घुमान येथील 'चपराक प्रकाशन'च्या दालनात साहित्य रसिकांनी अशी गर्दी केली होती. |
साप्ताहिक ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांचा एक आग्रह मला टाळताच आला नाही. काय होता तो आग्रह? तर, ‘‘काय वाट्टेल ते झाले तरी तुम्ही आमच्याबरोबर पंजाबच्या घुमान येथील साहित्य संमेलनाला आलेच पाहिजे.’’ त्यांच्या आग्रहात कळकळ होती. विलक्षण कळकळ! त्यांना नाही म्हणणं शक्यच झालं नाही. दरम्यानच्या काळात उत्सुकता म्हणून घुमान व संत नामदेवांबद्दल हाताशी लागेल ते वाचत होतोच. त्यातून एक लक्षात आलं होतं. मराठ्यांचा भारतभर संचार हा खूप पूर्वीपासून होताच. मात्र, त्याही आधी संतांची देखील एक फळी दोन-दोन हजार मैल पायपीट करत भारतभर फिरत होती. मराठी योद्ध्यांच्या व मराठी संतांच्या या हालचालींमुळं खूप मोठं राजकारण आकाराला येत होतं त्या काळात! ते राजकारण माणसं जोडण्याचं होतं. देश जोडण्याचं होतं. महाराष्ट्राची राजकीय व आध्यात्मिक ताकत सगळ्या देशालाच कवेत घेत होती व देशही या ताकदीवर विसंबून होता. महाराष्ट्रावर विश्वास ठेवून होता. दळणवळणाची कसलीही आधुनिक साधनं नसलेल्या काळात हा चमत्कार घडत होता. आपल्या पूर्वजांचे हे उपद्व्याप (उपद्व्याप हा शब्द सकारात्मक अर्थानं घ्यावा) वाचताना जीभ आश्चर्यानं टाळूला चिकटत होती. पानिपतावर दोन वेळा जाऊन आलो होतो. एकदा तर पुणे ते पानिपत हे एकवीसशे किलोमीटर अंतर दुचाकीवर पार केलं. जिथं एक लाख मराठी बांगड्या फुटल्या, तिथं नुसतं जाऊन येणं कठीण होतं का? हीच गोष्ट घुमानबद्दल होती. संत नामदेव तिथं अठरा वर्षे राहिले होते. त्यांची 61 पदे ‘गुरूग्रंथसाहिब’ या शीखांच्या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. गुरूनानक व गुरूगोविंदसिंगांइतकंच महत्त्वाचं स्थान नामदेवांनी प्राप्त केलं होतं. हा काय चमत्कार होता? घुमानला गेल्याशिवाय ते कळणार नव्हतं. तिथं जाऊन भोजन झोडून परतायचं असं अजिबातच नव्हतं. परिस्थिती जाणून घ्यायची होती. इतिहास व वर्तमानाची सांगड घालता येते का ते पहायचं होतं. खरंतर घुमानला संमेलन होतंंय हे जाहीर झाल्यावर माझं पित्त खवळलं होतं, हे मोकळेपणानं सांगितलं पाहिजे; मात्र नंतर जाणवलं, आपण खूप लवकर संतापतो. तसंही डॉ. भालचंद्र नेमाडे व डॉ. सदानंद मोरे या दोन दिग्गजांमध्ये सापडून माझ्यासारख्या अनेकांचं सँडविच झालं होतं; पण शेवटी मनानं कौल दिला, गेलं पाहिजे. डॉ. भालचंद्र नेमाडे हे कायमच श्रद्धास्थानी असतील यात वादच नाही; मात्र काही वेळा आतला आवाज ऐकावा लागतो आणि तो आवाज तुम्हाला निराश करत नाही. संमेलनातली प्रत्येक गोष्ट आवडली असं अजिबातच नाही; मात्र उठता-बसता आयोजकांच्या नावानं बोटं मोडावीत असं तर त्याहून नाही. शेकडो माणसं संमेलनासाठी राबत होती. यात पंजाबमधले अनेक शीख बांधवदेखील आले. त्यांच्या या कष्टाला मोठं मोल नक्कीच होतं. पंजाबची राजकीय, प्रशासकीय व पोलीस यंत्रणा. ती तर तन, मन, धनानं या संमेलनासाठी धावून आली. मग या प्रेमाला नुसता प्रतिसाद देण्यानं काय बिघडणार होतं?
