Sunday, January 8, 2017

गडकरींचे नाटक आणि ब्रिगेडचा ‘ड्रामा!’

आपल्या समाजाला सध्या एक मोठी कीड लागलीय. सर्व महापुरूषांना आपण जातीपातीत वाटतोय. बरे, त्यांचे काही विचार अंमलात आणतोय असेही नाही. आचार्य विनोबा भावे म्हणायचे की, ‘महापुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात.’ त्यांच्या या विचाराची सत्यता गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. आमच्या जातीय अस्मिता अधिक टोकदार होत चालल्यात. यातून किमान त्या त्या समाजाचे भले होतेय असेही नाही. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने ‘समाजशास्त्रीय भूमिका’ म्हणून जातीवादाला खतपाणी घातले. त्या-त्या जातीपातीतील लोक एकत्र आल्यास त्यांच्या समस्या सुटायला हातभार लागेल अशी त्यांची भाबडी समजूत; मात्र आपण स्वार्थाच्या आणि विविध विचारधारांच्या इतके आहारी गेलोय की आपले स्वत्वच हरवत चाललेय.
पुण्यात संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही समाजकंटकांनी रात्रीतून काढून टाकला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही या दुष्कृत्याची जबाबदारी घेतली. एखादी अतिरेकी, दहशतवादी संघटना एखादा घातपात घडल्यानंतर तो आपण घडवल्याचे ज्या आविर्भावात सांगते तोच आवेश ही जबाबदारी घेणार्‍यांचा होता. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच घटना अभिमानाने मिरवणार्‍यांना काय म्हणावे? यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडणार्‍यांनी, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढणार्‍यांनी, वाघ्याचा पुतळा फोडणार्‍यांनीच राम गणेश गडकरींचा पुतळा काढून टाकला आहे. साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील धुरिणांनी या घटनेचा निषेध केला असला तरी या गुन्हेगारी कृत्याची आणि त्यांच्या निगरगट्ट मानसिकतेची गंभीर नोंद घ्यायलाच हवी.
‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेचे नुकतेच राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे. यापूर्वीही या मंडळींनी एक राजकीय पक्ष काढला होता. त्यावेळीही सपशेल तोंडावर आपटल्यानंतर त्यांनी हाच प्रयत्न पुन्हा केला आहे. सध्या पुण्या-मुंबईसह काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जनतेचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून त्यांचे असे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. नवनिर्मितीची क्षमता नसल्याने हे लोक विध्वंसच घडवणार हे पुन्हा पुन्हा त्यांच्या कृत्यातून दिसून येतच आहे. आजवर या लोकांचे भरणपोषण ज्यांनी केले त्यांच्यासाठीही ही मोठी डोकेदुखी झाली आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्यांनी काढून टाकल्यानंतर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ‘लवकरच तो त्या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्यात येईल’ असे सांगितले आहे. मुख्य म्हणजे दादोजींचा पुतळा हटवला त्यावेळीही मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच महापौर होते. जगतापही राष्ट्रवादीचेच आहेत. त्याहीवेळी ‘दादोजींचा पुतळा आठ दिवसाच्या आत पुन्हा बसवण्यात येईल,’ अशी घोषणा राजपालांनी राणा भीमदेवी थाटात केली होती. अजूनही त्याचे काय झाले हे कळले नाही.
राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक लिहिले. खरेतर ते अपूर्णच होते. त्यातील जिवाजी कलमदाने हे एक खलपात्र आहे. दुष्ट वृत्तीचे हे पात्र शिवाजी महाराजांविषयी चुकीचे बोलते. मुख्य म्हणजे याच पात्राने समर्थ रामदास स्वामी यांचीही निंदानालस्ती केली आहे. गडकरी हे काही इतिहासकार नाहीत. त्यांनी हे चरित्रात्मक लेखन केले नाही. रावणाने रामाचे गोडवे गावेत किंवा अफजलखानाने शिवाजीराजांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवताच येणार नाही. हे खलपात्र ज्या भाषेचा वापर करते ते चूक की बरोबर हा वाद होऊ शकतो. मात्र ‘महाराष्ट्र गीत’ लिहिणारे आणि लक्षवेधी साहित्य संपदा असणारे गडकरी ‘व्हिलन’च होते असा निष्कर्ष काढणे अविवेकी आहे. 1907 साली लिहिलेल्या या नाटकावरून 2017 साली ‘ड्रामा’ करणे हे निव्वळ राजकारण आहे.
चार तरूण कार्यकर्त्यांनी संभाजी उद्यानातून हा पुतळा काढला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. ही चारही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय, याचा पत्ता असणे शक्य नाही. देशभक्ती काय असते हेही यांना सांगून उपयोग नाही. मात्र हे अविचारी, तालिबानी वृत्तीचे, दहशतवादी स्वरूपाचे कृत्य आहे इतकेही कळू नये याचे आश्‍चर्य वाटते. संभाजी ब्रिगेडच्या चिथावणीवरून ज्या तरूणांनी भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड केली त्यांचे काय हाल झाले हे एकदा मुद्दामहून बघायला हवे. या कुणालाही कसल्याही नोकर्‍या मिळत नाहीत. त्यांना धड व्यवसाय-उद्योग करता येत नाही. कोर्टाच्या तारखा पडल्यानंतर उपस्थित राहण्यासाठी, प्रवासासाठीही यांच्याकडे पैसे नसतात. बाहेरचे सोडा पण कुटुंबातील सदस्यही यांच्याशी परकेपणे वागतात. अशावेळी कोणतेही ‘माफीवीर’, ‘शिवीश्री’ त्यांच्याबाजूने उभे राहत नाहीत. यांची होणारी ससेहोलपट पाहिल्यानंतर असे गुन्हेगारी कृत्य करायला कोणीही धजावणार नाही. तरूणांचा ‘ब्रेन वॉश’ करून राजकारण करणारे मात्र नामानिराळे राहतात.
पुतळ्यामुळे कुणाला फार स्फूर्ती मिळते असेही नाही. मात्र आपल्या देशात पुतळ्यांचे ‘फॅड’ आहे. त्यात सर्वाधिक पुतळे राजकारण्यांचे आहेत. काही राज्यात साहित्यिक, विचारवंत,  संतमहात्मे, समाजसुधारक, शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत; पण त्यामुळे कुणी फार प्रेरणा घेतलीय आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिलेय असेही नाही. उलट पुतळ्यांची सुरक्षा, त्यांची विटंबना यामुळे अनेक वाद निर्माण होतात. शिवसागरात तयार करण्यात येणारा शिवरायांचा पुतळा असेल, बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील पुतळा असेल किंवा आता इंदू मिलमध्ये संकल्पित असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल... या प्रत्येक पुतळ्यावर, त्या प्रकल्पावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते. पैशाचा असा बाजार मांडण्याऐवजी त्या त्या महापुरूषांचे विचार जपण्यासाठी काही करता आले तर अवश्य विचार व्हावा.
इतिहासाची तोडफोड हा तर अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय झालाय. आपल्याला हवे ते वाक्य घ्यायचे, त्याचे मागचे-पुढचे संदर्भ न लावता त्याचा अर्थ लावायचा आणि श्रद्धास्थानांना तडा देऊन राजकारण पेटवायचे हे इथल्या व्यवस्थेत काहीजणांच्या ‘उपजिविकेचे’ साधन झालेय. उदाहरणच घ्यायचे झाले तर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’चे घेता येईल. बाबासाहेबांनी लिहिले, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच...’ या वाक्यावरून आऊसाहेबांची बदनामी झाली म्हणून काहींनी महाराष्ट्र पेटवला. ते मूळ वाक्य असे होते, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच... ते म्हणजे सह्याद्री!’ यातील ‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढून टाकायचे आणि आपणच आपल्या श्रद्धास्थानांची बदनामी करायची असे निलाजरेपण काहीजण करतात.
गडकरींच्या ‘एकच प्याला’तले तळीराम शोभावेत असे काही लोक कोणत्याही काळात असतात. त्यांना पर्याय नसतो. त्यांच्या विकृत मानसिकतेचा राष्ट्राला मात्र मोठा फटका बसतो. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. रोजच्या भाकरीचा प्रश्‍न बिकट असताना आपण पुतळ्यासारख्या विषयावरून राजकारण करतोय, राज्य पेटवतोय याचे काहीच सोयरसुतक अशांना नसते. त्यांच्या बोलबच्चनगिरीला बळी पडलेल्यांची मात्र पुढे केविलवाणी अवस्था होते. ‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे मात्र अशा प्रकारानंतर मूग गिळून गप्प बसतात. त्यांचा ‘निषेध’, ‘प्रतिक्रिया’ हे सर्व काही सोयीस्कर असते.
महापुरूषही काळाच्या रेट्यात कसे दुर्लक्षित राहतात याबाबत रॉय किणीकर यांनी त्यांच्या एका रूबाईत सांगितलेय,
कोरून शिळेवर जन्म मृत्युची वार्ता
जा ठेवा त्या जागेवर पणती आता
वाचेल कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा? कशास याचे स्मरण?

