Friday, June 22, 2018

नाव मोठे, लक्षण खोटे!



हनुमंता राव (वय 35) हे तेलंगण राज्याच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील एका तेलगू वृत्तपत्रासाठी काम करणारे पत्रकार. तुटपूंज्या पगारामुळे प्राथमिक गरजाही पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. ज्यांच्याकडून सातत्याने हातउसणे पैसे घेतले ते तगादा लावू लागले. ही परिस्थिती त्यांनी त्यांच्या पत्नी मीना (वय 30) यांना सांगितली. प्राप्त परिस्थितीत कोणताच मार्ग निघत नसल्याने दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या 5 व 3 वर्षांच्या मुलांची गळा दाबून हत्या केली. हनुमंता यांनी पंख्याला दोरी लावून गळफास घेतला तर मीनानेही विषप्राषण केले.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत असे दुर्दैवी कृत्य घडावे हे दुःखद आहे. आत्महत्या, मग ती कुणाचीही असो! ती वाईटच! हतबल होऊन आत्मनाश घडविणे हे शेवटचे टोक आहे. कोणत्याही परिस्थितीत जगण्यातला संघर्ष संपता कामा नये. इतरांच्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणारे पत्रकार जेव्हा असे कृत्य करतात तेव्हा ती आणखी चिंतेची बाब असते. लोककवी मनमोहन नातू म्हणायचे, ‘‘उद्याचा कालीदास जर अनवानी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते!’’

कलावंतांचे, प्रतिभावंतांचे असे जाणे त्यामुळे ही त्यांची हार तर ठरतेच पण हे सत्ताधार्‍यांचे, समाजाचेही मोठे अपयश असते.

वृत्तवाहिन्यांवर झळकणारे चार-दोन चेहरे आणि काही भांडवलदार वृत्तपत्रांचे संपादक म्हणजेच प्रसारमाध्यमं अशी काहींची समजूत झालीय. माध्यमांशी संबंधित सगळ्या चर्चाही नेहमी त्यांच्याच भोवती फिरत असतात. अगदी तळागाळातल्या वार्ताहरांचा विचार केला तर त्यांचं जगणं मात्र भयावह आहे. मोठमोठ्या वृत्तपत्रांच्या ग्रामीण वार्ताहरांनाही आज दीड-दोन हजार रूपये मासिक वेतनावर काम करावं लागतं हे भेदक वास्तव आपण स्वीकारत नाही. इतरांना पगारवाढ व्हावी, त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, कर्मचार्‍यांवर कसा अन्याय होतो हे गळे काढून सांगणार्‍या माध्यमांच्या बुडाशी काय जळतंय हे पाहणं म्हणूनच गरजेचं आहे. मुद्रित माध्यमं सोडाच पण दृकश्राव्य माध्यमातही हीच अवस्था आहे. त्यांच्या तालुका वार्ताहरांना तर काहीच किंमत नाही. चार-दोन महिन्यात त्यांची एखादी बातमी लागते. त्याचे त्यांना हजार-पाचशे रूपये मिळतात. मग स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कुटुंबाची गुजरान करण्यासाठी त्यांना पत्रकारितेसोबत अन्य काही उद्योग करावे लागतात.

अनेक ठिकाणी स्थानिक शिक्षक बातम्या पाठवायचे. आता ‘शिक्षकांनी पत्रकारिता करू नये’ असे फर्मान निघालेय. काही ठिकाणी स्थानिक वृत्तपत्र विक्रेतेच बातम्या पाठवण्याचे काम करतात. अशा ‘पार्ट टाईम’ पत्रकारांच्या अधूनमधून बातम्या छापून येत असल्याने त्यांना गावात मान-सन्मान मिळतो. थोडीफार प्रतिष्ठा असते; पण त्यांनी घरात खायचे काय? याचा कोणी विचार करतच नाही. मोठ्या जिज्ञासेने, प्रामाणिक भावनेने या क्षेत्रात जी मुलं आलीत त्यांचा तर खूप लवकर भ्रमनिरास होतो. त्यातून अनेकांना सावरता येत नाही.

हनुमंता राव यांच्या आत्महत्येने हे भेदक वास्तव पुन्हा समोर आले आहे. त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे असे जाणे कदाचित मोठ्या व्यवस्थेत गृहितही धरले जाणार नाही. त्यांच्या पत्नी मीना या अत्यवस्थ आहेत. त्यांचे पुढे काय होईल याचाही कुणी फारसा विचार करणार नाही. तितकी संवेदनशीलता आपल्याकडे राहिलीच नाही. प्रत्येक आत्महत्यांवरून रान पेटवणारी प्रसारमाध्यमे याची दखलही घ्यायचे नाहीत. कारण त्यातून त्यांचाच विद्रूप चेहरा समाजासमोर येईल.

