Saturday, December 31, 2016

साहित्यिक झरे पाझरत रहावेत!

नव्या वर्षाची चाहूल लागली की मराठी सारस्वतांना वेध लागतात साहित्य संमेलनाचे. या संमेलनांना उत्सवी स्वरूप आले आहे. न. चिं. केळकर, लोकमान्य टिळक अशा दिग्गजांनी ग्रंथकारांचे संमेलन सुरू केले. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यापक रूपांतर झाले. माय मराठीच्या सर्वंकश विकासासाठी मोलाचे योगदान देणार्‍या साहित्य संमेलनांनी जनमाणसाची नैतिकता वृद्धिंगत करण्यात हातभार लावला. गेल्या वर्षी 15 ते 18 जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन धडाक्यात पार पडले. धडाक्यात यासाठी की गेल्या वर्षीचे आयोजक होते शिक्षणसम्राट पी. डी. पाटील! मोठा आयोजक आणि खुजा संमेलनाध्यक्ष असे चित्र असल्याने या संमेलनात अनेक गंमती-जंमती घडल्या. यंदाचे नव्वदावे संमेलन डोंबिवली येथे 3, 4, 5 फेब्रुवारी रोजी होणार असून अक्षयकुमार काळे यांच्यासारखा अभ्यासू समीक्षक आणि स्वतःला कवितेचा ‘प्रियकर’ मानणारा संवेदनशील लेखक संमेलनाध्यक्ष म्हणून मिळाला आहे.
सध्याच्या बाजारू युगात साहित्य संमेलनांची आवश्यकता आहे का? असा प्रश्‍न काहीजण सातत्याने उपस्थित करतात. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा ज्ञानपीठ विजेता लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांची जत्रा’ असे म्हणतो तेव्हा या क्षेत्रातील लोकांनी गंभीरपणे सिंहावलोकन करायला हवे.
महाराष्ट्रात वर्षभर अनेक लहान मोठी साहित्य संमेलने होतात. त्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. या छोट्या संमेलनांचा प्रवाह बनून पुढे तो अखिल भारतीयसारख्या विराट सागराला मिळतो. अखिल भारतीयची तयारी सुरू झाली की पहिला वाद रंगतो तो संमेलनाध्यक्षाच्या निवडीवरून. 1080 लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडून देतात. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा याचा ध्वज संमेलनाध्यक्षाने डौलात फडकत ठेवावा अशी अपेक्षा असते. ही धुरा खांद्यावर आल्यानंतर काहीजण या अपेक्षेला न्याय देतात; तर काहीजण केवळ आक्रस्ताळेपणा करणे, वाद-विवाद निर्माण करणे, विसंगती असणारी वक्तव्ये करणे यातच रममाण होतात. गेल्या वर्षीच्या संमेलनाध्यक्षांनी याचा कळस गाठला आहे. सामान्य वाचकांचे मन आणि जीवन समृद्ध बनावे, त्यांच्यात भाषेविषयीची प्रेमभावना वाढीस लागावी, मायमराठीची मरगळ दूर होऊन त्यात सुदृढता यावी यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. ‘पंतप्रधान तिकडे (पाकिस्तानात) कशाला बोंबलत फिरतोय?’ असे अप्रस्तुत आणि खुळचट सवाल मात्र संमेलनाध्यक्षांनी केले. सामान्य माणसाचा कैवार घेऊन ‘सांस्कृतिक अनुबंध’ प्रस्तापित करता न आल्याने कसलेही ‘साहित्यिकसंचित’ साध्य झाले नाही. भलेमोठे आणि अतिशय रटाळ, कसलाही ’विचार’ न देणारे 130 पानांचे अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या पूर्वसंध्येला महामंडळाकडे दिल्याने ते छापणेही शक्य झाले नाही. संमेलनानंतर अध्यक्षांनी साहित्य परिषदेसमोर सपत्निक उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काही प्रती छापून त्यांची बोळवण करावी लागली. ही निश्‍चितच मराठी भाषेच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.
संमेलनातील डामडौल टाळून ती साधेपणाने व्हावीत अशी भूमिका अनेकजण घेतात. सहभागी लेखकांच्या ‘सर्व प्रकारच्या’ मागण्या पूर्ण करून पैशांची होणारी उधळपट्टी थांबवावी असे अनेकांना वाटते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि घुमानच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मात्र याबाबत वेगळी भूमिका आहे. प्रा. जोशी म्हणतात, ‘‘लेखक सेलिब्रिटी झाला तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे कारण नाही. समाजातील इतर वलयांकित घटकांप्रमाणे लेखकांना प्रतिष्ठा मिळायला हवी. संमेलनात इतर बाजारबुणग्यांऐवजी लेखक केंद्रबिंदू असायला हवा.’’ डॉ. मोरे म्हणतात, ‘‘आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आपण जिव्हाळ्याने करतो. दिवाळी उत्साहातच साजरी व्हायला हवी. त्या दिवशी पंचपक्वान्ने न करता आपण सुतकी वातावरणात बसत नाही. आयोजकांना त्यांच्याकडे येणार्‍या साहित्यिक व रसिकांचे उत्साहात स्वागत करावे वाटले, कोट्यवधींची उधळपट्टी करावी वाटली तर त्यात आम्हा लेखकांचा काय दोष? अगदीच वाटले तर आयकर विभागाने त्यांच्यावर छापे मारावेत.’’
गेल्या वर्षी पी. डी. पाटील यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर पैशांची खिरापत वाटली. (संमेलनाध्यक्षांना ती खीर कितपत पचली हे आपण बघितले आहेच.) मागच्या वर्षीच्या अध्यक्षांचे सोडा मात्र त्यापूर्वीच्या अध्यक्षांनी हे पैसे का घेतले, हे उमजत नाही. पी. डी. पाटील यांची राजकीय (नकारात्मक) पार्श्‍वभूमी माहिती असूनही साहित्यिक त्यांच्या दावणीला बांधले जातात. मुख्य म्हणजे हे पैसे स्वीकारलेल्या माजी अध्यक्षांपैकी कुणाचेही पोट साहित्यावर अवलंबून नाही. यापैकी कुणीही पूर्णवेळ लेखक नाही आणि या पैशाशिवाय त्यांच्या घरची चूल पेटणार नाही असेही नाही. मग इतके मिंधेपण, इतकी लाचारी साहित्य क्षेत्राचे नेतृत्व करणार्‍या धुरीणांनी का बरे स्वीकारावी? याच विकलांग मानसिकतेतून मराठी साहित्य अपंग तर बनत चालले नाही ना?
यंदा अखिल भारतीय साहित्य महामंडळ नागपूरला गेले आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासारखा चळवळीतला आणि सच्चा पत्रकार महामंडळाला अध्यक्ष म्हणून लाभला. त्यांनी नुकतेच सांगितले की, ‘‘वारीला येणारा वारकरी कधी कुणाकडून मानधन घेत नाही. संस्कृती आणि संस्कार जिवंत ठेवणे, भक्तिचा मळा फुलविणे हे त्याला त्याचे कर्तव्य वाटते. साहित्यिकांनीही हाच आदर्श घ्यायला हवा. लोकशाही व्यवस्थेतून निवडून आलेल्या संमेलनाध्यक्षांवरही महामंडळ कसलेही ‘सेन्सॉर’ लादणार नाही. विचारांची प्रक्रिया प्रवाही असायला हवी.’’  मुख्य म्हणजे नुकतेच बदलापूरला विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. त्यात श्रीपाद जोशी यांनी त्यांना मिळालेले मानधनाचे पाकीट व्यासपीठावर सर्वांच्या साक्षीने आयोजकांना परत केले. त्यांची ही कृती पाहून कवी अशोक नायगावकर यांनीही त्यांचे पाकीट लोकलज्जेस्तव परत दिले. यापूर्वी तीन पानाच्या संहितेसाठी तीस हजार रूपये मानधन घेणार्‍या अध्यक्षा आपण बघितल्याच. श्रीपाद जोशी यांनी मात्र निस्वार्थ वृत्तीचे दर्शन घडवित नवा पायंडा पाडला आहे.
आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था धाकदपटशाहीने टिकून नाही. बालपणापासून घरात, शाळेत माणुसपणाचे जे संस्कार होतात, त्यातून आपली नीतिमत्ता टिकून राहते. साहित्यिक संस्कारामुळे माणसाचे जनावरात रूपांतर होत नाही. केवळ मराठी भाषेतच साहित्य संमेलनाची इतकी मोठी परंपरा आहे. साहित्य संमेलनरूपी भरलेली विहिर संपन्नता निर्माण करते; मात्र या विहिरीतील झरे आटायला नकोत. यातील साचेबद्दपणा दूर झाला, कंपूशाही टाळून नवनवीन लेखक आणि कवींना सहभागी करून घेतले तर साहित्य संस्था आणि संमेलने समाजाभिमुख आणि लोकाभिमुख होतील. सामान्य लोकही साहित्याभिमुख होतील. 11 करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात बहुतेक पुस्तकांची आवृत्ती हजार प्रतींची असते. दरवर्षी संमेलनात तेच-तेच विषय असतात आणि निमंत्रित कवीही त्याच-त्याच कविता सादर करतात. हे चित्र बदलणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी गेल्या वर्षीच्या संमेलनानंतर बदललेले आहेत. हे परिवर्तन केवळ व्यक्तिंचे नाही तर विचारांचेही आहे. संमेलनाध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष अशा पदांवरील कोती माणसे जाऊन व्यापक भूमिका घेणारे लोक आले आहेत. त्यामुळे हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नव्या वर्षात साहित्याचे झरे अविरतपणे प्रवाही राहतील आणि वैचारिक दुष्काळ नष्ट होईल असे म्हणण्यास मोठा वाव आहे. देशातच परिवर्तनाची लाट जोरात असताना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा विकास अटळ आहे. त्यासाठी वाचक म्हणून आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवे. उमलते अंकूर फुलत राहिले तर एक विशाल वृक्ष निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. या वर्षात आपल्या साहित्यिक जाणिवा आणखी समृद्ध व्हाव्यात आणि मातृभाषेचे पांग फेडण्यास हातभार लागावा याच सदिच्छा व्यक्त करतो.

