Monday, June 14, 2021

... तर सैतानाशीही हातमिळवणी करू!


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यांनी राजगडावर रोपवेची तयारी सुरू केल्यानंतर काही तथाकथित शिवप्रेमींकडून त्यांना विरोध होत आहे. इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल तर गडावर जाणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे. रायगडावर रोपवे केला तर तिथं जाणार्‍या-येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली. तिथल्या पर्यटनालाही चालना मिळाली. ज्यांना रायगडावर जाण्याची इच्छा आहे पण शारीरिक दुर्बलतेमुळं जे तिथं जाऊ शकत नाहीत त्यांची सोय रोपवेमुळं झाली. एखादा माणूस तरूणपणी कायम रायगडला जायचा पण आता वयाच्या सत्तरीत अनेक आजारांनी ग्रासलं असताना त्याला जमत नाही किंवा एखाद्या गृहिणीला वाटतंय की रायगडाची माती कपाळाला लावावी पण तब्येतीमुळं जमत नाही त्यांची सोय रोपवेमुळं झाली. पर्यटकांच्या येण्या-जाण्यानं गडांचं आणि किल्ल्यांचं सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करणार्‍यांनी लक्षात घ्यावं की हे सौंदर्य आपण कधीच नष्ट केलंय.

गड आणि किल्ले यांच्याकडं दुर्लक्ष करणं गेली दीडशे-दोनशे वर्षे सुरूच आहे. सातार्‍याच्या समोर अजिंक्यतारा आहे. तिथं किती लोक जातात? फिरायला म्हणून जाणारेही अर्ध्यातूनच परत येतात. तो किल्ला आहे तसाच पडून आहे. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात प्रिय असणारा किल्ला. शत्रूला सुद्धा महाराज रायगडावर आहेत की राजगडावर याबाबत कायम संभ्रम निर्माण व्हायचा. त्या संभ्रमावस्थेतल्या शत्रूला फसवण्यासाठी महाराजांनी या दोन गडांचा वापर केला. शिवाजी महाराज आग्र्याला जायला बाहेर पडले ते राजगडावरून आणि महाराज जेव्हा आग्र्याहून परत आले तेही थेट राजगडावर. जिजाऊसाहेबांचा मुक्काम अनेक वर्षे राजगडावर होता. महाराज शाहिस्तेखानावर छापा मारायला बाहेर पडले तेही राजगडावरून. ते राजगडावरून खेडशिवापूरला आले, तिथून पुण्यात आले आणि मग सिंहगडावर जाऊन राहिले. सुरत लूट करून आल्यावरही महाराज राजगडावर आले. शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी, त्यांच्या पराक्रमाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य इतिहासाशी निगडित असणार्‍या अनेक घटना राजगडावर घडलेल्या आहेत.

मग इथं सध्या नेमकं कोण जातं? इथं सामान्य पर्यटक जात नाहीत. राजगडचा टे्रक हा अवघड आहे. सामान्य इतिहासप्रेमी माणसाला जर राजगड बघता आला आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांचं वैभव बघता आलं आणि त्यासाठी जर रोप वे तयार केला गेला तर कुणाला काही त्रास व्हायचं कारण नाही. राजगडाचं सौंदर्य कमी होईल, इथलं सौंदर्य ढासळेल असं काही होत नाही. रोप वे साठी लागणारी जागा ही अतिशय मर्यादित असते. रायगडावर रोप वे केला गेला तेव्हाही त्याला असाच विरोध केला गेला. रोपवेमुळं रायगड बघणार्‍यांची संख्या वाढली हे वास्तव कोण नाकारणार?

6 जून 1674 ला रायगड जसा होता तसाच आज तो त्यावेळची साधनसामग्री वापरत नव्यानं उभारण्याची गरज आहे. राजगडही पुन्हा तसाच उभारणं शक्य आहे. राजगडावर महाराजांचे महाल कुठं होते, राजसदर कुठं होती, नगारखाना कुठं होता या सगळ्याच्या जागा माहीत आहेत. त्याच्यावर काम करून हे गड पूर्ववत बांधावेत. सामान्य इतिहासप्रेमी शोधतो की या किल्ल्यावर आहे काय? वैराडगड, कमळगड, पालीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, वासोटा, लोहगड, पांडवगड, चंदनगड, वंदनगड, अजिंक्यतारा, तिकोना, सोनगीरचा किल्ला अशा किल्ल्यावर काय शिल्लक आहे? शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती म्हणून शिवप्रेमी तिथंली माती कपाळाला लावतात आणि साडेतीनशे वर्षानंतरही एखाद्या श्रद्धाळू भाविकांप्रमाणे या इतिहासापासून प्रेरणा घेऊन घरी येतात.

