ही गोष्ट आहे दोन तगड्या माणसांची!
एक प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी होता; तर दुसरा अतिशय शून्यातून राजकारणात आपलं नाव गोंदवणारा!
त्याचं झालं असं की, ‘शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतचि होता’ असं सांगणारे लोककवी मनमोहन नातू आजारी पडले. वयानुसार त्यांनी अंथरूण धरलं तरी त्यांची उमेद, त्यांचा स्वाभिमान हा मात्र तसाच होता. ती बातमी तेव्हाच्या एका आघाडीच्या वृत्तपत्रात आली. त्याकाळी वृत्तपत्रात काय छापून यायचं याकडं राजकारण्यांचं बारकाईनं लक्ष असायचं. माहिती, मनोरंजन आणि ज्ञान समाजाला एकाचवेळी देणारी वृत्तपत्रं असल्यानं राजकारण्यांवर त्यांचा अंकुश असायचा.
तर ही बातमी महाराष्ट्राच्या तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी वाचली. त्यांचं मन भरून आलं. डोळे पाझरू लागले. आपल्या आवडत्या कवीचं आपल्याला विस्मरण झालं म्हणून त्यांना उचंबळून आलं. त्यांनी हातातली सर्व कामं बाजूला सारली. मुंबईहून गाड्यांचा ताफा निघाला तो थेट पुण्याकडं. मनमोहनांच्या घरासमोर अर्थमंत्र्यांची लाल दिव्याची गाडी थांबली.
सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अर्थमंत्र्यांच्या साहित्यप्रेमाचं कौतुकही वाटलं. मंत्रीमहोदय मनमोहनांजवळ गेले. त्यांना त्यावेळी धड बोलता येत नव्हतं की उठून बसता येत नव्हतं.
अर्थमंत्र्यांनी त्यांची अडचण ओळखली आणि सांगितलं, ‘‘तुम्ही उठू नकात. बोलूही नकात. मी फक्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला आलोय.’’
अर्थमंत्री म्हणाले, ‘‘माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता आकाशवाणीवरून ऐकायचो. त्या अनेकांना म्हणून दाखवायचो. मी कोर्टात नोकरी केली. राजकारणात आलो. आता अर्थमंत्री आहे. तुमच्या कवितेचा संस्कार माझ्यात रूजलाय. मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. आज वृत्तपत्रात तुमच्या तब्येतीविषयी वाचले आणि तुम्हाला भेटायला आलोय. माझ्या आवडत्या कवीराजाला मला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तुम्हाला काय देऊ ते सांगा....’’
त्यावर सगळे शांत झाले. त्यांचा नम्रपणा पाहून भारावूनही गेले. काहींच्या पोटात गोळा आला की हे आता काय मागणार? कदाचित सरकारी कोट्यातून घर मागतील, मुलासाठी नोकरी मागतील, गाडी मागतील किंवा त्यांच्या नावे काही सरकारी कार्यक्रम, उपक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतील....
सगळ्यांचं लक्ष मनमोहनांकडं होतं.
अफाट प्रतिभेचा हा अवलिया अर्थमंत्र्यांकडं पाहत होता. त्याला शब्द फुटत नव्हते. मग त्यांनी खुणेनं सांगितलं की मला कागद-पेन द्या...! ते दिलं गेलं. त्यावर मनमोहन नातू या अफाट प्रतिभेच्या बेफाट माणसानं चार ओळी लिहिल्या. सगळ्यांना वाटलं, त्यांना जे हवंय ते त्यांनी लिखित स्वरूपात मागितलंय. काय लिहिलं असावं त्यावर? सगळेच विचारात पडले.
थरथरत्या हातानं लिहिलेलं ते अक्षर कुणालाही कळत नव्हतं. आजचे आघाडीचे लेखक असलेले डॉ. न. म. जोशी हा तरूण त्यावेळी तिथं होता. त्यांना मनमोहनांचं अक्षर लागायचं. तो कागद अर्थातच त्यांच्याकडं दिला गेला. त्यावर लिहिलं होतं,
मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचं दान नको;
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने!