(दैनिक 'संचार', इंद्रधनू पुरवणी)

- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, December 24, 2016

टाटायन आणि सारस्वतायन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तोंडावर आलेले असताना ‘कोण हे संमेलनाध्यक्ष?’ असे म्हणण्याची एक ‘फॅशन’ रूढ होत आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या ‘खुज्या’ अध्यक्षांनी या फॅशनला खतपाणीच घातले आहे. मात्र लोकशाही व्यवस्थेत साहित्यिक मतांच्या बळावर निवडून आलेल्या अध्यक्षांबाबत हा प्रश्‍न अप्रस्तुत वाटतो. साहित्यिकांच्या या क्षेत्रातील योगदानाबाबत, त्यांच्या विचार आणि भूमिकेबाबत मतभेद असू शकतात; किंबहुना ते असावेत! मात्र ‘कोण हे संमेलनाध्यक्ष?’ असा खुळचट सवाल करणे हे त्यांचे नाही तर आपले अज्ञान आहे. संबंधितांच्या साहित्यिक कारकिर्दीचा अभ्यास करून हे अज्ञान कुण्याही वाचकाला प्रयत्नपूर्वक दूर करता येईल.
नव्वदाव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे निवडून आलेले अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्याबाबतही एका वृत्तपत्राने ‘कोण हे?’ हा प्रश्‍न त्यांच्या स्वभाववृत्तीप्रमाणे केला. काळे यांनीही त्यांना समर्पक उत्तर दिले. ‘टाटायन लिहिणार्‍यांना सारस्वतायन वाचायला वेळ मिळत नसेल’ असे एका वाक्यात त्यांनी सर्वकाही सांगितले आहे. लेखकांच्या लेखनाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यासाठी निदान त्यांचे साहित्य तरी वाचायला हवे. इतकी तसदीही संमेलनाध्यक्षांवर टीका करणारी मंडळी घेत नाहीत. महाराष्ट्रात जवळपास तीनशे वृत्तपत्रे रोज प्रकाशित होतात. त्यातील अनेकांचा खप किमान काही हजारात आहे. मात्र तो परिसर वगळता बहुसंख्य महाराष्ट्राला या वृत्तपत्रांची नावेही माहीत नाहीत. रोज प्रकाशित होणार्‍या आणि काही हजारांच्या घरात खप असलेल्या वृत्तपत्रांची ही अवस्था! मग पाचपन्नास उत्तम पुस्तके लिहूनही ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहचली नसतील तर हा दोष कोणाचा?
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनेक मोठमोठे लेखक होते हे सत्य आहे. टीका करणार्‍यांच्या आरोपाप्रमाणे असे ‘मानदंड’ ठरणारे अध्यक्ष कदाचित आज होणारही नाहीत. हे सत्य स्वीकारताना आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आज आचार्य अत्रे, पु. भा. भावे, ग. वा. बेहेरे, प्रबोधनकार ठाकरे, गेला बाजार गोविंदराव तळवलकर असे संपादकही होणार नाहीत. त्या त्या क्षेत्रात अनेकांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरावे असे नेत्रदीपक काम केले आहे. त्यामुळे आधीच्या पिढीची तुलना समकालीन कुणाशीही होणार नाही. हे म्हणजे छत्रपती शिवरायांची तुलना त्यांच्या आजच्या वंशजाशी करण्यासारखे हास्यास्पद झाले. प्रत्येकाचे एक वेगळे महत्त्व असते. स्वयंभू प्रतिभा असते. काही क्षमता असतात. त्या ध्यानात घेतल्यास असे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. ‘केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा’ हे सांगायला आणि ऐकायला बरे वाटत असले तरी देवानंद होणेही केस वाढवण्याइतके सोपे नाही हेच आम्ही लक्षात घेत नाही. इतके साधे सुत्र कळल्यास साहित्य आणि प्रकाशन व्यवहारास आणखी गती मिळेल आणि माय मराठीची पताका सर्वदूर डौलात फडकेल.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारास या क्षेत्रातील लोकच निवडून देतात. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ, परिषदेच्या घटक संस्था, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, आयोजक समिती असा सर्वांचा त्यात समावेश असतो. अध्यक्षांना निवडून देणारी साहित्यिक आणि वाचक मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर आक्षेप घेता येणार नाही. मुख्य म्हणजे ज्यांचा साहित्याशी किंवा साहित्य संस्था, साहित्यिक उपक्रम यांच्याशी काहीही संबंध नाही अशी मंडळी अध्यक्षांवर आणि निवड प्रक्रियेवर टीका करतात. त्यांनी किमान एका साहित्य संस्थेचे सभासदत्व घ्यावे. निवडून आलेल्या अध्यक्षांची पुस्तके पहावित आणि मग खुशाल हवी तितकी टीका करावी.
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

(प्रसिद्धी : दैनिक 'लोकमत', नाशिक)


वाचकांना 'प्रेक्षक' बनवणारे पुस्तक!

‘‘मॅटिनी, पहिला आणि दुसरा असे सलग तीन शो पाहण्याचा जिचा विक्रम मी अजून मोडू शकलेलो नाही, त्या माझ्या प्रिय आईस...’’
 