गडकरींचा पुतळा काढल्याने थोडेसे विस्मृतीत गेलेले त्यांचे साहित्य पुन्हा चर्चेत आले आहे. जे ‘राजसंन्यास’ फार कुणी वाचले नव्हते ते यानिमित्ताने पुन्हा घराघरात पोहोचले आहे. गडकरींच्या नाटकावरून ‘ड्रामा’ करणार्‍यांचे हे यश आहे की अपयश आहे हे त्यांचे त्यांनीच पडताळून पहावे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Wednesday, January 4, 2017

ही तर मेकॉलेचीच अवलाद!

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

असे महन्मंगल काव्य लिहिणारे राम गणेश गडकरी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासारख्या महानगरातून यापूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला होता. आज संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकून पुणे शहराचा ‘सिरीया’ झालाय हे काही अपप्रवृत्तींनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, पुण्यातील साहित्यिक, कलावंत, प्रकाशक यांनी तातडीने एकत्र येऊन या प्रवृत्तींचा निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेडचे संघटनेतून राजकीय पक्षात रूपांतर झाल्यानंतर असे प्रकार घडणे अपेक्षित असले तरी ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रावरील हा सांस्कृतिक बलात्कार तमाम मराठी माणसांनी एकत्र येऊन थांबवायला हवा.
‘विचारांची लढाई विचाराने लढायला हवी’, हे गुळगुळीत वाक्य बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार्‍यांची तालिबानी वृत्तीच यातून दिसून येते. उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे इतिहास, नाटके, कथा-कादंबर्‍या लिहिल्या जातात. मुळात हे लिखाण करणारे सर्वजण इतिहास संशोधक असतातच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या कलाकृतीत काहीना काही आक्षेपार्ह असे असतेच. वाचकांची त्या त्यावेळची मानसिकता आणि बदलत्या काळानुसार ते लेखन कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही. राम गणेश गडकरी यांनी त्या काळात लिहिलेले ‘राजसंन्यास’ हे नाटक तसे अपुरेच राहिले. या नाटकातील जिवाजी कलमदाने या पात्राने शिवाजी राजांची बदनामी केल्याचे आत्ता म्हणजे शंभरहून अधिक वर्षांनी काही जणांना उमजले. कुठून ना कुठून महापुरूषांची वादग्रस्त विधाने शोधायची आणि त्यावरून खल करत रहायचा हा काही समदु:खी लोकांचा उद्योगच होऊन बसलाय. जिवाजी कलमदाने हे पात्र या नाटकात देहू या पात्राजवळ फुशारकी मारताना छत्रपती शिवरायांविषयी वाईट बोलते. किंबहुना या जिवाजीने समर्थ रामदास स्वामींची यथेच्छ नालस्ती केली आहे. शिवरायांच्या कर्तृत्वावर संशय घेताना तो रामदास स्वामी यांच्याविषयी वाटेल ते तारे तोडतो. मुळात हे खलपात्र भ्रष्ट आहे. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशा ठेवता येतील? रावणाने रामाची महती गावी किंवा अफजलखानाने शिवरायांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे नाही का?
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरूनही आत्तापर्यंत झालेली झुंडशाही आपण बघितलेली आहेच. विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’वरून राडा झाला. आता ‘राजसंन्यास’ या अर्धवट नाटकातील एका पात्राच्या संवादाने अकारण महाराष्ट्र पेटवला जात आहे. कोणत्याही साहित्य कृतीतून आपल्याला हवा तितका भाग सोयीस्करपणे घेतल्यास रामायण, महाभारत अशा महाकाव्यावरूनही राष्ट्र पेटवले जाऊ शकते.
संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याने ते नाट्यरसिकांच्या आणि वाचकांच्या हृदयातून मुळीच जाणार नाहीत. देशातील सर्वच साहित्यिकांचे, विचारवंतांचे, शास्त्रज्ञांचे पुतळे काढून टाकावेत आणि केवळ राजकारण्यांचे पुतळे देशभर लावावेत, अशी अपेक्षा यानिमित्ताने साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी अतिशय हताशपणे व्यक्त केली. देशभर अनेक छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांचे पुतळे असताना त्यांचे विचार समाजमनावर प्रभाव पाडून गेेलेत असे म्हणता येणार नाही.
पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?
सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?

अशा आशयाची एक वास्तववादी कविता आपणा सर्वांना ज्ञात आहेच; मात्र महापुरूषांचे असे पुतळे काढून आपण आपल्या श्रद्धास्थानांना तडा देतोय. ज्यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता अशा ब्रिटीश सल्तनतचीही गडकरींना हात लावायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना गडकरींनी त्यांच्या अजरामर साहित्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या ‘एकच प्याला’तील तळीरामाचे वारसदार आज महाराष्ट्रात अकारण हैदोस घालत आहेत. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेसाठी जे योगदान दिले, त्याला तोड नाही.
‘जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’

असे म्हणणार्‍या गडकरींचा भगवा आजचा नव्हता. मराठी साहित्याचा विजयध्वज ठरणारा तो भगवा कुण्या एका पक्षाचा, कुण्या एका विचारधारेचा नव्हता.
‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’

असे गर्जून सांगणार्‍या गडकरींच्याबाबत आजच्या दरिद्री लोकांनी जे कारस्थान केले ते निश्‍चितच निंदणीय आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्याशी कसलेच देणे-घेणे नसलेल्या नीच लोकांचे हे काम आहे. लॉर्ड मेकॉले या ब्रिटीश शिक्षणतज्ज्ञाने त्यावेळी सांगितले होते की, ‘‘हिंदुस्तान हा सुजलाम् सुफलाम् देश आहे. या देशातून सोन्याचा धूर निघतो. इथल्या गुरूकुल शिक्षणपद्धतीमुळे इथली पिढी संस्कारशील आहे. देव, देश आणि धर्मासाठी जीव ओवाळून टाकणारे हे लोक प्रचंड श्रद्धावान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज्य करणे आपल्याला कदापि शक्य होणार नाही. बंदुकीच्या जोरावर हिंदुस्तान आपल्याला जिंकता येणार नाही. या देशावर राज्य गाजवायचे असेल तर इथली गुरूकुल शिक्षण पद्धत आधी नष्ट करा, यांच्या श्रद्धास्थानांना तडा द्या. यांची श्रद्धा कमकुवत झाली तरच ते डळमळीत होतील आणि त्यांच्यावर आपल्याला राज्य गाजवता येईल.’’ लॉर्ड मेकॉलेची औलाद शोभणार्‍यांनी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. लालमहालातून दादोजी कोंडदेवांंचा पुतळा काढणे असेल किंवा आज संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा काढणे असेल यातून मेकॉलेचीच वृत्ती दिसून येते.
‘कोणतीच भूमिका घ्यायची नाही’, ही एकच भूमिका साहित्यिक आणि विचारवंत इमानेइतबारे पार पाडत असताना साहित्यिक आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज आज रस्त्यावर उतरले आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सुप्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रविण तरडे, महेश मांजरेकर, सुनिल महाजन, डॉ. सतिश देसाई, योगेश सोमण अशा सर्वांनी संभाजी उद्यानात एकत्र येऊन आपला निषेध नोंदवला आहे. ‘यानिमित्ताने राम गणेश गडकरी आजच्या पिढीला माहीत तरी होतील’ , असेही काहीजण सांगत आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापासून अनेक दिग्गजांना घडविणारा गडकरीसारखा हिरा अशापद्धतीने प्रकाशात यावा, हे दुर्दैवी आहे.
आपल्याकडे औरंगजेब कायम चर्चेत राहतो मात्र संस्कृततज्ज्ञ असलेल्या दारा शुकोकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. कुपमंडूक वृत्तीच्या इथल्या विचारवंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सोयीस्कर असते. भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड असेल, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढणे असेल किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणे असेल या सर्वांतून मेकॉलेची अवलाद पुन्हा कार्यान्वित झाल्याचे दिसून येते. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि देशाचे पंतप्रधान जातीभेद, धर्मभेद करू नका असे तळमळीने सांगत असतानाच आमच्या जातीय अस्मिता अधिक घट्ट होत चालल्यात.
गडकरींचा पुतळा काढून टाकणार्‍यांनीच यापूर्वी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरही आक्षेप घेतले होते. वाघ्याचा पुतळाही त्यांनी काढून टाकला होता. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी त्यांचे हे कारस्थान हाणून पाडले होत. दुर्दैव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच गडकरींचा पुतळा हटविण्यात आला. हा कट चार-दोन दिवसात शिजलेला नाही. संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्यावर असे अनेक विषय आहेत. त्यातूनच ते वेळोवेळी अनेक विखारी फुत्कार सोडतात. जून 2011 लाच संजय सोनवणी यांनी ‘राम गणेश गडकरींनी शिवरायांची बदनामी केली आहे काय?’ हा लेख त्यांच्या ब्लॉगवर लिहिला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात यायला इतकी आठवण पुरेशी आहे.
एकीकडे सामान्य माणसाची रोजची जगण्याची लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र जातीय विष पेरणे, श्रद्धास्थानांना तडे देणे हे काम सुरूच आहे. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर हा पराभव जिव्हारी लागल्याने, सत्तेची ऊब मिळत नसल्याने काही नेते वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून ही अशी अराजकता माजवत आहेत. सुज्ञ मतदार येणार्‍या निवडणुकांमध्येही अशा विचारधारेला, अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना सणसणीत चपराक देईल हे वेगळे सांगायला नको.

