मराठीत उत्तमोत्तम बालकलाकार
निर्माण होतात. अंगभूत कला आणि अत्यंत कठोर परिश्रम, त्यातील सातत्य
यामुळे अनेकजण पुढच्या आयुष्यात यशस्वी होतात; तर काहीजण काळाच्या ओघात
कुठे हरवले ते लक्षातही येत नाही. आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा
वैशंपायन, प्रथमेश लगाटे, रोहित राऊत या व अशा टीव्ही शोमुळे पुढे आलेल्या
कलाकारांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे सातत्याने प्रयत्न केले. आर्या आंबेकर,
रोहित राऊत हे यशस्वी होताना दिसतात. कार्तिकीच्या वडिलांनी सतत
कार्यक्रमाच्या सुपार्या घेऊन तिला संपवले असाही आक्षेप घेतला जातो. सध्या
‘सैराट’मुळे चर्चेत आलेले रिंकु राजगुरू, आकाश ठोसर हे कलाकारही पुढे
कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हे सारे मांडण्याचे कारण म्हणजे ‘टाईमपास’मुळे थोडेसे वलय प्राप्त झालेली कलाकार केतकी माटेगांवकर! जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या केतकीला चाहत्यांचा त्रास सहन करावा लागला. या मनस्तापाला वैतागून तिच्या वडिलांनी म्हणजेच पराग माटेगांवकरांनी एक पत्र लिहून थेट राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडेच तक्रार नोंदविली आहे. तिथे घडलेल्या प्रकारामुळे केतकीला आणि तिच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचेही त्यांनी सांगितलंय. महत्त्वाचं म्हणजे ‘पुन्हा कोणत्याही महिला कलाकारासोबत अशी घटना घडू नये’ अशी मागणीही त्यांनी महासंचालकांकडे केली आहे. प्रथमदर्शनी ही तक्रार रास्त वाटत असली तरी नाण्याची दुसरी बाजुही पडताळून पहायला हवी.
केतकीची आई सुवर्णा माटेगावकर या उत्तम गायिका आहेत. विविध क्षेत्रातील लोकांच्या साठी-पासष्ठीनिमित्त गाणे गाऊन उपस्थितांचे मनोरंजन करण्याचे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेत. त्यानंतर त्यांचे गाण्याचे अनेक अल्बमही गाजले. अशा कार्यक्रमात अर्थातच केतकीची अनेकदा त्यांना साथ असायची. त्यातूनच कलाकार म्हणून तिची जडण-घडण झाली. असे ‘कमर्शिअल’ कार्यक्रम करणारे कलाकार आपल्याकडे कमी नाहीत. या क्षेत्रावरील निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे माटेगांवकर मायलेकींप्रमाणे काहींना यश मिळते. त्यातून असंख्य चाहते निर्माण होतात. समाजमाध्यमांमुळे सध्या अनेक कलाकारांचा बोलबाला होतो. युवापिढी त्यांच्याकडे आकर्षित होते. त्यातून काहीवेळा अशा घटना घडतात. घसघशीत मानधन देऊन अशा कलाकारांना कार्यक्रमासाठी बोलवणारे आयोजक मात्र तोंडघशी पडून बदनाम होतात.
केतकी सध्या एक वलयांकित कलाकार आहे. हे वलय किती काळ राहील हे कोणीही सांगू शकत नाही. जळगावात बहिणाबाई महोत्सवात तिला पाहुणी म्हणून बोलावल्यानंतर तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आयोजकांचे कर्तव्य होते. त्यात निश्चितपणे ते कमी पडले असतील; मात्र आपल्याकडील लोकांची मानसिकता केतकीला आणि तिच्या सोबत आलेल्या तिच्या वडिलांना माहीत नाही असे कसे म्हणता येईल? गलेलठ्ठ मानधन घेऊन विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करणारे असे कलाकार स्वत:चे सुरक्षारक्षक का नेमत नाहीत? जळगावात केतकीभोवती जो गराडा पडला तो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा होता. प्रामुख्याने त्यातील तरूणींना दूर सारणे आयोजक, कार्यकर्त्यांना शक्य झाले नाही. बहिणाबाई महोत्सवात बचत गटातील महिलांचे आणि विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवणार्या महिलांचे सत्कार केतकीच्या हस्ते करण्यात आले. तिने आयोजकांना जो वेळ दिला होता त्याच्या आधीच तिथून ती निघाली. या कार्यक्रमासाठी तिने तब्बल दीड लाख रूपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते. हा कार्यक्रम ठरल्यानंतर जवळपासच्या विविध संस्थांचे चार-पाच कार्यक्रम ऐनवेळी तिने स्वीकारल्याने बहिणाबाई महोत्सवातून लवकर निघण्याची घाई तिला झाली. त्यामुळे आयोजकांना व्यासपीठावरील मान्यवरांकडे लक्ष द्यावे की तिला बाहेर सोडावे हेच कळत नव्हते. तेथील काही महिलांनी आणि ढोल पथकाच्या मुलींनी कडे करून केतकीला सुखरूप बाहेर काढले. भांडून, आग्रह करून मानधन भरगच्च घ्यायचे आणि कार्यक्रम अर्धवट सोडून निघायचे हे काही बरे नाही. चित्रपट आणि अन्य क्षेत्रातीलही अनेक कलाकार असेच करतात.