होय... ही एका पुस्तकाची अर्पणपत्रिकाच आहे. हे पुस्तक आहे सुप्रसिद्ध सिनेसमीक्षक आणि लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं. पुस्तकाचं नावही तितकंच समर्पक - ‘फर्स्ट डे फर्स्ट शो!’ थेट विषयाला भिडणारं, त्याचं अंतरंग उलगडून दाखविणारं! ज्यांना आईकडून, आजोबांकडून चित्रपट पाहण्याचं बाळकडू मिळालं अशा श्रीपाद ब्रह्मे यांनी मागच्या तेरा-चौदा वर्षात जवळपास सव्वातीनशे चित्रपटांची परीक्षणं लिहिली. ही परीक्षणं समीक्षकी आविर्भावात न लिहिता आस्वादक भूमिकेतून लिहिल्यानं वाचकांना ती आवर्जून वाचाविशी वाटतात. अर्थात केवळ आस्वाद म्हणून त्यांनी कोणत्या चित्रपटाला न्याय दिला नाही असंही नाही. खुसखुशीत शैली आणि लालित्यपूर्ण भाषा यामुळं त्यांचं लेखन मनाला स्पर्शून जातं.
ब्रह्मे यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांपैकी मराठी पंचवीस आणि हिंदी पंचवीस अशा पन्नास चित्रपटांच्या परीक्षणांचं ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हे पुस्तक नुकतंच ‘चपराक’नं समारंभपूर्वक प्रकाशित केलं. या प्रकाशन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही सेलिब्रिटींना न बोलवता ब्रह्मे यांचे सहकारी असलेल्या आणि अशी परीक्षणं नेटानं लिहिणार्‍या अभिजित पेंढारकर, मंदार कुलकर्णी, अभिजित थिटे, महेश बर्दापूरकर आणि जयदीप पाठकजी या पाच सिनेपत्रकारांच्या हस्ते या पुस्तकाचं दणक्यात बारसं झालं.
मराठी साहित्यात समीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतेक वृत्तपत्रं पुस्तक परीक्षणांना त्यांच्या पुरवणीत मोलाचं स्थान देतात. ही पुस्तकं समीक्षकांना आधी वाचावयास मिळतात. त्यामुळं त्या पुस्तकावरील चिंतन संबंधित समीक्षकाला मांडता येतं. चित्रपटाचं जग मात्र जरा वेगळं आहे. दर शुक्रवारी नवे चित्रपट प्रदर्शित होतात. त्या दिवशीचा सकाळचा शो पहायचा, कार्यालयात यायचं आणि लगेच परीक्षण लिहून हातावेगळं करायचं... काही वृत्तपत्रे शनिवारच्या अंकात तर काही वृत्तपत्रे रविवारच्या अंकात ते लगेचच प्रकाशित करतात. ते वाचून चित्रपट पहायचा की नाही हे ठरवणारे अनेक रसिक असतात. त्यामुळे हे काम जरा जिकिरीचंच! अनेकदा घाईगडबडीत लिहिल्यामुळं त्या चित्रपटाचं नेमकेपण मांडणं अवघड होतं तर काही वेळा चित्रपट बघितल्या बघितल्या अभिव्यक्त झाल्यानं लेखनात उत्स्फुर्तताही येते. श्रीपाद ब्रह्मे यांचं नाणं खणखणीत आहे. मुळात ते एक ललित लेखक आणि सजग पत्रकार आहेत. त्यांनी असंख्य चित्रपट पाहिलेत. गुणग्राहकतेनं त्यांचं रसग्रहण केलंय. त्यामुळे चित्रपटाविषयी त्यांनी नोंदविलेली मतं वाचून तो चित्रपट पहायचा की नाही हे ठरवणारे तमाम वाचक आहेत. अत्यंत परिश्रमातून आणि चित्रपटांच्या साधनेतून मिळवलेलं त्यांचं हे कौशल्य दखलपात्र आहे. त्यांच्या भाषेत कुठेही रूक्षपणा नाही. एखादा चित्रपट पाहून आल्यानंतर आपण आपल्या जवळच्या व्यक्तिस त्याबाबत सांगतो इतकी त्यांची भाषा प्रवाही आणि म्हणून प्रभावीही आहे.
त्यांची चित्रपट परीक्षणं तर वाचनीय असतातच; पण त्यांच्या शीर्षकातूनच संपूर्ण कथासार मांडण्याचं अफलातून सामर्थ्य त्यांच्याकडं आहे. त्याची काही उदाहरणं पाहूयात - प्रियदर्शनचा ‘खट्टा-मीठा’ हा चित्रपट! अक्षयकुमारनं हा सगळा तंबू एकहाती तोलण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठी वातावरणात असलेला हा हिंदी चित्रपट!! ब्रह्मे यांनी या चित्रपटाचं परीक्षण लिहिताना त्याला शीर्षक दिलं होतं ‘डोश्याच्या पीठाचं थालिपीठ..’ काही कलाकृती पाहिल्यावर आपण नि:शब्द होतो. ‘वॉटर’ हा एक असाच अत्युत्तम चित्रपट! त्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलं होतं, ‘वॉटर पाणी नव्हे; तीर्थ!’ गंमत म्हणजे केवळ ‘खट्टा-मीठा’चं थालिपीठच नव्हे तर त्यांच्या अनेक परीक्षणांच्या शीर्षकात खाण्याचे संदर्भ येतात. ‘मातीच्या चुली’ या चित्रपटाच्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलंय, ‘आपल्या घरातल्याच ‘चुली’वरची खमंग फोडणी.
‘ओम शांती ओम’चं शीर्षक आहे, ‘पंचतारांकित बुफे तर ‘आनंदाचं झाडचं शीर्षक आहे, ‘साजूक तुपातला शिरा.‘सुखान्तला ते ‘शेवटचा दिस ‘गोड’ झाला म्हणतात तर ‘नटसम्राटचं शीर्षक होतं, ‘नटसम्राट? ना... ना...!‘काय द्याचं बोलाया चित्रपटाच्या परीक्षणाला त्यांनी शीर्षक दिलंय ‘कुंथलगिरीकरची कायदेशीर कामेडी. मुख्य म्हणजे या चित्रपटाचं परीक्षण करताना त्यांनी चित्रपटाचं प्रमुख पात्र असलेल्या मकरंद अनासपुरे यांचीच भाषा वापरली आहे. मराठवाडी ग्रामीण ढंगातील ही भाषा वाचताना वाचकांच्या डोळ्यासमोर जणू आपले गाव आणि हा संपूर्ण चित्रपटच तरळतो.
गजेंद्र अहिरे यांचा ‘सरीवर सरी
हा चित्रपट ते ‘रसरशीत आणि चकचकीत असल्याचं सांगतात तर ‘पक पक पकाऽऽकहा अद्‘भुतरम्य! ब्रह्मे यांची ही सर्व परीक्षणं भाषेच्या बाबतीत वाचकांना समृद्ध करणारी आहेत. वृत्तपत्रीय सदरात लिहिलेली ही परीक्षणं असल्यानं त्यांना शब्दमर्यादा सांभाळावी लागलीय. त्यामुळे पुस्तकाच्या अवघ्या दोन-अडीच पानात प्रत्येक चित्रपटाचं परीक्षण लिहिताना त्यांनी या चित्रपटांचा जणू ‘सारच काढलाय. जेमतेम तीन-चार मिनिटात एक परीक्षण वाचून होते आणि दोनअडीच तासांचा सिनेमा आपल्या डोळ्यासमोर तरळतो. हे पुस्तक वाचताना ‘वाचक कधी ‘प्रेक्षक होतात हेच कळत नाही. हातात घेतलेलं पुस्तक चित्रपटप्रेमींना संपूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववणार तर नाहीच; पण ‘अरेच्चा, संपलं होय...! असं वाटतं. कथासार सांगायची ब्रह्मे यांची शैली आणि भाषेची नजाकत यामुळं हे पुस्तक वाचतच राहावंसं वाटतं आणि हेच या पुस्तकाचं बलस्थान आहे. मराठी पुस्तकांच्या समीक्षेची पुस्तकं सातत्यानं प्रकाशित होत असताना अशाप्रकारची चित्रपटांच्या परीक्षणांची दर्जेदार पुस्तकं प्रकाशित होणं ही काळाची गरज आहे. मागच्या तेरा-चौदा वर्षात जे चांगले चित्रपट आले त्यांचं ‘दस्तऐवजीकरण श्रीपाद ब्रह्मे यांच्या या पुस्तकामुळं झालं आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठी 120, हिंदी 184 आणि 3 इंग्रजी चित्रपटांच्या नावांची सालानुक्रमे यादी या पुस्तकात दिली आहे. ‘श्‍वास’पासून सुरू झालेल्या या पुस्तकाचा प्रवास ‘मसान’ला येऊन थांबतो. ‘श्‍वास’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याचदिवशी त्यांनी या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं आणि दुसर्‍या दिवशी ते प्रकाशित केलं. ‘मराठी चित्रपटाला नवी ‘दृष्टी’ देणारा’ असं थेट शीर्षक देऊन त्यांनी ‘श्‍वास’विषयीचं आपलं मत नोंदवलं होतं. पुढं ते एक ‘श्‍वासपर्व’च ठरलं, हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. या पुस्तकातील सर्वच चित्रपटांची परीक्षणं तर वाचनीय आहेतच; मात्र लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं मनोगतही अत्यंत वाचनीय आहे. एका सिनेमावेड्या पत्रकाराच्या अंतःकरणातून आलेला हा हुंकार आहे. कोणताही चित्रपट असेल तर त्याच्या निर्मितीप्रक्रियेत किमान दोन-अडीचशे लोकांचा सहभाग असतो, याचं भान ब्रह्मे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी ही परीक्षण लिहिताना सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
कोणताही चित्रपट आपल्या संवेदनांना खतपाणी घालतो. रूपेरी पडद्यावरील कहाणी आपल्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे का, याचा शोध रसिक अंतर्मनातून घेत असतात. म्हणूनच अनेक प्रसंग पाहताना आपण भावूक होतो, संतापतो, हसतो, रडतो... अभिनेता-अभिनेत्रीत स्वतःला, जवळच्या लोकांना शोधू लागतो. त्यात ‘व्हिलन’च्या भूमिकेत कधी आपला ‘बॉस’ही दिसतो. (तर कधी नवरा!) त्यामुळे पंचेंद्रियांना जागे करण्याबरोबरच चित्रपटातून आपल्या डोक्याला बराचसा खुराकही मिळतो. म्हणूनच प्रत्येक चित्रपटप्रेमीनं, प्रत्येक वाचकानं हे पुस्तक वाचायलाच हवं. गेल्या पंधरा वर्षातील सर्व महत्त्वाच्या चित्रपटांची झलक आपल्याला यातून अनुभवता येईल. श्रीपाद ब्रह्मे यांची ‘हटके’ शैली, समीर नेर्लेकर यांनी साकारलेलं आकर्षक व अर्थपूर्ण मुखपृष्ठ, वाजवी किंमत आणि ‘चपराक’ची नेहमीप्रमाणं उत्कृष्ठ निर्मिती यामुळं हे पुस्तक वाचनीय आणि संग्राह्यही झालं आहे.
लेखक - श्रीपाद ब्रह्मे
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)
पाने - 144, मूल्य - 100/-

(हे पुस्तक www.chaprak.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुक करून आहे त्याच किंमतीत घरपोच मागवता येईल.)

