मराठीतले पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? असा प्रश्न केला की आपण डोळे झाकून सांगतो, बाळशास्त्री जांभेकर!
...मग मराठीतले पहिले मासिक कोणी सुरू केले?
पहिले सार्वजनिक वाचनालय कोणी सुरू केले?
पहिले असिस्टंट प्रोफेसर कोण?
पहिले मराठी शिक्षणाधिकारी कोण?
या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर म्हणजे, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर!
त्यांनी 6 जानेवारी 1832 साली ‘दर्पण’ हे मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र सुरू केले. हा दिवस आपण ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करतो. तरीही दुर्दैवाने आजच्या पिढीला या महान समाजसुधारकाची हवी तशी माहिती नाही. आज महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात जी प्रगती सुरू आहे त्याचा श्रीगणेशा बाळशास्त्रींनी त्या काळात केला.
मराठी वृत्तपत्राची गंगोत्री बाळशास्त्रींनी सुरू केली. त्याचा निम्मा भाग इंग्रजी असायचा. त्यामुळे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करणारेही ते पहिले भारतीय संपादक ठरले. दर्पण वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांनी लोकशिक्षणाच्या हेतूने ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले. एल्फिस्टन स्कूलला त्यांची पहिले सहायक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. दादाभाई नौरोजी, भारतीय पुराणेतिहास संशोधक डॉ. भाऊ दाजी लाड, विख्यात गणिती प्रो. केरो लक्ष्मण छत्रे, मुंबईचे न्यायनिष्ठुर प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट रा. ब. नाना मोरोजी त्रिलोकेकर, योराबजी शापूरजी बंगाली, के. शि. भवाळकर असे त्याकाळातील वलयांकित मान्यवर हेही त्यांचे विद्यार्थी. वयाच्या सतराव्या वर्षी तेरा भाषा अवगत असलेले बाळशास्त्री हे ‘आधुनिक पश्चिम भारताचे जनक होते,’ असे गौरवोद्गार मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर ऑस्किन पेरी यांनी काढले होते.
मराठी पत्रकारितेबरोबरच मराठी मासिक, अध्यापनशास्त्र, इतिहास संशोधन, सामाजिक सुधारणा, विविध पुस्तकांचे लेखन, गद्य निबंध, सामाजिक-शैक्षणिक चळवळी अशा सर्वांचे प्रेरक प्रणेते म्हणून कोकणातील पोंभुर्ले गावच्या बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आधी स्त्री शिक्षणाचा विचार मांडणारे आणि आपल्या लेखनातून सातत्याने त्याचा ध्यास घेणारे बाळशास्त्री समाजसुधारणेचे दीपस्तंभ ठरावेत.
लोकमान्य टिळक यांच्याबाबत एक आख्यायिका आहे. गोपाळ गणेश आचवळ यांनी 1 ऑगस्ट 1947 च्या ‘केसरी’त ती लिहिली आहे. गंगाधर टिळक यांनी त्यांच्या मुलाचे नाव प्रथम ‘केशव’ असे ठेवले होते. त्याचवेळी बाळशास्त्री जांभेकर यांची विद्वत्ता देशभर पसरली होती. बाळशास्त्री 1842 मध्ये दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्र विभागाचे शाळा तपासणीस होते. त्यामुळे गंगाधरपंत टिळक यांना बाळशास्त्रींबद्दल अतोनात आदर व अभिमान होता. आपला पुत्रही त्यांच्यासारखाच विद्वान व लोकप्रिय व्हावा या भावनेने त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘बाळ’ असे ठेवले. बाळ गंगाधर टिळक हे पुढे ‘लोकमान्य’ झाले, मात्र बाळशास्त्री जांभेकरांची त्यावेळची लोकप्रियता आणि जनभावना यातून दिसून येते.
