‘मराठा’ मुख्यमंत्रीच होते. त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही?’ असाही सवाल केला जातोय. ‘त्यांनी प्रश्न सोडवला नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिले’ असा प्रतिवादही केला जातोय. या सर्वात मूळ प्रश्न मागे पडतो. दलित, अन्य अल्पसंख्यांक यांच्या मनात भीतिचे वातावरण आहे. मराठेही अस्वस्थ आहेत. पुरोगामी टोळके फक्त ब्राह्मणांना झोडपण्यात व्यग्र आहे. या सर्वात समाजाविषयीचा कळवळा कुणाच्याच मनात दिसून येत नाही. तवा तापलाय तर भाकरी भाजून घ्या इतकीच अनेकांची भावना! त्यामुळं प्रश्‍न सुटण्याऐवजी फक्त चिघळत चाललाय.

सध्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलनं सुरू आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यांनी मराठा बांधवांचं निवेदन स्वतः स्वीकारलं. त्याच धर्तीवर पुण्यातील कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरी आंदोनलनकर्ते गेले. त्यांनी त्यांना कार्यालयात बोलावलं; मात्र हे आंदोलनकर्ते त्यांच्या घरासमोर बसून राहिले. त्यांनी घोषणाबाजी केली. एकानं त्यांच्या गॅलरीत बाटली फेकली. मेधा कुलकर्णी यांचा मुलगा सौरव यानं त्याचा जाब विचारला. त्यातून बाचाबाची झाली आणि पुढं मेधा कुलकर्णी यांनाच धारेवर धरण्यात आलं. त्यांना ‘जातीवादी’ ठरवून समाजमाध्यमावर त्यांच्यावर वाटेल तशी चिखलफेक झाली. अत्यंत अश्‍लाघ्य आणि अश्‍लिल भाषेत त्यांच्यावर टीका झाली. आमदार मेधा कुलकर्णी चूक की बरोबर हा चर्चेचा विषय होऊ शकतो मात्र त्यांच्यावर, त्यांच्या जातीवर आणि स्त्रीत्वावर वाटेल तशी शेरेबाजी करणारे ‘मराठे’ असू शकत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजीमहाराजांनी प्रत्येक स्त्रीचा आईसमान आदर केला त्याच महाराजांचे नाव घेत एखाद्या स्त्रीवर अशी अश्‍लाघ्य भाषा वापरत टीका केली जात असेल तर हे आंदोलन भरकटलेय हे ठामपणे सांगायलाच हवे. मेधा कुलकर्णी यांचा मुलगा चुकला असेल तर त्याविरूद्धचे पुरावे द्यावेत. झुंडशाहीचे प्रदर्शन करतानाचे आणि तिथे दादागिरी, दडपपशाही करतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत आहेत; पण कुलकर्णी यांचा मुलगा सौरव काही चुकीचे बोलतोय याची एकही चित्रफित उपलब्ध असू नये यातच सर्वकाही आले. 

यापूर्वी प्रा. मेधा कुलकर्णी या मराठा आंदोलनात सहभागी होत्या. मराठी बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्या कायम तत्पर आहेत. याबाबत निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार त्यांना नाहीत. त्यामुळं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जे करता येईल ते त्या करतच आहेत. असं असताना त्या वारंवार कार्यालयात येऊन चर्चेचं निमंत्रण देत असताना त्यांच्या घरच्यांना डांबून ठेवणं, त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना वेठीस धरणं, मुलाला जीवे मारण्याची धमकी देणं यात कसला पराक्रम आलाय? अशा मार्गानं आरक्षण मिळणार आहे का? बरं, यातही संभाजी ब्रिगेडचेच लोक सहभागी होते. म्हणजे केवळ संभाजी ब्रिगेडसारख्या संस्थेचे चार पदाधिकारी म्हणजे सकल मराठा समाज झाला का? एखाद्या स्त्रीविषशी अशी टीकाटिपन्नी करणं मराठा बांधवांना तरी मान्य आहे का? मग पुरूषोत्तम खेडेकर यांच्या विचारात आणि या झुंडशाहीत काय फरक राहिला? आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एखाद्या समाजाला, एखाद्या लोकप्रतिनिधीला, त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे?

