प्रत्येक पालकांना वाटते की आपल्या मुलाने खूप शिकावे. रग्गड पैसा कमवावा. बंगला बांधावा, आलिशान सदनिका विकत घ्यावी. परदेशी बनावटीची गाडी त्याच्या घरासमोर असावी. ‘इंडिया विरूद्ध भारत’ या स्पर्धेत तो ‘इंडिया’तच असावा आणि गर्भश्रीमंतीत त्याने त्याचे आयुष्य व्यतिथ करावे.
पाल्याचे हित चिंतणे, त्याला त्या दृष्टिने घडविणे, तशा अपेक्षा ठेवणे यात गैर ते काय? मात्र सध्या या अपेक्षांच्या ओझ्याने कोवळ्या वयातच मुलांची कंबरडी मोडत आहेत. त्याची क्षमता न पाहता त्याच्याकडून इतक्या अपेक्षा केल्या जातात की, या स्पर्धेत कुबड्या घेऊन चालणेही त्याला अशक्य व्हावे! त्यात नैराश्याने ग्रासून आलेले मानसिक पंगुपण कायम राहते.
मुलं सुसंस्कृत झाले काय किंवा न झाले काय, त्यांनी सुशिक्षित मात्र झालेच पाहिजे असा कल दिसतो. आपल्या पाल्याने आयआयटीत जावे यासाठी चाललेली पालकांची धडपड पाहून आश्चर्य वाटते. राजस्थानातल्या कोटा शहरात अशा वर्गांचे पेव फुटले आहे. त्याठिकाणी तब्बल दीड लाख विद्यार्थी विविध वर्गातून आयआयटीची तयारी करतात. त्यांच्यात जीवघेणी स्पर्धा असते. या स्पर्धेतून तिथे गेल्यावर्षी 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मग आपली दिशा कोणती? पालकांना नेमके काय हवे? रविकुमार सुरपूर हे तिथले जिल्हाधिकारी. त्यांनी शिकवणी वर्गांच्या प्रमुखांसाठी भावनिक आवाहन करणारे एक पत्रक काढले. मुलांनी स्पर्धेचा अतिरेक करू नये, आपली आवड पाहून क्षेत्र निवडावे, आयुष्य मोलाचे आहे आणि आयआयटीतून अभियंता होणे म्हणजेच सर्वकाही नाही, हे त्यांनी ठासून मांडले आहे. तरीही पालक जागे होत नाहीत. अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलं जिकिरीला येतात. त्यासाठी अट्टाहास करतात आणि तोंडघशी पडतात.
सध्या मुलांना सुट्ट्या सुरू आहेत. पूर्वी सुटट्यात आपली धमाल असायची. मामाच्या गावला जाऊन चंगळ करायचे हे दिवस. विविध शारीरिक खेळ, बौद्धिक गमतीजमती असे सारे काही चालायचे. मात्र आजची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलीय. फेसबुक, व्हॉटस् ऍप, इंटरनेटवरचे खेळ यातच त्यांना स्वारस्य वाटते. सुटीच्या काळात खेळापेक्षा पुढच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जातेय. पूर्वी या दिवसात काही शिबिरे व्हायची. त्यांची जागाही अशा अभ्यासक्रमांच्या शिकवणी वर्गांनी घेतलीय. यातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास कसा घडणार?
ध्येयवादी तरूणांपेक्षा दिशाहीन तरूणांचे प्रमाण अधिक जोमाने वाढतेय. शिस्त आणि अभ्यासाच्या नावावर पालक या भरकटलेपणाला खतपाणीच घालतात. त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवतात. ते पूर्ण करण्यासाठी मग वाटेल त्या मार्गांचा अवलंब करायचा. एक साधे निरीक्षण पाहा. व्यसनाधीन मुला-मुलींचे प्रमाण झपाट्याने वाढलेय. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण. आठवी-नववीच्या मुलामुलींच्याही जोड्या जुळलेल्या असतात आणि त्यांच्यात अनेक विषयांवर ‘सखोल’ चर्चा होते. दूरचित्रवाणी मालिका आणि नवनवे चित्रपट यामुळे काहीजण काही ‘प्रयोग’ही करतात. त्यांच्या ‘अनुभवसंपन्नते’ची पुसटशी जाणिवही पालकांना नसते. ते मात्र त्यांच्याकडून अव्वल शालेय कामगिरीची वाट पाहत असतात.
