Monday, June 25, 2018

अजब तुझे सरकार!


ही गोष्ट आहे एका अत्यंत त्यागी, देशसेवेला वाहून घेतलेल्या आदर्श पंतप्रधानांची. अर्थात लालबहाद्दूर शास्त्री यांची. त्यावेळी ते कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य होते. 

एके रात्री त्यांचा एक मित्र अचानक त्यांच्या घरी आला. त्यानं सांगितलं, ‘‘शास्त्रीजी, माझ्या बायकोची तब्येत अचानक बिघडलीय. तिला तातडीने डॉक्टरकडे नेले पाहिजे. मला पन्नास रूपये हातउसणे द्या!’’

ते ऐकून शास्त्रीजी विचारात पडले. ते म्हणाले, ‘‘मला कॉंग्रेस वर्किंग कमिटीकडून पन्नास रूपये महिना मानधन मिळते. त्यात माझे घर चालते. शिल्लक अशी काही राहत नाही; पण तुमची अडचण मी समजू शकतो. आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू...’’

त्यांचा हा संवाद शास्त्रीजींच्या पत्नी ललितादेवी ऐकत होत्या. त्यांनी लगबगीने घरातून पन्नास रूपये आणले आणि त्या ग्रहस्थांना दिले. ललितादेवींचे आभार मानत ते निघून गेले.

शास्त्रीजींना आश्‍चर्य वाटले. त्यांनी विचारले, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’

ललितादेवींनी सांगितले, ‘‘तुम्ही मला घरखर्चाला महिना पन्नास रूपये देता. त्यातून काटकसर करत मी महिना पाच रूपये वाचवते. एखाद्याच्या अडचणीला हे पैसे कामाला आले नाहीत तर ते साठवून करायचे काय?’’

शास्त्रीजींना ललितादेवींचे कौतुक वाटले. त्या आत गेल्या. त्याबरोबर शास्त्रीजींनी कागद घेतला आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिले, ‘‘माझे घर दरमहा पंचेचाळीस रूपयांत चालते. त्यामुळे आपल्याकडून पाच रूपये जास्त येत असल्याने ते तातडीने कमी करावेत आणि अन्य गरजूंना देण्यात यावेत...’’

आजकाल असा कोणी माणूस असेल तर आपण त्याला वेड्यात काढू! आपल्या संवेदनाच तितक्या बोथट झाल्यात. शास्त्रीजींसारख्या माणसांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक छान शब्द वापरलाय. ‘सद्गुण विकृती!’

अशी सद्गुण विकृती असणारी माणसं आजच्या काळात शोधावी लागतात. तो शोध सहसा अपूर्णच राहतो.

शास्त्रीजींच्या या प्रामाणिकपणाची आठवण होण्याचे कारण म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील. त्यांच्या चिरंजिवांचे, सुजय विखे पाटील यांचे राहता तालुक्यातील लोणी बुद्रुकजवळ ऊसाचे शेत आहे. त्या शेतात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मिळालेले हायमास्टचे दिवे उभारण्यात आलेत. कोणतीही लोकवस्ती नसताना या रानात झगझगाट असतो. आजचे नेतेमंडळी असा ‘उजेड’ पाडतात. त्यांना ना समाजाची चिंता, ना नैतिकतेची. त्यांच्या शेतातील खांबाला चार हायमास्ट दिवे असून खांबाच्या मध्यभागी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या फाटोसह योजनेचेही नाव आहे. मुख्य म्हणजे वीज मंडळाने तातडीने वीज जोडही दिली असून सर्वसामान्यांसाठी असलेल्या विकासयोजनांचा असा गैरवापर चालवला आहे.

सत्तेचा असा गैरवापर करणारे विखे काही एकमेव नेते नाहीत. राजकारणातला हा नियमच झालाय. ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ असे ठामपणे सांगितले जाते. सरकारी योजनांचा स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांसाठी वापर केला नाही असा राजकारणी शोधून दाखवा. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटीत स्वतःच्या नातेवाईकांच्या म्हणजे, सासूबाईंच्या, मेव्हणींच्या नावे सैन्यातील अधिकार्‍यांच्या सदनिका घेतल्या होत्या हे आपणास माहीत आहेच. नाशिकमध्ये भुजबळांनी अतिभव्य उड्डाणपूल केलाय. मुंबईहून येणार्‍यांची सोय हा त्यामागचा उद्देश! मात्र तो येतो ते थेट भुजबळांच्या घराजवळच. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

‘पहिल्या महिला राष्ट्रपती’ म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या प्रतिभा पाटील यांनी त्यांची कारकिर्द संपल्यावर राष्ट्रपती भवनातल्या सगळ्या वस्तू ‘उचलून’ आणल्या होत्या. त्या परत ‘मागवण्याची’ नामुष्की संबंधितांवर आली. परवा अखिलेश यादव यांनी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे निवासस्थान सोडताना चक्क घराच्या भिंतीही पाडून टाकल्या.

राजकारण्यांचे सोडा प्रशासकीय अधिकारीही याला अपवाद नाहीत. सरकारी गाड्या, अन्य साधने ते स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खाजगी कामासाठी वापरतातच पण त्यांच्या कनिष्ठांना अक्षरशः घरगड्यासारखी वागणूक देतात. अर्थात, याला काही सन्माननीय अपवाद आहेत; पण ते प्रमाणाने तुरळकच! 

राजकारण्यांचे, प्रशासकीय अधिकार्‍यांचे एकवेळ सोडा... आपल्याकडील साहित्यिकांची, विचारवंतांची काय अवस्था आहे? ना. धों. महानोर यांच्यासारख्या लेखकाने त्यांच्या घराचे आणि शेतीचे वीज बिलच भरले नव्हते. किती दिवस? थोडे थोडके नव्हे तर तब्बल चौदा वर्षे! एका वृत्तपत्राने हा विषय उचलून धरला. त्यावेळी त्यांनी निलाजरे समर्थन दिले की, ‘‘मला बिल आलेच नाही तर कसे भरणार?’’

सामान्य माणसांकडून वीज बिल भरायला एक दिवस उशीर झाला तरी वीज तोडली जाते. मग हे काय सरकारचे जावई आहेत का? बरे, वीज बील आले नाही तर मग ते का आले नाही हे विचारण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवू नये? तुम्ही विचारवंत म्हणून मिरवता ना? हा सगळा मामला तेव्हाचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला. त्यावेळी अजित पवार यांनी महानोरांचे हे थकित वीज बील भरले.

साधा नगरसेवक असेल किंवा गावातला ग्रामपंचायतीचा सदस्य. त्याच्या दारात सगळ्या सोयीसुविधा आलेल्या असतात. आपल्याला सामान्य माणसाचा किती पुळका आहे हे दाखवणारे महाभाग सगळं काही स्वतःच्या पदरात पाडून घेतात. त्यांना कशाचीही ददात नसते. गावचा सरपंच असेल तरी तो टोलनाक्यावर पाच-पन्नास रूपयांच्या टोलसाठी कर्मचार्‍यांसोबत अरेरावी करतो. यातून आपल्या समाजाची, नेतृत्व करणार्‍यांची मनोवृत्ती दिसून येते.

महात्मा गांधी म्हणाले होते, ‘‘राजकारणात भ्रष्टाचार हा अपरिहार्य असतो. मात्र त्याचे प्रमाण लक्षात घ्यावे. एखादी मधमाशी मधाच्या पोळावर असते तेव्हा तिच्या पायाला जितका मध लागतो तितकाच व्यवस्थेचा लाभ यातील लोकांनी घ्यावा...’’

