‘‘मॅटिनी, पहिला आणि दुसरा असे सलग तीन शो पाहण्याचा जिचा विक्रम मी अजून मोडू शकलेलो नाही, त्या माझ्या प्रिय आईस...’’
होय... ही एका पुस्तकाची अर्पणपत्रिकाच आहे. हे पुस्तक आहे सुप्रसिद्ध सिनेसमीक्षक आणि लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं. पुस्तकाचं नावही तितकंच समर्पक - ‘फर्स्ट डे फर्स्ट शो!’ थेट विषयाला भिडणारं, त्याचं अंतरंग उलगडून दाखविणारं! ज्यांना आईकडून, आजोबांकडून चित्रपट पाहण्याचं बाळकडू मिळालं अशा श्रीपाद ब्रह्मे यांनी मागच्या तेरा-चौदा वर्षात जवळपास सव्वातीनशे चित्रपटांची परीक्षणं लिहिली. ही परीक्षणं समीक्षकी आविर्भावात न लिहिता आस्वादक भूमिकेतून लिहिल्यानं वाचकांना ती आवर्जून वाचाविशी वाटतात. अर्थात केवळ आस्वाद म्हणून त्यांनी कोणत्या चित्रपटाला न्याय दिला नाही असंही नाही. खुसखुशीत शैली आणि लालित्यपूर्ण भाषा यामुळं त्यांचं लेखन मनाला स्पर्शून जातं.
ब्रह्मे यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांपैकी मराठी पंचवीस आणि हिंदी पंचवीस अशा पन्नास चित्रपटांच्या परीक्षणांचं ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हे पुस्तक नुकतंच ‘चपराक’नं समारंभपूर्वक प्रकाशित केलं. या प्रकाशन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही सेलिब्रिटींना न बोलवता ब्रह्मे यांचे सहकारी असलेल्या आणि अशी परीक्षणं नेटानं लिहिणार्या अभिजित पेंढारकर, मंदार कुलकर्णी, अभिजित थिटे, महेश बर्दापूरकर आणि जयदीप पाठकजी या पाच सिनेपत्रकारांच्या हस्ते या पुस्तकाचं दणक्यात बारसं झालं.
मराठी साहित्यात समीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतेक वृत्तपत्रं पुस्तक परीक्षणांना त्यांच्या पुरवणीत मोलाचं स्थान देतात. ही पुस्तकं समीक्षकांना आधी वाचावयास मिळतात. त्यामुळं त्या पुस्तकावरील चिंतन संबंधित समीक्षकाला मांडता येतं. चित्रपटाचं जग मात्र जरा वेगळं आहे. दर शुक्रवारी नवे चित्रपट प्रदर्शित होतात. त्या दिवशीचा सकाळचा शो पहायचा, कार्यालयात यायचं आणि लगेच परीक्षण लिहून हातावेगळं करायचं... काही वृत्तपत्रे शनिवारच्या अंकात तर काही वृत्तपत्रे रविवारच्या अंकात ते लगेचच प्रकाशित करतात. ते वाचून चित्रपट पहायचा की नाही हे ठरवणारे अनेक रसिक असतात. त्यामुळे हे काम जरा जिकिरीचंच! अनेकदा घाईगडबडीत लिहिल्यामुळं त्या चित्रपटाचं नेमकेपण मांडणं अवघड होतं तर काही वेळा चित्रपट बघितल्या बघितल्या अभिव्यक्त झाल्यानं लेखनात उत्स्फुर्तताही येते. श्रीपाद ब्रह्मे यांचं नाणं खणखणीत आहे. मुळात ते एक ललित लेखक आणि सजग पत्रकार आहेत. त्यांनी असंख्य चित्रपट पाहिलेत. गुणग्राहकतेनं त्यांचं रसग्रहण केलंय. त्यामुळे चित्रपटाविषयी त्यांनी नोंदविलेली मतं वाचून तो चित्रपट पहायचा की नाही हे ठरवणारे तमाम वाचक आहेत. अत्यंत परिश्रमातून आणि चित्रपटांच्या साधनेतून मिळवलेलं त्यांचं हे कौशल्य दखलपात्र आहे. त्यांच्या भाषेत कुठेही रूक्षपणा नाही. एखादा चित्रपट पाहून आल्यानंतर आपण आपल्या जवळच्या व्यक्तिस त्याबाबत सांगतो इतकी त्यांची भाषा प्रवाही आणि म्हणून प्रभावीही आहे.