* घनश्याम पाटील 
 

Saturday, December 17, 2016

कृतज्ञ आठवणींचे बेट

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सेनापती आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘कर्‍हेचे पाणी’ आणि ‘मी कसा झालो’ ही आत्मचरित्रात्मक पुस्तके लिहून त्यांचे समग्र जीवन अतिशय प्राजंळपणे मराठी वाचकांसमोर मांडले आहे. प्रत्येक मराठी वाचकाने किमान ‘मी कसा झालो’ हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला हवे. अत्रे नावाचं प्रतिभेचं लखलखतं बेट त्यातून आपणास थोडंफार उमजू शकतं. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान देणार्‍या आचार्यांची कारकीर्द देदीप्यमान आहे. त्यांच्याविषयी कितीही लिहून आले तरी ते कमीच. हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. अत्रे साहेबांच्या कन्या, मराठीतील ख्यातनाम कवयित्री आणि लेखिका शिरीष पै यांनी ‘वडिलांच्या सेवेसी’ हे पुस्तक लिहून आठवणींचे बेट तेवते ठेवले आहे. या आठवणी गोड आहेत, कटू आहेत, सुखद आहेत तशाच दु:खदही आहेत. मात्र जे आहे ते कृतज्ञतेच्या भावनेने मांडलेले सत्य आहे. त्यात निर्भयता आहे, प्रांजळता आहे, धैर्य आहे. खुद्द शिरिषताईच म्हणतात, ‘‘पप्पांसाठी जे करू शकले नाही त्याची उणीव या आठवणी लिहून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.’’ आचार्य अत्रे यांची मुलगी म्हणूनच नव्हे तर एक समर्थ, सशक्त लेखिका म्हणून शिरीषताईंचे लेखन नेहमीच लुभावणारे असते. त्यांचे शब्द अंत:करणातून येतात. वाचकांना प्रेरणा देतात. लिहिले पाहिजे, जे लिहितो त्याहून सुंदर लिहिता आलं पाहिजे. लेखन म्हणजे आपले समग्र जीवन झाले पाहिजे’ अशी आकांक्षा, अशी धारणा अत्रे साहेबांनी शिरीषताईंच्या मनात बालपणीच रूजवली. पुढे त्यांचे पती व्यंकटेश पै यांच्यामुळे त्यांच्यात आत्मपरीक्षणाची दृष्टी आली. त्यामुळे या पुस्तकात आई, वडील, नवरा आणि स्वत:विषयी त्यांनी मोकळेपणे लिहिले आहे. त्यातील प्रांजळता भावते. या महामानवाची खरी ओळख करून देते. ‘कर्‍हेचे पाणी’मधून जे अत्रेसाहेब कळतात तितकेच किंबहुना त्याहून अधिक या पुस्तकातून त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. ‘पप्पा’, ‘आई’, ‘व्यंकटेश’ आणि ‘मी’ अशा चार विभागात या पुस्तकाची मांडणी केली आहे.
शिरीषताई सांगतात, ‘पप्पा जलद वाचतात पण त्यांच्या वाचनात त्यांच्या ताणलेल्या भावनांचा सारा पूर वाहून जात असतो.’ खंडाळ्याचा बंगला हे अत्रे साहेबांच्या आयुष्यातले समाधानाचे एक मोठे ठिकाण. या बंगल्याच्या रस्त्याने चढावर चढताना बाबासाहेब आंबेडकरांची मोटर कशी अडली होती, खंडाळा कराराची बोलणी बंगल्यात चालली असताना आपल्या मांडीवर छतामधून तोंडात धरलेल्या बेडकासकट साप कसा धपकन आदळला होता असे अनेक अनुभव या पुस्तकात आलेत. या पुस्तकातून अत्रे साहेबांचे भावविश्‍व अचुकपणे उलगडते. ‘पप्पा, तुम्हाला एकट्याला कंटाळा नाही का येत?’ असे विचारल्यावर अत्रेसाहेब शिरिषताईंना म्हणतात, ‘मी एकटा असतो तेव्हा मला माझी सोबत असते ना! मला माझी सोबत फार आवडते. मी एकटा असतो तेव्हा मी माझ्याशीच बोलत असतो.’
म्हणूनच शिरीषताई म्हणतात, ‘ खंडाळा हे पप्पांच्या जीवनातले ‘काव्यस्थळ’ आहे. सासवड हा त्यांचा देह आहे तर खंडाळा हा त्यांचा आत्मा आहे.’ अत्रे साहेबांच्या डोक्यात कल्पनाशक्तीचे कुंड चोवीस तास कसे धगधगत असायचे हे या पुस्तकातच वाचावे. शिरीषताई म्हणतात, ‘कल्पनेचा लगाम धरून शब्दावर स्वार होणे त्यांना फारसे कठीण कधीच गेले नाही.’
छत्रपती शिवरायांनंतर महाराष्ट्राच्या भल्यासाठी अहोरात्र धगधगणारे अत्रे साहेबांसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व दिसत नाही. हे अग्निहोत्र कायम पेटलेले असायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला पणाला लावले. लेखणीला धार लावून तिची तलवार बनवली. दुष्प्रवृत्तीवर सपासप वार केले. ‘नवयुग’ आणि नंतर ‘मराठा’ ही नियतकालिके मराठी माणसांचा आवाज बनली.
अत्रे साहेबांना भव्यतेचा ध्यास होता. किरकोळ गोष्टी कधी त्यांना सहनच व्हायच्या नाहीत. जे करायचे ते प्रचंडच. त्यातूनच त्यांनी जीवनाचे सर्व रंग अनुभवले. सर्व क्षेत्रात त्यांनी चमकदार कामगिरी पार पाडली. मराठी माणूस त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ असेल.
शिरीषताईंनी त्याकाळी प्रेमविवाह केला. त्यांची निवड चुकीची होती असे अत्रे साहेबांनी लग्नाच्या दिवशीच सांगितले; मात्र मुलीवरील प्रेमाखातर त्यांनी सर्वकाही स्वीकारले. जावयाशी जमवून घेतले. कन्या‘दाना’च्या कल्पनेने त्यांचे पितृहृदय गलबलून गेले. पुढे व्यंकटेश पै यांनी त्यांच्या सणकू स्वभावामुळे काही चुका केल्या. आपले सर्वस्व मातीमोल करून त्यांनी अत्रे साहेब आणि ‘मराठा’साठी स्वत:च्या छातीची ढाल केली. हे सगळं काही या पुस्तकात आलं आहे. दोन्ही मुलींची लग्ने लावून दिल्यानंतर लग्नात पंगती बसल्या. अत्रे साहेब सर्वांना आग्रह करूकरू जेवायला वाढत होते. परंतु ते स्वत: काही जेवावयास बसेनात. सर्वात शेवटी नोकरांची पंगत बसली. त्या पंक्तीबरोबर ते जेवायला बसले. असे होते अत्रे साहेब! त्यांनी यशाची अनेक शिखरे पाहिली आणि अपयशाच्या दरीतूनही मनसोक्त भटकंती केली. शिरीषताईंना बालपणापासून ते सांगायचे, ‘पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोकेे फुटता कामा नये.’ शिरीषताई लिहितात, ‘नित्य नवे हा त्यांचा छंद स्थिर आहे. सदैव पराक्रम ही त्यांची वृत्ती स्थिर आहे. त्यांचे जीवनावरचे प्रेम स्थिर आहे. साठ वर्षे संपताना ते असे स्थिर आहेत नि अस्थिरही आहेत. चंचल आहेत आणि अविचल आहेत.
एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना जडलेले श्‍वानप्रेम, त्यांची लाडकी कुत्री, इतरांसाठी खात असलेल्या खस्ता, त्यांची व्यापक ध्येयनिष्ठा, कुटुंबवत्सलता, त्यांचे प्रेम, त्यांचा राग, त्यांचा संताप हे सारे काही वाचताना उर अभिमानाने भरून येतो, मन गलबलते, डोळे पाणावतात. नातवाने लिहिलेले पत्र जपून ठेवणे, ते प्रत्येकाला वाचून दाखवणे याविषयी शिरीषताई लिहितात, ‘वेड्यावाकड्या अक्षरातलं दित्यूचं ते बोबडं पत्र तुम्ही एखाद्या तरूण मुलीनं आपल्याला आलेलं आपल्या प्रियकराचं पहिलं प्रेमपत्र जितक्या काळजीपूर्वक हृदयाशी जपून ठेवावं तितक्या काळजीने आपल्या कोटाच्या खिशात ठेवून दिलेलं होतं. तुमच्या स्वत:च्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आयुष्यभर सहज हरवून टाकल्यात. त्याची एवढीसुद्धा खंत मनात ठेवली नाहीत; पण माझी ती लहानपणीची लहानशी पत्रं मात्र तुम्ही इतर मोठ्यामोठ्या माणसांच्या पत्राबरोबरच इतक्या प्रेमानं जपून ठेवलीत.’