एक एप्रिलला पहाटे साडेचार वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोचलो, तर तिथं शेकडो जणांची गर्दी उसळलेली! सगळे घुमानला निघालेले; पण पहाटे पहाटे पहिल्याच घासाला खडा लागावा असं घडलं. ‘‘रेल्वे लेट आहे’’ असं कुणीतरी म्हणालं. त्यावर कुणीतरी म्हणालं, ‘‘हे एप्रिल फूल आहे.’’ मात्र, एक तास-दोन तास झाले तरी गाडीचा पत्ता नाही. तीन तास, चार तास उलटून गेले आणि अनेकांचा संयम सुटला. महामंडळाच्या नावानं बोंबाबोंब सुरू झाली. पुणेकर अशा तावातावानं बोलू लागले की जणू काही माधवी वैद्यच रेल्वे चालवत होत्या!! पेटापेटी सुरू झाली आणि बातमीच्या प्रतिक्षेत असलेल्या पत्रकारांनी आपापली दांडकी बाहेर काढली. मला ‘पुण्यनगरी’च्या पत्रकारानं विचारलं. मी म्हटलं, ‘‘दोन हजार कि. मी. प्रवास करायचा आहे. मुख्य म्हणजे संमेलनाला गांभीर्यानं उपस्थित रहायचं आहे. हे असले अडथळे गृहित धरले पाहिजेत.’’ मात्र गाडी उशीरा आल्याचा एक फायदा झाला. त्यामुळं एकमेकांशी बोलता आलं. संवाद, संवादामुळं ओळखी झाल्या. गाडी वेळेवर आली असती तर अनेकजण गाडीत सरळ झोपून गेले असते. माझा पत्रकार मित्र प्रशांत चव्हाण व त्याच्या सहकारी अर्चना माने, दैनिक ‘सुराज्य’चा विजय म्हस्के व ‘मिड डे’ची चैत्राली देशमुख अशा आम्ही पाच सहा जणांनी सरळ जवळचं इराण्याचं हॉटेल गाठलं व गप्पा मारत बनमस्का व चहाचा आस्वाद घेतला. अखेर एकदाची गाडी आली ती सकाळी दहा वाजता. पाच तास लेट! पण गाडी आली हे काय कमी होतं?आमचा डबा होता ‘एम-9.’ साप्ताहिक ‘चपराक’ची बारा जणांची टीम होती. गाडी सुरू झाली व एकेक चमत्कार सुरू झाला. घनश्याम पाटलांनी सूत्रं हातात घेतली व काव्यशास्त्रविनोदाची अशी काही मैफल जमली की विचारता सोय नाही. कवी व लेखक समीर नेर्लेकर, कवयित्री सौ. मंजिरी पाटील, कवी शांताराम डफळ ही ‘चपराक’ टीम मधील मंडळी. त्यांच्या काव्यवाचनानं मन तृप्त तृप्त झालं! सुरूवातीला काही गंभीर कवितांचं वाचन केल्यानंतर नेर्लेकरांनी एक मिश्किल कविता आपल्या पोतडीतून बाहेर काढली. एका बाजूला ती मिश्किल होती व दुसर्या बाजूला हसता हसता डोळ्यात टचकन अश्रू यावेत अशीदेखील,
मी रचिले प्रेमकाव्य तुझ्यावर
तू लसूण सोलीत होतीस तेव्हा
टाकला तुझ्यावर कटाक्ष तिरका
तू वरणाला दिलास तडका
मनी चांदणे बरसत होते
तू हिशोब लिहित होतीस तेव्हा
मी गजर्याची पुडी उलगडली
तू नाक मुरडले होतेस तेव्हा
मी प्रणयाचे गीत गायिले
तू दार लोटले होतेस तेव्हा
पुढे हा जिंदादिल कवी म्हणतो,
मी नकार समजत होतो ज्यांना
ते तर अव्यक्त होकारच होते
लाडात येऊन तुज जवळ घेतले
लाजून तू इश्श म्हणालीस तेव्हा...
मैफलीची सुरूवातच अशी जोरदार झाली. टाळ्या व वाहव्वाची दाद व काव्याची बरसात!! नेर्लेकरांच्या आणखी काही पंक्ती उद्धृत केल्याशिवाय या ताकदीच्या कवीची कल्पना येणार नाही.
क्षितीजावर आलो तरीही
येथून परतणे आहे
नशिबात फकिराच्या
बेधुंद भटकणे आहे
प्रत्येक अक्षरापाशी
का उगा अडूनी बसतो
ठाऊक मला का नसते
हे पान उलटणे आहे
एकेक शब्द स्मरताना
हा ऊर दाटूनी येतो
नि:शब्द तिचे स्मरताना
हा देह हरपणे आहे
क्या बात है दादा! क्या बात है!! सगळ्यांनीच दाद दिली. आमचं संमेलन दोन दिवस आधीच सुरू झालं होतं. एवढ्यात सौ. मंजिरी पाटील त्यांची कवितांची वही घेऊन मैफलीत दाखल झाल्या. त्या गातात केवळ अप्रतिम!! लेखिका, कवयित्री व गायिका असं त्यांचं तिरंगी व्यक्तिमत्व! त्या त्यांची कविता गाऊ लागल्या आणि जणू काळ काही क्षणांसाठी थांबावा असं घडलं.
मेघवेडा मोर मोर, नाचे थुई थुई
गच्चावले नभ नभ, झाकळून येई...
पाने फुले झाडे वेली, गारवा गारवा
आठवांचे गीत गीत, मारवा मारवा
हिर्वा ताजा कंच वारा, लहरून जाई...
गच्चावले...
चिंब चिंब झाडावर, पाखरू वेल्हाळ
ओली ओली पाने पाने, नव्हाळ नव्हाळ
पावसाचा जोर जोर, गंधाळली भुई...
गच्चावले...
थेंब आला आला जसा, तान्हुला तान्हुला
शिंपल्यात मोती मोती, सानुला सानुला
सर पावसाची मोती, उधळून जाई...
गच्चावले...
‘अमृतातेही पैजा जिंके’ असे मंजिरीताईंचे शब्द व सूर. त्यांना अशी दाद मिळाली की त्या स्वत:ही ती दाद कधी विसरू शकणार नाहीत. त्यांचं काव्यवाचन संपतंय तोच घनश्याम पाटील यांनी एक शेर ऐकवला...
अगर इस दुनिया मे खुदा है,
तो इस मस्जिदको हिलाकर दिखा
नही, तो आ, मेरे साथ बैठ
दो जाम ले
और मस्जिद को हिलता हुआ देख...