त्यांची चित्रपट परीक्षणं तर वाचनीय असतातच; पण त्यांच्या शीर्षकातूनच संपूर्ण कथासार मांडण्याचं अफलातून सामर्थ्य त्यांच्याकडं आहे. त्याची काही उदाहरणं पाहूयात - प्रियदर्शनचा ‘खट्टा-मीठा’ हा चित्रपट! अक्षयकुमारनं हा सगळा तंबू एकहाती तोलण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठी वातावरणात असलेला हा हिंदी चित्रपट!! ब्रह्मे यांनी या चित्रपटाचं परीक्षण लिहिताना त्याला शीर्षक दिलं होतं ‘डोश्याच्या पीठाचं थालिपीठ..’ काही कलाकृती पाहिल्यावर आपण नि:शब्द होतो. ‘वॉटर’ हा एक असाच अत्युत्तम चित्रपट! त्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलं होतं, ‘वॉटर पाणी नव्हे; तीर्थ!’ गंमत म्हणजे केवळ ‘खट्टा-मीठा’चं थालिपीठच नव्हे तर त्यांच्या अनेक परीक्षणांच्या शीर्षकात खाण्याचे संदर्भ येतात. ‘मातीच्या चुली’ या चित्रपटाच्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलंय, ‘आपल्या घरातल्याच ‘चुली’वरची खमंग फोडणी.’ ‘ओम शांती ओम’चं शीर्षक आहे, ‘पंचतारांकित बुफे’ तर ‘आनंदाचं झाड’ चं शीर्षक आहे, ‘साजूक तुपातला शिरा.’ ‘सुखान्त’ला ते ‘शेवटचा दिस ‘गोड’ झाला’ म्हणतात तर ‘नटसम्राट’चं शीर्षक होतं, ‘नटसम्राट? ना... ना...!’ ‘काय द्याचं बोला’ या चित्रपटाच्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलंय ‘कुंथलगिरीकरची कायदेशीर कामेडी.’ मुख्य म्हणजे या चित्रपटाचं परीक्षण करताना त्यांनी चित्रपटाचं प्रमुख पात्र असलेल्या मकरंद अनासपुरे यांचीच भाषा वापरली आहे. मराठवाडी ग्रामीण ढंगातील ही भाषा वाचताना वाचकांच्या डोळ्यासमोर जणू आपले गाव आणि हा संपूर्ण चित्रपटच तरळतो.
