Saturday, March 19, 2016

लोकसत्ता की शोकसत्ता?

लोकशाही व्यवस्थेत वृत्तपत्रांचे स्थान महत्त्वाचे आहे. व्यवस्थेचा हा चौथा स्तंभ समजला जातो. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडीलकर अशा धुरीणांनी लेखणीची ताकत अनेकवेळा दाखवून दिली. परिवर्तनाच्या चळवळीत माध्यमांना पर्याय नाही. मात्र भारतीय वृत्तपत्र सृष्टीत महत्त्वाचे स्थान असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाच्या ‘लोकसत्ता‘ने या वैचारिक परंपरेला तडा दिला आहे. ‘लोकसत्ता’सारख्या अग्रणी वृत्तपत्राने माफी मागत चक्क अग्रलेख परत घेतल्याने ‘लोकसत्ता’चा ‘शोकसत्ता’ झाल्याची चर्चा आहे. मराठी वृत्तपत्रांसाठी तर ही अतिशय दुर्दैवी आणि काळीकुट्ट घटना आहे. ‘कुबेर’ आडनावाच्या एका संपादकाची ही ‘गरिबी’ समजून घेणे वाटते तेवढी सोपी घटना नाही.

असंतांचे संत
क्षमस्व! प्रिय वाचक! ‘असंतांचे संत’ या 17 मार्च 2016 च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. - संपादक