पाटलांचा शेर ऐकून कुठल्या कलंदर माणसानं त्यांना दाद दिली नसती? इतक्यात कवी शांताराम डफळ त्यांची कविता उत्कृष्ट उच्चारात वाचू लागले,
विश्वात शोधतो मी
माझे अस्तित्व किती ते
खिन्न दुपारल्या वेळी
मन एकाकी झुरते
सागरातल्या थेंबांमध्ये
एक थेंब काय त्याचे!
एक वेदना जळते उरी
हे सारे खेळ दैवाचे
डफळ हे शिक्षक. कवितांचे सगळे प्रकार हा मनस्वी कवी हाताळतो. मग त्या कविता छंदबद्ध असोत किंवा मुक्तछंदातील! डफळांच्या इतर कवितांनी देखील मैफलीत जान आणली.
चपराक'च्या पुढाकाराने रेल्वेत कविता, विनोद, व्याख्यान, मुलाखत असे कार्यक्रम सुरु होते. |
दि. 3 एप्रिल. शेवटच्या ‘बियास’ या स्टेशनवर पोहोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. त्या आधी पहाटेच्या कडक चहासोबत वेगवेगळ्या विषयांवर मनसोक्त गप्पा होत होत्या. खास रेल्वेने सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून पंजाबमध्ये पाहोचलो होतो. सुमारे दीड हजार जण होतो आम्ही सगळे! घुमानच्या अलीकडे एका भव्य शाळेत आमची सोय करण्यात आली होती. आमच्यात मुलींची, स्त्रियांची संख्यादेखील लक्षणीय होती. लुधियाना येण्यापूर्वी डॉ. सदानंद मोरे यांना मी एसएमएस पाठविला. म्हटलं ‘‘सर, घुमानमध्ये भेटतो’’. त्यांचं उत्तर आल, ‘‘वेलकम’’!
शाळेतच दाढी, आंघोळ सर्वांनी उरकली. नाश्त्याची सोय होती. घुमानमध्ये पोहोचेपर्यंत दुपारचे तीन वाजले. नुकतंच ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन झालं होतं. ग्रंथ दिंडी निघाली होती. स्टॉल्स सुरू झाले. सगळीकडे नुसता उत्साह होता. घनश्याम पाटलांनी ‘चपराक प्रकाशन’चा स्टॉल सुरू केला व आणखी एक चमत्कार झाला. एकापाठोपाठ एक पुस्तकांची विक्री सुरू झाली. साप्ताहिक ‘चपराक’ व मासिक ‘साहित्य चपराक’चे अंकही उपलब्ध होते. धडाधड पुस्तकं जातायत हे पाहून पाटलांसहित सर्वांचाच उत्साह वाढला. शेवटच्या दिवशी हिशोब केला तेव्हा लक्षात आलं, ‘चपराक’ प्रकाशनाची जवळपास पन्नास हजार रूपयांची पुस्तकं विकली गेली होती व अनेकजण मासिकाचे व साप्ताहिकाचे सभासदही झाले. स्टॉल खूप नव्हतेच. फार तर पंचवीस एक असतील; मात्र काही स्टॉल्सना चांगला प्रतिसाद मिळाला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ व ‘महाराष्ट्र टाईम्स’नं ‘चपराक’ला चांगली प्रसिद्धीदेखील दिली.
आता उद्घाटनाचा सोहळा सुरू होणार होता. त्याआधी मी ‘शब्द’ प्रकाशनच्या स्टॉलवर गेलो व काही पुस्तकांची खरेदी केली. त्यात नामदेव ढसाळांचे कवितासंग्रह होते. विश्राम गुप्त्यांची ‘नारी डॉट कॉम’ व भाऊ पाध्यांची ‘राडा’ ही शिवसेनेवरील कादंबरी मी घेतली.
दुपारची चारची वेळ. उद्घाटन सोहळा सुरू झाला. तुळजापूर तालुक्यातल्या आर्वी बुद्रुक या गावच्या ख्वाजा सय्यद यांनी रात्रंदिवस खपून संमेलनाचा भव्य मंच उभारला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, फ. मु. शिंदे अशी सगळी मंडळी व्यासपीठावर हजर होती. मुत्सद्दी राजकारणी व चांगला वाचक ही शरद पवारांची ओळख आहेच. एकाचवेळी ते प्रकाशसिंह बादल व डॉ. मोरे यांच्याशी व्यासपीठावर बसल्या बसल्या सहजपणे संवाद साधत होते. बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. अवतीभवतीच्या इमारतींवर पोलीस उभे होते व सगळीकडे घारीसारखं लक्ष ठेऊन होते. संमेलन संपेपर्यंत ही परिस्थिती कायम होती. मुख्य मंडपात जाताना कसून तपासणी होत होती. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं व संमेलनाला सुरूवात झाली. सुरूवातीला भारत देसडला बोलले. देसडला हा माणूस मराठीवर प्रेम करणारा आहे. उमद्या मनाचा आहे; मात्र त्यांचं राजकीय थाटातलं भाषण खटकलंच. वेळही खूप खाल्ला त्यांनी. व्यासपीठावरून स्वत:ला मिरवणं व माईक समोर आला की वेळेचं भान न ठेवता बोलत सुटणं ही खूप घाण सवय! आपल्याला ती जडलीच आहे. सुटकाच नाही आपली त्यातून! संजय नहार हे संयोजकांपैकी एक; मात्र त्यांनी भाषणबाजी टाळली. गरजेपुरतं बोलायचं व बाजूला व्हायचं हे धोरण ठेवलं. भाषणबाजीपेक्षा इतर छोट्या मोठ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. आपण पैसे दिले म्हणून भाषणं ठोकायला मिळाली पाहिजेत हे बरोबर नाही. खरं दातृत्व पडद्यामागं राबण्यात असतं. उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांसाठी बोलण्याचा वेळ राखून ठेवला पाहिजे हे सांगायला लागतं का? उद्घाटनाच्या सत्रात मोरे, शरद पवार, नितीन गडकरी व प्रकाशसिंह बादल यांची अप्रतिम भाषणं झाली. शरद पवार हे अतिशय समयोेचित बोलतात. त्यांचा एक शब्ददेखील विषयाला सोडून नसतो. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी भालचंद्र नेमाडेंचा आवर्जून उल्लेख केला हे विशेष!! मोरेंनी देखील चांगली मांडणी केली. त्यांचा व्यासंग अफाट आहे, हे त्यांच्या भाषणाच्या पुस्तिकेवर नजर टाकली तरी लक्षात येतं. मोरेंच्या भाषणात ब्रिटीश प्रशासक व इतिहासकार सर विल्यम विल्सन हंटरचा उल्लेख होता. हंटरनं फ्लॉरेन्स नाइटिंगेल बाईंना म्हटलं होतं, ‘‘मराठाज आर पिपल प्राऊड नॉट ओन्ली ऑफ देअर हिस्ट्री ऍज कॉन्करिंग अँड गवर्निंग रेस, बट अल्सो ऑफ देअर नॅशनल लिटरेचर’’ म्हणजेच, मराठे ही जशी विजेत्यांची व प्रशासकांची जमात आहे तशीच ती साहित्यकारांची व लेखक कवींचीदेखील जमात आहे. आता ब्रिटिशांच्या प्रमाणपत्राची मराठ्यांना फार गरज होती असे नाही. मात्र बर्याचदा आपणच आपली ओळख विसरतो म्हणून त्यांनी हे उदाहरण दिलं असावं. शेवटी अशी संमेलनं स्वत:ची नेमकी ओळख करून घेण्यासाठीच असली पाहिजेत, असं वाटतं. न पेक्षा नुसता उत्सवी बाज पदरात काहीच टाकत नाही. मोरेंचं भाषण लांबलं व ते भूतकाळातच अडकून पडले, अशी बोंबाबोंबदेखील नंतर झाली; मात्र ते पोटतिडकीनं एक भूमिका मांडत होते. त्यांची भूमिका या शंकासूरांनी लक्षातच घेतली नाही. केवळ टाळीबाज भाषणं हीच खरी भाषणं नसतात. भाषणातली वैचारिक ताकद महत्त्वाची; मात्र ती वैचारिक ताकत कळायला आपल्याकडेही काही वैचारिक ताकत असायला लागते. असो! उद्घाटनाचा कार्यक्रम एकूण शानदार होता. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल. या माणसाचं भाषण थेट मनाला भिडणारं होतं. तो माणूस राजकारणी वाटलाच नाही. बोलणं, वागणं प्रांजळ होतं. कसलाही ‘मी’पणा व काहीतरी जगावेगळं करत असल्याचा आव तर अजिबात नव्हता. बादलांनी मोरेंनाच एक विनंती केली. ‘‘नामदेवांवर आणखी संशोधन झालं पाहिजे व त्यासाठी तुम्ही सहकार्य करा,’’ असं ते म्हणाले. या माणसानं पंजाबचं सगळं प्रशासन या संमेलनासाठी कामाला लावलं होतं. संमेलन चालू होतंं तेव्हा बाहेर पाचशे पोलीस छातीचा कोट करून उभे होते. मायमराठीला असलेलं ते पंजाबी संरक्षण पाहून कृतज्ञतेनं नतमस्तक व्हावं अशीच ती परिस्थिती होती. जणू नामदेवांना गुरूगोविंदसिंगांनी संरक्षण दिलं होतं.
संमेलनाच्या दुसर्या दिवशी मात्र सगळ्यांना एकच वेध लागले, ते म्हणजे अमृतसरचं सुवर्णमंदिर व वाघा बॉर्डर बघण्याचे. घनश्याम पाटील, सागर सुरवसे, समीर नेर्लेकर व तुषार उथळे पाटील ‘चपराक’च्या ग्रंथ विक्री दालनात पाय रोवून उभे होते. त्यांना तिथून हलता येणं शक्यच नव्हतं. मात्र त्यांनी आम्हाला अडवलं नाही. हा त्यांचा मोठेपणा होता. जगबीरसिंग हा लष्करात 15 वर्षे सेवा केलेला जवान. अत्यंत नेक! त्याच्या ओळखीनं सकाळीच आम्ही एक जीप केली व लेखक प्रभाकर तुंगार, कवी शांताराम डफळ, ‘ओडर संदेश’चे संपादक अमर कुसाळकर, कवयित्री मंजिरी पाटील, पत्रकार प्रज्ञा कांबळे, मुकुंद वाघमोडे, अनिल ढमाळ, कवी संदिपान पवार व मी सरळ अमृतसर गाठलं. तिथल्या वाहनतळापासून आम्ही सायकल रिक्षा केल्या व सुवर्ण मंदिराजवळ पोहोचलो. या देशात कुठंही फिरा एक गोष्ट जाणवते, माणसांचा पोटापाण्यासाठी प्रचंड संघर्ष चालू असतो. सायकल रिक्षा हे एक उदाहरण. असो. तर सुवर्णमंदिराच्या आवारात आम्ही पाऊल ठेवलं. केवढंभव्य आवार! व हजारो भाविकांची गर्दी! इतकी गर्दी का तर कुणीतरी म्हणालं, चैत्र पौर्णिमा आहे म्हणून! या हजारोंच्या गर्दीत आम्ही शिरलो ते अकाल तख्तापुढं नतमस्तक होण्यासाठी! चहूबाजूंनी पाण्याचं प्रचंड तळं व मध्ये सुवर्णमंदिर असं ते शीखांचं सर्वात पवित्र धर्मपीठ! रांगेत किती तास उभे असू आम्ही, तर तब्बल अडीच तास! मात्र सुवर्णमंदिरात आल्याचं समाधान मोठं होतं. ऐंशीच्या दशकात खलिस्थानवाद्यांनी पंजाबला भारतापासून तोडायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी आपला तळ कुठे ठोकला तर याच सुवर्णमंदिरात! किती दुर्दैव! देश संकटात होता तेव्हा मात्र, इंदिरा गांधींनी लष्करी कारवाई केली. त्या कारवाईत अनेक खलिस्थानवादी अतिरेकी याच सुवर्णमंदिरात मारले गेले. 