आजकाल या ‘मधमाशा’ मधात पूर्ण बुडल्यात. इतक्या, की त्यातून त्यांना बाहेरही पडता येत नाही. 

घराणेशाहीसारखे विषय तर आपल्या सर्वच राजकीय पक्षांसाठी तकलादू ठरलेत. कोणीही कुणावर ‘घराणेशाहीचा’ आरोप करू नये अशी एकंदर परिस्थिती आहे. मात्र सगळी सत्ता आपल्याच घरातील सदस्यांकडे आल्यानंतर त्याचा विनीयोग तरी प्रामाणिकपणे व्हावा. तळे राखताना तुम्ही पाणी जरूर चाखा! पण जितकी तहान आहे तितकेच! शेजारचा गरजू तहानेने व्याकूळ झालेला असताना तुम्ही त्याला आडकाठी तर करत आहातच पण दांडगाईने ते पाणीही इतरत्र पळवताय. हे काही बरे नाही.

शेवटी एक गाणे आठवते.

लबाड जोडती इमले माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा
वेश्येला मणीहार...
उद्धवा अजब तुझे सरकार!

- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, June 23, 2018

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!



दारू प्यायल्याने लोकांचे तारतम्य सुटते आणि अनेक तंटे निर्माण होतात म्हणून दारूबंदी करता का?

रस्त्यावर मोठ्या संख्येने गाड्या आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांचे त्यात जीव जात आहेत म्हणून सर्व वाहनांवर बंदी आणणार का?

...मग प्लॅस्टिकच्या उत्पादनावर बंदी आणणे म्हणजे ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशातला प्रकार नव्हे काय?

सध्याच्या जीवनशैलीचा विचार करता प्लॅस्टिकशिवाय आपले पानही हलत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेत तीस टक्के वाटा प्लॅस्टिकचा आहे. सकाळी उठल्यानंतर हातात ब्रश घेण्यापासून ते रात्री ‘गुड नाईट’पर्यंत प्लॅस्टिकशिवाय पर्याय नाही. प्लॅस्टिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. अनेक प्रगत राष्ट्रात प्लॅस्टिकचा पुनर्वापर, त्याचे विघटन सहजपणे होत असताना आपल्याकडे त्याचा बागुलबुवा करणे म्हणूनच योग्य नाही. जर इतर देश पर्यावरणाला हानी न पोहोचवता प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे करत असतील तर आपण नेमके कुठे कमी पडतो? हे अपयश आपल्या व्यवस्थेचे की समाजाचे?

कालपासून (दि. 23 जून) आपल्याकडे सर्वप्रकारच्या प्लॅस्टिकवर म्हणजे पॉलिथीन, पॉलिप्रॉपेलीन, पॉलिस्टायरीन, नायलॉन, ऍक्रेलीक, थर्माकोलवर बंदी आणलीय. अविघटनशील वस्तुंचे उत्पादन, त्यांचा वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर बंदी आणली आहे. याचे जो कोणी पालन करणार नाही त्याला आर्थिक दंडाबरोबरच तीन महिन्यांच्या तुरूंगवासालाही सामोरे जावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसा ‘कॉंग्रेसमुक्त भारत’चा संकल्प केला तसेच आपल्या व्यवस्थेने प्लॅस्टिकला हद्दपार करण्याचा संकल्प केलाय. 

प्लॅस्टिक बंदीचे दूरगामी परिणाम काय होतील हे बघितले पाहिजेच; पण सध्या महाराष्ट्रातले पन्नास हजार लघुउद्योजक रस्त्यावर येणार आहेत. त्यातील साधारण पाच लाख कामगार बेकार होणार आहेत. ज्या उद्योजकांनी प्लॅस्टिक निर्मितीचे कारखाने काढलेत, जे पॅकेजिंगच्या व्यवसायात आहेत ते संकटात येणार आहेत. त्यांचा व्यवसायच बंद पडल्याने त्यांनी काढलेल्या कोट्यवधींच्या कर्जाची परतफेड केवळ अशक्य आहे आणि त्यामुळे अनेक बँकाना मोठा फटका बसणार आहे. केवळ दांडगा महसूल मिळतो म्हणून दारूबंदीचा निर्णय न घेणार्‍या शासनाचा प्लॅस्टिक बंदीमुळे कोट्यवधींचा जीएसटी बुडणार आहे. 

याबाबत कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप कुंभोजकर सांगतात, ‘‘प्लॅस्टिक बंदीबरोबरच शेती आणि अन्नप्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल्स व गारमेंट, औद्योगिक स्पेअर पार्टस्, स्टेशनरी, स्पोर्टस्, कॉस्मेटिक इत्यादी उद्योगांना पॅकिंगचा प्रश्‍न भेडसावणार आहे. या उद्योगात किमान पंचवीस लाख लोक काम करतात. उत्पादकांबरोबरच दुकानदार संकटात येतील. आज साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रात 20 ते 25 लाख दुकानदार आहेत. पॅकिंगशिवाय कोणतीही वस्तु विकणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे सरकारी कायदेशीर कारवाईला ते सर्वप्रथम बळी पडतील.’’

पुणे जिल्हा प्लॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि ‘मेकिंग इंडिया’ प्रकल्पात भरीव योगदान देणारे यशस्वी उद्योजक अनिल नाईक म्हणतात, ‘‘आपल्याकडील लोकांची मानसिकता बदलायला हवी. रिप्रोसेस प्लॅस्टिकपासून स्वस्त व मस्त ताडपत्री, कचरा पिशवी, पेव्हिंग ब्लॉक, पाण्याचे पाईप्स, पॅकिंग शिटस्, पेलेटस्, भाजीपाला व फळांचे क्रेटस्, प्लॅस्टिकचे डबे, घागर, कॅन्स अशा वस्तू तयार करता येतात. खुर्च्यापासून टेबलापर्यंत अनेक वस्तू प्लॅस्टिकच्या असतात. त्या पुन्हा लाकडाच्या बनवायच्या झाल्या तर वृक्षतोड अटळ आहे. कागदाचा वाढलेला वापर गैरसोयीचा तर आहेच पण त्यामुळेही मोठ्या प्रमाणात झाडं तोडावी लागतील. म्हणजे प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान पाहताना पर्यावरणाला प्रतिकूल ठरतील अशा कितीतरी गोष्टी या निर्णयामुळे घडतील.’’

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, वेफर्स, बिस्किटं, चॉकलेट, मसाले, फरसाण या सर्वांची वेष्ठणं प्लॅस्टिकची असतात. ती बंद केल्यानं हे सर्व पदार्थ टिकवायचे कसे आणि ग्राहकापर्यंत पोहोचवायचे कसे? यातून आरोग्याच्या काही गंभीर समस्या निर्माण झाल्या तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही नाईक करतात.

अल्पावधीत महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ‘कामंत मसाले’चे संचालक आणि समाजसेवक मच्छिंद्र कामंत यांना यात राजकारण दिसते. ते म्हणतात, ‘‘निवडणुका आल्या की असे फंडे वापरावेच लागतात. त्याशिवाय उद्योजकांकडून पैसे कसे काढणार? गुटखाबंदी केली तरी आपल्याकडे गुटखा सहजपणे मिळतो. हेल्मेटसक्ती केली त्याचे काय झाले ते आपण बघितलेच. आमच्या मसाला प्रोजेक्टच्या पॅकिंगसाठी आणलेले काही लाखाचे प्लॅस्टिक पडून आहे. त्याचे काय करायचे हा प्रश्‍न आहेच. पर्यावरणारच्या दृष्टिने प्लॅस्टिकबंदी करायची असेल तर ती टप्प्याटप्प्याने करावी आणि आम्हाला पॅकिंगसाठी नवा काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा.’’

