पुण्यातलं मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय; म्हणजेच आपलं एमएमसीसी! इथं व्यवस्थापन शास्त्र पदवीचं शिक्षण घेणारे काही तरूण-तरूणी! त्यातील बहुतेक ग्रामीण भागातून आलेले. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न रंगवताना वर्तमानात मात्र ते वेगळ्याच विश्वात रमत होते. साधारणतः महाविद्यालयीन जीवनात जी हुल्लडबाजी करणं अपेक्षित असतं ते सगळं या पोरा-पोरींनी केलं. वाद घातले, मारामार्या केल्या, मैत्री निभावली, लफडी केली, खरंखुरं प्रेम केलं, हौसमौज केली आणि जमलाच तर थोडाफार अभ्यासही केला. हे सगळं करताना स्वतःचा प्रामाणिकपणा आणि माणुसकी मात्र सोडली नाही.
एखाद्या चित्रपटात दाखवतात तसे इथेही दोन ग्रुप होते. दोन्हीही ग्रुप एकमेकांना पाण्यात पाहत. त्यातल्या एका ग्रुपनं ट्रॅडिशनल डेला चक्क महाभारतातलं पात्र साकारलं. ते पाहून दुसरा ग्रुप बेचैन झाला. यापेक्षा भारी आपल्याला काय करता येईल यावर डोकेफोड झाली. मग महाभारताला आव्हान देऊ शकेल असं काही करायचं असेल तर त्यांच्यापुढं अर्थातच एक आणि एकच पर्याय होता. तो कोणता हे वेगळं सांगावं लागेल का? भीम, अर्जुन, कृष्ण या कुणाहीपेक्षा मराठी माणसाला ज्याची भुरळ पडते असं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे युगपुरूष छत्रपती शिवाजीराजांचं!
ठरलं तर मग! त्यातल्याच एका राजबिंड्या तरूणानं शिवाजी महाराज साकारावेत यासाठी सगळ्यांनी लकडा लावला. त्याचा दबाव आल्यानं तो पठ्ठ्या काही तयार होईना. मग अशावेळी एक नायक लागतो. तो तत्परतेनं पुढं आला. त्या नायकाचं खरंखुरं नाव सागर कळसाईत! या उमद्या तरूणानं त्याच्या दोस्ताला शिवाजीमहाराजांची भूमिका करण्यासाठी पटवलं. आता कुणालाही पटवायचं तर काही आश्वासनं द्यावी लागतात. काही आमिषं दाखवावी लागतात. सागरनं सांगितलं, ‘‘मित्रा, तुझं व्यक्तिमत्त्व भारदस्त आहे. समोरच्या ग्रुपवाल्यांची जिरवायची तर तुच महाराजांची भूमिका केली पाहिजे. माझ्या शब्दासाठी हे कर! त्याबदल्यात भविष्यात तू सांगशील ते एक काम मी करेन. तो शब्द माझ्याकडं उधार राहिला.’’
आता इतक्या मिनतवार्या केल्यावर तोही तयार झाला.
त्यानं राजांची भूमिका केली. सगळ्या कॉलेजमध्ये हवाच हवा. मग काय? सगळे खूश!
काळाच्या रेट्यात सगळ्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता सगळे जगरहाटीला सामोरे जाणार! आपापल्या नोकर्या, व्यवसाय, कुटुंबकबीला यात गुरफटणार! हे कॉलेजचं गेट आपल्या सगळ्यांसाठी बंद होणार... सगळेच भावविभोर झाले. या दरम्यान केलेली दंगामस्ती, एकमेकांची काढलेली खोड, जीवापाड केलेलं प्रेम, वसतीगृहातील साहचर्य, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील सर्वांशी निर्माण झालेले संबंध, रेक्टरपासून पहारेकर्यांपर्यंत आणि वर्गशिक्षकांपासून प्राचार्यापर्यंत सर्वांशीस निर्माण झालेले ऋणानुबंध...! कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून सर्वजण या दरम्यानच्या आठवणी जागवू लागले. भविष्यातही ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असं सांगू लागले.
हे सर्व चालू असतानाच ज्यानं सागरच्या आग्रहावरून शिवाजीराजांची भूमिका केली होती तो पुढं आला. त्यानं सांगितलं, ‘‘साग्या, माझा शब्द तुझ्याकडे उधार आहे. आता कर्जफेड कर...’’ कुणालाच काही कळेना. तो काय मागणार?
मग त्यानं व्याकूळ होत सांगितलं, ‘‘कॉलेज लाईफनंतरही आपण सर्वजण एकत्र राहू असं काहीतरी कर...’’
आता आली का पंचाईत? हे कसं करता येईल? सागरनं तर शब्द दिला होता. तो विचारात पडला.
विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या असतात. सागरनं विचार केला. कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि प्रामाणिकपणे तो विचार अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि तशी कृतीही केली. ही कृती महाराष्ट्रातल्या तरूणांना वेड लावून गेली. मरगळलेल्या मराठी साहित्याला या कृतीनं ऊर्जा दिली.