आपल्या देशाला जशी ‘पुस्तकी किड्यां’ची गरज नाही; तशीच ‘अशा’ अनुभवसंपन्नतेचीही गरज नाही. संस्कार आणि संस्कृतीची बंधने त्यांच्यावर नकोच; मात्र त्याचे महत्त्वही त्यांना ठाऊक असायला हवे. एकीकडे देशाच्या महासत्तेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे उद्याच्या उज्ज्वल राष्ट्राचे भवितव्य असलेल्या मुलांच्या भावनेशी खेळ खेळायचा. हे आता थांबायला हवे. आपण एका विचित्र टप्प्यावर आहोत. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी मुलांचे संघटन केले. त्यांच्यावर शिस्तीचे संस्कार केले. साने गुरूजींनीही मुलांचे गोष्टीतून प्रबोधन केले. आपल्या फसलेल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादणारे पालकच सध्या बिथरले आहेत तिथे या नव्या पिढीला संस्कार कोण देणार? त्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्याने यांचे भावविश्व बदलत चालले आहे.
बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे दहावीपर्यंतची गाडी एका लयीत येते. पुढे मात्र प्रत्येकांची दिशा वेगळी. मुलांची स्वप्ने आणि पालकांच्या अपेक्षा यात त्यांच्या आयुष्याचे मातेरे होते. मुलांनी अभियंता व्हावे, वैद्यकीय क्षेत्रात जाऊन खोर्याने पैसा ओढावा अशीच अनेक पालकांची अपेक्षा असते. मुलांपुढे काहीच ध्येय नसताना देखील त्यांच्या मनावर या क्षेत्राची लालसा बिंबवली जाते. त्यातूनच सुरू होते जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेचा निकाल कधीच लागत नाही. आयुष्यभर फक्त पळत रहायचे. ‘आणखी हवे, आणखी हवे’ चा जयघोष सुरूच ठेवायचा. मानसिक समाधान, तृप्ती, आत्मानंद या गोष्टी दुर्मीळ होत चालल्या आहेत. फक्त पैसा उकळणारी यंत्रं आपल्याला हवीत. आपला देश चालवणारे बहुतेक राज्यकर्ते, स्पर्धा परीक्षांद्वारे पुढे गेलेले प्रशासकीय अधिकारी, घटनातज्ज्ञ विधिज्ञ, मुलांना ज्ञानाची शिदोरी देणारे प्राध्यापक-शिक्षक, समाजाचे चित्र धाडसाने मांडणारे पत्रकार असे समाजातील बहुतेक महत्त्वाचे घटक ‘कला शाखेद्वारे’ पुढे येतात. विज्ञान किंवा वाणिज्य विषय न घेतल्याने त्यांचे काही अडत नाही. तरीही पालकांना आपला मुलगा अभियंता व्हावा, डॉक्टर व्हावा, बँकेत लागावा असेच वाटते. हे वाटणे गैर नाही. त्यांच्या त्यांच्या कलानुसार मुले त्या त्या क्षेत्रात आपले भवितव्य गाजवतीलही! मात्र त्यांच्यावर ते लादणे आणि त्यातून विपरीत घडणे आपल्याला परवडणारे नाही.
18 ते 30 या वयोगटातील मुलामुलींच्या मृत्युचे प्रमाण बघा. शालेय जीवनात अपयश आल्याने आत्महत्या, नैराश्याने मृत्युला कवटाळले, प्रेमप्रकरणातून जीवनयात्रा संपवली, व्यसनाच्या आहारी जाऊन अखेर, नशेत गाडी चालवल्याने अपघातात मृत्यू या व अशा कितीतरी बातम्या रोजच पाहून अक्षरशः चर्र होते. तरूणाई हे राष्ट्राचे भवितव्य आहे. अशा घटना म्हणजे आपल्या राष्ट्राचे फार मोठे नुकसान आहे. पालकांनी तरूण मुलामुलींचा मृत्यू डोळ्याने पाहणे यापेक्षा भयंकर दुःख कोणते? त्यातून त्यांना सावरणे शक्य नाही. काहीजण तसे ‘दाखवत’ असले तरी ते सत्य नाही. ती स्वतःची फसवणूक असते. शत्रूराष्ट्राकडून होणारे आक्रमण जितके घातक आहे त्याहून आपल्या तरूणाईचे असे मृत्यू भीषण आहेत. हे थांबायला हवे. निमय बनवून किंवा धाकधोपटशाहीने हे चित्र बदलणारे नाही. पालकांनी त्यासाठी सजग असायला हवे.
साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प, अभिनय अशा कोणत्याही क्षेत्रात मुलांना काम करू द्या! त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नकात. यावर अनेकांनी लेखन केले, चित्रपटाद्वारे प्रबोधन केले. तरीही आपली आसक्ती संपत नाही. आजजी मुलं उद्याच्या बलशाली राष्ट्राचा आत्मा आहेत. आपल्या फुटकळ महत्त्वाकांक्षेपोटी आपण त्यांचा गळा घोटतोय. हे पातक थांबायला, थांबवायला हवे. आत्मकेंद्रीत वृत्ती सोडून मनाचे व्यापकत्व दाखवले नाही तर पश्चातापाशिवाय हाती काहीच राहणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, ‘साहित्य चपराक’, पुणे
7057292092
The artical is realy releated to our lives
ReplyDelete