कामंत म्हणतात, ‘‘आपल्याकडे जनजागृती लवकर होत नाही. पाणी बचतीच्या उद्देशाने आम्ही भारतात सर्वप्रथम ‘सोलर एज्युकेशन किट’ ही कल्पना राबवली. विद्यार्थ्यांत आणि पालकांत त्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून तेव्हाचे मंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील शाळेत तीन आणि राणा जगजितसिंह यांच्या उस्मानाबाद येथील शाळेत दोन किट भेट म्हणून दिले. मात्र शाळांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अनेक मंत्र्यांना, अधिकार्‍यांना भेटूनही व्यवस्था ढिम्मच होती. त्यांनी सांगितले, हा विषय शालेय अभ्यासक्रमात आला तरच आम्ही काहीतरी करू शकतो. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी ऐवजी प्लॅस्टिकच्या वापराविषयी जागरूक करणारा धडा शालेय अभ्यासक्रमात द्यावा.’’

कोणतीही बंदी, सक्ती ही वाईटच असते. गुटखाबंदी होऊनही आज सर्वाधिक प्लॅस्टिकचा कचरा हा गुटख्यांच्या पुड्यांचाच असतो. मग या ‘हप्तेबाजावर’ कोण कारवाई करणार? लोकसंख्या नियंत्रणात आणायची म्हणून शस्त्रक्रिया, नसबंदी असे पर्याय पुढे आले. कंडोमसारखी साधनं आली. त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी सरकारनं कोट्यवधी रूपये पाण्यात घालवले. ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी सेक्स करूच नका’ असा तुघलकी फतवा त्यांनी काढला नाही. मग प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालून काय साध्य होणार?

प्लॅस्टिक जमिनीवर पडल्यानंतर तिथे काही उगवत नाही कारण ते नष्ट होत नाही. अनेक जनावरे, विशेषतः भटक्या गायी प्लॅस्टिक खाऊन दगावल्या. गटारे तुंबली. नद्यांचे प्रदूषण वाढले असे सांगण्यात येते. हे सगळे का घडते? कारण लोक प्लॅस्टिक कुठेही फेकतात. त्यांच्यावर कठोर आणि दंडात्मक कारवाई करा. कायद्याचा धाक दाखवा. एखाद्याने गाडीतून पाण्याची बॉटल फेकली म्हणून अनुष्का शर्मा त्याला कशी झापडते अशा फडतूस बातम्या दाखवून लोकांचे मनोरंजन करण्याऐवजी प्लॅस्टिकच्या वापराविषयी काही आदर्श नियमावली घालून द्या. त्याविषयी प्रबोधन करा. दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अशा वस्तुंवर बंदी आणण्याऐवजी काहीतरी मार्ग काढावा असेच बहुसंख्य लोकांना वाटते हे शासनाने ध्यानात घ्यावे, इतकेच. आपल्याकडे कांद्यावरून सरकार पडते हा इतिहास आहे. प्लॅस्टिकचा बागुलबुवा केल्याने सामाजिक वातावरण प्रदूषित होऊन सरकार गडगडू नये असे वाटते.
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

Friday, June 22, 2018

नाव मोठे, लक्षण खोटे!



हनुमंता राव (वय 35) हे तेलंगण राज्याच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील एका तेलगू वृत्तपत्रासाठी काम करणारे पत्रकार. तुटपूंज्या पगारामुळे प्राथमिक गरजाही पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. ज्यांच्याकडून सातत्याने हातउसणे पैसे घेतले ते तगादा लावू लागले. ही परिस्थिती त्यांनी त्यांच्या पत्नी मीना (वय 30) यांना सांगितली. प्राप्त परिस्थितीत कोणताच मार्ग निघत नसल्याने दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या 5 व 3 वर्षांच्या मुलांची गळा दाबून हत्या केली. हनुमंता यांनी पंख्याला दोरी लावून गळफास घेतला तर मीनानेही विषप्राषण केले.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत असे दुर्दैवी कृत्य घडावे हे दुःखद आहे. आत्महत्या, मग ती कुणाचीही असो! ती वाईटच! हतबल होऊन आत्मनाश घडविणे हे शेवटचे टोक आहे. कोणत्याही परिस्थितीत जगण्यातला संघर्ष संपता कामा नये. इतरांच्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणारे पत्रकार जेव्हा असे कृत्य करतात तेव्हा ती आणखी चिंतेची बाब असते. लोककवी मनमोहन नातू म्हणायचे, ‘‘उद्याचा कालीदास जर अनवानी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते!’’

कलावंतांचे, प्रतिभावंतांचे असे जाणे त्यामुळे ही त्यांची हार तर ठरतेच पण हे सत्ताधार्‍यांचे, समाजाचेही मोठे अपयश असते.

वृत्तवाहिन्यांवर झळकणारे चार-दोन चेहरे आणि काही भांडवलदार वृत्तपत्रांचे संपादक म्हणजेच प्रसारमाध्यमं अशी काहींची समजूत झालीय. माध्यमांशी संबंधित सगळ्या चर्चाही नेहमी त्यांच्याच भोवती फिरत असतात. अगदी तळागाळातल्या वार्ताहरांचा विचार केला तर त्यांचं जगणं मात्र भयावह आहे. मोठमोठ्या वृत्तपत्रांच्या ग्रामीण वार्ताहरांनाही आज दीड-दोन हजार रूपये मासिक वेतनावर काम करावं लागतं हे भेदक वास्तव आपण स्वीकारत नाही. इतरांना पगारवाढ व्हावी, त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, कर्मचार्‍यांवर कसा अन्याय होतो हे गळे काढून सांगणार्‍या माध्यमांच्या बुडाशी काय जळतंय हे पाहणं म्हणूनच गरजेचं आहे. मुद्रित माध्यमं सोडाच पण दृकश्राव्य माध्यमातही हीच अवस्था आहे. त्यांच्या तालुका वार्ताहरांना तर काहीच किंमत नाही. चार-दोन महिन्यात त्यांची एखादी बातमी लागते. त्याचे त्यांना हजार-पाचशे रूपये मिळतात. मग स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कुटुंबाची गुजरान करण्यासाठी त्यांना पत्रकारितेसोबत अन्य काही उद्योग करावे लागतात.

अनेक ठिकाणी स्थानिक शिक्षक बातम्या पाठवायचे. आता ‘शिक्षकांनी पत्रकारिता करू नये’ असे फर्मान निघालेय. काही ठिकाणी स्थानिक वृत्तपत्र विक्रेतेच बातम्या पाठवण्याचे काम करतात. अशा ‘पार्ट टाईम’ पत्रकारांच्या अधूनमधून बातम्या छापून येत असल्याने त्यांना गावात मान-सन्मान मिळतो. थोडीफार प्रतिष्ठा असते; पण त्यांनी घरात खायचे काय? याचा कोणी विचार करतच नाही. मोठ्या जिज्ञासेने, प्रामाणिक भावनेने या क्षेत्रात जी मुलं आलीत त्यांचा तर खूप लवकर भ्रमनिरास होतो. त्यातून अनेकांना सावरता येत नाही.