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’
7057292092

Saturday, December 31, 2016

राजकीय पटाचा ‘कर्णधार’


सोमवार ते रविवार असा विचार आपण करत असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक वार महत्त्वाचा आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडूच शकत नाहीत. तो वार आहे, ‘प-वार!’
देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्‍चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 45 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.
10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या शक्यता संपुष्टात आल्या. त्यांनी जे राजकीय डावपेच आणि प्रसंगी तडजोडी केल्या त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.
पुण्यातील स्वामी विजयकुमार हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक. ‘ज्योतीष’ आणि ‘साहेब’ ही खरे तर विसंगतीच! नियती न मानणारे पवार साहेब नियतीच्या अनेक तडाख्यातून सहीसलामत सुटले आहेत! तर या स्वामींनी त्यांचे अल्पचरित्र वाचकांसमोर मांडले आहे. शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला इतक्या नेमक्या शब्दात आणि नेमकेपणे टिपणे हे काम तसे जिकिरीचेच. तरीही विजयकुमार स्वामी यांनी या विषयाला पुरेपूर न्याय देत पवारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ‘तोंडओळख’ करून दिली आहे. ही ओळख करून घेताना वाचकांना ‘शरद पवार’ या ऊर्जाकेंद्राची पुसटशी कल्पना येऊ शकते. साधी, सोपी, ओघवती शैली आणि महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय पटाची दखल लेखकाने सजगतेने घेतली आहे.
केवळ ‘दिवे ओवाळणे’ असाही या पुस्तकाचा सूर नाही. शरद पवार यांनी आणीबाणीचे समर्थन करताना ज्या खेळ्या केल्या त्याविषयी सूचक भाष्य करताना लेखक म्हणतात, ‘साहेबांची आजच्या एवढी प्रगल्भता पस्तीसाव्या वर्षी नव्हती.’ त्यामुळेच हे पुस्तक प्रत्येक राजकीय अभ्यासकाने, कार्यकर्त्याने वाचले पाहिजे. शरद पवार हा माणूस आहे तरी काय? हे भल्याभल्यांना उलगडले नसताना ‘कर्णधार’ या पुस्तकाद्वारे स्वामीजींनी ते ताकदीने मांडले आहे.
‘राजकारण हा आपला व्यवसाय नाही तर ते आपले नैसर्गिक कर्तव्य आहे’ ही पवार साहेबांची नीतिमूल्ये या पुस्तकात आली आहेत. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ असे म्हणत संगमा, तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल अशा सहकार्‍यांना सोबत घेऊन पवार साहेबांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना केली. देशाचे कृषीमंत्री असतानाही त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. हीच त्यांची ‘राष्ट्रीय’ कामगिरी का? असा सवाल काहीजण उपहासाने विचारत असले तरी कार्यकर्त्यांशी जोडलेली त्यांची नाळ, ‘साहेब’ या नावाची जादू महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवली आहे.
वाजपेयींनी पंतप्रधान असताना गुजरातच्या भूकंपावेळी साहेबांची मदत घेतली होती. साहेबांनी किल्लारी भूकंपात केलेल्या निस्वार्थ कामाची ती पावती होती. राजकारणात टीका-टिपण्या कायम सुरूच असतात; मात्र आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत येऊन साहेबांचा जो गौरव केला त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा आवाका ध्यानात येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या अनेक विरोधकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या महानेत्याचे मोठेपण सिद्ध करतात.
गोपीनाथ मुंडे यांनी एकदा सांगितले होते की, ‘जो माणूस शरद पवार यांच्यावर टीका करतो तोच मोठा होतो. त्यामुळे आम्हाला आमचे भवितव्य सुधारण्यासाठी त्यांच्यावर टीका करावी लागते.’ म्हणूनच महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणताही विषय निघाला की त्याच्याशी पवार साहेबांचे नाव जोडले जाते. ‘या आरोपांचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?’ असे विचारल्यानंतर त्यांनी एकदा फारच मार्मिक उत्तर दिले होते. ते म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय असे म्हणत नाही तोपर्यंत मी या आरोपांचा विचार करत नाही.’
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फलोत्पादनाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन असेल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असेल या सगळ्यात त्यांची दूरदृष्टी दिसते आणि याचा नेमकेपणे वेध स्वामी विजयकुमार यांनी या पुस्तकाद्वारे घेतला आहे.
शरद पवार यांचे राजकीय मूल्यमापन करताना स्वाभाविकपणे यात कॉंग्रेसचीही बरीचशी वाटचाल आली आहे. स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी पवारांची तुलना लेखकाने अनेक ठिकाणी केली आहे आणि ती रास्तही आहे. छत्रपती शिवरायानंतर यशवंतराव आणि त्यांच्यानंतर पवार साहेब यांनीच महाराष्ट्रावर खर्‍याअर्थी छाप टाकलीय. लोककल्याणकारी असे नेतृत्व या नेत्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.
पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही. त्यांना कोणत्याही विधानावरून कधी माफी मागावी लागली नाही; मात्र ‘इतर नेत्यांनी काही चुकीचे विधान केल्यास पक्षाध्यक्ष या नात्याने साहेबांनी माफी मागितली’ असे स्पष्ट मत नोंदवत स्वामी यांनी अजित पवारांच्या ‘त्या’ विधानाची आठवण करून दिली आहे.
शरद पवार हे नाव नाही! हा शब्द नाही! हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मंत्र झालाय. इतक्या दीर्घकाळ राजकारण करताना त्यांच्यावर असंख्य आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. (फारतर आपण त्याला राजकीय ‘कसब’ म्हणूया.)
या पुस्तकात त्यांची जशी राजकीय कारकिर्द आलीय तशीच कौटुंबिक पार्श्‍वभूमीही आलीय. ते कसे कुटुंबवत्सल आहेत, हे लेखकाने अचूकपणे टिपले आहे. किंबहुना नंतरच्या काळात त्यांना पानपराग (खरेतर ‘माणिकचंद’ गुटखा) खाल्ल्याने कर्करोग झाला. त्यानंतर त्यांना झालेल्या त्रासाचे वर्णन केवळ एका परिच्छेदात आले आहे. तरीही ते वाचून कुणी तंबाखू, गुटखा खाण्याचे ‘धाडस’ करणार नाही. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशा सच्च्या आणि अच्छ्या नेत्यांवरही व्यसनांनी घाला घातला. त्यामुळे आजच्या नेत्यांनी ‘व्यसनापासून दूर रहावे’ हा संदेश ते तळमळीने मांडतात आणि त्याचे यथायोग्य वर्णन या पुस्तकात आले आहे.
स्वामी विजयकुमार यांचे आडनाव ‘जंगम’; मात्र या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास आणि अधिकार यामुळे सर्वजण त्यांना ‘स्वामी’ असेच म्हणतात. स्वामींनी आजवर पंधरा पुस्तके लिहिली आहेत. ‘भविष्य’ हा दिवाळी अंक ते एकहाती लिहितात आणि स्वतःच प्रकाशित करतात. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांच्याकडे भविष्य पहायला येतात; तरीही या पुस्तकाचे ‘भविष्य’ चांगलेच आहे हे सांगण्यासाठी माझ्यासारख्या कुण्याही बोरूबहाद्दराची गरज नाही.
भारतीय राजकारणावर प्रभाव पाडणार्‍या या बलाढ्य नेत्याने ‘कर्णधार’ बनून आपल्या कामाची छाप समाजमनावर उमटवलेली आहेच. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, ह. भ. प. बबनराव पाचपुते (पूर्वाश्रमीचे), काही प्रमाणात छगन भुजबळ (हेही पूर्वाश्रमीचेच!), सुनील तटकरे असे अनेक नेते साहेबांनी त्यांच्या मुशीत घडवले. या सर्व नेत्यांनी त्यांच्या ‘गुणदोषांसकट’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा प्रभावीपणे हाकला आणि त्याचे सारे श्रेय या लोकनेत्याकडे जाते.
म्हणूनच या पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे. सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे आणि या लोकनेत्याविषयी माहिती मिळवण्याबरोबरच आपापल्या सामाजिक, राजकीय क्षमता विकसित कराव्यात इतकेच या निमित्ताने सांगतो. स्वामी विजयकुमार यांचे आणखी लेखन वाचकांना पुढच्या काळात वाचायला मिळो याच सदिच्छा व्यक्त करतो.
कर्णधार
लेखक - स्वामी विजयकुमार
प्रकाशक - भक्ती प्रकाशन, पुणे (9822785055)
पाने - 48, मूल्य - 100/-
-घनश्याम पाटील
संपाकद, ‘चपराक’, पुणे
7057292092

साहित्यिक झरे पाझरत रहावेत!

