सांगोला हा महाराष्ट्रातील एक दुष्काळी तालुका. या भागात मनाची, विचारांची श्रीमंती मात्र जागोजागी अनुभवायला मिळते. पुण्या-मुंबईचा सांस्कृतिक केंद्रबिंदू ग्रामीण महाराष्ट्राकडे वळला असताना सांगोला तालुक्यातील चोपडीसारख्या एका छोट्याशा गावातील एक लेखक मोठ्या ताकतीने पुढे आला आहे. सुनील जवंजाळ हे त्याचे नाव. पेशाने शिक्षक असलेल्या या माणसाने आधी कवितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. ‘वेदनेच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहानंतर आपला मोर्चा कादंबरीकडे वळवला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकावा याप्रमाणाने त्यांनी इतिहास घडवला. ‘काळीजकाटा’ ही त्यांची कादंबरी आम्ही ‘चपराक’तर्फे प्रकाशित केली आणि पंधरा दिवसातच ती ‘बेस्ट सेलर’ ठरली. अवघ्या तीन महिन्यात या कादंबरीची पहिली आवृत्ती संपत आलीय हे प्रकाशक या नात्यानं सांगताना मला आनंद होतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण साहित्यासाठी आज (दि. 26) या कादंबरीला ‘ग. ल. ठोकळ पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात येत आहे.
प्रेम हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रेमाशिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही. ही भावना थोड्याफार फरकाने प्रत्येकात असतेच असते. प्रेमाची प्रत्येकाची संकल्पना न्यारी! ती व्यक्त करण्याची पद्धतही निराळी! तरुण वयात मात्र अनेकांना विभिन्नलिंगी आकर्षण म्हणजेच प्रेम वाटू लागते. इथेच अनेकांची गल्लत होते. त्यातूनच पुढे अनेक गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी कृत्ये घडतात. एकतर्फी प्रेमातून, वासनेतून, अनैतिक संबंधातून घडत असलेल्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. आपल्याला आवडणारा किंवा आवडणारी आपल्या आयुष्यात आला अथवा आली नाही तर अनेकजण सूडाच्या भावनेने पेटतात. काहीजण त्या विरहात झुरत राहतात. प्रसंगी दु:खातिरेकाने मनोरुग्णही होतात. प्रेमामुळे माणूस घडतो तसाच बिघडतोही! प्रत्येकालाच त्याचे प्रेम मिळेलच असे नाही. अशावेळी त्यातून सावरणे, समोरच्याच्या भावनेचा आदर करणे अत्यावश्यक असते. ती समज अनेकांत असतेच असे नाही. नेमका हाच धागा पकडून सुनील जवंजाळ यांनी ‘काळीजकाटा’ ही कलाकृती साकारली. प्रेमात अपयश आलेल्या बहुसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणारी ही कादंबरी जीवनाचे अनेक रंग दाखवून देते. संकटांना न जुमानता त्यातून उभारी घेण्याचे बळ देते. नैराश्य झुगारून लावते. संस्कारांचा धागा भक्कम करते.
‘आत्मिक प्रेमाचे सुंदर मंदीर म्हणजे काळीजकाटा’ या शब्दात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी या कादंबरीचा गौरव केला. सुनील जवंजाळ हे कवी मनाचे लेखक असल्याने ही कादंबरी अतिशय काव्यात्म शैलीत साकारली आहे. यातील सुभाषितवजा वाक्ये, जागोजागी केलेली कवितांची पेरणी वाचकांना खिळवून ठेवतात. आपण एखादा चित्रपट पाहतोय की काय असे चित्र जवंजाळ यांच्या समर्थ लेखणीतून उभे राहते. वाचक त्यात आपलीच कथा शोधू लागतात आणि त्यात एकरूप होतात. सावली आणि वसंत ही या कादंबरीतील प्रमुख पात्रे असली तरी यात अनेकांचे ‘जगणे’ आलेय, ‘वागणे’ आलेय. ‘सोसणे’ आलेय. सावलीचे आई-बाबा, मावशी, सरपंच, स्त्रियांचं शोषण, शेतकरी बांधवांची अगतिकता, साहित्यातलं ‘गटार’ राजकारण हे सगळेच मुळातून वाचण्यासारखे आहे.