अशी इवलीशी चौकट कुबेरांनी 18 मार्चच्या ‘लोकसत्ता’मध्ये छापून ‘अग्रलेख वापसी’ केली आहे. काही साहित्यिकांनी यापूर्वी ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम राबवली होती. हे परत केलेले पुरस्कार पुन्हा काहींनी स्वीकारले. देशात अशा नाट्यपूर्ण घडामोडी सुरू असतानाच आपल्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजले. श्रीपाल सबनीस नावाचा एक समीक्षक संमेलनाध्यक्ष झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी भाषा वापरत काही तारे तोडले. ‘कोण हे सबनीस?’ असा प्रश्‍न त्यावेळी केला जात होता. हे चित्र पाहून ‘लोकसत्ता’ने त्यांच्याविषयी ‘श्रीपाल की शिशुपाल?’ असा अग्रलेख लिहिला. ‘चपराक’नेही सबनीसांचे ‘बौद्धिक’ घेतले. या प्रकाराने सबनीसांनी ‘मी माझे भाषण माघार घेतो’ असे म्हणत भाषण वापसी केली. झालेले भाषण माघार कसे घ्यायचे हा प्रश्‍न आम्हाला पडला होता. मात्र वादावर पडदा पडतोय म्हणून आम्ही त्यावर फारशी चर्चा केली नाही. मराठी साहित्य, संस्कृती, समीक्षा, भाषा या दृष्टीने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे हे अत्यंत दुर्दैवी होते. संमेलनाध्यक्षांची बौद्धिक क्षमता आणि त्यांना लागलेली प्रसिद्धीची चटक पाहता तिकडे आमच्याप्रमाणेच अनेकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. असाच प्रकार कुबेरांच्या बाबत घडल्याने सांस्कृतिक क्षेत्रात असलेली दहशत पुन्हा एकदा वाचकांसमोर आली आहे.
सबनीस, कुबेर अशा माणसांची तशीही फारशी विश्‍वासार्हता नाही. त्यांनी काय लिहावे आणि काय बोलावे हा त्यांच्या आणि त्यांच्या मालकांचा प्रश्‍न आहे. मात्र ते ज्या संस्थांचे, पदांचे प्रतिनिधित्व करतात त्याला मात्र यामुळे अप्रतिष्ठा येत आहे. सबनीस फारसे गंभीरपणे घेण्यालायक व्यक्तिमत्त्व नाही; मात्र गिरीश कुबेर भूमिका घेणारे संपादक म्हणून ओळखले जातात. चेंबरमध्ये बसून अग्रलेखाची पानेच्या पाने खरडणारे कुबेर आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत. बर्‍याचवेळा त्यांचे अग्रलेख भांडवलदारधार्जिने असतात. ते चूक की बरोबर हा चर्चेचा विषय असू शकतो; पण ‘अग्रलेख वापसी’चे समर्थन कुणीही सुज्ञ व्यक्ती करू शकणार नाही. कालचा अग्रलेख आज दिलगिरी व्यक्त करत माघार घ्यावा लागतो म्हणजे गिरीश कुबेर यांच्यावर किती दबाव आला असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यातही त्यांनी ‘मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो’ अशी संपादकाला न शोभणारी एकेरी भाषा वापरली आहे. ‘पगारी संपादकां’चे कसे हाल होतात यावर अनेक वेळा चर्चा होत असली तरी कुबेरांच्या या कृतीतून ते प्रत्यक्ष दिसून आले आहे.
अग्रलेख माघार न घेता अन्य सहकार्‍यांनी त्याचा प्रतिवाद करणे, तटस्थपणे त्याविषयीची दुसरी बाजू मांडणे, ज्यांना तो अग्रलेख पटला नाही त्यांनी लोकशाही मार्गाने कुबेरांना आणि ‘लोकसत्ते’ला न्यायालयात खेचणे असे लोकशाही मार्ग उपलब्ध असताना कुबेरांनी चक्क माघार घेत वृत्तपत्राच्या मूलतत्वालाच तिलांजली दिली आहे. असा नामुष्कीचा प्रकार आजवर कोणत्याही संपादकावर आला नाही आणि यापुढेही येऊ नये. ‘पत्रकारांनी नेहमी दुसरी बाजू बघावी. विरोधी प्रवाह समजून घेतले तरच तुम्ही ठामपणे लिहू शकता’ असे उपदेशाचे प्रवचन झाडणारे गिरीश कुबेर हेच का? असाही प्रश्‍न अनेकांना पडला आहे. कुबेर लोकसत्तेच्या चेंबरमध्ये बसून अग्रलेख लिहित असल्याने त्यावेळी त्यांनी मद्यपान केले असण्याचीही शक्यता नाही! मग हे कसे घडले?
मदर तेरेसा या संत नव्हत्या तर एक सामान्य धर्मप्रसारक होत्या हे अनेकांनी अनेकवेळा सिद्ध केलेले सत्य आहे. त्यांचे सेवा-सुश्रुषेचे कार्य महत्त्वाचे असले तरी त्यातून त्यांनी ख्रिश्‍चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच स्वत:ला वाहून घेतले होेते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. खुद्द मदर तेरेसा यांनीही हे आपल्या कृतीतून कायम दाखवून दिले आहे. हिंदू धर्मातील विविध संत-महंतांवर आपल्या लेखणीद्वारे तुटून पडणार्‍या कुबेरांनी कधी नव्हे ते या विषयाला हात घालत सत्य मांडले. विविध समाजमाध्यमांद्वारे त्यांचा तो अग्रलेख मोठ्या प्रमाणात वाचला गेला. एकांगी भूमिकेमुळे ज्या वाचकांनी ‘लोकसत्ता’ वाचणे कायमचे सोडून दिले त्यांनीही फेसबुक, ट्वीटरसारख्या माध्यमातून या अग्रलेखाचे समर्थन केले. हा अग्रलेख वाचकप्रिय होत असतानाच कुबेरांनी तो माघार घेण्याची घोषणा केली.
बरे! कालच्या वृत्तपत्रातील अग्रलेख आज कसा माघार घ्यायचा हेही आम्हास कळले नाही. त्यांच्या वृत्तपत्राचा जेवढा खप आहे त्याहून कितीतरी मोठ्या प्रमाणात हा अग्रलेख वाचला गेला. मध्यंतरी शेतकर्‍यांच्या विरोधी कुबेरांनी अग्रलेख लिहिला आणि त्यांचे लेखन म्हणजे अग्रलेख नसतात तर ‘हाग्रलेख’ असतात अशी टीका झाली. संपादकांनी कोणत्या विषयावर काय लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. घटनेच्या कलम 19 अ अन्वये आपणास विचारस्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र हिंदू धर्मावर कायम पोटतिडिकेने लिहिणार्‍या आणि ‘असहिष्णूते’वरून रान पेटवणार्‍या कुबेरांना इतर धर्मावर टीका केली की कसे शेपूट घालून पळावे लागते याची प्रचिती आली. हिंदू धर्मावर कुणी काहीही लिहिले तरी आपण खपवून घेतो. ख्रिश्‍चन-मुस्लिम अशा कडवट धर्मावर लिहिल्यानंतर मात्र अग्रलेख माघार घ्यावे लागतात; व्यंग्यचित्रे छापल्यावरही खुनाच्या राशी पडतात हा इतिहास सर्वपरिचित आहे. कुबेरांनी पळपुटेपणा करत माघार घेतल्याने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे नाक कापले गेले आहे.
एखाद्या चित्रपटावर, नाटकावर बंदी आणणे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे आणि आता एका आघाडीच्या वृत्तपत्राने त्याचाच कित्ता गिरवत चक्क अग्रलेख मागे घेणे हे प्रचंड क्लेशकारक आहे. मुळात बहुतांश वृत्तपत्रातील संपादकीय लेख वाचक सध्या वाचत नाहीत. संपादकांनीही केवळ औपचारिकता पूर्ण करायची आणि तेवढी जागा भरायची असा खेळ सुरू आहे. याला जी चार-दोन वृत्तपत्रे अपवाद होती त्यात ‘लोकसत्ता’चा समावेश आवर्जून व्हायचा. या प्रतिमेला कुबेरांनी तडा दिला आहे. त्यांनी हा अग्रलेख का माघार घेतला, नक्की कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे तरी स्पष्ट करायला हवे होते.
‘जॅकेट कव्हर’ या नावाने पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात छापणे ‘लोकसत्ता’ने सुरू केले त्यावेळी ‘बाईने कपाळावरील कुंकू कधीही विकू नये’ अशी प्रतिक्रिया आम्ही दिली होती. पुढे जॅकेट कव्हर हा प्रकार सर्वच वृत्तपत्रांनी सुरू केला. ‘लोकसत्ता’ने  अग्रलेख माघार घेऊन एक दुर्दैवी पाऊल टाकले आहे. याची री इतर वृत्तपत्रांनी ओढू नये म्हणजे मिळवली. ‘लोकसत्ता’ आज खर्‍याअर्थी ‘शोकसत्ता’ झाला अशा ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या दुर्दैवाने सत्य ठरू नयेत असेच आम्हास अजूनही वाटते. 

