Showing posts with label roy kinikar. Show all posts
Showing posts with label roy kinikar. Show all posts

Friday, February 10, 2023

कुणास कळले...कुणास न कळले

जगातले उत्तुंग मनोरे शोधायचे झाले तर त्यात महाराष्ट्राची माती सर्वाधिक सुपिक आहे. इथं अशा काही महान हस्ती होऊन गेल्यात की त्यांची सर कोणत्याही मनोर्‍याला येणार नाही. लोककवी मनमोहन आणि रॉय किणीकर ही जोडीही आपल्या प्रतिभेच्या तेजाने झळाळत होती. सहसा एक कवी दुसर्‍या कवीला मोकळेपणाने दाद देत नाही असे म्हणतात; मात्र मनमोहनासारख्या सिद्धहस्त लेखकानं लिहून ठेवलंय, 
‘‘कधीकाळी दगड स्वस्त होतील 
आणि शिल्पकारही पुष्कळ होतील 
त्यावेळी, पुतळा माझा घडवणार्‍यांनो, 
रॉय किणीकर आधी खोदा, 
असेच मी ‘त्या’ जगातून ओरडून सांगेन...’’ 
मनमोहनांसारख्या कवीला किणीकरांचं खोदकाम करावंसं वाटतंय. कोण होते हे किणीकर? रमेश गोविंदांच्या भाषेत सांगायचं तर - 
तरंगणारा धोतर कुर्ता, शुभ्र धुक्याचा
इथे तिथे फिरताना हृदयी, भाव तुक्याचा
कुणास कळले... कुणास न कळले, फिकीर नाही
दरवळणारा धूप ठेवूनी, फकीर जाई...
शब्द, रंग, स्वर अशा कोणत्याही प्रतिभेचा स्फोट झाला की तिथं किणीकर आनंदानं बागडायला लागत. ‘धरती’, ‘दीपावली’, ‘आरती’ अशा दिवाळी अंकांचे सिद्धहस्त संपादक, उमर खय्याम यांच्या तोडीस तोड रूबायांमुळे मराठीची पताका डौलात फडकत ठेवणारे कवी, प्रयोगशील चित्रपट दिग्दर्शक, नाटककार, एक मनस्वी आणि तितकंच बेभरोशाचं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर आहे. 
रॉयसाहेबांनी त्या काळात दीनानाथ दलालांच्या सहकार्याने 'शिरडीचे श्री साईबाबा' हा उत्कृष्ट साहित्यमूल्य असलेला चित्रपट काढला. त्याची खूप चर्चा झाली, पुरस्कार मिळाले पण आर्थिकदृष्ट्या तो फसला. त्यावर ते विनोदाने म्हणायचे, ‘‘साईबाबांनी अनेकांना भरभरून दिले, आमच्या खांद्यावर मात्र त्यांनी झोळी दिली.’’
त्यांनी दत्तगुरूवरील चित्रपट केला त्याचा एक धमाल किस्सा आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पुण्यात सुरू होतं. प्रसंग असा होता की, दत्त महाराजांचा लवाजमा जातोय. सोबत शिष्य आहेत आणि त्यांच्या मागे कुत्री येत आहे. या शूटमध्ये कुत्री एक तर मागे रहायची किंवा पुढे निघून जायची. एका पाठोपाठ एक बिड्या शिलगावत ते ही गंमत पाहत होते. शेवटी ते जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, ‘‘दहा मिनिटाच्या शूटसाठी तुम्ही दोन तास घालवले.’’ 
‘‘कुत्री सोबत येत नाहीत त्याला आम्ही काय करणार?’’ संबंधितांनी विचारलं. ते म्हणाले, ‘‘दहा मिनिटाचा ब्रेक घ्या. मी दोन मिनिटात हे शूट पूर्ण करतो!’’
सगळे त्यांच्या या बोलण्यावर वैतागले होते. आम्ही इतका प्रयत्न करतोय तरी जमत नाही हे काय करणार? अशा त्यामागे भावना होत्या. किणीकरांनी स्पॉटबॉयला बोलावलं आणि पाव किलो मटन आणायला सांगितलं. सदाशिवपेठी स्पॉटबॉयनं नाकं मुरडत ते आणलं आणि रॉयसाहेबांकडं दिलं. ते म्हणाले, ‘‘हे मला नको, टाक त्या दत्त महाराजांच्या झोळीत...’’ ही मात्रा लागू पडली! त्या वासानं कुत्री मागोमाग येऊ लागली. खरंच दोन मिनिटात चित्रीकरण झालं. चित्रपटात दत्त महाराजांचा ताफा, सोबत भक्त, मागोमाग येणारी कुत्री हा प्रसंग पाहून भक्त अक्षरशः नतमस्तक व्हायचे. 
कोल्हापूरातल्या एका दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम त्यांच्याकडं आलं होतं. त्यांनी त्या संपादकांकडून प्रवासासाठी म्हणून एक हजार रूपये उचल घेतले. मुंबई गाठली. तिथं जिवाची मुंबई केली. पैसे संपल्यावर ते परत गेले. जयवंत दळवी, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे अशा सर्वांचे लेख, कथा त्यांनी संपादकाला दिल्या. सगळ्या नामवंतांच्या सहभागानं तो अंक दणदणीत झाला. अंक आल्यावर ते प्रत्येकाला भेेटले. अंक दिला आणि त्यांचं साहित्य दमदार झाल्याचं सांगितलं. पु.ल. म्हणाले, ‘‘किणीकर, ही कथा माझ्या स्टाईलची आहे पण मी कधी लिहिलीय आठवत नाही.’’ 
किणीकर म्हणाले, ‘‘आठवत नाही ना? मग मी तुम्हाला फुकटची प्रसिद्धी दिली. हे मीच लिहिलंय आणि त्याचं मानधनही मीच घेतलंय. ते तुम्ही विसरा!’’ आणि ते चालते झाले. त्या पंचवीस कथा-लेखांपैकी प्रत्येकाला त्यांनी हे सांगितलं. अंक जोरात खपतोय म्हणून संपादक खूश होता. हा प्रकार कुणालाही कळला नाही. पुढे एक-दोघांनी त्यांच्याकडं आमच्या नावानं लेखन केलं म्हणून तक्रार केली पण एकाही वाचकाला असं वाटलं नाही. इतक्या समकालिन लेखकांचं साहित्य त्यांच्या त्यांच्या स्टाईलनं लिहिणं म्हणजे केवढी मोठी प्रतिभा! हे काम येरागबाळ्याचं नक्कीच नाही.
असाच प्रसंग त्यांच्या ‘धरती’च्या दिवाळी अंकाचा आहे. त्या वर्षी त्यांनी भारतातल्या विविध प्रांतातील कवींच्या कविता अनुवादित करून दिवाळी अंकात प्रकाशित केल्या. सगळ्या वृत्तपत्रांनी त्याची यथायोग्य दखल घेत कौतुक केलं की ‘यंदाच्या ‘धरती’च्या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रांतातील कवींच्या अनुवादित केलेल्या दर्जेदार कविता!’ म्हणजे बंगालचे कुणी मुखर्जी, काश्मीरचे महंमद! त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी लिहिलं ‘‘अरे, ज्यांच्या नावाने कविता छापल्यात त्या नावाचे कुणी कवी त्या भाषेत आहेत की नाही हे तर बघा. ही सगळी टोपणनावं आहेत आणि या सगळ्या कविता माझ्याच आहेत.’’
असाच प्रकार त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाबाबत. त्यात पहिल्याच पानावर एक रूबाई आहे. 
पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते
आणि उत्तररात्र म्हणजे,
जागर... यात्रेचे पुन्हा प्रस्तान!
त्याखाली नाव आहे ‘रवीन्द्रनाथ ठाकूर!’ मात्र गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्याच वाटाव्यात इतक्या क्षमतेच्या या ओळी किणीकरांच्याच आहेत हे नंतर कळले.
किणीकरांबाबत पु. ल. देशपांडे लिहितात, ‘‘उत्तररात्र वाचताना वाटलं ह्या अवलियाकडे आपण अधिक आस्थेनं आणि आदरानं पाहायला हवं होतं. त्यांनी स्वतः आदराची किंवा मानसन्मानाची चुकूनही अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणून काय आपण त्यांना ओळखायला नको होते? आपण ओळखीच्या माणसाबाबतही किती अनोळखी राहतो पहा!’’
मराठी दिवाळी अंकाच्या परंपरेत, साहित्यात, संपादनात, चित्रपट-नाटकात गौरवशाली योगदान देणार्‍या रॉय किणीकर यांनी संपूर्ण आयुष्य दारिद्य्रात घालवलं. आपल्या दीड खोलीच्या विश्वात कमालीच्या उपेक्षेत जगत असतानाही त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केलं. ‘कुणास कळले, कुणास न कळले’ हे जरी खरे असले तरी या आणि अशा चरित्रनायकांनी दिलेलं योगदान न विसरणं हीच त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली असेल.
-घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी - दि. 11 जानेवारी 23
दैनिक 'पुण्य नगरी'