हनुमंता राव यांच्या आत्महत्येने हे भेदक वास्तव पुन्हा समोर आले आहे. त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे असे जाणे कदाचित मोठ्या व्यवस्थेत गृहितही धरले जाणार नाही. त्यांच्या पत्नी मीना या अत्यवस्थ आहेत. त्यांचे पुढे काय होईल याचाही कुणी फारसा विचार करणार नाही. तितकी संवेदनशीलता आपल्याकडे राहिलीच नाही. प्रत्येक आत्महत्यांवरून रान पेटवणारी प्रसारमाध्यमे याची दखलही घ्यायचे नाहीत. कारण त्यातून त्यांचाच विद्रूप चेहरा समाजासमोर येईल.

सरकारचे उदासीन धोरण, शासकीय जाहिरातीत केलेली कपात यामुळे छोटी वृत्तपत्रे कधीच देशोधडीला लागलीत. भांडवलदार वृत्तपत्रांना त्याचा फारसा धोका नाही. शहरी भागात कामाची अशाश्‍वतता असली तरी काही मोठी वृत्तपत्रे पत्रकारांना बरे मानधन  देतात. मात्र त्यांच्यासाठी राबणार्‍या ग्रामीण वार्ताहरांची हीच अवस्था आहे.

काही साखळी वृत्तपत्रे त्यांच्या जुन्या कर्मचार्‍यांना नारळ देत आहेत. कोणतेही कारण न सांगता ‘पुढचा दहा महिन्यांचा पगार घ्या आणि घरी बसा’ अशी ताकीद त्यांना दिली जातेय. नव्याने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या अननुभवी मुला-मुलींना अल्पवेतनावर कामाला घेऊन वृत्तपत्रांचा गाडा हाकला जातोय. मुद्रित शोधक, टंकलेखक ही पदे तर कालबाह्य होत आहेत. पत्रकारांनी स्वतःच्या बातम्या स्वतः टाईप करून पाठवायच्या. जाहिरातीतून जागा उरलीच तर उपसंपादकांनी काटछाट करून त्या लावायच्या असा मामला अनेक ठिकाणी दिसतो. ‘नाव मोठे अन् लक्षण खोटे’ अशीच गत अनेक वृत्तपत्रांची झालीय. काही जिल्हा वृत्तपत्रे तर ग्रामीण वार्ताहरांना सांगतात, ‘आम्हाला जाहिराती द्या! तुमच्या बातम्या प्रकाशित करू. बातम्यांसाठी तुम्हाला कुणी काही चिरीमिरी दिली तर त्यात तुमचे घर चालवा...’

तालुका स्तरावरील अनेक पत्रकार संघ म्हणजे तर संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या झाल्यात हे आम्ही वारंवार सांगत आलोय. एलआयसी एजंटपासून ते स्थानिक राजकारण्यांची तळी उचलण्यापर्यंत त्यांना मग सर्वकाही करावे लागते. त्यांच्याकडून न्यायाची, तटस्थतेची काय अपेक्षा करणार? 

असं म्हणतात की पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो. त्यात समाजाचे प्रतिबिंब उमटते. लोकांना दिशा मिळते. भल्या-बुर्‍याची जाणीव होते. मात्र हे अर्धसत्य आहे. आरश्यात आपल्याला आपली ‘मिरर इमेज’  दिसते. आपले उलटे प्रतिबिंब आपण सहजपणे स्वीकारतो. पत्रकारितेचेही तसेच झालेय. जे नाहीच ते सत्य म्हणून दाखवण्याचे काम माध्यमं जोरात करतात. ‘व्हर्च्युअल’च्या नादात ‘ऍक्च्युअल’ काहीच दिसत नाही. वर आपणच कसे सत्याचे दिवे लावलेत याची हाकाटी सुरू असते. म्हणूनच लोकांचा पत्रकारितेवरील विश्‍वास उडालाय. पत्रकार म्हणजे त्यांना संबंधितांच्या सुपार्‍या घेऊन लूट करणारे वाटतात.

‘सिंहासन’ चित्रपटातील निळूभाऊंप्रमाणे आजचे पत्रकार वेडेपिसे होणार नाहीत. त्यांना या क्षेत्रातील बदलाची थोडीफार जाणीव झालीय! पण हनुमंता राव यांच्यासारखे काहीजण असे दुर्दैवी मार्ग निवडत आहेत. अनेक पत्रकार अल्पवयात हृदयविकारासारख्या आजाराने मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या कामाचा ताण कोणीही विचारात घेत नाही. घरच्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांच्यातील खमकेपणा कमी होतोय. अनेक आजारांना त्यांना बळी पडावे लागतेय. जेवणाच्या, झोपेच्या वेळा तर निश्‍चित नसतातच पण कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते. सतत अपडेट राहण्याच्या नादात तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.

हे सर्व थांबवायचे असेल तर निदान त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील इतक्या सुविधा, लाभ त्यांना द्यायला हवेत. भांडवलदार म्हणून मिरवणार्‍या वृत्तपत्रांनी त्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या शिलेदारांना बळकटी द्यावी. तसे झाले नाही तर ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशीच या वृत्तपत्रांची, वाहिन्यांची आणि पर्यायाने या क्षेत्राचीही अवस्था होईल हे मात्र नक्की!
- घनश्याम पाटील
7057292092

भय इथले संपत नाही!


तानाजी धोंडिराम कोरके हा लातूर जिल्ह्यातील एक तरूण. पुण्यात वाढप्याचे काम करायचा. गेल्या शनिवारी (दि. 16) तो ऑटोरिक्षाने रविवार पेठेत उतरला. ऑटोचे बिल चाळीस रूपये झाले. तानाजीकडे केवळ वीस रूपये होते. त्यावरून रिक्षाचालक अतुल उर्फ ईश्‍वर दशरत हराडे याच्यासोबत त्याची बाचाबाची झाली. रिक्षाचालकाने त्याचा सहकारी रोहन गोडसेच्या मदतीने तानाजीला जबर मारहाण केली. तानाजी बेशुद्धावस्थेत पडल्याचे परिसरातील लोकांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्याच रिक्षाचालकाच्या मदतीने तानाजीला ससून रूग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. तो जिथे बेशुद्ध पडला होता तिथल्या दुकानातील एका सीसीटीव्हीत घटना दिसत होती. त्याच रिक्षाचालकाने केवळ वीस रूपयांसाठी तानाजीचा जीव घेतला.

आपल्या अनेक वाचकांना या बातमीचे काहीच वाटणार नाही. कारण अशा घटना आजूबाजूला नित्याच्या झाल्या आहेत. काहीजण हळहळतील. काहीजण केवळ वीस रूपयांसाठी (?) असे करायला नको होते म्हणून शिव्याही घालतील. एकंदरीत आपल्या समाजाच्या खालावलेल्या आणि दळभद्री मानसिकतेचे हे उदाहरण आहे. 

अशा घटना घडल्या की आपण चार-दोन दिवस प्रतिक्रिया देतो. ‘महाराष्ट्राचा बिहार होतोय’ अशी चिंता व्यक्त करतो. खरंतर बिहारही आपल्यापेक्षा कितीतरी पुढे जातोय; पण नसलेल्या गोष्टींचा अहंकार बाळगत आपण स्वतःची भलावण करतो. 