आपल्याकडं पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेली अनेक काळ सुरू आहे. आर्थिक निकषानुसार आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवणं यासाठीही अनेकांनी पुढाकार घेतला आहे. हे करताना दलित बांधवांचे हक्कही नाकारता येणार नाहीत. सर्वांना खूश ठेवणं राज्यकर्त्यांनाही शक्य नाही. धनगर, मराठा यांच्या आरक्षणाचे निर्णय त्यामुळंच सत्ताकारणाचा एक भाग बनतात. हे प्रश्न सुटावेत अशी प्रामाणिक इच्छाशक्ती राजकारण्यात दिसत नाही. त्यामुळं समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. एकीकडं जातिअंताची भाषा करताना आपण कट्टर जातीवादी बनलोय. इतर जातींचा उपमर्द करणं, त्यांना कमी लेखणं, आपल्या जातीचा अभिमान बाळगताना इतरांवर तुटून पडणं ही बाब सध्या वाढीस लागलीय. ज्यांना जातीअंत हवाय ते सर्वच आपापल्या जातीचं घोडं पुढं दामटत आहेत. म्हणूनच नवी पिढी या सगळ्या जाळ्यात अलगद अडकतेय. 

वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी हे व असे अनेक गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. आरोग्य, शिक्षण, मुलभूत सेवा-सुविधा याची वाणवा असताना आपण जातीपातीचं राजकारण करतोय. जातीमुळे अनेकांवर अन्याय होतोय हे तर खरंच! पण तो अन्याय निवारण करण्यासाठी इतर जाती समूहांना जबाबदार धरून त्यांच्यावर आघात करणं हेही योग्य नाही. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी अशा आंदोलनाची धग वाढत जाते आणि निवडणुका संपल्या की पुन्हा सर्व शांत होते हा आजवरचा अनेकवेळचा अनुभव आहे. त्यामुळं आपण आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा. कायदेशीर मार्गानं जे काही करता येईल ते करायला हवं. मात्र आंदोलनाचा भाग म्हणून स्वतःचा जीव देणं, इतरांना वेठीस धरणं, सामान्य माणसाची गैरसोय करणं हे अस्सल मराठ्यांनाही रूजणारं नाही. खरा मराठा असे पळपुटे मार्ग कधी निवडणारही नाही. त्यामुळं वेळीच सावध होऊन निश्चित दिशा ठरवली नाही तर यातून साध्य तर काही होणारच नाही पण येत्या निवडणुकीनंतर हे केवळ एक ‘भरकटलेलं आंदोलन’ इतकीच त्याची नोंद इतिहासात घेतली जाईल हे कटूसत्य आहे.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092
* या लेखातील आमदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संबंधित मजकूर वगळून दैनिक 'पुण्य नगरी'ने आज माझ्या 'दखलपात्र' या स्तंभात हा लेख प्रकाशित केला आहे. 

Tuesday, July 17, 2018

ओवीचं पुनरूज्जीवन करणारा अवलिया!


आज जर संत ज्ञानेश्वर महाराज असते तर?

तर कदाचित त्यांनाही आजच्या प्रकाशकांनी, समीक्षकांनी सांगितलं असतं, ‘‘बाबा रे! ही असली पुस्तकं लिहिण्याचं तुझं वय नाही. काहीतरी हलकफुलकं लिही!’’

असं वाटण्याचं कारण म्हणजे आमचे राजगुरूनगर येथील प्राध्यापक मित्र दादासाहेब मारकड! 

मारकडांनी एक अचाट काम केलंय. त्याबद्दल खरंतर त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला हवं; पण त्यांच्या नशिबीही उपेक्षाच येतेय. कलावंतांची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय असल्यानं त्याचं मारकडांना फारसं वैषम्य वाटत नाही पण आपल्या मुर्दाड मानसिकतेचं प्रतिबिंब मात्र ठळकपणे दिसून येतं.

वाचकमित्रांना वाटत असेल कोण हे मारकड? आणि त्यांनी असा कोणता पराक्रम केलाय...?