त्यातील आणखीन एक गोष्ट खटकते. साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना आपल्याला वलयांकीत कलाकारच लागतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हणूनच अमिताभ बच्चन, आशा भोसले, सुबोध भावे अशा कलाकारांना बोलवले जाते. मग त्यांचेही नखरे सुरू होतात. अमिताभ बच्चनचे मराठी साहित्यातले योगदान काय? हा प्रश्न मात्र कोणीही विचारत नाही. उलट अशा वलयांकित लोकांमुळे कार्यक्रमास गर्दी होते असे आयोजकांकडून सांगितले जाते. मुळात बहिणीबाई महोत्सवात केतकीसारख्या नवख्या कलाकारास बोलवणे हीच मोठी चूक होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार तिच्या हस्ते करणे अशोभनीय होते. पोलीस कमिशनरचा सत्कार कॉन्स्टेबलच्या हातून करावा किंवा आदर्श प्राचार्यांचा सत्कार एखाद्या बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिपायाच्या हस्ते करावा अशातला हा मामला. केतकीला कलाकार म्हणून अजून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे एका छोट्याशा कारणावरून थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणे म्हणजे केतकीच्या वडिलांच्या अविवेकाचे आणि डोक्यात हवा गेल्याचे लक्षण आहे. चाहते आहेत म्हणून कलाकार आहेत. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम, मिळणारे प्रोत्साहन हा सर्वोच्च पुरस्कार असतो. म्हणूनच ‘सेल्फीवरून मनस्ताप झाला’ असे गळे काढत प्रसिद्धीच्या झोतात राहणार्यांची कीव कराविशी वाटते. पराग माटेगांवकर यांच्या तक्रारीनंतर माध्यमांनी बातम्या दिल्या आणि काहींनी केतकीविषयी सहानुभूतीही दाखवली. जळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी यांनी याबाबतचे सत्य मांडून माटेगांवकर कुटुंबियांकडून कसा आक्रस्ताळेपणा केला जातोय हे दाखवून दिले. जळगावकरांना अकारण बदनाम करण्याचे त्यांचे कारस्थान दिलीप तिवारी यांनी हाणून पाडले.
शोलेसारखा चित्रपट इतक्या वर्षांनीही चर्चेत राहतो तो त्यातील अभिनयामुळे! याउलट चार-सहा महिन्यांपूर्वी सर्वोतोमुखी असलेला ‘सैराट’ आज अनेकांच्या विस्मृतीतही गेला. हा उच्च अभिरूची असलेल्या कलाकृतीचा आणि त्यातील प्रतिभावंत कलाकरांचा विजय असतो. कलाकारच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील यशस्वीतांचे जीवन आपल्याकडे खाजगी राहत नाही. त्यामुळेच ते कायम चर्चेत असतात. एखाद्या गाढवावरून डोंगराळ भागात मूर्ती नेताना आजुबाजूचे लोक त्या मूर्तिला झुकून नमस्कार करतात. त्यावेळी त्या गाढवाचाही अहंकार सुखावला जातो. कलाकारांचा मान-सन्मान हा त्यांच्या कलेला असतो. म्हणूनच हुरळून जाऊन कलाकारांनी कोणताही गाढवपणा करू नये. शाहरूख खानसारखा कलाकार जेव्हा सुरक्षारक्षकावर हात उगारतो तेव्हा आपले कलाकार किती गाढवपणा करतात याची प्रचिती येते.
पुण्यामुंबईसारख्या महानगरात केतकीसारखी एक कलाकार शोधायला गेल्यास शंभर मिळतात. इकडे यांना कोणीही विचारत नाही. म्हणूनच अन्य ठिकाणी गेल्यास त्यांचा अहंकार सुखावतो. आयोजकांनी चार-दोन पोलीस सुरक्षेसाठी बोलवले नाहीत तर हे लगेच कांगावा सुरू करतात. आपल्या देशात अनेक विचारवंत, संशोधक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते राजरोसपणे, निडरपणे फिरत असताना केतकीसारख्या तुलनेने अगदीच नवख्या कलाकारांना त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण देणे म्हणजे जणू व्यवस्थेची चेष्टाच आहे. स्वत:चे पगारी सुरक्षारक्षक ठेवायचे नाहीत, मनात येईल तितके मानधन घ्यायचे, प्रवास, निवास, भोजनासह सर्व सुविधा अव्वल असाव्यात यासाठी आग्रह धरायचा आणि त्यावर कडी म्हणजे चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी त्रास दिला म्हणून गावगन्ना करायचा हे कोणत्याही सुसंस्कृत आणि सभ्य परंपरेला शोभणारे नाही. हा व असा मनस्ताप सहन होणार नसेल तर कार्यक्रम घेऊच नयेत, खुशाल घरी झोपून रहावे. आपल्या कृत्यामुळे आणि मिरवण्याच्या लालसेमुळे व्यवस्था वेठीस धरली जाते याचे भान प्रत्येक कलावंतांनी सदैव ठेवले पाहिजे.
- घनश्याम पाटील
7057292092