Tuesday, August 1, 2017

कवितेसाठी जगलो तेव्हा...!



‘कवितेसाठी जगलो तेव्हा कवितेनेही मला जगवले’ अशी कृतार्थतेची भावना जपणारे आणि जगणारे कवी म्हणजे रमेश गोविंद वैद्य! कवी आणि कवितांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या वैद्यांनी अनेक विधायक स्वप्नं पाहिली आणि ती पूर्णत्वासही नेली. खरंतर स्वप्नं पाहणं, स्मृतींना उजाळा देणं हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं. म्हातारे भूतकाळ आठवत बसतात तर तरणेताठे भविष्याचे स्वप्नरंजन करतात. रमेश गोविंदांचा जन्म 1942 चा असला तरी ते ‘तरणे बॉन्ड’ कवी आहेत. त्यांची कविता समाजासाठी दिशादर्शक आणि तितकीच रसरशीत आहे. ती जितकी हळवी, प्रेमळ आहे तितकीच अन्याय-अत्याचाराविरूद्ध, विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांविरूद्ध तुटूनही पडते. त्यांनी कवितेच्या माध्यमातून जे आसूड ओढलेत त्याचे वळ गलथान व्यवस्थेच्या पाठीवर अजूनही दिसून येतात. 

वैयक्तिक सुखांचा त्याग करून, प्रापंचिक बंधनात न अडकता ते गेली कित्येक दशकं अखंडपणे काव्यसाधनाच करीत आहेत. स्वतः कविता करून आणि त्या रसिकांपर्यंत पोहोचवून ते थांबले नाहीत तर त्यांनी इतर कविंनाही हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यातला सगळ्यात मोठा भाग म्हणजे ‘काव्यसप्ताह.’ ग्रामीण भागात जसे अखंड हरिनाम सप्ताह होतात तसा त्यांनी काव्यसप्ताह सुरू केला आणि त्यात कवितेचा नंदादीप तेवता ठेवला. त्यात कविसंमेलनं, एका प्रतिभावंताची मुलाखत, काव्यक्षेत्रात सक्रिय असणार्‍याला ‘शांता-गोविंद’ पुरस्कार, काही कवींचे त्यांच्या रचनांवर आधारित स्वतंत्र कार्यक्रम असं भरगच्च वैचारिक खाद्य काव्यप्रेमींना मिळतं. दरवर्षी 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम पुण्यात पार पडतो. एकेवर्षी त्यांनी मुंबईतही काव्यसप्ताह घेतला आणि दिल्लीत निदान एकतरी ‘काव्यसप्ताह’ आयोजित करून कवितेच्या प्रेमध्वजाखाली सर्वांना एकत्र आणण्याचा त्यांचा मानस आहे.

रमेश गोविंद वैद्य यांच्या लेखणीत आणि वाणीत समोरच्याचं मन जिंकण्याचं सामर्थ्य आहे. व्यक्तिशः मी तर ते समोर असताना संमोहित होतो. मागच्या पंधरा वर्षात या माणसाचे अनेक रंग मी जवळून बघितलेत. स्वभावातला रोखठोकपणा, चुकीच्या वृत्तीविषयी चीड, व्यक्तिकेंद्रित मूर्तिपूजेला बळी न पडणं, अकारण कुणाचं स्तोम न माजवणं आणि गुणवंतांना न्याय मिळावा यासाठी धडपडणं यामुळं प्रस्थापित यंत्रणेकडून अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी ‘नो एन्ट्री’चा अलिखित फलक असतो. ‘उद्याचा कालिदास अनवाणी पायानं जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते’ या तत्त्वज्ञानावर त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळं क्षमता असूनही त्यांच्या वाट्याला जी अवहेलना, उपेक्षा आली त्याचं त्यांना काहीच सोयरसुतक नसतं. 

रमेश गोविंद कोणत्याही राजकीय विचारधारेला बांधील नाहीत. जे चांगलं ते स्वीकारायचं, वाईट ते अव्हेरायचं अशी त्यांची धारणा आहे. तरीही त्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या ऐन भरापासून म्हणजे 1957-58 पासून आजतागायत भारतातील राजकीय घडामोडींविषयी सातत्यानं चिंतन सुरूच असतं. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यावर पडलंय. त्यांच्या ‘बापूजींचे राष्ट्र’ या जळजळीत कवितेची दोन चरणे वानगीदाखल पाहूया - 

अन्नपाण्यातून येथे विष जाते चारले
न्याय आणि ज्ञान यांना उघड जाते मारले
कोटी कोटी बधीर मेंदू कोणी कैसे भारले?
बापूजींचे राष्ट्र मजला कधीच वाटे वारले

फुलवण्याचे सत्य ज्यांनी तेच थापा मारती
बेदिलीचे बीज जहरी हेच भडवे पेरती
रोज लागे रांड कोरी, फुगत जाती बंगले
बापूजींचे राष्ट्र मजला कधीच वाटे वारले...