व्यवस्थेच्या नकारात्मक मानसिकतेमुळंच मारकडांचा ‘पराक्रम’ वाचकांपर्यंत गेला नाही आणि त्यामुळं त्याचा दोष त्यांना देता येणार नाही.

दादासाहेब मारकड या अवलियानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं तब्बल 1104 पानांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय. त्यात एकूण 82 अध्याय आहेत.

याचं फलित काय हे सांगितल्यास कोणताही माणूस हादरून जाईल.

काही कीर्तनकारांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले की, ओवी हा साहित्यप्रकार केवळ संतांनी वापरलाय. यात लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

काहींनी सांगितलं, आजच्या काळात ओव्या कोण वाचणार? हा साहित्यप्रकार केव्हाच कालबाह्य झालाय...

त्यांना ओळखणारे काहीजण म्हणाले, तुम्ही भुगोलाचे प्राध्यापक आहात. चांगलं शिकवता. मग घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचे असे उद्योग करण्यापेक्षा अभ्यासक्रमाची पुस्तकं लिहा. निदान चार पैसे तरी मिळतील!

मात्र ज्यानं काळावर मोहोर उमटवणार्‍या छत्रपती शिवरायांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय तो हरहुन्नरी लेखक अशा प्रवृत्तीला काय भीक घालणार? त्यांनी पदरचे जवळपास अडीच लाख रूपये खर्च करून हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणार्‍या संस्था, संघटनांनी, राजकीय पक्षांनी आणि सामान्य मराठी माणसानं मात्र त्यांची कदर केली नाही. वारंवार प्रती पाठवूनही कोणत्याही वृत्तपत्रांनी या पुस्तकाचा परिचय दिला नाही. विक्रेत्यांनी तर विक्रीसही नकार दिला.

इतकं सारं होऊनही दादासाहेब डगमगले नाहीत.

त्यांनी खेड्यापाड्यापर्यंत हे पुस्तक स्वतः पोहचवलं. त्याचा परिणाम असा झाला की, अनेक ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताहात या ‘शिवायन’चं पारायण करण्यात आलं. भजनी मंडळातल्या लोकांनी त्याला चाली लावल्या. ज्या कीर्तनकारांनी सांगितलं की, दादा मारकडांना ओवीबद्ध ग्रंथ लिहिण्याचा अधिकार नाही त्याच ठिकाणी या ग्रंथाची सात-सात दिवसांची पारायणं झाली.

एकनाथ महाराजांच्या ‘भावार्थ रामाणण’पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. त्यासाठी अहोरात्र अभ्यास केला. ‘ओवी छंद’ समजून घेण्यासाठी त्यांनी संत महिपती महाराजांपासून अनेकांचे अनेक ग्रंथ सातत्यानं अभ्यासले. ‘ओवी ही फक्त धार्मिक क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली. इतिहासातील महापुरूषांचे जीवन आणि त्यांचे ऐहिक कार्य मांडण्यासाठी ओवीचा वापर झाला नाही’ याची खंत त्यांना वाटते. दादासाहेबांचे बंधू विनायकमहाराज मारकड यांनी त्यांना या लेखनासाठी उद्युक्त केले. मग त्यांची गाडी सुसाट सुटली. 

‘शिवायन’नंतर त्यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज, छत्रपती संभाजीमहाराज यांचेही ओविबद्ध चरित्र साकारले आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांना जगद्गुरू तुकाराम महाराजांचे असेच चरित्र लिहिण्यास सुचवले आहे आणि त्याची तयारी त्यांनी सुरू केलीय.

दादासाहेब सांगतात, ‘शिवायन’ हा ग्रंथ लिहिताना मी त्यात एकरूप झालो होतो. त्यावेळी संभाजीराजांच्या नावानं राजकारण करणार्‍या एका संघटनेनं सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्‍वासन दिलं होतं. तेे त्यांनी पूर्ण तर केलं नाहीच पण मला अडचणीत सोडून एकटं पाडलं. या ग्रंथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर प्रकाशन होणार होतं पण तो योग काही आला नाही. 