अत्रे साहेबांच्या खाण्याच्या आवडीनिवडी, त्यांचा स्वभाव व त्यांचे गुण-दोष याविषयी या पुस्तकात अंत:करणापासून लिहिले आहे. त्या लिहितात, ‘पप्पांना एकटं जेवायला फारसं आवडत नसे. ते जेवत असताना कोणी पाहुणा आला की ते त्याला जेवायला घातल्याशिवाय परत पाठवीत नसत. मोठ्यामोठ्या नामवंत माणसांना मेजवानी द्यायची पप्पांना फार हौस. गरीब भुकेल्या माणसालाही त्यांनी कनवाळुपणानं जेवायला घातल्याशिवाय कधी सोडलं नाही. स्वयंपाक करण्याच्या जितक्या शैली दुनियेत असतील तितक्या त्यांनी स्वीकारल्या; मात्र त्यांची खाण्याची अखेरची इच्छा काय असावी तर ऊनऊन मऊ भात, त्यावर तूप आणि मेतकूट... आयुष्यभर इतकं खाऊन-पिऊन शेवटी इतकं साधंच मागितलं... तूपभात आणि मेतकूट... मात्र दुर्दैवाने त्यांची ही इच्छा शिरीषताई पुरवू शकल्या नाहीत.
त्यांच्या शेवटच्या काळातील विमनस्क अवस्था, वाढलेले मद्यपान, तृप्ततेचे समाधान हे वाचून कोणीही भारावून जाईल. शिरीषताईंच्या आई हुजूरपागेतल्या शिक्षिका. त्यांनी नाशिकलाही नोकरी केली. अत्रे साहेबांच्या कार्यविस्तारामुळे या माऊलीच्या संसाराचा ताप आणि व्याप वाढतच गेलेला. मात्र शेवटी त्यांना मधुमेह झाला. त्यात शस्त्रक्रिया करून आधी एक आणि नंतर एक असे दोन्ही पाय काढावे लागले पण त्यांनी धैर्यानं, चिकाटीनं दुखण्याला टक्कर दिली. अखेरच्या घटकेपर्यंत जीवनाला नकार दिला नाही. ‘एक छोटसं घरकुल, सतत जवळीक देणारा समव्यवसायी जोडीदार आणि चिमणी पाखरं’ इतकंच त्यांचं स्वप्न होतं; पण घरकुल जंगलभर पसरलं. समव्यवसायी जोडीदाराने अनेक धंदे अंगावर घेतले. त्यामुळे ती गांगरली-गोंधळली. हळूहळू सावरलीही; पण त्यात तिला न पेलवणार्‍या लढाया खेळाव्या लागल्या. दोन्ही मुलींवर या माऊलीने काळजाची सावली धरली. महाराष्ट्राच्या हृदयावर अनभिक्षिक्त राज्य करणार्‍या एका प्रतिभावंत बादशहाच्या कीर्तीच्या, वैभवाच्या, कर्तबगारीच्या आणि विजयाच्या ऐन शिखरावर ती त्यांच्या सिंहासनाशेजारी बसली होती. त्या सिंहासनावर उधळल्या गेलेल्या प्रत्येक फुलातली पाकळी न पाकळी तिच्याही पायावर पडत होती. त्यांच्या यशाचा सूर्यप्रकाश तिला जवळून पहायला मिळाला. शिरीषताई म्हणतात, ‘हा आनंद मिळाला नसता तर ह्या संघर्षात, इतक्या दुबळ्या देहानं ती इथवर टिकलीच नसती.’
विधी शाखेचे शिक्षण घेताना शिरीषताईंची आणि व्यंकटेश पै यांची ओळख झाली. व्यंकटेश यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी. त्यात देखणे. शिवाय राजकारणी. त्यामुळे शिरीषताई त्यांच्या प्रेमात पडल्या. मग काय झालं? त्या परीक्षेत नापास झाल्या. पुढे? इकडे-तिकडे चोहीकडे जे होत असतं तेच झालं. त्यांचं लग्न ठरलं. ज्याला लोक ‘प्रेमविवाह’ म्हणतात! व्यंकटेश यांची राजकीय विचारधारा, त्यांच्या मॉं, त्यांची भाषा, व्यंकटेश यांनी चांगली चालणारी वकीली सोडून मराठीसाठी खाल्लेल्या खस्ता, वाढलेले मद्यपान, त्यातून आलेले नैराश्य, अत्रे साहेब आणि त्यांच्यातील संघर्ष व त्यांचे एकमेकांवरील दृढ प्रेम... हे सर्वकाही वाचताना कुणालाही हेवा वाटावा.
लग्नानंतर शिरीषताईंनी आणि व्यंकटेश यांनी ‘मराठा’त नोकरी केली. त्यावेळी अत्रेसाहेबांनी कर्जाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. नोकरांचे पगार थकलेले. त्यांचा हा पडता काळ. रोजच्या रोज दारात सावकार मंडळी पैशासाठी तगादा लावायची. त्यांचा वाट्टेल तसा अपमान करायची. कर्जापायी प्राण कंठाशी आलेले! ‘नवयुग’च्या छपाईची बीलं भरता न आल्यानं छापखान्याचा मालक घाणेरड्या शिव्या द्यायचा. त्यातच अत्रे साहेबांच्या आयुष्यात एक विलक्षण घटना घडली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारला गेला. मग त्यांच्या कर्तबगारीची तेजस्वी पहाट उगवली. एका रात्रीत ते या आंदोलनाचे सेनापती झाले. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. नवयुगचा खप महाराष्ट्रभर हजारोंनी वाढला. त्याचे संपादकीय कामकाज अत्रे साहेब बघायचे, तर वितरण व्यवस्था, रोजचा कारभार आणि आर्थिक उलाढाली व्यंकटेश यांच्यावर आल्या. त्यातून व्यंकटेश यांच्या दारूचा आरंभ झाला. हा आरंभ अंतापर्यंत घेऊन जाणारा ठरला. व्यंकटेश यांच्याकडून होणारा छळ शिरीषताई व्यक्तही करू शकत नव्हत्या. कारण हा प्रेमविवाह! कोणत्या तोंडानं नवर्‍याविरूद्ध बोलणार?
1969 च्या जूनमध्ये शिरीषताईंनी ‘मराठा’च्या संपादनाची सुरूवात केली. त्याकाळी व्यंकटेश पै आणि शिरीषताईंनी दोन मोठ्या संकटांना तोंड दिलं. एक आचार्य अत्रे यांचं मृत्युपत्र आणि दुसरे ‘मराठा’तील कामगारांनी केलेला संप. या संपामुळे ‘मराठा’ची आर्थिक स्थिती एकदम खालावली. सरकारनं ‘मराठा’ला काळ्या यादीत टाकलं. शासकीय जाहिराती बंद झाल्या. या प्रसंगाविषयी शिरीषताई लिहितात, ‘मराठाच्या निर्मितीत आणि विकासात पप्पांइतकाच व्यंकटेशचा घामही गळला होता. तितकंच रक्त त्यानंही आटवलं होतं. जो ‘मराठा’ व्यंकटेशचं समग्र जीवन होता, ज्या ‘मराठा’साठी मी व्यक्तिगत सुखांना तिलांजली दिली होती, तो ‘मराठा’ अखेर हातचा गेला. संपाच्या काळात कामगारांनी आमच्या दारात उभे राहून व्यंकटेशला आणि मला गलिच्छ शिव्या मोजल्या होत्या. ‘मराठा’च्या संपादक खात्यात काम करणार्‍या ज्या संपादकांना मी नेहमीच उत्तेजन दिलं, त्यांनीच कामगारांना मला ‘रांड’ ही शिवी आमच्या घरासमोर भर रस्त्यावर उभे राहून देण्याची चिथावणी दिली होती. ‘व्यंकटेश पै मेला रे, उशाला बाटली ठेवा रे’ अशा अर्वाच्च घोषणा कोणी दिल्या होत्या, तर ज्या कामगारांना सणासुदीला व्यंकटेश घट्ट मिठी मारून हृदयाशी धरीत होता त्यांनी!’
21 मे 1983 ला व्यंकटेश यांचं निधन झालं. लिव्हरचं दुखणं असं डॉक्टरांचं निदान होतं; पण विकोपाला गेलेलं नैराश्य हे खरं दुखणं असल्याचं निरिक्षण शिरीषताई नोंदवितात.
शिरीषताई बालपणापासूनच सकस आणि दर्जेदार लिहितात. पुढे त्यांनी ‘मराठा’त काम केले. रविवार  पुरवणीचे संपादन केले. अत्रे साहेबांनंतरही शक्य त्या अवस्थेत खमकेपणे मराठा चालवला. सुरूवातीला पुस्तकं, चित्रपट, नाटकांची परीक्षणं लिहिली, मुलाखती  घेतल्या. अत्रे साहेब त्या काळात लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून आग ओकत असताना शिरीषताईही त्यात योगदान पेरत होत्या. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या ध्येयाने पछाडलेले अत्रे साहेब ‘जनतेचा कसाई, मोरारजी देसाई’ अशा प्रक्षोभक मथळ्यांनी अग्रलेख लिहीत होते. त्यांच्यावर सगळीकडून मानहानीचे दावे दाखल होत होते. त्यावेळी व्यंकटेश पै यांनी वकीलाच्या भूमिकेतून हे हल्ले परतून लावले. हे सगळे आणि इतरही बरेचसे सत्य जाणून घेण्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीत सर्वात मोठे आणि भरीव योगदान देणार्‍या आचार्य अत्रे आणि त्यांच्या कुटुंबियांना समजून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. शिरीषताईंनी यात जागवलेल्या आठवणी सर्वांनाच प्रेरणा देणार्‍या आहेत. आचार्य अत्रे यांच्यासारखा अफाट प्रतिभेचा बेफाट माणूस ‘वडिलांच्या सेवेसी’ मधून वाचकांच्या समोर येतो. वडिलांविषयी कृतज्ञता म्हणून शिरीषताईंनी हा लेखन प्रपंच केला असला तरी इतक्या वैयक्तिक गोष्टी स्पष्टपणे मांडल्याबद्दल वाचक या नात्याने आम्हीही अत्रे साहेबांबरोबरच शिरीषताई यांच्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करतो.
लेखिका - शिरीष पै
प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन, ठाणे (0250-2335203)
पाने - 239, किंमत - 250/-

