महाराष्ट्र साहित्य परिषद परिवर्तन आघाडीतर्फे मी स्थानिक कार्यवाह क्रमांक 6 (अतिथी निवास व्यवस्थापन, वास्तुदेखभाल) या पदासाठी निवडणुक लढवत आहे. काहीतरी विधायक, सकारात्मक कार्य करून साहित्य परिषद समाजाभिमुख करावी यासाठी आमच्या आघाडीचे प्रमुख प्रा. मिलिंद यांनी ही आघाडी स्थापन केली आहे. त्यात साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या लोकांचा समावेश आहे. प्रा. जोशी यांनी तब्बल एक वर्षापूर्वी (8 फेब्रुवारी 2015) माझ्या कार्याविषयी गोव्यातील अग्रगण्य असलेल्या दैनिक ‘गोमन्तक’ला एक लेख लिहिला होता. तो आपण अवश्य वाचावा. निवडणुकीचा विचारही डोक्यात नसताना आजच्या आघाडीप्रमुखाने केलेले कार्याचे मूल्यमापन मला सुखावून गेले.
पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. विद्येचे माहेरघर आहे. अशा शहरात येवून कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका जिद्दी तरूणाने केवळ आत्मविश्वासाच्या बळावर साप्ताहिक सुरू करणे, साहित्याला वाहिलेले मासिक सुरू करणे, दर्जेदार दिवाळी अंक काढणे आणि साहित्य क्षेत्रातील जाणकारांची वाहवा मिळविणे ही गोष्ट स्वप्नवत वाटावी अशीच आहे पण हे स्वप्न सत्यात उतरविले आहे ते घनश्याम पाटील नावाच्या मराठवाड्यातल्या एका हरहुन्नरी तरूणाने! साप्ताहिक 'चपराक', मासिक 'साहित्य चपराक' आणि दिवाळी अंक तसेच नवोदितांबरोबरच, नामवंतांच्या साहित्यकृतींना प्रकाशात आणणारे 'चपराक प्रकाशन' ही सुद्धा या तरूणाच्या सर्जनशीलतेला आलेली सुगंधी फुलेच आहेत. लाडक्या अपत्यांप्रमाणे या सर्वांचा सांभाळ घनश्याम पाटील मोठ्या प्रेमाने आणि कर्तव्यनिष्ठेने करीत आहेत.
त्यांना मी पहिल्यांदा भेटलो. त्यांचे पोरसवदा रूप पाहिले. त्यात कुठेही पोरकटपणाचा अंश नव्हता. त्यांच्या वागण्या, बोलण्यात एकप्रकारची प्रगल्भता होती. साहित्याविषयीची आस्था होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना अंगी आवश्यक असलेली निर्भीडता होती. प्रसंगी वाईटपणा विकत घेण्याची तयारीही होती. मुख्य म्हणजे स्वतःविषयीचा आत्मविश्वास होता. तो मला अतिशय भावला आणि मी त्यांचा स्नेहांकित झालो. त्यांची 'झिरो टू हिरो' ही जी वाटचाल सुरू आहे त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. आपल्या समोर एखादे झाड बहरावे आणि आपण ते पाहत रहावे तितक्याच मनस्वीपणे मी त्यांचे बहरणे पाहतो आहे. 'चपराक' आणि घनश्याम पाटील हे अद्वैत आहे. ते एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. 'चपराक' हा घनश्याम पाटील यांचा प्राण आहे आणि घनश्याम पाटील हा 'चपराक'चा आत्मा आहे. त्यांना असणारी साहित्याची जाण, स्वतःला अधिक समृद्ध करता यावे यासाठीची त्यांची धडपड, अखंड कार्यरत असण्याची त्यांची वृत्ती, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील माणसे जोडण्याचे त्यांच्याकडे असलेले कसब, प्रसंगी भीडभाड न ठेवता स्पष्ट भूमिका घेण्याची आणि त्याची किंमत मोजण्याची त्यांची तयारी आणि या सर्व गुणांच्या जोडीला असणारी त्यांची धडाडी यामुळे त्यांची दमदार पावले पडत गेली. त्यांच्यासह 'चपराक'चा परिघ त्यामुळे विस्तारत गेला. ग्रामीण भागातून आलेला हा मुलगा आणि त्याचं प्रकाशन हा सारस्वतांच्या कौतुकाचा विषय बनला.