खाटेवर असले म्हणून काय झाले? ते तर साहित्यातले राजेच होते. त्यांना आणखी कोण काय देणार?
या वयातही इतकी निस्पृहता आणि स्वाभिमान हा आजच्या काळात चेष्टेचा विषय ठरावा. या अर्थमंत्र्यांनी पुढे बरीच मजल मारली. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. देशाचे गृहमंत्री झाले. कोर्टातला शिपाई ते देशाचे गृहमंत्री असा प्रवास असलेले सोलापूरचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतची ही सत्य घटना. मनमोहनांना जाऊन आज कितीतरी वर्षे झाली. मात्र सुशीलकुमारच काय तर कोणीही त्यांना उपेक्षेशिवाय काहीच देऊ शकले नाही. युगानुयुगाची अवहेलना वाट्याला आलेला हा कवी अनेकांच्या हृदयात मात्र आजही बेगुमानपणे राज्य करतोय. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हे वाचा -
राजकीय पुरूषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायू-बाबरपेक्षा
गालिब हृदय वेधित राही!
काळाच्या ओघात कितीतरी हुमायू-बाबर येतील-जातील... समाजाच्या अंतःकरणात मात्र गालिबच ठाण मांडून बसलेला असेल.
असे ‘गालिब’ आज किती आहेत? त्यांच्यातला ‘स्वाभिमान’ जिवंत आहे का? मग त्यांना ‘पुरस्कार वापसी’च्या कुबड्या का बरे घ्याव्या लागतात?
लोकमान्य टिळकांच्या बाबत एक किस्सा सांगितला जातो. त्यावेळी ते मंडालेच्या तुरूंगात होते. इकडं त्यांच्या मुलानं एका परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर त्यांनी लोकमान्यांना पत्र लिहिलं. त्यात लिहिलं, ‘‘माझं हे शिक्षण पूर्ण झालंय. आता पुढं काय करू?’’
त्यावर उलटटपाली टिळक लिहितात, ‘‘पुढं काय करायचं हे तुच ठरव! पण जे काही करशील ते सर्वोत्तम कर! भलेही तू चप्पल विकण्याचा व्यवसाय कर... पण लोकांनी म्हटलं पाहिजे, चप्पल घ्यायची तर टिळकांच्या मुलाकडूनच!’’
गुणवत्तेचा, दर्जाचा ध्याय घेणारे असे आज किती लोक आहेत? समाजाचं नेतृत्व करणार्या धुरिणांचं सोडा! आपण आपल्या मुलांना तरी असं स्वातंत्र्य देतो का? त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं किती प्रमाणात लादतो? त्या पूर्ण झाल्या नाहीत तर कुणाकुणाचं आणि किती नुकसान होतं? ‘जे करशील ते सर्वोत्तम कर’ असं त्याला सांगण्याचं धाडस आपल्यापैकी कितीजण करतात? अगदी एखादं नवं हॉटेल सुरू झालं, तिथल्या पदार्थांची चव भन्नाट असली तरी काही दिवसातच त्याची रया गेलेली असते. एखाद्या लेखकाची एक-दोन पुस्तकं गाजली की तो ओढून-ताणून लिहायला लागतो. त्यासाठी करावे लागणारे अविरत परिश्रम त्याला नको असतात. नाव झालं की काहीही खपवता येतं असा अहंकार वाढतो आणि क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं होतं.
पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांना फोन केला. त्यांना सांगितलं, ‘‘तुम्हाला केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची शपथ घ्यायचीय...’’
खरंतर ही वार्ता ऐकून कोणीही हर्षोल्हासित होईल. त्याला त्याच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. इथं मात्र नेमकं उलटं घडलं. क्षणाचाही विलंब न करता यशवंतराव म्हणाले, ‘‘मी बोलून कळवतो.’’
