सध्या सर्वत्र मराठी भाषा सप्ताह साजरा होत आहे. अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेत आहेत. माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘झुळूक आणि झळा’ या अग्रलेख संग्रहातील माय मराठीचा जागर घालणारा हा लेख खास तुमच्यासाठी!!
‘‘शरद
पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली
अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही
माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय
कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला
‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे आम्ही नुकतेच एका लेखात लिहिले होते. हाच धागा
पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्या वर्गात शिकत असलेल्या एका
विद्यार्थ्याने आम्हाला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत
आहे की तुम्ही कधीही खोटे लिहित नाही. मात्र पवार साहेबांनी खरेच वसंतदादा
पाटलांचा ‘मर्डर’ केलाय का हो?’’
अज्ञानापोटी झालेल्या त्याच्या
गैरसमजाबद्दल हसावे की रडावे हेच आम्हाला कळत नव्हते. मराठी माणसाविषयी
सातत्याने कोकलणार्यांना मराठी भाषा, मराठी संस्कृती या दृष्टिने इथल्या
व्यवस्थेने दिलेली ही चपराकच होती. ‘खंजीर खुपसणे म्हणजे ‘मर्डर’ करणे’ हे
पक्के ठाऊक असणार्या एका महाविद्यालयीन युवकाला मराठी भाषेचे ज्ञान देणे
यासारखे आव्हानात्मक काम दुसरे कोणते असू शकते काय?
गलेलठ्ठ पगार
घेऊन शाळा-महाविद्यालयातून आजची ही पिढी बरबाद केली जात आहे. भाषेचे
गर्भितार्थ, उपहास, व्यंग्य, अर्थच्छटा हे सारे त्यांच्या डोक्यावरून जाते.
विशेषतः ग्रामीण जीवनाचा परिचय नसल्यानेही अनेक घोटाळे होतात. कृषी
संस्कृतीशी तर या पिढीला काहीच देणेघेणे नाही. नांगरणी, पेरणी, कोळपणी,
खुरपणी, बैलगाडी, कासरा, जू, रान, पिकं, धसकटं, वाफे, धार या व अशा गोष्टी
तर त्यांच्या गावीही नसतात. ‘खुरप्याच्या तोंडी पिकाचं अमृत असतं’ असं मी
म्हणालो तर मित्रानं लगबगीनं विचारलं, ‘हा खुरपं नावाचा प्राणी आपल्याला
कसा मिळवता येईल?’ मुंबईत मध्यंतरी ‘दूध कोठून येते?’ या प्रश्नाचे उत्तर
एका विद्यार्थ्याने ‘दुधवाल्या भैय्याकडून’ असे दिले होते. गाय, म्हैस,
शेळी याविषयी ऐकून घेण्यासही तो तयार नव्हता.
परवा एका निरागस
चिमुकल्याने गव्हाच्या ओंब्यासोबत आपले छायाचित्र काढून घेतले आणि
‘पोळीच्या झाडासोबत’ म्हणून त्याच्या पालकांनी मोठ्या कौतुकाने ते
फेसबुकवर टाकले. अर्थात, त्यात विनोदाचा आणि गमतीचाच भाग अधिक असल्याने
सगळ्यांनी त्याचे कौतुकच केले; मात्र आजच्या मुलांना या सर्व गोष्टी
कळेनाशा झाल्या आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
याबाबत एक
किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. मध्यंतरी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ
यांच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात त्यांचा नातू नील तिथे आला.
गाडगीळांनी चिमुकल्या नीलला आमच्यासमोर संस्कृत श्लोक म्हणून दाखवायला
सांगितला. तो ऐकत नाही हे पाहून त्यांनी निवेदनाच्या शैलीत गमतीने
सांगितले, ‘‘आता नील गाडगीळ सादर करतील एक संस्कृत श्लोक...’’ आणि त्याने
खरेच एकदोन श्लोक म्हणून दाखवले. त्याचे पाठांतर आणि स्पष्ट शब्दोच्चार
पाहून आम्हास आश्चर्य वाटले. त्याविषयी विचारले असता गाडगीळांनी दिलेले
उत्तर मार्मिक तर आहेच पण प्रत्येकाने विचार करावा असेच आहे.
