Saturday, February 20, 2016

‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतून साकारलेल्या या संस्थेचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले. मात्र गेल्या काही वर्षात या संस्थेची रयाच गेली. वादविवाद आणि वितंडवाद यामुळे साहित्य परिषद चर्चेत येतेय. साहित्य परिषदेतून साहित्यच हरवलेय असे वाटते. आजीव सभासदांचाही परिषदेशी फारसा संबंध राहिलेला नाही. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे मुखपत्र असलेले त्रैमासिक आणि पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी आलीच तर मतपत्रिका, एवढाच काय तो आजीव सभासदांचा परिषदेशी संबंध येतोय.
मात्र यंदा चित्र बदलतेय. अतिशय परखड बाण्याचे, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय निवडणूक निर्णय अधिकारी लाभल्याने त्यांनी अनेक विधायक, सकारात्मक बदल घडविले आहेत. निवडणूक प्रक्रियेत त्यांनी केलेले आमुलाग्र बदल स्वागतार्ह आहेत. त्यामुळे यापूर्वी मतदान प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत जी उलटसुलट चर्चा व्हायची त्याला चाप बसला. एकतर त्यांनी यावेळी प्रत्येक मतपत्रिकेला सांकेतिक क्रमांक (बारकोड) दिले आहेत. शिवाय मतदारांचे ओळखपत्र अनिवार्य केल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येते. त्यामुळे आमच्यासारख्या काहींनी या व्यवस्थेचे आणि प्रक्रियेचे जोरदार स्वागत केले आहे तर काहींच्या पायाखालची वाळू सरकली.
पत्रकार या नात्याने आम्ही आजवर अनेक निवडणुका अनुभवल्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा, समृद्ध करणारा आहे. परिषदेतील अपप्रवृत्तींवर बाहेरून अनेकवेळा मी धाडसाने दगडफेक केली; मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे स्वतः परिषदेत उतरून आपण काहीतरी करावे या विचाराने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना कायम ‘चपराक’ देताना आम्ही कधीही डगमगलो नाही. त्यामुळेच ‘तुमच्यासारखे साहित्यिक कार्यकर्ते परिषदेत हवेत’ असे अनेक मान्यवर आवर्जुन सांगत आहेत. सभासदांचा मिळणारा हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. त्यांच्याकडून मिळणारी कौतुकाची थाप ही मोठी पावती होय.
निवडणुकीच्या निमित्ताने अनेक बरेवाईट अनुभव येत असून त्यावर आधारित ‘जावे त्याच्या वंशा’ हे पुस्तक मी लवकरच आपणास वाचावयास देईन! साहित्य परिषद साहित्याभिमुख व्हावी, समाजाभिमुख व्हावी यासाठी आमच्या ‘परिवर्तन आघाडी’चे प्रमुख प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांनी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांचाच या आघाडीत समावेश केला. समोरच्या पॅनलने एकाही महिलेला स्थान दिले नसताना ‘परिवर्तन’ने मात्र बारा जागांपैकी चार ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देऊन साहित्य क्षेत्रातील स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे. ‘पुरूषी मानसिकतेतून मला त्रास दिला जातो आणि माझी कुचंबणा होते’ असे गळे काढणारी विदुशी मात्र खुल्या दिलाने या निर्णयाचे स्वागत करत नाही!
साहित्य परिषदेचे 11300 मतदार आहेत. त्यात पुण्यातील 2865 जणांचा समावेश आहे. परिषदेने उमेदवारांना या सभासदांची जी यादी दिली त्यात कुणाचेही संपर्क क्रमांक किंवा मेल आयडी नाहीत. त्यामुळे संपर्कात अनंत अडचणी येत आहेत. त्यातील कित्येक सभासद हयात नाहीत, काहींची नावे दुबार आहेत तर काहींचे पत्ते बदलले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतोय. शिवाय या यादीत सर्वांची नावे आद्याक्षराप्रमाणे असल्याने त्या त्या भागातील सभासदांची यादी वेगळी करणे हे जिकिरीचे काम आहे. वेळेच्या मर्यादा लक्षात घेता यातील सभासदांपर्यंत थेट पोहोचणे कुणालाही शक्य होत नाही. त्यामुळे पत्रव्यवहाराला पर्याय नाही. त्यातही पत्ते किंवा पिन कोड क्रमांक चुकीचे असतील तर पत्रं त्यांच्यापर्यंत जात नाहीत. या सार्‍या अडचणींवर मात करण्याचे आव्हान दोन्ही पॅनलपुढे आहे.
व्यक्तीशः मला या निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मतदारांच्या घरी गेल्यानंतर ते जोरदार स्वागत करतात. साहित्यावर चर्चा होते. त्यांची ग्रंथसंपदा कळते. माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती कळतात. अनेक सभासद गेल्यानंतर आधी ‘चपराक’ची वर्गणी हातात टेकवतात. ते सांगतात, ‘‘आम्ही परिवर्तन आघाडीला मत तर देणार आहोतच, पण आधी ‘चपराक’च्या अंकाची वर्गणी घ्या! तुमचा अंक आमच्यापर्यंत आलाच पाहिजे...’’ हा प्रतिसाद उमेद वाढवणारा आहे. लोकांना परिवर्तन हवेय. साहित्य परिषद साहित्यिक उपक्रमांनी चर्चेत यावी, या मातृसंस्थेची अप्रतिष्ठा होऊ नये असेच अनेकांना वाटते.
अर्थात, काही कटू अनुभवही आहेत पण ते मोजकेच! एका नामवंत लेखकाने विचारले, ‘‘तुम्हाला व्हर्र्च्युअल रिऍलिटी माहिती आहे का?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘हो, म्हणजे भासात्मक सत्य!’’
त्यांनी सांगितले, ‘‘अगदी बरोबर! आता एक भासात्मक सत्य मनावर बिंबवा की, मागील वर्षभर मी तुमच्याकडे लेखन केले आहे. त्याचे मानधन आणून द्या आणि आमची इतकी मते घेऊन जा!’’
लेखन केलेले नसतानाही असे मानधन मागणे हा केवढा मोठा गैरव्यवहार! राजकारण्यांना लाजवेल असा हा अनुभव! त्यामुळे आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला आणि बाहेर पडलो.
काहीजण घरी बोलवून प्रेमाने पाच-दहा कविता ऐकवतात आणि मत आमच्याच परिवर्तन पॅनलला देणार असल्याचे सांगतात. लेखणी-वाणीवर जबरदस्त प्रभूत्व असलेले प्रा. मिलिंद जोशी हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. प्रकाश पायगुडे यांनी परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी चांगले कार्य केले आहे. सुनिताराजे पवार या ‘संस्कृती प्रकाशन’च्या माध्यमातून साहित्य शारदेची उपासना करतात. ज्योत्स्ना चांदगुडे या ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आहेत. निलिमा बोरवणकर यांची सकस ग्रंथसंपदा आहे. स्वप्निल पोरे हे ‘केसरी’चे वृत्तसंपादक आहेत, उत्तम कवी आणि कथाकार आहेत. चित्रपटविषयक लेखनात त्यांचा हातखंडा आहे. वि. दा. पिंगळे हे शिक्षक आहेत, कवी आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाली. मी ‘चपराक’च्या माध्यमातून गेली चौदा वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. नंदा सुर्वे गेली अनेक वर्षे परिषदेवर कार्यरत आहेत. प्रा. क्षितिज पाटुकले हे उत्तम लेखक असून दत्तोपासक आहेत. त्यांच्या ‘कर्दळीवन’ या पुस्तकाने इतिहास रचला. श्रीधर कसबेकर हे विधिज्ञ आहेत. असा हा भक्कम संघ परिषदेच्या विकासासाठी, मराठीच्या संवर्धनासाठी मैदानात उतरलाय. त्यामुळे त्याला बळकटी देणे हे सुजाण मतदारांचे कर्तव्य आहे.
आमच्यासारख्या तरूणांनी या निवडणुकीत भाग घेतल्याने साहित्य परिषदेचे वय कमी झाले आहे. प्रा. मिलिंद जोशी हे सर्वात कमी वयाचे कार्याध्यक्ष होतील. हा विक्रम नोंदविला गेला तर साहजिकच परिषदेशी तरूणांचे नाते अधिक घट्ट होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरूणांची खंबीर साथ या बळावरच हा मराठीचा गाडा हाकावा लागेल. त्यासाठी आता परिवर्तन घडवा. कोणतेही किंतु मनात न ठेवता आमच्या आघाडीचे हात मजबूत करा. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा, संशोधन यासाठी हे पूरक आणि पोषक ठरणार आहे. केवळ मराठी भाषा दिन साजरा करणे, मराठी सप्ताह साजरा करणे यामुळे फारसे काही होणार नाही. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ हे सूत्र लक्षात घ्यायला हवे. आम्हाला चांगली कृती करायचीय. त्यासाठी आपणा सर्वांचा पाठिंबा मिळावा, इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. बाकी या सार्‍या प्रक्रियेविषयी लवकरच एक पुस्तक लिहून साहित्य क्षेत्राचा चेहरा लख्खपणे दाखवतोय. तूर्तास, परिवर्तनाच्या प्रतिक्षेत! 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Wednesday, February 10, 2016

साहित्य परिषदेत परिवर्तन घडावे!