नव्या वर्षाची चाहूल लागली की मराठी सारस्वतांना वेध लागतात साहित्य संमेलनाचे. या संमेलनांना उत्सवी स्वरूप आले आहे. न. चिं. केळकर, लोकमान्य टिळक अशा दिग्गजांनी ग्रंथकारांचे संमेलन सुरू केले. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यापक रूपांतर झाले. माय मराठीच्या सर्वंकश विकासासाठी मोलाचे योगदान देणार्‍या साहित्य संमेलनांनी जनमाणसाची नैतिकता वृद्धिंगत करण्यात हातभार लावला. गेल्या वर्षी 15 ते 18 जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन धडाक्यात पार पडले. धडाक्यात यासाठी की गेल्या वर्षीचे आयोजक होते शिक्षणसम्राट पी. डी. पाटील! मोठा आयोजक आणि खुजा संमेलनाध्यक्ष असे चित्र असल्याने या संमेलनात अनेक गंमती-जंमती घडल्या. यंदाचे नव्वदावे संमेलन डोंबिवली येथे 3, 4, 5 फेब्रुवारी रोजी होणार असून अक्षयकुमार काळे यांच्यासारखा अभ्यासू समीक्षक आणि स्वतःला कवितेचा ‘प्रियकर’ मानणारा संवेदनशील लेखक संमेलनाध्यक्ष म्हणून मिळाला आहे.
सध्याच्या बाजारू युगात साहित्य संमेलनांची आवश्यकता आहे का? असा प्रश्‍न काहीजण सातत्याने उपस्थित करतात. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा ज्ञानपीठ विजेता लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांची जत्रा’ असे म्हणतो तेव्हा या क्षेत्रातील लोकांनी गंभीरपणे सिंहावलोकन करायला हवे.
महाराष्ट्रात वर्षभर अनेक लहान मोठी साहित्य संमेलने होतात. त्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. या छोट्या संमेलनांचा प्रवाह बनून पुढे तो अखिल भारतीयसारख्या विराट सागराला मिळतो. अखिल भारतीयची तयारी सुरू झाली की पहिला वाद रंगतो तो संमेलनाध्यक्षाच्या निवडीवरून. 1080 लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडून देतात. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा याचा ध्वज संमेलनाध्यक्षाने डौलात फडकत ठेवावा अशी अपेक्षा असते. ही धुरा खांद्यावर आल्यानंतर काहीजण या अपेक्षेला न्याय देतात; तर काहीजण केवळ आक्रस्ताळेपणा करणे, वाद-विवाद निर्माण करणे, विसंगती असणारी वक्तव्ये करणे यातच रममाण होतात. गेल्या वर्षीच्या संमेलनाध्यक्षांनी याचा कळस गाठला आहे. सामान्य वाचकांचे मन आणि जीवन समृद्ध बनावे, त्यांच्यात भाषेविषयीची प्रेमभावना वाढीस लागावी, मायमराठीची मरगळ दूर होऊन त्यात सुदृढता यावी यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. ‘पंतप्रधान तिकडे (पाकिस्तानात) कशाला बोंबलत फिरतोय?’ असे अप्रस्तुत आणि खुळचट सवाल मात्र संमेलनाध्यक्षांनी केले. सामान्य माणसाचा कैवार घेऊन ‘सांस्कृतिक अनुबंध’ प्रस्तापित करता न आल्याने कसलेही ‘साहित्यिकसंचित’ साध्य झाले नाही. भलेमोठे आणि अतिशय रटाळ, कसलाही ’विचार’ न देणारे 130 पानांचे अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या पूर्वसंध्येला महामंडळाकडे दिल्याने ते छापणेही शक्य झाले नाही. संमेलनानंतर अध्यक्षांनी साहित्य परिषदेसमोर सपत्निक उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काही प्रती छापून त्यांची बोळवण करावी लागली. ही निश्‍चितच मराठी भाषेच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.
संमेलनातील डामडौल टाळून ती साधेपणाने व्हावीत अशी भूमिका अनेकजण घेतात. सहभागी लेखकांच्या ‘सर्व प्रकारच्या’ मागण्या पूर्ण करून पैशांची होणारी उधळपट्टी थांबवावी असे अनेकांना वाटते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि घुमानच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मात्र याबाबत वेगळी भूमिका आहे. प्रा. जोशी म्हणतात, ‘‘लेखक सेलिब्रिटी झाला तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे कारण नाही. समाजातील इतर वलयांकित घटकांप्रमाणे लेखकांना प्रतिष्ठा मिळायला हवी. संमेलनात इतर बाजारबुणग्यांऐवजी लेखक केंद्रबिंदू असायला हवा.’’ डॉ. मोरे म्हणतात, ‘‘आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आपण जिव्हाळ्याने करतो. दिवाळी उत्साहातच साजरी व्हायला हवी. त्या दिवशी पंचपक्वान्ने न करता आपण सुतकी वातावरणात बसत नाही. आयोजकांना त्यांच्याकडे येणार्‍या साहित्यिक व रसिकांचे उत्साहात स्वागत करावे वाटले, कोट्यवधींची उधळपट्टी करावी वाटली तर त्यात आम्हा लेखकांचा काय दोष? अगदीच वाटले तर आयकर विभागाने त्यांच्यावर छापे मारावेत.’’
गेल्या वर्षी पी. डी. पाटील यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर पैशांची खिरापत वाटली. (संमेलनाध्यक्षांना ती खीर कितपत पचली हे आपण बघितले आहेच.) मागच्या वर्षीच्या अध्यक्षांचे सोडा मात्र त्यापूर्वीच्या अध्यक्षांनी हे पैसे का घेतले, हे उमजत नाही. पी. डी. पाटील यांची राजकीय (नकारात्मक) पार्श्‍वभूमी माहिती असूनही साहित्यिक त्यांच्या दावणीला बांधले जातात. मुख्य म्हणजे हे पैसे स्वीकारलेल्या माजी अध्यक्षांपैकी कुणाचेही पोट साहित्यावर अवलंबून नाही. यापैकी कुणीही पूर्णवेळ लेखक नाही आणि या पैशाशिवाय त्यांच्या घरची चूल पेटणार नाही असेही नाही. मग इतके मिंधेपण, इतकी लाचारी साहित्य क्षेत्राचे नेतृत्व करणार्‍या धुरीणांनी का बरे स्वीकारावी? याच विकलांग मानसिकतेतून मराठी साहित्य अपंग तर बनत चालले नाही ना?
यंदा अखिल भारतीय साहित्य महामंडळ नागपूरला गेले आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासारखा चळवळीतला आणि सच्चा पत्रकार महामंडळाला अध्यक्ष म्हणून लाभला. त्यांनी नुकतेच सांगितले की, ‘‘वारीला येणारा वारकरी कधी कुणाकडून मानधन घेत नाही. संस्कृती आणि संस्कार जिवंत ठेवणे, भक्तिचा मळा फुलविणे हे त्याला त्याचे कर्तव्य वाटते. साहित्यिकांनीही हाच आदर्श घ्यायला हवा. लोकशाही व्यवस्थेतून निवडून आलेल्या संमेलनाध्यक्षांवरही महामंडळ कसलेही ‘सेन्सॉर’ लादणार नाही. विचारांची प्रक्रिया प्रवाही असायला हवी.’’  मुख्य म्हणजे नुकतेच बदलापूरला विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. त्यात श्रीपाद जोशी यांनी त्यांना मिळालेले मानधनाचे पाकीट व्यासपीठावर सर्वांच्या साक्षीने आयोजकांना परत केले. त्यांची ही कृती पाहून कवी अशोक नायगावकर यांनीही त्यांचे पाकीट लोकलज्जेस्तव परत दिले. यापूर्वी तीन पानाच्या संहितेसाठी तीस हजार रूपये मानधन घेणार्‍या अध्यक्षा आपण बघितल्याच. श्रीपाद जोशी यांनी मात्र निस्वार्थ वृत्तीचे दर्शन घडवित नवा पायंडा पाडला आहे.
आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था धाकदपटशाहीने टिकून नाही. बालपणापासून घरात, शाळेत माणुसपणाचे जे संस्कार होतात, त्यातून आपली नीतिमत्ता टिकून राहते. साहित्यिक संस्कारामुळे माणसाचे जनावरात रूपांतर होत नाही. केवळ मराठी भाषेतच साहित्य संमेलनाची इतकी मोठी परंपरा आहे. साहित्य संमेलनरूपी भरलेली विहिर संपन्नता निर्माण करते; मात्र या विहिरीतील झरे आटायला नकोत. यातील साचेबद्दपणा दूर झाला, कंपूशाही टाळून नवनवीन लेखक आणि कवींना सहभागी करून घेतले तर साहित्य संस्था आणि संमेलने समाजाभिमुख आणि लोकाभिमुख होतील. सामान्य लोकही साहित्याभिमुख होतील. 11 करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात बहुतेक पुस्तकांची आवृत्ती हजार प्रतींची असते. दरवर्षी संमेलनात तेच-तेच विषय असतात आणि निमंत्रित कवीही त्याच-त्याच कविता सादर करतात. हे चित्र बदलणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी गेल्या वर्षीच्या संमेलनानंतर बदललेले आहेत. हे परिवर्तन केवळ व्यक्तिंचे नाही तर विचारांचेही आहे. संमेलनाध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष अशा पदांवरील कोती माणसे जाऊन व्यापक भूमिका घेणारे लोक आले आहेत. त्यामुळे हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नव्या वर्षात साहित्याचे झरे अविरतपणे प्रवाही राहतील आणि वैचारिक दुष्काळ नष्ट होईल असे म्हणण्यास मोठा वाव आहे. देशातच परिवर्तनाची लाट जोरात असताना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा विकास अटळ आहे. त्यासाठी वाचक म्हणून आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवे. उमलते अंकूर फुलत राहिले तर एक विशाल वृक्ष निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. या वर्षात आपल्या साहित्यिक जाणिवा आणखी समृद्ध व्हाव्यात आणि मातृभाषेचे पांग फेडण्यास हातभार लागावा याच सदिच्छा व्यक्त करतो.

