Tuesday, February 11, 2020

हे तर प्रचंड क्रौर्य!



शरद पवार हे देशातले एक बलाढ्य नेते आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. त्यामुळंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, कामकाजाविषयी, निर्णयाविषयी, त्यांच्या विविध भूमिकांविषयी सातत्यानं चर्चा होत असते. तशी चर्चा मराठीतला एक लेखक आणि पत्रकार म्हणून मीही सातत्यानं केली आहे. त्यांच्या चांगल्या कामकाजावर जसे आम्ही गौरवांक काढले, विविध नियतकालिकातून कौतुक केलं तसंच चुकीच्या धोरणांवर आम्ही सातत्यानं तुटून पडलोय.

गेल्या काही काळापासून समाजमाध्यमांचा वापर वाढला आणि आम्ही आमची भूमिका दृकश्राव्य माध्यमाद्वारे मांडू लागलो. आमच्या व्हिडिओंना शब्दशः लाखो दर्शक मिळू लागले. घराघरात हे विचार पोहोचल्यानं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. शरद पवार तरी याला कसे अपवाद राहतील? 

काँग्रेसमधून फुटून त्यांनी आपली एक वेगळी टोळी निर्माण केली आणि त्याला ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष’ असं व्यापक नाव दिलं. हा पक्ष देशपातळीवर काम करतो, तो राष्ट्रीय पक्ष आहे असा त्यांचा समज आहे. मात्र आजवर एकदाही या पक्षानं स्वतःच्या हिमतीवर राज्यात सत्ता आणली नाही ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना केंद्रीय कृषी मंत्री असतानाही शरद पवार पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला यायचे आणि ‘पुण्याचा कारभारी बदला’ असं आवाहन पोटतिडिकेनं करायचे हा इतिहास आहे. 

समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषी, सहकार, क्रीडा, नाट्य, साहित्य अशा कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी त्यात पवारांचा सहभाग आहेच. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर प्रकरण असेल किंवा स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय असतील ते सर्व गौरवास्पदच आहे. हे सारं करतानाच त्यांनी मात्र सातत्यानं स्वतःविषयी अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं. 

दिल्लीश्वरापुढं कायम लोटांगण घालत त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचं साम्राज्य उभं केलं. ‘दिल्लीचं तख्त’ ही त्यांची महत्त्वाकांक्षा आजच्या दिवसापर्यंत अपूर्ण राहिली कारण अजूनही दिल्लीत आणि इतर राज्यात त्यांच्याविषयी ‘धोकेबाज’ म्हणूनच बोललं जातं. 

विशेषतः ब्राह्मण, मराठा, दलित, आदिवासी अशा जातीजातीत कायम संघर्ष निर्माण होईल असंच वातावरण त्यांनी निर्माण केलं. राजू शेट्टी राजकीय अपरिहार्यतेतून त्यांच्या सोबत असले तरी त्यांची जात काढणं असेल, पुणेरी पगडी आणि कोल्हापुरी पागोट्याविषयीचं त्यांचं विधान असेल, पेशवे आणि शाहू अशी तुलना असेल किंवा मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख जाणीवपूर्वक ‘पंत’  असाच करणं असेल यातून त्यांची मनोवृत्ती दिसून येते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा सोयीस्कर वापर करतानाच त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज हा विषयही राजकारणासाठीच वापरला. 

त्यांचा उल्लेख गेल्या अनेक वर्षांपासून ‘जाणता राजा’ असाच केला जातो. ज्या श्रीसमर्थ रामदास स्वामींचा द्वेष करण्यात शरद पवार नेहमी धन्यता मानतात त्याच समर्थांनी ‘जाणता राजा’ हे विशेषण छत्रपती शिवाजीमहाराजांसाठी वापरलं होतं. त्यामुळं इतिहासात छत्रपती शिवाजीराजे हे एकमेव जाणते राजे आहेत. आजच्या काळात तर राजा आणि प्रजा ही पद्धतही लोप पावलीय. त्यामुळं लोकशाहीत कुणालाही जाणता राजा म्हणणं निव्वळ हास्यास्पद आहे. शरद पवारांनी कधीही याला विरोध केला नाही. याविरूद्ध मी काही आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवरून आणि विविध लेखांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. हे सगळं सुरू असतानाच ‘रामदास स्वामी शिवरायांना समकालीन नव्हते किंबहुना असं कोणतं पात्रही नव्हतं. केवळ ब्राह्मणांनी त्यांचं वर्चस्व वाढविण्यासाठी ते निर्माण केलं आहे’ अशा आशयाची भूमिका त्यांनी घेतली.\

एकेकाळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार्‍या शालिनीताई पाटील यांच्यासोबत त्यांनी सुडाचं राजकारण केलं. वसंतदादा पाटलांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याची चर्चाही महाराष्ट्रात सातत्यानं होते. इतकंच काय तर केवळ सत्तेच्या हव्यासापोटी ते ज्यांना गुरू मानतात त्या यशवंतराव चव्हाण यांनाही त्यांनी ‘परतीचे दोर कापून टाकलेत’ इतक्या स्पष्ट शब्दात सुनावलं होतं. 

हा सगळा इतिहास माझी पिढी सातत्यानं ऐकत, वाचत आलीय. त्याविषयी जाब विचारणं, त्यांचं म्हणणं जाणून घेणं हा आमचा अधिकार आहे. त्यामुळं आम्ही काही प्रश्‍न उपस्थित केले तर ते शरद पवार यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबण्याचं काहीच कारण नाही. ‘शरद पवार तुम्ही आमच्या आणखी किती पिढ्या बरबाद करणार?’ असा सवाल मी ‘द पोस्टमन’ या यू ट्यूब चॅनेलवरील व्हिडिओत उपस्थित केला आणि दिल्लीचं तख्त काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले हे ‘स्वयंघोषित जाणते’ राजे बिथरले. आमच्या त्या वक्तव्यावर शब्दशः हजारो प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही प्रतिक्रिया निश्चितपणे आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहेत. त्या थांबवायला हव्यात. मात्र तशी कोणतीही यंत्रणा आमच्याकडे नाही. ‘चुकीच्या प्रतिक्रिया देऊन प्रतिक्रियावादी बनू नका’ हे आम्ही सातत्यानं सांगत असतो पण शरद पवार यांच्यावर लोकांचं इतकं ‘विलक्षण प्रेम’ आहे की लोक त्यांना शिव्या घातल्याशिवाय शांत राहूच शकत नाहीत. 

या सर्व लोकभावना समजून घेऊन स्वतःच्या आचारविचारात बदल करण्याऐवजी त्यांच्या एका निकटवर्तीयानं मी आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याविरूद्ध व ‘पोस्टमन’ विरूद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. बरं, जर यांना हे इतकंच अवमानकारक वाटत असेल तर त्यांनी किमान आमच्याविरूद्ध लोकशाही मार्गानं रीतसर गुन्हा नोंद करावा. तसं न करता ज्यात कसलाच दम नाही अशी अर्थहीन तक्रार देऊन त्यांनी यंत्रणेतही स्वतःचं हसं करून घेतलं आहे. इतक्यावरच न थांबता हे महाभाग राज्यातील विविध शहरात पत्रकार परिषदा घेऊन याबाबतची माहिती देत फिरत आहेत.

कोरेगाव भीमा येेथे उपस्थित न राहताही त्यांना त्याविषयीची सगळी माहिती असते. इथं त्यांच्याच एका निकटवर्तीय पदाधिकार्‍यानं मी आणि भाऊ तोरसेकर यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही त्यांना त्याचा पत्ता नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही. या तक्रारीनंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या काही पंटरांकडून आम्हाला धमक्या येत आहेत. त्यात जीवे मारण्यापासून ते आम्हाला कापा, तोडा असा उल्लेख करत आमच्या आई-बहिणींचा उद्धार केला जातोय. 

शरद पवार यांच्या समर्थकांची बौद्धिक उंची, त्यांची झेप, रक्तातली गुंडगिरी याविषयी माझ्या आणि भाऊंच्या मनात कसलीही शंका नाही. त्यामुळंच जर उद्या यात आमचा देह पडला किंवा आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला तर त्याचे सूत्रधार शरद पवार हेच असतील हे वेगळे सांगायला नको.

एकीकडं नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं गळे काढायचे आणि दुसरीकडं कुणी काही प्रश्न उपस्थित केला की त्याचा प्रतिवाद करण्याऐवजी असं सूडाचं राजकारण करायचं हे फक्त आणि फक्त शरद पवार यांनाच शोभू शकतं. राजकीय विश्‍लेषक या नात्यानं मी जेव्हा पवारांच्या कारकिर्दीकडं पाहतो तेव्हा त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा मला मनस्वी अभिमान वाटतो. या नेत्याची आपण कदर केली नाही, महाराष्ट्र याबाबत करंटा ठरला असंही मला वाटतं. त्याचवेळी त्यांनी सातत्यानं चालवलेलं सूडाचं राजकारण, त्यांनी निर्माण केलेला द्वेष, अविश्वास हे सर्व पाहिलं की चीडही येते.

आपल्याकडं माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवा नाही. त्यामुळं पवारांवर नंतर पोवाडे रचले जातील पण आमच्या पिढीनं काही प्रश्न उपस्थित केले तर आम्हाला संपवण्याचं पातक त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी करू नये. यात माझं किंवा भाऊंचं काही बरंवाईट झालं तरी त्यांच्या काळ्याकुट्ट मनोवृत्तीचं आणि क्रौर्याचंच दर्शन समाजाला घडणार आहे एवढं मात्र नक्की.
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक', पुणे
7057292092

Tuesday, January 14, 2020

जाणते राजे आणि अजाणते नेते!