गरिबी, बेरोजगारी, दारिद्य्र हे पिढ्या न पिढ्या सुरूच आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरूच आहेत. सामान्य माणसाला जगण्याचा आधार देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. प्रश्‍न उरतो तो आपल्या इच्छाशक्तीचा. एकीकडे कोणत्याही क्षेत्रात जा, सर्वांची ओरड आहे की, कामगारच मिळत नाहीत आणि दुसरीकडे एक मोठा वर्ग सातत्याने गळे काढतोय की, कामच मिळत नाही. मग असे ऐतोबा परिस्थितीने गांजतात. आपल्या नाकर्तेपणाचे खापर इतरांवर फोडतात. त्यातून नैराश्य वाढते. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात. त्यातून पुढे अनेक समाजविघात कृत्ये घडतात.

ज्या देशात वीस रूपयांसाठी एखाद्याला आपला जीव गमवावा लागत असेल त्या देशाच्या भवितव्याची आपण कल्पना करू शकाल. महासत्तेच्या गप्पा मारताना आपल्यासमोरी आव्हानांचा अंदाज येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. बरं, या घटनेत या रिक्षाचालकाचे आणि मयत तानाजी कोरकेचे काहीच नाते नव्हते. आपण दुसरी घटना बघूया. 

लातूरच्याच साधुराम आणि गयाबाई कोटंबे या दुर्दैवी दांम्पत्याचा ज्ञानदीप हा मुलगा. साधुराम प्राचार्य पदावरून निवृत्त झालेले. ज्ञानदीपने एम.एस्सी. पर्यंत उच्चशिक्षण घेतलेले. त्याला लातूरच्या मोरेनगर परिसरातील राहते घर स्वतःच्या नावे करून हवे होते. वडिलांची त्याला तयारी नव्हती. ज्ञानदीपचे महिनाभरापूर्वी लग्न झाले. ‘माझा संसार बघायला या’ म्हणून त्याने आईवडिलांकडे आग्रह केला. आईवडिल मोठ्या मनाने मुलाकडे आले. नव्या सूनबाईला साडी घ्यावी म्हणून तिला घेऊन सासूसासरे बाजारात गेले. परत आल्यावर ज्ञानदीपने त्यांना प्यायला नारळपाणी दिले. वडील घेत नसतानाही त्याने सांगितले की, ‘घ्या, तरतरी येईल...!’ आईवडिलांनी ते घेतले. या पठ्ठ्याने त्या नारळपाण्यात घूस मारण्याचे विषारी औषध मिसळले होते. ती कडवट चव जाणवू नये म्हणून त्यात साखरही मिसळली. हे पाणी पिऊन वडील जागीच गेले. आई अत्यवस्थ आहे...

आपल्या समाजाच्या खालावलेल्या मनोवृत्तीचे भिकार रूप यातून दिसेल. असे क्रौर्य हा आपल्या समाजजीवनाचा एक भाग बनतोय. सत्तेसाठी आपल्या आप्तेष्टांना ठार मारणारा क्रूरकर्मा औरंगजेब आणि आपल्या जन्मदात्यांचा बळी घेणारा ज्ञानदीप यात फरक तो कोणता? जिथे बाप मुलीवर बलात्कार करतोय, पोर्न साईट पाहून चौदा वर्षाचा मुलगा आपल्या सोळा वर्षाच्या बहिणीवर अत्याचार करतोय त्या देशाचे आपण नागरिक आहोत. आपली संस्कृती, आपले आदर्श, आपल्या रूढी-परंपरा, आपले तत्त्वज्ञान याच्या बाता करणार्‍यांनी, प्रगतीच्या, विकासाच्या, सुधारलेपणाच्या गोष्टी मांडणार्‍यांनी आजच्या भारताचे हे वास्तव चित्र आधी समजून घ्यायला हवे.

विकास ही संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘देश आगे बढ रहा है’ अशी जाहिरात कोट्यवधी रूपये खर्च करून करणे सहजशक्य असते. भौतिक प्रगती, नवनवे शोध-संशोधन, विविध क्षेत्रातील उपलब्ध करून दिलेल्या संधी, उद्योग-व्यवसायातील फुगवलेले आकडे यावरून कागदोपत्री कोटीच्या कोटी उड्डाणे जरूर घेता येतील. मात्र आपल्या ढासळलेल्या या मनोवृत्तीचे काय? त्याला कोण अपवाद राहिलंय? इथे जात-पात, धर्म, लिंग, वय, प्रांत, भाषा, गरीब-श्रीमंत असे कसलेही निकष नाहीत. शोषित, पिडीत अन्याय सहन करत आहेत. संधी मिळताच तेही इतरांवर अन्याय करत आहेत. त्यातून आलेला मुजोरपणा त्यांचे मनोबल वाढवतो. कायद्याचा धाक नसणे आणि ढिम्म व्यवस्थेला विकत घेणे यामुळे गुन्हेगार कोणतेही कृत्य करायला धजावतात. नैतिक-अनैतिक अशा कोणत्याही फूटपट्ट्या तिथे नसतात. 

इतरांचे नुकसान करणे, त्याला त्रास देणे यात आसुरी आनंद मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याची कारणमीमांसा होऊ शकत नाही. ‘तो असा का वागला?’ याचे उत्तर देणे सोपे नाही. चांगुलपण हरवत चाललेल्या समाजात त्यामुळेच आपली जबाबदारी मोठी आहे. ‘भय इथले संपत नाही’ हे तर खरेच! त्यामुळे समाजसुधारणा गेली खड्ड्यात! तो आविर्भाव आपण आणायलाच नको. आपण फक्त स्वतः बदलूया! कोणीतरी म्हटलेच आहे, ‘‘जर आपण स्वतः बदललो तर जगातला एक वाईट माणूस कमी होईल.’’ हे वाईटपण संपवणं, निदान कमी करणं आपल्याच हातात आहे. कोणताही ‘देवदूत’ त्यासाठी काहीही करू शकणार नाही. 

आपण सध्या जिथे आहोत तिथे विचाराला, सुधारणेला थोडाफार वाव आहे. आणखी काही वर्षे अशीच गेली तर येणारी पिढी आणखी अंधारात ढकलली जाईल. काळही आपल्याला माफ करणार नाही!
- घनश्याम पाटील
7057292092

Thursday, June 21, 2018

खरे जातीयवादी कोण?

परवा एक विनोद वाचला.
भारताचा प्रमुख राष्ट्रीय खेळ कोणता?
त्याचे उत्तर होते, आडनावावरून जात ओळखणे!

विनोदातही क्लेशकारक वाटावं असं हे वास्तव. ते नाकारण्याचं धारिष्ट्य आपल्यात निश्चितपणे नाही.