ओवीसारखे साहित्यप्रकार संपले असं म्हणणार्‍यांना ग्रामीण महाराष्ट्र कळलाच नाही. आजही खेड्यापाड्यात ओवीबद्ध ग्रंथाविषयी लोकांच्या मनात श्रद्धाभाव आहे. त्यामुळं उलट या साहित्यप्रकाराचं पुनरूज्जीवन करायला हवं. ते काम दादासाहेब मारकड मोठ्या नेटानं करीत आहेत. त्यांच्या पत्नी आणि उत्तम कथाकार जयश्री मारकड यांची त्यांना समर्थ साथ मिळत आहे. त्यामुळं जमाना काय म्हणतोय यापेक्षा आपली माणसं आपल्यासोबत असल्यानं काहीतरी भव्यदिव्य साकारू असं त्यांना वाटतं.

हा अद्वितीय ग्रंथ सिद्धीस नेताना त्यांना अनंत अडचणी आल्या. बरंच हलाहल पचवावं लागलं. मराठ्यांच्या मुलखातलं अमर महाकाव्य साकारताना हे होणारच हे त्यांनी गृहित धरलं होतं. 

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे तर मराठी माणसाचे पंचप्राण! दादासाहेबांचं विश्‍वही याभोवतीच फिरतं. अत्यंत चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्ती असल्यानं त्यांनी सत्याची कास सोडली नाही. लेखन करताना काहीजणांकडून दिशाभूल झाली, चुकीची माहिती मिळाली मात्र मी त्याच्या खोलात जाऊन सत्याचा तळ गाठतोय असं ते सांगतात. माणसानं हजार चुका कराव्यात पण एकच चूक हजारवेळा करू नये यावर त्यांचा विश्‍वास आहे. म्हणूनच अनावधानानं काही गोष्टी उशिरा कळल्या तरी ते सत्य स्वीकारण्याचं धाडस त्यांच्याकडं आहे. 

ज्यांना छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि चरित्राचा अभ्यास करायचाय त्यांनी हा ग्रंथ अवश्य वाचावा. दादासाहेब मारकड यांची त्यामागची साधना मोठी आहे. 

सध्या लोककवी, रानकवी, प्रेमकवी, महाकवी अशी बिरूदं लावायची एक ‘फॅशन’ झालीय. म. भा. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणं 
कोण लेकाची कोणाची देशसेवा पाहतो!
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो! 

असा काहीसा प्रकार सुरू आहे. साहित्यिकांचे कळप झाल्यानं त्यात जो सहभागी होत नाही तो जाणिवपूर्वक उपेक्षित ठेवला जातो. त्याला अनुल्लेखानं मारण्यात अनेकजण वाकबगार आहेत. ही कंपूशाही भेदून मराठी साहित्यातील सकस काही स्वीकारायचं असेल तर दादासाहेब मारकड यांच्यासारख्या धडपडणार्‍या प्रतिभावंतांची कदर करायला हवी.

मुख्य म्हणजे त्यांचा ‘मी कोणी फार मोठा लागून गेलोय’ असा आविर्भाव अजिबात नाही. त्यांचा सतत अभ्यास सुरू असतो. 

बहुजन समाजातला एक माणूस पुढे येऊन ‘शिवायन’सारखं  ओवीबद्ध महाकाव्य लिहितो याची इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद घेतली जाईल. ती घेताना मराठी माणसाच्या कद्रूपणाचं दर्शन घडू नये इतकंच! म्हणूनच दादासाहेब मारकड यांच्या या अवाढव्य कार्याची दखल घेतानाच त्यांच्या भावी उज्ज्वल लेखन कारकिर्दीस शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक पुण्य नगरी, ८ जुलै २०१८)

Monday, July 16, 2018

वर्चस्ववादाला आव्हान!


मागच्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी परीक्षक होतो. त्यात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाला मी पुरस्कार दिला. त्यावेळी  विश्वंभर चौधरी नावाच्या एका विदुषकाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यांचे म्हणणे होते की, एका हिंदुत्त्ववाद्याच्या पुस्तकाला पुरस्कार दिलाच कसा? हे पुस्तक वाचायचीही त्यांना गरज वाटली नव्हती. शेवडेंनी लिहिलंय ना? मग त्यात काय वाचायचं? असा काहीसा सूर होता. असाच प्रकार मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्याबाबतही  सातत्यानं घडतोय. सोनवणी यांनी लिहिलंय ना? मग ते केवळ हिंदू धर्मात फूट पाडायचंच काम करतात. त्यांचं या विषयावरील लेखन कशाला वाचायचं असा अपप्रचार केला जातो.

हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे संजय सोनवणी यांचं ‘हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास’ हे पुस्तक नुकतंच पुण्यातील ‘प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केलंय. या पुस्तकात त्यांनी जे लिहिलंय त्यावर मोठी चर्चा होऊ शकते! किंबहुना तशी चर्चा व्हायला हवी. लोकमान्य टिळक यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक रथीमहारथींचे सिद्धांत संजय सोनवणी यांनी सप्रमाण खोडून काढले आहेत. हिंदू आणि वैदिक यांच्यातील फरक माहीत नसणार्‍यांना किंवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्षित ठेऊ इच्छिणार्‍यांना हे पटणारे नाही. मात्र ज्यांना अभ्यास करायचाय, ज्ञान मिळवायचंय, सत्य शोधायचंय त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं.

आद्य शंकराचार्यही वैदिक नाहीत हे सोनवणी यांनी यात मांडलं आहे. आपला इतिहास पुराणकथांनी गढूळ झालेला असताना आणि आपण जे ऐकत आलोय तेच सत्य मानणार्‍यांना कदाचित हे रूचणार नाही; पण सत्यापासून फारकत का घ्यावी? सोनवणी यांच्यावर तोंडसुख घेणारे काही महाभाग त्यांच्या मुद्यांचा प्रतिवाद करून ते खोडून काढू शकत नाहीत आणि हे सत्यही स्वीकारत नाहीत. पुराणातली वाणगी (वांगी नव्हे!) पुराणात म्हणून काहीजण दुर्लक्षही करतील; पण याच्या तळाशी जाऊन चिकित्सा करायलाच हवी. 

यापूर्वी त्यांनी ‘जातीसंस्थेचा इतिहास’ हे पुस्तकही लिहिले. ‘चपराक’ने प्रकाशित केलेले ‘भाषेचे मूळ’ हे भाषाशास्त्रावरील अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकही सिद्धीस नेले. घग्गर नदीलाच सरस्वती नदी समजणार्‍यांना सणसणीत चपराक दिली. या सर्व पुस्तकांचा सार म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे. आपल्याकडे संस्कृतलाच आद्य भाषा, देवभाषा समजून आपण मराठीला दुय्यम स्थान दिले आहे. यावर ‘जिच्यावर संस्कार झाले ती संस्कृत’ इतकी साधी सोपी व्याख्या करून सोनवणी यांनी प्रकाश टाकला आहे. जर संस्कृत ही आद्य भाषा असती तर आपल्या खेड्यापाड्यातील म्हातारी-कोतारी लोक संस्कृतच बोलली नसती का? असा बिनतोड सवालही ते करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं नौटंकी करणार्‍या चमकोछाप लोकांनी हे समजून घ्यायला हवं.

आर्यवंश श्रेष्ठत्ववादाचा जन्म म्हणजे काळीकुट्ट किनार, हे मत ते ठामपणे मांडतात. रामायण-महाभारताचा काळ हा वैदिक भारतात येण्यापूर्वीचा हेही ठासून सांगतात. हे कुणाला पटेल किंवा पटणार नाही पण आपल्याला सत्य स्वीकारावेच लागेल. भारतीय संस्कृतीचा धावता आढावा, असूर संस्कृती, वेदपूर्व भारतीय असूर संस्कृती, वेदपूर्व तत्त्वज्ञान व विकास, वैदिक धर्माची स्थापना कोठे झाली?, सिंधू-घग्गर संस्कृतीची भाषा, बौद्ध-जैन ते सातवाहन काळ, वैदिक भाषा, पाणिनी, मनुस्मृती आणि कौटिल्याचा काळ, श्रेणी संस्था, विकास, उत्कर्ष, अधःपतन आणि वैदिक वर्चस्वाची सुरूवात आणि ब्रिटीश काळ - वैदिक वर्चस्वावर अधिकृत शिक्कामोर्तब अशा 11 प्रकरणातून त्यांनी हा व्यापक विषय अत्यंत अभ्यासपूर्ण रीतिने मांडला आहे. हिंदू धर्मावर होणारे आक्रमण, वैदिकांचा वर्चस्ववाद याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यामुळे वेदप्रामाण्याच्या नावावर काहीही ठोकून देणारे आपोआप उघडे पडले आहेत. 