एक काळ असा होता की साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू हा फक्त पुण्या-मुंबईपुरता मर्यादित होता. आता तो ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागाकडे सरकतो आहे. जगण्याचा तीव्र झालेला संघर्ष या भागातून येणारे नवे लेखक प्रभावीपणे मांडत आहेत. आजचा काळ लेखनासाठी अनुकूल आहे पण लेखकांसाठी मात्र प्रतिकूल आहे. याचे कारण वृत्तपत्रांंना नामवंत लेखक हवे आहेत. जी वाड्मयीन नियतकालिके कशीबशी चालू आहेत ते चौकटीतून बाहेर पडायला तयार नाहीत. वर्षातून एकदाच दिवाळी अंकाचे निमित्त असते त्या अंकाचे संपादकही वर्षानुवर्षे त्याच त्या लेखकांची आरती करताना दिसतात. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अप सारखी माध्यमे आहेत पण त्यावरील लेखनाला अजून प्रतिष्ठा मिळत नाही अशा परिस्थितीत नव्या लोकांच्या हुंकाराला आणि अभिव्यक्तीला सामावून घेणार्या एका सशक्त व्यासपीठाची आवश्यकता होती! ती 'चपराक'ने पूरी केली. प्रतिभेच्या अनेक नव्या कवडशांना उजेडात आणण्याचे काम 'चपराक'ने केले. 'चपराक'च्या लेखकांच्या मांदियाळीत अनेक नामवंत लेखकांचा समावेश आहे. परंपरा आणि नवता यांचा सुरेख समन्वय साधत 'चपराक'ची वाटचाल योग्य रीतिने सुरू आहे.
घनश्याम पाटील हे प्रतिमेत अडकलेले संपादक नाहीत. ते निर्भीड आहेत. त्यामुळे 'चपराक'ला कोणताही विषय वर्ज्य नसतो. खरंतर साहित्याने कोणतेही क्षेत्र आणि विषय वर्ज्य मानता कामा नये पण आज जो कप्पेबंदपणा सर्वत्र प्रत्ययाला येतो त्या पार्श्वभूमीवर 'चपराक'चे वेगळेपण उठून दिसते.
महाराष्ट्राला वेगळ्या वाटा चोखाळणार्या संपादकांची समृद्ध परंपरा आहे. 'वाङ्मयाच्या पाकात राजकारण तळून वाढेन' या ध्येयाने 'नवयुग' किंवा 'मराठा' चालविणारे आचार्य अत्रे असोत, केवळ जाई काजळाच्या जाहिरातीवर 'सोबत' चालविणारे ग. वा. बेहरे असोत, घनश्याम पाटील मला त्याच कुळातले वाटतात. जग काय म्हणतंय यापेक्षा आपल्याला काय वाटतंय याला प्राधान्य देत आपल्या वाटा आपणच शोधणारी जी माणसे आहेत त्या पंथातले घनश्याम पाटील आहेत.
पुण्यात राहून चुकलेल्या राजकारणी पुणेकर सारस्वतांना तेच धार्यावर धरू शकतात. साहित्य संस्थांमधील राजकारणाचा तेच पर्दाफाश करतात, पुरस्कार संस्कृतीतल्या विकृतीवर हल्लाबोल करतात, राजकारण्यांना धडकी भरेल अशापद्धतीने त्यांच्या कारवाईचा समाचार घेतात. या सार्यांमागे काहीतरी मिळवणे हा त्यांचा हेतू कधीच नसतो. लोकांना अपमानित किंवा बदनाम करण्याचाही प्रयत्न नसतो. त्यांच्या लेखनामागे असते ती दांभिकतेची चीड आणि समाजस्वास्थ्याची कळकळ. त्यामुळेच ते परखडपणे लिहितात आणि स्पष्टपणे लिहिणार्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करतात. एक तरुण मुलगा एखाद्या वडिलधार्याला शोभेल असे काम आज साहित्य क्षेत्रात करीत आहे. ही कौतुकाची बाब आहे.
तुच्छतावाद आणि प्रतिसादशून्यता या दोन रोगांनी आज साहित्यक्षेत्राला ग्रासले आहे. अंगावरती प्रेमाने थाप पडली तर जनावरंसुद्धा शहारून येतात पण माणसं मात्र मठ्ठासारखी असंवेदनशील झाली आहेत. अशा परिस्थितीत घनश्याम पाटील आणि त्याचा 'चपराक' परिवार साहित्य क्षेत्राला आलेले स्थितीस्थापकत्व दूर करून तो प्रवाह गतिमान करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत तेच त्यांचे वेगळेपणे आहे आणि सामर्थ्यही!
आज एकीकडे पुस्तके विकली जात नाहीत म्हणून रडणारे प्रकाशक आहेत. त्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी त्यांच्यातलाच पुस्तकांचा संसार करणारा घनश्याम पाटील यांच्यासारखा एक प्रकाशक एकाचवेळी बारा-बारा, पंधरा-पंधरा पुस्तकांचे प्रकाशन एकाच व्यासपीठावर करतो ही निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. साहित्य सोनियाची खाण अधिक समृद्ध व्हावी, सारस्वतांची अभिव्यक्तीची दिवाळी साजरी होत राहावी आणि सर्व प्रकारचे तिमीर नष्ट व्हावे यासाठी विचारांची दिवेलागण करणार्या साहित्योत्सवाची समाजाला नितांत गरज आहे. पाटील यांनी सुरू केलेल्या 'चपराक'च्या साहित्योत्सवामागेही हीच भावना आहे. अशा या वेगळेपण जपणार्या लेखक-प्रकाशकाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
- प्रा. मिलिंद जोशी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते
९८५०२७०८२३
No comments:
Post a Comment