मागच्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या वाकडी गावात एक घटना घडली. सचिन आणि राहुल चांदणे हे चुलत भाऊ गावातील एका विहिरीत पोहण्यासाठी गेले. कर्णफाट्याजवळील ही विहिर ईश्वर जोशी यांच्या मालकीची आहे. या विहिरीत पोहल्याच्या रागातून जोशी यांनी चांदणे बंधुंना पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांची धिंड काढल्याचेही सांगण्यात आले. वाकडी हे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील गाव. त्यात ज्याने मारहाण केली तो ‘जोशी!’ त्यामुळे वातावरण तापायला वेळ लागला नाही. राहुल गांधी यांच्यापासून प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या. माध्यमांनी जोरदार बातम्या चालवल्या. सगळे तथाकथित पुरोगामी निषेधासाठी बाहेर पडले. मनुवाद कसा फोफावलाय आणि मोदींनी राजीनामा देणे किती अगत्याचे आहे यावर खुमासदार चर्चा रंगली. जो तो आपल्या बुद्धिप्रमाणे अक्कल पाजळत होता. ही बातमी देशभर गेली आणि दुपारपर्यंत दुसरी बातमी येऊन धडकली. यातील आरोपी ‘जोशी’ हा ब्राह्मण जोशी नव्हता! तो भटक्या जमातीतला ‘जोशी’ होता. झाले! या घटनेचा विरोध करणार्‍यांचा फुगा फुटला. जी घटना जातीवादातून झालीय असे वाटत होते ती आता या लोकांना सामाजिक विकृती वाटू लागली.

या घटनेच्या थोडे मुळाशी जायला हवे. घटना घडल्यानंतर ज्यांना मारहाण झाली त्या मुलांच्या आजीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीजवळ पहिली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘‘जोशी यांच्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यापूर्वी त्यांनी अनेकदा आमच्या मुलांना इथे पोहू नका म्हणून तंबी दिली होती. मुलं ऐकत नव्हते. म्हणून त्यांना मारले...’’

माध्यमांनी गळे काढले की त्यांना ‘नग्न करून मारले..’ 
यातली वस्तुस्थिती ही होती की ही मुलं पोहण्यासाठी आली होती. त्यामुळे त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. अनेकदा सांगूनही ते ऐकत नसल्याने विहिरीत उड्या मारून आलेल्या या पोरांना पकडले आणि जोशींनी धुतले. ‘जोशींनी मारले’ म्हटल्यावर सगळे तुटून पडले. त्यांच्यावर ऍट्रोसिटीपासून सर्व गुन्हे लावण्यात आले. ब्राह्मणांना झोडपण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. फडणवीस आणि मोदींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. राज्यात दलित कसे असुरक्षित आहेत आणि ‘शेंडीवाल्यांची’ मुजोरी कशी वाढलीय याचे चर्वितचर्वण सुरू झाले.

महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा कधीच विद्रुप झालाय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच एक विधान केलं होतं. ‘सध्या पेशवे शाहूंची निवड करतात’ अशा आशयाचं ते विधान होतं. खासदार राजू शेट्टी यांचीही त्यांनी जात काढली होती. राष्ट्रवादीच्या स्थापना दिन सोहळ्यात तर त्यांनी पुणेरी पगडी नाकारून फुले पगडी घालण्याचे आवाहन जाहीरपणे केले. हे सर्व पुरोगामित्वात बसते. त्याउलट नरेंद्र मोदी यांच्यासारखा बहुजन समाजातला माणूस देशाचा पंतप्रधान झालाय तो जातीयवादी आणि मनुवादी ठरतो. अमित शहा यांच्यासारखा नेता सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो ब्राह्मणवादी ठरतो. म्हणजे असे लांच्छनास्पद आरोप करायला आपली जिभ झडत नाही. येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करायची झाल्यास आरोपांची राळ उडवण्याशिवाय दुसरे हातात काहीच उरत नाही. विकासाच्या मुद्यावर बोलायचे झाल्यास आजवरचे आपले नाकर्तेपण पुन्हा लख्खपणे उघड होईल हे काय यांना कळत नाही का? मग असे वाद पेटवत ठेवावे लागतात. जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण करून ‘पुरोगामित्वाचे’ टेंभे मिरवायचे असा सगळा उद्योग सुरू आहे. 

जळगावातील घटनेचा आरोपी जर ब्राह्मण असता तर एव्हाना देश पेटला असता. मग प्रश्न पडतो खरे जातीयवादी कोण? लोककल्याणकारी राज्य आणि सर्वसमावेशक न्यायाची भूमिका घेताना आपण असे सोयीस्कर कसे वागू शकतो? 

सध्या जातीजातीतील कट्टरतावाद वाढत चाललाय. प्रत्येकजण आपापल्या जातीचं घोडं पुढं दामटतोय. फुले, शाहू, आंबेडकर हे आपले आदर्श असायला हवेत. आपण केवळ त्यांचे नाव घेऊन जातीचे राजकारण करतो. त्या-त्या महामानवाच्या विचारांना, त्यांच्या तत्त्वांना आपणच दिलेली ही तिलांजली आहे.

महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं, ‘‘जातीनिर्मुलन करायचे असेल तर आंतरजातीय लग्नं करा.’’

फुल्यांचे फोटो देवाप्रमाणे लावून मिरवणार्‍या किती जणांनी आपल्या मुलींची लग्नं इतर जातीतल्या लोकांशी लावून दिली?

आंबेडकरांनी सांगितलं होतं, ‘‘मद्यपान करू नकात! शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.’’

त्यांना मानणार्‍यांपैकी कितीजण व्यसनापासून दूर आहेत? कितीजणांनी शिकून द्वेषविरहित आणि रचनात्मक संघर्ष उभारलाय?

महाराजा शाहूंचे नाव घेणार्‍यांपैकी कितीजणांनी त्यांचे विचार अंमलात आणलेत?

मग हे सगळं कशासाठी चाललंय? 

आपल्यापुढील नेमक्या समस्या कोणत्या आहेत?

रोजचे जगण्यामरण्याचे प्रप्रश्न न सुटल्याने मेटाकुटीला आलेला सामान्य माणूस या सगळ्याच्या मागे अकारण धावत स्वतःची फरफट का करून घेतोय? आपल्याला आपला, कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने अर्थातच देशाचा विकास घडवायचा असेल तर आणखी व्यापक व्हायला हवे. त्यासाठी जातीपातीची जळमटं दूर सारायला हवीत. अन्याय! मग तो कुणावरचाही असो! तो घडता कामा नये. ज्याच्यावर घडतोय त्याच्या बाजूने आपण ठामपणे उभे रहायला हवे. चुकीच्या वृत्ती-प्रवृत्तीवर आसूड ओढायला हवेत. 

स्वार्थाशिवाय राजकारण पूर्ण होत नसतं. मग त्यांच्या स्वार्थाची जपणूक करण्यासाठी आपण आपलं चांगुलपण का बरं पणाला लावावं?

हे सगळं थांबवणं आपल्याच हातात आहे. ‘खरे जातीयवादी कोण?’ असा सवाल आपण स्वतःला केला तर समोरच्या आरशात आपलीच प्रतिमा काळवंडलेली दिसेल. चला तर मग! ती स्वच्छ, निर्मळ करण्याचा प्रयत्न करूया!

Saturday, June 16, 2018

दोन घडीचा डाव...


अनेकांच्या मनात प्रेरणेची ज्योत चेतवणारे आणि अनेकांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणारे, मदतीचा हात देणारे युवा संत भैय्युजी महाराज यांनी आत्महत्या केली आणि अनेकांना आश्चर्याचा दुःखद धक्का बसला. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोक, नेते, अभिनेते त्यांचे अनुयायी, भक्त होते. अध्यात्माच्या क्षेत्रातील एका प्रतिभावंताचे असे जाणे चटका लावणारे तर आहेच पण या क्षेत्रातील माणूसही मनावर, इंद्रियावर संयम ठेऊ शकत नाही असा दुर्दैवी संदेश देणारे आहे.

