Saturday, April 2, 2016

विश्‍वास नसेकर!

विश्‍वास नसेकर!

वाद आणि वितंडवाद याशिवाय सध्या कोणतीही साहित्य संमेलने पार पडतच नाहीत. अनेकांचे हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप, मानापमान, आयोजक यामुळेच संमेलने चर्चेत येतात. साहित्यिक विषयांवरून चर्चेत येणारी संमेलने दुर्मीळ होत चालली आहेत. भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा, संशोधन या व अशा क्षेत्रात कमालीचा दुष्काळ पडलाय. मोठमोठे लेखकही रतीब टाकल्याप्रमाणे तेचतेच विषय वेगवेगळ्या व्यासपीठावरून ठासून मांडत असतात. तेच कवी, त्यांच्या त्याच कविता यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही कंटाळवाणे होत चालले आहे. असो.
तर सध्या मराठवाड्यात चर्चा आहे ती 37 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची. येत्या 9 व 10 एप्रिल रोजी जालना येथे हे संमेलन होणार आहे. दत्ता भगत हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मागच्या वर्षी सुधाकर वायचळकर आणि रामचंद्र तिरूके यांनी प्रयत्न करून उदगीरमध्ये या संमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रम पत्रिका ठरल्यानंतर त्याची तयारीही जोरदार झाली. मात्र ऐनवेळी कुठेतरी पाणी मुरले आणि उदगीरचे हे संमेलन रद्द करावे लागले. ‘प्रशासकीय अधिकारी’ अशी ओळख असलेले लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. उदगीरचे संमेलन रद्द झाल्याने नांदेड येथील एका जिल्हा दैनिकाने हे संमेलन घेतले. सुदैवाने अध्यक्षस्थानी देशमुखच होते.
काही महिन्यांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. कौतुकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. सर्वच्या सर्व जागा पटकावण्यात ठाले पाटलांनी बाजी मारली. मराठवाड्यात त्यांचे मोठे प्रस्थ. साहित्य वर्तुळातही चांगलाच दबदबा. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचे नेतृत्व ते गेली अनेक वर्ष करीत आहेत. इतकेच नाही तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असावे याबाबत ठाले पाटलांची भूमिका नेहमीच निर्णायक असते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या 37 व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विनयकुमार कोठारी हे असून जालना संस्कृत महाविद्यालय समितिने या संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रा. जयराम खेडेकर हे निमंत्रक तर डॉ. संजीवनी तडेगावकर या कार्यवाह आहेत. दत्ता भगत यांच्यासारखा तगडा संमेलनाध्यक्ष लाभल्याने अनेकांना आनंद झाला आहे. मुळचे मराठवाड्यातील असलेले मात्र सध्या पुण्यात स्थायिक झालेले कवी, लेखक आणि समीक्षक प्रा. विश्‍वास वसेकर यांनी अविवेक दाखवत यंदाच्या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
मद्य, स्त्री, कविता आणि नश्‍वरतेची जाणीव यापैकी प्रत्येक गोष्ट माणसाला आयुष्यातून उठवते. मग या चारही गोष्टी ज्याच्या आयुष्यात आल्या असतील त्याचे काय होते हे पाहण्यासाठी विश्‍वास वसेकर यांच्यासारख्या लोकांकडे पहावे! वसेकर हे सातत्याने लिहित असतात. त्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कारही मिळालेला आहे. आयुष्यभर अध्यापन क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांच्यात म्हणावी तशी प्रगल्भता दिसत नाही. नुकतेच त्यांचे ‘तहानलेले पाणी’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षांशी असलेल्या संबंधांमुळे त्यांनी त्यांचे हे पुस्तक भगत यांना अभिप्रायार्थ पाठवले.
नवोदित किंवा अन्य लेखकांनी प्रस्थापित आणि मान्यवर लेखकांना आपली पुस्तके पाठवणे यात नवे असे काही नाही. भगत यांना ही पुस्तके मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले. या पुस्तकातील त्रुटी प्रांजळपणे दाखवून देत त्यांनी वसेकरांना प्रामाणिक अभिप्राय पाठवला. या प्रकाराने वसेकर बिथरले. आपण लिहिले ते सर्वोच्च, अशा भ्रमात काहीजण असतात. दत्ता भगत यांनी या पुस्तकातील सुमार बाजू पुढे आणल्याने वसेकरांचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी ‘यंदाच्या संमेलनाध्यक्षांनी माझ्या साहित्याचा अपमान केला’ अशी बोंब ठोकत संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
विश्‍वास वसेकर यांचा निमंत्रितांच्या कवी संमेलनात सहभाग होता. मात्र दत्ता भगतांनी थारा न दिल्याने त्यांना संमेलनात जाणे ‘अप्रतिष्ठेचे’ वाटले. त्यामुळे भगत यांचा निषेध म्हणून ते संमेलनाला जाणार नाहीत. वसेकरांसारखी टिनपाट मंडळी संमेलनाला गेली नाहीत म्हणून असा कितीसा फरक पडणार? पण यानिमित्ताने त्यांनी आपला जो वैचारिक आणि बौद्धिक दुष्काळ दाखवून दिला आहे तो हास्यास्पद आहे.
