ही गोष्ट आहे इ. स. 1900 सालातली. हा काळ ऐन वंगभंग चळवळीचा! लाल, बाल, पाल या त्रिमुर्तींनी बंगालच्या फाळणीविरूद्ध रान उठवले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शिरोळ येथील दत्तात्रेय पटवर्धन हे कोलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये (होमियो) डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करत होते. तिथे असताना सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महर्षि दादाभाई नवरोजी यांची भाषणे त्यांच्या कानावर पडत. लोकमान्य टिळकांच्या झंजावाती लेखनाचा मनावर मोठा परिणाम होत होता. ‘देशाचा संसार आहे माझ्या शिरी । ऐसे थोडे तरी वाटू द्या हो’ ही सेनापती बापटांची हाक त्यांना राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी खुणावत होती.
दरम्यान, कोल्हापूर संस्थानच्या रोषाला बळी पडल्याने प्रा. अण्णासाहेब विजापूरकरांना कोल्हापूर सोडावे लागल्याने त्यांचे समर्थ विद्यालय सरकारने बंद पाडले. अत्यंत परिश्रमपूर्वक ते नव्याने तळेगावला सुरू झाले. तिथे डॉक्टर म्हणून दत्तोपंत पटवर्धन यांची निवड झाली. हे विद्यालय पुन्हा इंग्रजांच्या रोषाला बळी पडले आणि 1910 साली डॉ. गोपाळराव पळसुले या आपल्या सहकार्यासह दत्तोपंतांनी पुण्यात आपला दवाखाना सुरू केला. तेथे प्रसिद्ध वारकरी विष्णुबुवा जोग राहत. त्यांची निरूपणे ऐकत ऐकत दत्तोपंत अभंग म्हणायला लागले. स्वतः कीर्तने, निरूपणे करू लागले. स्वच्छ वाणी, उत्तम गोड आवाज, प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोकमान्य टिळक, पांगारकर, अण्णासाहेब पटवर्धन असे मान्यवर येऊ लागले.
1914 साली लोकमान्य टिळकांनी सांगितले, ‘‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर निःसंशय कीर्तनकार झालो असतो. वर्तमानपत्रे साक्षर लोकांसाठी असतात पण कीर्तनातील अभंग, गाणी, कथा लोकांच्या मनाला स्पर्श करतात. दत्तोपंतांनी आजवर लोकांच्या आरोग्याची सेवा केली. आता त्यांची मने तंदुरूस्त व्हावीत, त्यांच्यात राष्ट्रभक्तिचे स्फूल्लिंग चेतावे यासाठी कीर्तनाचे माध्यम जीवनध्येय म्हणून स्वीकारायला हवे.’’
या प्रोत्साहनानंतर पंतांनी दवाखान्याला रामराम ठोकला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जुलमी ब्रिटिश राज्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य शोधले. राष्ट्रीय आणि ऐतिहासिक नायकांबद्दल उत्तररंग सादर करत ‘राष्ट्रीय कीर्तना’ची परंपरा सुरू केली. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांत, रस्त्यावर धुमधडाक्यात कीर्तने करत त्यांनी ‘राष्ट्रीय कीर्तनकार’ म्हणून लौकिक मिळवला. सुखासीन चालू असलेला वैद्यकीय व्यवसाय बंद करून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभ्या महाराष्ट्राला खडबडून जागे केले. स्नेह्यासोबत्यांनी, गणगोतांनी त्यांना नावे ठेवली पण कशालाही न जुमानता त्यांनी या माध्यमातून स्वतःला राष्ट्रीय कार्यात वाहून घेतले. त्यांच्या कीर्तनाला कमीत कमी आठ-दहा हजार श्रोते असत. त्यावेळी गावात नाटक असेल तर बुवांच्या कीर्तनाने ते ओस पडे. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य आणि बहिष्कार ही त्यांच्या कीर्तनाची चुतःश्रुती असे. 1960 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला. टिळकांनी त्यांना सांगितले होते की, ‘‘हे राष्ट्रप्रबोधनाचे माध्यम आहे. त्यामुळे कीर्तन करण्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत.’’ बुवांनी हे वचन कायम पाळले. त्यांनी टिळकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. हाताने दळलेले, हाताने सडलेले धान्य, गाईचे दूध, ताक आणि तूप याशिवाय त्यांनी काही सेवन केले नाही. हे न मिळाल्यास त्यांनी उपवास पत्करले पण व्रतभंग केला नाही. त्यांनी शेवटपर्यंत हातमागावर विणलेली खादी वापरली. ‘नमस्कारप्रियो भानुः’ या शास्त्रवचनावर विश्वास ठेवून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी संकल्प केला की, आयुष्यात एक कोटी सूर्यनमस्कार घालायचे! हा ‘नमस्कारयज्ञ’ त्यांच्या मृत्युदिवसापर्यंत सुरू होता. आयुष्यभर त्यांनी 97 लाख सूर्यनमस्कार घातले. त्यांच्या निधनानंतर बेळगाव येथील ‘नमस्कार मंडळा’ने उर्वरित तीन लाख सूर्यनमस्कार घालून त्यांना आदरांजली अर्पण केली.