कुण्यातरी जय भगवान गोयल नावाच्या एका भाजप नेत्यानं ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या शीर्षकाचं पुस्तक लिहिलंय. दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत भाजपच्याच दिल्ली कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाच्या शीर्षकावरून वादळ निर्माण झालं आहे.
आजवर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत झाली. उदा. नेपोलियनसोबत महाराजांची तुलना झाली. ती तुलना अत्यंत अयोग्य होती कारण नेपोलियन हा चारित्र्यहीन, लंपट माणूस होता. हिटलरसोबत महाराजांची तुलना झाली पण तो हुकूमशाही वृत्तीचा होता. फ्रेडरिक द ग्रेट, अलेक्झांडर, विस्टन चर्चिल अशा अनेकांसोबत महाराजांची तुलना झाली पण ती अयोग्य होती हे इतिहासाची पानं चाळताना कुणाच्याही लक्षात येईल. अलेक्झांडर जग जिंकत आल्यावर भारतात आला. त्यावेळी त्याचं सैन्य परत गेलं. ‘‘इतक्या वर्षाच्या लढाईत आम्ही घर सोडून बाहेर आहोत. आमच्या बायका कशा आहेत आम्हाला माहीत नाही. मुलं काय करतात, कशी दिसतात हे माहीत नाही. त्यामुळं आम्ही परत चाललो’’ असं त्याच्या सैन्यानं त्याला सांगितलं. महाराज चर्चिलसारखे व्यसनी आणि अहंकारी नव्हते. त्यांचं चारित्र्य धवल होतं. ते आदर्श मुलगा, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राज्यकर्ते होते.
आपल्याकडील विक्रमादित्य, शालिवाहन अशा महापुरूषांसोबतही महाराजांची तुलना करण्यात आली. यांनी स्वतःच्या नावे शके सुरू केली. महाराजांनी कुठंही स्वतःचं नाव न वापरता ‘राज्याभिषेक शक’ सुरू केलं. त्यामुळं त्यांच्यासोबतही महाराजांची तुलना होऊ शकत नाही. तुलनात्मक अभ्यास केला तर महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ते एकमेवाद्वितीय होते. आहेत.
आपण काही वर्षे मागे गेलो तर यशवंतराव चव्हाण यांनाही ‘प्रतिशिवाजी’ म्हटलं जायचं. ती तुलनाही अयोग्य होती कारण मृत्यू समोर दिसत असतानाही महाराजांचे मावळे त्यांना सोडून गेले नव्हते. यशवंतराव चव्हाण यांच्याकडं शेवटी फक्त चार आमदार उरले होते. त्यानंतर त्यांनी स्वाभिमान बाजूला ठेवून परत इंदिरा गांधी यांच्याशी जुळवून घेतलं. अत्यंत गरीब घरातून पुढं आलेल्या या मुलानं देशस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली पण ते ‘प्रतिशिवाजी’ होऊ शकत नाहीत. सध्याच्या काळाचा विचार केला तर नाना पटोले यांच्यासारखा खासदार मोदींना उघड शिव्या देऊन सोडून गेला. अशांची तुलना महाराजांसोबत कशी बरं होऊ शकेल? 
समोर मृत्यू दिसत असतानाही तीनशे बांदलांना सोबत घेऊन  बाजीप्रभू देशपांडे सार्वजनिक हौतात्म्य पत्करायला आणि प्राणार्पण करायला धाडसानं गेले. त्यांचं हे बलिदान लक्षात घेतल्यावर तुलना करणार्‍यांना त्याची जाणीव होईल. मुरारबाजीसारख्या मर्द मावळ्यानं मृत्यू समोर दिसत असतानाही दिलेरखानाच्या बक्षीसावर थुंकण्याची हिंमत दाखवली. त्यामुळं महाराजांच्या अद्भूत गुणांची तुलना कुणासोबतही होणार नाही. 12 मे 1666 ला आग्य्राच्या किल्ल्याबाहेर महाराजांनी ठणकावून सांगितलं, ‘‘माझं शीर कापून दिलं तरी चालेल पण या माणसाच्या दरबारात मी जाणार नाही.’’
इतिहासात महाराजांची तुलना झाली ती फक्त नेताजी पालकर यांच्यासोबत. नेताजी आदिलशहाला जाऊन मिळाले. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. ते मुहम्मद कुली खान झाले. मात्र ‘शिवाजी’ नावाचा परिसस्पर्श झाल्यानं तेे पुन्हा माणसात आले.
मावळे ज्याला देव मानत होते तो राजा किती मोठा हे समजून घेतलं पाहिजे. मूल्यमापनाच्या कोणत्याही कसोट्या शिवचरित्राचा अभ्यास करताना टिकत नाहीत. शिवाजी हा जगाच्या इतिहासातला एक चमत्कार आहे.
5 सप्टेंबर 1659 ला सईबाईंसाहेबांचा मृत्यू झाला. त्यावेळी रजा न घेता महाराज अफजलखानाच्या भेटीस गेले. त्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. ‘स्वराज्य’ महत्त्वाचं ही त्यांची त्यामागची भूमिका होती. सामान्य माणसाच्या मनात निष्ठा आणि ध्येय निर्माण करायचं आणि त्याच्याकडून असामान्य पराक्रम करून घ्यायचा हे काम राजांनी केलं. ते जगात कुणालाच जमलं नाही. त्यामुळं महाराजांवर दैवीपणाची पुटं चिकटवू नका.
मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेल्या तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लगीन कोंडाण्याचं’ म्हणत मोहीम हाती घेतली. आपल्या पत्नीच्या मृत्युचा वियोग बाजूला ठेवून लढणारा राजा त्यांचा आदर्श होता. आज असं काही दिसतंय का? 
6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळीच संभाजीराजे ‘युवराज’ झाले. महाराजांनी रयतेवर राज्याभिषेक कर लावला नाही. आज अजितदादा मुद्रांक शुल्क वाढवत आहेत.
महाराजांनी राजव्यवहार कोेश सुरू केला. रघुनाथ पंडितांची त्यासाठी निवड केली होती. आज मोदी किंवा ठाकरे त्यासाठी काय करत आहेत? किती भाषांना त्यांनी अभय दिलंय? आपल्या मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाचं घोंगडं सरकार दरबारी किती काळ भिजत पडलंय? मग हे ‘आजचे शिवाजी’ कसे होऊ शकतात?
महाराजांचं न्यायदानाचं खातं अतिशय निष्कलंक होतं. असा निस्पृहपणे वागणारा आज एक नेता दाखवा. त्याविषयी महाराजांचे एक उदाहरण बघितले पाहिजे.
पिलाजीराव शिर्के हे संभाजीराजांचे सासरे. त्यावेळी चिंचवडला मोरया गोसावी यांचं प्रस्थ मोठं होतं. मोरया गोसावी यांनी पिलाजी शिर्के यांना ‘देवाच्या वार्षिक उत्सवासाठी काहीतरी मदत करा’ अशी गळ घातली. शिर्के यांनी हा विषय संभाजीराजांच्या कानावर घातला आणि ‘परिसरातल्या शेतकर्‍यांकडून भात आणि मीठ गोळा करण्याची’ सनद त्यांना मिळवून दिली.
शेतकर्‍यांनी तीन-चार वर्षे कर दिला. त्यानंतर मात्र दुष्काळी परिस्थिती होती. भात आणि मीठ देणं शक्य नव्हतं. त्यामुळं देवस्थानचा वार्षिक उत्सव अडचणीत आला. ते पाहून मोरया गोसावी यांनी सिंहगडच्या किल्लेदाराला सांगितलं की ‘यांना अंधारकोठडीत डांबा.’
 राजघराण्याशी संबंधित आध्यात्मातला मोठा माणूस असल्यानं त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली. त्या निष्पाप शेतकर्‍यांना अंधारकोठडीत डांबण्यात आलं.
या अन्यायाच्या विरूद्ध दाद मागण्यासाठी या शेतकर्‍यांचे नातेवाईक  रायगडावर गेले. महाराजांना भेटण्यासाठी मध्यस्थांची गरज नसायची. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यावर त्या शेतकर्‍याला त्याच्या मुलीसकट बाहेर हाकलतात.  नरेंद्र मोदी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. शरद पवार यांच्यासोबत कायम बंदुकधारी खासगी सुरक्षारक्षक असतात. त्या महाराजांतला आणि आजच्या नेत्यांतला हा मूलभूत फरक आहे.
तर ते शेतकरी राजांकडं गेले. त्यांनी सांगितलं, ‘‘कोणत्याही चौकशीशिवाय आमच्या नातेवाईकांना अटक केलीय. तुम्ही उलटतपासणी करून पहा.’’
महाराजांनी चौकशी केली. हे अन्यायकारक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी सिंहगडच्या किल्लेदाराला पहिला आदेश दिला, ‘‘तुला किल्लेदार म्हणून आम्ही नेमलंय. त्यामुळं आमचं ऐक. अन्य कुणाच्याही आदेशाचं पालन करणं तुला गरजचेचं नाही. आता त्या सर्व शेतकर्‍यांना सन्मानानं घरी नेऊन सोड. त्यांना थोडाही त्रास झाला तर त्या अंधारकोठडीत तू असशील!’’
संभाजीराजांनी युवराज या नात्यानं मोरया गोसावी यांना भात आणि मीठ वसुलीचा परवाना दिला होता. युवराजांच्या आदेशाचं पालन म्हणून त्यांनी सांगितलं, ‘‘यापुढं या वार्षिक उत्सवाचा सगळा खर्च शिवाजीराजांच्या खासगी तिजोरीतून, वैयक्तिक उत्पन्नातून केला जाईल. त्यासाठी कुणाला काहीही मागायची गरज नाही.’’
यानंतर त्यांनी मोरया गोसावी यांना पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, ‘‘तुम्ही तर गोसावी! राज्यकारभाराची इतकीं हाव तुम्हास कशासाठी? राज्यकारभाराची इतकीं हाव असेल तर आपली वस्त्रे आम्हास द्या आणि आमची वस्त्रे तुम्ही घ्या. याउपर राज्यकारभारात हस्तक्षेप केलात तर ब्राह्मण म्हणून, साधू म्हणून मुलाहिजा राखला जाणार नाहीं हे खूब ध्यानात ठेंवा.’’
ही वागणूक मोदींनी, पवारांनी शेतकर्‍यांना देऊन दाखवावी. महाराज मोरया गोसावी यांना आध्यात्मिक गुरू मानायचे. तरी त्यांनी न्यायदान करताना त्याचा विचार केला नाही. 
महाराजांच्या रूपानं परमेश्‍वरापेक्षा मोठी ताकद पृथ्वीवर अवतरली होती. नरेंद्र मोदी आणि महाराजांची तुलना करायची असेल तर त्यावर चर्चासत्र ठेवा. अशी तुलना करायची आमची तयारी आहे. 
त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ते जात्यांध नव्हते. महाराजांनी कधीही गोध्रा घडवलं नाही. महाराजांच्या मागं महाराष्ट्र होता. त्यांच्या राज्यात शेतकर्‍यानं आत्महत्या केल्या नव्हत्या. चुकून कोणी आत्महत्या केलीच असती तर त्यांनी दारू पिऊन, लफडे करून आत्महत्या केल्या असं शरद पवार यांच्यासारखं  सांगितलं नसतं. इब्राहिम सिद्धी हा त्यांचा सहकारी अफजलखान भेटीचा सोबती होता. मदारी मेहतर या मुस्लिम युवकानं त्यांच्यावर स्वप्राणाहून अधिक प्रेम केलं. महाराजांनी शहा मदर शहा, याकूत बाबा अशा त्यांच्या मुस्लिम गुरूंचे दर्गे बांधून दिले, तिथल्या खर्चाची सोय केली. असा पराक्रम पुन्हा मानवता घडवेल, इतिहास घडवेल असं वाटत नाही.
शरद पवार यांनाही ‘जाणता राजा’ हे विशेषण गेल्या कित्येक वर्षांपासून वापरलं जातं. तेही अतिशय चुकीचं आहे. 
निश्‍चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी
यशवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत
वरदवंत पुण्यवंत नीतीवंत, जाणता राजा।
असं श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन केलंय. त्यामुळं जाणते राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कुणालाही ती सर येणार नाही. शरद पवार यांना ‘जाणता राजा’ हे विशेषण प्रथम वसंत बापटांनी वापरल्याचं सांगितलं जातंय. मात्र हे धादांत खोटं आहे. आज भाजपवाले शरद पवारांच्या ‘जाणता राजा’ या विशेषणावरून रान पेटवत असले तरी त्यांचा तसा प्रथम उल्लेख भाजपा नेते प्रमोद महाजन यांनी केला होता हा इतिहास आहे. 
बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे किंवा अन्य कोणत्याही स्वकियानं कधीही सांगितलं नाही की शिवाजीराजांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. पवारांचे सहकारी हे उघडपणे सांगतात. त्यांनी जवळच्या अनेक लोकांना त्रास दिला. त्यांचं राजकारण पाहून जवळचे अनेक लोक दूर गेले. त्यामुळं त्यांनीच सगळ्यांना सांगायला हवं की ‘‘बाबांनो मला जाणता राजा म्हणू नका. ती माझी योग्यता नाही. किंबहुना महाराजांचा ‘मावळा’ होण्याचीही क्षमता माझ्यात नाही.’’
त्यामुळं यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नरेंद्र मोदी किंवा आणखी कोणीही ‘शिवाजी महाराज’ होऊ शकणार नाहीत. तेवढं सामर्थ्य, तेवढी कुवत कुणाच्याही जवळ नाही. 
जाता जाता एक उदाहरण देतो आणि थांबतो.
रामायणातलं राम आणि रावणाचं युद्ध 85 दिवस चाललं. त्यातले पहिले 84 दिवस राम जमिनीवर होते आणि रावण रथात. सगळ्या देव-देवता स्वर्गातून हे युद्ध बघायच्या. आयपीएलचा ट्वेन्टी ट्वेन्टीचा सामना असावा असं वातावरण होतं. जर आपण प्रभू श्रीरामचंद्राला मदत केली आणि यात दुर्र्दैवानं रावण जिंकला तर आपलं काही खरं नाही हे त्यांना ठाऊक होतं. 84 दिवस प्रभू रामचंद्रांनी नेटानं लढा दिल्यावर देव मदतीला आले. त्यांनी त्यांना रथ दिला. 85 व्या दिवशी राम रथात आरूढ झाले आणि ही विषम लढाई सम झाली. त्या दिवशी रामांनी रावणाचा वध केला. तेव्हा देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली.
देवही इतके सोयीस्कर वागू शकतात तर माणसाचं काय? मात्र महाराजांसोबतच्या सगळ्या मावळ्यांना पावला पावलावर मृत्यू दिसत असूनही त्यांनी कधी त्यांची साथ सोडली नाही. त्यांच्याशी प्रतारणा केली नाही. गद्दारी करून ते शत्रू पक्षात सामील झाले नाहीत. शिवाजीराजांचं श्रेष्ठत्व अधोरेखित होतं ते अशा घटनांतून. त्यामुळं त्यांच्याशी कुणाचीही तुलना करू नये.
मध्यंतरी ‘अण्णा हजारे आंधी है, देश के दुसरे गांधी है’ असा एक घोष कानावर पडायचा. अमित शहांना भाजपचे ‘चाणक्य’ म्हटलं जायचं. आता आता संजय राऊत यांच्यासारखा विदुषकही माध्यमांना ‘चाणक्य’ वाटू लागलाय. अशी कुणाचीही, कुणासोबतही तुलना करण्याचा जमाना आलाय. मात्र या सगळ्यात छत्रपती शिवाजीराजांच्या नावाचा वापर सातत्यानं स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणार्‍या कोणत्याही राजकारण्यानं, पक्षानं, माध्यमांनी अशी अनाठायी तुलना करू नये. छत्रपती शिवाजी महाराज ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही याचं भान सुटू नये. ते सुटलं तर मग आम्हालाही महाराजांसोबत तुमची तुलना करावी लागेल आणि महाराजांनी कधीही स्वतःच्या पत्नीचा त्याग केला नाही हे अधोरेखित करावे लागेल.
- घनश्याम पाटील
संपादक ‘चपराक’
7057292092