खुद्द देशाचे पंतप्रधान एका प्रादेशिक नेत्याला त्याचं क्षितिज विस्तारण्याची संधी देत होते आणि हे म्हणत होते, ‘‘मी बोलून कळवतो...’’
इतकी मोठी संधी येत असताना आणि खुद्द पंतप्रधान सोबत असताना आणखी कुणाशी बोलायला हवं? नेहरूंनाही हा प्रश्न पडला आणि त्यांनी त्याबाबत विचारणा केली.
यशवंतराव म्हणाले, ‘‘जिने माझ्यासोबत सुख-दुःखात राहण्याचा, मला साथ देण्याचा निश्चय केलाय त्या माझ्या अर्धांगिनीला, वेणुबाईला विचारावं लागेल... तिच्या सल्ल्याशिवाय, परवानगीशिवाय मी काहीच करत नाही...’’
नेहरूंनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी यशवंतरावांच्या या पत्नीप्रेमाचं, स्त्री-पुरूष समानतेचं कौतुक केलं.
आपल्या बायकोला असा सन्मान देणारे, तिच्या इच्छा-आकांक्षांचा विचार करणारे, तिला प्रेम आणि जिव्हाळ्याबरोबरच योग्य तो आदर देणारे असे किती लोक आज शिल्लक आहेत?
दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्याबाबतचाही एक किस्सा सर्वश्रुत आहे.
ते त्यावेळी कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य होते. दरमहा त्यांना पन्नास रूपये मानधन मिळायचं. त्यात त्यांचं घर चालायचं.
एकदा एक मित्र अचानक त्यांच्याकडं आला. त्यानं सांगितलं की, ‘‘माझ्या बायकोची तब्येत बिघडलीय. तिला डॉक्टरकडं नेणं गरजेचं आहे. शक्य तितकी आर्थिक मदत करा...’’
शास्त्रीजींपुढं प्रश्नचिन्ह उभं होतं. आता काय करावं? आपल्याला जेवढं मानधन मिळतं तितक्यात घरखर्च चालतो. शिल्लक अशी काही नव्हतीच. मित्र तर संकटात आहे. त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. काय बरं करावं?
ते विचारात असतानाच त्यांच्या पत्नी ललितादेवी घराबाहेर आल्या. त्यांनी या दोन मित्रांमधील संवाद ऐकला होता. ललितादेवींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पन्नास रूपये दिले. मित्र निघून गेला.
शास्त्रीजींना कळत नव्हतं की हे पैसे आले कुठून?
त्यांनी त्याबाबतची विचारणा केली.
तेव्हा ललिताबाई म्हणाल्या, ‘‘तुम्ही दरमहा तुमचे पन्नास रूपये मानधन मला घरखर्चासाठी देता. दरमहा मी पंचेचाळीस रूपयांत घर भागवते आणि उरलेले पाच रूपये बचत करते. एखाद्याच्या अडचणीला हे पैसे आले नाहीत तर त्यांचा काय उपयोग? म्हणून ते मी त्यांना दिले...’’
शास्त्रीजींना त्यांच्या पत्नीचा अभिमान वाटला. त्यांनी ललिताबाईंचं कौतुक केलं. इतरांची सहवेदना अनुभवण्याइतकी संवेदनशीलता त्यांच्याकडं आहे याचं त्यांना अप्रूप वाटलं.
ललिताबाई आतल्या खोलीत वळल्या आणि शास्त्रीजींनी कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिलं, ‘‘माझं घर दरमहा पंचेचाळीस रूपयात चालतं. पाच रूपये जादा येत असल्यानं माझी पत्नी त्याची बचत करत आहे. असलेला पैसा चलनात असावा आणि गरजेपुरताच पैसा सोबत ठेवावा या विचाराचा मी असल्यानं या महिन्यापासून माझे वाचवलेले पाच रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूंना द्यावेत.’’
