Wednesday, April 7, 2021

राजकारणातल्या संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या आवरा

 



- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

महाराष्ट्राने आजवर कधीही झुंडशाहीला पाठिंबा दिलेला नाही. रॅन्डच्या काळातही ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं विचारणार्‍या लोकमान्य टिळकांची परंपरा महाराष्ट्राला आहे. एखादा माणूस माझ्या मनाविरूद्ध लिहितो म्हणून त्याच्यावर आक्रमण करायचं ही महाराष्ट्राची परंपरा नाही.

फ्रेंच तत्त्वज्ञ व्हाल्टेअरने फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू आणि विलासी उमरावांवर कडाडून हल्लाबोल केला. दोन हजारहून अधिक पुस्तके लिहिणारा व्हाल्टेअर म्हणतो, ‘‘एखाद्या माणसाचे आणि माझे विचार एकमेकांशी जुळत नाहीत, तो माझ्या विरूद्ध बोलतोय, ते मला आवडत नाही पण तरीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न कोणी केला तर मी तसे प्रयत्न करणार्‍यांच्या विरूद्ध जाईन! कारण माझ्याविरूद्ध बोलणार्‍यालाही बोलण्याचा मुलभूत हक्क आणि अधिकार आहे. त्याचं बोलणं ऐकून घेण्याची क्षमता निर्माण होणं गरजेचं आहे.’’

‘शंभर उंदरापेक्षा एका सिंहाचं राज्य केव्हाही श्रेष्ठ’ असं म्हटल्यामुळं व्हाल्टेअरला दोनदा तुरूंगात डांबलं होतं आणि फ्रान्समधून हद्दपार सुद्धा करण्यात आलं होतं. त्याच्या विचारामुळं जागृती झाली आणि लोकांनी तिथल्या अन्याय आणि जुलूमाच्या विरूद्ध बंड पुकारलं. याच विचारवंताच्या म्हणण्याप्रमाणे समोरच्या माणसाचं ऐकून घेण्याची क्षमता जर आपल्यात नसेल तर ही लोकशाही समृद्ध होण्याची लक्षणं नाहीत. प्रत्येकानं आपले काही आयडॉल्स ठरवलेले आहेत. त्या मूर्तींना किंवा त्यांच्या आयडॉल्सबद्दल बोलल्यानंतर काही समुदायांना असा काही राग येतोय की ते समुदाय कुठलाही विधिनिवेष न ठेवता अशा पद्धतीनं लेखन करणार्‍याविरूद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा आक्रमकांना एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला रोखलं नाही तर महाराष्ट्राचं पुढचं स्वरूप फारसं चांगलं नसेल.

आजची पत्रकारितेता कशी आहे?, पत्रकारितेचं स्वरूप काय?, पत्रकारितेत कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत?, कोणत्या वाईट गोष्टी आहेत? याबाबतची चर्चा परत कधीतरी करूच! प्रश्न एवढाच आहे की एखाद्या व्यक्तिविरूद्ध, एखाद्या गटाविरूद्ध, एखाद्या पक्षाविरूद्ध लिहिल्यानंतर लिहिणार्‍यालाच आम्ही पकडू, त्याला बडवू, त्याच्याकडे बघून घेऊ, मारू, त्याला धमक्या देऊ अशा प्रवृत्ती वाढता कामा नयेत. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो हे वाक्य काय फक्त आमच्यासारख्यांच्या श्रद्धांजली सभेतच वापरणार का? याचं प्रशिक्षण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी देणं गरजेचं आहे.

एखाद्या व्यक्तिचं लेखन आवडलं नाही तर त्याच्याशी वैचारिक वाद आणि प्रतिवाद करा! कारण वैचारिक वाद आणि प्रतिवाद करण्याची आमची क्षमता नाही म्हणून आम्ही तुमच्याशी मारामारीच करू असं तुम्हाला वाटत असेल तर या देशातल्या निवडणुका रद्द करून टाका. मग होऊन जाऊ द्या मारामार्‍या! प्रत्येक पक्षानं बाऊंसर गोळा करावेत, पैलवान, ब्लॅक बेल्टवाले कराटेपटू गोळा करावेत. ज्याच्याकडं जास्त शक्तिमान लोक असतील त्यांना सत्ता देऊन टाका. सभा नकोत, पत्रकार परिषदा नकोत, राजकीय आंदोलनं नकोत, चर्चा तर नकोच नको! असलं काहीच नको. लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांना हरताळ फासणार्‍या या प्रवृत्ती महाराष्ट्रात जर काम करत असतील तर त्यांना थांबवण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे.

हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. महाराजांचे सहिष्णुतेचे संस्कार अनेक वर्षे महाराष्ट्रावर झालेत. महाराष्ट्राला संत परंपरा लाभलीय. सहिष्णुता म्हणजे काय हे संतांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून लोकांना दाखवून दिलंय. असा महाराष्ट्र असताना आम्ही या दोन्ही परंपरा विसरणार असू आणि एखाद्यानं आमच्याविरूद्ध, आमच्या नेत्याविरूद्ध लिहिलं म्हणून त्याच्या मागं लागणार असू तर ते वाईट आहे. विचार मांडणार्‍यांना धमक्या देणं हा प्रकार तुम्ही करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि इथल्या संतांच्या विचारांचा विसर तुम्हाला पडलाय आणि त्यांचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही.
 
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विरूद्ध ‘केसरी’ आणि ‘मराठा’मध्ये लेखन येत होतं. एकदा शाहू महाराज जेवायला बसले असताना लोकमान्यांच्या मृत्युची बातमी आली. त्यावेळी महाराजांनी समोरचं ताट बाजूला सारलं. एक चांगली व्यक्ती गेली म्हणून त्यांनी जेवण बंद केलं. महाराष्ट्राला अशी एक सशक्त परंपरा आहे. माधव गडकरी, गोविंद तळवलकर, आचार्य अत्रे अशा अनेकांनी यशवंतराव चव्हाणांना वेळोवेळी फैलावर घेतलं. यशवंतरावांनी तर त्या त्या लेखक आणि संपादकांचं वेळोवेळी कौतुकच केलेलं आहे. शरद पवार यांच्याकडूनही विरोधात लिहिणार्‍या संपादकांवर हल्ले झाले नाहीत. आपल्याविरूद्ध लिहिणार्‍या व्यक्तिंच्या मताचा आदर करणं, त्याला सन्मानानं वागवणं, विरोधी विचारधारेचं स्वागत करताना त्याच्या आत्मसन्मानाला धक्का लागू न देणं हे सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचं लक्षण असतं. असं व्यापक दर्शन आपण महाराष्ट्राला घडवणार आहोत की नाही?

ज्यांना व्यापक हिंदुत्व स्वीकारायचंय त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत तर असहिष्णुता बसतच नाही. सहिष्णु वृत्तीनं विचारांचा विरोध विचारांनी न करता अशा पद्धतीनं लेखन करणार्‍यांना तुम्ही बोलणार असाल तर भविष्यात कोणी लिहिणारच नाही, आपले विचार चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे मांडणारच नाही. भविष्यात लिहिणारे हात तुम्ही असं वागून कलम करणार असाल तर उद्याच्या महाराष्ट्रातले चार चांगले लेखक संपवण्याचा अक्षम्य अपराध तुमच्याकडून घडतोय.
 