Sunday, November 24, 2019

पुरोगामी कोणाला म्हणावं?

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचं सातत्यानं सांगितलं जातं. अनेकजण आपणच कसे पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी धडपडत असतात तर काहींना प्रतिगामी ठरविण्यासाठी काहींचे ‘नको नको ते’ उद्योग सुरू असतात. अशा सगळ्या वातावरणात प्रश्‍न पडतो की, पुरोगामी कोणाला म्हणावं? खरा पुरोगामी कोण?

या प्रश्‍नाचं उत्तर तसं खूप सोपं आहे. ज्याचं अन्याय-अत्याचाराविरूद्ध रक्त सळसळतं, उसळून येतं, जुन्या चुकीच्या प्रथा-परंपरा मोडून काढण्याची धमक ज्याच्यात आहे, जे जे विज्ञाननिष्ठ नाही आणि जे समाजासाठी मारक आहे त्याच्याविरूद्ध जो पेटून उठतो तो पुरोगामी! याउलट ज्याला सत्य स्वीकारायचं नसतं, जो आपल्याच चुकीच्या भूमिकेवर आडून राहतो, दुराग्रह बाळगतो तोच कट्टरतावादी आणि खरा प्रतिगामी असतो, खरा दहशतवादी असतो. असा दहशतवाद स्वयंघोषित पुरोगामी वर्तुळात आणि परंपरावादी प्रतिगाम्यात दिसून येतो. यापैकी कोणीही परिवर्तनवादी नसल्यानं नितळतेचा हा प्रवाह दुर्गंधीकडं येऊन ठेपलाय. पुरोगामी परंपरेचं वाटोळं या दोन्ही प्रवृत्तीच्या अनुयायांनी केलंय.

स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेचं राजकारण करणारे आपले नेते ना पुरोगामी आहेत ना प्रतिगामी! ते आहेत संधीसाधू! ज्यामुळं आपलं भलं होणार त्याप्रमाणं त्यांचं वर्तन असतं. मग अनेक गुंड, पुंड, वस्ताद नि पठ्ठे ते पावन करून घेतात. त्यांच्यासाठी पुरोगामी, प्रतिगामी असं काही नसतं. समोरच्याचं उपयोगितामूल्य त्यांच्या बरोबर ध्यानात येतं. त्यानुसार ते आपले पंटर तयार करतात. 

आपण जेव्हा ‘पुरोगामी महाराष्ट्र’ असा शब्दप्रयोग करतो तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषाची छाप आहे. पाच हजार वर्षे जलपर्यटनावर बंदी असताना ज्यांनी स्वतःचं मोठं आरमान उभारलं ते छत्रपती शिवाजीराजे खरे पुरोगामी नेते ठरतात. त्यामुळं महाराजांचं तत्त्वज्ञान, त्यांची शिकवण आचरणात आणणारे जे कोणी असतील ते पुरोगामी! आदिलशाही-मोघलशाहीच्या विरूद्ध आवाज उठवताना ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं ते पुरोगामी. त्यांना अनिष्ठतेविरूद्ध, जुलमी सत्तेविरूद्ध बंड पुकारून हिंदवी स्वराज्य स्थापायचं होतं. त्यामुळं स्वतःच्या घरावर निखारा ठेऊन अहोरात्र रयतेच्या कल्याणाचा विचार करणारे छत्रपती शिवाजीराजे हे खरे पुरोगामी ठरतात. 

‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावे’ असं ठणकावून सांगणारे तुकाराम महाराज खरे पुरोगामी ठरतात तर त्याचवेळी मंबाजी भट, सालो-मालो प्रतिगामी ठरतात. भगवत्गीतेचं तत्त्वज्ञान मराठीत आणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पुरोगामी ठरतात तर त्याचवेळी त्यांना धर्मबहिष्कृत करणारे आळंदी-पैठणचे ब्राह्मण प्रतिगामी ठरतात. मोघल-आदिलशहांची चाकरी करणारे घोरपडे-सावंत कधीही पुरोगामी ठरू शकत नाहीत. त्यामुळं प्रत्येक काळात या दोन्ही प्रवृत्तीतला संघर्ष अटळ असतो. एकंदरीत संत ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेऊन नाचणारा, त्यांचा वारसा पुढं चालवणारा प्रत्येकजण पुरोगामी. एकीकडं फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं आपल्याच बहुजन समाजातील बांधवांना अंधारात ठेवायचं, त्यांचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा आणि आपली दुकानदारी जोरात सुरू ठेवायची असा बेगडी संधीसाधूपणा गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सुरू असल्यानंच पुरोगामी ही शिवी झालीय. एखादी ओवी जेव्हा शिवीत रूपांतरीत होते तेव्हा तो समाज अधःपतनाला गेलाच म्हणून समजा. जर आपलं महाराष्ट्र राज्य खरंच ‘पुरोगामी’ असतं तर आजची ही असली चालू असलेली ‘मेगाभरती’ करावी लागली असती का?

सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री असताना ‘हिंदू दहशतवाद’ ही कल्पना मांडली होती. पंढरीच्या विठ्ठलानंतर ज्ञानोबा आणि तुकोबाला देव माणणारा आपला समाज. तो कधीही दहशवादी असू शकत नाही. पूर्वी अशी काही विधानं केली की दलित, आदिवासी, मुस्लिम बांधवांपैकी काहीजण खूश व्हायचे. आता त्यांनाही त्यातला फोलपणा कळलाय. त्यामुळं ते अशा विधानांना बळी पडत नाहीत. कॉंग्रेसचं इतकं पानिपत झाल्यावर तरी त्यांना ही गोष्ट नक्कीच उमगली असेल. टोकाचा कट्टरतावाद जपणारे मुस्लिम, ख्रिश्‍चन हेही पुरोगामी असू शकत नाहीत. उलट कट्टरतावाद नेहमी दहशतवादाकडं जातो. अनेकांची क्षमा मागून मला यानिमित्तानं माझं निरीक्षण नोंदवासं वाटतं. ते असं की, हिंदू हा कधीही दहशतवादी असू शकत नाही! तो सच्चा पुरोगामी असणंही दुरापस्त झालंय. त्यामुळं तो ना पुरोगामी, ना प्रतिगामी! तो असलाच तर फक्त आणि फक्त ‘वेडगळ’ असू शकतो. त्याला ना आपल्या आदर्श संस्कृतीची चाड, ना नव्याचा ध्यास, ना परिवर्तनाची आस! विविध राजकारण्यांच्या मागं सैरभैर झालेले बहुसंख्य हिंदू बघितले की याची खात्री पटते. अर्थात याला काही अपवाद आहेत पण त्यांचं प्रमाण अंत्यत अत्यल्पच! ज्ञानेश्‍वर-तुकारामांची शिकवण रक्तात भिनलेला हिंदू उदारमतवादी असला तरी त्याला काळाची आव्हानं ओळखता येत नाहीत हे कटू वास्तव आहे.

