ही गोष्ट आहे एका अत्यंत त्यागी, देशसेवेला वाहून घेतलेल्या आदर्श पंतप्रधानांची. अर्थात लालबहाद्दूर शास्त्री यांची. त्यावेळी ते कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य होते.
एके रात्री त्यांचा एक मित्र अचानक त्यांच्या घरी आला. त्यानं सांगितलं, ‘‘शास्त्रीजी, माझ्या बायकोची तब्येत अचानक बिघडलीय. तिला तातडीने डॉक्टरकडे नेले पाहिजे. मला पन्नास रूपये हातउसणे द्या!’’
ते ऐकून शास्त्रीजी विचारात पडले. ते म्हणाले, ‘‘मला कॉंग्रेस वर्किंग कमिटीकडून पन्नास रूपये महिना मानधन मिळते. त्यात माझे घर चालते. शिल्लक अशी काही राहत नाही; पण तुमची अडचण मी समजू शकतो. आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू...’’
त्यांचा हा संवाद शास्त्रीजींच्या पत्नी ललितादेवी ऐकत होत्या. त्यांनी लगबगीने घरातून पन्नास रूपये आणले आणि त्या ग्रहस्थांना दिले. ललितादेवींचे आभार मानत ते निघून गेले.
शास्त्रीजींना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’
ललितादेवींनी सांगितले, ‘‘तुम्ही मला घरखर्चाला महिना पन्नास रूपये देता. त्यातून काटकसर करत मी महिना पाच रूपये वाचवते. एखाद्याच्या अडचणीला हे पैसे कामाला आले नाहीत तर ते साठवून करायचे काय?’’
शास्त्रीजींना ललितादेवींचे कौतुक वाटले. त्या आत गेल्या. त्याबरोबर शास्त्रीजींनी कागद घेतला आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिले, ‘‘माझे घर दरमहा पंचेचाळीस रूपयांत चालते. त्यामुळे आपल्याकडून पाच रूपये जास्त येत असल्याने ते तातडीने कमी करावेत आणि अन्य गरजूंना देण्यात यावेत...’’
आजकाल असा कोणी माणूस असेल तर आपण त्याला वेड्यात काढू! आपल्या संवेदनाच तितक्या बोथट झाल्यात. शास्त्रीजींसारख्या माणसांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक छान शब्द वापरलाय. ‘सद्गुण विकृती!’
अशी सद्गुण विकृती असणारी माणसं आजच्या काळात शोधावी लागतात. तो शोध सहसा अपूर्णच राहतो.
शास्त्रीजींच्या या प्रामाणिकपणाची आठवण होण्याचे कारण म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील. त्यांच्या चिरंजिवांचे, सुजय विखे पाटील यांचे राहता तालुक्यातील लोणी बुद्रुकजवळ ऊसाचे शेत आहे. त्या शेतात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मिळालेले हायमास्टचे दिवे उभारण्यात आलेत. कोणतीही लोकवस्ती नसताना या रानात झगझगाट असतो. आजचे नेतेमंडळी असा ‘उजेड’ पाडतात. त्यांना ना समाजाची चिंता, ना नैतिकतेची. त्यांच्या शेतातील खांबाला चार हायमास्ट दिवे असून खांबाच्या मध्यभागी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या फाटोसह योजनेचेही नाव आहे. मुख्य म्हणजे वीज मंडळाने तातडीने वीज जोडही दिली असून सर्वसामान्यांसाठी असलेल्या विकासयोजनांचा असा गैरवापर चालवला आहे.
सत्तेचा असा गैरवापर करणारे विखे काही एकमेव नेते नाहीत. राजकारणातला हा नियमच झालाय. ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ असे ठामपणे सांगितले जाते. सरकारी योजनांचा स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांसाठी वापर केला नाही असा राजकारणी शोधून दाखवा. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटीत स्वतःच्या नातेवाईकांच्या म्हणजे, सासूबाईंच्या, मेव्हणींच्या नावे सैन्यातील अधिकार्यांच्या सदनिका घेतल्या होत्या हे आपणास माहीत आहेच. नाशिकमध्ये भुजबळांनी अतिभव्य उड्डाणपूल केलाय. मुंबईहून येणार्यांची सोय हा त्यामागचा उद्देश! मात्र तो येतो ते थेट भुजबळांच्या घराजवळच. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
‘पहिल्या महिला राष्ट्रपती’ म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या प्रतिभा पाटील यांनी त्यांची कारकिर्द संपल्यावर राष्ट्रपती भवनातल्या सगळ्या वस्तू ‘उचलून’ आणल्या होत्या. त्या परत ‘मागवण्याची’ नामुष्की संबंधितांवर आली. परवा अखिलेश यादव यांनी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे निवासस्थान सोडताना चक्क घराच्या भिंतीही पाडून टाकल्या.