‘सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच’ या सिद्धांताला संजय सोनवणी यांनी तडा दिला आहे. वैदिक व पाश्‍चात्य विद्वानांच्याच मतांवर अवलंबून असलेल्यांनी सत्य कधी पुढे येऊच दिले नाही. आपल्या नसलेल्या अस्मिता आणि खोटा अहंकार कुरवाळत त्यांनी हिंदू आणि वैदिक यांच्यात मोठी गल्लत केली. हा सगळा मामला काय हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचण्यावाचून गत्यंतर नाही. मनुस्मृती नेमकी का आणि कुणासाठी याबाबतचेही विवेचन या पुस्तकात आले आहे. सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भाषिक स्थित्यंतराचा एक मोठा पट उलगडून दाखवणे तसे जिकिरीचे काम. त्यातही पुस्तकाच्या केवळ 320 पानांत हे मांडणे म्हणजे तर शिवधनुष्यच! पण ते आव्हान संजय सोनवणी नावाच्या प्रतिभेच्या जागृत ज्वालामुखीने लिलया स्वीकारलं आणि ते इतिहासाशी, प्रामाणिकपणाशी तडजोड न करता, त्याच्याशी प्रतारणा न करता पूर्णत्वासही नेलं. आपल्या संस्कृतीची पाळंमुळं समजून घ्यायची असतील तर कोणतेही पूर्वग्रह न बाळगता हे पुस्तक तटस्थपणे वाचायला हवं, त्यावर चिंतन करायला हवं. 

हिंदू आणि वैदिक हे दोन्ही धर्म वेगळे कसे आहेत याचा पुरातन काळापासूनचा त्यांनी घेतलेला धांडोळा कुणालाही अचंबित करणारा आणि अभ्यासकांना व्यापक दृष्टी देणारा आहे. वैदिक धर्माचा आणि हिंदू धर्माचा काळ यातील तफावतही त्यांनी अधोरेखित केली आहे.  सूर आणि असूर संस्कृतीतील फरक सांगितला आहे. पौराणिक कथामधून सत्याशी घेतलेली फारकत दाखवून दिली आहे. दोन्ही धर्मातील श्रद्धा, अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी परंपरा, आचार-विचार, संस्कृती, संघर्ष या सर्वाची नेटकी आणि नेमकी मांडणी त्यांनी या पुस्तकात केलीय. तंत्र-मंत्र, देवादिकांच्या प्रतिमांचे पूजन, त्यातून बनवली गेलेली मिथके यावरही त्यांनी प्रभावी भाष्य केलंय. भाषा गटांचे प्रश्‍न मांडलेत. या भाषांचे जाळे कसे निर्माण झाले, प्रांतिक भाषा कशा विस्तारत गेल्या हेही साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. 

‘विषमतेचे तत्त्वज्ञान असलेले वैदिक धर्मतत्त्व की समतेचे स्वतंत्रतावादी तत्त्वज्ञान असलेले हिंदू धर्मतत्त्व ही निवड हिंदुंना डोळस व नीटपणे करावी लागेल. वैदिकांनाही आपल्याच धर्माचा पुनर्विचार करणे आवश्यक बनून जाते’ असे मत संजय सोनवणी या पुस्तकातून मांडतात. त्यावर प्रत्येकानं विचार केलाच पाहिजे.