ज्या महात्मा फुल्यांनी टिळक-आगरकरांना जामिन देऊन सोडवून आणलं त्याच फुल्यांच्या मृत्युनंतर केसरी, मराठा, सुधारकमधून मात्र फारसं काही लिहून आलं नाही. राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे विचार आजच्या स्वयंघोषित पुरोगाम्यांसाठी केवळ दुकानदारीपुरतेच उरलेत हेही समाजवास्तव आहे.

आज पक्ष कोणताही असला तरी नेत्यांच्या पाया पडायचा काळ आहे. त्यांचे जोडे उचलायलाही आपले नेते मागंपुढं पाहत नाहीत. मात्र याच हुजरेगिरी करणार्‍या आजच्या नेत्यात स्वाभिमान जागृत करावा यासाठी पूर्वसुरींनी जे प्रयत्न केले त्याला तोड नाही. दुर्दैवानं ते सगळं वाया गेलं असंच म्हणावं लागेल. आपल्या राज्याची पुरोगामी राज्य अशी ओळख असली तरी त्यात तथ्यांश नाही हेच खरं!

खरा पुरोगामीपणा बघायचा तर कोल्हापूरकडं बघावं. छत्रपती शाहू महाराजांनी पुराणोक्त संस्कार नाकारले. वेदोक्त संस्कार का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते शक्य नाहीत हे तेव्हाच्या व्यवस्थेनं सांगितल्यावर मग त्यांनी असले तकलादू संस्कारच नाकारले. ते ब्राह्मणविरोधी असल्याचा अपप्रचार काहीजण करतात; मात्र त्यात सत्य नसल्याचं कुणाही अभ्यासकाच्या सहजपणे लक्षात येईल. दिनानाथ मंगेशकर नावाचा कुणी चांगला गातो हे कळल्यावर कोल्हापूरकरांनी त्यांना आश्रय दिला. प्रबोधनाचा वारसा जपणार्‍यांना त्यांनी प्रेस चालू करून दिले. इतकी मदत करूनही ते कर्जबाजारी झाले, त्यांनी प्रेस विकून टाकले पण त्यांना महाराजांनी जाब विचारला नाही. छत्रपती शाहू महाराजांनी कधीही, कोणत्याही कलावंताची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. गुणीजणांना त्यांनी योग्य ती मदत सातत्यानं केली. आज त्यांच्या नावानं राजकारण करणारे मात्र जात आणि धर्म याबाहेर पडायला अजूनही तयार नाहीत. त्यातून पेशवाईचे आरोप होतात. पगडी आणि पागोट्याचं राजकारण होतं. 

एका दलितानं हॉटेल सुरू केलं तर त्याच्याकडं लोकानी जावं म्हणून शाहू महाराज त्याच्या हॉटेलवर चहा प्यायला गेले. भीमराव आंबेडकर नावाचा एक तरूण शिकून, पदवी घेऊन आलाय हे कळल्यावर त्याच्या चाळीत जाऊन त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. लोकमान्य टिळकासारखे तेव्हाचे धुरीण जर महाराजांच्या पाठिशी उभे राहिले असते तर आजचं महाराष्ट्राचं चित्र खूप वेगळं राहिलं असतं. छत्रपती शाहू महाराजांचं जगणं आणि वागणं हे खरं पुरोगामी होतं. अशा लोकनेत्याच्या प्रतिक्षेत महाराष्ट्र अजूनही आहे. तो शोध काही संपत नाही. महाराष्ट्र शाहू महाराजांविषयी, कोल्हापूर संस्थानविषयी कायम कृतज्ञ आहे पण त्यांना अपेक्षित असलेला समाज घडविण्यात आपले पुढचे सगळे नेते कमी पडले. 

जाणता राजा म्हणून मिरवणार्‍या नेत्याचे तट्टू आणि सतत फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा जप करणारे आपले भुक्कड विचारवंत यांनी इथला पुरोगामीपणा संपवला. आपल्या नेत्याची विचारसरणी पुढं न्यायची या धोरणानं दिवसरात्र एक करणारे आंधळे उपासक हे खरे पुरोगामीपणाचे मारेकरी आहेत. म्हणूनच कॉमे्रड पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचा प्रचार केला जातो पण हमीदभाई दलवाईंचं ‘भारतीय मुसलमान’ हे पुस्तक आपल्याला पचत नाही. हिंदुंच्या श्रद्धांस्थानांना तडे देताना अन्य धर्मातील रूढी-परंपरा मात्र हेतुपरस्सर दुर्लक्षिल्या जातात. शोषण हीच वृत्ती ज्या धर्माच्या केंद्रस्थानी आहे त्या धर्माची चिकित्सा जरूर व्हावी पण ती करताना सर्वसमावेशकता न ठेवता केवळ हिंदुंवरच आघात करावेत हे आजच्या पुरोगाम्यांचं तर्क आहे. थोडक्यात, जो ब्राह्मणांना झोडपतो तोच पुरोगामी इतकी ही संकल्पना या सर्वांनी खुजी करून ठेवलीय.

आपल्याला मारहान होईल, आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोकाला आहे, ज्यांच्यासोबत काम करतोय त्या राजकारण्यांची खप्पामर्जी होईल, त्यांच्याकडून पदरात पडणारे लाभ मिळणार नाहीत, मान-सन्मानाच्या जागा डावलल्या जातील या अपरिहार्यतेतून आजचे अनेक पुरोगामी कायम तटस्थ असतात. त्यांनी सत्तेशी जमवून घेताना सत्याशी फारकत घेतलीय. अंदमानच्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांनी ‘पुरोगामी दहशतवाद’ ही संकल्पना मांडल्यावर म्हणूनच अनेकांना हादरा बसला. कॉम्रेड पानसरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शिरावर आपलंच धड असावं! पण आजचे अनेक पुरोगामी नेते आणि विचारवंत इतरांच्याच मेंदुनं चालतात. स्वयंप्रज्ञेचा अभाव आणि समाजाविषयी, गोरगरिबांविषयी व्यापक कळवळा हरवलाय. आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याच्या अहंकारापोटी पुरोगामी चळवळ लयाला गेलीय. 

मध्यंतरी लेखक संजय सोनवणी म्हणाले होते, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हीच खरी पुरोगामी संघटना आहे.’’ 

त्यांच्या या विधानावर मी डोळे विस्फारले. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘संघाचे आजचे सरसंघचालक आजच्या समस्यांवर, आजच्या प्रश्‍नांवर सातत्यानं बोलतात. ते कधीही डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी किंवा त्यांच्या अन्य नेत्यांवर फारसे बोलत नाहीत. आरोग्य, शिक्षण, मदत आणि पुनर्वसन अशा क्षेत्रात ते जगभर काम करत आहेत. त्यांच्याकडं आयुष्यभर निरपेक्षपणे खपणार्‍या स्वयंसेवकांची पिढीच्या पिढी आहे. याउलट पुरोगामी म्हणवून घेणारे अनेक नेते फुले, शाहू, आंबेडकर, गांधी  आणि नेहरू याबाहेर पडत नाहीत. आजच्या प्रश्‍नांवर बोलत नाहीत. त्यांना निष्ठावान माणसं घडवता आली नाहीत. जो पुरोगामी आहे त्याला काळाबरोबर चालता आलं पाहिजे. हे सर्व निकष लावले तर संघच खरा पुरोगामी ठरतो.’’

आज आपले अनेक लेखक, पत्रकार, विचारंवत आपण किती पुरोगामी आहोत हे दाखविण्यासाठी धडपडत असतात. यांनी पुरोगामी-प्रतिगामी असणं महत्त्वाचं आहे की सत्य मांडणं, समाजाला जागरूक करणं, नव्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे? मुळात प्रश्‍न पडणं, चिकित्सा करणं हे पुरोगामित्वाचं लक्षण असताना यांच्याविषयी कोणीही काहीही प्रश्‍न उपस्थित केले की यांना ते झोंबतात. समोरच्याची कुतूहलवृत्ती मारून टाकणं, त्याची जिज्ञासा संपवणं आणि ते करताना आपणच कसे भारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं इथंच पुरोगामीपणा संपतो. प्रतिगामी हिंसेचं समर्थन करतात तर पुरोगामी वैचारिक संघर्ष करतात असाही एक दिखावा या मंडळींनी निर्माण केलाय. त्यात किती विरोधाभास आहे हे वेळोवळेच्या अनेक घटनांनी आजवर दाखवून दिलेलं आहेच. 

महाराष्ट्राच्या चार भागात चार सच्चे पुरोगामी नेते पैदा झाले तर आपण सर्वांसाठी आदर्श आणि दिशादर्शक असू शकू. मागच्या आदर्शांचा वारसा पुढं नेणं आणि स्वतःच्या प्रतिभेच्या, कर्तृत्वाच्या जोरावर त्यात भर घालणं याला पुरोगामीपणा म्हणतात. तो आदर्शही ज्ञानेश्‍वर माऊलींनीच घालून दिलाय. आपला धर्मग्रंथ म्हणून सर्वमान्य असलेली भगवतगीता सांगते, जेव्हा जेव्हा समाजाला ग्लानी येईल, समाजावर मोठं संकट येईल त्यावेळी सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी नक्की जन्म घेईल.

भगवान श्रीकृष्णाचं हे तत्त्वज्ञान पचवताना त्यांचे शिषोत्तम असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज कृष्णाच्याही पुढं गेलेत. त्यांनी जे पसायदान मागितलं त्यात दुरितांचे तिमिर जाओ अशी प्रार्थना केलीय. खळांची व्यंकटी सांडताना त्यांची सत्कर्मी रती वाढो असं ते म्हणतात. ज्याला जे हवं ते मिळो अशी प्रार्थना करताना त्यांनी गीतेप्रमाणं दुष्टांचा नाश करण्याची भाषा केली नाही तर त्यांचा दुष्टपणा संपावा अशी प्रार्थना केलीय. संपूर्ण आयुष्य गीतेवर भाष्य करण्यात घालवताना गीतेची कुठंही अप्रतिष्ठा न होऊ देता त्याच्याही खूप पुढं जाऊन असं पसायदान मांडणं यालाच तर खरा पुरोगामीपणा म्हणतात. म्हणूनच माऊलींचं पसायदान जगभर मान्यता पावलं. 

सध्याचा काळ पाहता दुष्ट लोक आणि त्यांचा दुष्टपणा संपणार नाही हे सत्य आपण स्वीकारायलाच हवं. मात्र किमान त्यांचा दुष्टपणा कमी व्हावा इतकी प्रार्थना तर आपण नक्कीच करू शकतो. पुरोगामी म्हणवणार्‍या आपण सर्वांनी हा निश्‍चय केला तरी समाजात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. ते दिसावेत हीच यानिमित्तानं प्रार्थना.

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

दैनिक ‘पुढारी’ बहार पुरवणी - 24 नोव्हेंबर 2019










Friday, October 18, 2019

चला, बदल घडवूया!