विश्‍वास वसेकर यांना भगत यांनी पंधरा वर्षांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या घरात झाप झाप झापले होते. तेव्हापासूनच वसेकरांच्या मनात भगत यांच्याविषयी आढी असावी. त्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांनी भगत यांना अभिप्रायार्थ पुस्तके पाठवली. भगतांनी अभिप्राय पाठवल्यानंतर वसेकरांनी त्यांना भलेमोठे पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात वसेकर भगत यांना लिहितात, ‘‘तहानलेले पाणी हे माझे पुस्तक शुद्ध वाङ्मयीन अपेक्षेतून मी तुम्हाला पाठवले; पण आज कळले की तुम्ही स्वमनातल्या हिणकसाचे मोठेच संग्राहक आहात. तुमच्या या हिणकसाला तुम्ही स्वत:ची अस्मिता समजता हा फार मोठा अंतर्विरोध आहे. तुमचे हिणकस तुम्हाला लखलाभ असो. कुरूंदकरांच्या मृत्यूवार्तेने मी कमालीचा हादरलो, हळहळलो. त्यावेळी उत्स्फूर्तपणे मी सुंदर मृत्यूलेखही लिहिला आहे. माझी मर्यादा ही आहे की ‘रसाळ स्कूल’ मधून आल्यामुळे मी त्यांचा भक्त होऊ शकलो नाही! आणि कुरूंदकरांच्या मृत्यूमुळे आपण बालविधवा झालो असे नांदेडच्या लेखक कवींना वाटले तसे मला वाटले नाही. त्यांच्या लेखनापुढे आणि वक्तृत्वापुढे आपली बुद्धी गहाण टाकावी इतका मतिमंद मी नाही.’’
वसेकर यानिमित्ताने आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना लिहितात, ‘‘वाईट याचे वाटते की कुरूंदकरांना जाऊन जवळजवळ अर्धशतक लोटलं तरी त्यांचे शिष्य अजून अविकसितच आहेत. ते गेले तेव्हा त्यांच्या या बालविधवा धड ऋतुस्नातही झाल्या नव्हत्या. एकविसाव्या शतकात, वयात आल्यानंतरही त्यांनी पुनर्विवाह करू नये, जन्मभर त्यांची विधवा म्हणून जगावे हे आपला समाज अजूनही किती मागासलेला आहे याचे गमक आहे.’’
वसेकर यांनी भगत यांना अभिप्रायार्थ जी दोन पुस्तके पाठवली ती रजिस्टर पोस्टाने परत मागवली आहेत. मनाजोगता अभिप्राय न दिल्याने पुस्तके परत पाठवा किंवा त्याचे मूल्य पोस्टाने पाठवून द्या अशी तंबीही त्यांनी दिलीय. साहित्यक्षेत्र कोणत्या बजबजपुरीतून जात आहे याचेच हे उदाहरण!
विश्‍वास वसेकर हे ‘चपराक’चे लेखक आहेत. मागच्या वर्षी घुमान संमेलनाच्या आधी चार-पाच दिवस ते ‘चपराक’ कार्यालयात आले. त्यांचा ‘तरी आम्ही मतदारराजे’ हा काव्यसंग्रह ‘चपराक’ने प्रकाशित करावा यासाठी त्यांनी गळ घातली. चार-पाच दिवसात पुस्तक होणे शक्य नव्हते. मात्र ते उठायलाच तयार नाहीत. घुमानला त्याचे प्रकाशन झालेच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. आम्ही दिवसरात्र एक करून त्या धावपळीतही तो संग्रह प्रकाशित केला. 31 मार्चला घुमानच्या तयारीविषयी आमचे त्यांच्याशी बोलणेही झाले. मात्र दुसर्‍या दिवशी ते संमेलनाला आलेच नाहीत. शेवटी घुमानमध्ये त्यांच्या अनुपस्थितीत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आयोजक भारत देसडला यांच्या हस्ते आम्ही या संग्रहाचे प्रकाशन ‘चपराक’च्या ग्रंथदालनातच केले. तेव्हापासूनच त्यांचे नामकरण आम्ही ‘विश्‍वास नसेकर’ असे केले आहे.
जालना येथील संमेलनाला अध्यक्षांवर नाराज असल्याने ते जाणार नाहीत असे सांगत असले तरी 10 तारखेला विजय तरवडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते करणार असल्याचे कळते. हा कार्यक्रम जालन्याच्याही आधी ‘पूर्वनियोजित’ आहे. त्यामुळे वसेकरांनी कितीही आव आणला तरी त्यांचे इप्सित साध्य होणार नाही.
दत्ता भगत यांनी वसेकरांच्या ‘तहानलेले पाणी’ या पुस्तकाबाबत मांडलेली मते फारच सौम्य आहेत. ‘क्लेषकारक आयुष्याचा माफीनामा’ या पठडीतले ते पुस्तक आहे. आपल्या मनातील लैंगिक वासना विकृत स्वरूपात मांडणे, कुणाकुणासोबत किती वेळा दारू प्यालो याचे रसभरीत वर्णन करणे, नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासह अनेक ज्येष्ठांवर चिखलफेक करणे आणि वर आपण त्यांचे किती चांगले मित्र आहोत हे ठासून मांडणे, अनेक कपोलकल्पित गोष्टी चरित्राच्या नावावर खपवणे हे सारे उद्योग वसेकरांनी केलेले आहेत.
या पुस्तकासोबतच त्यांचे ‘पोट्रेट पोएम्स’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दलाई लामापासून ते इंदिरा गांधी, अमृता प्रीतम यांच्यापर्यंत त्यांच्यावर प्रभाव पाडणार्‍या अनेकांवर त्यांनी चरित्रात्मक कविता या संग्रहात केल्या आहेत. त्यांचा स्नेही म्हणून ‘राजकुमार’या शीर्षकाची एक सुंदर रचना त्यांनी ‘चपराक’चा संपादक या नात्याने माझ्यावरही केली आहे. हा माझा बहुमान असला तरी ‘तहानलेले पाणी’बाबतची प्रांजळ मते व्यक्त करणे हे दत्ता भगत यांच्याप्रमाणेच माझेही सांस्कृतिक कर्तव्य आहे.
- घनश्याम पाटील, 

संपादक ‘चपराक’
7057292092

No comments:

Post a Comment