Showing posts with label social system. Show all posts
Showing posts with label social system. Show all posts

Monday, November 21, 2022

समाजव्यवस्था बदलावी!

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी ललकारी लोकमान्य टिळकांनी दिली. त्यावर ‘सर्वांगीण समाजसुधारणा’ हे स्वप्न उराशी कवटाळून टिळकांशी वैचारिक वाद घालणार्‍या गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलं, ‘पूर्वी आपल्या देशाचे स्वराज्य होतेच ना? ते आपण का गमावले? त्याची कारणे शोधून ती दूर केल्याशिवाय आपल्याला स्वराज्य मिळवता येणार नाही आणि चुकून मिळालेच तर ते टिकवता येणार नाही. खर्‍या अर्थाने ‘स्वराज्य’ लाभावे असे वाटत असेल तर विद्यमान समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणे आवश्यक आहे...’

स्वातंत्र्यपूर्व काळातील या विचारमंथनाचा विचार करता आजही आपण ‘स्वराज्य’ निर्मितीत सपशेल अपयशी ठरलो आहोत, हे कोणीही अमान्य करणार नाही. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण उत्साहात साजरा केला. या निमित्ताने रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, विज्ञान-तंत्रज्ञान या आणि अशा सगळ्या क्षेत्रात आपण प्रगतीचे किती पर्वत सर केले हे सांगितले गेले; मात्र आजही आपल्यातले पशूत्व संपुष्टात आल्याचे दिसत नाही. आपल्यावर प्रेम करत सर्वस्व अर्पण करणार्‍या एखाद्या अभागी जिवाचे तुकडे करून ते घरातील फ्रिजमध्ये साठवण्यापर्यंतचे क्रौर्य माणसात आहे. अनैतिक संबंध, जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, आर्थिक देवाण-घेवाणीतून नात्यात निर्माण झालेले वैतुष्ट्य, असूया यामुळे माणूस माणसाच्या जिवावर उठतोय. भौतिक सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात निर्माण झालेल्या असताना आणि सर्वप्रकारची साधने उपलब्ध असताना आपण आपले तारतम्य का गमावतोय? आजही हुंडाबळी जातात, मुलगी नको म्हणून गर्भपात होतात, नवजात अर्भके कचराकुंडीत टाकली जातात, जाती-जातीत संघर्ष होतात, धर्माचे राजकारण केले जाते, या सगळ्यात महापुरूषांचीही वाटणी केली जाते. जो तो आपापल्या सोयीनुसार आचरण करतो आणि वर निर्लज्जपणे देशभक्तिचा आव आणतो. अशी विषमता आणि विसंगती जपत जीवनव्यवहार सुरू आहे. मग पुन्हा आपल्याकडे सुराज्य कसे येणार आणि आलेच तरी आगरकर म्हणतात त्याप्रमाणे ते कसे टिकणार?

आपल्या राष्ट्राला लाभलेली शौर्य आणि पराक्रमाची परंपरा खंडित झाली आहे की काय? असे चित्र सर्वत्र आहे. ‘मी आणि माझे’ या वृत्तीने कळस गाठल्याने आपण ‘समाज’ म्हणून काही विचार करतच नाही. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी हसत-हसत आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे हौतात्म्य प्राप्त परिस्थितीत दुर्दैवाने वांझोटे ठरत आहे. महापुरूषांच्या विचारधारांवरून, त्यांच्या कार्यकर्तृत्वावरूनही आपल्यात मतभेद निर्माण झाले आहेत. प्रत्येकजण कुणाच्या तरी प्रभावाखाली जगतो. समाजमाध्यमांमुळे या सगळ्यांना खतपाणी घातले जाते. इतिहासाचे ज्ञान नाही, वर्तमानाचे आकलन नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही. त्यामुळे आजची तरूणाई एका अराजकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्यांच्याकडे काही स्वयंप्रज्ञा आहे आणि आर्थिक सुबत्ता आहे ते तरूण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विदेशात जाऊन स्थिरावत आहेत. हे ज्याला जमत नाही त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. नोकरी, उद्योगासाठी भांडवल अशा जंजाळात अडकलेला तरूण इथल्या व्यवस्थेच्या, राजकारणाच्या कचाट्यात अडकतो आणि त्यातच भरडला जातो. या दुष्टचक्रातून सावरताना त्याला मोठी कसरत करावी लागते. एकीकडे अशा दिशाहीन तरूणाईचे प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे काही ध्येयवादी तरूणही आहेत. त्यांचे प्रमाण मात्र अत्यल्प दिसते. वर्षानुवर्षे प्रतिकूलतेत आणि टोकाच्या विवंचनेत जगणार्‍या या पिढीने आपल्या जगण्याचे इप्सित हेरले आहे. प्रशासनाबरोबरच विविध क्षेत्रात तळपणार्‍या अशा मोजक्या प्रज्ञावंतांनी परिस्थितीवर यशस्वी मात करून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे बघितल्यावर पुन्हा एकदा आशेच्या अंकुराची पालवी फुटते.