घनश्याम पाटील
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2019

जो बदलतो तो टिकतो, हे वैश्विक सत्य मानलं जातं. डार्विननंही हा सिद्धांत सांगितला! मात्र सध्याच्या बदलत्या मनोवृत्तीतील बदल क्लेशकारक आहेत. परिवर्तनाचा वारसा चालवणारे कुबड्या घेतल्याशिवाय चालू शकत नाहीत आणि ज्यांना बदलाशी काही देणंघेणं नाही ते इतके बदललेत की ‘ते हेच का?’ असा प्रश्न कुणालाही सहज पडावा. 

सध्या आपल्याकडे राजकीय पक्ष बदलण्याचा ‘ट्रेंड’ आलाय. सकाळी एका पक्षात असलेले दुपारी दुसर्‍याच पक्षात आणि संध्याकाळी आणखी भलत्याच नेत्यांसोबत दिसतात. विचारधारा, निष्ठा असे सगळे शब्द कालबाह्य झालेत. आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी ‘आदर्श’ शब्द कसा बदनाम केला तसेच सत्तेतल्या अनेक नेत्यांनी ‘मेगाभरती’च्या नावावर अनेक ओंगळवाण्या प्रवृत्ती दाखवून दिल्या. सत्ताधारी कोण, विरोधक कोण हेच समजायला मार्ग नाही. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत राजकारणावर काही प्रश्‍न आला आणि त्याने व्यवस्थित उत्तर लिहिले तरी ती प्रश्नपत्रिका तपासायला जाईपर्यंत सगळं चित्र बदललेलं असेल. हे असे बदल आपण सध्या सर्वत्र अनुभवत आहोत.

बरं, हे बदल फक्त राजकारणातच आहेत असंही नाही. आज एका वृत्तपत्रात असलेले संपादक दुसर्‍या दिवशी त्यांच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्रात असतील. आज रात्रीच्या बातम्या सांगणारा वृत्तनिवेदक उद्या आणखी कोणत्या वाहिनीच्या स्टुडिओत मेकअप करताना दिसेल. व्यवस्थेत, यंत्रणेत मूलभूत बदल होत नसल्याने असे वरवरचे बदल निश्चितपणे अस्वस्थ करणारे आहेत.

सध्या म्हणे समाज बदललाय. लोकाची अभिरूची बदललीय. त्यांच्या गरजा बदलल्यात. एकंदरीत त्यांचं जगणंच बदललंय. या बदलाच्या केंद्रस्थानी कोण आहे? हे बदल स्वागतार्ह आहेत की आणखी काळोखाच्या खाईत लोटणारे आहेत? 

भारताच्या कोणत्याही शहरात फिरताना माझं काळीज चर्रर होतं. जागोजागी वेगवेगळे श्रद्धांजलीचे फलक. त्यावर हमखास तरूणांचे फोटो. कोणी अपघातात गेलंय, कोणी प्रेमभंगानं तर कोणी नैराश्यानं आत्महत्या केलीय. कोणी व्यवसायातील अपयशानं जिंदगीशी हार मानलीय. कुणाचा ‘सेल्फी’ काढताना करूण अंत झालाय तर कोणी काही आजारानं मृत्युच्या आहारी गेलाय. हे कसले बदल म्हणावेत? असलं पोकळ परिवर्तन आपल्याला हवं होतं का? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन शोध लागताहेत आणि आपल्याकडं तरूण मुलं पब्जीसारखे कसलेतरी गेम खेळताना मरतात. हे बदल नेमकं कशाचं द्योतक म्हणावं? 

आजही जात-धर्म अशा विषयांवरून आपल्याला झुंजवलं जातं. या सामाजिक दर्‍या कमी होण्याऐवजी अधिक विस्तारत चालल्यात. कमालीचा कट्टरपणा वाढत चाललाय. कुणाचा कशावरून स्वाभिमान दुखावेल आणि कोण कशामुळे कसा वागेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत. नेमकं असं काय बदललंय की आपण माणसाशी माणूस म्हणूनही वागू शकत नाही. काही चांगले बदल घडावेत यासाठी अनेक महापुरूषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांनी त्या-त्या विषयात काम करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. आपण मात्र जुनाट थोतांड दूर सारून आयुष्य बदलण्याऐवजी आणखी रानटी होत चाललोय. स्वतःला बदलण्याऐवजी कायम बदला घेण्याच्या आविर्भावात वावरतोय. 

सध्या समाजात सगळंच काही नकारात्मक चाललंय असंही एक चित्र विविध माध्यमातून सातत्यानं रंगवलं जातं. ते आधी बदललं पाहिजे. सद्गुणांची पूजा बांधताना आपण जे-जे सकारात्मक आहे त्याची वकिली केली पाहिजे. जगाकडून काही अपेक्षा ठेवण्याऐवजी आपण आपल्या वागण्यात काही बदल केले तरी खूप काही बदलू शकेल. सगळं अनिष्ट गाडून टाकण्याची, सगळं हलाहल पचवण्याची आणि प्रतिकूलतेवर मात करत स्वतःचं विश्‍व निर्माण करण्याची धमक आणि कुवत मराठी माणसात आहे. शौर्य आणि पराक्रमाचा वारसा चालवणारा मराठी माणूस मरगळलेला असेल; पण त्याच्या विचाराची धार कमी झालेली नाही. जगभर मराठी माणसानं आपल्या विद्वत्तेचा, कृतीशीलतेचा ठसा उमटवलेला असताना हे बदल आपल्याला टिपता आले पाहिजेत.

गेल्या काही काळापासून आपलं जे अधःपतन सुरू आहे ते पाहता कुण्याही विवेकी माणसाला चिंता वाटावी. सृष्टीत बदल होतोय. प्राणीमात्रात बदल होतोय. हे बदल स्वीकारण्याची, पचवण्याची आपली क्षमता आहे का? सामाजिक, आर्थिक, वैचारिक बदल होताना त्याचे सामर्थ्य आणि मर्यादा या दोन्हींचाही विचार केला पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदल स्वीकारतानाच त्यापासून होणारे बरे-वाईट परिणाम आपण लक्षात घ्यायला हवेत.

जग बदलायला निघालेली माणसं स्वतःतही बदल करत नाहीत. मध्यंतरी माझे मित्र शिरीष देशमुख म्हणाले, स्वतःच्या धडावर स्वतःचं शिर असावं! पण त्या शिरात (डोक्यात) मात्र आम्ही घालून दिलेले विचारच असावेत असं काहीसं वातावरण सध्या आहे.

आम्हीही ठरवलं आपणही काही बदल घडवूया! हे बदल समाजात असतील, स्वतःत असतील! मात्र कसलं काय? ही जालिम दुनिया काही करू देईल तर शपथ! गेला काही काळ प्रकाशनक्षेत्राच्या दृष्टिनं नेमकं कसाय हे ठरवणंही मुश्किल आहे. 

म्हणजे होतंय असं, पुण्या-मुंंबईचा साहित्याचा केंद्रबिंदू ग्रामीण महाराष्ट्राकडं वळलाय. ‘वाचणारी’ एक नवी पिढी तयार झालीय. ती कमालीची सजग आहे. ‘माझं किती अवाढव्य वाचन आहे’ असला तकलादू अहंकार या पिढीत नाही. ‘काय वाचावं?’ हे या पिढीला चांगलं कळतं. त्यामुळं ही ‘ज्ञानोपासक’ पिढी अक्षरशः चातकाप्रमाणं चांगल्या पुस्तकांची वाट पाहत असते. स्वतःची भूक मारून पुस्तकं विकत घेणारी तरूण पोरं बघितली की अभिमान वाटतो. विद्यालयातून पुस्तकी किडे तयार होतात आणि मद्यालयातून गुंड तयार होतात. देवालयातून कट्टरतावादी जन्मताहेत. या सगळ्यात ‘माणूस’ संपत चाललाय. अशा बिकट परिस्थितीत ही ‘वाचणारी’ सजग तरूणाई मात्र जग वाचवायचा प्रयत्न करतेय. हे बदल निश्चितच स्वागतार्ह म्हणावे लागतील.

एस. एम. जोशी म्हणायचे, ‘एखाद्या गावात देशी दारूची दहा दुकानं असतील आणि तिथं एकच दूध डेअरी असेल तर दुधवाला दुधात पाणी घालतोय म्हणून तक्रार करण्यात काही अर्थ नसतो. उलट दारूची दुकानं कमी होऊन दुधाची दुकानं कशी वाढतील यासाठी काही करता आले तर करावे!’ 

आम्हीही तोच ध्यास घेतलाय. समाजात टीका करावी, धिक्कार करावा अशी ‘मानवी जनावरं’ कमी नाहीत. त्यांचा हिंस्त्रपणा भयंकरच आहे. त्यांच्यावर आसूड ओढतानाच जे जे उदात्त, व्यापक आहे तेही डोक्यावर घेऊन नाचायला हवे. ते काम आम्ही करतोय. हे बदल घडविण्यासाठी आमच्यासोबत यायला अनेकांची झुंबड उडालीय.

ग्रंथव्यवहाराचा विचार केला तर ‘कमिशन’ वृत्तीनं या क्षेत्राचं अतोनात नुकसान केलंय. विक्रेते, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते ‘आणखी हवा’च्या भस्मासुरानं चटावलेत. अर्थात, वर्षानुवर्षे निष्ठेनं काम करणारेही अनेकजण आहेत पण या झुंडशाहीपुढं त्यांचा निभाव लागताना दिसत नाही. इथली सरकारी व्यवस्थाही दलालांच्या पुढं झुकलेली असते.

मासिक ही संकल्पनाच मृतावस्थेला गेलेली असताना त्याला पुन्हा ऊर्जितावस्था मिळावी म्हणून सध्या अनेकजण गंभीरपणे धडपडत आहेत. मराठी मासिकं सध्या बदलत आहेत. हा बदल आनंददायी आहे. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात किमान एक लाख सभासद असणारी निदान पंचवीस मासिकं असायला काय हरकत आहे? 

‘चपराक’ची त्या दृष्टिनं वाटचाल सुरू आहे. आमचे असंख्य वाचक, विक्रेते, हितचिंतक, सभासद, जाहिरातदार या सर्वांचे त्यात मोठे योगदान आहे. जागतिक मंदी, मध्यंतरी झालेली नोटबंदी, जीएसटीसारखे तुघलकी कायदे यामुळे अनेकांना मोठा फटका बसलाय. सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगारकपात झालीय. संघटित कामगार किमान त्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येऊन लढतात. असंघटित कामगारांचे हाल मात्र बघवत नाहीत. यंदा अनेक दिवाळी अंकांच्या जाहिराती घटल्यात. मंदीचा तर मोठा फटका बसलेला आहेच पण यंदाच्या पुरासारख्या आपत्तीत अनेक उद्योजकांनी सढळ हातांनी मदत केलीय. आता त्यांचे जाहिरातीचे बजेट संपलेय. त्यामुळे नाईलाज झालाय. ते त्यांच्याठिकाणी बरोबर असले तरी याचा मोठा फटका अनेकांना बसून अनेक दिवाळी अंकांचे दिवाळे निघालेय.