काही दिवसांपूर्वी हिमांशू रॉय या कर्तव्यतत्पर अधिकार्‍याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आपल्याकडे जगाचा पोशिंदा ठरणार्‍या बळीराजाच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. धर्मा पाटील या बुजूर्ग शेतकर्‍यानं तर मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या, तरूण-तरूणींच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. म्हैसकर दांपत्याच्या तरूण मुलाने केलेली आत्महत्याही अनेकांना चुटपूट लावून गेली. कौटुंबिक कलह आणि व्यवसायातील अपयशामुळे अतुल तापकीर या युवा निर्मात्याने काही महिन्यांपूर्वीच फेसबुकवर पोस्ट टाकून आपली जीवनयात्रा संपवली.

जे कोणी नियतीच्या, निसर्गाच्या, दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेत, ज्यांची हतबलता विकोपाला गेलीय, ज्यांना नैराश्याने ग्रासलेय, ज्यांच्या ताणतणावाचा अतिरेक होतोय असे अनेकजण आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलताना आढळतात. दुःखाचा आवंढा गिळताना मनातील शल्य कुणालाही सांगावसं न वाटणं यामुळं होणारा कोंडमारा घातक ठरतोय. व्यावसायिक स्पर्धा विकोपाला जात आहेत. या सगळ्याची परिणीती आत्महत्येत होतेय.

अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशातही लोकांचे मानसिक संतुलन बिघडतेय. मनोरूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या सर्वाचे कारण मन मोकळं करण्यासाठीच कोणी नाही. वाफ फार काळ कोंडून ठेवली तर त्या भांड्याचा स्फोट अटळ असतो. तसंच मानवी मनाचं झालंय. आजूबाजूला असंख्य माणसं असतात पण ज्यांच्याजवळ मन रीतं करावं अशा लोकांची वानवा आहे. विशेषतः जे उच्चपदस्थ आहेत, महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडणारे आहेत त्यांच्याभोवतीचं माणसांचं कोंडाळं हे स्वार्थापोटी जमलेलं असतं. याची त्यांनाही जाणीव असते. अशा लोकांना आपल्या कर्तव्यापोटी कुटुंबियांसाठीही वेळ देता येत नाही. नवनवीन आव्हानं पेलताना, इतर अनेकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवताना स्वतःच्या आयुष्याचं मात्र डबकं झालेलं असतं. म्हणूनच रॉय यांच्यासारखे वर्दीतले आणि भय्यूजी महाराजांसारखे गर्दीतले लोक आपली जीवनयात्रा संपवतात.

प्रत्येकाच्या जीवनात काही भलेबुरे प्रसंग येतातच. काहीवेळा त्याचा अतिरेक झाल्यावर असे नकारात्मक विचार सुरू होतात. कितीही खमक्या मनाचा माणूस असला तरी त्यातून त्याची सुटका नाही. अशावेळी मनावर संयम ठेवणं जिकिरीचं असतं. आपल्यावर अवलंबून असणारे लोक, आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारे लोक आठवले की प्रतिकूलतेतही जगण्याचं बळ मिळतं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यावेळी त्यांच्याही मनात नैराश्याचं मळभ दाटून आलं होतं. त्यांनाही आत्महत्या करावीशी वाटली. सावरकरांना जेव्हा मृत्युचं आकर्षण वाटू लागलं तेव्हा त्यांनी एक निर्धार केेला. ‘‘या कारागृहात जो देशसेवा करील तो खरा देशसेवक. जे मूल्य दिल्याविना देशोद्वार होणेच नाही. ते कारापीडनाचे मूल्य देणे म्हणजे जीवन व्यर्थ जाणे नव्हेच नव्हे. कीर्तीचे, लौकिकाचे, मनाचे मधाचे बोट त्यास लागलेले नाही पण म्हणूनच ते अधिक अव्यर्थ होय. आणि निदान... मग असा का मरतोस? तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि ही बातमी देखील देशास कळणार नाही मग त्याचा नैतिक परिणाम कोणता होणार? मग व्यर्थ कष्ट का म्हणून? मरणारच असशील तर असे कुत्र्याचे मोलाने आपल्या हाताने का मरतोस? त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरता स्वतःचे हाताने करून आपल्या पक्षाचे हानीत आणि अपजयात आणखी भर का घालतोस? जर मरणे तर सेनेतील तू एक सैनिक आहेस त्या सेनेचे एखादे कार्य करून मग तरी मर.. फाशी घेऊन नव्हे तर... आपल्या एका जीवास्तव... असे मर!’’

भगवतगीता सांगते, ‘‘सुख-दुःख, लाभ-अलाभ, जय-पराजय, पाप-पुण्य या कशाचाही विचार न करता आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला हवं.’’ कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरणं, आलेल्या परिस्थितीतून निर्धारानं बाहेर पडणं गरजेचं आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ असेच वातावरण अवतीभोवती असले तरी मरण्यात कसली मर्दुमकी आलीय? तो भ्याडपणाच आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय... मी जाता राहील कार्य काय!’ याचा विचार केला पाहिजे. 

आपण देश बदलू शकत नाही, समाज सुधारू शकत नाही! पण आपल्यामुळे एक माणूस जरी घडला तरी आयुष्याचे सार्थक झाले. मग जीवनाच्या कसोटीवर यशस्वी व्हायचे तर कणखर राहण्याशिवाय पर्याय नाही. 

कवी माधव गिर यांच्या आई एक गोष्ट वारंवार सांगायच्या. त्या म्हणायच्या ‘‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपलं एक घर असावं!’’

म्हणजे प्रत्येक गावात एकजण तरी इतक्या जवळचा असावा की ते त्याला आणि आपल्याला आपलंच घर वाटावं. अशी मायेची माणसं जोडायला हवीत. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत. गिर सरांच्या आईच्या म्हणण्यातला व्यापकपणा सोडून द्या! पण किमान चार-दोन मित्र असे असावेत की त्यांच्याशी आपण सगळं काही विश्‍वासानं शेअर करू शकू. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ शकू. 

मनाचा गुंता सोडवण्यासाठी कुटुंबात, मित्रपरिवारात काही हक्काच्या जागा असतात. त्यांच्याशी मोकळेपणे बोला. विचारांचा, अडचणींचा डोंगर थोडासा बाजूला ठेवा. समस्या नाहीत, दुःख नाहीत असा जगात कोणीच नाही. त्याची तीव्रता आणि ते सहन करण्याची, त्याला सामोरं जाण्याची प्रत्येकाची क्षमता मात्र वेगवेगळी! त्यामुळं दुःखाचा बाजार मांडणं, त्याचा बागुलबुवा करणं, त्यापासून दूर पळणं हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे. संघर्ष आपल्या नसानसात आहे. शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेली ही भूमी आहे. कितीही मोठं दुःख आलं तरी त्याला आपल्याला कोलता आलं पाहिजे.

रामशास्त्री’ या ऐतिहासिक चित्रपटात छोटा राम आणि त्याची सखी जानकी हे दोघे खेळत असताना एक गीत घालण्यात आलं. शांताराम आठवले यांनी मराठी चित्रपटगीतात मानाचं स्थान प्राप्त झालेलं  हे गीत लिहिलं. जीवनाचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात सांगितलेलं इतरत्र कुठंही सापडणार नाही. बेबी शकुंतला यांनी या चित्रपटात अभिनय केला होता. आज ते गीत मला आठवतंय.