1984 चा जून महिना होता तो. तेव्हा लष्करप्रमुख अरूणकुमार वैद्य होते. देशाच्या ऐक्यासाठी अनेक पंजाबी जवानांनी देखील या खलिस्थानविरोधी कारवाईत भाग घेतला. यात अनेक शीख व पंजाबी जवानांचेदेखील बळी पडले हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे याचा सूड म्हणून खलिस्थानवाद्यांनी इंदिरा गांधी व अरूणकुमार वैद्यांना मारलं. पुन्हा इंदिराजींच्या हत्येचा सूड म्हणून दिल्लीत शेकडो शीख बांधवांना मारण्यात आलं. हा दुर्दैवी इतिहास सुवर्णमंदिर पाहताना समोर उभा राहतो; मात्र जाणवत राहते ती एक गोष्ट. आता या सर्व कटू आठवणी खूप मागे पडल्या आहेत. अधूनमधून त्या डोकं वर काढतात. मात्र त्या अनुभवातून देश खूप काही शिकला आहे. एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. पंजाब जेव्हा जळत होता त्यावेळी संजय नहार नावाचा एक महाराष्ट्रीय तरूण तेव्हा अनेक मराठी तरूणांना हाताशी धरत होता. त्यांना घेऊन पंजाबात जात होता. शांततेचा संदेश देत होता. तोच तरूण नंतर अनेक वर्षांनी या घुमान येथील संमेलनाचा प्रमुख सुत्रधार व संयोजक झाला. कालाय तस्मै नम:!
सुवर्णमंदिरातच आम्ही लंगर म्हणजे दुपारचं भोजन घेतलं. भोजनगृहात एकाचवेळी शेकडो भाविकांच्या भोजनाची सोय होती. नंतर सरळ वाघा बॉर्डरकडे निघालो. बॉर्डरवर पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होेती. अमृतसर ते वाघा बॉर्डर हे अंतर साधारण चाळीस किलोमीटर असावं. वाघा बॉर्डरवरही तुफान गर्दी होती. अनेकांची बेशिस्त मात्र बघवत नव्हती. ही बेशिस्त पाहून बॉर्डरवरच्या लष्करी अधिकार्यांनाही संताप येत होता. प्रत्येकाला संध्याकाळचं सीमेवरचं ते विशिष्ट लष्करी संचलन पहायचं होतं. त्यासाठी नुसती रेटारेटी व धक्काबुक्की! बॉर्डरच्या दिशेनं चालत निघताना अचानक माझ्या एक लक्षात आलं, गाडीचा चालक जगजितसिंग सकाळपासून उपाशीच आहे. मी शंभर रूपये त्याच्या हातात ठेवले. म्हटलं,‘‘सुबह से कुछ खाया नही आपने. कुछ खालो.’’ तर तो गहिवरून गेला. जगजित हा घुमान जवळच असलेल्या बलिहार गावचा.
बॉर्डरवरचं ते संचलन आम्ही पाहिलं. ‘फ्रीडम ऍट मिडनाईट’, ‘फाळणी-युगांतापूर्वीचा सूर्यास्त’ ही फाळणीवरची पुस्तके वाचली होती. शेषराव मोर्यांचा ‘गांधी आणि कॉंग्रेसने अखंड भारत का नाकारला?‘ हा ग्रंथही संग्रही होताच. फाळणीचा सगळा इतिहास समोर उभा राहिला. समोरच्या पाकिस्तानच्या चेकपोस्टवर बॅरिस्टर महंमदअली जीनाचा फोटो झळकत होता. कुणीतरी म्हटलं, ‘‘आपल्या चेकपोस्टवर कुणाचा फोटो असेल?’’ ‘‘बहुधा महात्मा गांधींचा असेल.’’ मी अंदाजाने म्हणालो. कारण प्रचंड गर्दीमुळं आपलं चेकपोस्ट बाहेरून दिसणं शक्यच नव्हतं. तरी एक सत्य होतंच, गांधीजींना जग आजही आदरानं ओळखतं व बॅ. जीनाला त्याच्या देशातही पुरेशी ओळख नाही. इकडे स्टॉलवर पुस्तकांच्या विक्रीत गढून गेलेले असतानाही घनश्याम पाटलांना आमची काळजी होती. त्यांचे दोनदा फोन आले. शेवटी आम्ही परतीकडे निघालो तेवढ्यात डफळांनी प्रस्ताव ठेवला, ‘‘कुठेतरी ढाब्यावर जेवूया’’. सगळ्यांनी ती सूचना उचलून धरली. पोटात कावळे ओरडत होतेच, शिवाय पंजाबी ढाबा म्हणताच ते अधिकच ओरडू लागले. जगजितसिंगला म्हटलं, ‘‘एक अच्छा ढाबा देखो!’’ त्यानं एका चांगल्या ढाब्यापुढं गाडी थांबवली. गरमागरम तंदूर रोटी, दालफ्राय, कांदा, लोणचं असं सगळं पुढ्यात आलं. जगजितसिंगला शेजारीच जेवायला बसवलं व आग्रह करून वाढलंदेखील. तो संकोचत होता, पण मनातून सुखावला होता. ढाब्यातून बाहेर पडताना त्यानं आग्रह केला, ‘‘आप सबको मेरे घर चाय पीने अभी आना पडेगा.’’ घुमानपासून जवळच होतं त्याचं गाव. रात्री साडेदहा वाजता त्यानं त्याच्या घरापुढं गाडी उभी केली. सगळं घर आम्हाला पाहून खूश! त्याचा भाऊ, भावजय, आई, बहिणी सगळे खूश झाले. चहा बिस्किटं झाली. गप्पा झाल्या. सगळ्या कुटुंबाबरोबर फोटोसेशन झालं. नंतर घुमान बाहेरील मुक्कामाच्या ठिकाणी जगजितसिंगनं आम्हाला सोडलं, तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले असावेत. जगजितच्या कुटुंबाचा निरोप घेतला तेव्हा सगळं कुटुंब निरोप द्यायला घराबाहेर आलं होतं.