सरकारचे उदासीन धोरण, शासकीय जाहिरातीत केलेली कपात यामुळे छोटी वृत्तपत्रे कधीच देशोधडीला लागलीत. भांडवलदार वृत्तपत्रांना त्याचा फारसा धोका नाही. शहरी भागात कामाची अशाश्‍वतता असली तरी काही मोठी वृत्तपत्रे पत्रकारांना बरे मानधन  देतात. मात्र त्यांच्यासाठी राबणार्‍या ग्रामीण वार्ताहरांची हीच अवस्था आहे.

काही साखळी वृत्तपत्रे त्यांच्या जुन्या कर्मचार्‍यांना नारळ देत आहेत. कोणतेही कारण न सांगता ‘पुढचा दहा महिन्यांचा पगार घ्या आणि घरी बसा’ अशी ताकीद त्यांना दिली जातेय. नव्याने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या अननुभवी मुला-मुलींना अल्पवेतनावर कामाला घेऊन वृत्तपत्रांचा गाडा हाकला जातोय. मुद्रित शोधक, टंकलेखक ही पदे तर कालबाह्य होत आहेत. पत्रकारांनी स्वतःच्या बातम्या स्वतः टाईप करून पाठवायच्या. जाहिरातीतून जागा उरलीच तर उपसंपादकांनी काटछाट करून त्या लावायच्या असा मामला अनेक ठिकाणी दिसतो. ‘नाव मोठे अन् लक्षण खोटे’ अशीच गत अनेक वृत्तपत्रांची झालीय. काही जिल्हा वृत्तपत्रे तर ग्रामीण वार्ताहरांना सांगतात, ‘आम्हाला जाहिराती द्या! तुमच्या बातम्या प्रकाशित करू. बातम्यांसाठी तुम्हाला कुणी काही चिरीमिरी दिली तर त्यात तुमचे घर चालवा...’

तालुका स्तरावरील अनेक पत्रकार संघ म्हणजे तर संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या झाल्यात हे आम्ही वारंवार सांगत आलोय. एलआयसी एजंटपासून ते स्थानिक राजकारण्यांची तळी उचलण्यापर्यंत त्यांना मग सर्वकाही करावे लागते. त्यांच्याकडून न्यायाची, तटस्थतेची काय अपेक्षा करणार? 

असं म्हणतात की पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो. त्यात समाजाचे प्रतिबिंब उमटते. लोकांना दिशा मिळते. भल्या-बुर्‍याची जाणीव होते. मात्र हे अर्धसत्य आहे. आरश्यात आपल्याला आपली ‘मिरर इमेज’  दिसते. आपले उलटे प्रतिबिंब आपण सहजपणे स्वीकारतो. पत्रकारितेचेही तसेच झालेय. जे नाहीच ते सत्य म्हणून दाखवण्याचे काम माध्यमं जोरात करतात. ‘व्हर्च्युअल’च्या नादात ‘ऍक्च्युअल’ काहीच दिसत नाही. वर आपणच कसे सत्याचे दिवे लावलेत याची हाकाटी सुरू असते. म्हणूनच लोकांचा पत्रकारितेवरील विश्‍वास उडालाय. पत्रकार म्हणजे त्यांना संबंधितांच्या सुपार्‍या घेऊन लूट करणारे वाटतात.

‘सिंहासन’ चित्रपटातील निळूभाऊंप्रमाणे आजचे पत्रकार वेडेपिसे होणार नाहीत. त्यांना या क्षेत्रातील बदलाची थोडीफार जाणीव झालीय! पण हनुमंता राव यांच्यासारखे काहीजण असे दुर्दैवी मार्ग निवडत आहेत. अनेक पत्रकार अल्पवयात हृदयविकारासारख्या आजाराने मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या कामाचा ताण कोणीही विचारात घेत नाही. घरच्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांच्यातील खमकेपणा कमी होतोय. अनेक आजारांना त्यांना बळी पडावे लागतेय. जेवणाच्या, झोपेच्या वेळा तर निश्‍चित नसतातच पण कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते. सतत अपडेट राहण्याच्या नादात तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.

हे सर्व थांबवायचे असेल तर निदान त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील इतक्या सुविधा, लाभ त्यांना द्यायला हवेत. भांडवलदार म्हणून मिरवणार्‍या वृत्तपत्रांनी त्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या शिलेदारांना बळकटी द्यावी. तसे झाले नाही तर ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशीच या वृत्तपत्रांची, वाहिन्यांची आणि पर्यायाने या क्षेत्राचीही अवस्था होईल हे मात्र नक्की!
- घनश्याम पाटील
7057292092

No comments:

Post a Comment