वाचनसंस्कृती कमी होत असल्याचं सांगितलं जात असताना आणि त्यामुळं प्रकाशनविश्वाला घरघर लागलेली असतानाच काही प्रकाशन संस्था मात्र सातत्यानं वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तकं प्रकाशित करीत आहेत. त्यांच्या पुस्तकांना मागणीही उत्तम असून नवीन वाचक घडविण्याचं काम त्यांनी नेटानं केलंय. आजच्या तरूणाईला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या आणि नकारात्मकतेचं मळभ दूर सारून ग्रंथ व्यवहारात चेतना निर्माण करणार्या पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’चे तरूण संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांच्याशी नगर येथे होणार्या विभागीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ना. सुर्वे यांनी साधलेला हा संवाद.
* नगरला विभागीय साहित्य संमेलन होतंय. अशी साहित्य संमेलनं कितपत महत्त्वाची आहेत?
- साहित्य माणसाच्या मनाला उभारी देतं, त्याचं नैराश्य दूर सारून त्याला दिशा दाखवतं. त्यामुळं या साहित्याकडं सामान्य माणसाला आकर्षित करून घ्यायचं झालं तर अशा संमेलनांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. संमेलनात वाचक-रसिकांना लेखक भेटतात, त्यांचे विचार जवळून ऐकता येतात. छोट्या संमेलनात लेखक आणि वाचकांचा थेट संवाद होतो. त्यामुळं विभागीय साहित्य संमेलनं ही मोलाची आहेत. नगरला होणारं साहित्य संमेलन त्यामुळंच महत्त्वपूर्ण आहे.
* अशी अनेक विभागीय साहित्य संमेलनं होत असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची काय गरज? ते बंद करावं अशी मागणी सातत्याने होते. त्याबाबत तुमचं मत काय?
- अनेक छोट्याछोट्या नद्या एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार होतो आणि तो पुढं सागराला मिळतो. त्यामुळं छोट्या नद्या आणि सागराचं महत्त्व कमी होत नाही. दोन्ही तितकेच गरजेचे आहेत. या छोट्या नद्या तो तो भाग संपन्न करतात. आजूबाजूच्या जमिनीचं, गावाचं भवितव्य त्यांच्यावर असतं. या नद्यांचं पाणी जसं झिरपत, मुरत येतं तसंच छोट्या आणि विभागीय साहित्य संमेलनामुळं आपली साहित्यिक भूक भागवली जाते. यातूनच चांगले वाचक तयार होतात, लेखक तयार होतात. साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी, ती वृद्धिंगत होण्यासाठी ही संमेलनं मोठी भूमिका पार पाडतात. त्याचे विशाल रूप म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते आयोजनापर्यंत आणि जेवणाचे पदार्थ कोणते असावेत इथपासून ते सहभागी लेखक-कवी कोण असावेत इथपर्यंत तिथं सातत्यानं वाद आणि वितंडवाद होत असले तरी या संमेलनांचं योगदान आणि परंपरा मोठी आहे. काळानुसार तिथंही आवश्यक ते बदल होत आहेत. त्यामुळं संमेलनच काय, तर कोणताही विधायक उपक्रम बंद करण्याची मागणी अप्रस्तुत आणि दुर्दैवी आहे.
* वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी ओरड असताना तुम्ही नवनवीन पुस्तकं सातत्यानं कशी काय प्रकाशित करता?
- काही ठराविक प्रकाशकांनी हा बागुलबुवा निर्माण केलाय. वाचक कमी होत असल्याची ‘अंधश्रद्धा’ ‘चपराक’ने प्रयत्नपूर्वक दूर केलीय. आमची सर्व पुस्तकं ‘बेस्ट सेलर्स’ ठरली. त्यामुळं त्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. जर जुन्या आणि नामवंत प्रकाशकांची पुस्तकं खपत नसतील तर त्यांना काळाबरोबर चालता येत नाही. आजच्या काळाची गरज ओळखून नवे साहित्य पुढे यायला हवे. वाचक कमी झालेत असे म्हणण्यापेक्षा त्यांची वाचनाची अभिरूची आणि माध्यमं बदललीत हे आपण समजून घ्यायला हवं. ‘अंतर्नाद’सारखं एक चांगलं मासिक बंद पडल्याबद्दल आपण हळहळतो; पण त्यांची साधी वेबसाईटही नव्हती किंवा नवे वाचक तयार करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत इकडं आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळं नकारात्मकता बाजूला सारून आपण जोमानं कार्यरत राहिलं पाहिजे. आम्हाला हे जमलं म्हणून आम्ही नवनवीन पुस्तकं प्रकाशित करू शकलो.