(दैनिक 'संचार', इंद्रधनू पुरवणी)

- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, December 24, 2016

टाटायन आणि सारस्वतायन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तोंडावर आलेले असताना ‘कोण हे संमेलनाध्यक्ष?’ असे म्हणण्याची एक ‘फॅशन’ रूढ होत आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या ‘खुज्या’ अध्यक्षांनी या फॅशनला खतपाणीच घातले आहे. मात्र लोकशाही व्यवस्थेत साहित्यिक मतांच्या बळावर निवडून आलेल्या अध्यक्षांबाबत हा प्रश्‍न अप्रस्तुत वाटतो. साहित्यिकांच्या या क्षेत्रातील योगदानाबाबत, त्यांच्या विचार आणि भूमिकेबाबत मतभेद असू शकतात; किंबहुना ते असावेत! मात्र ‘कोण हे संमेलनाध्यक्ष?’ असा खुळचट सवाल करणे हे त्यांचे नाही तर आपले अज्ञान आहे. संबंधितांच्या साहित्यिक कारकिर्दीचा अभ्यास करून हे अज्ञान कुण्याही वाचकाला प्रयत्नपूर्वक दूर करता येईल.
नव्वदाव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे निवडून आलेले अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्याबाबतही एका वृत्तपत्राने ‘कोण हे?’ हा प्रश्‍न त्यांच्या स्वभाववृत्तीप्रमाणे केला. काळे यांनीही त्यांना समर्पक उत्तर दिले. ‘टाटायन लिहिणार्‍यांना सारस्वतायन वाचायला वेळ मिळत नसेल’ असे एका वाक्यात त्यांनी सर्वकाही सांगितले आहे. लेखकांच्या लेखनाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यासाठी निदान त्यांचे साहित्य तरी वाचायला हवे. इतकी तसदीही संमेलनाध्यक्षांवर टीका करणारी मंडळी घेत नाहीत. महाराष्ट्रात जवळपास तीनशे वृत्तपत्रे रोज प्रकाशित होतात. त्यातील अनेकांचा खप किमान काही हजारात आहे. मात्र तो परिसर वगळता बहुसंख्य महाराष्ट्राला या वृत्तपत्रांची नावेही माहीत नाहीत. रोज प्रकाशित होणार्‍या आणि काही हजारांच्या घरात खप असलेल्या वृत्तपत्रांची ही अवस्था! मग पाचपन्नास उत्तम पुस्तके लिहूनही ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहचली नसतील तर हा दोष कोणाचा?
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनेक मोठमोठे लेखक होते हे सत्य आहे. टीका करणार्‍यांच्या आरोपाप्रमाणे असे ‘मानदंड’ ठरणारे अध्यक्ष कदाचित आज होणारही नाहीत. हे सत्य स्वीकारताना आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आज आचार्य अत्रे, पु. भा. भावे, ग. वा. बेहेरे, प्रबोधनकार ठाकरे, गेला बाजार गोविंदराव तळवलकर असे संपादकही होणार नाहीत. त्या त्या क्षेत्रात अनेकांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरावे असे नेत्रदीपक काम केले आहे. त्यामुळे आधीच्या पिढीची तुलना समकालीन कुणाशीही होणार नाही. हे म्हणजे छत्रपती शिवरायांची तुलना त्यांच्या आजच्या वंशजाशी करण्यासारखे हास्यास्पद झाले. प्रत्येकाचे एक वेगळे महत्त्व असते. स्वयंभू प्रतिभा असते. काही क्षमता असतात. त्या ध्यानात घेतल्यास असे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. ‘केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा’ हे सांगायला आणि ऐकायला बरे वाटत असले तरी देवानंद होणेही केस वाढवण्याइतके सोपे नाही हेच आम्ही लक्षात घेत नाही. इतके साधे सुत्र कळल्यास साहित्य आणि प्रकाशन व्यवहारास आणखी गती मिळेल आणि माय मराठीची पताका सर्वदूर डौलात फडकेल.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारास या क्षेत्रातील लोकच निवडून देतात. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ, परिषदेच्या घटक संस्था, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, आयोजक समिती असा सर्वांचा त्यात समावेश असतो. अध्यक्षांना निवडून देणारी साहित्यिक आणि वाचक मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर आक्षेप घेता येणार नाही. मुख्य म्हणजे ज्यांचा साहित्याशी किंवा साहित्य संस्था, साहित्यिक उपक्रम यांच्याशी काहीही संबंध नाही अशी मंडळी अध्यक्षांवर आणि निवड प्रक्रियेवर टीका करतात. त्यांनी किमान एका साहित्य संस्थेचे सभासदत्व घ्यावे. निवडून आलेल्या अध्यक्षांची पुस्तके पहावित आणि मग खुशाल हवी तितकी टीका करावी.
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

(प्रसिद्धी : दैनिक 'लोकमत', नाशिक)


वाचकांना 'प्रेक्षक' बनवणारे पुस्तक!

‘‘मॅटिनी, पहिला आणि दुसरा असे सलग तीन शो पाहण्याचा जिचा विक्रम मी अजून मोडू शकलेलो नाही, त्या माझ्या प्रिय आईस...’’
 
