नोव्हेंबर 1956 ला अलियारपूर येथे रेल्वेचा एक भीषण अपघात झाला. त्यात 144 प्रवासी मरण पावले. या विभागाचे मंत्री असल्याने, ‘‘रेल्वे अपघाताची कसून चौकशी होईल, अपराध्यांना कडक शासन होईल, मृतांच्या कुटुंबियांना सर्व ती मदत करण्यात येईल,’’ असं काही ते सांगत बसले नाहीत. रेल्वेमंत्री या नात्याने ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे मानून रेल्वेमंत्र्यांनी आपला निस्पृहपणा दाखवला आणि रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बरं, राजीनामा दिल्यानंतर ते मंत्र्यासाठी असलेल्या गाडीने नाही तर सरकारी बसने घरी आले. घरी आल्यावर आपल्या पत्नीला सौ. ललितादेवी यांना सांगितलं की, ‘‘आपल्या घरी जेवणात रोज दोन भाज्या असतात. यापुढे ही अशी ‘श्रीमंती’ आपल्याला परवडणारी नाही. आजपासून रोज एकच भाजी करत जा...’’
आजच्या काळात साध्या ग्रामपंचायत सदस्याचाही तोरा पाहता केंद्रीय मंत्र्याचं हे वागणं अविश्वसनीय वाटेल. हाच प्रामाणिक नेता आपल्या देशाचा पंतप्रधान झाला आणि त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली. लालबहादूर शास्त्री नावाच्या या शांतीदूताचं आपल्या देशाच्या विकासात मोलाचं योगदान आहे.
शास्त्रीजींचं चरित्र म्हणजे सद्वर्तनाची श्वेतपत्रिकाच होती. या विधानाच्या अनुशंगानं एक प्रसंग सांगावासा वाटतो. शास्त्रीजी त्यावेळी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाचे चिटणीस होते. एके रात्री त्यांचा एक मित्र अचानक घरी आला आणि त्यानं सांगितलं की, ‘‘माझ्या बायकोची तब्येत बिघडलीय. तिला इस्पितळात नेण्यासाठी पन्नास रूपये उसने हवेत.’’
शास्त्रीजी एकदम शांत झाले. त्यांनी सांगितलं, ‘‘मला दरमहा पन्नास रूपये मानधन मिळतं. त्यात माझं घर चालतं. बचत अशी काही होतच नाही. त्यामुळं जवळ पैसे तर नाहीत. आणखी काय करता येतं ते आपण बघूया!’’
त्यांचा हा संवाद ऐकत असलेल्या ललितादेवी घरात गेल्या आणि त्यांनी आतून पन्नास रूपये आणून शास्त्रीजींच्या हातावर टेकवले. ते पैसे घेऊन मित्र आनंदाने निघून गेला. तो गेल्यावर शास्त्रीजींनी विचारलं, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’
ललितादेवींनी सांगितलं, ‘‘तुम्ही मला घरखर्चाला दरमहा तुमच्या मानधनाचे पन्नास रूपये देता. चाळीस रूपयात मी घरखर्च भागवते. अडीनडीसाठी म्हणून दहा रूपये दरमहा बचत करते. अशा अडचणीच्या वेळी कुणाला त्यातून मदत झाली तर आनंदच आहे की...’’
शास्त्रीजींनी आपल्या पत्नीच्या या वृत्तीचं कौतुक केलं. त्या आत जाताच त्यांनी कागद घेतला आणि काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाला पत्र लिहिलं, ‘‘माझं घर दरमहा चाळीस रूपयात चालतं! त्यामुळं पुढील महिन्यापासून माझ्या मानधनाचे दहा रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूंना द्यावेत...’’
एकदा एका सदस्यानं लोकसभेत आक्षेप घेतला की, शास्त्रीजींच्या बंगल्याचं आणि त्यांच्या इमारतीच्या आवाराचं एका महिन्याचं बिल पाचशे रूपये आहे. ते ऐकताच शास्त्रीजी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या सरकारी बंगल्याचं सर्वच्या सर्व बिल आपल्या खाजगी पैशांतून भरलं!
एक प्रसंग तर खूपच विदारक आहे. त्यांची दीड वर्षाची सुंदर कन्या विषमज्वराने आजारी पडली. तिच्या आईला, सौ. ललितादेवींना अत्यंत काबाडकष्ट करूनही तिच्या उपचारासाठी पैसे जमवता आले नाहीत. या सगळ्यात उपचाराअभावी मंजुचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ राष्ट्रासाठी आपल्या कुटुंबाकडे, मुलांबाळांकडे सुद्धा लक्ष देता आलं नाही म्हणून शास्त्रीजी अस्वस्थ झाले होते.
1920 साली त्यांनी वाराणशी येथे महात्मा गांधी यांचे व्याख्यान ऐकून प्रभावीत झाल्याने देशासाठी आत्मसमर्पणाचा निर्धार केला. त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. कारावास सहन केला. नंतर अलाहाबाद काँग्रेसचे चिटणीस, अध्यक्ष व नंतर उत्तर प्रदेश काँग्रेसचे चिटणीस झाले. 1937 ला विधानसभेवर निवडून आले. नंतर मुख्यमंत्री, गृह व वाहतूक मंत्री, 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन ते राज्यसभेवर गेले आणि रेल्वेमंत्री झाले. 1957 ला त्यांची लोकसभेवर दुसर्यांदा निवड झाली आणि ते दळणवळण व वाहतूक मंत्री झाले. 1961 ला गृहमंत्री असताना आसाम-बंगाल भाषिक दंगल, पंजाब सुभा चळवळ, केरळ काँग्रेस-प्रजा समाजवादी पक्षातील तंटे थांबविण्यात त्यांना यश आले. 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडालेला असताना ते देशाचे पंतप्रधान झाले. पाकिस्तानच्या आक्रमणास त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. ताश्कंद-भारत सलोख्यासाठी ते रवाना झाले. 11 जानेवारी 1966 ला त्यांचे देहावसान झाले. या त्यागी, निःस्पृह, सेवाभावी, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रभक्त नेत्यास मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्यात आला.