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’
7057292092

Saturday, December 10, 2016

‘स्वप्तातलं पुणं’

होय, आपला देश झपाट्याने बदलतोय. आपल्या राष्ट्राची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरू आहे. येथील समाजकारण, राजकारण अधिक प्रगल्भ होताना दिसतेय. प्रशासकीय यंत्रणा आणखी जोमाने काम करतेय. विज्ञान-तंत्रज्ञानाचा पुरेपुर उपयोग करून घेतला जातोय. अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध झाल्याने एकेक पाऊल झपाट्याने पुढे पडतेय. पोपटराव पवार यांच्यासारख्या एका दृष्ट्या माणसाने नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावचा चेहरामोहरा बदलला! त्याचप्रमाणे आपले पंतप्रधानही कार्यरत आहेत. त्यांनी काही महानगरांना ‘स्मार्ट’ करण्याचा विडा उचललाय. त्यांच्या खासदारांनी गावंच्या गावं दत्तक घेतलीत. सर्वजण खडबडून कामाला लागलेत. ‘कॅशलेस’ आणि ‘कास्टलेस’ समाज व्हावा यासाठी सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातून आर्थिक विषमतेची दरी दूर व्हावी, जातीभेद नष्ट व्हावेत असे प्रयत्न सुरू आहेत. हे सारे सुरू असतानाच येथील सामान्य माणूस आपल्या राष्ट्राबाबत, आपल्या शहराबाबत नेमका काय विचार करतो? त्याच्या स्वप्नातले शहर नेमके आहे तरी कसे? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एखाद्या राष्ट्राची प्रगती पहायची झाल्यास तेथील युवकांच्या तोंडात कोणती गाणी आहेत हे पहावे म्हणजे त्या राष्ट्राचा चेहरा तुमच्या समोर येईल असे म्हटले जाते. तद्वतच त्या राष्ट्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, लेखक, कवी आपल्या शहराबाबत काय विचार करतात याचा अभ्यास झालाच पाहिजे. दत्तात्रय वायचळ हे अशाच लेखकांचे प्रतिनिधीत्व करणारे व्यक्तिमत्त्व. संवेदनशील मनाचे वायचळ सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांचा ‘गजरा’ हा कथासंग्रह ‘चपराक‘ने प्रकाशित केलाय. त्यांच्या प्रस्तुत दुसर्‍या पुस्तकात त्यांनी भविष्यातील पुणे शहराचा वेध घेतला आहे. सध्या ‘स्मार्ट सिटी’बाबत जी चर्चा सुरू आहे त्याचा प्रभाव वायचळ यांच्या लेखणीवर पडलेला दिसतो. पुण्याचे ‘पुणेरीपण’ जिवंत ठेवत अजून पाच-पंचवीस वर्षांनी हे शहर कसे असेल, कसे असावे याबाबतचे स्वप्नरंजन त्यांनी केले आहे. मुख्य म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वेध घेताना त्यांनी केवळ चांगल्या बाजूच मांडल्या आहेत. या पुस्तकात राजेश राजाराम रेळेकर हा युवक त्याच्या काकांना पुणे शहर फिरून दाखवतो. काका अनेक वर्षापासून विदेशात स्थिरस्थावर झाल्याने त्यांना या बदलत्या शहराचे मोठे कुतूहल वाटते. रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजा तर आहेतच; मात्र शहराच्या विकासात हातभार लावणार्‍या वाहतूक व्यवस्थेपासून ते अगदी उद्याने, रस्ते, पोलीस ठाणे, विविध सेवा केंद्रे, खेळाची मैदाने, शाळा, महाविद्यालये, स्वयंचलीत बस स्थानके, पदपथ, सायकलपथ, हॉटेल्स, अन्य सेवा या सर्वांचे वर्णन वाचताना आपण एखाद्या पाश्‍चिमात्य शहरात आहोत की काय असेच वाटते. दत्तात्रय वायचळ यांनी स्थानिक महापालिका प्रशासन आणि आपल्या सत्ताधार्‍यांसमोर शहराच्या विकासाचा आरसाच ठेवला आहे. बदलते पुणे कसे असावे यासाठीचे मार्गदर्शन म्हणून या छोटेखानी पुस्तकाकडे पाहता येईल. बाहेरून येणारे लोंढे कसे थोपवायचे, येथील भूमीपुत्रांना कसा न्याय द्यायचा आणि तरीही प्रशासनाचे थोरण सर्वसमावेशक कसे असावे याचाही उहापोह वायचळ यांनी या पुस्तकात केला आहे. ‘स्वप्तातलं पुणं’ म्हटल्यावर लेखकाने पाच-पन्नास वर्षापूर्वीच्या स्मृतीची पाने चाळली आहेत की काय; असे कुणासही वाटावे मात्र त्यांनी भविष्याचा वेध घेऊन या शहराच्या विकासाचे चित्रच स्पष्ट केले आहे. लवकरच म्हणजे येत्या फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील महानगरापैकी पुणे हे एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराने सांस्कृतिक वारसाही नेटाने जपलाय. त्यामुळे या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसाठी हा खजिनाच आहे. शहराच्या विकासाचे नियोजन करताना त्यांना या पुस्तकाचा मोठा उपयोग होऊ शकतो. मुख्य म्हणजे यातील कोणतीही गोष्ट ‘अशक्यप्राय’ पठडीतील नाही. ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे ते कोणीही हे सगळे काही अंमलात आणू शकतात. आजचे हे स्वप्नरंजन उद्याचे ‘वास्तव’ असणार आहे. दत्तात्रय वायचळ हे सरकारी कर्मचारी आहेत; तसेच उत्तम ललित लेखक आणि कथाकार आहेत. त्यामुळे त्यांनी या शहराबाबत केलेले मूलभूत चिंतन शहर नियोजनात निश्‍चितच मोलाचे ठरेल. कोणतीच भूमिका घ्यायची नाही, अशी एकच भूमिका सध्याचे साहित्यिक घेत असताना वायचळांनी आपल्या शहराबाबत रंगवलेले चित्र समाधानकारक आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. मुख्य म्हणजे या पुस्तकाचे मुुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक आणि तंत्रज्ञ समीर नेर्लेकर यांनी साकारले असून तेही तितकेच बोलके आहे. आजूबाजूच्या मोठमोठ्या इमारतीपुढे ‘शनिवारवाडा’ एकदमच छोटा वाटतोय. हे आपल्याला पटण्यासारखे नसले तरी भविष्यातील वास्तव आहे. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करणारा ‘रोबोट’ दाखवून त्याला घातलेली ‘पुणेरी पगडी’ हेही कलात्मक, सूचक आणि अर्थपूर्ण आहे. हे शहर कितीही बदलले तरी त्याचा मूळचा स्वभाव जाणार नाही, साहित्य, संस्कृती, संस्कार जपण्यात पुणे कायम अग्रेसर असेल हे त्यातून स्पष्टपणे नोंदवले जाते. वायचळ यांच्या भावी लेखन प्रवासास शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांच्याकडून आणखी दर्जेदार ललित व माहितीपूर्ण साहित्यकृती निर्माण होवोत अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- घनश्याम पाटील
'चपराक प्रकाशन', पुणे 
७०५७२९२०९२

