Saturday, August 6, 2016

लघुकथांचे लखलखते बेट

सध्याच्या काळात कथा हा साहित्यप्रकार नामशेष होत आहे, अशी अफवा पसरविणार्‍यांना प्रत्यक्ष आपल्या साहित्य कृतीतून सणसणीत चपराक देण्याचे काम समीर नेर्लेकर या ताकतीच्या कथाकाराने केले आहे. अगदी सुरूवातीच्या काळापासून कुणीही आणि कुणालाही ‘तुला एक गोष्ट सांगतो’ असे म्हटले की समोरचा माणूस गांभीर्याने कान टवकारतो. सांस्कृतिक मूल्य असणार्‍या कथा बालमने घडवतात. मोठ्यांना उभारी देतात. काहीवेळा हसवतात, काहीवेळा रडवतात! माणसांच्या जिवंतपणाचे रहस्यच जणू या दडलेल्या कथाबीजांमधून उलगडते. विविध आशयाच्या, विविध विषयाच्या अशा कथा समीर नेर्लेकर या प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून साकारल्या आहेत. ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह मराठी वाचकांची सांस्कृतिक भूक पूर्णपणे भागविण्याइतका सक्षम आहे, हे मला आनंद आणि अभिमानपूर्वक सांगावेसे वाटते.
समीर नेर्लेकर हे एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. कसलाही डांगोरा न पिटता, शेखी न मिरवता अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांचे जीवनानुभव समृद्ध आहेत आणि सातत्याने ते त्यांच्या लेखणीतून उतरलेही आहे. कवी, चित्रकार, कथाकार, पत्रकार, तंत्रज्ञ अशा विविध भूमिकातून कार्यरत असताना त्यांनी कधीही त्यांची नेकदिल वृत्ती सोडली नाही. ‘काय चांगले आणि काय वाईट’ यातील फरक सामान्य माणसाला निश्‍चितपणे कळतो; मात्र त्याची अभिव्यक्ती त्याला जमत नाही. अशा परिस्थितीत समाजातील विसंगतीवर नेर्लेकर नेमकेपणाने बोट ठेवतात. नेर्लेकरांच्या कथा वाचल्यानंतर कथा या साहित्य प्रकाराला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झालीय, हे सांगण्यासाठी कुण्या ठोकळेबाज विचारसरणीच्या समीक्षकाची गरज नाही.
‘एमरल्ड ग्रीन’ या शीर्षककथेतील रहस्य मानवी वृत्तीच्या पैलूंवर प्रकाश टाकते. समाजात जे काही अनिष्ट चाललेले आहे ते संयमित शब्दांत अधोरेखित करताना लेखक एका अतिउत्साही सामान्य माणसाच्या आयुष्याची झालेली जीवघेणी फरफट मांडतात. कथांचा रहस्यमय, गूढ आणि अनपेक्षित शेवट करण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय आहे. नेर्लेकरांची एक स्वतंत्र शैली आहे आणि त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवण्यात ते वाकबगार आहेत. त्यांच्या कथा सोप्या आणि संवादी भाषेेत असल्याने कुणालाही कंटाळवाण्या वाटत नाहीत. प्रत्येक कथेतून एक सामाजिक संदेश देतानाच ते पोटतिडकिने सामान्य माणसाची वकिली करतात, त्यांचे दुःख समर्थपणे मांडतात. ‘व्यवहार’, ‘निरोप’, ‘परपुरूष‘, ‘लंगडा घोडा’, ‘कॉकटेल पार्टी,’ ‘रेड कार्पेट‘, ‘म्हातारीची फणी‘, ‘डोह’ अशा सर्वच कथा त्यादृष्टिने बोलक्या ठरतील.
कॉकटेल पार्टीचे निमंत्रण मिळूनही ‘पेशल कटिंग’ने तृप्त होणारा शरद नगरकर, मालकशाहीच्या फसवणुकीला बळी पडलेला कामगार, विशिष्ट आजारामुळे मुलांकडूनच्या निरोपाची वाट पाहणारी आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारी वाढत्या वयातील मुलगी, आपल्या प्रेमाची प्रतारणा करून ‘नवरा’ नावाच्या एका परपुरूषाबरोबर जाणारी स्त्री, अंगी असलेल्या प्रामाणिकपणामुळे स्त्रीचा गैरफायदा न घेणारा अ‘व्यवहारी’ पुरूष, माणूस होण्याची इच्छा बाळगून रात्र संपली की क्षितिजावर परतणारा आणि पहाट होण्याची वाट पाहणारा सूर्य या सार्‍यातून मानवी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समीर नेर्लेकर यांनी प्रभावीपणे मांडले आहेत.