राजकारण्यांचे सोडा प्रशासकीय अधिकारीही याला अपवाद नाहीत. सरकारी गाड्या, अन्य साधने ते स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खाजगी कामासाठी वापरतातच पण त्यांच्या कनिष्ठांना अक्षरशः घरगड्यासारखी वागणूक देतात. अर्थात, याला काही सन्माननीय अपवाद आहेत; पण ते प्रमाणाने तुरळकच!
राजकारण्यांचे, प्रशासकीय अधिकार्यांचे एकवेळ सोडा... आपल्याकडील साहित्यिकांची, विचारवंतांची काय अवस्था आहे? ना. धों. महानोर यांच्यासारख्या लेखकाने त्यांच्या घराचे आणि शेतीचे वीज बिलच भरले नव्हते. किती दिवस? थोडे थोडके नव्हे तर तब्बल चौदा वर्षे! एका वृत्तपत्राने हा विषय उचलून धरला. त्यावेळी त्यांनी निलाजरे समर्थन दिले की, ‘‘मला बिल आलेच नाही तर कसे भरणार?’’
सामान्य माणसांकडून वीज बिल भरायला एक दिवस उशीर झाला तरी वीज तोडली जाते. मग हे काय सरकारचे जावई आहेत का? बरे, वीज बील आले नाही तर मग ते का आले नाही हे विचारण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवू नये? तुम्ही विचारवंत म्हणून मिरवता ना? हा सगळा मामला तेव्हाचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला. त्यावेळी अजित पवार यांनी महानोरांचे हे थकित वीज बील भरले.
साधा नगरसेवक असेल किंवा गावातला ग्रामपंचायतीचा सदस्य. त्याच्या दारात सगळ्या सोयीसुविधा आलेल्या असतात. आपल्याला सामान्य माणसाचा किती पुळका आहे हे दाखवणारे महाभाग सगळं काही स्वतःच्या पदरात पाडून घेतात. त्यांना कशाचीही ददात नसते. गावचा सरपंच असेल तरी तो टोलनाक्यावर पाच-पन्नास रूपयांच्या टोलसाठी कर्मचार्यांसोबत अरेरावी करतो. यातून आपल्या समाजाची, नेतृत्व करणार्यांची मनोवृत्ती दिसून येते.
महात्मा गांधी म्हणाले होते, ‘‘राजकारणात भ्रष्टाचार हा अपरिहार्य असतो. मात्र त्याचे प्रमाण लक्षात घ्यावे. एखादी मधमाशी मधाच्या पोळावर असते तेव्हा तिच्या पायाला जितका मध लागतो तितकाच व्यवस्थेचा लाभ यातील लोकांनी घ्यावा...’’
आजकाल या ‘मधमाशा’ मधात पूर्ण बुडल्यात. इतक्या, की त्यातून त्यांना बाहेरही पडता येत नाही.
घराणेशाहीसारखे विषय तर आपल्या सर्वच राजकीय पक्षांसाठी तकलादू ठरलेत. कोणीही कुणावर ‘घराणेशाहीचा’ आरोप करू नये अशी एकंदर परिस्थिती आहे. मात्र सगळी सत्ता आपल्याच घरातील सदस्यांकडे आल्यानंतर त्याचा विनीयोग तरी प्रामाणिकपणे व्हावा. तळे राखताना तुम्ही पाणी जरूर चाखा! पण जितकी तहान आहे तितकेच! शेजारचा गरजू तहानेने व्याकूळ झालेला असताना तुम्ही त्याला आडकाठी तर करत आहातच पण दांडगाईने ते पाणीही इतरत्र पळवताय. हे काही बरे नाही.
शेवटी एक गाणे आठवते.
लबाड जोडती इमले माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा
वेश्येला मणीहार...
उद्धवा अजब तुझे सरकार!
- घनश्याम पाटील
7057292092