Monday, December 5, 2016

वाल्याचा वाल्मिकी होईल का?

राम गणेश गडकरी यांच्याकडे एकदा काही कार्यकर्ते गेले. त्यांनी सांगितले की, ‘‘आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केलीय. तिच्या शुभारंभाचा नारळ तुमच्या हस्ते फोडावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे...’’
त्यावर गडकरी म्हणाले, ‘‘मी संस्थेचा नारळ फोडतो; संस्था कधी फुटणार हेही सांगा....’’
यातला विनोदाचा भाग सोडला तर मराठी माणसे फार काळ एकत्र राहू शकत नाहीत, संघटीतपणे काम करू शकत नाहीत असाच अनुभव आजही येतो.
गडकरींचा हा किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे सध्याचे आपल्या राज्यातील असलेले राजकारण! आजवर अनेक संस्था, संघटनांनी, राजकीय पक्षांनी येनकेन प्रकारे आपापल्या ध्येयधोरणानुसार काम करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते संघटीत राहू शकत नाहीत असेच आजवर दिसून आले आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची मोट बांधण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला. मराठा समाजावर होणारे अत्याचार, त्यांची होणारी पिळवणूक, ऍट्रोसिटी कायद्याचा होणारा गैरवापर या सर्वांविषयी एक खदखद होती. कोपर्डीतील एका निष्पाप मुलीवरील अत्याचारानंतर हा रोष अधिक प्रमाणात वाढला आणि सर्वत्र क्रोधाच्या ज्वाळा निर्माण झाल्या. यात मराठा समाज शांतीच्या मार्गाने रस्त्यावर उतरला. त्यांनी सर्वत्र लाखोंचे मूक मोर्चे काढले. व्यवस्थेविषयीचा निषेध नोंदवतानाच त्यांनी कुठेही हिंसाचार होणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे मराठा समाजाची दखल मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. प्रशासन आणि प्रसारमाध्यमे खडबडून जागी झाली.
समुद्र मंथनातून जसे अमृत बाहेर येते तसेच विषही येते. त्यातून काय घ्यायचे हा ज्याचा त्याचा अधिकार. मराठा मूक मोर्चातून या समाजाचे संघटन दिसले असले तरी त्यातून नेमके काय साध्य झाले हे पाहण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. तूर्तास तर हातात काहीच आल्याचे दिसत नाही. उलटपक्षी मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर राज्यभर झालेल्या पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत सेना-भाजपचाच जोर दिसून आला आहे. याचा अर्थ आजच्या सरकारविषयी सामान्य माणसाच्या मनात राग नाही असा तर निघतोच पण दुसरी वस्तुस्थितीही लक्षात घ्यायला हवी. ग्रामीण भागातील बहुसंख्य असलेला मराठा समाज आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी
कॉंग्रेससोबत नाही तर सेना-भाजपसोबत आहे. म्हणजे ज्या भगव्या पताक्याची तथाकथित ‘मराठा’ संघटनांना ‘ऍलर्जी’ होती त्याच समाजातील बहुसंख्य लोक भगवी पताका श्रद्धेने खांद्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.
मराठा मूक मोर्चाचे अपत्य म्हणजे यातून ‘संभाजी ब्रिगेड’सारख्या संघटनेेेने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. अर्थात यापूर्वीही ही संघटना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या राजकारण करायचीच; पण ते द्वेषाचे, सूडाचे राजकारण होते. या संघटनेचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकर यांच्या सौभाग्यवती रेखा खेडेकर या भाजपाच्याच आमदार होत्या. हेच स्वयंघोषीत शिवश्री (नव्हे शिवीश्री) केवळ ब्राह्मण द्वेषाने पेटलेले होते. अगदी ब्राह्मणांना कापा, मारा, त्यांच्या बायका पळवून आणा इतके सांगण्यापर्यंत आणि लिहिण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यांनी त्यांचे हे ‘दिव्य’ विचार त्यांच्याच घरी त्यांच्या बायकोला आणि आईला सांगावेत, त्या दोघीही त्यांच्या तोंडावर थुंकल्याशिवाय राहणार नाहीत, असे आम्ही यापूर्वीच निक्षून सांगितले होते. आता राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली या शिवीश्रींना अटक होण्याची शक्यता असतानाच मराठा मूक मोर्चाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून या संघटनेने राजकारणात उडी मारली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच मराठा समाजाला एकत्र करण्याच्या नावावर हा पक्ष उभा राहत आहे. त्याचे भवितव्य काय असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही; मात्र त्यांनी द्वेषाचे राजकारण सोडले, हिंदुत्वाचा विरोध कमी केला, समाजहिताचे चार निर्णय घेतले तर त्यांना किमान श्‍वास घेता येईल. पुण्या-मुंबईसारख्या महानगरात इच्छुक उमेदवारांची साठमारी सुरू असताना त्यातील काही अतृप्तांना ही संघटना (किंवा फार तर नवा पक्ष म्हणूया) सामावून घेऊ शकेल. स्थानिक समीकरणे पाहता त्यातील काही उमेदवार निवडून येतीलही! पण ब्रिगेडची विचारधारा किंवा ध्येयनिष्ठा असले काही प्रकार त्यांच्याकडे नसतील. निवडून आल्यानंतर तू तुझ्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने असेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसेल. ‘संभाजी ब्रिगेड’ची ध्येयधोरणे पाहून आणि त्यांच्या सूडाच्या राजकारणावर फिदा होऊन कोणी त्यांच्याकडे आकर्षित होईल असे वाटत नाही. केवळ अपरिहार्यता किंवा तात्कालिक तडजोड म्हणून काहीजण त्यांना साथसंगत करतील. हे चांगले की वाईट हे ज्याने त्याने ठरवावे.
नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक कणखर आणि सत्याची चाड असणारे पंतप्रधान लाभले आहेत. ते धाडसाने निर्णय घेत आहेत. अगदी शत्रूच्या गोटात जाऊन त्यांना मारणे असेल किंवा अंतर्गत साफसफाईसाठी एका रात्रीत नोटाबंदीचा निर्णय घेणे असेल, त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून त्यांचा कणखरपणा आणि स्वाभिमानी बाणा दिसून येतो. किंबहुना ‘मोदी म्हणजे भाजप नाही’ हेही आता आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्यांची भूमिका कुण्या एका पक्षासाठी नसून ती देशहिताची आहे, यावरचा सामान्य माणसाचा विश्‍वासही अधिक दृढ होत चालला आहे. एका नव्या राजकीय पर्वाची नांदी झालेली असताना देशभरातील त्यांचे विरोधक पुरते भुईसपाट झाले आहेत. कॉंगे्रस असेल किंवा इतर प्रादेशिक पक्ष असतील; प्रत्येकांना त्यांनी लोळवले आहे. लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे चित्र देशभर आहे.
या अशा सार्‍या वातावरणात संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष म्हणून पुढे येत असेल तर त्यांच्यापुढे निश्‍चितच मोठे आव्हान आहे. ऑल इंडिया मुस्लिम लिग असेल किंवा शिवसेनेसारखे मराठमोळे पक्ष असतील तेही अशाच कट्टरतावादातून पुढे आले आहेत; मात्र त्यांनी त्यांचा कट्टरपणा, कडवटपणा दूर सारत लोकहिताचे निर्णय घेतल्याने त्यांना बर्‍यापैकी मान्यता मिळाली आहे. संभाजी ब्रिगेडनेही त्यांची संकुचित वृत्ती आणि द्वेष बाजूला सारला तर त्यांना एक संधी उपलब्ध होऊ शकते. बहुसंख्य असलेला मराठा त्यांच्या पाठिशी राहील अशी मुळीच शक्यता नसली तरी जे कोणी हतबलतेने किंवा पर्यायाअभावी त्यांच्याकडे आकर्षित होतील त्यांच्याकडून जनहिताची कामे करून घेतली, वैचारिक संघर्ष उभारला तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. संभाजी ब्रिगेडसाठी समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची ही संधी आहे. ते कात टाकून सकारात्मक राजकारण करतील की विषाचे फुत्कार सोडण्यातच धन्यता मानतील हे येणार्‍या काळात कळेल. तूर्तास महाराष्ट्राच्या राजकारणात इतर अनेक छोट्या-मोठ्या पक्षाप्रमाणेच आणखी एका पक्षाची भर म्हणून त्यांना शुभेच्छा देऊयात!!

