सध्या आपण विचित्र स्थित्यंतरातून जात आहोत. सर्व माध्यमातून देश पुढं जात असल्याचं दाखवलं जात असताना आपण किती मागं आलोय हे अनेकांना माहीत नाही. या पार्श्वभूमीवर देशभक्तीची व्याख्या ठरवणं हे म्हणूनच कठीण काम आहे. कवितेसारख्या सर्वोच्च साहित्यप्रकाराची व्याख्या करणं तुलनेनं खूप सोपं आहे पण देशभक्तीची व्याख्या करण्यासाठी कोणते तराजू जवळ बाळगावेत?
आपल्या जाज्ज्वल्य इतिहासाचा थोडासा धांडोळा घेतला तर ही व्याख्या ठरवणं थोडसं सुसह्य होईल. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं; तेव्हा एकानं त्यांना प्रश्न विचारला, ‘‘तुमचं ध्येय साध्य झालं. आता यापुढं तुम्ही काय करणार?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता चाणक्य म्हणाले, ‘‘मी मूळचा शिक्षक आहे. पुन्हा विद्यादानाचं काम करणार.’’ याला देशभक्ती म्हणतात.
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी अमानुष गोळीबार झाला. त्यावेळी ‘मुस्लिम पळून गेले’ असा आक्षेप घेतला गेला. खान अब्दुल गफार खां यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी धारातीर्थी पडलेल्या मुस्लिमांची तपासणी करण्याची मागणी केली. त्यावरून 76 मुस्लिमांचे मृतदेह तपासले गेले. अर्थातच त्यांना गोळ्या लागलेल्या होत्या. याला देशभक्ती म्हणतात.
सावरकर त्यावेळी म्हणाले होते, ‘‘इंग्लंडची राणी मेली तर मी तिच्या श्रद्धांजली सभेला जाणार नाही...’’ या बाणेदार उत्तराला देशभक्ती म्हणतात.
सावरकरांनी माफी मागितली, ते पळून आले असे काहीजण सांगतात. या इतक्या मोठ्या देशभक्तावर शंका घेणारे मात्र दुर्दैवानं आज देशभक्त ठरतात. राष्ट्रासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पण समजून न घेता आपण जात, धर्म, प्रांत, विचारधारा अशा फूटपट्ट्या लावून ‘देशभक्त कोण?’ ते ठरवतो.
1666 ला शत्रूच्या ताब्यातून सुटून आल्यानंतर पुढची चार वर्षे छत्रपती शिवाजीमहाराज गप्प होते. त्यांनी अनेक तह केले. वेळप्रसंगी माघार घेतली. त्यांचा आदर्श सांगणारे काहीजण मात्र सावरकरांना सहजपणे ‘माफीवीर’ ठरवतात.
‘वंदे मातरम्’ न म्हणणार्यांना आपल्याकडे राष्ट्रद्रोही ठरवलं जातंय. इथला सच्चा मुसलमान रोज पाच वेळा नमाज पढतो. तो नमाज पढताना ज्या ज्या वेळी जमिनीवर डोकं टेकवतो ते त्याचं ‘वंदे मातरम्’च असतं, हे आम्ही समजून घेत नाही. समाजवाद्यांनी, हिंदुत्त्ववाद्यांनी किंवा आणखी कोणी घालून दिलेले नियम पुढं रेटणं हीच अनेकांना देशभक्ती वाटतेय.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडे तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. ‘फितुरांची नावे दे, तुझे सगळे किल्ले दे आणि तुझ्या वडिलांचा म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा सर्व खजिना दे...’ त्यावेळी त्यांनी शत्रूंना धुडकावून लावलं. ‘माझ्या वडिलांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य हे माझं नाही तर ते रयतेचं आहे’ हे ठणकावलं. अत्यंत निश्चयानं, धैर्यानं हा राजा मृत्युला सामोरा गेला. याला म्हणतात देशभक्ती! राष्ट्रभक्तीच्या सर्वोच्च त्यागाचं हे जिवंत उदाहरण आम्ही सोयीस्कर विसरतो.