हिंदू धर्म आपल्या कृषी संस्कृतीतून जन्माला आलाय आणि अफगाणिस्तानात स्थापन झालेला व विस्थापितांच्या माध्यमातून धर्मप्रसारासाठी आलेला वैदिक धर्म आपल्याकडे नंतर स्थिरावलाय याकडं ते लक्ष वेधतात. या पुस्तकाचा गाभाच हा असल्यानं या दोन्ही धर्मधारांची चिकित्सा त्यांनी या पुस्तकाद्वारे केलीय. वैदिकांचा वर्चस्ववाद कसा वाढत गेला आणि त्यात हिंदू धर्म कसा अडकत गेला हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. धर्मइतिहासावर सुस्पष्ट प्रकाश टाकतानाच वर्चस्ववाद झुगारून देण्याचं मोठं धाडस संजय सोनवणी यांनी या पुस्तकाद्वारे दाखवलं आहे. वैदिक-अवैदिक या विषयाचा ध्यास घेऊन, अहोरात्र अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. आम्ही मित्रमंडळी त्यांना गंमतीनं ‘वैदिक धर्माचे शंकराचार्य’ म्हणत असलो तरी या विषयाची व्याप्ती आणि त्यांचा त्यातील व्यासंग किती मोठा आहे ते हे पुस्तक वाचल्यावर समजते. त्यांच्या भावी लेखन प्रवासाला आणि साहित्यातील संशोधनाला आमच्या शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक 'पुण्य नगरी, १५ जुलै २०१८)

Monday, July 2, 2018

संमेलाध्यक्षपदी ‘दादा’च हवेत!


साहित्य संमेलन हा मराठी भाषेतील मोठा साहित्योत्सव आहे.  आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकशाही व्यवस्थेप्रमाणे निवडून न येता ‘निवडून’ देण्याचा घाट साहित्य महामंडळाने घातला आहे. म्हणजे यापुढे निवडणूक न घेता संमेलनाध्यक्ष सर्वसहमतीने निवडून देण्याचे ठरवले जात आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर साहित्य आणि संस्कृतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आदींना सढळ हाताने मदत करण्याचा त्यांचा गुण सर्वश्रूत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले असले तरी त्यातील एकही सिद्ध झालेला नाही. प्रत्येक गोष्टीचे खापर त्यांच्यावर फोडले जात असल्याने त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. देशाच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे पवार साहेब आरोप सहन करण्यास पुरते निर्ढावलेले आहेत. संमेलनाध्यक्षांच्या निवडप्रक्रियेत त्यांचा असलेला वाटा आजवर अनेकदा दिसून आलेला आहे. आता थेट ते सांगतील तो अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पवार साहेब हा महाराष्ट्राचा आणि देशाचाही चालताबोलता इतिहास आहे. साहित्यात वैचारिक भ्रष्टता आलेली असताना साहित्यिक अकारण राजकारण करतात आणि राजकारणी साहित्यात रमतात हे चित्र सध्या सर्रास दिसते. त्यामुळे पवारांनी संमेलनाध्यक्ष सुचवला तर त्याचे स्वागतच करायला हवे. 

या साहेबांनी त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी सुचवले तर कसला बहार येईल?  संमेलनाध्यक्षपदी दादा म्हटल्यावर साहित्य क्षेत्राबरोबरच प्रसारमाध्यमे, सर्वपक्षीय सामान्य कार्यकर्ते, नेते यांच्या कल्पनाशक्तीला, प्रतिभेला उधाण येईल. साहेबांचे ‘एकेकाळचे’ कार्यकर्ते असलेल्या रामदास आठवलेंना कवी संमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दोन शक्तिंचे मनोमिलन झाले तर ते त्या दोघांसाठीही पोषकच ठरणारे आहे. 

गेल्या काही वर्षातील उथळ संमेलनाध्यक्ष पाहता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘खमक्या’ असायला हवा. त्यासाठी तूर्तास तरी आमच्या डोळ्यासमोर एकच नाव आहे, ते म्हणजे अजित पवार यांचे! अजित पवार यांच्यासारखा नेताच मराठी साहित्याला आता दिशा देऊ शकतो.