पुरस्काराच्या निमित्ताने संयोजकाकडून बलात्कार वाट्याला आलेली कवयित्री सावली बंड करून का उठत नाही? असा प्रश्न काहींना पडला. खरेतर ही कादंबरी म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे. समाजाची बंधनं झुगारून देता न येणारी पात्रं अनेकदा जे बोलू शकत नाहीत तेच तर लेखक आपल्या कलाकृतीद्वारे मांडत असतो. सबंधित पात्रांच्या त्या भावना समजून न घेण्याइतके वाचक दूधखुळे नसतात. आपल्या आजूबाजूच्या अशा घटना उघड्या डोळ्याने बघण्याचे, त्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे धाडस ‘काळीजकाटा’सारख्या कलाकृती देतात. ही कादंबरी वाचून कुणाचे डोळे पाणावले नाहीत, कुणाला रुखरुख लागली नाही, हळहळ वाटली नाही तरच नवल!
सावली आणि वसंतच्या व्यापक, उदात्त आणि तरीही शोकात्म प्रेमकथेबरोबरच या कादंबरीत आणखी एका लेखकाची उपकथा आहे. त्याने त्याच्या जगण्यातील विद्रोह नेमकेपणाने मांडलाय. तोही वाचकांच्या मनाचा ठाव घेतो, अनेकांना गुंतवून ठेवतो. ‘काळीजकाटा’मधील ‘त्या’ लेखकाचीच एक वेगळी कादंबरी प्रकाशित करा, असाही आग्रह काही वाचकांनी प्रकाशक म्हणून माझ्याकडे धरलाय. ‘‘वसंताचे पुढे काय झाले?’’ हा प्रश्न विचारून तर अनेकांनी भंडावून सोडले. हे या कादंबरीचे यश तर आहेच पण या कादंबरीचा पुढचा भागही लवकरच येईल हे यानिमित्ताने आनंदपूर्वक जाहीर करतो.
या कादंबरीचे उत्तम नाट्यरुपांतर होऊ शकते, यावर दमदार चित्रपट निर्माण होऊ शकतो आणि प्रिंट आणि ऑडिओ स्वरूपात ही कादंबरी अनेक भाषांत जाऊ शकते. ‘चपराक’तर्फे आम्ही त्यादृष्टीने नक्की सकारात्मक प्रयत्न करू! या कादंबरीचा काही भाग एखाद्या विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासक्रमासाठी लावला तर आजच्या तरुणाईसाठी तो निश्चितपणे दिशादर्शक ठरेल.
वाचनसंस्कृती कमी होतेय आणि ग्रामीण भागातून नव्याने कोणी काही दर्जेदार लिहित नाही या ‘अंधश्रद्धा’ सुनील जवंजाळ या लेखकाने त्याच्या कसदार लेखणीतून सप्रमाण दूर केल्या आहेत. या भरीव साहित्यिक योगदानाबद्दल आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मिळत असलेल्या पारितोषिकाबद्दल प्रकाशक या नात्याने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देतो!
दैनिक 'पुण्य नगरी'
२६ मे २०१८
-घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092
सर जी खूप छान सन्मान काळीजकाटा चा आपण केला आहे.एका खेड्यातील लिहित्या हाताला आपण खूप मोठे बळ देता आहात....
ReplyDeleteस्वागत आहे बंधू. तुमचे लेखन आणखी फुलू द्या. आमच्या सदैव सदिच्छा आहेतच.
Deleteतुमच्या लेखणीचा आविष्कार मराठी वाचकांच्या मनावर गारुड निर्माण करेल.
सर जी खूप छान सन्मान काळीजकाटा चा आपण केला आहे.एका खेड्यातील लिहित्या हाताला आपण खूप मोठे बळ देता आहात....
ReplyDeleteव्वा! खूप छान लेख.
ReplyDeleteलेखक व प्रकाशकांचेही मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद.
Deleteकादंबरी वाचायची उत्कंठा वाढवणारे लेखन.
ReplyDeleteकाळीजकाटा जगासमोर आणणाऱ्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन !
मनःपूर्वक धन्यवाद नानासाहेब.
Deleteएक भन्नाट व मर्मस्पर्शी कादंबरी...
ReplyDeleteसुंदर परीक्षण..।
धन्यवाद भाई काका.
Deleteखूप छान कादंबरी आहे . धन्यवाद चपराक प्रकाशन चोपडी तील लेखकाला योग्य न्याय दिला...💐💐
ReplyDeleteखूप छान कादंबरी आहे . धन्यवाद चपराक प्रकाशन चोपडी तील लेखकाला योग्य न्याय दिला...💐💐
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteसर , शक्यतो मोठी माणसे लहान माणसाला सोबत सुद्धा घेत नसतात , पण तुम्ही ते काम सहजतेने केलंय. तुमचा अभिमान आहे सर माझ्यासारख्या वाचकाला..... काळीजकाटा च्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद बापूसाहेब.
Delete