एकेकाळी सुप्रसिद्ध कथाकार ह. मो. मराठे यांनी अनेक ‘कामगार कथा‘ लिहिल्या होत्या. सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ‘कंपनी कामगार‘ नाममात्र राहिला आहे. कामगार संघटना, बंद, संप असे काही फारसे जोमात दिसत नाही. मालक आणि कामगार संघटनांच्या पुढार्‍यांचे संबंध बर्‍यापैकी सुधारल्याने कामगारांच्या अडचणी मांडणार्‍या कथाही खूप कमी झाल्या आहेत. अशा काळात समीर नेर्लेकर यांनी ‘लंगडा घोडा‘ या कथेद्वारे कामगारांचे होणारे शोषण, त्यांचा घेतला जाणारा गैरफायदा नेमकेपणाने मांडलाय.
‘रेड कार्पेट‘ आणि ‘उपसंपादक पाहिजे‘ या दोन कथांमधून सध्याच्या साहित्य, संस्कृती व्यवहाराचे आणि पत्रकारितेचे त्यांनी अक्षरशः वाभाडे काढले आहेत. कवी मोहन भारद्वाज याची होणारी घुसमट आणि त्याने महानगराचा घेतलेला अनुभव त्याच्या आत्मस्वरूपी भाषेत नेर्लेकरांनी शब्दबद्ध केलाय. तो वाचताना कोणत्याही सच्च्या साहित्यप्रेमीच्या डोळ्याच्या कडा ओलावतील. ‘आपली स्वतःची ओळख गुणवत्तेच्या जोरावर निर्माण करावी‘ असे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका संवेदनशील कवीचे आत्मकथन त्यांनी मोठ्या खुबीने या कथेद्वारे मांडले आहे. स्वतःच्याच नावाने विद्यापीठ काढून ‘सबकुछ‘ भूमिका पार पाडणारे ठक असतील किंवा गटातटाचे राजकारण करणारी काव्यमंडळे, ‘कविता कसल्या करताय, कवितेनं पोट भरतं का?‘ असा खुळचट सवाल करणारे प्रकाशक, थेट ‘बिझनेस‘चीच विचारणा करणारे प्रकाशक, नवोदितांनी कविताच करू नयेत, असे म्हणून त्यांचे खच्चीकरण करणारे महाभाग या सर्वांचा समाचार ‘रेड कार्पेट’ या कथेद्वारे घेऊन नेर्लेकरांनी साहित्य क्षेत्र ढवळून काढले आहे. ‘या रेड कार्पेटखाली साचलेली धूळ मात्र कॅमेर्‍यातून दिसत नाही’ या वाक्याने कथेचा शेवट करताना या क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने धडपडणार्‍यांचा आक्रोश व्यवस्थेवर घाव घालतो.
‘उपसंपादक पाहिजे‘ ही या संग्रहातील एक धमाल कथा. जिल्हा आणि तालुका स्तरावरील अनेक वृत्तपत्रात दिसणारे चित्र त्यांनी ज्या ढंगाने मांडले आहे ते खरोखरी लाजवाब आहे. अनेक वर्षे पत्रकारितेत काढल्याने अगदी बारीक सारीक गोष्टींचे निरीक्षणही समीर नेर्लेकर यांच्यातील लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. रद्दीच्या दुकानापासून प्रगती करत, जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या दै. गडगडाट या वृत्तपत्राचे  मालक बनलेल्या सुभानरावांच्या रूपाने त्यांनी मराठी पत्रकारितेचा  खरा चेहरा दाखवून दिला आहे. आचार्य अत्रे यांनी सांगितले होते की, ‘‘वृत्तपत्र हा धंदा आहे आणि पत्रकारिता हा धर्म! एकवेळ धंद्याचा धर्म करा; पण धर्माचा धंदा होऊ देऊ नकात!’’ नेमके आज तालुका पातळीवर आणि अनेक ठिकाणी जिल्हा स्तरावरही छोट्या वृत्तपत्रांनी पत्रकारिता धर्माचा जो धंदा करून ठेवलाय ते त्यांनी उद्वेगी वृत्तीने आणि विनोदी शैलीने मांडले आहे. या क्षेत्रातील अनेक हौशी पत्रकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम समीर नेर्लेकर यांनी केले आहे. माध्यमातील प्रतिनिधी, पत्रकारितेचे विद्यार्थी आणि सामान्य वाचकांनाही ही कथा वाचताना हास्यरसाचा आनंद घेता येईल.