होय... ही एका पुस्तकाची अर्पणपत्रिकाच आहे. हे पुस्तक आहे सुप्रसिद्ध सिनेसमीक्षक आणि लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं. पुस्तकाचं नावही तितकंच समर्पक - ‘फर्स्ट डे फर्स्ट शो!’ थेट विषयाला भिडणारं, त्याचं अंतरंग उलगडून दाखविणारं! ज्यांना आईकडून, आजोबांकडून चित्रपट पाहण्याचं बाळकडू मिळालं अशा श्रीपाद ब्रह्मे यांनी मागच्या तेरा-चौदा वर्षात जवळपास सव्वातीनशे चित्रपटांची परीक्षणं लिहिली. ही परीक्षणं समीक्षकी आविर्भावात न लिहिता आस्वादक भूमिकेतून लिहिल्यानं वाचकांना ती आवर्जून वाचाविशी वाटतात. अर्थात केवळ आस्वाद म्हणून त्यांनी कोणत्या चित्रपटाला न्याय दिला नाही असंही नाही. खुसखुशीत शैली आणि लालित्यपूर्ण भाषा यामुळं त्यांचं लेखन मनाला स्पर्शून जातं.
ब्रह्मे यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांपैकी मराठी पंचवीस आणि हिंदी पंचवीस अशा पन्नास चित्रपटांच्या परीक्षणांचं ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हे पुस्तक नुकतंच ‘चपराक’नं समारंभपूर्वक प्रकाशित केलं. या प्रकाशन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही सेलिब्रिटींना न बोलवता ब्रह्मे यांचे सहकारी असलेल्या आणि अशी परीक्षणं नेटानं लिहिणार्‍या अभिजित पेंढारकर, मंदार कुलकर्णी, अभिजित थिटे, महेश बर्दापूरकर आणि जयदीप पाठकजी या पाच सिनेपत्रकारांच्या हस्ते या पुस्तकाचं दणक्यात बारसं झालं.
मराठी साहित्यात समीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतेक वृत्तपत्रं पुस्तक परीक्षणांना त्यांच्या पुरवणीत मोलाचं स्थान देतात. ही पुस्तकं समीक्षकांना आधी वाचावयास मिळतात. त्यामुळं त्या पुस्तकावरील चिंतन संबंधित समीक्षकाला मांडता येतं. चित्रपटाचं जग मात्र जरा वेगळं आहे. दर शुक्रवारी नवे चित्रपट प्रदर्शित होतात. त्या दिवशीचा सकाळचा शो पहायचा, कार्यालयात यायचं आणि लगेच परीक्षण लिहून हातावेगळं करायचं... काही वृत्तपत्रे शनिवारच्या अंकात तर काही वृत्तपत्रे रविवारच्या अंकात ते लगेचच प्रकाशित करतात. ते वाचून चित्रपट पहायचा की नाही हे ठरवणारे अनेक रसिक असतात. त्यामुळे हे काम जरा जिकिरीचंच! अनेकदा घाईगडबडीत लिहिल्यामुळं त्या चित्रपटाचं नेमकेपण मांडणं अवघड होतं तर काही वेळा चित्रपट बघितल्या बघितल्या अभिव्यक्त झाल्यानं लेखनात उत्स्फुर्तताही येते. श्रीपाद ब्रह्मे यांचं नाणं खणखणीत आहे. मुळात ते एक ललित लेखक आणि सजग पत्रकार आहेत. त्यांनी असंख्य चित्रपट पाहिलेत. गुणग्राहकतेनं त्यांचं रसग्रहण केलंय. त्यामुळे चित्रपटाविषयी त्यांनी नोंदविलेली मतं वाचून तो चित्रपट पहायचा की नाही हे ठरवणारे तमाम वाचक आहेत. अत्यंत परिश्रमातून आणि चित्रपटांच्या साधनेतून मिळवलेलं त्यांचं हे कौशल्य दखलपात्र आहे. त्यांच्या भाषेत कुठेही रूक्षपणा नाही. एखादा चित्रपट पाहून आल्यानंतर आपण आपल्या जवळच्या व्यक्तिस त्याबाबत सांगतो इतकी त्यांची भाषा प्रवाही आणि म्हणून प्रभावीही आहे.
त्यांची चित्रपट परीक्षणं तर वाचनीय असतातच; पण त्यांच्या शीर्षकातूनच संपूर्ण कथासार मांडण्याचं अफलातून सामर्थ्य त्यांच्याकडं आहे. त्याची काही उदाहरणं पाहूयात - प्रियदर्शनचा ‘खट्टा-मीठा’ हा चित्रपट! अक्षयकुमारनं हा सगळा तंबू एकहाती तोलण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठी वातावरणात असलेला हा हिंदी चित्रपट!! ब्रह्मे यांनी या चित्रपटाचं परीक्षण लिहिताना त्याला शीर्षक दिलं होतं ‘डोश्याच्या पीठाचं थालिपीठ..’ काही कलाकृती पाहिल्यावर आपण नि:शब्द होतो. ‘वॉटर’ हा एक असाच अत्युत्तम चित्रपट! त्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलं होतं, ‘वॉटर पाणी नव्हे; तीर्थ!’ गंमत म्हणजे केवळ ‘खट्टा-मीठा’चं थालिपीठच नव्हे तर त्यांच्या अनेक परीक्षणांच्या शीर्षकात खाण्याचे संदर्भ येतात. ‘मातीच्या चुली’ या चित्रपटाच्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलंय, ‘आपल्या घरातल्याच ‘चुली’वरची खमंग फोडणी.
‘ओम शांती ओम’चं शीर्षक आहे, ‘पंचतारांकित बुफे तर ‘आनंदाचं झाडचं शीर्षक आहे, ‘साजूक तुपातला शिरा.‘सुखान्तला ते ‘शेवटचा दिस ‘गोड’ झाला म्हणतात तर ‘नटसम्राटचं शीर्षक होतं, ‘नटसम्राट? ना... ना...!‘काय द्याचं बोलाया चित्रपटाच्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलंय ‘कुंथलगिरीकरची कायदेशीर कामेडी. मुख्य म्हणजे या चित्रपटाचं परीक्षण करताना त्यांनी चित्रपटाचं प्रमुख पात्र असलेल्या मकरंद अनासपुरे यांचीच भाषा वापरली आहे. मराठवाडी ग्रामीण ढंगातील ही भाषा वाचताना वाचकांच्या डोळ्यासमोर जणू आपले गाव आणि हा संपूर्ण चित्रपटच तरळतो.
गजेंद्र अहिरे यांचा ‘सरीवर सरी
हा चित्रपट ते ‘रसरशीत आणि चकचकीत असल्याचं सांगतात तर ‘पक पक पकाऽऽकहा अद्‘भुतरम्य! ब्रह्मे यांची ही सर्व परीक्षणं भाषेच्या बाबतीत वाचकांना समृद्ध करणारी आहेत. वृत्तपत्रीय सदरात लिहिलेली ही परीक्षणं असल्यानं त्यांना शब्दमर्यादा सांभाळावी लागलीय. त्यामुळे पुस्तकाच्या अवघ्या दोन-अडीच पानात प्रत्येक चित्रपटाचं परीक्षण लिहिताना त्यांनी या चित्रपटांचा जणू ‘सारच काढलाय. जेमतेम तीन-चार मिनिटात एक परीक्षण वाचून होते आणि दोनअडीच तासांचा सिनेमा आपल्या डोळ्यासमोर तरळतो. हे पुस्तक वाचताना ‘वाचक कधी ‘प्रेक्षक होतात हेच कळत नाही. हातात घेतलेलं पुस्तक चित्रपटप्रेमींना संपूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववणार तर नाहीच; पण ‘अरेच्चा, संपलं होय...! असं वाटतं. कथासार सांगायची ब्रह्मे यांची शैली आणि भाषेची नजाकत यामुळं हे पुस्तक वाचतच राहावंसं वाटतं आणि हेच या पुस्तकाचं बलस्थान आहे. मराठी पुस्तकांच्या समीक्षेची पुस्तकं सातत्यानं प्रकाशित होत असताना अशाप्रकारची चित्रपटांच्या परीक्षणांची दर्जेदार पुस्तकं प्रकाशित होणं ही काळाची गरज आहे. मागच्या तेरा-चौदा वर्षात जे चांगले चित्रपट आले त्यांचं ‘दस्तऐवजीकरण श्रीपाद ब्रह्मे यांच्या या पुस्तकामुळं झालं आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठी 120, हिंदी 184 आणि 3 इंग्रजी चित्रपटांच्या नावांची सालानुक्रमे यादी या पुस्तकात दिली आहे. ‘श्‍वास’पासून सुरू झालेल्या या पुस्तकाचा प्रवास ‘मसान’ला येऊन थांबतो. ‘श्‍वास’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याचदिवशी त्यांनी या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं आणि दुसर्‍या दिवशी ते प्रकाशित केलं. ‘मराठी चित्रपटाला नवी ‘दृष्टी’ देणारा’ असं थेट शीर्षक देऊन त्यांनी ‘श्‍वास’विषयीचं आपलं मत नोंदवलं होतं. पुढं ते एक ‘श्‍वासपर्व’च ठरलं, हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. या पुस्तकातील सर्वच चित्रपटांची परीक्षणं तर वाचनीय आहेतच; मात्र लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं मनोगतही अत्यंत वाचनीय आहे. एका सिनेमावेड्या पत्रकाराच्या अंतःकरणातून आलेला हा हुंकार आहे. कोणताही चित्रपट असेल तर त्याच्या निर्मितीप्रक्रियेत किमान दोन-अडीचशे लोकांचा सहभाग असतो, याचं भान ब्रह्मे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी ही परीक्षण लिहिताना सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
कोणताही चित्रपट आपल्या संवेदनांना खतपाणी घालतो. रूपेरी पडद्यावरील कहाणी आपल्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे का, याचा शोध रसिक अंतर्मनातून घेत असतात. म्हणूनच अनेक प्रसंग पाहताना आपण भावूक होतो, संतापतो, हसतो, रडतो... अभिनेता-अभिनेत्रीत स्वतःला, जवळच्या लोकांना शोधू लागतो. त्यात ‘व्हिलन’च्या भूमिकेत कधी आपला ‘बॉस’ही दिसतो. (तर कधी नवरा!) त्यामुळे पंचेंद्रियांना जागे करण्याबरोबरच चित्रपटातून आपल्या डोक्याला बराचसा खुराकही मिळतो. म्हणूनच प्रत्येक चित्रपटप्रेमीनं, प्रत्येक वाचकानं हे पुस्तक वाचायलाच हवं. गेल्या पंधरा वर्षातील सर्व महत्त्वाच्या चित्रपटांची झलक आपल्याला यातून अनुभवता येईल. श्रीपाद ब्रह्मे यांची ‘हटके’ शैली, समीर नेर्लेकर यांनी साकारलेलं आकर्षक व अर्थपूर्ण मुखपृष्ठ, वाजवी किंमत आणि ‘चपराक’ची नेहमीप्रमाणं उत्कृष्ठ निर्मिती यामुळं हे पुस्तक वाचनीय आणि संग्राह्यही झालं आहे.
लेखक - श्रीपाद ब्रह्मे
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)
पाने - 144, मूल्य - 100/-

(हे पुस्तक www.chaprak.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुक करून आहे त्याच किंमतीत घरपोच मागवता येईल.)

