Monday, July 16, 2018

वर्चस्ववादाला आव्हान!


मागच्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी परीक्षक होतो. त्यात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाला मी पुरस्कार दिला. त्यावेळी  विश्वंभर चौधरी नावाच्या एका विदुषकाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यांचे म्हणणे होते की, एका हिंदुत्त्ववाद्याच्या पुस्तकाला पुरस्कार दिलाच कसा? हे पुस्तक वाचायचीही त्यांना गरज वाटली नव्हती. शेवडेंनी लिहिलंय ना? मग त्यात काय वाचायचं? असा काहीसा सूर होता. असाच प्रकार मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्याबाबतही  सातत्यानं घडतोय. सोनवणी यांनी लिहिलंय ना? मग ते केवळ हिंदू धर्मात फूट पाडायचंच काम करतात. त्यांचं या विषयावरील लेखन कशाला वाचायचं असा अपप्रचार केला जातो.

हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे संजय सोनवणी यांचं ‘हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास’ हे पुस्तक नुकतंच पुण्यातील ‘प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केलंय. या पुस्तकात त्यांनी जे लिहिलंय त्यावर मोठी चर्चा होऊ शकते! किंबहुना तशी चर्चा व्हायला हवी. लोकमान्य टिळक यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक रथीमहारथींचे सिद्धांत संजय सोनवणी यांनी सप्रमाण खोडून काढले आहेत. हिंदू आणि वैदिक यांच्यातील फरक माहीत नसणार्‍यांना किंवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्षित ठेऊ इच्छिणार्‍यांना हे पटणारे नाही. मात्र ज्यांना अभ्यास करायचाय, ज्ञान मिळवायचंय, सत्य शोधायचंय त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं.

आद्य शंकराचार्यही वैदिक नाहीत हे सोनवणी यांनी यात मांडलं आहे. आपला इतिहास पुराणकथांनी गढूळ झालेला असताना आणि आपण जे ऐकत आलोय तेच सत्य मानणार्‍यांना कदाचित हे रूचणार नाही; पण सत्यापासून फारकत का घ्यावी? सोनवणी यांच्यावर तोंडसुख घेणारे काही महाभाग त्यांच्या मुद्यांचा प्रतिवाद करून ते खोडून काढू शकत नाहीत आणि हे सत्यही स्वीकारत नाहीत. पुराणातली वाणगी (वांगी नव्हे!) पुराणात म्हणून काहीजण दुर्लक्षही करतील; पण याच्या तळाशी जाऊन चिकित्सा करायलाच हवी. 

यापूर्वी त्यांनी ‘जातीसंस्थेचा इतिहास’ हे पुस्तकही लिहिले. ‘चपराक’ने प्रकाशित केलेले ‘भाषेचे मूळ’ हे भाषाशास्त्रावरील अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकही सिद्धीस नेले. घग्गर नदीलाच सरस्वती नदी समजणार्‍यांना सणसणीत चपराक दिली. या सर्व पुस्तकांचा सार म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे. आपल्याकडे संस्कृतलाच आद्य भाषा, देवभाषा समजून आपण मराठीला दुय्यम स्थान दिले आहे. यावर ‘जिच्यावर संस्कार झाले ती संस्कृत’ इतकी साधी सोपी व्याख्या करून सोनवणी यांनी प्रकाश टाकला आहे. जर संस्कृत ही आद्य भाषा असती तर आपल्या खेड्यापाड्यातील म्हातारी-कोतारी लोक संस्कृतच बोलली नसती का? असा बिनतोड सवालही ते करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं नौटंकी करणार्‍या चमकोछाप लोकांनी हे समजून घ्यायला हवं.

आर्यवंश श्रेष्ठत्ववादाचा जन्म म्हणजे काळीकुट्ट किनार, हे मत ते ठामपणे मांडतात. रामायण-महाभारताचा काळ हा वैदिक भारतात येण्यापूर्वीचा हेही ठासून सांगतात. हे कुणाला पटेल किंवा पटणार नाही पण आपल्याला सत्य स्वीकारावेच लागेल. भारतीय संस्कृतीचा धावता आढावा, असूर संस्कृती, वेदपूर्व भारतीय असूर संस्कृती, वेदपूर्व तत्त्वज्ञान व विकास, वैदिक धर्माची स्थापना कोठे झाली?, सिंधू-घग्गर संस्कृतीची भाषा, बौद्ध-जैन ते सातवाहन काळ, वैदिक भाषा, पाणिनी, मनुस्मृती आणि कौटिल्याचा काळ, श्रेणी संस्था, विकास, उत्कर्ष, अधःपतन आणि वैदिक वर्चस्वाची सुरूवात आणि ब्रिटीश काळ - वैदिक वर्चस्वावर अधिकृत शिक्कामोर्तब अशा 11 प्रकरणातून त्यांनी हा व्यापक विषय अत्यंत अभ्यासपूर्ण रीतिने मांडला आहे. हिंदू धर्मावर होणारे आक्रमण, वैदिकांचा वर्चस्ववाद याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यामुळे वेदप्रामाण्याच्या नावावर काहीही ठोकून देणारे आपोआप उघडे पडले आहेत. 