* ‘चपराक’चा विस्तार राज्याबाहेरही झाला. तो कसा काय?
- हो! आमच्या मासिकाचे सहा राज्यात सभासद आहेत. शिवाय अनेक अंक, पुस्तके देश-विदेशात पोहोचली. मराठी माणूस जगभर विखुरलाय. आपण त्यांचा कधी विचारच करत नाही. त्यांचीही साहित्यिक भूक मोठी आहे. त्यासाठी ते आसुसलेले असतात. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातही एखादे मासिक प्रभावीपणे पोहोचू शकत नाही. त्यामुळं इतर तर त्यांच्या खिजगणतीतही नसतात. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. बेळगाव, गुलबर्गा, हैद्राबाद, बेंगलुरू, कारवार, अमृतसर, दिल्ली, इंदूर, भोपाळ, सूरत, अहमदाबाद, चेन्नई, पणजी अशा महत्त्वाच्या शहरातील मराठी वाचकांपर्यंत आम्ही पोहोचलो. तिथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिलं. त्यातील अनेकजण सध्या लिहितेही झाले आहेत. प्रत्येक वाचकांमध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला जागे करण्याचे काम ‘चपराक’ने केेले.
* मराठी मासिकांची पिछेहाट का झाली?
- मी सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणं नवे वाचक तयार व्हावेत यासाठी कोणीही फार प्रयत्न केले नाहीत. अनेक मासिकं विविध विचारधारांत अडकून पडली. कोणी समाजवादी आहे तर कोणी हिंदुत्त्ववादी. मग तेच तेच विचार वाचकांच्या माथी मारले जातात. त्यामुळं ती मासिकं कोणी वाचत नाही. सत्तर वर्षांची पंरपरा सांगायची आणि सात हजार वाचकांपर्यंतही पोहोचायचं नाही हे त्यामुळंच होतं. मग ठरलेल्या विचारधारांचा उदोउदो करायचं, पाककृतीपासून मेहंदीपर्यंत विशेषांक काढायचे आणि आलेला दिवस ढकलायचा अशी यांची गत होणे स्वाभाविक आहे; पण त्यामुळे नवे वाचक नाहीत किंवा मासिकांची पिछेहाट झालीय असे म्हणता येत नाही. फक्त पर्याय बदललेत. ‘चपराक’सारख्या अनेक मासिकांचा उदय आणि त्यांना भरभरून मिळणारा वाचकाश्रय हेच सिद्ध करतो.
* वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणते प्रयोग केले?
- एकतर आम्ही भारतातील सर्व प्रमुख शहरात गेलो. तिथल्या मराठी लोकांशी संवाद साधला. अगदी इंदूरसारख्या शहरात जाऊन तिथंही ‘चपराक’चा साहित्य महोत्सव घेतला. घुमानच्या साहित्य संमेलनातील प्रकाशकांची कोंडी फोडली. लिहित्या हातांना बळ दिलं. ते करताना त्यांचं नाव, गाव, प्रांत, धर्म, लिंग याचा कधीही विचार केला नाही. त्यामुळं केवळ ‘चपराक’मध्ये तुम्हाला साहित्याचं इतकं वैविध्य दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी ‘चपराक’चाही साहित्य महोत्सव घेतो. त्यात एकाचवेळी राज्यातील वेगवेगळ्या भागातल्या लेखकांची, वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील पुस्तके प्रकाशित होतात. परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन, अभिवाचन, अभ्यासपूर्ण व्याख्यानं, इतर दिवाळी अंकांचा गौरव असे उपक्रम त्यात असतात. मुख्य म्हणजे त्यात वाचकांचाही सहभाग घेतला जातो. त्यामुळं अल्पावधीत ‘चपराक’ वाचकाभिमुख झालाय.