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

12 comments:

  1. घनःश्यामजी,
    आपण तटस्थपणे विश्लेशण केले आहे. हा मराठी वृत्तपत्रसृष्टीसाठी काळा दिवसच म्हटला पाहीजे. हिंदू धर्मावर कुणीही यावे आनी टपली मिरुन जावे अशी स्थीती असतांना इतर धर्मीयांबाबत मात्र सुधारणावादी शेपूट घालण्याची वृत्ती बाळगतात हेच पुनाह सिध्द झाले आहे.

    ReplyDelete
  2. Aagrlekh vapas gheny pekshy kuber yani sampadak padacha rajinama malkachy todavar marun baher padayla pahije hote...

    ReplyDelete
  3. Aagrlekh vapas gheny pekshy kuber yani sampadak padacha rajinama malkachy todavar marun baher padayla pahije hote...

    ReplyDelete
  4. पाटील सर, कुबेरांनी सन्मानाने राजीनामा दिला असता तर ते निश्चितच मोठे झाले असते !

    ReplyDelete
  5. पाटील सर, कुबेरांनी सन्मानाने राजीनामा दिला असता तर ते निश्चितच मोठे झाले असते !

    ReplyDelete
  6. कुबेर अभ्यासु असतील पण लाचारही आहेत हेच यातून सिध्द होतयं

    ReplyDelete
  7. Loksatta is owned by ACTS CHRISTIAN MIMISTRY. Their mission is to downsize Hindus and their culture but uphold Roman Catholic Sonia and her so called secular congress. Kuber forgot who his paymasters are.

    ReplyDelete
  8. Loksatta is owned by ACTS CHRISTIAN MIMISTRY. Their mission is to downsize Hindus and their culture but uphold Roman Catholic Sonia and her so called secular congress. Kuber forgot who his paymasters are.

    ReplyDelete
  9. Mr Patil you need to study deeply ,the dynamic personality of Dr Kumar

    ReplyDelete
  10. Mr Patil you need to study deeply ,the dynamic personality of Dr Kumar

    ReplyDelete
  11. सबनीसांना मोदींच्या वक्तव्यावरून माफी मागायला लावणारे हिंदुत्ववादीच होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला (बिनपगारी असूनही) माफी मागावी लागते म्हणजे किती दबाव आला असेल. मॉर्निंग वॉकला जात जा म्हणून गर्भित धमकी दिली ते काय गांधीवादी होते का?

    ReplyDelete
  12. सबनीसांना मोदींच्या वक्तव्यावरून माफी मागायला लावणारे हिंदुत्ववादीच होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला (बिनपगारी असूनही) माफी मागावी लागते म्हणजे किती दबाव आला असेल. मॉर्निंग वॉकला जात जा म्हणून गर्भित धमकी दिली ते काय गांधीवादी होते का?

    ReplyDelete