एक सांगायचं राहून गेलं. सुवर्णमंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही जालियनवाला बागेत गेलो. ही बाग सुवर्णमंदिरापासून अगदी एक मिनिटाच्या अंतरावर आहे. लहानपणापासून इतिहासात जालियनवाला बागेबद्दल वाचत होतो. आज प्रत्यक्ष तिथं जायचा योग आला. दि. 13 एप्रिल 1919. या दिवशी या बागेत स्थानिक लोकांची सभा भरली होती. बैसाखीचा दिवस होता तो. हा दिवस म्हणजे शीखांचा नववर्षदिन. लोेकानी जमावबंदीचा आदेश मोेडला म्हणून जनरल डायरनं बागेतील सभेवर याच दिवशी गोळीबार केला. दुपारी सव्वाचारची ती वेळ होती. या गोळीबारात 371 जण मारले गेले. बागेत मृतदेहांचा खच पडला. लोकांनी घाबरून बागेतील विहिरीत उड्या टाकल्या. ती विहीर आजही बागेत आहे. शेकडो जखमी झाले. कित्येकांचे अवयव तुटून पडले. डोळे बाहेर आले. शरीरातले अवयव बाहेर आले. इतक्या नीच पातळीचं हे हत्याकांड होतं. ब्रिटिशांचा साम्राज्यवाद काय लायकीचा होता हे जाणून घ्यायचं असेल त्यानं हा इतिहास वाचावा आणि आयुष्यात एकदा तरी या बागेला भेट द्यावी. इतिहास असं सांगतो, त्यावेळी सभेत पंचवीस हजार माणसं होती. मृतांमध्ये 41 मुले आढळून आली व एक मृत बालक तर सहा आठवड्यांचं होतं. काही वस्तू तिथं आजही जतन करून ठेवल्या आहेत. त्यात एक नाणं आहे. एका व्यक्तिच्या खिशातील त्या नाण्याचा गोळीनं टवका उडाला व तेवढा भाग जळून गेला. ते जळकं नाणं ब्रिटिश साम्राज्यवादाचा खरा इतिहास सांगतं. खरी छायाचित्रेही आहेत तिथं. त्यात अर्धनग्न माणसांच्या पार्श्वभागावर चाबूक मारणारे शिपाई दिसतात. पुढं दि. 17 डिसेंबर 1928 साली भगतसिंगांनी लाहोरमध्ये ब्रिटिश अधिकारी सँडर्सवर लागोपाठ आठ गोळ्या झाडल्या. त्यामागं जो राग होता तो जालियनवाला बाग येथील हत्याकांडाचा होता. अमृतसरमध्ये त्याकाळात घडत असलेल्या अत्याचारांचा होता. सध्या भालचंद्र नेमाडेंनी केलेली देशीवादाची मांडणी अभ्यासतो आहे. साम्राज्यवादाच्या याच राक्षसी प्रवृत्तीवर नेमाडे सगळ्या बौद्धिक ताकदीनिशी तुटून पडल्याचं क्षणोक्षणी जाणवतं. या साम्राज्यवादानं आपल्या भाषा, साहित्य, अर्थकारण, संस्कृती, राजकारण, सामाजिक व राजकीय ऐक्य या सगळ्यांचीच वाट लावली आहे, असं ते सांगतात. हे गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रजीचं आक्रमण रोखण्याचा उपाय ते सांगतात. अफूवर बंदी आहे तशी इंग्रजी शाळांवर घाला असं ते म्हणतात. यामागं त्यांच्या अभ्यासाची प्रदीर्घ बैठक आहे. मात्र आपल्याकडे विचारवंतांची दखल घेतली जात नाही व मूळ प्रश्न अधिकाधिक चिघळत जातात. त्यामुळंच दाभोलकर व पानसरेंच्या हत्येमागं परकीय शक्तींचे हात असू शकतात, असं ते जे सांगतात त्याकडेही फारसं गांभीर्याने कुणी पाहत नाही. परकीय शक्ती असं म्हणताना त्यांनी लिबिया व इजिप्तमध्ये अमेरिकेने घडवून आणलेल्या उत्पाताकडे बोट दाखवलं आहे हे विशेष. असो.