ते
म्हणाले, ‘‘मूल जन्मल्यापासून आपण उगीच त्याच्याशी बोबडे बोलतो. अलेले...
माझं गोड्ड बाल... असं म्हणत बसण्यापेक्षा त्याच्याशी स्पष्टपणे बोलावे.
त्याच्या बालमनावर चांगल्या भाषेचे संस्कार करावेत. उगीच बाललीलेच्या
नावाखाली भाषेची वाट लावण्याऐवजी त्याच्या कानावर उत्तमोत्तम आणि अर्थपूर्ण
शब्द पडतील याची काळजी घ्यावी, म्हणजे तो तसाच वागेल, बोलेल!’’
गाडगीळांचे
हे तत्त्वज्ञान खरोखरी प्रत्येकाने आचरणात आणावे असेच आहे. सध्या अनेक
कुटुंबात पालकच पाल्याशी व्यवस्थित बोलत नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि
काही ठिकाणी अन्य भाषेचेही शब्द बोलण्यात सर्रासपणे वापरले जातात. त्याचे
गांभिर्य कुणाच्या गावीही नसते. मग भाषाशुद्धी कशी होईल? महानायक अमिताभ
बच्चन यांच्याकडे बघा. ते हिंदीत बोलताना फक्त हिंदीतच बोलतात. इंग्रजीत
बोलताना अस्खलीत इंग्रजीतच बोलतात. त्यांच्या बोलण्यात भाषेची सरमिसळ नसते.
भेसळ तर नसतेच नसते! म्हणूनच त्यांनी असंख्य लोकांवर मोहिनी घातली.
त्यांचा आवाज, त्यांची भाषा हीच त्यांची ओळख आहे. मराठीच्या नावावर राजकारण
करणार्यांनी त्यांचा हा एवढा एक गुण जरी आत्मसात केला तरी खूप काही साध्य
होईल.
सध्या शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही बहुसंख्य पालक
आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी धडपडत असतात.
त्यासाठी वाटेल तितका निधी द्यायचीही त्यांची तयारी असते. ‘इंग्रजी ही
ज्ञानभाषा आहे’ आणि ‘इंग्रजी ही जागतिक भाषा आहे’ या दोन ‘अंधश्रद्धा’तून
मानसिकदृष्ट्या खचलेले लोक इंग्रजीचे स्तोम अकारण माजवतात. मातृभाषेत
शिक्षण न झाल्याने या मुलांची प्रगती खुंटते. त्यांना धड इंग्रजीसारखी
‘मागास’लेली भाषा आत्मसात करणे जमते ना मराठीतला गोडवा कळतो! बरे, हे
ध्यानात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपापल्या मातृभाषेत शिक्षण
घेतलेल्या मुलांनीच यशाचे नवनवे मानदंड तयार करत विक्रम नोंदवले आहेत.
मराठीतच काय अन्य कोणत्याही भाषेत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार
नाही.
इतर जातींचा, इतर धर्मांचा तसेच इतर भाषेचा द्वेष करू
नकात! मात्र आपली मातृभाषा तरी धडपणे बोलणार की नाही? मध्यंतरी कोणीतरी
सांगितले होते, ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा; मी तुम्हाला
‘मम्मी’ म्हणणारे लाखो हिंदुस्थानी दाखवेन!’ ही वस्तुस्थिती आहे. विदेशी
भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत झाल्या
आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले, तरीही आम्ही
सुधारायला तयार नाही. याला काय म्हणावे?