पर्वतीवरील सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने मी वैद्यांच्या अनेक कविता अनेकदा त्यांच्याकडून ऐकल्यात. लोककवी मनमोहन नातू, रॉय किणीकर, माधव ज्युलियन, उमर खय्याम, कवी अनिल, कवी यशवंत, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, ग. वा. बेहरे, शिरीष पै, शांता शेळके, सुरेश भट यांच्याविषयीचे अनेक किस्से ते इतक्या रंगतदारपणे सांगतात की बस्स! प्रत्येक गोष्टीत सातत्य, सराव आणि सखोल विचार महत्त्वाचा याची जाणीव ते नव्या पिढीला करून देतात. याबाबत त्यांच्या कार्यक्रमाची एक आठवण मुद्दाम सांगणे अगत्याचे आहे.

2005 सालच्या ‘काव्यसप्ताहात’ 30 डिसेंबर रोजी त्यांचा किणीकर आणि मनमोहन यांच्या कवितांवर आधारित ‘दोन मनोरे गगनापार’ हा कार्यक्रम होणार होता. या सप्ताहातील मैफली म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंगच! पुण्यातील भारत स्काऊट ग्राऊंड संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम रूळलाय. त्यादिवशी खजिना विहिर चौकातून ‘चपराक’कडं जाताना साडेचारच्या दरम्यान वैद्य या संस्थेच्या सभागृहात जाताना दिसले. कार्यक्रम सात वाजता असताना हे इतक्या लवकर इकडं कसे असं वाटल्यानं मी माझाही मोर्चा तिकडे वळवला. गाडी लावून दहा-पंधरा मिनिटात आत पोहोचलो तर सभागृहातून कवितावाचनाचा आवाज येत होता. मोठ्या कुतूहलानं मी हळूच दरवाजा ढकलून आत गेलो तर व्यासपीठावरील माईकचा ताबा घेऊन ते कार्यक्रम सादर करीत होते. पूर्ण रिकाम्या सभागृहात मी एकटाच समोरच्या खुर्चिवर जाऊन बसलो आणि तो  संपूर्ण कार्यक्रम मी एकट्यानंच ऐकला. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी सांगितलं, ‘हा कार्यक्रमाचा सराव होता...’ त्यानंतर अर्ध्याच तासानं मी तीच मैफल पुन्हा काव्यरसिकांनी तुडुंब भरलेल्या त्याच सभागृहात ऐकली. रसिकांचा टाळ्यांचा कडकटात होत होता आणि त्यांच्या साहित्यसाधनेचा सराव माझ्या अंतःकरणाचा वेध घेत होता.

रामाच्या मागे उगा न गेली सीता
हे प्रेमच माझे कुराण आणि गीता

अशा ओळी लिहिणार्‍या वैद्यांनी कवितेवरच प्रेम केलं आणि कवितेसोबतच संसार केला. ‘माणूस माणूस जावा जोडत, इतकेच मला कवितेने शिकवले’ असे ते सांगतात. स्वर्गातल्या देवांच्या अमृतपानापेक्षा त्यांना भूतलावरची चटणी-भाकरी अधिक प्यारी आहे. म्हणूनच हा माणूस जगण्यावर प्रेम करतो आणि सदैव आनंदी असतो. त्यातूनच ते माणुसकीचा संदेश जगाला देतात. 

मंदीर-मस्जिद हवी कशाला?
आधी चांगला माणूस घडवा
तीच खरी रे ईद मुबारक
तोच खरा रे गुढीपाडवा

अशा प्रगल्भ आणि वास्तवादी ओळी त्यांचे सामर्थ्य सिद्ध करतात. त्यांची मुंबईच्या जीवनाचे दर्शन घडविणारी ‘बॉम्बे’ ही कविताही आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’नं गौरवानं प्रकाशित केली होती.

आभाळाच्या कडेस मर्डर
लोकल लोकल भुंकत जाई
या शहराला रूपयाखेरीज
दुसरी भाषा समजत नाही

अशी सुरूवात असलेल्या या कवितेत शेवटी ते म्हणतात,

मांसाच्या लोभाने जमले
इथे लांडगे फसफसणारे
आणि रावणासमोर उघडी
रूपयाखातर सीतामाई
पहा तिच्या दुःखाची दिंडी
दाद ईश्‍वरा मागत जाई
या शहराला...