सभागृहात बोलणार्‍यांना विशेष संरक्षण असतं. सभागृहाच्या बाहेर असं संरक्षण नसतं. सभागृहाच्या बाहेर सत्य बोलून लोकशाही बळकट करण्याचं काम जर कोणी करत असेल तर आमच्यासारखे लोक करतात. आम्हाला संरक्षण देणं सोडा तुम्ही किमान सभ्यताही पाळत नाही. ‘‘मी माझ्या मताशी आणि विचारांशी ठाम आहे, मी माझी मतं आणि विचार बदलणार नाही’’ असं सांगणार्‍या सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यायला भाग पाडलं गेलं. विचारवंत म्हणून जी वेळ सॉक्रेटिसवर आली तीच वेळ प्रत्येक पिढीत त्याच्या वारसांवर यावी असं आवर्जून म्हणण्याची गरज नाही. महाराष्ट्राला अशाप्रकारची झुंडशाही लाजीरवाणी आहे. ‘काचेच्या कपाटातील सिंह’ म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आचार्य अत्र्यांनी लेख लिहिल्यावर त्यांच्यावर पुण्यातील एका कॉलेजच्या सभेत हल्ला झाला होता. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी ‘मला मारणारे मेले, मी जिवंत आहे’ अशा आशयाचा लेख लिहिला होता. अत्र्यांना त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि वृत्तपत्रांनी पाठिंबा दिला होता. हा महाराष्ट्र अशा झुंडशाहीला सातत्यानं विरोध करत आलाय याची किती उदाहरणं द्यायची?

अलीकडं हे झुंडशाहीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्याची कारणं काय आहेत याचं मूल्यमापन त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी करावं आणि बोलणार्‍यांना नावं ठेवण्यापेक्षा, त्याला ट्रोल करण्यापेक्षा, त्याला धमक्या देण्यापेक्षा आपल्याबद्दल असं का बोललं जातंय याचं आत्मचिंतन करावं. त्या त्या पक्षाची राजकीय अधिवेशन होत असती, वार्षिक सभा होत असत्या, चर्चासत्रं होत असती, बौद्धिकं होत असती तर त्यांना व्यक्त व्हायला संधी मिळाली असती. कोणत्याही पक्षाकडून कार्यकर्त्यांना व्यक्त व्हायची संधी मिळत नसल्यानं अशा पद्धतीनं बेजाबदार वागून आपण आपला पुरूषार्थ गाजवतोय, आपल्या निष्ठा सिद्ध करतोय असं त्यांना वाटतं.

जो माझ्या विचारांच्या विरोधी बोलेल, जो माझ्या विचारांना विरोध करेल त्याच्याशी कुस्तीच खेळायली, त्याला मारायचं, ठोकायचं ही प्रवृत्ती जर वाढत गेली तर ती गोष्ट लोकशाहीला जसी शोभा देणारी नाही तशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेलाही शोभणारी नाही. आपण जेव्हा म्हणतो की हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे तेव्हा एका सुसंस्कृत महाराष्ट्राचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर असतं. अशा महाराष्ट्रात लेखन केलं आणि वैचारिक विरोध केला म्हणून त्याला विचारांनी उत्तर न देता त्या व्यक्तिला धमक्या देणं, त्याचं वैयक्तिक आयुष्य डिस्टर्ब करणं असे प्रकार होत असतील तर असे प्रकार करणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई व्हायला हवी. त्यांच्या विरूद्ध गुन्हेही दाखल व्हायला हवेत. अशा पद्धतीनं लेखन करण्याचं सामर्थ्य भविष्यात कोणी दाखवलं नाही तर ही एकतर्फा हुकूमशाहीकडं होणारी वाटचाल ठरू शकते. प्रत्येक पिढीत सर्वांना पुरून उरणारा आचार्य अत्रे जन्माला यावा अशी अपेक्षा ठेवण्याचं काहीही कारण नाही. सर्वसामान्य माणसाचा आवाज जेव्हा जेव्हा दाबण्याचा प्रयत्न झालाय तेव्हा तेव्हा त्या त्या समाजसमूहात विपरित घटना घडलेल्या आहेत. सामान्य माणसाचा आवाज कोणत्याही संघटित टोळीनं बंद करू देत त्या टोळीचा विनाश हा ठरलेला आहे. अशा टोळ्यांच्या प्रमुखांनी स्वतःच्या टोळ्या सांभाळताना लोकशाही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पुढं जाईल याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जर तुम्ही भारतीय संविधानावर विश्वास ठेऊन लोकशाही मार्गानं राजकीय पक्ष चालवत असाल तर तुम्हाला तुमच्यावरची टीका स्वीकारता आली पाहिजे आणि त्या टिकेला वैचारिक उत्तरही देता आलं पाहिजे. मात्र हे न करता लिहिणाराच मूर्ख आहे, तो विकला गेलेला आहे, त्याच्याकडं बघून घेतो, त्याला हिसका दाखवतो ही आणि याहून कठोर भाषा महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगली नाही इतकंच.
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