या सगळ्यांना एकत्र बांधुन ठेवायचं तर कॉलेज लाईफचे हे दिवस शब्दबद्ध करणं गरजेचं होतं. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी सागरनं हे आव्हान स्वीकारलं आणि सगळे अनुभव जशास तसे उतरवले. प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते. इथं तर अनुभवाचा खजिनाच होता. त्यानं तो कादंबरीद्वारे शब्दांकित केला. त्याला शीर्षक दिलं, ‘कॉलेज गेट-नाण्याची तिसरी बाजू.’
या कादंबरीनं अनेक विक्रम केले. प्रत्येकाला ही आपलीच कथा वाटते. बघता-बघता या कादंबरीच्या पाच आवृत्या झाल्या. आज नाशिकच्या आयएमए सभागृहात या कादंबरीची सहावी आवृत्ती सन्मानपूर्वक प्रकाशित होतेय. बाबुराव भोर यांच्याच्यासारख्या रत्नपारखी चित्रपट निर्मात्यानं या कादंबरीवर चित्रपट निर्मितीचं काम सुरू केलंय. सागरच्या या प्रयत्नाला दाद देत बाबुराव भोर यांनी ही कलाकृती जिवंत केलीय. आता या कादंबरीवर चित्रपट येतोय.
मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एका सर्वात मोठ्या दैनिकानं एक सर्वेक्षण केलं होतं. वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन त्यांनी तरूणांच्या आवडत्या पुस्तकांसंबंधी विचारणा केली. ती यादी त्यांच्या सर्व आवृत्त्यांना पहिल्या पानांवर प्रकाशित केली. त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘टॉप टेन’ पुस्तकात पहिल्या क्रमांकावर शिरवळकरांची ‘दुनियादारी’ होती. दुसर्या क्रमांकावर ‘शाळा’ तर तिसर्या क्रमांकावर आमच्या सागरची ‘कॉलेज गेट.’ महाराष्ट्रातील बहुतेक वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी या कादंबरीची प्रचंड दखल घेतली. साहित्य संमेलनात, पुस्तक विक्रेत्यांकडे या कादंबरीची मागणी वाढली. राज्यभरातून ‘कॉलेज गेट’चा चाहता वर्ग निर्माण झाला.
प्रकाशक असूनही सागरच्या आग्रहाखातर या कादंबरीला मीच प्रस्तावना लिहिली होती. त्यात मी म्हटलं होतं, ‘‘एखाद्या रसिकप्रिय चित्रपटाला शोभेल असे सशक्त कथानक या कलाकृतीला निश्चितपणे लाभले आहे. महाविद्यालयीन जीवनातील विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचा चिकित्सक उलगडा करणारी, शब्दाशब्दाला उत्सुकता वाढवणारी आणि मैत्रीच्या नात्याचे चिरंतन मूल्य ताकदीने सिद्ध करणारी ही कलाकृती आहे.’’
सुदैवानं आज हे सारं काही खरं ठरलंय. आजचे तरूण लिहित नाहीत, वाचत नाहीत अशा सगळ्या अंधश्रद्धा या कादंबरीनं खोडून काढल्यात. सागरच्या कसदार लेखणीचं हे यश आहे. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी ही एक कादंबरी आहे. किंबहुना तमाम युवकांच्या मनात आणि हृदयात ‘चपराक’चं नाव पोहोचवण्यात या कादंबरीचं योगदान मोठं आहे. सागरचं संवादी लेखन, स्वभावातील नम्रता आणि मृदुता यामुळं तसाही तो सगळ्यांच्या हृदयावर राज्य करतो. दोन व्यक्तींची तुलना अनाठायी असते असं माझं मत असलं तरी आज सांगावंसं वाटतं की, सागर कळसाईत हा मराठीतला चेतन भगत आहे.
लेखनातही भवितव्य घडवता येतं हे सिद्ध करणार्या सागरची ‘लायब्ररी फे्रंड’ ही दुसरी कादंबरीही ‘चपराक’ने प्रकाशित केली. आता एक मोठा राजकीय पट उलगडून दाखविणारी ‘काशिनाथ-विश्वनाथ’ ही कादंबरी लिहिण्यात सागर व्यग्र आहे. बाबुराव भोर यांच्यासारखे समर्थ हात त्याच्या पाठीशी आहेत. ‘चपराक’ परिवाराचा ‘आयडॉल’ म्हणून सागरचं मला नेहमीच कौतुक वाटतं. भविष्यात तो नवनवीन विक्रम नोंदवेल हे वेगळं सांगायला नकोच. त्याच्या लेखनप्रवासाला मित्र म्हणून, प्रकाशक म्हणून माझ्या ‘जी जान से’ शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
7057292092
No comments:
Post a Comment