![]() |
'चपराक प्रकाशन' पुणे/ ७०५७२९२०९२ |
कथालेखक हे कवी, चित्रकार, कथाकार, पत्रकार, तंत्रज्ञ अशा भूमिका निभावतात. त्यांच्या ह्या भूमिकांचा प्रभाव त्यांच्या विविध कथांमधून जाणवतो. अतिशय साधी-सोपी भाषा! पण उत्कंठा वाढविण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आहे. इंग्रजीमध्ये ‘शॉर्ट बट स्वीट’ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ‘छोट्या पण नेटक्या’ अशा शब्दात नेर्लेकरांच्या कथांबद्दल म्हणता येईल.
विविध विषयांवरच्या... विविध आशय असलेल्या... मनाचा वेध घेणार्या, मानवी स्वभावाचे विविध कंगोरे दाखवणार्या तर काही कथा समाजातल्या अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करणार्या आहेत. सामान्य मध्यमवर्गीय माणसाला कॉकटेल पार्टीचं आमंत्रण मिळालं तर त्याची वास्तवात आणि पार्टीत काय अवस्था होईल, याच मनोरंजनात्मक वर्णन आपल्याला ‘कॉकटेल पार्टी’त वाचायला मिळतं. कॉकटेल पार्टी त्यांनी डोळ्यासमोर उभी केली आहे. तसेच साहित्य प्रबोधन रंजन करत साहित्यिक नावारूपाला आल्यानंतर त्याचा मान-सन्मान केला जातो पण नवोदित साहित्यिकाच्या वाटेला उपेक्षा, अवहेलना येते. साहित्यिकांमध्ये कसे गट असतात यावर ‘रेड कार्पेट’मध्ये यथार्थ प्रकाश टाकला आहे. लेखक म्हणतात, ‘‘रेड कार्पेटखाली साचलेली धूळ मात्र कॅमेर्यातून दिसत नाही... एव्हढंच!’’
‘म्हातारीच्या फणी’मधून एक शाश्वत सत्य मजेशीर पद्धतीने समजावून सांगितले आहे. एक विद्वान म्हातारीला म्हणतो, ‘‘तुझी फणी घरात हरवली आहे, तर ती घरातच शोध. त्यासाठी बाहेर डोकावण्याची गरज नाही.’’ तेव्हा म्हातारी म्हणते, ‘‘हेच तुला का समजत नाही, ज्या सत्याचा तू बाहेर शोध घेतो आहेस ते बाहेर सापडणारच नाही कारण ते तुझ्या आतच आहे.’’
भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता आणि अपेक्षाभंग याचं छान चित्रण ‘प्लॅचेंट’मध्ये आहे. ‘परपुरूष’ ही अगदी छोटी कथा... यामध्ये पूर्वाश्रमाचे प्रियकर-प्रेयसी अचानक रस्त्यात समोरासमोर येतात. तेव्हा प्रेयसी म्हणते, ‘‘परपुरूषाशी संबंध ठेवणं सभ्य स्त्रियांना शोभत नाही...’’ त्यावेळी पूर्वीचा प्रियकर म्हणतो, ‘‘तुझ्या दृष्टिने परपुरूष कोण? मी की तुझा नवरा?’’
‘कोड’ मुलींच्या लग्नाआड येतं. असं लग्न न ठरलेल्या, दरवेळी मोडणार्या मुलीची व्यथा आणि समाज मानचं वास्तव उघड करणारी कथा!
सामाजिक प्रवृत्ती ,समाजरिती याबरोबरच रहस्यकथाही लिहिल्या आहेत. ‘एमरल्ड ग्रीन’ अशीच उत्कंठा वाढवणारी रहस्यकथा वाचायला मिळते.
स्वत:च्या फायद्यासाठी क्रौर्याचा कळस गाठणारे दुसर्यांचा कसा वापर करून घेतात हे सांगणारी ‘लंगडा घोडा’ ही अगदी थोड्या शब्दातील कथा अंतर्मु्ख करून जाते.
याचप्रमाणे ‘व्यवहार शून्य’, ‘सावली’ इत्यादी कथाही मानवी मनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतात.
काही काही लोक इतके व्यवहारी असतात की त्यांना व्यवहारापुढे नाती, प्रेम काहीच दिसत नाही. परंतु काही माणसे जीवनात प्रामाणिकपणाच महत्त्वाचा मानतात. त्यांनाही समाज ‘व्यवहार शून्य’ ठरवतेही. बाब व्यवहार शून्य मध्ये अतिशय रंजकपणे सांगितली आहे.
मनोविज्ञानावरची ‘डोह’ कथा अंतर्मनाचा वेध घेते. ‘उपसांपादक पाहिजे’मध्ये पत्रकारितेची दुसरी बाजू दाखवली आहे. सध्याचा समाजजीवनाच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन घडवले आहे.
अशा विविध आशय, विषय असलेल्या कथा वाचकांना नक्कीच भावतील, मनात घर करून राहतील.
-सुवर्णा अ. जाधव
9819626647