निजामानं पुणं जाळलं. त्यावेळी मल्हारराव रास्ते यांनी त्यांना काही धनाढ्यांची घरं दाखवली. ते वाडे लुटले गेले, जाळले गेले. माधवराव पेशवे यांनी त्यांना शिक्षा दिली. सामान्य माणसाचं हे नुकसान भरून देण्याचे आदेश दिले. स्वतःच्या मामाला त्यांनी माफ केलं नाही. माधवरावांच्या आईनं त्यांना विरोध केला. स्वतःच्या भावासाठी शनिवारवाडा सोडण्याचीही धमकी दिली. पुढं त्यांची आई शनिवारवाडा सोडून गेली सुद्धा! पण माधवराव पेशवे त्यांच्या न्याय आणि विवेकापासून दूर गेले नाहीत. असं स्वतःच्या मतापासून न ढळणं म्हणजेच देशभक्ती!
रामशास्त्री प्रभुणे यांचा न्यायनिवाडा आपणास माहीत आहेच. असं ‘देहान्त प्रायश्चित’ देण्याची शिक्षा आजकाल कोणती न्यायव्यवस्था देईल काय? तकलादू लोकांच्या हातात व्यवस्था गेलीय. लोकशाहीचे चारही स्तंभ भुसभुशीत झालेत. म्हणूनच देशभक्तीची व्याख्या ठरवण्यासाठी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल, भाजप किंवा एमआयएमची मदत घ्यावी लागते.
अशावेळी पुन्हा आचार्य चाणक्य आठवतात. त्यांना एकानं विचारलं, ‘‘तुम्ही सिंहासन बदलवू शकता. मग तुुम्ही स्वतःच राजे का होत नाही? तुम्ही उत्तम राज्य प्रशासन देऊ शकाल.’’
त्यावेळी चाणक्यांनी सांगितलं, ‘‘राज्यकारभार करण्यासाठी लग्न करावं लागतं. कुटुंबवत्सल असावं लागतं. त्याला सामान्य माणसाची, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली सुखदुःखं कळावी लागतात. ती मला कळत नाहीत म्हणून मी राज्यकारभार करू शकत नाही.’’
देशातली आजची परिस्थिती पाहता असंच वाटतं. आपल्या राजाला सामान्य माणसाची सुखदुःखं कळतात का? जसोदाबेन यांना ते बायको म्हणूनही ओळख देत नाहीत. स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही सुद्धा देशभक्तीच ठरावी!
ग्यानी झैलसिंग असोत व्यंकटरमण असोत किंवा आपल्या मराठमोळ्या प्रतिभाताई पाटील! या सर्वांनी त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला की तिथून ट्रक भरभरून सामान आणलं. प्रतिभा पाटील यांच्याकडं तर राष्ट्रपती भवनातून त्यांच्या काही सामानाची परत मागणी करण्यात आली होती. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात सैन्यदलाची जागाही ढापली. तो विषयही चर्चेत आला. असं सारं असताना एपीजे अब्दुल कलाम नावाचा एक फकीर शास्त्रज्ञ राष्ट्रपती भवनातून केवळ दोन सुटकेस हातात घेऊन बाहेर पडला. रामेश्वरला एकेकाळी हिंदू बांधवांचे पर्यटन घडविणारा, त्यांना गाईड करणारा हा मुलगा राष्ट्रपती झाला आणि त्यानं त्याच्या साधेपणानं जगाला देशभक्ती दाखवून दिली. ती आम्हाला दिसत नाही..
1965 च्या आणि 1971 च्या युद्धात संपूर्ण समुदाय एकत्रितपणं उभा राहिला होता. अडचणीच्यावेळी सर्वांनी असं एकत्रं येणं आणि आपली सामुहिक शक्ती दाखवून देणं ही सुद्धा देशभक्तीच आहे. त्यासाठी जागतिक योग दिन साजरा करणं आणि शक्तीप्रदर्शन घडविणं गरजेचं नाही.
आपल्याकडं आपण नैतिक शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार नवीन पिढीला देण्यात कमी पडलोय. प्रत्येक गोष्टीचं राजकारणच सुरू आहे. पंडित नेहरू यांच्याबाबत अनेकांची मतमतांतरे असू शकतात; मात्र त्यांच्या मंत्रीमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पाच बिगर कॉंग्रेसी मंत्री होते. पूर्ण बहुमत असताना संयुक्त राष्ट्रसंघात आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी इंदिरा गांधींनी तेव्हाच्या विरोधी पक्षनेता असलेल्या अटलबिहारी वाजपेयींना पाठवलं होतं. इंदिराजींनी असा निर्णय घेणं आणि अटलजींनी त्यांचा मान राखणं ही देशभक्ती होती. पक्षीय राजकारण बाजूला सारून सध्या असं काही होताना दिसतं का बरं!