‘शीलवंत लोकच संस्कृतीचे रक्षण करू शकतात,’ असा त्यांचा सिद्धांत होता. भारतीयांची दिनचर्या कशी असावी, पूर्वी आयुरारोग्य व सुखसंपत्ती याचा लाभ घेणारे आर्य कसे वागत असत? यासंदर्भातले आचार्यधर्म लोकांनी तंतोतंत पाळावेत यासाठी त्यांनी ‘आर्यांची दिनचर्या’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री परत बिछान्यात पडेपर्यंत आहार, विहार, विधि, नित्यनेम कसे असावेत? माणसाने प्रतिदिनी कसे वागावे? याबाबत प्राचीन ऋषिमुनींनी कोणते नियम घालून दिले आहेत? मनुष्य आरोग्यसंपन्न व सुखी कसा होईल? याबाबत या पुस्तकात अभ्यासपूर्ण विवेचन आहे. बुवांचे सहकारी पुंडलिकजी कातगडे यांनी त्यांचे ‘राष्ट्रीय कीर्तनकार कै. डॉ. पटवर्धनबुवा विचारधारा आणि शिकवण’ हे चरित्रही लिहिले आहे. त्यांचे हे दुर्मीळ चरित्र आणि ‘आर्यांची दिनचर्या’ हे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक पुन्हा वाचकांच्या भेटीस आणावे यासाठी व्यापक, उदात्त हेतूने कळमनुरी येथील श्री. दिलीपराव कस्तुरे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या अथक आणि निःस्वार्थ भावाने ही पुस्तके नव्या स्वरूपात उपलब्ध झाली आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कराड येथे त्यांची भेट झाली. त्यावेळी ते बुवांना म्हणाले, ‘‘येथे कृष्णामाईचे घाटावर पूर्वी तुमची होणारी कीर्तने मी लहानपणापासून ऐकली आहेत. आता या वयातही तुमचे तसेच खडतर कार्य चालू आहे याचे नवल वाटते. तुम्हास काही आर्थिक मदतीची अपेक्षा असेल तर विचार करू!’’
यावर बुवा काहीच बोलले नाहीत. काही दिवसांनी एक सरकारी कर्मचारी आर्थिक मदतीसाठीचा अर्ज घेऊन त्यांच्याकडे आला. तो वाचून बुवा म्हणाले, ‘‘पोटाकरिता अशा रीतिने अर्ज करण्याची कल्पना मला अगदी असह्य होते. हा पटवर्धनबुवा अशी अर्ज करण्याची लाचारी करणार नाही हे वर कळवा आणि अर्ज परत न्या...’’
बुवांचा हा बाणा आज पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावणार्या कीर्तनकारांनी लक्षात घ्यायला हवा.
एका रामनवमीनिमित्त पुण्यात कीर्तनास आले असताना ते नेहमीप्रमाणे टिळकांच्या भेटीस गेले. लोकमान्यांनी त्यांना विचारलं, ‘‘रामाच्या आख्यानात तुम्ही लोकांना काय सांगता?’’
बुवा म्हणाले, ‘‘भगवान प्रभू रामचंद्रांच्या अवताराचे महात्म्य वर्णून, त्यांचे देवकोटीतील श्रेष्ठत्व मी सांगत असतो.’’
त्यावर टिळक म्हणाले, ‘‘बुवा, तुम्ही अगदी चुकता आहात. असे खोटे तत्त्वज्ञान सांगू नका. राम हा प्रथम देव नव्हता. साधासुधा देहधारी मनुष्य होता. केवळ परिश्रमाने, त्यागाने, विहित कर्तव्यबुद्धिने म्हणजे कर्म साधून, प्रयत्नांती परमेश्वर या न्यायाने तो शेवटी मनुष्याचा म्हणजे नराचा नारायण कसा झाला ते सांगत जा! नाही तर लोक काय, तो देव म्हणून दहा वेळा त्याच्या फक्त पाया पडतील व बोध न घेता आणि काही त्याग व कर्म न करता केवळ दैवावर हवाला ठेवून पंगू व निष्क्रिय होतील.’’
तेव्हापासून लोकमान्यांचे हे वळण बुवांनी यथाशक्ती गिरवले.
ज्यांनी देशाला विचारांच्या माध्यमातून राष्ट्रभक्तिचे बाळकडू पाजले त्यात दत्तोपंत पटवर्धनबुवांचे योगदान मोठे आहे. आजच्या वारकरी संप्रदायासह सामान्य माणसानेही म्हणूनच त्यांच्या विचारांचे, त्यागाचे स्मरण ठेवायला हवे.
- घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी - दैनिक 'पुण्य नगरी',
शनिवार दि. 25 फेब्रुवारी 23