आकाशातून उत्तुुंग भरारी घेणार्‍या घारीचे सारे लक्ष आपल्या पिलाकडेच असते. त्याप्रमाणे नवनवीन क्षेत्रात यशाचे मानदंड निर्माण करताना आपण माणूस म्हणून अंगी असलेले मूलभूत चांगुलपण जपले पाहिजे. स्वतःतील अवगुण बाजूला सारून स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायाने समाजाच्या व्यापक उत्कर्षाची वेगळी वाट निर्माण केली पाहिजे. इतरांचे सुख-दुःख समजून घेतल्यास आपल्याही दुःखमुक्तिचा मार्ग मोकळा होईल. गरजेतून आलेल्या हतबलतेवर मात करण्याची कुवत आपल्यात निर्माण झाली तर चैतन्याचे नंदादीप प्रज्वलीत होतील.

‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ अशा संस्कृतीची शिकवण असलेल्या आपल्या देशाला संपन्न विचारधारेचा वारसा लाभला आहे. मंडन मिश्र आणि आद्य शंकराचार्य यांच्यापासून ते वैचारिक संपन्नता जपणार्‍या अनेक परस्सरभिन्न विचारधारेच्या तत्त्वज्ञ, प्रज्ञावंतापर्यंतची ही परंपरा आहे. ‘विचारकलहाला का भीता?’ असा प्रश्न उपस्थित करणार्‍या आगरकरांनीही म्हटले होते, ‘दुष्ट आचारांचे निर्मुलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणार्‍या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत.’ आज आपण मात्र अशा ‘विचारशलाका’ चेतवण्याऐवजी सातत्याने आपल्या वाचाळवीरतेचे प्रदर्शन घडवत आहोत. सामान्य माणसापासून ते उच्चस्तरीय अधिकार्‍यांपर्यंत आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांपासून ते साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत अनेकांनी वेळोवेळी त्यांचा हिणकसपणा दाखवून दिला आहे. कोणतीही घटना घडली, कुणी काही मत व्यक्त केले की, त्यावर तातडीने व्यक्त होणे हे आपले जीवितकर्तव्य आहे, असा ग्रह करून घेतलेल्या प्रतिक्रियावाद्यांनी समाज आणि पर्यावरण गढूळ केले आहे. अभ्यासाची, चिंतनाची वाणवा असताना केवळ लोकशाहीने दिलेला अधिकार सोयीस्कररित्या वापरायचा आणि आपण कसे संवेदनशील, विचारवंत आहोत हे दाखवायचे या अट्टहासामुळे आपले अपरिमित नुकसान होत आहे. हे थोपवण्यासाठी आपली सारासारविवेकबुद्धी जागृत असणे गरजेचे आहे. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेले ‘स्वराज्य’ आणि आगरकरांना हवे असलेले ‘सुराज्य’ याचा आजच्या परिप्रेक्ष्यात विचार करून व्यवस्था बदलाचे आव्हान स्वीकारायला हवे.
(दैनिक 'प्रभात' - 22 नोव्हेंबर 2022)

- घनश्याम पाटील
7057292092