गजेंद्र अहिरे यांचा ‘सरीवर सरी’ हा चित्रपट ते ‘रसरशीत’ आणि चकचकीत असल्याचं सांगतात तर ‘पक पक पकाऽऽक’ हा अद्‘भुत’रम्य! ब्रह्मे यांची ही सर्व परीक्षणं भाषेच्या बाबतीत वाचकांना समृद्ध करणारी आहेत. वृत्तपत्रीय सदरात लिहिलेली ही परीक्षणं असल्यानं त्यांना शब्दमर्यादा सांभाळावी लागलीय. त्यामुळे पुस्तकाच्या अवघ्या दोन-अडीच पानात प्रत्येक चित्रपटाचं परीक्षण लिहिताना त्यांनी या चित्रपटांचा जणू ‘सार’च काढलाय. जेमतेम तीन-चार मिनिटात एक परीक्षण वाचून होते आणि दोनअडीच तासांचा सिनेमा आपल्या डोळ्यासमोर तरळतो. हे पुस्तक वाचताना ‘वाचक’ कधी ‘प्रेक्षक’ होतात हेच कळत नाही. हातात घेतलेलं पुस्तक चित्रपटप्रेमींना संपूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववणार तर नाहीच; पण ‘अरेच्चा, संपलं होय...!’ असं वाटतं. कथासार सांगायची ब्रह्मे यांची शैली आणि भाषेची नजाकत यामुळं हे पुस्तक वाचतच राहावंसं वाटतं आणि हेच या पुस्तकाचं बलस्थान आहे. मराठी पुस्तकांच्या समीक्षेची पुस्तकं सातत्यानं प्रकाशित होत असताना अशाप्रकारची चित्रपटांच्या परीक्षणांची दर्जेदार पुस्तकं प्रकाशित होणं ही काळाची गरज आहे. मागच्या तेरा-चौदा वर्षात जे चांगले चित्रपट आले त्यांचं ‘दस्तऐवजीकरण’ श्रीपाद ब्रह्मे यांच्या या पुस्तकामुळं झालं आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठी 120, हिंदी 184 आणि 3 इंग्रजी चित्रपटांच्या नावांची सालानुक्रमे यादी या पुस्तकात दिली आहे. ‘श्वास’पासून सुरू झालेल्या या पुस्तकाचा प्रवास ‘मसान’ला येऊन थांबतो. ‘श्वास’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याचदिवशी त्यांनी या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं आणि दुसर्या दिवशी ते प्रकाशित केलं. ‘मराठी चित्रपटाला नवी ‘दृष्टी’ देणारा’ असं थेट शीर्षक देऊन त्यांनी ‘श्वास’विषयीचं आपलं मत नोंदवलं होतं. पुढं ते एक ‘श्वासपर्व’च ठरलं, हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. या पुस्तकातील सर्वच चित्रपटांची परीक्षणं तर वाचनीय आहेतच; मात्र लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं मनोगतही अत्यंत वाचनीय आहे. एका सिनेमावेड्या पत्रकाराच्या अंतःकरणातून आलेला हा हुंकार आहे. कोणताही चित्रपट असेल तर त्याच्या निर्मितीप्रक्रियेत किमान दोन-अडीचशे लोकांचा सहभाग असतो, याचं भान ब्रह्मे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी ही परीक्षण लिहिताना सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
कोणताही चित्रपट आपल्या संवेदनांना खतपाणी घालतो. रूपेरी पडद्यावरील कहाणी आपल्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे का, याचा शोध रसिक अंतर्मनातून घेत असतात. म्हणूनच अनेक प्रसंग पाहताना आपण भावूक होतो, संतापतो, हसतो, रडतो... अभिनेता-अभिनेत्रीत स्वतःला, जवळच्या लोकांना शोधू लागतो. त्यात ‘व्हिलन’च्या भूमिकेत कधी आपला ‘बॉस’ही दिसतो. (तर कधी नवरा!) त्यामुळे पंचेंद्रियांना जागे करण्याबरोबरच चित्रपटातून आपल्या डोक्याला बराचसा खुराकही मिळतो. म्हणूनच प्रत्येक चित्रपटप्रेमीनं, प्रत्येक वाचकानं हे पुस्तक वाचायलाच हवं. गेल्या पंधरा वर्षातील सर्व महत्त्वाच्या चित्रपटांची झलक आपल्याला यातून अनुभवता येईल. श्रीपाद ब्रह्मे यांची ‘हटके’ शैली, समीर नेर्लेकर यांनी साकारलेलं आकर्षक व अर्थपूर्ण मुखपृष्ठ, वाजवी किंमत आणि ‘चपराक’ची नेहमीप्रमाणं उत्कृष्ठ निर्मिती यामुळं हे पुस्तक वाचनीय आणि संग्राह्यही झालं आहे.
लेखक - श्रीपाद ब्रह्मे
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)
पाने - 144, मूल्य - 100/-
(हे पुस्तक www.chaprak.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुक करून आहे त्याच किंमतीत घरपोच मागवता येईल.)
* घनश्याम पाटील

छान पोस्ट
ReplyDeleteवाह!
ReplyDeleteखूपच छान !...
ReplyDelete