दिनांक 5 एप्रिल. सकाळी 11 ची वेळ. मुख्य सभामंडपात एका मोठ्या माणसाची मुलाखत होती. भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी. शांताराम डफळ, मंजिरी पाटील व मी या मुलाखतीला गेलो. अरूण जाखडे व सुषमा करोगल हे मुलाखतकार होते. जाखडे काही प्रश्न विचारत होते. मात्र त्यांची देहबोली मरगळल्यासारखी होती. खणखणीतपणे प्रश्न विचारावेत व मुलाखतीत जान आणावी हा प्रकारच नाही. त्यांचं प्रश्न विचारणं म्हणजे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणं होतं! तर सुषमा करोगल या प्रश्न विचारतच नव्हत्या. माईक समोर केला की त्या सरळ भाषणच सुरू करायच्या. त्यामुळं या मुलाखतीचा बराच चुथडा झाला. शेवटी गणेश देवींनीच काही अप्रतिम मुद्दे मांडत उत्तम वैचारिक प्रबोधन केलं. वसाहतवाद व जागतिकीकरणामुळं जगातील व आपल्या देशातील अनेक भाषा मरत आहेत, हा त्यांचा प्रमुख युक्तिवाद होता. इथं मात्र जाखडेंनी देवी यांची तुलना भालचंद्र नेमाडेंशी केली. नेमाडेंचा देशीवाद व देवींचं भाषाविषयक काम यात साम्य असल्याचं सांगितलं. यावरचं देवींचं उत्तर मार्मिक होतं, ‘‘नेमाडे हे खूप महान आहेत. मी आदीवासींसाठी काम करतो, ते करत नाहीत. मी उपेक्षित घटकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरतो, ते उतरत नाहीत; पण मी महान कादंबर्या लिहित नाही.’’ देवी हा खरोखर बाप माणूस! त्यांना आता भारतासह जगभरातील सर्वच भाषांचं सर्वेक्षण करायचं आहे. मुलाखतीत देवी यांच्या अत्यंत नम्र असण्याचा मुद्दा सुषमा करोगल यांनी मांडला. यावर देवींची प्रतिक्रिया होती, ‘‘जन्माला येताना कुणी राजा नसतो वा रंक नसतो. राजा वा रंक असणं हा आपला भ्रम असतो. मग भ्रमाला किती महत्त्व द्यायचं?’’ हे उत्तर थक्क करणारं होतं. ‘‘किती जमिनीवर आहे हा माणूस?’’ मी शेजारी बसलेल्या मंजिरी पाटलांना म्हणालो. ‘‘विद्या विनयेनं शोभते’’ त्या म्हणाल्या. मी पुन्हा अवाक् आणि थक्क!
जवळच्या काकासाहेब गाडगीळ सभागृहात एक परिसंवाद होता. त्यालाही आम्ही गेलो. ‘आधुुनिक तंत्रज्ञान व मुद्रित साहित्याचे भवितव्य‘ असा विषय. मात्र प्रत्येकजण माईकपुढं येऊन निबंध वाचल्यासारखे आपले मुद्दे वाचू लागला. एक महत्त्वाचा विषय त्यामुळे कंटाळवाणा झाला. तरीही काही हाताशी लागलंच. उदा. ‘पुस्तक वाचताना जी एकाग्रता साधली जाते ती इंटरनेटवर साधली जाईल असं वाटत नाही. पुस्तकाचं एकेक पान उलटून वाचण्यात सुख आहे. पुस्तकाला आपण स्पर्श करण्यातलं सुख महत्त्वाचं!’, असं माधव चौसाळकर म्हणाले. असं जे वेचता येईल ते आम्ही वेचत होतो.
शेवटी समारोपाचा क्षण जवळ आला. दुपारी 4 च्या आसपास सगळा मंडप भरून गेला. शीख बांधवांनी गर्दी केलीच होती. या गर्दीमागं प्रेम व उत्सुकता होती. प्रकाश पायगुडे यांनी ठराव वाचन केलं. घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे बरेच ठराव त्यांनी मांडले. ‘घुमानचं नाव नामदेवनगरी घुमान करावं’ असाही एक ठराव होता. या सगळ्यात प्रत्येक संमेलनात मांडला जाणारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा ठराव मात्र महामंडळानं मांडला नाही. ही घोडचूक म्हटली पाहिजे. मध्यंतरी एक नाट्यकलावंत बेळगावात गेला व ‘सीमाप्रश्न तुमचा तुम्ही सोडवा’ असं म्हणाला. त्या बेवड्याला सीमाप्रश्न किती कळला होता हाच प्रश्न आहे. मात्र महामंडळानं सीमाप्रश्नाकडं दुर्लक्ष का करावं? उद्या काश्मीरमध्ये संमेलन झालं तरी, सीमाप्रश्नाचा ठराव मांडलाच गेला पाहिजे. कानडी पोलिसांनी येल्लूरच्या गावकर्यांना मध्यंतरी जनावरासारखं मारलं. ती घटना आपण एवढ्यात विसरलो की काय? निदान त्या अत्याचाराचा निषेध करणारा ठराव मांडायला काय हरकत होती? सीमावासीयांचं मनोबल त्यामुळे वाढलं असतं, पण आपण सगळे सीमावासीयांचं खच्चीकरण करण्यात फार सराईत झालो आहोत. त्याबाबतीत आपण घरच्या म्हातारीचे काळ आहोत पक्के! शरद पवारांच्या उद्धाटनाच्या भाषणात मुंबईतल्या कमी होत जाणार्या मराठी माणसांच्या टक्केवारीचा मुद्दा होता. ‘मुंबईत अवघी बावीस टक्के मराठी माणसे उरली आहेत’ असं ते म्हणाले. ही सगळी आपल्या पायाखाली जळणारी दुखणी आहेत. स्वत: डॉ. मोरेंचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा व सीमाप्रश्नाचा विलक्षण अभ्यास आहे. तरीही सीमाप्रश्नाचा ठराव मांडला गेला नाही, याचं दु:ख झालं. आतातर कानडी सत्ताधार्यांनी सीमाभागात पहिलीपासून कानडी सक्तीची केली आहे. आपला हा वाद कानडी जनतेशी नाही तर, कानडी सत्ताधार्यांशी आहे व या प्रश्नाकडे गांभीर्यानंच पाहिलं पाहिजे.