रोपवे झाल्यानंतरही रायगडाची अवस्था बर्‍यापैकी चांगली आहे. राजगड टे्रकरसाठी आहे. मग तिथं जाण्यासाठी काही चांगल्या सुविधा झाल्या तर आपण उगीच आरडाओरडा का करतो? जे अवघड आहेत अशा प्रत्येक किल्ल्यावर रोप वे झाले तर बिघडलं कुठं? बरं, रोप वे केला तरी टे्रकरला कोणी पायी जाण्यासाठी अडवत नाही. आज आपल्या गडांची, किल्ल्यांची काय अवस्था आहे? पन्हाळ्यावर आख्खा तालुका वसवलाय. न्यायकोठीत पोलीस स्टेशन चालू केलंय. जिथून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज न्यायनिवाडे करायचे तिथं खाबूगिरी करणारे पोलीस अधिकारी बसून असतात. प्रतापगडावर लोकांनी घरं बांधली आणि तो कमर्शिअल करून टाकला. सिंहगडावर टिळकांपासून ते लता मंगेशकरांपर्यंत अनेकांनी जागा घेतल्या आणि खाजगी बांधकाम केलं. विशाळगडावर गेलात तर मन विषन्न होतं. एका कोपर्‍यात बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांची समाधी आहे. शिवाजी महाराजांना या गडावर पोहोचवण्यासाठी तीनशे बांदल धारातीर्थी पडले. त्यांचं नेतृत्व करणारे बाजीप्रभू आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या धाकट्या भावाच्या नेतृत्वाखाली लढणारे फुलाजी यांनी आदिलशहाचे, जिद्दीचे घाव धाडसानं आपल्या उरावर घेतले. त्यांच्या समाध्या इथं कोपर्‍यात आहेत आणि मस्जिद गडाच्या मध्यभागी आहे. ‘पतीव्रत्तेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’ हा प्रकार इथं घडत असूनही कुणाला इथलं सौंदर्य नष्ट झालंय असं वाटत नाही.

ज्यांनी इतिहास घडवला, इतिहास निर्माण केला, इतिहासाची चाकं बदलली, इतिहासाचा प्रवाह बदलला त्यांच्या समाध्या कोपर्‍यात असाव्यात? आणि ज्यांचा इतिहासाशी काही संबध नाही, महाराजांच्या विशाळगडाशी काही संबंध नाही त्यांच्या मस्जिदी बांधून तिथं कोंबड्या मारल्या जातात. हे गलिच्छ वातावरण बघून कोणताही शिवप्रेमी विमनस्क झाल्याशिवाय राहणार नाही. अशा सगळ्या विषयावर काम न करता शासन काही चांगलं करत असेल तर इथं हे करू नका, तिथं ते करू नका म्हणत हिरीरिनं पुढं येणारे ढोंगी आहेत.

शिवकाळात रायगडावर राजाराम महाराजांचं लग्न झालं होतं. अनेक मावळ्यांची, सैनिकांची, स्वराज्यातील अनेक महत्त्वाच्या लोकांची लग्नं गडावर झाल्याचे उल्लेख आढळतात. एखाद्याला जर वाटलं की अशा गडाला साक्षी ठेवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना, त्या भगव्याला साक्षी ठेवून मला लग्न करायचंय तर त्याला कशाला अडवताय? निदान पत्नीशी कसं प्रामाणिक वागावं याचं तरी भान त्याला येईल. पत्नीला जाहीरपणानं ‘सखीराज्ञी’ म्हणणारा राजा सतराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेला हा संस्कार या जोडप्यांवर नाही का होणार? किल्ल्यांवर रिसॉर्ट करू नका, हॉलिडेज होम करू नका पण इथलं पावित्र्य जपत लग्न लावायला काय हरकत आहे? इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्या वास्तू जपाव्या लागतात. युरोपातल्या अशा अनेक वास्तू त्या देशांनी प्राणपणानं जपल्यात. नेपोलियनच्या आठवणी फ्रान्सनं जपल्यात आणि ड्युक ऑफ वेलिंग्टनच्या आठवणी इंग्लंडनं जपल्यात.