19 comments:

  1. एकदम बरोबर पाटील सर!👌👍💐💐💐

    ReplyDelete
  2. सहिष्णूता संपतेय हे खरं. यातून हुकूमशाही अस्तित्वात आली नाही म्हणजे मिळवली.
    घनश्यामजी, आपलं चौफेर वाचन, समतोल चिंतन आणि प्रभावी मांडणी मला भुरळ घालते.
    यातूनच उद्याची सहिष्णूता बळकट होणार आहे.
    अभिनंदन.!

    ReplyDelete
  3. पाटील साहेब जबरदस्त

    ReplyDelete
  4. विवेकाचे भान देणारा लेख

    ReplyDelete
  5. तुम्हाला धमकी देऊन त्यांना त्यांच्या नेत्याविषयी निष्ठा दाखवायची असते

    ReplyDelete
  6. जबरदस्त उत्तर दिलय.. मी काल पासून वाट पाहतच हाेताे.

    ReplyDelete
  7. लेखणीला उत्तर लेखणीनेच द्यावे एव्हढे तरी शहाणपण ह्या लेखातून आले तरी खूप झाले. अतिशय सडेतोड चपराक लगावलीत सर. अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  8. लोकशाही टिकविण्यासाठी सर तुम्ही दिलेले आपल्या देशातील व इतर देशातील संदर्भ उपयुक्त आहेत. महाराष्ट्रात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली परंपरा लेखकांना, पत्रकारांना, संपादकांना आदराने वागवण्याची प्रथा अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. हल्लीच्या राजकीय नेत्यांनी मा. यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिक भूमीकेचा अभ्यास करून त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे वाटते!

    ReplyDelete
  9. अगदी योग्य भाषेत कान उपटलेत धमक्यांची भाषा करणाऱ्यांचे. वैचारिक लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली, तर त्या नेत्याची मर्जी संपादन करण्यासाठी शेपट्या हलवणारी कार्यकर्ते मंडळीच असे अविचारी कृत्य करायला पुढे असतात. मला खात्री होतीच, तुमचा या विषयावर लेख नक्की येणार. कारण तुम्ही परवाच एका आग्या मोहोळावर दगड भिरकावला होता. तो नेम अचूक लागलेला दिसतोय! असो... तुम्ही स्पष्टवक्ते आहात, परखड विचारसरणी आणि ती योग्य शब्दांत मांडण्याची धमक बाळगणारे आहात. त्यामध्ये कोणत्याही दबावाने अथवा धमक्यांमुळे तुमच्या सडेतोडपणात बदल होणार नाही, ही खात्री आहेच.

    ReplyDelete
  10. अगदी सडेतोड लेख!

    ReplyDelete
  11. पण हे असं आहे ना की गाढवापुढे वाचली गीता.......
    या लोकांमध्ये सुधारणा होईल याची सुतराम शक्यता नाही.

    ReplyDelete
  12. अभ्यासपूर्ण आणि परखड

    ReplyDelete
  13. झुंडशाही कधीही हिताव नसते. आज आपण नाही बोललो तर भविष्यात त्याची जबर किंमत मोजावी लागेल. खुप छान व अभ्यासपूर्ण लेख आवडला.

    ReplyDelete
  14. छान झालाय.ज्यांना मारामारीची खाज आहे त्यांनी मार खाण्याच्या तयारीने मैदानात या. सोशल मीडियावरून आपली ताकद दाखवू नका.

    ReplyDelete
  15. घनश्याम पाटील सरांचा हा अग्रलेख मी माझ्या यूट्यूब चैनल वरून वाचून दाखवला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मनसेच्या काही लोकांनी कॉल करून धमकी देण्याचा प्रयत्न केला अशा लोकांच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही. माझा हा व्हिडीओ आपण नक्की बघा लिंक शेअर करत आहे.

    https://youtu.be/ZkSLd9jZ54o

    ReplyDelete