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Sunday, November 13, 2016

वाचकांविषयी कायम कृतज्ञ!

‘वाचनसंस्कृती कमी होतेय’, अशी ‘अंधश्रद्धा’ काही प्रकाशक, लेखक आणि वृत्तपत्रेही सातत्याने पसरवतात. यामागचा त्यांचा उद्देश काय हे मला अजूनही कळले नाही; मात्र मराठीत अनेकजण उत्तमोत्तम लिहित आहेत आणि ते मोठ्या संख्येने वाचले जात आहे, हा माझा स्वानुभव आहे. बदलत्या पिढीनुसार त्यांची अभिरूची बदलत असेल; पण वाचकांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अनेक जिज्ञासू वाचक आमच्याकडे त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करण्यासाठी आमचे कार्यालय शोधत येतात, ग्रंथ प्रदर्शनात आमच्या दालनात तुडूंब गर्दी करतात आणि रोख रक्कम देऊन त्यांना हवी ती पुस्तके विकत घेतात. तरीही ‘वाचक नाहीत’ असे म्हणणे म्हणजे या सर्वांचा अवमान करण्यासारखेच आहे. असा करंटेपणा कोणीही करू नये.
7 मे 2013 ला माझ्या ‘दखलपात्र’ या अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन केसरीवाड्यात झाले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, निवेदक सुधीर गाडगीळ, श्रीपाल सबनीस, श्रीराम पचिंद्रे, प्रदीप नणंदकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मी अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित केली असली तरी माझे स्वत:चे हे पहिलेच पुस्तक होते. त्यामुळे माझ्या हितचिंतकांनी आणि मित्रांनी त्याच्या बारशाचा सोहळा वाजत गाजत पार पाडला. कार्यक्रम संपल्यावर जेवण आणि नंतरच्या गप्पांनी आमच्या दोस्त मंडळींनी रात्र जागवली.
पहाटेच्या सुमारास आम्ही जरा कलंडलो. मला झोप लागते न लागते तोच माझा फोन वाजला. अतिशय त्रासलेल्या मन:स्थितीत मी तो उचलला. समोरची व्यक्ती म्हणाली, ‘‘सर, मी इंदापूर तालुक्यातल्या लासुर्णे गावातून राहुल सवणे बोलतोय. रात्री तुमचे ‘दखलपात्र’ हे पुस्तक वाचले. ते आवडले. तुमचे अभिनंदन करण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी फोन केलाय.’’
एक तर आदल्या रात्री पुस्तकाचे प्रकाशन झालेले. दुसरे म्हणजे लेखकाबरोबरच प्रकाशकही मीच असल्याने हे मला पक्के ठाऊक होते की पुस्तक अजून बाजारात गेले नाही. मग लासुर्णेसारख्या छोट्या गावात, इतक्या कमी वेळात ते जाणेही शक्य नाही. त्यामुळे माझा कुणी मित्रच गंमत करत असेल म्हणून मी जरा आवाज चढवला.
समोरून सवणे शांतपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘सर, माझा रवीकिरण सासवडे हा मित्र कालच्या प्रकाशनच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्याने रात्री मला हे पुस्तक दिले. मला वाचनाची आत्यंतिक आवड आहे; मात्र काही दिवसांपूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाल्याने नवे काही वाचवत नव्हते. रवीने काल पुस्तक दिल्यावर मी चाळायला घेतले आणि वाचतच सुटलो. रात्री अकराच्या सुमारास लोडशेडिंगमुळे ‘लायटीने घोटाळा’ केला. आता पुस्तक वाचल्याशिवाय समाधान होणार नाही म्हणून मी चिमणी लावली. चिमणीच्या प्रकाशात रात्री संपूर्ण पुस्तक वाचून काढले. हे पुस्तक वाचल्यावर मला माझ्या पत्नीच्या मृत्युचाही विसर पडला. त्यामुळे इतक्या पहाटे तुम्हाला फोन करतोय...’’
माझी झोप कुठल्या कुठे पळाली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आलेली ही पहिली प्रतिक्रिया. माझेही डोळे पाणावले. मी त्यांना धन्यवाद दिले. त्यावर सवणे म्हणाले, ‘‘सर, मी माझ्या कमाईतील निम्मी रक्कम पुस्तकांच्या खरेदीसाठी खर्च करतो. त्यामुळे माझी झोपडी पुस्तकांनी समृद्ध झालीय. ती पुस्तके मी वाचलीत. माझ्या या दर्जेदार ग्रंथसंग्रहात तुमच्या पुस्तकाने भर पडलीय.’’
मी त्यांना ‘काम काय करता?’ असे विचारले. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने तर मी उडालोच. सवणे म्हणाले, ‘‘मी भंगार विक्रेता आहे. गोवागावी फिरून भंगार गोळा करतो आणि ते विकतो.’’ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाचनाची आवड जोपासणार्‍या या अवलियाची दाद मिळाल्याने मी खर्‍याअर्थी श्रीमंत झालो. साहित्यातील मोठ्यात मोठा पुरस्कारही यापुढे फिका ठरावा. भारावलेल्या अवस्थेतच मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही काही लिहिता का?’’ ते म्हणाले, ‘‘होय सर, मी ‘मोजमाप’ नावाचे आत्मचरित्र लिहिलेय. भंगारच्या गाड्यावर ठेऊन, ओरडून हे पुस्तक विकले. त्याची एक हजार प्रतींची आवृत्ती नुकतीच संपलीय.’’
पुढे मी मुद्दाम त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. गावकुसाबाहेर त्यांची वस्ती. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचे अफाट वाचन आणि ग्रंथप्रेम पाहून हरखून गेलो. नेमके त्यादिवशी राखीपौर्णिमा होती. त्यांच्या मुलीने मला राखी बांधली. कवी महादेव कोरे, रवीकिरण सासवडे सोबतीला होतेच. आम्ही अक्षरशः भारावून गेलो. लेखणामुळे मिळालेले, कायमस्वरूपी जोडले गेलेले असे लोक हीच तर माझी मोठी संपत्ती आहे. त्यानंतर लवकरच म्हणजे 8 ऑगस्ट 2014 ला ‘दखलपात्र’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि लेखणी व वाणीवर उत्तम प्रभुत्व असणारे प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन झाले. त्यावेळी मी राहुल सवणे यांना अगत्याने बोलावले. माझ्या पुस्तकाचे ‘पहिले वाचक’ म्हणून कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.
दुसरा अनुभव भुवड काकूंचा. आमच्या ‘चपराक’ कार्यालयाजवळ बाफना पेट्रोल पंपाच्यासमोर त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. तिथे त्या लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंज्या असे खाद्यपदार्थही विक्रीला ठेवतात. मुख्य म्हणजे हे सारे पदार्थ त्या स्वतः तयार करतात. ‘चपराक’ला बर्‍याचवेळा रात्री उशीरपर्यंत काम झाल्यानंतर सकाळी या दुकानात जाण्याचे प्रसंग अनेकदा येतात. मी ‘चपराक’मध्ये असतो इतकीच जुजबी माहिती त्यांना होती. एकदा ‘सकाळ’ या पुण्यातील आघाडीच्या वृत्तपत्राने माझ्या अग्रलेख संग्रहाचे परीक्षण प्रकाशित केले आणि माझा गौरव केला. त्याच दिवशी नेमका मी त्या दुकानात गेलो. काकूंनी मला सांगितले, ‘‘दादा तू चपराकमध्ये असतोस ना रे? मला ते पाटील सरांचे पुस्तक आणून देतोस का? मी त्याचे पैसे देईन.’’
मला गंमत वाटली. ते पुस्तक मी त्यांना नेऊन दिले. त्यांनी पुस्तकाचे पैसे आग्रहपूर्वक मला दिले. मी तिथून सटकलो. हा प्रसंग विसरूनही गेलो. काही दिवसांनी पुन्हा त्या दुकानात जाणे झाले. काकूंनी ते पुस्तक वाचले होते. मला पाहताच त्या एकदम भारावून गेल्या. अत्यानंदाने म्हणाल्या, ‘‘सर, माफ करा. तुम्हीच घनश्याम पाटील आहात, हे मला माहीत नव्हते. मला पुस्तक खुपच आवडले. लोकांच्या मनातला रोषच तुम्ही लेखणीतून मांडलाय.’’ त्यादिवशी त्यांनी आग्रहपूर्वक खूप ‘खाऊ’ दिला. नंतर जेव्हा कधी त्यांची भेट होते तेव्हा त्या आस्थेने विचारपूस करतात. त्यांची सुखदुःखे सांगतात. हा व्याप सांभाळत काही लिहिण्याचाही प्रयत्न करतात. मला ते आवर्जून दाखवतात आणि माझ्या प्रतिक्रियेवर खुशही होतात.
मध्यंतरी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुका झाल्या. मिलिंद जोशी यांनी त्यांच्या परिवर्तन पॅनेलमधून मला निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. खरेतर मी निवडून यायची शक्यता खुपच कमी होती. यातले राजकारण माहीत नव्हते. सभासद माहीत नव्हते; मात्र त्यांचा आग्रह मोडता आला नाही. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मी सहमती दर्शवली आणि शेवटचा अर्ज मी भरला. त्यात आमच्या पॅनलचे कार्याध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार चांगल्या मतांनी निवडून आले. आमचे पुण्याबाहेरीलही सर्व प्रतिनिधी निवडून आले; मात्र आम्ही पुण्यातले कार्यवाहपदाचे चारही उमेदवार सटकून आपटलो. आपटलो म्हणजे आमचे पूर्णच पानिपत झाले.
या निवडणुकीच्या प्रचारात फिरतानाही अनेक अनुभव आले. प्रामुख्याने ते वाचनसंस्कृतीशी निगडित होते. अरूण किर्लोस्कर हे आपल्याकडील सुप्रसिद्ध उद्योजक. त्यांचे वय जवळपास ऐंशीहून अधिक असावे. त्यांच्याशी माझा कधीच काही संबंध आला नव्हता. एकेदिवशी अचानक त्यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही परिषदेच्या निवडणुकीला उभे आहात याबद्दल अभिनंदन. या निवडणुकीशी माझे काहीही देणेघेणे नाही; मात्र मी परिषदेचा सभासद आहे. मला मतपत्रिकाही आलीय. इथे आवर्जून मतदान करावे असे काहीच नाही; मात्र तुम्ही सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे पुस्तक प्रकाशित केलेय. त्यांचे ‘चपराक’ने केलेले ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक मी वाचलेय. ते माझे आवडते लेखक आहेत. इतके चांगले पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल माझे मत तुमच्या पॅनेलला. तुम्ही असेच लिहित रहा. उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करा. तुमची साहित्यसेवा मोलाची आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहेत.’’
केवळ एक दर्जेदार पुस्तक प्रकाशित केल्याने इतक्या ज्येष्ठ उद्योजकाने माझ्यावर हा विश्‍वास दाखवला होता. पुढे त्यांच्याशी चांगला स्नेह जुळला. माझ्या लेखनाला ते आवर्जून दाद देतात. मी लिहावे यासाठी प्रोत्साहन देतात. असाच प्रसंग हडपसरचा. प्रचारानिमित्त त्या परिसरात फिरताना आम्ही श्रीकांत कुमकर यांच्या घरी गेलो. त्यांच्याशी कसलाच परिचय नव्हता. ते दोघेही पती-पत्नी परिषदेचे सभासद आहेत. उत्तम वाचक आहेत. मी ‘चपराक’चा संपादक आहे हे कळताच त्यांनी अक्षरशः आमचे जोरदार स्वागत केले. मला कारण काही कळेना. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या आईची मुलाखत तुम्ही तुमच्या अंकात प्रकाशित केली होती. तेव्हापासून आम्ही ‘चपराक’चे नियमित वाचक आहोत. तुमची अशी भेट होईल असे वाटले नव्हते.’’ कुमकर मॅडमच्या आई भारतीताई पवार. त्या नंदुरबारच्या. हुतात्मा शिरीषकुमार यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले होते. साने गुरूजींच्या प्रभावाने या चिमुकल्यांनी नंदुरबारमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. माझे कर्तव्य म्हणून मी त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली होती; मात्र तेव्हापासून हे पूर्ण कुटुंब माझे ‘वाचक’ झाले होते.
आणखी एक अनुभव तर फारच वेगळा आहे. एकदा असाच एक फोन आला. त्या वाचकाने माझे पुस्तक वाचले होते. ते वाचून तो ‘चपराक’चा सभासदही झाला होता. त्याने पुस्तकाचे भरभरून कौतुक केले. माझ्या काही लेखांवर बोलला. अशावेळी लेखक म्हणून नकळतपणे आपला अहंकार सुखावतो. नंतर त्याने चाचरतच विचारले, ‘‘सर, मी तुमचे लेखन आवर्जून वाचतो. तुमचे स्पष्ट आणि परखड विचार आवडतात. त्यामुळे तुमच्यावर माझा विश्‍वास आहे. तुम्ही मला काही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही याची खात्री असल्याने काही मनातले सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलाय. आपला गैरसमज होऊ नये ही विनंती; पण मला तुमचा सल्ला हवाय...’’
मी त्याला म्हणालो, ‘‘दादा जे काही आहे ते स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोला. मला जे शक्य आहे ते सहकार्य नक्कीच करेन.’’
तो म्हणाला, ‘‘सर, मी एका कंपनीत हेल्पर म्हणून कामाला आहे. मला तुटपूंजा पगार मिळतो. त्यात कसेबसे घर चालते. वडिलांना कॅन्सर होता. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या इच्छेखातर नात्यातल्याच एका मुलीशी लग्न केले. नंतर वडील गेले. माझा संसार सुरू झाला पण परिस्थितीने गांजलोय. तुम्हाला कसे सांगावे तेच कळत नाही...’’
मी विचारले, ‘‘तुम्हाला आणखी चांगली नोकरी हवीय का? काही कौटुंबिक अडचणी आहेत का? नेमके कारण सांगा म्हणजे आपल्याला काही मार्ग काढता येईल.’’
तो म्हणाला, ‘‘सर, आपली तशी ओळख नाही. आपण कधी भेटलोही नाही; मात्र तुमचे साहित्य वाचून मी तुमचा चाहता झालो आहे. तुम्ही योग्य तेच सांगाल.’’
मी पुन्हा म्हणालो, ‘‘मित्रा स्पष्ट बोल. मला जे शक्य आहे ते नक्की करेन.’’
त्यावर त्याने सांगितले, ‘‘सर, आम्ही परिस्थितीपुढे हतबल आहोत. घरी वडिलधारी मंडळी कोणीच नाहीत. भावकीचे वाईटावर टपून बसलेत. वडिलांच्या इच्छेखातर लग्न केले. त्यानंतर आम्ही काळजी घेतली, तरीही आमच्याकडून चूक झालीच. बायकोला दिवस गेलेत. हे पहिलेच मूल असणार आहे; मात्र... आम्ही ऍबॉर्शन करायचा विचार करतोय. आमचेच खायचे वांदे आहेत त्यात ही भर. बायको विरोध करतेय पण पर्याय नाही. मी काय करू? मला काहीतरी मार्ग दाखवा...’’
हा वाचक काळा की गोरा हेही मला माहीत नव्हते. मी त्याला कधी भेटलोही नव्हतो. केवळ लेखक या नात्याने तो त्यांची इतकी वैयक्तिक गोष्ट शेअर करत होता. इतक्या नाजूक विषयावर सल्ला मागत होता. मला दोन क्षण काय बोलावे तेच सुचेना. स्वतःला सावरत मी म्हणालो, ‘‘हे बघ मित्रा, आता वेळ गेलीय. निसर्गाने त्याचे काम केलेय. बाळ जन्मण्याच्या आधीच त्याला मारणे हे केवढे मोठे क्रौर्य? कदाचित हे होणारे मुलच तुझा भाग्योदय घेऊन येईल. त्यात बायकोच्या मनाचाही विचार कर. तिला मातृत्वाची आस लागली असेल. आणखी कणखर हो. कठोर परिश्रम कर. तुझ्या वडिलांनी असा काही विचार केला असता तर तुझा जन्मच झाला नसता...’’
तो फोनवरच रडायला लागला. कितीतरी वेळ आम्ही बोलत होतो. सुदैवाने त्याने माझे ऐकले. बाळाचा जन्म झाला. पुढे आमची मैत्रिही झाली. बाळाचे नावही मीच सुचवले. ती मुलगी आता मॉन्टेसरीत जातेय. एक लेखक म्हणून यापेक्षा मोठे समाधान कोणते? लेखनाने जोडलेला हा गोतावळा माझ्यासाठी अनमोल आहे.
अगदी आत्ता आत्ताचा अनुभव. ‘अंतर्नाद’ हे मराठीतले एक दर्जेदार मासिक. भानू काळे यांच्यासारखा साक्षेपी संपादक असल्याने या मासिकाने अल्पावधितच साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना मी माझा अंक नियमितपणे भेट म्हणून पाठवायचो. एका चांगल्या संपादकाने आपला अंक वाचावा ही त्यामागची अपेक्षा. परवा मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या पोस्टमनने एक पत्र आणून दिले. ‘अंतर्नाद’चे पाकिट बघून मी उत्सुकतेने ते फोडले. आत मला लेखनासाठी शुभेच्छेबरोबरच भानु काळे यांच्यातर्फे पाच हजार रूपयांचा धनादेश होता. केवढी मोठी पावती ही! एका ज्येष्ठ संपादकाने दिलेली दाद कितीपटीने बळ वाढवत असेल, हे शब्दात सांगता येत नाही. बाहेर पडणार्‍या पावसाहून अधिक वृष्टी आता माझ्या मनात होत होती आणि आनंदाश्रूने डबडबलेले माझे डोळे नवसृजनासाठीची मशागत करत होते.
हा लेख लिहित असतानाच मीनल सासणे यांची एक मनीऑर्डर आलीय. कितीची? तर तीन हजार रूपयांची. कोण या सासणे? तर गोविंदराव पवार यांच्या कन्या! बरोबर ओळखलेत!! ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भगिनी. त्यांनी पुस्तकांसाठी म्हणून हे पैसे चक्क टपालाने पाठवलेत. मग वाचक नाहीत असे म्हणणे म्हणजे या सर्वांच्या प्रामाणिक भावनेचा केवढा मोठा अवमान? तो प्रमाद मी कधीच करणार नाही. हे आणि असे वाचक आहेत म्हणून आम्ही आहोत.
असे कितीतरी वाचक आपल्या आजूबाजूला आहेत. पुस्तकांवर, लेखकांवर ते भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच मराठी प्रकाशन व्यवहार सुरळीत चालू आहे. प्रकाशक आणि लेखक या दोन्ही नात्याने वाचकांचे जे उदंड प्रेम लाभते त्यामुळे मी भरून पावतो. हेच माझे भांडवल आणि सामर्थ्य आहे. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी असे वाचक मोठी भूमिका बजावत आहेत. त्या सर्वांविषयी मी कायम कृतज्ञ आहे. 

- घनश्याम पाटील
प्रकाशक, संपादक 
चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092