* पाचशे पानांचा दिवाळी महाविशेषांक काढण्यामागची संकल्पना काय?
- आम्ही पहिल्या अंकापासून म्हणजे 2002 पासून दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो. गेल्या काही वर्षात चर्चा होती की, नव्यानं कोणी फारसं चांगलं लिहित नाही, दिवाळी अंकांचं दिवाळ निघतंय. ते बंद पडत आहेत. या व अशा नकारात्मक चर्चेला उत्तर म्हणून आम्ही ‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक करायचा ठरवलं. त्याला वाचक आणि लेखकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नवोदित आणि प्रस्थापित यांचा समन्वय साधत आम्ही सर्वोत्तम ते वाचकांना दिलं. त्यामुळं अनेकजण नव्यानं लिहिते झाले. वाचकही म्हणतात, दहा दिवाळी अंक घेण्यापेक्षा ‘चपराक’चा एकच दिवाळी महाविशेषांक घ्यावा! म्हणजे पैसेही वाचतील आणि दर्जेदार साहित्य वाचल्याचे समाधानही मिळेल.
* नवीन लेखकांना काय सांगाल?
- उत्तमोत्तम वाचत रहा, लिहित रहा. लिखाणाचं स्वयंपाकासारखं आहे. रोज केलात तर चपात्या उत्तम होतील. कधीतरीच करायला गेलात तर जगाचा नकाशा होणे अटळ आहे. सध्या समाजमाध्यमासारखं महत्त्वाचं शस्त्र तरूणांच्या हातात आहे. अनेक युवकांच्या ब्लॉगला लाखो वाचक मिळतात. त्यामुळं कोणी दखल घेत नाही म्हणून हतबल होऊ नकात, निराश होऊ नकात. तुमची दखल त्यांनी स्वतःहून घ्यावी इतके स्वसामर्थ्य बाळगा. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार लेखन करणार्यांना आणि त्यात सातत्य ठेवणार्यांना या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळं केवळ हौस म्हणून न लिहिता उत्तमतेच्या ध्यासातून कार्यरत रहा म्हणजे तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही.
Apratim
ReplyDeleteधन्यवाद सर!
Deleteव्वा . अप्रतिम मुलाखत .मराठी वाचक चपराकचा आणि आपला नेहमीच ऋणी राहील .
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद बंधू!
Deleteसाहित्य चपराकने वाचक घडवला आणि वाचकांच्यामध्ये दडलेला लेखक पुढे आणला .
ReplyDeleteहोय. ते आपले सर्वांचे कर्तव्यच आहे.
Deleteखुप छान मुलाखत सर जी...चपराक खरच ग्रेट आहे
ReplyDeleteहे आपले प्रेम!
Deleteमस्तच
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteव्वा.. मस्तच..।
ReplyDeleteरोखठोक आणि जबरदस्त मुलाखत..।
आभार भाई काका.
Deleteव्वा.. मस्तच..।
ReplyDeleteरोखठोक आणि जबरदस्त मुलाखत..।
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteफारच प्रगल्भ विचार मांडलेत घनश्यामसारांनी । बोले तैसा चाले,त्याची वंदावे पाऊले
ReplyDeleteधन्यवाद सर! भविष्यात मोठे काम उभे करूया!!
Deleteवा सर खूपच वेगळे आणि महत्वाचे विचार मांडले आहेत तुम्ही. विशेषत: दुस-या आणि तिस-या प्रश्नावरच भाष्य मला फार महत्वाच वाटलं.
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद! नकारात्मकता दूर सारली तर निश्चितपणे मोठा बदल घडेल.
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteप्रकाशकाची भुमिका साहित्य निर्मितीला पोषक असते हे आपण दाखवून दिले आहे.
ReplyDeleteप्रकाशकाची भुमिका साहित्य निर्मितीला पोषक असते हे आपण दाखवून दिले आहे.
ReplyDeleteधन्यवाद.
Delete