गेली 15 वर्षे सातत्याने ‘चपराक’ला जाहिरात देणार्‍या एका उद्योजकाची उलाढाल तीनशे कोटीहून अधिक होती. मध्यंतरी घरबांधणी क्षेत्रावर जे अरिष्ट ओढवले त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या शेकडो कर्मचार्‍यांचे गेले आठ महिने पगार थकले होते. शेवटी त्यांनी त्यांचा राहता बंगला विकून सगळ्यांचे पगार केले आणि व्यवसाय थांबवला. हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. असे बदल आपल्याला हवेत का? 

प्रश्न विचारणारी, शंका उपस्थित करणारी पिढी राज्यकर्त्यांना नकोय. त्यांच्या ‘हो’ ला ‘हो’ मिळवले की ते त्यांच्यासाठी खूप काही करत असल्याचा दिखावा निर्माण करतात. लोकशाहीचा मूळ उद्देश कधीच धुळीला मिळालाय. समाजातली निकोपता हरवत गेलीय. स्वार्थाच्या मागे लागलेला माणूस ‘स्व अर्थ’ विसरतोय. आपण जगतोय कशासाठी? हेही अनेकांना कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. भारत हा सर्वाधिक तरूणांचा देश असल्याचे ढोल गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पिटले जातात. याचाच अर्थ आणखी काही वर्षांनी भारत हा सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा देश असेल. नवनवीन औषधोपचारांमुळे आयुर्मान वाढत चाललंय. अर्थात ते निरोगी नाही. सत्तर टक्केहून अधिक लोकाना मधुमेहासारखे आजार असतात. अनेक व्याधींनी ग्रस्त असूनही ते स्वतःची जीवनशैली बदलत नाहीत. मग रडत, कुढत जगणं अटळ असतं. 

अशा सगळ्यांत किमान सजगता निर्माण व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणं, ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणं आणि त्यांना वाचायला भाग पाडणं या सगळ्या आघाड्यांवर आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळतंय. हा बदल आम्ही करतोय. करत राहू. भविष्यात ललित, वाङ्मयीन पुस्तकाबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञान, विविध ज्ञानशाखा अशी सर्व पुस्तकं ‘चपराक’ची असावीत असा आमचा प्रयत्न आहे. ही पुस्तकं फक्त मराठीपुरती मर्यादित राहणार नाहीत. मराठीतलं दर्जेदार साहित्य जगभर पोचावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

ज्याला जे जमतं त्यानं ते करावं, या न्यायानं आम्ही हा ज्ञानयज्ञ आरंभिला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. अवघड वाटणार्‍या गोष्टी आम्ही अगदी सहजपणे केल्यात. ज्या अशक्य वाटतात त्यासाठी थोडा वेळ लागेल इतकंच! 

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. अंधार दूर सारताना आपण ज्ञानाच्या पणत्या लावणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आम्ही जागल्याची भूमिका पार पाडतोय. यात तुमचाही सहभाग नक्की द्या! जंगलाला आग लागल्यानंतर आपल्या इवल्याशा चोचीतून पाणी आणून तो वणवा विझवण्याचा प्रयत्न करणार्‍या चिमणीची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. आपणही ‘विझवणार्‍या’सोबत राहूया. पेटवणारे तर कमी नाहीत! ते प्रत्येक काळात राहतील. पेटवणार्‍यांपेक्षा विझवणारे चिरंतन असतात, शाश्‍वत असतात एवढी जाणीव झाली तरी पुरेसं आहे. हे बदल घडावेत.  
तुर्तास, आपणा सर्वांना या प्रकाशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
7057292092

Sunday, September 22, 2019

मनातलं घर साकारताना...


काळाच्या ओघात आपल्याकडची ‘वाडा संस्कृती’ लयास गेली. बघताबघता तिथं मोठमोठ्या इमारती उभारल्या. या गगनचुंबी इमारतींनी सगळीकडं सिमेंटचं जंगल वाढलं. विकासाच्या नावावर हे परिवर्तन झपाट्यानं झालं असली तरी आपल्या संस्कृतीची पाळंमुळं मात्र घट्ट रोवलेली आहेत. म्हणूनच जगभर मराठी माणसाचा वरचष्मा आहे. संस्कार आणि संस्कृतीचा, आपल्या आदर्श परंपरांचा वारसा जपणार्‍या अशाच यशस्वी मराठी उद्योजकांपैकी एक आहेत ‘ढेपे वाड्या’चे प्रमुख नितीन ढेपे.

त्यांनी बांधकाम विकसक म्हणून मोठं योगदान दिलं. अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. ‘वाडा पाडण्यासाठी रिकामा झाल्यावर, वाड्याच्या त्या मोकळ्या वास्तूत मला प्रचंड अपराधी वाटायचं! आपण एका जिंदादिल वास्तूचा इतिहास पुसतोय अशी खंत वाटायची! आपल्या नव्या पिढीला आपली पारंपरिक वास्तुशैली दाखविण्याऐवजी आपण ती उद्ध्वस्त करतोय याची सल मनात असायची!’ अशी प्रांजळ कबुली देणारे आणि या कबुलीजबाबावरच न थांबता ‘ढेपे वाडा’च्या माध्यमातून भरीव असं काहीतरी उभं करणारे नितीन ढेपे म्हणूनच या बजबजपुरीत वेगळे ठरतात.

आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यात गैरही काही नाही. मात्र ते पुरं करता करता अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. सदनिकेची खरेदी हा एक मोठा उद्योग होऊन बसतो. प्रत्येक घर, सोसायटी, अपार्टमेंट आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी आदर्श ठरावं अशा माहितीचं विश्‍वासार्ह पुस्तक असणं गरजेचं होतं. खरंतर बाजारात अशा स्वरूपाची असंख्य पुस्तकं असली तरी याच क्षेत्रात ध्येयनिष्ठपणे काम करणार्‍या आणि संवेदनशील माणसानं याविषयी लिहिणं जास्त गरजेचं होतं. अतिशय नियमबद्ध व योग्य कार्यपद्धतीवर विस्तृत भर देत नितीन ढेपे यांनी ‘कशासाठी? घरासाठी!’ हे पुस्तक लिहिलं. ‘राजहंस प्रकाशन’ने ते आकर्षकरित्या प्रकाशित करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलंय.

या पुस्तकाद्वारे बांधकाम व्यावसायिक व घर खरेदीदार, सोसायटी, अपार्टमेंटचे कार्यकारी मंडळ व सभासद यांच्यातील सुसंवाद वाढावा, बांधकाम व्यावसायिकांची जनमानसातील प्रतिमा सुधारावी, घर खरेदीदारांची देखील फरफट थांबून त्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागावा अशी इच्छा नितीन ढेपे यांनी व्यक्त केलीय. किचकट भाषा टाळून अतिशय साध्या-सोप्या भाषेत घराबाबत इतकी इत्यंभूत माहिती दिल्यानं त्यांची ही इच्छा पूर्णत्वास आली आहे. म्हणूनच या पुस्तकाचं उपयोगितामूल्य मोठं आहे.

घर विकत घेणं, त्याची पुनर्विक्री करणं, जमीन घेऊन स्वतःच्या घराचं बांधकाम करणं, स्वमालकीच्या सदनिका, गाळे, बैठी घरं, बंगले, रो हाऊसेस यांच्या विक्रीची प्रक्रिया, पुनर्विकासाची प्रक्रिया, देखभाल आणि इतर खर्चात कपात कशी करावी, सदनिका खरेदी करतानाचे सहज, सोपे टप्पे अशा सर्वांविषयी त्यांनी या पुस्तकात विस्तृतपणे आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलंय. मुख्य म्हणजे सध्या एकेक सोसायटी म्हणजे एकेक गावच असतं. त्यामुळं बांधकाम व्यावसायिकांकडून सोसायटी, अपार्टमेंटची स्थापना, त्याची पूर्तता, कार्यकारी मंडळाकडे हस्तांतरण, सामाईक सुखसोयी वापराबाबतचे निमय, सोसायटी, अपार्टमेंटचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असणारे नियम, उपविधी (बायलॉज), आदर्श व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे हे सारं समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणारं आहे. या क्षेत्रातील ‘भगवतगीता’ म्हणून प्रत्येक सभासदानं, सोसायटींच्या पदाधिकार्‍यानं हे पुस्तक संग्रही ठेवायला हवं. 

आपल्या घराचं व आपल्या कुटुंबाचं चोर, लुटारूंपासून संरक्षण करण्यासाठी काय व्यवस्था करायची याबाबतचंही एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. या क्षेत्रात रौप्यमहोत्सवाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या नितीन ढेपे यांना या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी अनेक व्यावसायिक संकुलं, गृहसंकुलांपासून ते हॉस्पिटल-रिसॉटपर्यंतचे व्यावसायिक प्रकल्प पूर्ण केलेत. नवीन बांधणीपासून ते पुनर्विकासापर्यंत अनेक क्षेत्रात त्यांचा सहभाग असल्यानं काहीही हातचं राखून न ठेवता त्यांनी त्यांचं या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान वाचकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. ज्या घरात आपण राहतो त्या वास्तुशास्त्राविषयीची सजगता मात्र आपल्याकडे दिसत नाही. त्यामुळंच अनेकदा अनेकांकडून फसवणूक झाल्यानं मनस्ताप होतो. कायदेशीर सल्लागार, वास्तुविशारद, सरकारी अधिकार्‍यांकडून घरबांधणीच्या कार्यपद्धतीविषयी ठोस आणि समाधानकारक माहिती मिळेलच असं नाही. अनेकदा तर आपल्याला नेमकी कोणत्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे हेच अनेकांना उमगत नाही. त्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आहे.
 
‘असावे अपुले सुंदर घर’ किंवा ‘घर पाहावे बांधून’ असं आपण म्हणतो. मात्र असं स्वप्नातलं घर बांधताना, विकत घेताना त्याचे नियम, त्याची तंदुरूस्ती, पुनर्विकी, संरक्षण, देखभाल, सोसायटी-अपार्टमेंटची स्थापना आणि पुढं त्यांचा कारभार हे सर्व आपल्याला ठाऊक असणं अत्यावश्यक आहे. 

मराठा वास्तुशैली आणि जुनी वाडा संस्कृती पुनरूज्जीवित करण्याच्या ध्येयानं झपाटलेल्या नितीन ढेपे यांनी या क्षेत्रात दखलपात्र काम उभं केलंय. ‘जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जण’ अशा उदात्त हेतूनं त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. हे अवश्य विकत घ्या, वाचा, आपल्या संग्रहात ठेवा आणि योग्य ती माहिती वापरात आणा इतकंच. नितीन ढेपे आपली उद्यमशीलता जपतानाच आपल्यास संस्कृतीचं संचित जपण्यासाठीही अहोरात्र धडपडत असतात. त्यांच्या या सर्व उपक्रमांना माझ्या शुभेच्छा! 