वैद्यांचे ‘जिना बिलोरी’, ‘सळसळे सोन्याचा पिंपळ’, ‘निळाभोर मी सगळा’ असे उत्तमोत्तम कवितासंग्रह प्रकाशित आहेत. चिंचवडच्या मोरया गोसावी यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. मुंबईच्या जीवनावरच बेतलेली ‘टर्मिनस व्हिक्टोरिया’ ही अद्वितीय पे्रमकथा असलेली लघुकादंबरी ‘चपराक’नं प्रकाशित केलीय. असं सारं असूनही या कलावंताच्या आयुष्यात समाजाकडून मात्र घोर उपेक्षाच वाट्याला आली. त्यातूनच ते लिहितात -

तुम्हास अमृत देण्यासाठी
विषच केवळ प्यालो 
मी मृत्युला भ्यालो नाही
मी जगण्याला भ्यालो.

माणसाचा अंतरात्मा हलवण्याचे सामर्थ्य ज्या कवितेत असते ती खरी श्रेष्ठ कविता, असा त्यांचा सिद्धांत आहे. कवितामय जीवन जगणार्‍या या प्रतिभासंपन्न कविच्या कविताविषय चिंतनाचा हा आविष्कार पहा -

तान्ह्या बाळाच्या गालावरची 
तीट म्हणजे कविता
पांडुरंगाच्या चरणतळीची
वीट म्हणजे कविता
कविता म्हणजे
फूलपाकळ्यांवरील दहिंवर
कविता म्हणजे माणुसकीचा गहिंवर... 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092





10 comments:

  1. कवीमन लिलया ओळखणारे घनश्याम पाटील यांना सलाम! अप्रतिम लेख!!

    ReplyDelete
  2. वा फारच सुंदर। एका कसदार पण तरीही उपेक्षित कवीच्या कर्तृत्वाचा आटोपशीर पण समग्र असा धांडोळा आपण घेतलाय।
    रमेश गोविंद यांच्या विलक्षण प्रतिभेला नम्र प्रणाम।

    ReplyDelete
  3. खूप छान! आपले कवींच्या आणि कवितांच्याप्रती प्रेम असेच वाढत राहो!कवी रमेश गोविंद वैद्य आणि त्याच्या काव्य प्रतिभेला दंडवत!

    ReplyDelete
  4. व्वा!
    एका कविच्या कवितेचा भाव शब्दात पकडण्याचे सामर्थ्य फक्त एका कविमनाच्या शब्दप्रभूकडेच असु शकते.खुप छान.
    मनःपुर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  5. सुंदर रसग्रहण. अशा प्रतिभेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  6. घनशामसर तुम्हीं खरे कलेचे जाणकार आहात । कलाकार हा उपेक्षित असला तरी तुमच्यासारखा व्यासंगी त्याला शोधून त्याचा आणि कलेचा गौरवच करता आहात । मला अभिमान वाटतो तुमचा आणि चपराकचा सदस्य व वाचक असल्याचा । वैद्य सरांचेही खूप अभिनंदन ।

    ReplyDelete
  7. पाटील सर खूपच सुंदर लेख. आतापर्यंत फक्त लेख वाचले, पण कवितेचा लेख वाचला किंवा अभ्यासला नव्हता. सर तुम्ही ती संधी दिली. पाटील सर व वैद्य सर तुम्हाला त्रिवार सलाम...👌

    ReplyDelete
  8. खूप सुंदर लेखन.कविता आणि कवितेबद्दल ची संकल्पना खूप सुंदर शब्दात.शेवट अप्रतिम सर खुप अावडला.

    ReplyDelete
  9. वाह व्वा... खूप छान. अश्या प्रखर विचारांच्या कवीची सद्यस्थितीतही गरज आहे. वैद्य सरांचं अभिनंदन !
    हिऱ्याला पारखी भेटावा लागतो आणि जोहरीला अस्सल हिरा. तेव्हा हिऱ्याचे पैलू जगासमोर येतात आणि त्याचे मुल्य वाढते. तर,जोहरीच्या गुणग्राहकतेचं जगाला दर्शन होते. तो योग इथं घनःशामजींनी साधलाय असं वाटतं.
    हा दरवळ सर्वत्र पसरेल तेव्हा आसमंत सुगंधीत झाल्याशिवाय राहणार नाही.
    दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन !
    आणि, आभाळभर शुभेच्छा !

    ReplyDelete