रॉयसाहेबांच्या रुबयांचा हा आविष्कार पहा -

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातिल तो म्हणतो
***
ऋण नक्षत्रांचे असतें आकाशाला
ऋण फळाफुलांचे असतें या धरतीला
ऋण फेडायाचें राहुन माझें गेलें
ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेलें
***
पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला कांही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझें होते
***
पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला कांही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझें होते
***
कोरून शिळेवर जन्ममृत्युची वार्ता
जा, ठेवा पणती त्या जागेवर आता
वाचील कोणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास याचे स्मरण
***
पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगायाचे सांगून झाले नाही 
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही
***
आभाळ झिरपते भरलेल्या माठात
अन निळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलीकडे माठ फुटे हा इकडे
हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे
***
गेले पैगंबर, येशु, बुद्धही गेले
श्रीकृष्ण, रामही गेले म्हणजे मेले
चुकणार नसे देवालाही मरण
वाचले कुणी का आभाळाचे पान
***
हे चित्र, शिल्प ही वीणा आणि मृदंग
येतात कोठुनी त्यातील भावतरंग
हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे
आहे हे संचित, देणे भगवंताचे
***
जळल्यावर उरते, एक शेवटी राख
ती फेक विडी, तोंडातली काडी टाक
जळण्यातच आहे, गंमत वेड्या मोठी
दिव्यत्व अमरता, मायावी फसवी खोटी
***
अश्रूंना नाही रूप नि कसला रंग
का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग
जाणारा जातो अनंत आहे काळ
तुटणार कधीतरी मृत्यूची ती नाळ