सदैव राष्ट्रसेवेसाठी तत्पर असलेल्या अशा देशभक्ताचं हे वागणं आज अनेकांना खुळेपणाचं वाटू शकेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्याला ‘सद्गुण विकृती’ म्हणायचे ती यापेक्षा वेगळी थोडीच असते? आज असे किती लोक आपल्या आजूबाजूला आहेत बरं? नसतील तर यात दोष कुणाचा? आदर्शाची ही महान परंपरा नेमकं कुणामुळं, कशी आणि का खंडित झाली असावी?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबतचीही एक छान गोष्ट आहे.
ते आश्रमात होते. त्यावेळी एक गृहस्थ त्यांच्याकडं आले. बापूजींचं सूतकताईचं काम सुरू होतं. ते म्हणाले, ‘‘बापूजी मी एक उद्योजक आहे. भरपूर पैसा कमावला. मुलं मार्गी लागलीत. सारं काही करून झालंय. त्यामुळं आता मला देशसेवा करायचीय. आपण मला मार्गदर्शन करा. मी नेमकं काय करू शकतो?’’
बापूजी म्हणाले, ‘‘माझं हातातलं हे काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही बसा. मग आपण चर्चा करू!’’
ते गृहस्थ बाजूला जाऊन बसले. गांधीजींचं काम सुरूच होतं. पाच मिनिटं, दहा मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास...
या महाशयांना अशी कुणाची वाट पाहण्याची सवय नव्हती. त्यामुळं त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती.
थोड्या वेळानं बापूजी जवळ आले. म्हणाले, ‘‘माफ करा. माझं काम सुरू होतं. आता बोला. काय म्हणालात?’’
ते गृहस्थ म्हणाले, ‘‘मला देशसेवा करायचीय. काहीतरी काम सुचवा.’’
गांधीजी म्हणाले, ‘‘भल्या गृहस्था, मी सुतकताई करत होतो तेव्हा माझं लक्ष तुमच्याकडेच होतं. तुम्ही माझी वाट पाहताना चार वेळा या जागेवरून उठलात. या माठातलं ग्लासभर पाणी घेतलंत. अर्धा ग्लास पाणी तुम्ही प्यालं आणि अर्धा ग्लास टाकून दिला. यापुढं एक काम करा. जेवढी तहान असेल तितकंच पाणी ग्लासात घ्या. इतकं जरी प्रामाणिकपणे केलंत तरी तुमच्या हातून राष्ट्राची खूप मोठी सेवा घडेल. या आता...’’
त्यांचे हे विचार आपण कितीजण आचरणात आणतो? ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत अशा किती गोष्टी टाळतो? जे सहजशक्य आहे तेही करताना आपण अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष का बरं करतो? आपल्याला आणखी वेगळे आदर्श कसले हवेत?
आता थोडंसं मागं जाऊया.
तो काळ होता महाभारताचा.
पांडव वनवासात होते. तहानेनं व्याकुळलेले असताना एका डोहात पाणी आणण्यासाठी एकेकजण जात होते. त्यांना तिथून यक्षाचा आवाज येत होता. काही प्रश्न विचारले जात होते. तो आवाज न ऐकल्यावर, त्याच्या प्रश्नाला उत्तरं देता न आल्यावर एकेकजण मूर्च्छित होऊन पडत होता. सगळेजण पाणी आणायला जाऊनही एकही परतला नाही म्हणून शेवटी न्यायप्रिय युधिष्ठिर तिकडं गेले. त्यांनाही यक्षाचा आवाज आला. त्यांना विचारलं गेलं, ‘‘जगात सर्वात श्रेष्ठ कोण?’’
युधिष्ठिराकडून उत्तर आलं, ‘‘ब्राह्मण!’’
मग अर्थातच पुढचा प्रश्न आला. ‘‘खरा ब्राह्मण कोण?’’