रायगडावरची मोडकी बाजारपेठ, भग्न अवस्थेतील महाराजांचा राजवाडा आणि राणी वसाहत, वरती छप्पर नसलेला आणि अर्धवट भिंती असलेला महाराजांचा दरबार... हे सौंदर्याचं नाही तर पराक्रमाचं प्रतीक आहे. त्यामुळं महाराजांचा इतिहास जपण्याचं काम पर्यटन विभागाला करावं लागेल. त्यासाठी रोप वे सारख्या सुविधा गरजेच्या आहेत. शिवचरित्राचा कोणताही विषय निघाला की तो वादग्रस्त करायचा हा प्रकार लोकांनी आता थांबवला पाहिजे. तात्यासाहेब शिरवाडकरांची कविता आहे, ‘अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!’ ज्यांनी हा इतिहास घडवला त्यांची काही इच्छा नव्हती की त्यांचा स्तंभ बांधा आणि वात पेटवा. त्यांना भविष्यात आपल्या कर्तृत्वाचे अवशेष ठेवायचे नव्हते. त्यासाठी ते लढले नाहीत. एक उदात्त स्वप्न उराशी घेऊन महाराज आणि त्यांचे मावळे लढले. तो इतिहास चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जातील त्यांच्या सोबत आपण उभं रहायला हवं. एखादा सैतान जरी किल्ल्यांच्या रक्षणासाठी पुढं आला तरी आम्ही त्या संदर्भापुरती त्याच्याशी हातमिळवणी करू.

शिवराज्याभिषेकामुळं रायगड, शिवजन्मामुळं शिवनेरी, अफजलखानाचा कोथळा काढला म्हणून प्रतापगड आपल्या स्मरणात असतात पण राजगडांसारख्या किल्ल्यावरही आपण जायला हवं. शिवचरित्र पुढं नेणारे चार मराठी तरूण याच मातीतून आणि याच प्रेरणेतून उभे राहतील. त्यामुळं तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व प्रकारचे शर्थीचे प्रयत्न करायला हवेत. मग हे प्रयत्न करणारे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, भिडे गुरूजी असोत किंवा आणखी कुणी. त्यांच्या पाठिशी आपण समर्थपणे उभं रहायला हवं.
- घनश्याम पाटील

7057292092

दै. पुण्य नगरी,
मंगळवार, 15 जून 2021

6 comments:

  1. फारच सुंदर आणि सकारात्मक विचार करायला लावणारा लेख! विरोधाला विरोध काहीच उपयोगाचा नाही. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपतींचे विचार आचार सामान्य लोकांपर्यंत पोचवायचे असतील तर माणसे प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोचली पाहिजेत! लेख नेहेमी प्रमाणेच आवडला!

    ReplyDelete
  2. रोपवेविषयी सोडून बाकी पन्हाळगड, विशाळगड, प्रतापगड, सिंहगड याबद्दलच्या मुद्द्यांवर पूर्ण सहमत आहे. ज्यांना इतकीच राजगडावर जायची हौस आहे, त्यांच्यासाठी डोल्यांची सोय करू शकतो. गड चढायला अवघड आहे हीच त्याची विशेषता आहे. आता एखाद्याला एव्हरेस्ट, कांचनगंगावरील गार हवेचा झुळका अनुभवायचा असेल तर तिथेही रोपवे बांधायचा का?

    ReplyDelete
    Replies
    1. राजगड आणि रायगड यांच्यात प्रमुख फरक काय आहे हे समजून घेतले असते तर आपण हा लेखन प्रपंच केला नसतात पद्मावती माचीवर रोप वे वेळात तर ज्यांच्यासाठी हा रोपवे बांधताय ते बाले किल्ला व इतर ठिकाणी कसे जाणार?

      आणि हो एव्हरेस्ट ला पण रोपवे बांधा हो तेवढीच तिथे जाऊन दारू पिण्याचे सुख घेता येईल तेही फुकटचा बर्फ घालून

      Delete
  3. अगदी सांगोपांग विचार करून लिहिलेला उत्कृष्ट लेख!

    ReplyDelete
  4. सकारात्मक विचारांची गरज आहे, ती आपण छान पटवून दिली, हल्ली फक्त विरोधासाठी विरोध करतात काही विघ्नसंतोषी माणसं... मस्त लेख

    ReplyDelete