मराठी भाषेला
इंग्रजीपासून धोका आहेच आहे; पण त्याहून अधिक धोका हिंदीपासून आहे. आपण
सहजपणे बोलतानाही हिंदीचा आधार घेतो. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती
गोष्ट आम्ही अभिमानाने करतो. खरे तर या अर्धवट शहाण्यांना हिंदीही
व्यवस्थित येत नाही. प्रशासकीय कामकाजातली हिंदी भाषा कळणारे कितीजण आहेत?
चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली जाणारी भाषा, हिंदी भाषा म्हणून खपवली
जाते. मात्र त्या भाषेत अन्य भाषिक शब्दांचाच भरणा अधिक असतो. मध्यंतरी
एकदा एका हिंदी सिनेमाचे कथानक वाचल्यानंतर एका हिंदी अभिनेत्रीने सांगितले
होते की, ‘‘मी इंग्रजी सिनेमात काम करणार नाही...’’ या चित्रपटात खरेच
निम्मे संवाद इंग्रजीत असतात, हिंदुस्तानातल्या विविध प्रांतातले काही शब्द
घुसडले जातात आणि हिंदी या नावाखाली ते आमच्यावर लादले जातात. म्हणूनच
‘सहज बोलली अन् चव गेली’ अशी आमची अवस्था होते.
मराठी भाषेतले
आशयसंपन्न असणारे विविध शब्द, त्यांच्या अर्थच्छटा आजच्या तरूणाईला कळत
नाहीत. संगणक महाजाल, भ्रमणध्वनी या माध्यमांतून तर वेगळीच भाषा निर्माण
होत चालली आहे. इतर भाषेतले अनेक शब्द मराठीत रूजले आहेत, आपण ते सामावूनही
घेतले आहेत. तरीही भाषेबाबत कोणी आग्रही असल्याचे दिसत नाही.
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही भाषा अंथरूणाला खिळल्याचे चित्र आहे.
भाषेबाबत आग्रही असणारे पुणेकर सध्या अनेकांचे चोचले पुरवता पुरवता या
व्यवस्थेचाच एक भाग बनत चालले आहेत.
पुण्यातल्या एक विदुषी अनेक
साहित्यिक व्यासपीठावर दिसतात. ‘अमुक लेखकाची मुलगी आणि अमुकची आई’ अशीच
त्यांची सर्वत्र ओळख करून दिली जाते. प्रत्यक्षात त्या कोण आहेत, हे
महत्त्वाचे असताना अशा गोष्टींचाच उहापोह केला जातो. त्यांचा परिचय करून
देताना बर्याचवेळा ‘सुप्रसिद्ध महिला लेखिका’ असाच भाषाप्रयोग केला जातो
आणि पुणेकरही निमूटपणे ऐकून घेतात. लेखिका म्हटल्यावर त्या महिला आहेत याचे
तुणतुणे का वाजवावे लागते? ‘गोल सर्कल’, ‘पिवळे पितांबर’, ‘गाईचे
गोमूत्र’, ‘लेडिज बायका’, ‘चुकीची मिस्टेक झाली’ असे काही शब्दप्रयोगही
सर्रासपणे ऐकायला मिळत आहेत.
भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि
संस्कृती संपली तर राष्ट्र बेचिराख होईल, याचा गांभिर्याने विचार करण्याची
वेळ आली आहे. भाषा शुद्धीकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्याच्या
दृष्टिने प्रत्येकाने आता मराठी भाषेत बोलण्याबाबत आग्रही रहायला हवे.
आपल्या नाकापर्यंत पाणी आले आहे. आता हालचाल केली नाही तर स्वतःसह आपल्या
मातेची हत्या केल्याचे पातक आपल्याला लागणार आहे!!
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला लेख छान चपराक आहे, उगीचच अर्धवट भाषा बोलनारयांसाठी. ग्रामीण शब्द तर फार मजेशीर आहेत, पर्वा आईला म्हणालो, इद्रा शब्द आठवतो का ?
ReplyDelete