युधिष्ठिरानं सांगितलं, ‘‘जो न्याय, नीतीनं वागतो, ज्याची ज्ञानाची लालसा आहे, ते ज्ञान जो इतरांना देतो, जो धनसंचय करत नाही तो खरा ब्राह्मण.’’
पुढचा प्रश्न आला, ‘‘हे गुण एखाद्या ब्राह्मणात नसतील तर?’’
युधिष्ठिरानं क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, ‘‘मग तो खरा शूद्र!’’
‘‘आणि एखाद्या शूद्रात हे गुण असतील तर?’’
युधिष्ठिर महाराज म्हणाले, ‘‘मग तो शूद्र कसा राहील? तोच खरा ब्राह्मण!’’
या व अशा संवादानंतर यक्ष खूश झाला. त्यानं सांगितलं, ‘‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू योग्य उत्तरं दिल्याबद्दल मी तुझ्या दोन भावाला शुद्धीत आणतो. कुणाला ते तू ठरवं आणि सांग.’’
यक्षाला अर्थातच अपेक्षित होतं की तो सर्वशक्तीमान भीम आणि अर्जुनाला शुद्धीत आणायची विनंती करेल. या लढाईत त्या दोघांची खरी गरज आहे.
युधिष्ठिरांनी सांगितलं, ‘‘आपण नकुल आणि सहदेवाला शुद्धीत आणावं...’’
आता आश्चर्यचकित व्हायची वेळ यक्षाची होती. त्यानं त्याचं कारण विचारलं.
युधिष्ठिर म्हणाले, ‘‘जे दुर्बल आहेत त्यांना आपण उभं करायला हवं. जे सबल आहेत त्यांना थोडा त्रास झाला तरी ते त्यांच्या क्षमतेच्या बळावर उभे राहतील...’’
यक्षानं युधिष्ठिराच्या या समतोल बुद्धीचा मान राखत सर्वांनाच शुद्धीत आणलं.
आज आपली ‘शुद्ध’ जागेवर आहे का?
दुर्बलांना सबल करण्यासाठी आपण काय करतोय?
राजकीय घोषणाबाजी काय होते? लोककल्याणकारी राज्याच्या नावावर कुणाकुणाला कसे अडवले जाते, नागवले जाते हे आपण पाहतोच आहोत. ‘बळी तो कान पिळी’ असा जणू अलिखित नियमच झालाय. मग दुर्बलांचं काय? त्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकं काय करता येईल?
सध्या आपण सर्व एका अराजकाकडं निघालोय.
प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतंय.
ते गोंजारताना ना आपल्यात सहवेदना अनुभवण्याची ताकत उरलीय ना आपल्यात विश्वात्मक विचार उरलाय.
सगळं काही लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, बोलण्यासाठी!
आदर्शांचे जे काही मनोरे उभारलेत त्याचे इमले ढसढसा कोसळत आहेत. देव, देश आणि धर्माच्या विरूद्ध वागण्याला प्रतिष्ठा मिळतेय. एकीकडं महासत्तेची स्वप्नं पाहताना दुसरीकडं आपण आपलं जे ‘अस्सल’ आहे तेच निकालात काढायला निघालोय.
या सगळ्याचा विचार व्हायला हवा. जे परिस्थितीनं आणि विचारानं ‘दुर्बल’ आहेत ते सबल झाले तर आणि तरच हे चित्र पालटू शकेल. ती क्षमता सर्वांत जागृत होवो यासाठी सदिच्छा देतो.
(संचार दिवाळी अंक 2018)
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
वाचनीय लेख।सुंदर।अभिनंदन
ReplyDeleteअप्रतिमच सर.... एकेक गोष्ट भन्नाट....मनःपूर्वक धन्यवाद...
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteखूप छान लेख ... सर
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख...सर.
ReplyDeleteचांगल्या विचारांना सुंदर आधार देणारा लेख
ReplyDelete