‘सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच’ या सिद्धांताला संजय सोनवणी यांनी तडा दिला आहे. वैदिक व पाश्‍चात्य विद्वानांच्याच मतांवर अवलंबून असलेल्यांनी सत्य कधी पुढे येऊच दिले नाही. आपल्या नसलेल्या अस्मिता आणि खोटा अहंकार कुरवाळत त्यांनी हिंदू आणि वैदिक यांच्यात मोठी गल्लत केली. हा सगळा मामला काय हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचण्यावाचून गत्यंतर नाही. मनुस्मृती नेमकी का आणि कुणासाठी याबाबतचेही विवेचन या पुस्तकात आले आहे. सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भाषिक स्थित्यंतराचा एक मोठा पट उलगडून दाखवणे तसे जिकिरीचे काम. त्यातही पुस्तकाच्या केवळ 320 पानांत हे मांडणे म्हणजे तर शिवधनुष्यच! पण ते आव्हान संजय सोनवणी नावाच्या प्रतिभेच्या जागृत ज्वालामुखीने लिलया स्वीकारलं आणि ते इतिहासाशी, प्रामाणिकपणाशी तडजोड न करता, त्याच्याशी प्रतारणा न करता पूर्णत्वासही नेलं. आपल्या संस्कृतीची पाळंमुळं समजून घ्यायची असतील तर कोणतेही पूर्वग्रह न बाळगता हे पुस्तक तटस्थपणे वाचायला हवं, त्यावर चिंतन करायला हवं. 

हिंदू आणि वैदिक हे दोन्ही धर्म वेगळे कसे आहेत याचा पुरातन काळापासूनचा त्यांनी घेतलेला धांडोळा कुणालाही अचंबित करणारा आणि अभ्यासकांना व्यापक दृष्टी देणारा आहे. वैदिक धर्माचा आणि हिंदू धर्माचा काळ यातील तफावतही त्यांनी अधोरेखित केली आहे.  सूर आणि असूर संस्कृतीतील फरक सांगितला आहे. पौराणिक कथामधून सत्याशी घेतलेली फारकत दाखवून दिली आहे. दोन्ही धर्मातील श्रद्धा, अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी परंपरा, आचार-विचार, संस्कृती, संघर्ष या सर्वाची नेटकी आणि नेमकी मांडणी त्यांनी या पुस्तकात केलीय. तंत्र-मंत्र, देवादिकांच्या प्रतिमांचे पूजन, त्यातून बनवली गेलेली मिथके यावरही त्यांनी प्रभावी भाष्य केलंय. भाषा गटांचे प्रश्‍न मांडलेत. या भाषांचे जाळे कसे निर्माण झाले, प्रांतिक भाषा कशा विस्तारत गेल्या हेही साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. 

‘विषमतेचे तत्त्वज्ञान असलेले वैदिक धर्मतत्त्व की समतेचे स्वतंत्रतावादी तत्त्वज्ञान असलेले हिंदू धर्मतत्त्व ही निवड हिंदुंना डोळस व नीटपणे करावी लागेल. वैदिकांनाही आपल्याच धर्माचा पुनर्विचार करणे आवश्यक बनून जाते’ असे मत संजय सोनवणी या पुस्तकातून मांडतात. त्यावर प्रत्येकानं विचार केलाच पाहिजे.

हिंदू धर्म आपल्या कृषी संस्कृतीतून जन्माला आलाय आणि अफगाणिस्तानात स्थापन झालेला व विस्थापितांच्या माध्यमातून धर्मप्रसारासाठी आलेला वैदिक धर्म आपल्याकडे नंतर स्थिरावलाय याकडं ते लक्ष वेधतात. या पुस्तकाचा गाभाच हा असल्यानं या दोन्ही धर्मधारांची चिकित्सा त्यांनी या पुस्तकाद्वारे केलीय. वैदिकांचा वर्चस्ववाद कसा वाढत गेला आणि त्यात हिंदू धर्म कसा अडकत गेला हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. धर्मइतिहासावर सुस्पष्ट प्रकाश टाकतानाच वर्चस्ववाद झुगारून देण्याचं मोठं धाडस संजय सोनवणी यांनी या पुस्तकाद्वारे दाखवलं आहे. वैदिक-अवैदिक या विषयाचा ध्यास घेऊन, अहोरात्र अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. आम्ही मित्रमंडळी त्यांना गंमतीनं ‘वैदिक धर्माचे शंकराचार्य’ म्हणत असलो तरी या विषयाची व्याप्ती आणि त्यांचा त्यातील व्यासंग किती मोठा आहे ते हे पुस्तक वाचल्यावर समजते. त्यांच्या भावी लेखन प्रवासाला आणि साहित्यातील संशोधनाला आमच्या शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक 'पुण्य नगरी, १५ जुलै २०१८)

1 comment:

  1. Mr. Sanjay sonawanis these to Books are not only simple books. These real research is earthquake of vaidik religion. Congratulation to you sir. you wrote this article on this precious Subject. thanks!

    ReplyDelete