Saturday, December 31, 2016

साहित्यिक झरे पाझरत रहावेत!

नव्या वर्षाची चाहूल लागली की मराठी सारस्वतांना वेध लागतात साहित्य संमेलनाचे. या संमेलनांना उत्सवी स्वरूप आले आहे. न. चिं. केळकर, लोकमान्य टिळक अशा दिग्गजांनी ग्रंथकारांचे संमेलन सुरू केले. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यापक रूपांतर झाले. माय मराठीच्या सर्वंकश विकासासाठी मोलाचे योगदान देणार्‍या साहित्य संमेलनांनी जनमाणसाची नैतिकता वृद्धिंगत करण्यात हातभार लावला. गेल्या वर्षी 15 ते 18 जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन धडाक्यात पार पडले. धडाक्यात यासाठी की गेल्या वर्षीचे आयोजक होते शिक्षणसम्राट पी. डी. पाटील! मोठा आयोजक आणि खुजा संमेलनाध्यक्ष असे चित्र असल्याने या संमेलनात अनेक गंमती-जंमती घडल्या. यंदाचे नव्वदावे संमेलन डोंबिवली येथे 3, 4, 5 फेब्रुवारी रोजी होणार असून अक्षयकुमार काळे यांच्यासारखा अभ्यासू समीक्षक आणि स्वतःला कवितेचा ‘प्रियकर’ मानणारा संवेदनशील लेखक संमेलनाध्यक्ष म्हणून मिळाला आहे.
सध्याच्या बाजारू युगात साहित्य संमेलनांची आवश्यकता आहे का? असा प्रश्‍न काहीजण सातत्याने उपस्थित करतात. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा ज्ञानपीठ विजेता लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांची जत्रा’ असे म्हणतो तेव्हा या क्षेत्रातील लोकांनी गंभीरपणे सिंहावलोकन करायला हवे.
महाराष्ट्रात वर्षभर अनेक लहान मोठी साहित्य संमेलने होतात. त्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. या छोट्या संमेलनांचा प्रवाह बनून पुढे तो अखिल भारतीयसारख्या विराट सागराला मिळतो. अखिल भारतीयची तयारी सुरू झाली की पहिला वाद रंगतो तो संमेलनाध्यक्षाच्या निवडीवरून. 1080 लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडून देतात. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा याचा ध्वज संमेलनाध्यक्षाने डौलात फडकत ठेवावा अशी अपेक्षा असते. ही धुरा खांद्यावर आल्यानंतर काहीजण या अपेक्षेला न्याय देतात; तर काहीजण केवळ आक्रस्ताळेपणा करणे, वाद-विवाद निर्माण करणे, विसंगती असणारी वक्तव्ये करणे यातच रममाण होतात. गेल्या वर्षीच्या संमेलनाध्यक्षांनी याचा कळस गाठला आहे. सामान्य वाचकांचे मन आणि जीवन समृद्ध बनावे, त्यांच्यात भाषेविषयीची प्रेमभावना वाढीस लागावी, मायमराठीची मरगळ दूर होऊन त्यात सुदृढता यावी यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. ‘पंतप्रधान तिकडे (पाकिस्तानात) कशाला बोंबलत फिरतोय?’ असे अप्रस्तुत आणि खुळचट सवाल मात्र संमेलनाध्यक्षांनी केले. सामान्य माणसाचा कैवार घेऊन ‘सांस्कृतिक अनुबंध’ प्रस्तापित करता न आल्याने कसलेही ‘साहित्यिकसंचित’ साध्य झाले नाही. भलेमोठे आणि अतिशय रटाळ, कसलाही ’विचार’ न देणारे 130 पानांचे अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या पूर्वसंध्येला महामंडळाकडे दिल्याने ते छापणेही शक्य झाले नाही. संमेलनानंतर अध्यक्षांनी साहित्य परिषदेसमोर सपत्निक उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काही प्रती छापून त्यांची बोळवण करावी लागली. ही निश्‍चितच मराठी भाषेच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.
संमेलनातील डामडौल टाळून ती साधेपणाने व्हावीत अशी भूमिका अनेकजण घेतात. सहभागी लेखकांच्या ‘सर्व प्रकारच्या’ मागण्या पूर्ण करून पैशांची होणारी उधळपट्टी थांबवावी असे अनेकांना वाटते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि घुमानच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मात्र याबाबत वेगळी भूमिका आहे. प्रा. जोशी म्हणतात, ‘‘लेखक सेलिब्रिटी झाला तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे कारण नाही. समाजातील इतर वलयांकित घटकांप्रमाणे लेखकांना प्रतिष्ठा मिळायला हवी. संमेलनात इतर बाजारबुणग्यांऐवजी लेखक केंद्रबिंदू असायला हवा.’’ डॉ. मोरे म्हणतात, ‘‘आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आपण जिव्हाळ्याने करतो. दिवाळी उत्साहातच साजरी व्हायला हवी. त्या दिवशी पंचपक्वान्ने न करता आपण सुतकी वातावरणात बसत नाही. आयोजकांना त्यांच्याकडे येणार्‍या साहित्यिक व रसिकांचे उत्साहात स्वागत करावे वाटले, कोट्यवधींची उधळपट्टी करावी वाटली तर त्यात आम्हा लेखकांचा काय दोष? अगदीच वाटले तर आयकर विभागाने त्यांच्यावर छापे मारावेत.’’