‘प्लँचेट’च्या माध्यमातून मृतात्म्याशी संवाद साधू पाहणार्‍यांचा खुळचटपणाही त्यांनी अशाच विनोदी शैलीने हाणून पाडलाय. एखादी कल्पना डोक्यात घुसल्यानंतर माणूस कसा अस्वस्थ आणि हतबल होतो हे त्यांनी मार्मिकपणे या कथेतून मांडले आहे.
‘म्हातारीची फणी’ ही कथाही आपल्याला जीवनाचे सार सांगून जाते. गीता, कुराण, बायबल असे धर्मग्रंथ वाचून जे तत्त्वज्ञान सहजासहजी मिळणार नाही ते या कथेतून मिळते. ‘स्वरूप शोधा, विश्‍वरूप आपोआप गवसेल’ हे आचार्य विनोबाजींचे तत्त्वज्ञान इतक्या सहजपणे कथेच्या
माध्यमातून मांडणारे समीर नेर्लेकर मराठी कथाविश्‍वाच्या प्रवासातील एक लखलखते शिखर ठरतील.
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे (७०५७२९२०९२)
पाने : ७२, मूल्य : ७५ 
घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
 

Saturday, July 30, 2016

काळजातील ढगफुटी

एक नेते विधानसभेवर निवडून आले. त्यांनी पार्टी द्यावी असा आग्रह काही पत्रकार मित्रांनी धरला. ते पार्टी टाळायचे. ‘‘बघूया, पैसे जमले की जाऊ,’’ असे सांगून सुटका करून घ्यायचे. शेवटी त्यांनी पत्रकारांना पार्टीला नेलेच. ते म्हणाले, ‘‘मित्रांनो, हवं ते पोटभर जेवा.’’ त्यांनी वेटरला सांगितलं, ‘‘इनको जो जितना चाहिए, वो दे दो।’’ थोड्या वेळात ते उठले. हॉटेलच्या मॅनेजरजवळ गेले आणि पत्रकारांकडे न येता सरळ बाहेर पडले. पत्रकारांना आश्‍चर्य वाटलं. त्यांची जेवणं संपत आली होती. ते आईस्क्रिम वगैरे सांगण्याच्या बेतात होते. तेवढ्यात ते घाईघाईतच आले आणि म्हणाले, ‘‘मित्रांनो माफ करा थोडा उशीर झाला. मध्येच सोडून जावं लागलं.’’
पत्रकारांनी विचारलं ‘‘कशासाठी?’’
ते म्हणाले, ‘‘कशासाठी म्हणजे फार महत्त्वाचं नव्हतं पण जावं लागलं.’’
पत्रकारांनी पुन्हा विचारलं, ‘‘पण कशासाठी?’’
ते म्हणाले, ‘‘त्याचं काय झालं. जेवणाचं बिल किती येईल याचा अंदाज मला येत नव्हता. मेन्यूकार्ड वाचल्यानंतर थोडा अंदाज आला होता. खात्री करावी म्हणून मॅनेजरकडे गेलो. त्यालाच बिलाचा अंदाज विचारला. मग लक्षात आलं की, एवढे पैसे आपल्याकडे नाहीत. चटकन बाहेर पडलो. टॅक्सी केली आणि आमदार निवास गाठलं. एकाकडून हातउसणे घेतले आणि आलोय; पण तुम्ही पोटभर जेवा. काळजी करू नका. आपल्याकडे आता भरपूर पैसे आहेत.’’
नंतर त्यांनी घाईगडबडीत दोन-चार घास खाल्ले. कदाचित त्यांचं टेन्शन वाढलं असावं. आपण अधिक जेवलो तर अधिक बिल वाढेल याची काळजी त्यांना वाटली असावी...
वाचकांच्या एव्हाना हा नेता लक्षात आला असेलच. सध्याच्या बरबटलेल्या काळात इतका प्रामाणिक आणि निर्मळ मनाचा नेता आर. आर. आबांशिवाय दुसरा कोण असू शकेल? हा आणि असे काळजाला भिडणारे कितीतरी किस्से अंत:करणापासून लिहिले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी. त्यांचे ‘काळजातले आर. आर. आबा’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीचे प्रकाशक गुलाबराव कारले यांनी दर्जेदाररित्या प्रकाशित केले आहे.
आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पुजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. आर. आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीवालेही त्याला अपवाद ठरले नाहीत. स्वच्छ चारित्र्याचे आबा राष्ट्रवादीवाल्यांना कधी कळलेच नाहीत. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता हरपला अशी आवई देताना त्यांचा एकही गुण घेतलाय असे वाटत नाही. म्हणूनच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, राजकीय अभ्यासकांनी, पत्रकारांनी आणि मुख्य म्हणजे ज्यांचा चांगुलपणावर विश्‍वास आहे अशा सर्वांनीच उत्तम कांबळे यांनी लिहिलेले आबांचे हे चरित्र वाचलेच पाहिजे. यातून आर. आर. पाटील आणि उत्तमराव कांबळे या दोघांचेही चरित्र आणि चारित्र्य दिसून येते.