* घनश्याम पाटील 
 

Saturday, December 17, 2016

कृतज्ञ आठवणींचे बेट

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सेनापती आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘कर्‍हेचे पाणी’ आणि ‘मी कसा झालो’ ही आत्मचरित्रात्मक पुस्तके लिहून त्यांचे समग्र जीवन अतिशय प्राजंळपणे मराठी वाचकांसमोर मांडले आहे. प्रत्येक मराठी वाचकाने किमान ‘मी कसा झालो’ हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला हवे. अत्रे नावाचं प्रतिभेचं लखलखतं बेट त्यातून आपणास थोडंफार उमजू शकतं. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान देणार्‍या आचार्यांची कारकीर्द देदीप्यमान आहे. त्यांच्याविषयी कितीही लिहून आले तरी ते कमीच. हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. अत्रे साहेबांच्या कन्या, मराठीतील ख्यातनाम कवयित्री आणि लेखिका शिरीष पै यांनी ‘वडिलांच्या सेवेसी’ हे पुस्तक लिहून आठवणींचे बेट तेवते ठेवले आहे. या आठवणी गोड आहेत, कटू आहेत, सुखद आहेत तशाच दु:खदही आहेत. मात्र जे आहे ते कृतज्ञतेच्या भावनेने मांडलेले सत्य आहे. त्यात निर्भयता आहे, प्रांजळता आहे, धैर्य आहे. खुद्द शिरिषताईच म्हणतात, ‘‘पप्पांसाठी जे करू शकले नाही त्याची उणीव या आठवणी लिहून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.’’ आचार्य अत्रे यांची मुलगी म्हणूनच नव्हे तर एक समर्थ, सशक्त लेखिका म्हणून शिरीषताईंचे लेखन नेहमीच लुभावणारे असते. त्यांचे शब्द अंत:करणातून येतात. वाचकांना प्रेरणा देतात. लिहिले पाहिजे, जे लिहितो त्याहून सुंदर लिहिता आलं पाहिजे. लेखन म्हणजे आपले समग्र जीवन झाले पाहिजे’ अशी आकांक्षा, अशी धारणा अत्रे साहेबांनी शिरीषताईंच्या मनात बालपणीच रूजवली. पुढे त्यांचे पती व्यंकटेश पै यांच्यामुळे त्यांच्यात आत्मपरीक्षणाची दृष्टी आली. त्यामुळे या पुस्तकात आई, वडील, नवरा आणि स्वत:विषयी त्यांनी मोकळेपणे लिहिले आहे. त्यातील प्रांजळता भावते. या महामानवाची खरी ओळख करून देते. ‘कर्‍हेचे पाणी’मधून जे अत्रेसाहेब कळतात तितकेच किंबहुना त्याहून अधिक या पुस्तकातून त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. ‘पप्पा’, ‘आई’, ‘व्यंकटेश’ आणि ‘मी’ अशा चार विभागात या पुस्तकाची मांडणी केली आहे.
शिरीषताई सांगतात, ‘पप्पा जलद वाचतात पण त्यांच्या वाचनात त्यांच्या ताणलेल्या भावनांचा सारा पूर वाहून जात असतो.’ खंडाळ्याचा बंगला हे अत्रे साहेबांच्या आयुष्यातले समाधानाचे एक मोठे ठिकाण. या बंगल्याच्या रस्त्याने चढावर चढताना बाबासाहेब आंबेडकरांची मोटर कशी अडली होती, खंडाळा कराराची बोलणी बंगल्यात चालली असताना आपल्या मांडीवर छतामधून तोंडात धरलेल्या बेडकासकट साप कसा धपकन आदळला होता असे अनेक अनुभव या पुस्तकात आलेत. या पुस्तकातून अत्रे साहेबांचे भावविश्‍व अचुकपणे उलगडते. ‘पप्पा, तुम्हाला एकट्याला कंटाळा नाही का येत?’ असे विचारल्यावर अत्रेसाहेब शिरिषताईंना म्हणतात, ‘मी एकटा असतो तेव्हा मला माझी सोबत असते ना! मला माझी सोबत फार आवडते. मी एकटा असतो तेव्हा मी माझ्याशीच बोलत असतो.’
म्हणूनच शिरीषताई म्हणतात, ‘ खंडाळा हे पप्पांच्या जीवनातले ‘काव्यस्थळ’ आहे. सासवड हा त्यांचा देह आहे तर खंडाळा हा त्यांचा आत्मा आहे.’ अत्रे साहेबांच्या डोक्यात कल्पनाशक्तीचे कुंड चोवीस तास कसे धगधगत असायचे हे या पुस्तकातच वाचावे. शिरीषताई म्हणतात, ‘कल्पनेचा लगाम धरून शब्दावर स्वार होणे त्यांना फारसे कठीण कधीच गेले नाही.’
छत्रपती शिवरायांनंतर महाराष्ट्राच्या भल्यासाठी अहोरात्र धगधगणारे अत्रे साहेबांसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व दिसत नाही. हे अग्निहोत्र कायम पेटलेले असायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला पणाला लावले. लेखणीला धार लावून तिची तलवार बनवली. दुष्प्रवृत्तीवर सपासप वार केले. ‘नवयुग’ आणि नंतर ‘मराठा’ ही नियतकालिके मराठी माणसांचा आवाज बनली.
अत्रे साहेबांना भव्यतेचा ध्यास होता. किरकोळ गोष्टी कधी त्यांना सहनच व्हायच्या नाहीत. जे करायचे ते प्रचंडच. त्यातूनच त्यांनी जीवनाचे सर्व रंग अनुभवले. सर्व क्षेत्रात त्यांनी चमकदार कामगिरी पार पाडली. मराठी माणूस त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ असेल.
शिरीषताईंनी त्याकाळी प्रेमविवाह केला. त्यांची निवड चुकीची होती असे अत्रे साहेबांनी लग्नाच्या दिवशीच सांगितले; मात्र मुलीवरील प्रेमाखातर त्यांनी सर्वकाही स्वीकारले. जावयाशी जमवून घेतले. कन्या‘दाना’च्या कल्पनेने त्यांचे पितृहृदय गलबलून गेले. पुढे व्यंकटेश पै यांनी त्यांच्या सणकू स्वभावामुळे काही चुका केल्या. आपले सर्वस्व मातीमोल करून त्यांनी अत्रे साहेब आणि ‘मराठा’साठी स्वत:च्या छातीची ढाल केली. हे सगळं काही या पुस्तकात आलं आहे. दोन्ही मुलींची लग्ने लावून दिल्यानंतर लग्नात पंगती बसल्या. अत्रे साहेब सर्वांना आग्रह करूकरू जेवायला वाढत होते. परंतु ते स्वत: काही जेवावयास बसेनात. सर्वात शेवटी नोकरांची पंगत बसली. त्या पंक्तीबरोबर ते जेवायला बसले. असे होते अत्रे साहेब! त्यांनी यशाची अनेक शिखरे पाहिली आणि अपयशाच्या दरीतूनही मनसोक्त भटकंती केली. शिरीषताईंना बालपणापासून ते सांगायचे, ‘पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोकेे फुटता कामा नये.’ शिरीषताई लिहितात, ‘नित्य नवे हा त्यांचा छंद स्थिर आहे. सदैव पराक्रम ही त्यांची वृत्ती स्थिर आहे. त्यांचे जीवनावरचे प्रेम स्थिर आहे. साठ वर्षे संपताना ते असे स्थिर आहेत नि अस्थिरही आहेत. चंचल आहेत आणि अविचल आहेत.
एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना जडलेले श्‍वानप्रेम, त्यांची लाडकी कुत्री, इतरांसाठी खात असलेल्या खस्ता, त्यांची व्यापक ध्येयनिष्ठा, कुटुंबवत्सलता, त्यांचे प्रेम, त्यांचा राग, त्यांचा संताप हे सारे काही वाचताना उर अभिमानाने भरून येतो, मन गलबलते, डोळे पाणावतात. नातवाने लिहिलेले पत्र जपून ठेवणे, ते प्रत्येकाला वाचून दाखवणे याविषयी शिरीषताई लिहितात, ‘वेड्यावाकड्या अक्षरातलं दित्यूचं ते बोबडं पत्र तुम्ही एखाद्या तरूण मुलीनं आपल्याला आलेलं आपल्या प्रियकराचं पहिलं प्रेमपत्र जितक्या काळजीपूर्वक हृदयाशी जपून ठेवावं तितक्या काळजीने आपल्या कोटाच्या खिशात ठेवून दिलेलं होतं. तुमच्या स्वत:च्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आयुष्यभर सहज हरवून टाकल्यात. त्याची एवढीसुद्धा खंत मनात ठेवली नाहीत; पण माझी ती लहानपणीची लहानशी पत्रं मात्र तुम्ही इतर मोठ्यामोठ्या माणसांच्या पत्राबरोबरच इतक्या प्रेमानं जपून ठेवलीत.’
अत्रे साहेबांच्या खाण्याच्या आवडीनिवडी, त्यांचा स्वभाव व त्यांचे गुण-दोष याविषयी या पुस्तकात अंत:करणापासून लिहिले आहे. त्या लिहितात, ‘पप्पांना एकटं जेवायला फारसं आवडत नसे. ते जेवत असताना कोणी पाहुणा आला की ते त्याला जेवायला घातल्याशिवाय परत पाठवीत नसत. मोठ्यामोठ्या नामवंत माणसांना मेजवानी द्यायची पप्पांना फार हौस. गरीब भुकेल्या माणसालाही त्यांनी कनवाळुपणानं जेवायला घातल्याशिवाय कधी सोडलं नाही. स्वयंपाक करण्याच्या जितक्या शैली दुनियेत असतील तितक्या त्यांनी स्वीकारल्या; मात्र त्यांची खाण्याची अखेरची इच्छा काय असावी तर ऊनऊन मऊ भात, त्यावर तूप आणि मेतकूट... आयुष्यभर इतकं खाऊन-पिऊन शेवटी इतकं साधंच मागितलं... तूपभात आणि मेतकूट... मात्र दुर्दैवाने त्यांची ही इच्छा शिरीषताई पुरवू शकल्या नाहीत.