ठोकळेबाज विचारसरणीचे चार कळीचे नारद एकत्र आले की त्याची ‘परिषद’ होते, असा काहींचा गैरसमज झालाय. त्याला कारण अशा प्रवृत्तीचे मूठभर लोकच आहेत. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी निर्मितीक्षम, स्वयंप्रज्ञा असलेले लोक महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या मातृसंस्थेत हवेत. आपल्या लेखणी आणि वाणीने वाचक-रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या प्रा. मिलिंद जोशी यांनी हे ताडले आणि परिषदेच्या कारभारात काही बदल घडावा यासाठी चार पावले पुढे टाकली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांनी ‘मसाप परिवर्तन आघाडी’ स्थापन करून उडी घेतली आहे. साहित्य परिषद समाजाभिमुख आणि साहित्याभिमुख (होय, त्याची खरी गरज आहे!) व्हावी, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. आजीव सभासदांचा परिषदेतील सहभाग वाढून मराठी साहित्य, समीक्षा आणि संशोधनाचे हे ज्ञानकेंद्र व्हावे यासाठी या आघाडीच्या पाठिशी राहणे हे आपले सांस्कृतिक कर्तव्य आहे.
विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीनही पातळ्यांवर अव्वल ठरणार्‍या प्रा. जोशी यांचे कार्य मोठे आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, योगी अरविंद, शाहू महाराज ते महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्यापर्यंत प्रत्येक महापुरूषांवर सलग व्याख्यानांचा त्यांचा विक्रम आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची क्षणोक्षणी आठवण करून देणार्‍या जोशी यांचे लेखणी आणि वाणीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. मागच्या बारा-तेरा वर्षांपासून आम्ही त्यांना जवळून ओळखतो आणि त्यांचे कार्य उघड्या डोळ्यांनी पाहतो. व्याख्यानांच्या निमित्ताने दुर्गम भागात गेल्यानंतर रात्री तेथील कवी-लेखकांची मैफिल जमवणारे आणि त्यातील काही कलावंतांच्या नोकरीसाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आत्मियतेने सोडवणारे मिलिंद जोशी आम्ही अनुभवले आहेत. त्यामुळेच परिवर्तनाच्या या लढाईत ‘चपराक’ त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. इतकेच नाही तर ही साथ अधिक भक्कमपणे देता यावी यासाठी आम्ही त्यांच्या आघाडीतर्फे परिषदेच्या निवडणुकीतही उडी घेतली आहे.
‘चपराक’चा वाढता व्याप आणि उभारलेेला डोलारा सर्वपरिचित आहे. एक प्रभावी वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून अल्पावधीतच ‘चपराक’ने वाचकांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले आहे. नव्या-जुन्या लेखकांचा समन्वय साधताना ‘चपराक’ने ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे धोरण स्वीकारले. त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक प्रतिभावंत लेखक आम्ही आपल्यापुढे आणू शकलो. अनेक प्रतिभावंतांसाठी साहित्य परिषदेच्या बाहेर अलिखित असलेला ‘नो एन्ट्री’चा फलक आम्हास खुपत होता. सकस लिहिणार्‍या अनेक हातांना बळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे, नाउमेद करणे, अनुल्लेखाने मारणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील या कंपुशाहीला ‘चपराक’ देत आम्ही एक व्यापक चळवळ सुरू केली.
साप्ताहिकाच्या माध्यमातून अनेक समस्यांना सातत्याने वाचा फोडल्याने प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. लेखणीतून शब्दास्त्रांचा मारा केल्याने अनेक प्रश्‍न मार्गी लागले. चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या भावनेने आम्ही अनेकांचा आवाज बनलो. लिहित्या हातांना बळ दिले. त्यातूनच अनेक सृजनशील लेखक पुढे आले. ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची सुरूवात करून एकेकावेळी पंधरा-पंधरा पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, विख्यात निवेदक सुधीर गाडगीळ, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ, सदानंद मोरे अशा मान्यवरांना बोलवून या पुस्तकांचे प्रकाशन केले. दगडखाणीत काम करणार्‍या वर्गाचे चित्रण करणार्‍या युवा लेखक हणमंत कुराडे याच्यापासून ते सुप्रसिद्ध संशोधक संजय सोनवणी, सदानंद भणगे यांच्यापर्यंत अनेकांची पुस्तके ‘चपराक साहित्य महोत्सवा’त प्रकाशित केली.
सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आवर्जून आले. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते 2002 साली ‘चपराक’चा पहिला अंक प्रकाशित झाला आणि आम्ही साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचा, कार्यक्रमांचा धडाका लावला. ज्येष्ठ नेते शरद पवार, अभिनेत्री बेबी शकुंतला, चंदू बोर्डे, जगन्नाथ कुंटे, मंगेश तेंडुलकर, समाजवादी नेते भाई वैद्य, उद्योजक डी. एस. कुलकर्णी, भाजपा नेते माधव भंडारी, ह. भ. प. किसनमहाराज साखरे, प्रा. वीणा देव, अभिनेत्री आशा काळे, डॉ. न. म. जोशी, डॉ. कुमार सप्तर्षी, ह. मो. मराठे, अंजली कुलकर्णी, डॉ. माणिकराव साळुंखे अशा अनेक मान्यवरांनी ‘चपराक’च्या व्यासपीठावर आपली उपस्थिती लावली. जातीभेद, धर्मभेद, प्रांत, वय, स्त्री-पुरूष असे सारे भेद छेदत आम्ही लेखकांचा कबीला निर्माण केला.
महाराष्ट्राबरोबरच सहा राज्यात ‘चपराक’चा वाचकवर्ग निर्माण केला. बृहन्महाराष्ट्रातील लेखकांचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर प्रकाशित केले. हे सर्व पाहून साहित्य क्षेत्रातील आम्हाला आदर्श वाटणार्‍या काही दिग्गजांनी सांगितले की, ‘आपल्यासारखे साहित्यिक कार्यकर्ते साहित्य परिषदेत हवेत. महाराष्ट्र साहित्य परिषद तळागळातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी तरूणांनी परिषदेला बाहेरून नावे ठेवण्यापेक्षा पुढाकार घ्यायला हवा आणि परिवर्तन घडवून साहित्य क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करायला हवे.’
‘साहित्य परिषद साहित्यबाह्य विषयांवरूनच नेहमी चर्चेत असते. एकमेकांच्या कुचाळक्या करण्यातच तेथील महाभाग धन्यता मानतात; त्यामुळे त्या दलदलीत तुम्ही उतरू नका’ असा सल्लाही काहींनी दिला. ‘शिवाजी जन्मावा पण शेजार्‍याकडे’ हे आम्हाला कदापि मान्य नाही. काठावर बसून पोहणार्‍याला उपदेश करणार्‍यांपैकी आम्ही नाही. ‘चपराक’ने सातत्याने विविध विषयांवरून धाडसाने भूमिका घेतल्यात. त्या परिणामकारक आणि लक्ष्यवेधीही ठरल्यात. सकारात्मक परिवर्तनाचा ध्यास आम्ही घेतलाय. त्यासाठी मागची चौदा वर्षे रचनात्मक संघर्ष उभारलाय. साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक हे त्याचेच एक पाऊल आहे.
प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे हे या आद्यसंस्थेत परिवर्तन घडवू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी ही आघाडी स्थापन केली. प्रकाशन विश्‍वात अल्पावधीतच भरीव योगदान देणार्‍या सुनिताराजे पवार, ‘साहित्यदीप’ संस्थेच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या ज्योत्स्ना चांदगुडे, साहित्यिक जाणीवा समृद्ध असणार्‍या नीलिमा बोरवणकर, कथा-कविता, चित्रपट समीक्षा यात योगदान पेरणारे ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे यांचा या आघाडीत समावेश आहे. ‘चपराक’च्या माध्यमातून चौदा वर्षे कार्यरत असल्याने आम्हीही या आघाडीतर्फे स्थानिक कार्यवाह क्र. 6 (अतिथी निवास आणि इमारत देखभाल) या पदासाठी निवडणुकीला सामोरे जात आहोत. लेखिका नंदा सुर्वे, ‘कर्दळीवन’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक दत्तोपासक प्रा. क्षितिज पाटुकले आणि ऍड. श्रीधर कसबेकर असे लेखक या आघाडीत आहेत. समोरच्या पॅनेलने एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नसताना प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांनी स्त्रीशक्तीचा सन्मान राखत बारा पैकी चार महिला उमेदवारांना परिवर्तन आघाडीत समाविष्ट केले आहे.
कसलीही निर्मितीची क्षमता नसलेले लोक नवनिर्माणाची भाषा करीत आहेत, यापेक्षा अतिशयोक्ती ती कोणती? आता परिवर्तन झाल्याशिवाय नवनिर्माण होणार नाही. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपले एक मत निर्णायक ठरणारे आहे. पुणे शहराचा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात समावेश झालाय. शहर स्मार्ट करताना येथील हरवत चाललेले सांस्कृतिक पर्यावरण जतन करणे, समृद्ध करणे ही काळाची गरज आहे. अब्दूल कलाम यांनी ‘2020 साली भारत महासत्ता होणार’ असे स्वप्न पाहिले होते. त्याच्या पुर्ततेसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. यंत्रणेला, व्यवस्थेला शिव्या घालून, त्यांच्या नावे खडे फोडून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे साहित्यविषयक भरीव योगदान देण्यासाठी परिवर्तन आघाडी सज्ज आहे. त्याला आपल्या शुभेच्छांची, पाठिंब्याची सक्रीय साथ मिळाल्यास आम्ही निश्‍चितपणे काही बदल घडवू याचा आपण विश्‍वास बाळगावा. जोशी-पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिवर्तन आघाडीला आपण बहुमताने विजयी करावे. मी आणि माझे सर्व सहकारी आपणा सर्वांचा विश्‍वास सार्थ ठरवू आणि परिषदेत नवचैतन्य निर्माण करू, याची ‘चपराक’चा संपादक या नात्याने आपणास ग्वाही देतो.
- घनश्याम पाटील,
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२
------------------------------
---------

काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या साहित्य व्यवहाराचे मानबिंदू असले तरी प्रत्यक्षात असाहित्यिक राजकारणाचा अड्डा बनत अनेकदा टीकेचे धनी झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची आता निवडणूक होणार आहे. ही निवडणूक म्हणजे एका अर्थाने साहित्य प्रेमींना नव्या दमाच्या, कल्पक, साहित्याशीच खर्‍या अर्थाने निगडित व मराठी साहित्याची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरीत तरुणांना निवडून देत साहित्य परिषदेचा कारभार संपुर्णपणे सुधारण्याची एक अनमोल संधी आहे.
या निवडणुकीत माझे बंधुतूल्य मित्र घनश्याम पाटील स्थानिक कार्यवाह क्र. 6 या पदासाठी उभे आहेत. त्यांनी साहित्य परिषदेच्या पुर्वीच्या व्यवस्थापनावर अनेकदा जाहीरपणे परखड टीका करुन त्याला काही बाबतीत बदलायला भाग पाडले आहे. ते स्वत: सिद्धहस्त लेखक, पत्रकार व प्रकाशक असल्याने त्यांचा साहित्य क्षेत्रातील नव्या-जुन्या साहित्यिकांशी जवळचा संबंध आहे. साहित्य क्षेत्राशी निगडित प्रश्नांची त्यांना उत्तम जाण असून साहित्य परिषदेचा चेहरा-मोहरा बदलवण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे, याचा मला विश्वास वाटतो. ज्यांनाही त्यांच्या निगर्वी पण परखड आणि रोखठोकपणाचा अनुभव आहे ते माझ्या मताशी सहमत होतील याचाही मला विश्वास आहे. घनश्याम पाटील यांच्या उमेदवारीस माझा संपूर्ण पाठिंबा आहे.
याशिवाय परिवर्तन आघाडीचे प्रमुख प्रा. मिलिंद जोशी, माझ्या स्नेही ज्योत्स्नाताई चांदगुडे, ‘केसरी’चे वृत्तसंपादक, लेखक-कवी स्वप्निल पोरे यांच्यासह  घनश्याम पाटील यांच्या सर्व सहकार्‍यांना आपण भरघोस मतांनी निवडून देत मसापमध्ये खरोखरचे परिवर्तन घडवून आणावे, असे मी जाहीर आवाहन करतो.

-संजय सोनवणी, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
9860991205

------------------------------
----------------------------

घनश्याम पाटील हे माझे उत्तम मित्र आहेत. ‘चपराक’च्या माध्यमातून ते कुठल्याही दडपणांना बळी न पडता अनेक व्यक्ती आणि संस्थांची प्रकरणे बाहेर काढत असतात. हा नव्या दमाचा पत्रकार-लेखक साहित्य परिषदेच्या कारभारात नीट डोकावून पाहण्यासाठी, तिथे जाणं आवश्यक आहे. शुभेच्छा!
-सुधीर गाडगीळ, सुप्रसिद्ध निवेदक
९८२२०४६७४४
------------------------------


  नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, शाळा- कॉलेजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याची गोडी निर्माण करणे, ग्रामीण परिसरातील सांस्कृतिक संस्थांना आधार देणे आणि साहित्य परिषदेचे स्वरुप आणि क्षेत्र व्यापक करणे अशी काही स्वप्ने मनाशी धरुन जी मंडळी येत्या म. सा. परिषदेच्या निवडणुकीत उभी आहेत, त्यात घनश्याम पाटील यांचा समावेश अग्रकमाने करावयास हवा. पत्रसृष्टी, प्रकाशनसृष्टी, संस्कारसृष्टी नी तरुणांना बरोबर घेऊन स्वप्नसृष्टी साकार करण्याचे व्रत घेतलेले श्री. पाटील हे महाराष्ट्र समाज जीवनाला अधिक सशक्त करतील. सांस्कृतिक जीवनाला अधिक श्रीमंत करतील यात शंका नाही म्हणून पुण्यनगरीच्या सुजाण मतदारांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना भरघोस मतदान करुन उर्जा द्यावी, असे मला वाटते.
द. ता. भोसले, ज्येष्ठ साहित्यिक
पंढरपूर
९४२२६४६८५५

Sunday, February 7, 2016

हे झाड सारस्वताचे !


महाराष्ट्र साहित्य परिषद परिवर्तन आघाडीतर्फे मी स्थानिक कार्यवाह क्रमांक 6 (अतिथी निवास व्यवस्थापन, वास्तुदेखभाल) या पदासाठी निवडणुक लढवत आहे. काहीतरी विधायक, सकारात्मक कार्य करून साहित्य परिषद समाजाभिमुख करावी यासाठी आमच्या आघाडीचे प्रमुख प्रा. मिलिंद यांनी ही आघाडी स्थापन केली आहे. त्यात साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या लोकांचा समावेश आहे. प्रा. जोशी यांनी तब्बल एक वर्षापूर्वी (8 फेब्रुवारी 2015) माझ्या कार्याविषयी गोव्यातील अग्रगण्य असलेल्या दैनिक ‘गोमन्तक’ला एक लेख लिहिला होता. तो आपण अवश्य वाचावा. निवडणुकीचा विचारही डोक्यात नसताना आजच्या आघाडीप्रमुखाने केलेले कार्याचे मूल्यमापन मला सुखावून गेले.

पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. विद्येचे माहेरघर आहे. अशा शहरात येवून कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका जिद्दी तरूणाने केवळ आत्मविश्वासाच्या बळावर साप्ताहिक सुरू करणे, साहित्याला वाहिलेले मासिक सुरू करणे, दर्जेदार दिवाळी अंक काढणे आणि साहित्य क्षेत्रातील जाणकारांची वाहवा मिळविणे ही गोष्ट स्वप्नवत वाटावी अशीच आहे पण हे स्वप्न सत्यात उतरविले आहे ते घनश्याम पाटील नावाच्या मराठवाड्यातल्या एका हरहुन्नरी तरूणाने! साप्ताहिक 'चपराक', मासिक 'साहित्य चपराक' आणि दिवाळी अंक तसेच नवोदितांबरोबरच, नामवंतांच्या साहित्यकृतींना प्रकाशात आणणारे 'चपराक प्रकाशन' ही सुद्धा या तरूणाच्या सर्जनशीलतेला आलेली सुगंधी फुलेच आहेत. लाडक्या अपत्यांप्रमाणे या सर्वांचा सांभाळ घनश्याम पाटील मोठ्या प्रेमाने आणि कर्तव्यनिष्ठेने करीत आहेत.
त्यांना मी पहिल्यांदा भेटलो. त्यांचे पोरसवदा रूप पाहिले. त्यात कुठेही पोरकटपणाचा अंश नव्हता. त्यांच्या वागण्या, बोलण्यात एकप्रकारची प्रगल्भता होती. साहित्याविषयीची आस्था होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना अंगी आवश्यक असलेली निर्भीडता होती. प्रसंगी वाईटपणा विकत घेण्याची तयारीही होती. मुख्य म्हणजे स्वतःविषयीचा आत्मविश्वास होता. तो मला अतिशय भावला आणि मी त्यांचा स्नेहांकित झालो. त्यांची 'झिरो टू हिरो' ही जी वाटचाल सुरू आहे त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. आपल्या समोर एखादे झाड बहरावे आणि आपण ते पाहत रहावे तितक्याच मनस्वीपणे मी त्यांचे बहरणे पाहतो आहे. 'चपराक' आणि घनश्याम पाटील हे अद्वैत आहे. ते एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. 'चपराक' हा घनश्याम पाटील यांचा प्राण आहे आणि घनश्याम पाटील हा 'चपराक'चा आत्मा आहे. त्यांना असणारी साहित्याची जाण, स्वतःला अधिक समृद्ध करता यावे यासाठीची त्यांची धडपड, अखंड कार्यरत असण्याची त्यांची वृत्ती, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील माणसे जोडण्याचे त्यांच्याकडे असलेले कसब, प्रसंगी भीडभाड न ठेवता स्पष्ट भूमिका घेण्याची आणि त्याची किंमत मोजण्याची त्यांची तयारी आणि या सर्व गुणांच्या जोडीला असणारी त्यांची धडाडी यामुळे त्यांची दमदार पावले पडत गेली. त्यांच्यासह 'चपराक'चा परिघ त्यामुळे विस्तारत गेला. ग्रामीण भागातून आलेला हा मुलगा आणि त्याचं प्रकाशन हा सारस्वतांच्या कौतुकाचा विषय बनला.
एक काळ असा होता की साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू हा फक्त पुण्या-मुंबईपुरता मर्यादित होता. आता तो ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागाकडे सरकतो आहे. जगण्याचा तीव्र झालेला संघर्ष या भागातून येणारे नवे लेखक प्रभावीपणे मांडत आहेत. आजचा काळ लेखनासाठी अनुकूल आहे पण लेखकांसाठी मात्र प्रतिकूल आहे. याचे कारण वृत्तपत्रांंना नामवंत लेखक हवे आहेत. जी वाड्मयीन नियतकालिके कशीबशी चालू आहेत ते चौकटीतून बाहेर पडायला तयार नाहीत. वर्षातून एकदाच दिवाळी अंकाचे निमित्त असते त्या अंकाचे संपादकही वर्षानुवर्षे त्याच त्या लेखकांची आरती करताना दिसतात. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अप सारखी माध्यमे आहेत पण त्यावरील लेखनाला अजून प्रतिष्ठा मिळत नाही अशा परिस्थितीत नव्या लोकांच्या हुंकाराला आणि अभिव्यक्तीला सामावून घेणार्‍या एका सशक्त व्यासपीठाची आवश्यकता होती! ती 'चपराक'ने पूरी केली. प्रतिभेच्या अनेक नव्या कवडशांना उजेडात आणण्याचे काम 'चपराक'ने केले. 'चपराक'च्या लेखकांच्या मांदियाळीत अनेक नामवंत लेखकांचा समावेश आहे. परंपरा आणि नवता यांचा सुरेख समन्वय साधत 'चपराक'ची वाटचाल योग्य रीतिने सुरू आहे.
घनश्याम पाटील हे प्रतिमेत अडकलेले संपादक नाहीत. ते निर्भीड आहेत. त्यामुळे 'चपराक'ला कोणताही विषय वर्ज्य नसतो. खरंतर साहित्याने कोणतेही क्षेत्र आणि विषय वर्ज्य मानता कामा नये पण आज जो कप्पेबंदपणा सर्वत्र प्रत्ययाला येतो त्या पार्श्वभूमीवर 'चपराक'चे वेगळेपण उठून दिसते.
महाराष्ट्राला वेगळ्या वाटा चोखाळणार्‍या संपादकांची समृद्ध परंपरा आहे. 'वाङ्मयाच्या पाकात राजकारण तळून वाढेन' या ध्येयाने 'नवयुग' किंवा 'मराठा' चालविणारे आचार्य अत्रे असोत, केवळ जाई काजळाच्या जाहिरातीवर 'सोबत' चालविणारे ग. वा. बेहरे असोत, घनश्याम पाटील मला त्याच कुळातले वाटतात. जग काय म्हणतंय यापेक्षा आपल्याला काय वाटतंय याला प्राधान्य देत आपल्या वाटा आपणच शोधणारी जी माणसे आहेत त्या पंथातले घनश्याम पाटील आहेत.
पुण्यात राहून चुकलेल्या राजकारणी पुणेकर सारस्वतांना तेच धार्‍यावर धरू शकतात. साहित्य संस्थांमधील राजकारणाचा तेच पर्दाफाश करतात, पुरस्कार संस्कृतीतल्या विकृतीवर हल्लाबोल करतात, राजकारण्यांना धडकी भरेल अशापद्धतीने त्यांच्या कारवाईचा समाचार घेतात. या सार्‍यांमागे काहीतरी मिळवणे हा त्यांचा हेतू कधीच नसतो. लोकांना अपमानित किंवा बदनाम करण्याचाही प्रयत्न नसतो. त्यांच्या लेखनामागे असते ती दांभिकतेची चीड आणि समाजस्वास्थ्याची कळकळ. त्यामुळेच ते परखडपणे लिहितात आणि स्पष्टपणे लिहिणार्‍या लेखकांची पुस्तके प्रकाशित करतात. एक तरुण मुलगा एखाद्या वडिलधार्‍याला शोभेल असे काम आज साहित्य क्षेत्रात करीत आहे. ही कौतुकाची बाब आहे.
तुच्छतावाद आणि प्रतिसादशून्यता या दोन रोगांनी आज साहित्यक्षेत्राला ग्रासले आहे. अंगावरती प्रेमाने थाप पडली तर जनावरंसुद्धा शहारून येतात पण माणसं मात्र मठ्ठासारखी असंवेदनशील झाली आहेत. अशा परिस्थितीत घनश्याम पाटील आणि त्याचा 'चपराक' परिवार साहित्य क्षेत्राला आलेले स्थितीस्थापकत्व दूर करून तो प्रवाह गतिमान करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत तेच त्यांचे वेगळेपणे आहे आणि सामर्थ्यही!
आज एकीकडे पुस्तके विकली जात नाहीत म्हणून रडणारे प्रकाशक आहेत. त्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी त्यांच्यातलाच पुस्तकांचा संसार करणारा घनश्याम पाटील यांच्यासारखा एक प्रकाशक एकाचवेळी बारा-बारा, पंधरा-पंधरा पुस्तकांचे प्रकाशन एकाच व्यासपीठावर करतो ही निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. साहित्य सोनियाची खाण अधिक समृद्ध व्हावी, सारस्वतांची अभिव्यक्तीची दिवाळी साजरी होत राहावी आणि सर्व प्रकारचे तिमीर नष्ट व्हावे यासाठी विचारांची दिवेलागण करणार्‍या साहित्योत्सवाची समाजाला नितांत गरज आहे. पाटील यांनी सुरू केलेल्या 'चपराक'च्या साहित्योत्सवामागेही हीच भावना आहे. अशा या वेगळेपण जपणार्‍या लेखक-प्रकाशकाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