देशभक्तीची व्याख्या करणं तसं खरचं खूप अवघड झालंय. समाजमाध्यमावर सरकारविरोधी लेखन केलं म्हणून सध्या अनेकांना नोटीसा येत आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी होतेय. अशी जबरदस्ती करणार्यांकडून आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्यांकडून आपण राष्ट्रभक्ती शिकावी का?
इंग्रज लोक सांगतात की, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू, पण आमचं क्रिकेट आणि आमचा शेक्सपिअर आम्ही कुणालाही देणार नाही...’ स्वतःच्या खेळाविषयी, साहित्याविषयी असं प्रेम असणं याला राष्ट्रभक्ती म्हणतात. त्याउलट आम्ही क्रिकेटसारख्या खेळावर कोट्यवधी रूपयांचा सट्टा लावतो. भारत-पाकिस्थान मॅच झाल्यावर उन्माद दाखवतो, खेळाडूंची आई-बहिण काढतो. याला देशभक्ती म्हणतात?
माता आणि माती यात केवळ एका वेलांटीचा फरक असतो. या दोन्हीविषयी आपण केवळ ‘दिखाऊ’ प्रेम दाखवतो. आपल्याच शासनानं आपल्यासाठीच केलेले साधेसाधे नियमही आपण पाळत नाही. रोज सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडणारे, मान्यता नसलेल्या विद्यापीठातून पदव्या घेणारे, स्वतःच्या मुला-मुलीचे परीक्षेतले गुण वाढवणारे, शेतकर्यांच्या नावावर बनावट कागदपत्रं देऊन कर्ज काढणारे आणि ते पैसे निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरणारे आज आपल्याला मोठ्या जोशात देशभक्तीची प्रवचनं देतात.
आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, सर्व नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करणं हे सर्व दूरच राहिलं! किमान रोज शालेय वर्गात जी प्रार्थना म्हणत आलोय तिचं पालन केलं तरी खूप काही बदल दिसून येऊ शकतील.
इथला राजकारणी असेल, कलाकार असेल, साहित्यिक असेल, कामगार असेल किंवा देहविक्रय करणारी एखादी अबला असू शकेल... प्रत्येकाच्या मनात कारूण्याचे भाव प्रगट होणं म्हणजेच देशभक्ती! त्यापुढं जाऊन सांगायचं झालं, तर आपण करत असलेलं काम प्रामाणिकपणे करणं हेच देशभक्तीचं द्योतक आहे. देशभक्तीची व्याख्या ठरवण्यात वेळ घालवणं म्हणूनच सध्याच्या काळात अवघड झालंय. विविध धर्मिय बांधवांच्या सण-उत्सव, परंपरांविषयी आदर बाळगून सांगावसं वाटतं, की तुमच्या धार्मिक भावनांचं प्रगटीकरण करताना जो अतिरेकी उत्साह दाखवला जातो आणि त्यामुळं सामान्य माणसाची जी दैना होते ती थांबवणं ही सुद्धा मोठी देशभक्तीच आहे.
स्वतःच्या कल्पनाशक्तीशी द्रोह न करता आपल्याला आपलं काम करता आलं पाहिजे. हे ज्याला जमेल आणि त्यासाठी जो स्वतःशी प्रामाणिक राहील तोच खरा देशभक्त, तीच खरी देशभक्ती!
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092
(पूर्वप्रसिद्धी : दैनिक 'पुढारी' दिवाळी अंक २०१७)
खूपच परखडपणे विचार मांडलेला
ReplyDeleteएक जबरदस्त लेख..
देशभक्तीचा खरा अर्थ समजून सांगणारा आणि डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा एक रोखठोक परखड लेख . बायकोशी जो एकनिष्ठ तोच खरा देशाशी एकनिष्ठ .बायकोला अच्छे दिन तेव्हाच खरे देशाला अच्छे दिन .
ReplyDeleteघनःशामजी भले शाब्बास !
ReplyDeleteकिती भव्य पट, किती मोठा आवाका लेखाचा,आणि किती छान इंटरपिटेशन. हॅट्स आॅफ यू !
सर खूप छान लेख आहे. देशभक्ती बाबत खूप छान व अप्रतिम लेख......☺👌👌
ReplyDeleteखूपच छान विचार मांडलेत घनश्याम सर तुम्हीं. आपले काम हेच आपले दैवत आहे ह्या मताचा मी पण आहे आणि मलाही तीच खरी देशभक्ती वाटते. अप्रतिम लेख सर.
ReplyDeleteअप्रतिम लेखन, छान lekh
ReplyDelete