कशासाठी? घरासाठी!
लेखक - नितीन ढेपे, प्रकाशक - राजहंस

पाने - 148, मूल्य - 200
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

प्रसिद्धी : दैनिक 'पुण्य नगरी'
२३ सप्टेंबर २०१९


Friday, July 5, 2019

फक्त लढ म्हणा!


‘चपराक’चा ज्ञानयज्ञ सुरू!

विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या आहेत. त्यामुळं मराठी साहित्यात थोडफार योगदान द्यावं असा विचार आम्ही केला. त्यानंतर एक वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक, दिवाळी महाविशेषांक आणि पुस्तक प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ते कृतीतही आणले. हे सर्व करताना शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव झाली आणि स्वतःचाच हेवा वाटू लागला.

जेव्हा आम्ही एक दर्जेदार वाङमयीन मासिक सुरू केलं तेव्हा काही समदुःखी लोकानी ‘मासिक ही संकल्पनाच मृतावस्थेत गेल्याची’ आवई उठवली. साप्ताहिक सुरू केल्यावर ते म्हणू लागले, ‘क्षणाक्षणाला जगातल्या सगळ्या बातम्या कळतात, त्यात काही साप्ताहिकवाल्यांनी  इतकी दुकानदारी सुरू केलीय की, सर्व साप्ताहिकं बदनाम झालीत.’ 

‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक वाचकप्रिय ठरत असतानाच ‘बाजारात सात-आठशे दिवाळी अंक येतात आणि त्यातील बहुतेक पावसाळी छत्र्यांप्रमाणं फक्त जाहिराती मिळवण्यासाठीच प्रकाशित होतात; त्यामुळं दिवाळी अंकाचे वाचक घटलेत’ असंही त्यांनी सांगितलं. 

‘नव्या लेखकांची पुस्तकं सध्या कोणीही प्रकाशित करत नाही, वाचनसंस्कृती राहिलीयच कुठं?’ असंही काहींनी विचारलं.

या सर्वांच्या नकारात्मक मानसिकतेचा अभ्यास केल्यावर आमच्या लक्षात आलं की या क्षेत्रातील अंधश्रद्धा मोठ्या आहेत. महाराष्ट्रात, भारतात आणि जगात हजारो वृत्तपत्रं रोज प्रकाशित होतात. प्रत्येकाचा वाचकवर्गही मोठा आहे. अर्थकारण मोठं आहे. त्यावर अवलंबून असणारे लोकही अनेक आहेत. अनेक उत्तमोत्तम मासिकांची वाचक आतुरतेनं वाट बघत असतात. आपल्या आवडीचे दिवाळी अंक आधी नोंदवून ठेवतात. एखादा हवा असणारा अंक वेळेत उपलब्ध झाला नाही तर ते अस्वस्थ होतात. पुस्तकांसाठी तर अनेकजण ‘वेटिंग’ला असतात. 

राज्याचं, देशाचं, जगाचं सोडून द्या; फक्त पुणे शहरातूनच रोज किमान पाच-पन्नास पुस्तकं प्रकाशित होतात. ही पुस्तकं प्रकाशित करणारे बहुतांश प्रकाशक सांगतात की, सुरूवातीला आम्ही रस्त्यावर बसून पुस्तकं विकायचो, घरोघर जाऊन पुस्तकं विकायचो, शिपाई म्हणून काम करत असताना पुस्तकं पोचवू लागलो आणि त्यातून या क्षेत्रात आलो... शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून काम करताना पुस्तकांचं जग खुणावू लागलं आणि प्रकाशक झालो... 

गंमत म्हणजे आपल्या गरिबीचा, दुःखांचा, परिश्रमांचा बाजार मांडणारे बहुतेक प्रकाशक गब्बर आहेत. त्यांच्या पुण्या-मुंबईत स्वतःच्या मोठमोठ्या इमारती आहेत. सातत्यानं विदेश वार्‍या होतात. आलिशान गाड्या आहेत. मुलांचं शिक्षण देश-विदेशातील चांगल्या संस्थांत सुरू आहे. असं सारं असूनही त्यांची एक सार्वत्रिक ओरड असते; ती म्हणजे ‘पुस्तकं खपत नाहीत! सध्या वाचतं कोण?’ इतक्यावर न थांबता ते सरकारला आणि व्यवस्थेलाही कायम दूषणं देत असतात.

आचार्य अत्रे म्हणायचे की, ‘‘कृतज्ञता हे मानवाला मिळालेलं मोठं वरदान आहे आणि कृतघ्नता हा मोठा शाप...’’ मग ही सगळी मंडळी कृतघ्न नाहीत का? ज्या वाचकांच्या जिवावर त्यांनी त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण केली त्यांना दोष देणं, जाणिवपूर्वक गैरसमज निर्माण करणं आणि त्यातून साहित्याचं, भाषेचं, ग्रंथ व्यवहाराचं नुकसान करणं कितपत योग्य आहे?

म्हणूनच आम्ही जरा वेगळा विचार केला. आपल्याकडील ज्ञानोपासकांची भूक भागविण्यासाठी या वर्षात 365 पुस्तकं प्रकाशित करायची. साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक हे सर्व प्रयोग यशस्वी झाले असताना केवळ आणि केवळ वाचकांच्या विश्‍वासाच्या बळावर हे धाडसी पाऊल उचलायचं. त्यासाठीचं आमचं नियोजन सुरू झालं आणि आता त्याला मूर्त स्वरूपही मिळत आहे. 

महाराष्ट्राची मराठी माती शौर्य आणि पराक्रमाची परंपरा जपणारी आहे. इथल्या अनेकांनी आदर्शांचे मनोरे उभे केले आणि जगभरातील अनेकांसाठी ते दिशादर्शक ठरले. असं असतानाही सध्या अनेक क्षेत्रात एक मोठी नकारात्मकता निर्माण झाली आहे. ती नेमकी का झाली याचाही अनेकांनी आपापल्या परीनं उहापोह केला आहेच! मात्र या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गंभीरपणे जे काही प्रयत्न करावे लागतात त्याबाबत मोठी उदासीनता दिसून येते.

 सध्या एक करंटी मानसिकता जोपासत आपली वाटचाल सुरू आहे. इथली सामाजिक, राजकीय व्यवस्था पाहता भव्यदिव्यतेची स्वप्नं पाहणं हाही गुन्हा ठरतोय की काय असं एकंदरीत वातावरण आहे. पराभूत मानसिकतेतून बाहेर पडण्याचं त्राण आपल्यात नाही म्हणूनच उद्यमशीलतेकडं अक्षम्य दुर्लक्ष होतं. 

इतरांवर टीका करणं, त्यांच्या चांगल्या योजनांना, परिश्रमांना नावं ठेवणं, कुत्सित स्वरूपात टिंगलटवाळी करणं थांबवायला हवं. पुण्यासारख्या नगरीत कधीकाळी रिक्षा चालवणारे एखादे अविनाश भोसले कोेट्यवधींची मिळकत कमावतात तेव्हा त्यांच्यावर शंका उपस्थित करण्याऐवजी जर त्यांच्या परिश्रमाचा, जिद्दीचा अभ्यास केला, त्यातून काही बोध घेतला तर अनेक उद्योजक निर्माण होऊ शकतील. आपल्या आजूबाजूला शून्यातून विश्‍व निर्माण करणारे असे असंख्य लोक असूनही आपण परिस्थितीला दूषणं देतो, आणखी कुणावर आपल्या अपयशाचं खापर फोडतो तेव्हा आत्मपरीक्षणाची वेळ आलेली असते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे अगदी खरं आहे. अनेकांनी आपल्या कृतीतून ते दाखवूनही दिलं आहे.

साहित्य आणि ग्रंथ प्रकाशनविश्‍वाला तर कधीचीच घरघर लागल्याचं सांगण्यात येतं. वाचनसंस्कृती कमी होत चाललीय असं सांगणारी, ऐकणारी ही नेमकी कितवी पिढी आहे हे सांगता येणार नाही. साधारण 1909 साली वि. का. राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी भाषा मृतावस्थेला गेली आहे काय?’ या विषयावर परिसंवाद झाल्याचं वाचनात आलं. आजही ही व अशी चर्चा सुरूच असते हे आपल्या मायबोलीचं दुर्दैवच!

हे सगळं पाहून व्यक्तिशः मी अस्वस्थ झालो. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला, अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत साकारायचा तर आपण आपल्या क्षेत्रात खारीचा वाटा उचलावा असं अनेक दिवस मनात घोळत होतं. सध्या पुस्तकं कोणी वाचत नाही, नवीन लेखकांना व्यासपीठ मिळत नाही असं सातत्यानं ऐकून ही नकारात्मकता मोडीत काढण्याचा चंग आम्ही बांधला. त्यासाठी मागची दोन-अडीच वर्षे आमचे अव्याहत प्रयत्न सुरू होते. अजूनही ते थांबलेले नाहीत.

मराठी साहित्यात पुढची किमान काही वर्षे टिकून राहील असं काम उभं करण्याचा संकल्प आम्ही केला. त्यातून एक योजना सुचली. रोज एक याप्रमाणं वर्षभरात साधारण 365 पुस्तकं प्रकाशित करायची! ही योजना या क्षेत्रातील दिग्गजांना सांगितल्यावर अनेकांनी आम्हाला वेड्यात काढलं. त्यांच्या या नकारात्मक प्रतिक्रिया आमचा संकल्प आणखी दृढ करत गेल्या. एका ज्येष्ठ प्रकाशकांनी सांगितलं, ‘‘घनश्यामजी, जरा सबुरीनं घ्या... आत्महत्या करावी लागेल...’’ 

मग त्यांना मी बजावलं, ‘‘तशी वेळ आलीच तर घुशीचं औषध खाऊन मरणार नाही! मी परिश्रमानं, कष्टानं इतकं वैभव मिळवेन की हिरा चाटून मरेन!’’

‘चपराक’च्या माध्यमातून अनेक ग्रंथालयांशी, महाविद्यालयांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. इतकंच नाही तर आमच्या असंख्य वाचकांपैकी कित्येकजण असे आहेत की ‘चपराक’चं कोणतंही पुस्तक प्रकाशित झालं तरी ते आवर्जून विकत घेतात. 

आम्ही ही 365 पुस्तकांची योजना जाहीर करताच अनेक वाचकांनी सांगितलं की, ‘त्या-त्या महिन्यात प्रकाशित होणारी पुस्तकं आमच्याकडं पाठवून द्या! आम्ही त्याची वेगळी ऑर्डर द्यायची गरज नाही. ही सर्व पुस्तकं आमच्या संग्रहात हवीतच!’ इतक्या उदारपणे प्रेम करणारे मराठी वाचक असताना ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असं म्हणणं केवळ कृतघ्नपणाचं ठरेल.