बाळाशास्त्री जांभेकर यांचे चरित्रकार, ज्येष्ठ संपादक रवींद्र बेडकिहाळ लिहितात, ‘‘मराठी वृत्तपत्रसृष्टीची परंपरा सांगताना टिळक, आगरकरांचा उल्लेख होतो. निबंधमाला संदर्भात विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख होतो. स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणांच्या संदर्भात फुले, आगरकर, आंबेडकर, महर्षि कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना अगर सांगताना हे उल्लेख योग्यच आहेत. तथापि पत्रकारिता, निबंध, लोकशिक्षण, बालवाङमय, सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण इत्यादी बाबतीत या सर्वांच्याही आधी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या विषयांना स्पर्श करून वाचा फोडली होती. त्यामुळे या सर्वांची परंपरा सांगताना बाळशास्त्रींचे नाव न घेणे अन्यायकारक आहे. मराठी पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक म्हणूनच केवळ त्यांचा उल्लेख नाही तर वरील सर्व क्षेत्रातील प्रेरणांचा स्त्रोत बाळशास्त्री जांभेकरांपासूनचाच आहे, असे इतिहास सांगतो. याकडे आजच्या साहित्यिक, पत्रकारांनी निरीक्षण वृत्तीने पाहिले पाहिजे.’’
बेडकिहाळ फक्त बाळशास्त्रींचे चरित्र लिहूनच थांबले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या बाळशास्त्रींच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले आहे. दरवर्षी तेथे राज्यातील पत्रकारांचे व साहित्यिकांचे मेळावे होत असतात.
हाडाचे शिक्षक असलेल्या बाळशास्त्रींनी त्या काळात शिक्षकांना जो बहुमोल उपदेश केला तो आजच्या काळातही अंतर्मुख करणारा आहे. ते लिहितात, ‘‘पूर्वकाळाचे महाप्रबुद्ध ऋषिजन हे अरण्यवास पत्करून विद्यासंपन्न होत आणि विद्यादान करीत. त्यांनी आपल्या देशात अपूर्व ज्ञानभांडारे भरून ठेवली आहेत. ती इतकी तुडुंब आणि ओतप्रोत आहेत की ती नुसती चाळायला सुद्धा संबंध जन्म पुरायचा नाही. मग विद्याभ्यास अन विद्यादान करण्याची आपणास का लाज वाटावी? विद्या शिकून तुम्हाला कारकून किंवा अंमलदार व्हावेसे वाटते. शिक्षकाचा व्यवसाय लोक हलका मानतात पण तसे नाही. प्रजा मूढ आहे, म्हणून सरकारी नोकरांचे महत्त्व. विद्याप्रसार जसजसा होत जाईल तसतसे सरकारी नोकरांचे ढोंगसोंग अन थाटमाट नाहीसा होईल. प्रजा शहाणी आणि समजूतदार झाली म्हणजे कारकूनीला कोण विचारतो? म्हणून विद्याभिलाषी व्हा. विद्याभ्यास करा. लोकांना सुशिक्षण द्या. सरकार व प्रजा, धनी व चाकर, आईबाप व पुत्र, ह्यामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्वदेशाभिमान आणि स्वधर्माभिमान लोकांच्या मनात निर्माण उपजावा असा प्रयत्न करा. हेच आपले ऋषिवंशजाचे कर्तव्य.’’
आपल्या फक्त मेंदुचीच नाही तर दृष्टीचीही कवाडे सताड उघडी ठेवणार्या बाळशास्त्रींचा अफाट व्यासंग पाहून त्यांना ‘बाल बृहस्पती’ म्हटले जायचे. भारतीय शिलालेख, ताम्रपट याचे संशोधन करणारे ते त्या काळातले एकमेव भारतीय होते. रॉयल एशियाटिक पत्रिकेच्या आठ अंकात त्यांनी यावरचे शोधनिबंध लिहिले. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील भाषांतर समितीचे कार्यमंत्री म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली होती. 1840 मध्ये त्यावेळच्या अत्यंत बहुमानाच्या ‘जस्टिस ऑफ दि पीस’ या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. अशा प्रकारे नेमण्यात आलेल्या व्यक्तिला हायकोर्टात ‘ग्रॅन्ड ज्युरी’मध्ये बसण्याचा अधिकार होता.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या प्रेरणांचे अग्रदूत असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन!
- घनश्याम पाटील
7057292092

(पूर्वप्रसिद्धी - दै. 'पुण्य नगरी' 1 जानेवारी 22)