गेल्या वर्षी पी. डी. पाटील यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर पैशांची खिरापत वाटली. (संमेलनाध्यक्षांना ती खीर कितपत पचली हे आपण बघितले आहेच.) मागच्या वर्षीच्या अध्यक्षांचे सोडा मात्र त्यापूर्वीच्या अध्यक्षांनी हे पैसे का घेतले, हे उमजत नाही. पी. डी. पाटील यांची राजकीय (नकारात्मक) पार्श्‍वभूमी माहिती असूनही साहित्यिक त्यांच्या दावणीला बांधले जातात. मुख्य म्हणजे हे पैसे स्वीकारलेल्या माजी अध्यक्षांपैकी कुणाचेही पोट साहित्यावर अवलंबून नाही. यापैकी कुणीही पूर्णवेळ लेखक नाही आणि या पैशाशिवाय त्यांच्या घरची चूल पेटणार नाही असेही नाही. मग इतके मिंधेपण, इतकी लाचारी साहित्य क्षेत्राचे नेतृत्व करणार्‍या धुरीणांनी का बरे स्वीकारावी? याच विकलांग मानसिकतेतून मराठी साहित्य अपंग तर बनत चालले नाही ना?
यंदा अखिल भारतीय साहित्य महामंडळ नागपूरला गेले आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासारखा चळवळीतला आणि सच्चा पत्रकार महामंडळाला अध्यक्ष म्हणून लाभला. त्यांनी नुकतेच सांगितले की, ‘‘वारीला येणारा वारकरी कधी कुणाकडून मानधन घेत नाही. संस्कृती आणि संस्कार जिवंत ठेवणे, भक्तिचा मळा फुलविणे हे त्याला त्याचे कर्तव्य वाटते. साहित्यिकांनीही हाच आदर्श घ्यायला हवा. लोकशाही व्यवस्थेतून निवडून आलेल्या संमेलनाध्यक्षांवरही महामंडळ कसलेही ‘सेन्सॉर’ लादणार नाही. विचारांची प्रक्रिया प्रवाही असायला हवी.’’  मुख्य म्हणजे नुकतेच बदलापूरला विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. त्यात श्रीपाद जोशी यांनी त्यांना मिळालेले मानधनाचे पाकीट व्यासपीठावर सर्वांच्या साक्षीने आयोजकांना परत केले. त्यांची ही कृती पाहून कवी अशोक नायगावकर यांनीही त्यांचे पाकीट लोकलज्जेस्तव परत दिले. यापूर्वी तीन पानाच्या संहितेसाठी तीस हजार रूपये मानधन घेणार्‍या अध्यक्षा आपण बघितल्याच. श्रीपाद जोशी यांनी मात्र निस्वार्थ वृत्तीचे दर्शन घडवित नवा पायंडा पाडला आहे.
आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था धाकदपटशाहीने टिकून नाही. बालपणापासून घरात, शाळेत माणुसपणाचे जे संस्कार होतात, त्यातून आपली नीतिमत्ता टिकून राहते. साहित्यिक संस्कारामुळे माणसाचे जनावरात रूपांतर होत नाही. केवळ मराठी भाषेतच साहित्य संमेलनाची इतकी मोठी परंपरा आहे. साहित्य संमेलनरूपी भरलेली विहिर संपन्नता निर्माण करते; मात्र या विहिरीतील झरे आटायला नकोत. यातील साचेबद्दपणा दूर झाला, कंपूशाही टाळून नवनवीन लेखक आणि कवींना सहभागी करून घेतले तर साहित्य संस्था आणि संमेलने समाजाभिमुख आणि लोकाभिमुख होतील. सामान्य लोकही साहित्याभिमुख होतील. 11 करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात बहुतेक पुस्तकांची आवृत्ती हजार प्रतींची असते. दरवर्षी संमेलनात तेच-तेच विषय असतात आणि निमंत्रित कवीही त्याच-त्याच कविता सादर करतात. हे चित्र बदलणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी गेल्या वर्षीच्या संमेलनानंतर बदललेले आहेत. हे परिवर्तन केवळ व्यक्तिंचे नाही तर विचारांचेही आहे. संमेलनाध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष अशा पदांवरील कोती माणसे जाऊन व्यापक भूमिका घेणारे लोक आले आहेत. त्यामुळे हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नव्या वर्षात साहित्याचे झरे अविरतपणे प्रवाही राहतील आणि वैचारिक दुष्काळ नष्ट होईल असे म्हणण्यास मोठा वाव आहे. देशातच परिवर्तनाची लाट जोरात असताना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा विकास अटळ आहे. त्यासाठी वाचक म्हणून आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवे. उमलते अंकूर फुलत राहिले तर एक विशाल वृक्ष निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. या वर्षात आपल्या साहित्यिक जाणिवा आणखी समृद्ध व्हाव्यात आणि मातृभाषेचे पांग फेडण्यास हातभार लागावा याच सदिच्छा व्यक्त करतो.

(दैनिक 'संचार', इंद्रधनू पुरवणी)

- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

4 comments:

  1. साहित्याच्या प्रांतातल्या बुरसटलेल्या विचारांच्या खोंडांना चपराक लावणारा तुमच्यासारखा लेखक, प्रकाशक विरळा आहे.
    प्रस्थापितांशी जुळवून घेण्यात धन्यता मानणारे अनेक आहेत; पण प्रवाहाविरुद्ध पोहणे हेच जिवितकार्य मानणाऱ्या मोजक्या सक्रिय विरोधकात तुमचे नाव अग्रणी असणार आहे.

    सडेतोड लेख ...


    निशांत पवार

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद.

      Delete
  2. छान झापले आहे नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी....... नक्कीच काहीतरी सुधारेल ही आशा आहे...... खुप छान.... धन्यवाद

    ReplyDelete