एकतर साहित्य आणि राजकारण यात आता तसा फारसा फरक शिल्लक राहिलेला नाही. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. त्यातही साहित्यिक शोधून काढावे लागतात. प्रत्येकाला ‘करंगुळी’ दाखवत त्यांच्याकडून पुरेशा मतपत्रिका मिळवणे हे दादांच्या कार्यकर्त्यांना सहज शक्य झाले असते. आता तर त्याचीही गरज पडणार नाही. साहित्यातील संस्था आणि त्यांच्या घटकसंस्था दादांच्या नावाला विरोध करण्याइतक्या परिपक्व नाहीत. त्यामुळे दादा संमेलनाध्यक्ष झाले तर त्यांना सध्याच्या राजकीय उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडता येईल. त्यांना नवी आणि प्रतिष्ठेची ओळखही प्राप्त होईल. जितेंद्र आव्हाडासारखा नेता मतपत्रिका गोळा करण्यासाठी पाठवला तर एरवीही हा मार्ग सुकर झाला असता. 

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचे मोलाचे कार्य नामदार अजित पवारांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात तुकाराम महाराज आणि काही प्रमाणात रामदास स्वामी कळण्यास कारणीभूत ठरलेले दादा हेच यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. याच महिन्यात (म्हणजे 22 जुलै) दादांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन दादांच्या अध्यक्षपदाची तयारी सुरू करायला हवी. घुमानच्या संमेलनातील पंचपक्वान्नाचे कोडकौतुक करणार्‍यांना आणि पी. डी. पाटलांनी वाटलेल्या खिरापतीची सातत्याने चर्चा करणार्‍यांना दादा सणसणीत चपराक देऊ शकतात. साहित्यिकांना बिअरपासून ते रेड वाईनपर्यंत आणि कोंबड्या-बकर्‍यापासून ते मराठमोळ्या पुरणपोळ्यापर्यंत जे ‘हवे ते’ उपलब्ध करून देण्याची ‘ताकत’ या नेत्यात आहे. 

अजित पवार अध्यक्ष होणार असतील तर महामंडळाला निधीसाठी पायपीट करावी लागणार नाही. घुमानच्या संमेलनात व्यासपीठावर महामंडळाच्या अध्यक्षांची ‘नथ’ दिसली पण संमेलनाचे ‘नाक’ (अध्यक्ष) मागे दडले होते’ अशी टीका आम्ही केली होती. अजित पवार अध्यक्ष झाले तर जगबुडी झाली तरी प्रसारमाध्यमे सविस्तर वार्तांकन करतील. महामंडळाच्या अध्यक्षापेक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला जास्त मान मिळेल. आतापर्यंत प्रत्येक संमेलनात राजकारणी असतातच आणि ते संमेलनाध्यक्षांचे औपचारिकपणे गोडगोड कौतुक करून निघून जातात. संमेलनाध्यक्षही तेच तेच विचार रेटून नेत असतात. या असल्या थिल्लर प्रकाराची मराठी भाषेला आता गरज नाही. मराठीला आता खमकेपणे बोलणारा, प्रसंगी साहित्यिकांचीही कानउघाडणी करणारा, भाषेचा ठसा उमटवणारा, त्यातील रांगडेपणा सिद्ध करणारा अजित पवार यांच्यासारखा अध्यक्ष हवाय. ‘शिव्या देण्यात माझी पीएचडी आहे’ असे मोठ्या साहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे. काकणभर त्यांच्या पुढे जाऊन हा वारसा चालवणार्‍या त्यांच्या या शिष्याची कदर मराठी बांधवांनी केलीच पाहिजे. 

शरद पवार यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक ‘तत्त्वा’नुसार आजवर अनेक संमेलने झाली आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही त्यांच्या इशार्‍यावर ‘नेमले’ गेले आहेत. त्यांच्या सल्ल्याशिवाय संमेलनाचे पानही हलत नाही. त्यांच्या सहभागाशिवाय संमेलनाचे व्यासपीठ रितेरिते वाटते. मात्र सत्ताबदल होताच रंगबदलूपणा करत महामंडळाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. ‘सर्वसहमतीने संमेलनाध्यक्षाची निवड’ ही त्यासाठी एक चांगली संधी आहे. या निमित्ताने का होईना पण अजित पवारांना थोडीफार किंमत मिळेल. त्यामुळे यंदाच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी दादांच्या नावाचा आग्रह जरूर धरावा! 
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092