त्यांच्या शेवटच्या काळातील विमनस्क अवस्था, वाढलेले मद्यपान, तृप्ततेचे समाधान हे वाचून कोणीही भारावून जाईल. शिरीषताईंच्या आई हुजूरपागेतल्या शिक्षिका. त्यांनी नाशिकलाही नोकरी केली. अत्रे साहेबांच्या कार्यविस्तारामुळे या माऊलीच्या संसाराचा ताप आणि व्याप वाढतच गेलेला. मात्र शेवटी त्यांना मधुमेह झाला. त्यात शस्त्रक्रिया करून आधी एक आणि नंतर एक असे दोन्ही पाय काढावे लागले पण त्यांनी धैर्यानं, चिकाटीनं दुखण्याला टक्कर दिली. अखेरच्या घटकेपर्यंत जीवनाला नकार दिला नाही. ‘एक छोटसं घरकुल, सतत जवळीक देणारा समव्यवसायी जोडीदार आणि चिमणी पाखरं’ इतकंच त्यांचं स्वप्न होतं; पण घरकुल जंगलभर पसरलं. समव्यवसायी जोडीदाराने अनेक धंदे अंगावर घेतले. त्यामुळे ती गांगरली-गोंधळली. हळूहळू सावरलीही; पण त्यात तिला न पेलवणार्‍या लढाया खेळाव्या लागल्या. दोन्ही मुलींवर या माऊलीने काळजाची सावली धरली. महाराष्ट्राच्या हृदयावर अनभिक्षिक्त राज्य करणार्‍या एका प्रतिभावंत बादशहाच्या कीर्तीच्या, वैभवाच्या, कर्तबगारीच्या आणि विजयाच्या ऐन शिखरावर ती त्यांच्या सिंहासनाशेजारी बसली होती. त्या सिंहासनावर उधळल्या गेलेल्या प्रत्येक फुलातली पाकळी न पाकळी तिच्याही पायावर पडत होती. त्यांच्या यशाचा सूर्यप्रकाश तिला जवळून पहायला मिळाला. शिरीषताई म्हणतात, ‘हा आनंद मिळाला नसता तर ह्या संघर्षात, इतक्या दुबळ्या देहानं ती इथवर टिकलीच नसती.’
विधी शाखेचे शिक्षण घेताना शिरीषताईंची आणि व्यंकटेश पै यांची ओळख झाली. व्यंकटेश यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी. त्यात देखणे. शिवाय राजकारणी. त्यामुळे शिरीषताई त्यांच्या प्रेमात पडल्या. मग काय झालं? त्या परीक्षेत नापास झाल्या. पुढे? इकडे-तिकडे चोहीकडे जे होत असतं तेच झालं. त्यांचं लग्न ठरलं. ज्याला लोक ‘प्रेमविवाह’ म्हणतात! व्यंकटेश यांची राजकीय विचारधारा, त्यांच्या मॉं, त्यांची भाषा, व्यंकटेश यांनी चांगली चालणारी वकीली सोडून मराठीसाठी खाल्लेल्या खस्ता, वाढलेले मद्यपान, त्यातून आलेले नैराश्य, अत्रे साहेब आणि त्यांच्यातील संघर्ष व त्यांचे एकमेकांवरील दृढ प्रेम... हे सर्वकाही वाचताना कुणालाही हेवा वाटावा.
लग्नानंतर शिरीषताईंनी आणि व्यंकटेश यांनी ‘मराठा’त नोकरी केली. त्यावेळी अत्रेसाहेबांनी कर्जाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. नोकरांचे पगार थकलेले. त्यांचा हा पडता काळ. रोजच्या रोज दारात सावकार मंडळी पैशासाठी तगादा लावायची. त्यांचा वाट्टेल तसा अपमान करायची. कर्जापायी प्राण कंठाशी आलेले! ‘नवयुग’च्या छपाईची बीलं भरता न आल्यानं छापखान्याचा मालक घाणेरड्या शिव्या द्यायचा. त्यातच अत्रे साहेबांच्या आयुष्यात एक विलक्षण घटना घडली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारला गेला. मग त्यांच्या कर्तबगारीची तेजस्वी पहाट उगवली. एका रात्रीत ते या आंदोलनाचे सेनापती झाले. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. नवयुगचा खप महाराष्ट्रभर हजारोंनी वाढला. त्याचे संपादकीय कामकाज अत्रे साहेब बघायचे, तर वितरण व्यवस्था, रोजचा कारभार आणि आर्थिक उलाढाली व्यंकटेश यांच्यावर आल्या. त्यातून व्यंकटेश यांच्या दारूचा आरंभ झाला. हा आरंभ अंतापर्यंत घेऊन जाणारा ठरला. व्यंकटेश यांच्याकडून होणारा छळ शिरीषताई व्यक्तही करू शकत नव्हत्या. कारण हा प्रेमविवाह! कोणत्या तोंडानं नवर्‍याविरूद्ध बोलणार?
1969 च्या जूनमध्ये शिरीषताईंनी ‘मराठा’च्या संपादनाची सुरूवात केली. त्याकाळी व्यंकटेश पै आणि शिरीषताईंनी दोन मोठ्या संकटांना तोंड दिलं. एक आचार्य अत्रे यांचं मृत्युपत्र आणि दुसरे ‘मराठा’तील कामगारांनी केलेला संप. या संपामुळे ‘मराठा’ची आर्थिक स्थिती एकदम खालावली. सरकारनं ‘मराठा’ला काळ्या यादीत टाकलं. शासकीय जाहिराती बंद झाल्या. या प्रसंगाविषयी शिरीषताई लिहितात, ‘मराठाच्या निर्मितीत आणि विकासात पप्पांइतकाच व्यंकटेशचा घामही गळला होता. तितकंच रक्त त्यानंही आटवलं होतं. जो ‘मराठा’ व्यंकटेशचं समग्र जीवन होता, ज्या ‘मराठा’साठी मी व्यक्तिगत सुखांना तिलांजली दिली होती, तो ‘मराठा’ अखेर हातचा गेला. संपाच्या काळात कामगारांनी आमच्या दारात उभे राहून व्यंकटेशला आणि मला गलिच्छ शिव्या मोजल्या होत्या. ‘मराठा’च्या संपादक खात्यात काम करणार्‍या ज्या संपादकांना मी नेहमीच उत्तेजन दिलं, त्यांनीच कामगारांना मला ‘रांड’ ही शिवी आमच्या घरासमोर भर रस्त्यावर उभे राहून देण्याची चिथावणी दिली होती. ‘व्यंकटेश पै मेला रे, उशाला बाटली ठेवा रे’ अशा अर्वाच्च घोषणा कोणी दिल्या होत्या, तर ज्या कामगारांना सणासुदीला व्यंकटेश घट्ट मिठी मारून हृदयाशी धरीत होता त्यांनी!’
21 मे 1983 ला व्यंकटेश यांचं निधन झालं. लिव्हरचं दुखणं असं डॉक्टरांचं निदान होतं; पण विकोपाला गेलेलं नैराश्य हे खरं दुखणं असल्याचं निरिक्षण शिरीषताई नोंदवितात.
शिरीषताई बालपणापासूनच सकस आणि दर्जेदार लिहितात. पुढे त्यांनी ‘मराठा’त काम केले. रविवार  पुरवणीचे संपादन केले. अत्रे साहेबांनंतरही शक्य त्या अवस्थेत खमकेपणे मराठा चालवला. सुरूवातीला पुस्तकं, चित्रपट, नाटकांची परीक्षणं लिहिली, मुलाखती  घेतल्या. अत्रे साहेब त्या काळात लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून आग ओकत असताना शिरीषताईही त्यात योगदान पेरत होत्या. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या ध्येयाने पछाडलेले अत्रे साहेब ‘जनतेचा कसाई, मोरारजी देसाई’ अशा प्रक्षोभक मथळ्यांनी अग्रलेख लिहीत होते. त्यांच्यावर सगळीकडून मानहानीचे दावे दाखल होत होते. त्यावेळी व्यंकटेश पै यांनी वकीलाच्या भूमिकेतून हे हल्ले परतून लावले. हे सगळे आणि इतरही बरेचसे सत्य जाणून घेण्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीत सर्वात मोठे आणि भरीव योगदान देणार्‍या आचार्य अत्रे आणि त्यांच्या कुटुंबियांना समजून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. शिरीषताईंनी यात जागवलेल्या आठवणी सर्वांनाच प्रेरणा देणार्‍या आहेत. आचार्य अत्रे यांच्यासारखा अफाट प्रतिभेचा बेफाट माणूस ‘वडिलांच्या सेवेसी’ मधून वाचकांच्या समोर येतो. वडिलांविषयी कृतज्ञता म्हणून शिरीषताईंनी हा लेखन प्रपंच केला असला तरी इतक्या वैयक्तिक गोष्टी स्पष्टपणे मांडल्याबद्दल वाचक या नात्याने आम्हीही अत्रे साहेबांबरोबरच शिरीषताई यांच्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करतो.
लेखिका - शिरीष पै
प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन, ठाणे (0250-2335203)
पाने - 239, किंमत - 250/-

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’
7057292092