समारोप सत्रात अनेकांची भाषणं झाली. माजी लष्करप्रमुख जोगिंदरसिंग, पत्रकार जतिंदर पन्नू, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, डॉ. सदानंद मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू असे वक्ते होते. एक प्रभू सोडले तर सगळ्यांची भाषणं समयोचित व चांगली झाली. संत नामदेवांच्या नावानं महाराष्ट्र सरकारने पुरस्कार सुरू करावा व तो दरवर्षी महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकाला द्यावा, अशी सूचना सदानंद मोरे यांनी केली. ती अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. सगळ्या भारतीय भाषांना एका सूत्रात जोडणारी व राष्ट्रीय ऐक्याला बळकट करणारी ही सूचना सरकारनं त्वरित अंमलात आणायला हवी.
सूत्रसंचालन करणारी गौरी देशमुख-दामलेनं अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत अप्रतिम सूत्रसंचालन केलं. शेवटी राष्ट्रगीत झालं व सांगता झाली. त्याक्षणी नाही म्हटलं तरी मनात कालवाकालव झाली. पंजाबी माणसाचं प्रेम, मनाचा मोठेपणा याला तोड नव्हती. ते प्रेम मनात साठवत परतायचं होतं. संमेलनस्थळी जेवणाची सोय केवळ अप्रतिम होती. तिथं जेवण घेतलं तेव्हा रात्रीचे साडेआठ-नऊ वाजले असावेत. तिथून मुक्कामस्थळी आलो. आवराआवर केली. बियास स्टेशनवर आम्हाला सोडायला पंजाब सरकारच्या बसेस होत्याच. रात्री रेल्वेत बसलो तेव्हा बरोबर अनेक आठवणी होत्या. रात्री शांत झोप लागली. मनात दोन गोष्टी होत्या. हुरहुर व समाधान. सकाळी डब्यात पुन्हा काव्यशास्त्रविनोदाच्या मैफिली सुरू झाल्या. एका स्टेशनवर मी हरिवंशराय बच्चन यांचं ‘मधुशाला’ घेतलं. आम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमचा काव्यसंग्रह घ्यायचा होता, पण स्टेशनच्या कुठल्याच बूकस्टॉलवर तो मिळाला नाही. हिंदी भाषिक पट्ट्यात त्यांचा एकही काव्यसंग्रह मिळू नये, खरं तर ही शोकांतिकाच म्हणावी, पण आम्ही ती कसर भरून काढायचा प्रयत्न केला. समीर नेर्लेकर व शांताराम डफळ यांनी ‘मधुशाला’ व ‘तुही यंता कंची’ या नामदेव ढसाळांच्या काव्यसंग्रहाचं अप्रतिम काव्यवाचन केलं. घनश्याम पाटलांनी पत्रकारितेत आलेले भन्नाट अनुभव सांगितले. हसता हसता पुरेवाट झाली. सागर सुरवसे यांनी कळस केला. त्यांच्या एका किस्स्यावर आम्ही असे खदाखदा हसायला लागलो की, शेजारच्या बर्थमधून निरोप आला, ‘जरा हळू हसा’. जोडीला मंजिरी पाटलांची बहारदार गीतं. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे...’ व ‘तुने ओ रंगिले ऐसा जादू किया, पिया पिया बोले मतवाला जिया...’ ही गीतं त्यांनी गायली. तेव्हा मनात काहूर व डोळ्यात अश्रू अशी अवस्था झाली. एक धडा मिळाला होता. आनंदानं जगायला पैसा, प्रतिष्ठा काहीही लागत नाही. लागते ती कलंदर वृत्ती! प्रेम! हे सगळे धडे आम्हाला अतिशय उत्साहानं शिकवणारा एक कलंदर माणूस होता. त्याचं नाव घनश्याम पाटील.
सरतेशेवटी डॉ. सदानंद मोरे यांचं एक वाक्यही मनात साद घालत राहिलं, ‘‘रिकामटेकड्यांनी बरंच काही
साध्य केलं! रिकामटेकड्यांनी बरंच काही साध्य केलं!!’’
पुणे रेल्वे स्थानकावरून निघताना 'चपराक'चे सदस्य आणि इतर |
- महेश मांगले (मुक्त पत्रकार आणि समीक्षक)
९८२२०७०७८५
अतिशय सुरेख,अभ्यासपूर्ण,आशयपूर्ण,रंजक,सर्वसमावेशक असा लेख॰मन परत एकदा घुमानला फेरफटका मारून आले॰लेखक,समीक्षक महेश मांगले सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन॰ सुंदर लेख प्रकाशित करून,आम्हा वाचकांना वाचायला दिल्याबद्दल साहित्य चपराक आणि संपादक घनश्याम पाटील सर यांना ही धन्यवाद आणि खूप आभार॰
ReplyDelete