दोन घडीचा डाव 
याला जीवन ऐसे नाव
जगताचे हे सुरेख अंगण, 
खेळ खेळूया सारे आपण
रंक आणखी राव, 
खेळू या रंक आणखी राव
याला जीवन ऐसे नाव.
माळ यशाची हासत घालू, 
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव, 
झेलू या पराजयाचे घाव
याला जीवन ऐसे नाव.
मनासारखा मिळे सौंगडी, 
खेळाया मग अवीट गोडी
दु:खाला नच वाव, 
दु:खाला नच वाव
याला जीवन ऐसे नाव.
(दैनिक 'पुण्य नगरी', १७ जून २०१८)

- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, June 9, 2018

समर्थ ऊर्जाकेंद्र!


देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्‍चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 50 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.

10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या शक्यता संपुष्टात आल्या. त्यांनी जे राजकीय डावपेच आणि प्रसंगी तडजोडी केल्या त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात, ‘साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो’ असे ठासून सांगतात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.

नियती न मानणारे पवार साहेब आजवर नियतीच्या अनेक तडाख्यातून सहीसलामत सुटले आहेत! सध्या मोदी लाटेमुळे अनेक प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेले असताना ‘मी प्रचंड आशावादी’ म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा राहण्याची धडपड करतोय. जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे ही नेतेमंडळी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पूर्ण क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील पाळेमुळे त्यांनी भक्कम केलीत. एक मोठा वर्ग ‘अच्छे दिन’च्या मोहजालात अडकलेला असतानाच खेड्यापाड्यातील धास्तावलेल्या लोकांना धीर देण्याचे काम राष्ट्रवादीची नेतेमंडळी करत आहेत.

10 जून हा राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! त्यामुळे सिंहावलोकन करताना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला आणि त्यांच्या कारकिर्दीला नेमक्या शब्दात आणि नेमकेपणे टिपणे हे काम तसे जिकिरीचेच. पवारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ‘तोंडओळख’ करून घेेतली तरी कुणालाही अचंबा वाटेल. कोणत्याही नेत्यावर, संस्थेवर टीका करायला फार काही लागत नाही; मात्र त्यांची सकारात्मक बाजू पाहणेही तितकेच गरजेचे आहे. ती पाहताना ‘शरद पवार’ या ऊर्जाकेंद्राची पुसटशी कल्पना येऊ शकते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय पटाची त्यांची व्याप्ती अफाट आहे.

‘राजकारण हा आपला व्यवसाय नाही तर ते आपले नैसर्गिक कर्तव्य आहे’ ही पवार साहेबांची नीतिमूल्ये समजून घ्यायला  हवीत. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ असे म्हणत संगमा, तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल अशा सहकार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना केली. देशाचे कृषीमंत्री असतानाही त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. हीच त्यांची ‘राष्ट्रीय’ कामगिरी का? असा सवाल काहीजण उपहासाने विचारत असले तरी कार्यकर्त्यांशी जोडलेली त्यांची नाळ, ‘साहेब’ या नावाची जादू महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवली आहे. आज भारतभर कोणत्याही निवडणुकीत फुटकळ उमेदवारांसाठी सातत्याने सभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला कौतुकास्पद वाटतात; पण हीच कर्तव्ये पार पाडणार्‍या शरदराव पवार यांची आपण टवाळी करतो हे आपले दुर्दैव आहे.

वाजपेयींनी पंतप्रधान असताना गुजरातच्या भूकंपावेळी त्यांनी साहेबांची मदत घेतली होती. साहेबांनी किल्लारी भूकंपात केलेल्या निस्वार्थ कामाची ती पावती होती. राजकारणात टीका-टिपण्या कायम सुरूच असतात; मात्र आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत येऊन साहेबांचा जो गौरव केला त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा आवाका ध्यानात येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या अनेक विरोधकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या महानेत्याचे मोठेपण सिद्ध करतात.

गोपीनाथ मुंडे यांनी एकदा सांगितले होते की, ‘‘जो माणूस शरद पवार यांच्यावर टीका करतो तोच मोठा होतो. त्यामुळे आम्हाला आमचे भवितव्य सुधारण्यासाठी त्यांच्यावर टीका करावी लागते.’’ 

म्हणूनच महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणताही विषय निघाला की त्याच्याशी पवार साहेबांचे नाव जोडले जाते. ‘‘या आरोपांचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?’’ असे विचारल्यानंतर त्यांनी एकदा फारच मार्मिक उत्तर दिले होते. 

ते म्हणाले, ‘‘जोपर्यंत तुम्ही किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय असे म्हणत नाही तोपर्यंत मी या आरोपांचा विचार करणार नाही.’’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फलोत्पादनाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन असेल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असेल या सगळ्यात त्यांची दूरदृष्टी दिसते.

शरद पवार यांचे राजकीय मूल्यमापन करताना स्वाभाविकपणे स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांची तुलना होते आणि ती रास्तही आहे. छत्रपती शिवरायानंतर यशवंतराव आणि त्यांच्यानंतर पवार साहेब यांनीच महाराष्ट्रावर खर्‍याअर्थी छाप टाकलीय. लोककल्याणकारी असे नेतृत्व या नेत्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.

पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही. त्यांना कोणत्याही विधानावरून कधी माफी मागावी लागली नाही; मात्र पक्षातील इतर नेत्यांनी काही चुकीचे विधान केल्यास पक्षाध्यक्ष या नात्याने साहेबांनी माफी मागितली. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. 

शरद पवार हे फक्त नाव नाही! हा शब्द नाही! हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मंत्र झालाय. इतक्या दीर्घकाळ राजकारण करताना त्यांच्यावर असंख्य आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ज्या झाडाला भरपूर फळे लगडलेली असतात त्यालाच पोरंसोरं दगडं मारतात, हा निसर्गनियम सर्वज्ञात आहेच.

भारतीय राजकारणावर प्रभाव पाडणार्‍या या बलाढ्य नेत्याने ‘कर्णधार’ बनून आपल्या कामाची छाप समाजमनावर उमटवलेली आहे. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, ह. भ. प. बबनराव पाचपुते (पूर्वाश्रमीचे), छगन भुजबळ, सुनील तटकरे असे अनेक नेते साहेबांनी त्यांच्या मुशीत घडवले. या सर्व नेत्यांनी त्यांच्या ‘गुणदोषांसकट’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा प्रभावीपणे हाकला आणि त्याचे सारे श्रेय या लोकनेत्याकडे जाते.

या महिन्यात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! तो साजरा करताना या पक्षाने जे काही विधायक केलेय त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. त्यांच्या चुकीच्या धोरणांवर, निर्णयावर आपण कायम तुटून पडू! पण देशातील एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पवार साहेबांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्रातील असंख्य लोकांसाठी हे एक सकारात्मक ‘ऊर्जाकेंद्र’ आहे हे मान्य करावेच लागेल. जहाज बुडायला लागलं की उंदरं आधी बाहेर उड्या मारतात असं म्हणतात. अगदी त्याप्रमाणंच मध्यंतरीच्या एका लाटेत इतर अनेकांप्रमाणेच राष्ट्रवादीची नौका थोडी डळमळीत झाली असता अनेकांनी त्यांचे रंग दाखवले.  या कशालाही न जुमानता राष्ट्रवादी कॉंग्रेस येणार्‍या संग्रामासाठी सज्ज असेल आणि आपली विजयपताका डौलात फडकवत ठेवेल यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा! 
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२