‘‘अधिकारी किंवा पुढारी बुद्धिमान, हुशार किंवा चलाख असेल पण तो लाचखोर, भ्रष्ट असेल तर तो निरूपयोगी आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला बढती किंवा जबाबदारीची कामे देता कामा नये. सार्वजनिक कामात त्याचा स्वीकार करणे अतिशय घातक आहे. त्याच्या वाईट कृत्याला संरक्षण देणे हा राष्ट्रद्रोह आहे,’’ असे ते आग्रही प्रतिपादन करत आणि न डगमगता त्याप्रमाणेच वागत.
पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत ते म्हणाले होते, ‘‘पाकबरोबर शांततेने नांदायची आमची मनापासूनच इच्छा आहे पण त्यासाठी आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचा बळी आम्ही देणार नाही. आम्हाला कोणाचा इंचभर प्रदेश नको पण आमचाही इंचभर प्रदेश कोणी घेतलेला आम्ही बिलकूल खपवून घेणार नाही.’’
कितीही बिकट प्रसंग असला तरी ते विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आणि त्यांचं म्हणणंही ऐकून घेत. त्यांच्या विचारांचा ते आदर करत. समोरच्याचे ऐकून घेऊन त्यावर सखोल विचार करणे हा आजच्या राजकारणात हरवत चाललेला गुण त्यांच्याजवळ होता. विरोधकांनाही यथायोग्य मान देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. त्यामुळे विरोधकांनाही त्यांच्याविषयी आदर वाटायचा.
देशातील अन्नधान्याचा तुटवडा पाहून त्यांनी संध्याकाळचे जेवण वर्ज्य केले होते. स्वतःच्या घरी भात खाणे बंद केले होते. देशातील गरिबी पाहून अस्वस्थ झाल्याने त्यांनी आठवड्यातून एकदा उपवास सुरू केला आणि देशबांधवांनाही त्याचे आवाहन केले. त्यांचा नैतिक अधिकार पाहून या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून सोमवारला ‘शास्त्रीजींचा वार’ म्हणण्याची प्रथा पडली.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून लोककल्याणासाठी तन, मन, धन अर्पण करणारे लालबहादूर शास्त्री यांचे जीवन आणि चरित्र सर्वांसाठीच स्फूर्तिदायी आहे. त्यांच्या स्मृतिस अभिवादन.
- घनश्याम पाटील
7057292092
प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, दि. 29 जानेवारी 2023
खूप छान आणि शासत्रीजींबद्दल आदरभाव
ReplyDelete््वा््वाढवणारा लेख आहे. सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी मार्गदर्शक नि अनुकरणीय विचार आहेत.
विनम्र अभिवादन
Deleteवा सुंदर लेख लिहिला आहे.
ReplyDeleteखूपच सुंदर लेख. मनापासून आवडला व आपण अश्या आदर्श नेत्यांच्या देशात जन्मलो ह्याचा अभिमान वाटला.
ReplyDeleteशास्त्रीजींच्या त्यागाचा परिचय वाचल्यानंतर असे वाटते की,आजची बहुतांश राजकीय मंडळी असो किंवा समाजातील अन्य क्षेत्रांतील मंडळी असो,आपला स्वार्थ,आर्थिक फायदा अधिकाधिक कसा होईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.शास्त्रींना विनम्र अभिवादन.
ReplyDeleteखूप छान लेख. शास्त्रींजी विषयी आदरभाव आणखी वाढला
ReplyDeleteमाहितीपूर्ण व आदरभाव जागृत करणारे लेखन
ReplyDeleteलालबहाद्दूर शास्त्री यांना शतशः नमन
ReplyDeleteअशी देवतुल्य, आदर्श व्यक्तिमत्वे आता या भूमित निर्माण होत नाहीत. पाप, भ्रष्टाचार, व्यभिचार आणि संहार यांचा नंगानाच घालणारे आणि त्यांचे पुरस्कर्ते यांचीच आता दुनिया आहे !
ReplyDeleteही खरंच थोर माणसं. निस्पृह, निःसंग, निस्वार्थी. यांनी आयुष्यभर मूल्य जपली. आज मूल्य हा शब्दच जिथे संपून गेलाय तिथे त्याचा अर्थ कोण सांगणार.? फार सुंदर शब्दात मांडलाय लेख. 👍🙏
ReplyDeleteप्रामाणिक निस्वार्थी आणि अतिशय साधे सरळ व्यक्तिमत्व शास्त्री जी 🙏🙏🙏
ReplyDeleteआज देशाला अश्या नेत्यांची खरी गरज आहे. लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जीवन चरित्रावर प्रत्येक वर्गाला एक पाठ असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले परिणाम होऊन एक सुसंस्कृत पिढी पुढे येऊ शकेल. विनम्र अभिवादन
ReplyDelete