Monday, July 2, 2018

संमेलाध्यक्षपदी ‘दादा’च हवेत!


साहित्य संमेलन हा मराठी भाषेतील मोठा साहित्योत्सव आहे.  आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकशाही व्यवस्थेप्रमाणे निवडून न येता ‘निवडून’ देण्याचा घाट साहित्य महामंडळाने घातला आहे. म्हणजे यापुढे निवडणूक न घेता संमेलनाध्यक्ष सर्वसहमतीने निवडून देण्याचे ठरवले जात आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर साहित्य आणि संस्कृतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आदींना सढळ हाताने मदत करण्याचा त्यांचा गुण सर्वश्रूत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले असले तरी त्यातील एकही सिद्ध झालेला नाही. प्रत्येक गोष्टीचे खापर त्यांच्यावर फोडले जात असल्याने त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. देशाच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे पवार साहेब आरोप सहन करण्यास पुरते निर्ढावलेले आहेत. संमेलनाध्यक्षांच्या निवडप्रक्रियेत त्यांचा असलेला वाटा आजवर अनेकदा दिसून आलेला आहे. आता थेट ते सांगतील तो अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पवार साहेब हा महाराष्ट्राचा आणि देशाचाही चालताबोलता इतिहास आहे. साहित्यात वैचारिक भ्रष्टता आलेली असताना साहित्यिक अकारण राजकारण करतात आणि राजकारणी साहित्यात रमतात हे चित्र सध्या सर्रास दिसते. त्यामुळे पवारांनी संमेलनाध्यक्ष सुचवला तर त्याचे स्वागतच करायला हवे. 

या साहेबांनी त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी सुचवले तर कसला बहार येईल?  संमेलनाध्यक्षपदी दादा म्हटल्यावर साहित्य क्षेत्राबरोबरच प्रसारमाध्यमे, सर्वपक्षीय सामान्य कार्यकर्ते, नेते यांच्या कल्पनाशक्तीला, प्रतिभेला उधाण येईल. साहेबांचे ‘एकेकाळचे’ कार्यकर्ते असलेल्या रामदास आठवलेंना कवी संमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दोन शक्तिंचे मनोमिलन झाले तर ते त्या दोघांसाठीही पोषकच ठरणारे आहे. 

गेल्या काही वर्षातील उथळ संमेलनाध्यक्ष पाहता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘खमक्या’ असायला हवा. त्यासाठी तूर्तास तरी आमच्या डोळ्यासमोर एकच नाव आहे, ते म्हणजे अजित पवार यांचे! अजित पवार यांच्यासारखा नेताच मराठी साहित्याला आता दिशा देऊ शकतो.

एकतर साहित्य आणि राजकारण यात आता तसा फारसा फरक शिल्लक राहिलेला नाही. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. त्यातही साहित्यिक शोधून काढावे लागतात. प्रत्येकाला ‘करंगुळी’ दाखवत त्यांच्याकडून पुरेशा मतपत्रिका मिळवणे हे दादांच्या कार्यकर्त्यांना सहज शक्य झाले असते. आता तर त्याचीही गरज पडणार नाही. साहित्यातील संस्था आणि त्यांच्या घटकसंस्था दादांच्या नावाला विरोध करण्याइतक्या परिपक्व नाहीत. त्यामुळे दादा संमेलनाध्यक्ष झाले तर त्यांना सध्याच्या राजकीय उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडता येईल. त्यांना नवी आणि प्रतिष्ठेची ओळखही प्राप्त होईल. जितेंद्र आव्हाडासारखा नेता मतपत्रिका गोळा करण्यासाठी पाठवला तर एरवीही हा मार्ग सुकर झाला असता. 

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचे मोलाचे कार्य नामदार अजित पवारांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात तुकाराम महाराज आणि काही प्रमाणात रामदास स्वामी कळण्यास कारणीभूत ठरलेले दादा हेच यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. याच महिन्यात (म्हणजे 22 जुलै) दादांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन दादांच्या अध्यक्षपदाची तयारी सुरू करायला हवी. घुमानच्या संमेलनातील पंचपक्वान्नाचे कोडकौतुक करणार्‍यांना आणि पी. डी. पाटलांनी वाटलेल्या खिरापतीची सातत्याने चर्चा करणार्‍यांना दादा सणसणीत चपराक देऊ शकतात. साहित्यिकांना बिअरपासून ते रेड वाईनपर्यंत आणि कोंबड्या-बकर्‍यापासून ते मराठमोळ्या पुरणपोळ्यापर्यंत जे ‘हवे ते’ उपलब्ध करून देण्याची ‘ताकत’ या नेत्यात आहे. 

अजित पवार अध्यक्ष होणार असतील तर महामंडळाला निधीसाठी पायपीट करावी लागणार नाही. घुमानच्या संमेलनात व्यासपीठावर महामंडळाच्या अध्यक्षांची ‘नथ’ दिसली पण संमेलनाचे ‘नाक’ (अध्यक्ष) मागे दडले होते’ अशी टीका आम्ही केली होती. अजित पवार अध्यक्ष झाले तर जगबुडी झाली तरी प्रसारमाध्यमे सविस्तर वार्तांकन करतील. महामंडळाच्या अध्यक्षापेक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला जास्त मान मिळेल. आतापर्यंत प्रत्येक संमेलनात राजकारणी असतातच आणि ते संमेलनाध्यक्षांचे औपचारिकपणे गोडगोड कौतुक करून निघून जातात. संमेलनाध्यक्षही तेच तेच विचार रेटून नेत असतात. या असल्या थिल्लर प्रकाराची मराठी भाषेला आता गरज नाही. मराठीला आता खमकेपणे बोलणारा, प्रसंगी साहित्यिकांचीही कानउघाडणी करणारा, भाषेचा ठसा उमटवणारा, त्यातील रांगडेपणा सिद्ध करणारा अजित पवार यांच्यासारखा अध्यक्ष हवाय. ‘शिव्या देण्यात माझी पीएचडी आहे’ असे मोठ्या साहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे. काकणभर त्यांच्या पुढे जाऊन हा वारसा चालवणार्‍या त्यांच्या या शिष्याची कदर मराठी बांधवांनी केलीच पाहिजे. 

शरद पवार यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक ‘तत्त्वा’नुसार आजवर अनेक संमेलने झाली आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही त्यांच्या इशार्‍यावर ‘नेमले’ गेले आहेत. त्यांच्या सल्ल्याशिवाय संमेलनाचे पानही हलत नाही. त्यांच्या सहभागाशिवाय संमेलनाचे व्यासपीठ रितेरिते वाटते. मात्र सत्ताबदल होताच रंगबदलूपणा करत महामंडळाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. ‘सर्वसहमतीने संमेलनाध्यक्षाची निवड’ ही त्यासाठी एक चांगली संधी आहे. या निमित्ताने का होईना पण अजित पवारांना थोडीफार किंमत मिळेल. त्यामुळे यंदाच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी दादांच्या नावाचा आग्रह जरूर धरावा! 
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

No comments:

Post a Comment