एक मोठा वर्ग असाही तयार झालाय की त्यांना आमची ‘बुके ऐवजी बुक’ ही कल्पना आवडलीय. अनेक संस्थांचे विविध कार्यक्रम ‘चपराक’च्या दर्जेदार पुस्तकांसह साजरे होतात. लग्न, मुुंज, वाढदिवस, निवड, नियुक्ती अशा कोणत्याही प्रसंगी भेट आणि प्रतीभेट (रिटर्न गिफ्ट) म्हणूनही आमची पुस्तकं दिली जातात. त्यामुळं अनेक लेखकांच्या पुस्तकांची आवृत्ती अवघ्या चार-दोन दिवसात संपवण्याचे विक्रमही आम्ही केले आहेत. 

या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कोणतीही शासकीय मदत आजवर घेतली नाही, भविष्यात घेणार नाही. काही लेखक त्यांच्या पुस्तकांच्या प्रती विकत घेतात. आमच्या नियतकालिकांना मिळणार्‍या जाहिराती, त्यांच्या विक्रीतून-वर्गणीतून मिळणारा नफा आणि या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री यामुळंच नवनवीन पुस्तकं प्रकाशित करणं आम्हाला शक्य होतं. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकरांचं पुस्तक प्रकाशित केल्यावर तीन दिवसात जवळपास अकराशे प्रतींची नोंदणी होणं, राजेंद्र थोरात यांच्या पुस्तकाची आवृत्ती केवळ आठवड्याभरात संपणं किंवा सुनील जवंजाळ यांच्या कादंबरीच्या प्रती भेट देण्यासाठी एखाद्या पोलीस अधिकार्‍यानं, आमदारानं मागवणं हे सगळंच आमच्यासाठी सुखद आहे. म्हणूनच मराठीत कोणीही लेखक उपेक्षित राहणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते. हे करतानाच मराठी लेखक जागतिक स्तरावर जावेत या उद्देशाने आम्ही त्यांची पुस्तकं इंग्रजीत अनुवादीत करण्याचा शुभारंभही केला आहे. भाऊ तोरसेकरांचे ‘व्हाय मोदी अगेन’ हे पुस्तक भारतातल्या आणि जगातल्या वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले आहे. ‘चपराक’च्या अन्य काही पुस्तकांचे इंग्रजी आणि अन्य काही भाषांतील अनुवाद लवकरच आपल्या भेटीस आणत आहोत.

मराठीत पूर्णवेळ लेखन हे उपजिविकेचं साधन होऊ शकत नाही असाही आक्षेप घेतला जातो. काही सन्माननीय अपवाद वगळता हे खरंही आहे. मात्र इतर असंख्य संकल्पाप्रमाणेच आमचा हाही संकल्प आहे की, गुणवत्तापूर्ण, कसदार लेखन करणारा लेखक सन्मानानं जगू शकेल इतपत काम आम्हाला उभं करायचं आहे. या सर्वात वाचकांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. 

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर, वाचकमित्रांनो, तुम्ही फक्त लढ म्हणा! नवा जिज्ञासू वाचकवर्ग तयार करणं आणि काही कारणांनी वाचनापासून दूरावत चाललेला वर्ग पुन्हा पुस्तकांकडं वळवणं हे आमचं, माझं जीवनध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं त्यात यश मिळेल याची पूर्ण खात्री आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक'
७०५७२९२०९२

Tuesday, February 12, 2019

प्रकाशनविश्वाला संजीवनी



मराठी प्रकाशनविश्वावर सध्या मरगळ आली असल्याने हजाराची आवृत्ती पाचशेवर आणण्याची, नव्या लेखकांना संधी न देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे एकुण पुस्तक प्रकाशन संख्याही मर्यादित होण्याचा धोका उभा ठाकला आहे. किंबहुना प्रकाशकांनीच निरुत्साही धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. बरे, असा निरुत्साह दाखवणारे प्रकाशक आजच उगवताहेत असे नाही. पंचविसेक वर्षांपूर्वी ’श्रीविद्या’च्या मधुकाकांनीही ‘तीनशेच्या वर आवृत्ती विकली जाणे अशक्य झाले आहे,’ अशा स्वरुपाची मुलाखत वृत्तपत्रांत दिली होती. 

सरकारी पुस्तक खरेदी आणि टेंडर्स यात यश मिळवण्यात पटाईत झालेल्या प्रकाशकांना आवृत्ती बाजारात विकली जाते की नाही याच्याशी काही घेणेदेणे नसल्याने पुस्तकाचा साहित्यिक अथवा माहितीपर दर्जा सांभाळण्याचीही गरज पडत नाही. कारण ही पुस्तके शेवटी गोदामातच धूळ खात पडत उंदीर-घुशींच्याच उदरभरणाची सोय करणार हे माहितच असते. दहा कोटींच्या मराठी भाषकांच्या राज्यात हजाराही आवृत्ती जेमतेम खपावी आणि तीही आता खपत नाही म्हणून आवृत्तीच कमी पुस्तकांची करावी लागावी हे साहित्यरसिकांसाठी काही भूषणावह म्हणता येणार नाही! पण याला जबाबदार वाचक अहेत की निरुत्साही प्रकाशक याचाही विचार करणे गरजेचे आहे. कारण पुस्तकनिर्मिती करणारेच निर्मिती आणि वितरण या आघाडीवर अपयशी ठरत असतील, त्यांच्या कार्यात जोम आणि उत्साह नसेल तर वाचकांनी उत्साहाने त्यांच्या पुस्तकांकडे का वळावे हाही प्रश्न निर्माण होईल. 
या प्रश्नाचे उत्तर काय तर तरुण आणि जोम-उत्साहाने यंदाच्या वर्षी दिवसाला एक याप्रमाणे तब्बल 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा ‘चपराक प्रकाशना’चे घनशाम पाटील यांनी हाती घेतलेला विक्रम घडवणारा प्रकल्प. 

बाजारपेठच नसेल तर एवढा मोठा महत्त्वाकांक्षी, प्रचंड गुंतवणुकीचा प्रकल्प कोणीही हाती घेणार नाही हे उघड आहे. बरे, या पुस्तकांचे लेखक म्हणजे जुन्या-नव्याचा संगम आहे. म्हणजे नवोदितांना स्थान दिले तर आपले व्यावसायिक गणित कोलमडेल अशी व्यावहारिक भीतीही घनश्याम पाटील यांना शिवलेली दिसत नाही. मग बाकी प्रकाशक जी निरुत्साही आणि निराशावादी भाषा करतात ती खरी का खोटी हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

बरे, पाटील हे नुसते पुस्तक प्रकाशक नाहीत; ते साप्ताहिक चपराक तर चालवतातच पण साहित्य चपराक हे मासिकही गेली 15-16 वर्ष नियमितपणे आणि यशस्वीपणे चालवत आहेत. एकीकडे भली-भली मासिके बंदची पाटी लावून मोकळे होताहेत तर काही त्या वाटेवर आहेत. मग ही मासिके बंद पडली त्याला वाचक जबाबदार आहेत की स्वत: अव्यावसायिक असलेले, नव्या पिढीची साहित्यिक भूक भागवण्यात अपयशी ठरलेले संपादक/प्रकाशक? प्रकाशन बंद पडले की हमखास वाचकांवरच त्याचे खापर फोडण्यात ही मंडळी तरबेज झाली आहेत हे एक वास्तव आहे पण वाचक कमी झालेत काय? चांगले नवे लेखक खरेच आता दुर्मीळ झालेत काय? या प्रश्नांवर घनशाम पाटील यांच्याशी वेळोवेळी जी चर्चा झाली आहे ती सर्वांचेच डोळे उघडणारी आहे.

वाचक कमी झालेला नाही तर त्याच्या जागतिकीकरणाच्या काळातील वातावरणाने बदललेल्या सांस्कृतिक व साहित्यिक अभिरुची सकसपणे भागवणारे लेखन फारसे येत नाही ही खरी अडचण. असे लेखन करणार्‍या लेखकांना प्रस्थापित नाही म्हणून नाकारणारे प्रकाशक असल्याने ते वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग बंद होतो. नवलेखकही वैतागून लेखनाचा तसा कष्टप्रद उद्योग थांबवून आपापल्या कामांना लागतो. जुने प्रस्थापित लेखक अजूनही त्यांच्याच जुन्या काळात अडकत आपल्या जुन्या यशांची आणि कथानकांची फिरवाफिरव करत लेखन देत राहतात. आधीच्या लेखनावर प्रेम करणारे वाचक मग हळूहळू दुरावत जातात आणि शेवटी त्या लेखकांना गुडबाय करतात. हे लेखक फक्त माध्यमांत आपले प्रसिद्धीवलय मिरवण्यात धन्यता मानत राहतात पण वाचक दूर जातो आणि नवेही काही मिळत नाही म्हणून पुस्तकांपासूनच दुरावत जातो. या चक्रव्यूहात वाचक अडकलेत आणि नवी दृष्टी असलेले प्रकाशक दुर्मीळ असल्याने तेही निराशेच्या गर्तेत अडकलेत.

घनशाम पाटील यांचा वर्षात 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम या मरगळलेल्या वातावरणाला संजीवनी देणारा ठरतो. 365 पुस्तके वर्षात प्रकाशित करण्याचे आव्हान त्यांनी घेतले ती केवळ प्रकाशनांची संख्या वाढवण्यासाठी नाही. आजच्या वाचकाला प्रगल्भ करेल, जाणिवा विस्तारेल आणि साहित्यिक भान देईल अशाच पुस्तकांची निवड ते करत आले आहेत. जवळपास दीडशेहून अधिक पुस्तके त्यांनी तयार करुन ठेवलीत. त्यातील काही यंदा वर्षारंभीच प्रकाशितही झालेली आहेत. यामागे मागील त्यांची काही वर्षाची तपश्चर्या आहे. काव्य ते कादंबरी हे सर्व साहित्यप्रकारही त्यात सामील आहेत. जुने लेखक असले तरी त्यांच्याकडून साहित्य मिळवताना ते वर्तमानाशी सुसंगत असेल याचेही भान ठेवले आहे. नव्या लेखकांकडून उत्तम ते काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात ज्यामुळे मराठी प्रकाशनविश्वाची कोंडी झाली आहे ती फोडण्यासाठी योग्य ती दूरदृष्टी दाखवली आहे. ही पुस्तके इ-बुक आणि श्राव्य माध्यमातूनही प्रकाशित केली जाणार आहेत कारण आजची पिढी या नव्या वाचन-माध्यमांना सरावत चालली आहे. थोडक्यात एका तरुणाने तरुणांच्या साहित्यविषयक गरजा ओळखून हाती घेतलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे म्हणावे लागेल.

समस्या वाचक किंवा लेखक नसून स्वत: प्रकाशकच आहेत. प्रकाशकांनाच बदलावे लागेल नाहीतर त्यांना या व्यवसायातूनच बाहेर पडावे लागेल हा इशारा वाचकांनीच दिलेला आहे. या इशार्‍याला समजावून घेण्याची कुवत बव्हंशी प्रकाशकांत नाही. घनशाम पाटील यांनी तो ओळखून हा प्रकल्प हाती घेतला आहे तो अभिनंदनीय ठरतो तो यामुळेच! 

- संजय सोनवणी 
दैनिक 'संचार', सोलापूर 
१२ फेब्रुवारी २०१८