- प्रा. मिलिंद जोशी 
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते
९८५०२७०८२३

Monday, February 1, 2016

चला परिवर्तन घडवूया, साहित्य परिषद बदलूया!

परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम आहे. माणसाचे आयुष्य प्रवाही असायला हवे. पाणी एकाच जागी तुंबून राहिल्यास त्याचे गटार होते. साहित्य, नाट्य, नृत्य, शिल्प, संगीत या व अशा कला माणसाला समृद्ध बनवतात. जीवनमान उंचावत त्यांना प्रगल्भतेकडे नेतात. साचलेपण दूर करतात. नवा उत्साह, प्रेरणा देतात. सकारात्मक ऊर्जा वाढवतात. या सार्‍यात माणूस घडविणार्‍या प्रत्येक संस्थेची जबाबदारी लाखमोलाची आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्यातून नवे सृजन घडेल, समाजाची बौद्धिक उंची वाढेल असा त्यांचा कयास होता. साहित्यातील अनेक दिग्गजांनी या मातृसंस्थेचे नेतृत्व केले आणि साहित्यिक जाणीवा समृद्ध केल्या.
हा गौरवशाली इतिहास असला तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेची आजची स्थिती काय आहे? साहित्याचे व्यापारीकरण झाले आणि बुजगावण्यांच्या खोगीरभरतीमुळे साहित्य परिषदेत साहित्य शोधावे लागते. म्हणूनच परिषदेला साहित्याभिमुख आणि समाजाभिमुख करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. लौकिकाला साजेसे नेतृत्व न लाभणे हे कोणत्याही समाजाचे दुर्भाग्यच! अशावेळी कोणीतरी पुढाकार घेऊन हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करायलाच हवा! साहित्य, भाषा, संस्कृती याविषयी कळवळ असणार्‍या प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार या त्रयींनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेची परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जायला सज्ज आहे. परिषदेतील दुकानदारी संपुष्टात येऊन राजकारणविरहीत निर्मळ कारभाराची अपेक्षा या चमूकडून ठेवता येईल.
नामवंत व्यवस्थापन तज्ज्ञ असलेले 86 वर्षीय निवृत्त प्राचार्य, सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. ‘प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापासून मला दूर ठेवले गेले, मी नामधारी अध्यक्ष आहे’ असे त्यांना परिषदेच्याच व्यासपीठावरून जाहीरपणे सांगावे लागले यातच सारे काही आले. अशा सज्जन, सोज्वळ वृत्तीच्या आणि प्रत्येकावर भरभरून प्रेम करणार्‍या बुजुर्गाची ही अवहेलना, त्यांचे शल्य जर आपण समजून घेणार नसू तर आपल्याला मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचा नैतिक अधिकार आहे का?
आमच्या तरूण मित्रांना पुण्यातील पत्ता कळवताना काही वर्षापूर्वी स्थापन झालेले दुर्वांकूर हॉटेल लक्षात येते मात्र साहित्य परिषदेची इमारत काही केल्या कळत नाही. या आद्य साहित्य संस्थेचे हे मोठे अपयश आहे. तरूण पिढी तर सोडाच मात्र परिषदेचे कित्येक आजीव सभासदही या इमारतीकडे फिरकत नाहीत. इथल्या लोकांचे राजकारण, स्वकेंद्रीत वृत्ती आणि अहंकाराचे सतत पिटले जाणारे डांगोरे यामुळे अनेक साहित्य रसिकांचा परिषदेशी सुतराम संबंध राहिलेला नाही. किंबहुना परिषद कोणते उपक्रम राबवते, मराठी भाषा, संस्कृतीच्या संवर्धनासाठी काय करते याचीही कोणाला खबरबात नसते. शालेय विद्यार्थी, तरूण, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही आद्यसंस्था काही विधायक, रचनात्मक, प्रयोगशील कार्य करते, मराठीचे संवर्धन करते यावर कुणाचा सांगूनही विश्‍वास बसत नाही. परिषदेच्या मागच्या काही वर्षातील कारभार्‍यांनी आपल्या अकर्तबगारीमुळे ही नकारात्मक मानसिकता निर्माण केली आहे. उखाळ्या-पाकाळ्या आणि एकमेकातील कलगीतुरे, हेवेदावे, साहित्यबाह्य विषय यामुळेच परिषद चर्चेत राहते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही अधोगती रोखण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे ही काळाची गरज होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानंतर महाराष्ट्रात रसिकप्रिय ठरलेले, लेखणी आणि वाणीवर उत्तम प्रभुत्व असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी काळाची ही हाक ऐकली. त्यातूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिवर्तन आघाडीची स्थापना झाली. तीस टक्के जुन्या आणि सत्तर टक्के नव्या उमेदवारांचा या आघाडीत समावेश आहे. व्यापारी मनोवृत्तीच्या धनाढ्यांना या निखळ साहित्यप्रेमींनी आव्हान दिले आहे. समोरच्या पॅनलने स्त्रीशक्तीचा अनादर करत एकाही महिलेला स्थान दिलेले नसताना परिवर्तन आघाडीने चार कर्तृत्ववान महिलांना उमेदवारी दिली आहे. विविध वयोगटातले, साहित्याबरोबरच विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी पार पाडणारे, स्वत:च्या क्षमता विकसित करण्याबरोबरच साहित्य क्षेत्रात योगदान पेरणारे हे उमेदवार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व उपक्रम पार पाडतानाच नव्या परिप्रेक्ष्यातून मसापसाठी नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा या परिवर्तन आघाडीचा संकल्प आहे. स्वच्छ, पारदर्शक कारभाराद्वारे साहित्यकारणावर भर देणार्‍या आघाडीने महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गदिमांचे पुण्यात यथोचित स्मारक उभारण्याचा मानस जाहीर केला आहे. उल्लेखनीय म्हणजे मसापच्या शाखा विस्ताराबरोबरच या नव्या शाखांच्या आर्थिक सबलीकरणाचा प्रयत्न करून कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करणे व शाखांना उपक्रम देणे, फेसबुक-ब्लॉग अशा समाजमाध्यमांद्वारे तरूणाईशी सुसंवाद साधणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, महाविद्यालयातील वाङ्मय मंडळे परिषदेला जोडणे, साहित्यातील विविध प्रवाहात समन्वय साधून सुसंवाद घडविणे, समविचारी साहित्यसंस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य समीक्षा आणि संशोधनाचे प्रकल्प हाती घेणे, मसापच्या अतिथी निवासाचे व्यवस्थापन अधिक नेटके करून अतिथी निवास सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज करणे, मराठी विषय घेऊन स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक मिळावेत यासाठी सहकार्य करणे, मराठी विषय शिकविणार्‍या शिक्षकांची अध्यापन क्षमता वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रयत्न करणे, विविध वाङ्मय प्रकारांसाठी कार्यशाळांचे आयोजन करणे, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या परिषदेच्या त्रैमासिक मुखपत्राचे स्वरूप अधिक संदर्भमूल्य वाढविणारे आणि उपयुक्त करणे, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, मसापच्या ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे आणि मुख्य म्हणजे मसापच्या आजीव सभासदांचा विविध उपक्रमात सहभाग वाढविणे यासाठी ही परिवर्तन आघाडी क्रियाशील राहणार आहे.
हे सारे शक्य होईल का? असा प्रश्‍न अनेक वाचकांना पडणे स्वाभाविक आहे; मात्र याहून अनेक उपक्रम या आघाडीच्या समोर असून त्याच्या पूर्तीसाठी सर्व उमेदवार सज्ज आहेत. प्रा. मिलिंद जोशी हे परिषदेच्या इतिहासात सर्वात तरूण कार्याध्यक्ष होतील. प्रकाश पायगुडे यांच्या कार्याची चुणूक साहित्य क्षेत्राने अनुभवलीच आहे. अतिशय जिद्दीने प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सुनिताराजे पवार, ‘साहित्यदीप’ संस्थेच्या माध्यमातून पुणेकरांना सुपरिचित असलेल्या कवयित्री आणि आदर्श शिक्षिका ज्योत्स्ना चांदगुडे, संपादकीय कामाचा समृद्ध अनुभव असणार्‍या निलिमा बोरवणकर, कवी, चित्रपट समीक्षक आणि लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेल्या ‘केसरी’ या राष्ट्रीय बाण्याच्या दैनिकात वृत्तसंपादक असलेले स्वप्निल पोरे, ज्येष्ठ लेखिका नंदा सुर्वे, बहुआयामी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले प्रा. क्षितीज पाटुकले, ऍड. श्रीधर कसबेकर, मसापच्या पिंपरी शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, डॉ. पुरूषोत्तम काळे, सासवडचे रावसाहेब पवार असे एकाहून एक सरस उमेदवार या परिवर्तन आघाडीत आहेत. कवी आणि शिक्षक वि. दा. पिंगळे हे स्थानिक कार्यवाह म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. लेखक, कवी, प्रकाशक, संपादक, शिक्षक, वक्ते आणि पत्रकार अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील उमेदवारांचा परिवर्तन आघाडीत समावेश आहे.
सरतेशेवटी...
‘चपराक’च्या माध्यमातून मराठी साहित्याचा विजयध्वज डौलात फडकावा यासाठी गेली 14 वर्षे आम्ही अव्याहतपणे कार्यरत आहोत. एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय पुस्तके प्रकाशित केल्याने ‘चपराक’ची वेगळी ओळख निर्माण झालेली आहेच. चुकीच्या प्रवृत्तीला, विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना परखडपणे ‘चपराक’ देताना आम्ही सातत्याने ठाम भूमिका घेतल्या आहेत. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन आम्ही 2002 साली ‘चपराक’ ही संस्था स्थापन केली आणि त्याद्वारे प्रांजळपणे कार्यरत आहोत. घुमानच्या साहित्य संमेलनातील प्रकाशक परिषदेचा बहिष्कार धाडसाने फेटाळून लावणे किंवा यंदाच्या साहित्य संमेलनाध्यक्षांचा चेहरा आणि मुखवटा वाचकांसमोर आणणे हे आमचे कार्य आपणास ठाऊक आहेच. एकाच वेळी पंधरा-पंधरा पुस्तकांचे प्रकाशन असेल किंवा दीडशेहून अधिक साहित्यिकांचा समावेश असलेला, सहा राज्यात वाचक असलेला तब्बल 468 पानांचा ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक प्रकाशित करणे हे सारे कार्य आपण जाणताच. त्यामुळेच बरबरटलेल्या राजकारणातून साहित्य परिषदेला बाहेर काढण्यासाठी आम्हीही प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे या द्वयींना समर्थ साथ द्यायची ठरवली. परिवर्तनाच्या या लढाईत म्हणूनच आपले आम्हास सक्रीय सहकार्य, पाठिंबा अपेक्षित आहे. फक्त उमेदवार म्हणून नाही, हितचिंतक म्हणून नाही तर एक साहित्यरसिक या नात्याने, पत्रकार या नात्याने आमची कायम ‘जागल्या’ची भूमिका असेल. परिवर्तन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात जे-जे मांडले आहे त्याच्या पूर्ततेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कार्यरत राहू याची ग्वाही आम्ही देतो. त्यामुळेच विश्‍वासाने साद द्यावीशी वाटतेय की, ‘चला परिवर्तन घडवूया; साहित्य परिषद बदलूया!’

- घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Friday, January 22, 2016

चोराच्या उलट्या बोंबा....

 
पिंपरी येथील 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले तरी त्याचे कवित्व काही थांबत नाही. साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे भाषण न छापल्याने संमेलनाध्यक्षांनी ‘महामंडळ ‘सेन्सॉर’ कधीपासून झाले?’ असा सवाल करत हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचे सांगितले आहे. हे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लागेल. आक्षेपार्ह मुद्दे असल्याने संमेलनाध्यक्षांचे भाषण छापले गेले नाही, असे सांगण्यात येत असले तरी यात तथ्य नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.
श्रीपाल सबनीस यांनी निवडणुकीदरम्यान अनेक वाद ओढवून घेतले. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी भाषेत केलेला उल्लेख मोदी विरोधकांनाही आवडला नाही. त्याचवेळी सनातन संस्थेचे वकील पुनाळेकर यांनी त्यांना ‘मॉर्निंग वॉकला जात चला’ असा सल्ला दिल्याने सबनीसांनी थयथयाट केला. खरेतर हा सल्ला पुनाळेकरांनी सबनीसांना आधीच द्यायला हवा होता. कारण या सल्ल्यानंतर काही तथाकथित पुरोगामी संघटनांना सोबत घेऊन त्यांनी ‘मॉर्निंग वाक’ची नौटंकी केली आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. एक दिवस ‘मॉर्निंग वॉक’ला गेल्याने इतकी अक्कल आली; जर ते नियमित चालायला गेले असते तर कदाचित अशी दुर्दैवी वक्तव्ये केलीच नसती! असो.
महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण प्रकाशक या नात्याने छापावे असा रिवाज आहे. यंदा तो खंडित झाला आहे. त्यामुळे सबनीस गळे काढत आहेत. मात्र यातील तथ्य आपण समजून घ्यायला हवे. तब्बल 135 पानांचे हे भाषण सबनीसांनी संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ग्रंथदिंडी सुरू असताना महामंडळाकडे दिले. याची कबुली खुद्द सबनीसांनीही दिली आहे. त्यामुळे इतक्या कमी काळात हे भाषण छापणे अवघडच आहे. याची जाण त्यांनाही असल्याने त्यांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हे भाषण स्वतःचे पैसे टाकून (किंवा प्रायोजक मिळवून) ‘दिलीपराज प्रकाशन’कडून रातोरात छापून घेतले. एका रात्रीत दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे हे भाषण छापू शकतात तर महामंडळ का नाही? असा खुळचट सवालही सबनीसांनी केला आहे. अध्यक्षीय भाषण होण्यापूर्वीच एखादा प्रकाशक अशा पद्धतीने भाषण छापू शकतो का हेही तपासले पाहिजे; तसेच सबनीस हे भाषण स्वतः पैसे टाकून छापून घेतल्याचे सांगत असल्याने स्वतः पैसे टाकून त्यांनी आणखी काय काय उद्योग केले आहेत हेही समोर यायला हवे.
दिलीपराजची स्वतःची यंत्रणा आहे. ते प्रकाशक आहेत. महामंडळाकडे छपाईबाबत स्वतःची अशी कुठलीही साधने नाहीत. शिवाय संमेलनाची पूर्वसंध्याकाळ म्हणजे महामंडळाचे सर्व पदाधिकारी संमेलनाच्या धावपळीत असणार हेही सत्य नाकारून कसे चालेल? आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन सबनीसांनी वेळीच भाषण लिहून पूर्ण केले असते तर अशी वेळ ओढवलीच नसती. काहीही झाले तरी महामंडळाला नावे ठेवत, त्यांना दूषणे देत स्वतःचा करंटेपणा, नाकर्तेपणा झाकून ठेवायचा याला काही अर्थ नाही.
हे भाषण महामंडळाने न छापल्याने आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा विनोदी खुलासा अध्यक्षांनी केलाय. निवडणुकीच्या दरम्यान झालेले राजकारण आणि यांची हुजरेगिरी स्पष्टपणे मांडत संमेलनाध्यक्षांचा ‘चेहरा आणि मुखवटा’ दाखवून देणारा लेख ‘चपराक’ने प्रकाशित केला. तो ‘चपराक’च्या सदस्यांपर्यंत तर गेला होताच पण फेसबूक, ब्लॉग अशा समाजमाध्यमांबरोबरच राज्यातील अनेक वृत्तपत्रांनीही तो पुनर्मुद्रित केला होता. त्यानंतर संमेलनात ‘चपराक’च्या ग्रंथ दालनात या अंकाची दोन दिवस तडाखेबंद विक्री झाली. यामुळे हबकलेल्या अध्यक्षांनी त्यांची योग्यता सिद्ध केली! संमेलन समितीच्या सदस्यांनी हे अंक जप्त केले. इतकेच नाही तर, हा अंक येथे विक्रीस ठेवला तर दालनाचा परवाना रद्द करू असा दमही भरला.
‘चपराक’ कधीही कुणाच्या वांझोट्या धमक्यांना भीक घालत नाही. त्यामुळे आम्ही त्याचा खंबीरपणे सामना केला. वृत्तवाहिन्यांनी हा विषय लावून धरला. ‘साहित्य संमेलनातील सर्वात मोठी बातमी, ‘चपराक’चे अंक जप्त’ अशी बातमी सुरू झाली. झी चोवीस तास, एबीपी माझा, टीव्ही 9, आयबीएन लोकमत, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र नं. 1, साम टीव्ही अशा आघाडीच्या सर्वच वाहिन्यांनी आमचा आवाज तमाम मराठी बांधवापर्यंत पोहोचवला आणि यांच्या पार्श्‍वभागाला मिरच्या झोंबल्या. अंकातून जेवढी बदनामी झाली त्याहून मोठी नामुष्की या कृत्यामुळे होतेय, हे ध्यानात येताच ग्रंथालय समितीचे प्रतिनिधी रमेश राठिवडेकर यांनी ‘चपराक’चे जप्त केलेले अंक परत आणून दिले आणि आयोजकांच्या वतीने आमची माफी मागितली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणारे श्रीपाल सबनीस या प्रकाराच्या वेळी हजार किलो मूग गिळून गप्प होते.
‘विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे’ असे घसा ताणून सांगणारे यावेळी मात्र चिडीचूप होते. प्रसारमाध्यमांच्या दणक्यामुळे जागे झालेल्या आयोजक पी. डी. पाटील यांनी संमेलनाध्यक्षांना सोबत घेऊन मुद्दाम ‘चपराक’च्या दालनाला भेट दिली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत व्हायची तेवढी शोभा झाली होती. ‘नवाकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने तर दुसर्‍या दिवशी पहिल्या पानावर तीन ओळींचे शीर्षक देत, आमच्या फोटोसह आठ कॉलमची बातमी केली. ‘कुत्र्याला खीर पचली नाही’ हा आमचा लेख पुनर्मुद्रित केला. अनेक वृत्तपत्रांनी ‘चपराक’च्या भूमिकेला पाठिंबा देत अग्रलेख केले. विशेष लेखात या घटनेचा निषेध नोंदवला. मात्र पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यापैकी कुणीही एका शब्दात याचा निषेध नोंदवला नाही. (अपवाद सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचा. ते ‘चपराक’ परिवाराचेच सदस्य आहेत.)
निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून ‘अपमान सहन करणार नाही’ असे बंेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार्‍या सबनीसांना त्यांच्या विक्षिप्तपणामुळे अपमानाशिवाय दुर्दैवाने काहीच पदरात पडले नाही. घुमानच्या संमेलनात सदानंद मोरे यांची खुर्ची कशी बाजूला सरकवली गेली याचे माध्यम प्रतिनिधीसमोर चवीने वर्णन करणार्‍या सबनीसांना पहिल्या रांगेत स्थानही मिळाले नाही. संमेलन परिसरात आणि इतरत्र जे फ्लेक्स लावले गेले होते त्यावर केवळ स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांचाच फोटो होता. नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. संमेलनातील बहुतेक सत्कार पी. डी. पाटील यांच्याच हस्ते करण्यात आले. ‘ऊठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे’ इतकी त्यांची केविलवाणी अवस्था झाली होती आणि ती प्रत्येकाला जाणवत होती. यांची सतत चर्चेंत असणारी ‘तिसरी भूमिका’ अध्यक्षीय भाषणातून कळेल असे वाटत होते; मात्र तीस मिनिटाच्या भाषणातील पंधरा मिनिटे त्यांनी उपस्थितांची नावे घेण्यातच घालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्वसंकेत बाजूला सारून सबनीसांच्या भाषणाच्या आधीच  निघून गेले. आणखी हास्यास्पद म्हणजे, प्रोटोकॉलची माहिती नसलेल्या, किमान अभ्यास नसलेल्या सबनीसांनी मुख्यमंत्री गेल्यानंतर त्यांच्या दौर्‍याची माहिती भाषणातून दिली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने हे घातक आहे, इतकेही भान त्यांना नव्हते. उदय निरगुडकर यांच्यासारख्या अभ्यासू संपादकाने ‘झी चोवीस तास’ वरून विशेष संपादकीय प्रसारित केले होते. त्याबद्दल अध्यक्षांनी जाहीर खंत व्यक्त केली.
म्हणजे त्यांचा पोलखोल करणारे ‘चपराक’चे अंक दडपशाहीने जप्त करणारे, त्यांच्याविषयी स्पष्टपणे लिहिणार्‍या उदय निरगुडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ संपादकांविषयी खंत व्यक्त करणारे, संमेलनाच्या पूर्वसंध्येला 135 पानांचे भाषण लिहून ते महामंडळाकडे सोपवणारे सबनीस अभिव्यक्ती स्वांतत्र्याच्या नावे बोंब ठोकत आहेत. हे सारे जितके हास्यास्पद आहे तितका त्यांचा अविवेक, अप्रगल्भता दाखवून देणारे आहे. बरे, आता हे भाषण पुन्हा छापू असे महामंडळाच्या अध्यक्षा असलेल्या वैद्य बाईंनी सांगितले आहे. ते छापले तरी आता साहित्य रसिकांपर्यंत कसे पोहोचणार हे या दोघांनाच ठाऊक. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण पानेच्या पाने छापणार्‍या माध्यमांनी यावेळी त्यांची फारशी दखल घेतली नाही, यातून सबनीसांनी काहीतरी बोध घ्यायला हवा होता.
आता 26 जानेवारीपर्यंत हे भाषण महामंडळाने छापले नाही तर सपत्निक ते महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. तसा दम त्यांनी पत्रकार परिषदेत भरला आहे. इतकी शोभा होऊनही त्यांचे भाषण छापले जावे आणि ते वाचकांनी वाचावे असा दुराग्रह ते धरत आहेत. अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका छापण्याचा आपल्याकडे रिवाज असला तरी यांचे यावेळी 135 पानांचे पुस्तकच झाले आहे. सरकारी पैशाने ते का छापावे आणि असले कंटाळवाणे लेखन वाचकांनी का वाचावे हाही प्रश्‍नच आहे. सरकारी पैशाची अशी उधळपट्टी करून अमर होण्याचा हट्टाहास कशासाठी? संमेलनाच्या व्यासपीठावरून काही ‘विचार’ दिला असता तर ‘माझे विचार पोहोचवा’ असे म्हणत उपोषणाला बसण्याची वेळच आली नसती. शिवाय आता हे भाषण छापणे म्हणजे लग्न पार पडून मधुचंद्राला गेल्यानंतर सगळ्यांना अक्षता वाटत फिरण्यासारखे विनोदी आहे.
मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवहाराच्या दृष्टिने या चोराच्या उलट्या बांेंबा असून त्या घातक आहेत. साहित्याची, साहित्यिकांची झाली तेवढी शोभा पुरेशी आहे. आता आपली असलेली, नसलेली अक्कल न पाजळता संमेलनाध्यक्षांनी सवंग लोकप्रियतेसाठीची नौटंकी (ड्रेनेज ड्रामा) बंद करून मराठी साहित्यासाठी काही करता आले तर पहावे.


- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Thursday, January 21, 2016

‘लायब्ररी फ्रेंड फॉलो युवर हार्ट’

लायब्ररी फ्रेंड, चपराक प्रकाशन, पुणे 
सागर कळसाईत, लेखक
‘कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू’ या कादंबरीच्या अभूतपूर्व यशानंतर सागर कळसाईत या तरुणाचे नाव कादंबरी विश्‍वात ठळकपणे अधोरेखित झाले. मैत्री आणि प्रेम यात गुंतलेल्यांना खिळवून ठेवण्याचे काम ‘कॉलेज गेट’ने केले आणि अल्पावधीतच या कादंबरीच्या तब्बल चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ‘आजचे तरुण काय वाचतात?’ या विषयावर ‘सकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने एक सर्व्हेक्षण केले. त्यातून तरुणांच्या आवडीची दहा पुस्तके जाहीर केली. प्रकाशक या नात्याने सांगण्यास अत्यानंद होतो की, सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’नंतर दुसर्‍या क्रमांकाला आमच्या सागर कळसाईतची ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी होती. इतकेच नाही तर त्यावर लवकरच एक चित्रपटही प्रदर्शित होतोय. मराठी तरुणांची वाचनाची अभिरूची वृद्धिंगत करणार्‍या सागर कळसाईत या तरुण लेखकाविषयी साहित्य सृष्टीकडून प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या. जेमतेम पंचविशीत असलेल्या सागरने ही अपेक्षापूर्ती करत नवी कादंबरी मोठ्या ताकतीने वाचकांसमोर आणली आहे. प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या तरुणाईचा आलेख त्याने प्रस्तुत ‘लायब्ररी फ्रेंड’ या आपल्या कादंबरीत मांडला आहे.
सागरची भाषा कशी? तर जवळच्या मित्राने हक्काने आपल्याशी चर्चा करावी, वाद घालावेत किंवा पाठीवर धपाटे देत ‘सत्कार’ करावेत अशी! आजच्या तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनत, त्यांच्याच शैलीत अभिव्यक्त होत, संवादाच्या कक्षा व्यापक करत सागरची लेखणी प्रवाही राहते. एक अबोल प्रेमकथा मांडताना ‘लायब्ररी फ्रेंड’ आजच्या तरुणाईच्या भावभावनांचे शानदार प्रगटीकरण करते. कधी खुसखुशीत शैलीत तर कधी भावनिक होत तरुणाईच्या मनाचा कानोसा घेते. प्रेम, मैत्री, नातेसंबंध रंगवताना सागर समाजातील वास्तव रेखाटतो. यातील बर्‍याचश्या घटना, पात्रं हे त्याच्या परिघातलेच असल्याने त्यात जिवंतपणा आला आहे. मैत्रीसाठी जीव ओवाळून टाकणार्‍या मित्रांचे सुहृदयी वर्णन सागर खुमासदार पद्धतीने करतो. ‘कॉलेज गेट’नंतर लेखकाची मानसिकता, त्यासाठी उपसलेले कष्ट, थोडीफार झालेली फरफट, क्वचित प्रसंगी आलेले नैराश्य, वडिलांनी मनात पेरलेला आशावाद, दोस्तांची साथसंगत, मैत्रीत दुरावा निर्माण होत असताना त्यांचे साधलेले ऐक्य हे सारे काही ‘लायब्ररी फ्रेंड’मध्ये आल्याने रंजनातून प्रबोधन अशा पद्धतीची ही कलाकृती साकार झाली आहे. या कादंबरीत आजच्या तरुणांच्या भावभावनांचे प्रतिबिंब उमटल्याने ही कादंबरी म्हणजे आजच्या काळाचे प्रतिक ठरले आहे.
या कादंबरीतील प्रमुख पात्र असलेला मानव हा अस्मितावर नकळतपणे जीव ओवाळून टाकतो. प्रेमाची अभिव्यक्ती मात्र त्याला शेवटपर्यंत जमत नाही. त्याची स्वप्नप्रेमिका असलेली अस्मिता लायब्ररीत केवळ दूरदर्शनाने त्याची प्रेरणा बनते. पुस्तक लिहायची सुरुवात करण्यासाठी, संपलेल्या महाविद्यालयीन जीवनाची अनुभूती घेण्यासाठी मित्रांच्याच महत्प्रयासाने लायब्ररीत बसण्याची परवानगी मानव घेतो; मात्र प्रयत्नपूर्वक रोज दोन-तीन पानांच्या पुढे त्याची गाडी जात नाही. त्यातून नैराश्य येत असतानाच समोर बसलेली अस्मिता तिच्या मैत्रिणीला सांगते, ‘‘सचिन तेंडुलकरला सेंच्युरी करण्यासाठी पहिल्या रनाने सुरुवात करावी लागते.’’ नाजूक आवाजात मैत्रिणीला दिलेला सल्ला मानव स्वत:साठी म्हणून स्वीकारतो आणि त्यातूनच तिच्याकडे प्रेयसी म्हणून पाहतो. प्रेम तर दूरच मात्र साधी मैत्रीही नसताना ती मानवची शक्तीस्थान बनते. सहजपणे तिने इतरांशी साधलेले संवाद मानवच्या कानावर पडतात आणि त्यातून तो स्वत:ची दिशा ठरवत जातो. अस्मितावर ‘लव्ह ऍट फस्ट साईट’ असे प्रेम करणारा मानव ग्रंथपालाविषयी मात्र ‘हेट ऍट फस्ट साईट’ म्हणतो. त्यातच त्या ग्रंथपालाच्या प्रेमभंगाची कहाणीही सुरसपणे रंगवतो. एमबीए होऊनही नोकरी न करता पूर्णवेळ लेखन केल्याने जवळचे मित्र मानवला शिव्या घालतात; मात्र तो वडिलांची समजूत घालतो की या पुस्तकानंतर मी नोकरी करेन. आपला मित्र उमेश याला याबाबतची भूमिका सांगताना मानव प्रतिप्रश्‍न करतो, ‘एकाचवेळी दोन सशांच्या मागे धावणार्‍या शिकार्‍याला एकतरी ससा मिळेल का वेड्या?’
लायब्ररीत प्रेयसीच्या रुपाने नजरेस पडणारे प्रतिबिंब टिपण्यासाठी, तिचा सहवास लाभण्यासाठी, तिची एखादी झलक पाहण्यासाठी मानव आसुसलेला असतो. ही त्याची वैयक्तिक अनुभवावरील शोकात्मिका असली तरीही यात भाव खाऊन जाते ती वेदांत आणि साक्षी ही जोडी. त्या दोघांविषयीचे संवाद जसे वाचकांना खळखळवून हसवतात तसेच डोळ्यात अश्रूही यायला भाग पाडतात. अजरामर प्रेम कहाणीत नोंद करता येईल अशी या दोघांची जोडी! मात्र आपल्या समाजाला लागलेली जातीव्यवस्थेची कीड त्यांच्या वाट्याला येते. ‘हे लग्न झाले तर मुलाच्या आईवडिलांच्या जीवाला धोका आहे’, अशी थाप एक ज्योतिषी वेदांतच्या आईला मारतो आणि त्यात या जोडप्याची ससेहोलपट होते. उमेश, माऊली यांच्यासह मानव या प्रवृत्तीवर घाव घालण्यासाठी प्रयत्नशील असतात. साक्षीसारखी कोमल हृदयाची मुलगीही ज्योतिषाला, जातीव्यवस्थेला पोटतिडीकीने शिव्या घालते. आजच्या समाजव्यवस्थेत अपरिहार्य ठरलेले हे दुर्दैवी वास्तव ठळकपणे अधोरेखित करताना लेखकाने प्रेमकथेच्या माध्यमातून कठोर प्रहार केले आहेत.
एमबीएनंतर सर्व मित्रांना जोडून ठेवण्यासाठी मानवला अनेक क्लृप्त्या सुचतात. त्यातून तो काही उद्योग करतो. सुरूवातीला गणपतीच्या मूर्ती विकण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी प्रत्येकजण पॉकेटमनी काढतो आणि सर्वजण मिळून खास पेणहून गणपती मूर्ती आणतात. वारजेत दुकान लावून त्या विकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रयत्न मुळातून वाचण्यासारखे आहेत. समाजातील विविध प्रवृत्तींची झलक त्यातून दिसून येतेे. व्यवस्थापनशास्त्राचे पदवीधर असलेल्या या तरुणांना मात्र गणेशमूर्ती विकण्याच्या व्यवसायात आपटी खावी लागते. त्यात प्रयत्न करूनही पदरात अपयश पडल्याने वाचकांना जसे वाईट वाटते तसेच लेखकाने ते अपयश ज्या शैलीत सांगितले आहे ते वाचताना पुरेपूर रंजनही होते. ‘माणूस फक्त वेगवेगळ्या मूर्ती बनवतो. आकार बदलला की देवाचे नावही बदलते’ इतके शहाणपण या घाट्याच्या व्यवसायातून येते. ‘रंग देत असणार्‍या मूर्तीमध्ये देव आहे की मूर्तीकार स्वत: मन लावून करत असलेल्या कामामध्ये?’ असा तर्कशुद्ध विचारही लेखकाने मांडला आहे. पेणहून गणेशमूर्ती आणताना रस्त्यात पोलीस यांची गाडी अडवितात. त्यांच्या वाहनात मूर्तीशिवाय आणखी काही नाही ना हे तपासून पाहतात. या प्रकाराने झोपमोड झाल्याने माऊली मानवजवळ पोलिसांना शिव्या घालतो. तेव्हा मानव त्याला म्हणतो, ‘अच्छा... तुझी दोन-अडीच तासांची झोप मोडली! साल्या, ते पूर्ण रात्र आपल्याच सुरक्षिततेसाठी जागतात ना?’ आजच्या तरुणाईचे हे सामाजिक भान सागर कळसाईत या हरहुन्नरी लेखकाने अचूकपणे नोंदविले आहे.
गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी अनेक लोक मूर्तींचा भाव करतात; मात्र त्यांना ती जागा उपलब्ध करून देणारा पुढारी जेव्हा त्याच्या फौजफाट्यासह येतो तेव्हा तो राजकीय आविर्भावात सांगतो, ‘आम्ही देवाच्या मूर्तीची किंमत करत नाही.’ अनपेक्षितपणे मानवचे आई-वडिलही या दुकानात येऊन मूर्ती मागतात. तेव्हा मानवचा सहकारी त्यांना, ‘तुम्हाला सवलतीच्या दरात मूर्ती देतो काका’ असे म्हणतो. त्यावर तेही म्हणतात, ‘मला सवलत नको.’ वडिलांचा आवाज ऐकून मानव हर्षोल्हासित होतो. तेव्हा एमजे म्हणतो, ‘बघ ना, त्या आधारस्तंभानेही सवलत मागितली नव्हती आणि बाबांनीही सवलत नाकारली. त्या राजकारण्याने दिलेल्या पैशामागे त्याचा दिखाऊपणा होता. तर बाबांच्या सवलत नाकारण्यामागे त्यांचं प्रेम होतं. भलेही आपण राजकारण्याच्या मूर्तीमागे जरा जास्तच पैसे कमावले पण आई-वडिलांच्या प्रेमामुळे झालेला नफा अनमोल आहे यार.’
गणेशमूर्ती विक्रीतून नुकसान सहन करावे लागल्यानंतर सगळेजण थोडे नाराज होतात; मात्र मानव आशावाद सोडत नाही. लायब्ररीत आल्यानंतर अस्मिताच्या हातात चॉकलेट बॉक्स पाहून त्याला हॅण्डमेड चॉकलेटच्या व्यवसायाची कल्पना सुचते. मुंबईतील मित्रमैत्रिणींना गाठून तो ती कला अवगत करतो. त्यासाठी हे मित्रमंडळ कामाला लागते. त्यातही ते सडकून मार खातात. दुसर्‍या व्यवसायातही अपयश आल्याने काही मित्र साथ सोडतात. मात्र मैत्रीचा धागा बळकट ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेला मानव कच खात नाही. पराभवाने डगमगत नाही.
एका कंपनीकडून 25 लाखाचे गिफ्ट मिळणार म्हणून तो मित्रांच्या नकळत 25 हजार रुपये त्या कंपनीच्या खात्यावर भरतो. त्यातून झालेली फसवणूक लक्षात आल्यानंतर मित्रही यथेच्छ धुलाई करून धडपड्या मानवचा ‘सत्कार’ करतात. या फसवणुकीची तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलिसही त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांप्रमाणे त्यांना हुसकावून लावतात. ‘चक्रीवादळाने निसर्गात कितीही थैमान घातलं तरीही माणसाला जास्त दु:ख होत नसेल. जिव्हारी लागतं ते आपलं घर बरखास्त झाल्यावर! इथे चक्रीवादळही मी स्वत:च होतो आणि घरही स्वत:च्या स्वप्नांचं होतं’ अशी प्रांजळ कबुली देत आजची तरुणाई कोणकोणत्या आमिषाला बळी पडते, कशी भरकटत जाते, संकटाच्या काळातही आपली नीतिमत्ता कशी टिकवून ठेवते हे सारे ‘लायब्ररी फ्रेंड’मध्ये यथार्थपणे रेखाटण्यात आले आहे.
कादंबरी लिहिण्यासाठी म्हणून मानव कॉलेजच्या लायब्ररीत नियमितपणे जात असतो. अस्मितावर तो एकतर्फी प्रेम करत असतो. ते पाहून काही मित्र उमेशला सांगतात की, ‘मानवला अस्मितापासून दूर राहायला सांग.’ कारण त्याच कॉलेजमधील सुजित मागच्या काही वर्षांपासून अस्मिताच्या मागे असतो. उमेशकडून हा निरोप मिळताच मानव प्रेमवीराच्या आविर्भावात सुजितला दम भरायला त्याच्याकडे जातो; मात्र आपल्यापेक्षा धष्टपुष्ट, उंचेल्या, गोर्‍यापान सुजितला पाहून तो सांगतो की, ‘तू माझा कॉम्पिटेटर आहेस.’ सुजितही ते हसण्यावारी घेतो आणि हे दोघेही अस्मिताला पटवण्याच्या मागे लागतात. मानव शेवटपर्यंत आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. सुजित आणि अस्मिताची मात्र गट्टी जमते. सुजित आणि मानव दोघेही अस्मिताला ‘लाईक’ करतात आणि दोघेही एकत्रच वावरतात याचे उमेशला आश्‍चर्य वाटते. तेव्हा सुजित खिलाडूवृत्ती दाखवत म्हणतो, ‘मुलीसाठी दोस्तीत कुस्ती नाय!’
धडधडणार्‍या प्रत्येक हृदयाला या कादंबरीत कुठे ना कुठे आपल्या मनाच्या भावना दिसून येतील. शहरी भागात राहूनही साडी नेसण्याची हौस असणारी साक्षी शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यातूनच समाजातील आजचे प्रश्‍न लेखकाने ठामपणे मांडले आहेत. ‘जनरेशन गॅप’ समजून घेतली तरी ही कादंबरी प्रेम आणि मैत्री या दोन्ही आघाड्यांवर अव्वल ठरते. सागर कळसाईत याने आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण करून त्या शब्दबद्ध करताना लेखणीचा सुंदर आविष्कार घडविला आहे.
‘वेदांतच्या घरी आम्ही सर्वजण बर्‍याच वर्षांनंतर भेटायला गेलो आहोत. त्यावेळी साक्षीने व्हेज बिर्याणीच बनवली आहे. तेव्हा मात्र बिर्याणीत मीठ किंवा कुठलीच कमी नसेन. सर्व काही व्यवस्थित होईल.’ असे स्वप्न ही मंडळी रंगवत असतात. वेदांत साक्षीला आपली बायकोच मानत असतो. साक्षीही त्याच्यात प्रचंड एकरूप झालेली असते. त्यात चालीरिती, रूढीपरंपरा, जात, अंधश्रद्धा आड आल्याने या सगळ्यांचाच हिरमोड होतो. त्याचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आले आहे.
एखादा तरुण लेखक लिहायला लागतो तेव्हा साहित्यातील ठोकळेबाज विचारसरणीच्या धेंडांकडून आणि प्रकाशन संस्थांकडून येणारे भलेबुरे अनुभवही या कादंबरीत आले आहेत. ‘फक्त पुस्तकात अखंड डुबून राहणार्‍या लोकांसाठी नाही तर सर्वसाधारण माणसांनाही वाचता येईल, वाचताना मजा घेता येईल आणि त्यातून एखादा विचार देता येईल’ अशी कलाकृती घडविण्याचे लेखकाचे स्वप्न असते. या कादंबरीद्वारे ते पूर्णत्वास आले आहे. ‘जेव्हा माणूस स्वत:च्याच मनाशी वैर घेतो ना तेव्हा त्याला सोपी गोष्ट करणेही खूप अवघड होऊन जाते आणि तेच जर आपण स्वत:शी मैत्री केली तर अशक्य वाटणारी स्वप्नेसुद्धा आपण पूर्ण करू शकतो,’ असा प्रेरणादायी विचार मानवचे बाबा त्याला देतात आणि मानव ताळ्यावर येतो. ‘मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघे मिळून स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात,’ असा आवाज त्याला त्याचे हृदय देते आणि ही कादंबरी सशक्तपणे फुलत जाते. ‘सरळ झाड असले की पहिली कुर्‍हाड त्याच्यावर पडते. वाकड्या झाडांना कोणी तोडत नाही’ अशी अनेक चिंतनसूत्रे जागोजागी प्रभावीपणे या कादंबरीत मांडली आहेत.
तरुण मुलांना ‘प्रेयसी की आई?’ हा कठोर प्रश्‍न खूप छळतो. आजच्या तरुणांना हे दोन्ही हवे असते. या दोन्हीपैकी एक निवड असा निर्णय घेण्यापेक्षा आम्हाला मृत्यू प्रिय वाटतो ही आजच्या तरुणाईची प्रातिनिधीक भावना मांडताना, आजच्या तरुणाईची घुसमट व्यक्त करताना सागर कळसाईत याने या कादंबरीला सर्वोच्च स्थानावर नेले आहे. ‘दुनियादारी’, ‘शाळा’, ‘कॉलेज गेट’ अशा तरुणाईवरील कादंबर्‍यांच्या परंपरेत ‘लायब्ररी  फ्रेंड फॉलो युवर हार्ट’ या कादंबरीने भर पडली आहे. भविष्यात कादंबरी क्षेत्रात सागर कळसाईत हे नाव विद्युल्लतेप्रमाणे तळपत राहील असा आशावाद व्यक्त करत सागर कळसाईत यांना पुढील लेखनासाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा देतो!

घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’ पुणे
मो. 70572 92092

Tuesday, January 5, 2016

संमेलन सुरळीत पार पाडा!


वाचकमित्रांनो सस्नेह नमस्कार!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्याविषयी आम्ही मागील लेखात लिहिले होते. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’च्या अंकातील अग्रलेख आणि ‘दखलपात्र’ या ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांनी तो मोठ्या प्रमाणात वाचला आणि आमच्याकडे उदंड प्रतिक्रिया आल्या. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
नवनिर्वाचित अध्यक्ष सबनीस यांच्यावर टीका करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तिक आकस किंवा त्यांच्याशी वैरभाव, द्वेष असण्याचे कारण नाही. त्यांची बदललेली वैचारिक भूमिका आणि साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेले राजकारण हे कठोरपणे मांडणे आम्हास गरजेचे वाटले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काही पथ्ये पाळायची असतात, ती त्यांनी पाळली नाहीत. आमची झालेली भावनिक फसवणूक आणि त्यांचे बदललेले वर्तन यामुळे आम्हाला नाईलाजाने कठोर भूमिका घेऊन त्यांच्याविषयी सडेतोडपणे लिहावे लागले.
संमेलनाच्या निमित्ताने जे काही राजकारण घडते किंवा निवडून येण्यासाठीच्या क्लृप्त्या, प्रयत्न (युद्धात आणि प्रेमात सगळे क्षम्य असते या म्हणीनुसार) ते सारे काही सबनीसांनी केले आहे. मात्र एकदा संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्या पदाचा डौल आणि त्याचे पावित्र्य सांभाळण्याची जबाबदारीही त्या व्यक्तिवर येऊन पडत असते. हे सतीचं वाण असतं. निवड झाल्यापासून सबनीसांनी वसा सोडला. या पवित्र व्रताचं आचरण करण्याऐवजी चुकीचे वर्तन केल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर टीका करावी लागली.
मात्र सबनीस विरोधकांसाठी ते घबाड मिळाल्यासारखे झाले आहे. अर्थात, कोण कुणाच्या बाजूचा आणि कोण कुणाचा समर्थक यात आम्ही कधीही पडलो नाही. आमच्या बाण्यानुसार (चतुरस्त्र, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष) आम्ही आमची भूमिका कायम मांडत असतो. त्यामुळेच घुमान संमेलनाच्या वेळी प्रकाशक परिषदेने संमेलन विरोधी भूमिका घेतलेली असताना ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी आम्ही येणार’ अशी धाडसी भूमिका आम्ही सर्वप्रथम घेतली. नंतर विरोध करणार्‍यांना आणि इतरांना आमच्या भूमिकेची सत्यता पटली.
ताज्या वादात आम्हाला हेच म्हणायचे आहे. संमेलनाध्यक्षांनी आपल्या पदाचे पावित्र्य राखावे, इतकेच आम्हाला सांगायचे आहे. संमेलनाचे हीत लक्षात घेऊन आणि या प्रकरणी आम्हाला जेवढे सांगायचे होते ते यापूर्वीच्या लेखातून स्पष्ट करून झाले आहे. आमच्या बाजूने हा विषय संपवण्याची सामुहिक शहानपणाची भूमिका आम्ही घेत आहोत. ‘संमेलनावर बहिष्कार’ किंवा ‘सबनीसांना संमेलनाकडे फिरकू देणार नाही’, ‘त्यांचे हातपाय तोडा, त्यांना मारा’ असे म्हणणे हे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टिने चुकीचे आहे. सबनीस विरोधी काही लोक आम्ही त्यांचे वैरी असल्याप्रमाणे नवनव्या गोष्टी आणि त्यांची प्रकरणे आमच्याकडे पाठवत आहेत. साप्ताहिक, मासिक आणि पुस्तक प्रकाशनाच्या व्यापात व्यग्र असल्याने अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी तूर्तास तरी आमच्याकडे वेळ नाही. संमेलनाध्यक्ष या नात्याने यापुढे त्यांनी काही चुकीची विधाने केली तर नेहमीच्या शैलीत आम्ही त्यांचा समाचार घेऊच; मात्र या लेखामुळे ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्यात त्यांनी सबनीसांचे कारनामे आमच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या आणि आमच्या वेळेचा अपव्यय करू नये.
‘चपराक’ तर्फे या महिन्यात आठ-दहा दर्जेदार पुस्तके आपल्या भेटीस आणत आहोत. संमेलनाध्यक्ष या नात्याने सबनीसांनी यापुढे मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस यांच्यासाठी काही करता आले तर करावे, अन्य वादाचे विषय आणि इतरांना कमी लेखणे टाळावे इतकीच माफक अपेक्षा आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’, पुणे

7057292092