आबांची आणि उत्तम कांबळे यांची जवळपास चाळीस वर्षांची मैत्री. कांबळे लिहितात, ‘माझं दारिद्र्य वाटून घेणारे, माझं दु:ख वाटून घेणारे, माझं कष्ट वाटून घेणारे, माझ्या घामाचे कौतुक करणारे आणि लिहायला, बोलायला साधेपणानं पण स्वाभिमानानं जगायला शिकवणारे मित्र म्हणजे आबा. त्यांच्याविषयी लिहिताना आठवांची ढगफुटी झाली.’
या ढगफुटीत कांबळे यांच्या काळजातले आबा तर दिसतातच; पण आबांचे काळीजही तितक्याच ताकतीने वाचकांसमोर येते. शालेय जीवनात उत्तम कांबळे यांना मदत म्हणून त्यांच्यासोबत रोजंदारीने जाणारे आबा, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभव पचवणारे आबा, दारिद्र्याच्या मगरमिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे आबा, एकाहून एक गब्बर शत्रू असताना यश खेचून आणणारे आबा, अंजनीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आबा, व्यसनमुक्तीपासून ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापर्यंत विविध चळवळीत अग्रेसर असणारे आबा, धनदांडग्यांचा विरोध झुगारून देत डान्सबार बंदीसारखे निर्णय घेणारे आबा, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री झालेले आबा ही सगळी रूपे वाचताना त्यांच्या आठवणीने गलबलून येते.
सध्याच्या नेत्यांची विशेषत: राष्ट्रवादीवाल्यांची कोटीच्या कोटी उड्डाणांची चर्चा माध्यमातून सुरूच असते. त्यात आर. आर. आबांच्या झेडपीच्या निवडणुकीचा किस्सा वाचताना कुणालाही शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण येईल. आबांचे पोलीस खात्यात असलेले सख्खे भाऊ राजाराम यांनी कांबळे यांना सांगितलेला एक किस्सा या पुस्तकात आला आहे. आजच्या काळातील राजकारणाचे चित्र पाहता कुणालाही त्याचे आश्‍चर्य वाटेल. त्याचं झालं असं, झेडपीची निवडणूक लढण्याचं ठरलं तेव्हा आबा गांधी होस्टेलमध्ये राहत होते. ही बातमी सांगण्यासाठी ते सायकलीवरूनच शांतीनिकेतनमध्ये आले. तिथे राजाराम अकरावी-बारावीत शिकत होते. आबा त्यांना म्हणाले, ‘‘हे बघ राजाराम, सावळजमध्ये झेडपीसाठी मी निवडणूक लढवावी असा खूप दबाव येतोय. दादांकडून (वसंत दादा) निरोप येतोय. काय करूया?’’ राजाराम चटकन म्हणाले, ‘‘आबा आपण निवडणूक लढवू शकणार नाही.’’ आबांनी त्याचं कारण विचारल्यावर राजाराम म्हणतात, ‘‘अरे दादा, ग्रामपंचायतीत आपली थकबाकी आहे. ती भरल्याशिवाय नो ऑब्जेक्शन मिळत नाही.’’ आबांनी ‘थकबाकी किती आहे’ असे विचारले.
‘‘किती? अरे तेवीस रूपये थकबाकी आहे. कशी भरणार ती? पैसे कुठंयत आपल्याकडं?’’ राजारामानी प्रतिप्रश्‍न केला. आबा शांतपणे म्हणाले, ‘‘ज्यांनी उभं करण्याचा आग्रह धरला आहे. ते भरू शकतात. तो काही खूप मोठा विषय नाही. विषय वेगळाच आहे. मी जर राजकारणात उतरलो तर नोकरीधंदा काही करू शकणार नाही. राजकारणात मी काही मिळवायला निघालो नाही. घरी कमवणारं कोणी नाही. बाबाही हयात नाहीत. मी राजकारणात उतरलो तर घर सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मला त्यात गृहीत धरू नये. माझ्याकडून तुम्हाला काहीच मिळणार नाही. घर सांभाळायचं तर राजकारणात उतरता येणार नाही. राजकारणात उतरायचं तर मला काही कमावता येणार नाही. विषय गंभीर आहे म्हणून तुला इथं आणलं आहे.’’
यातून आबांच्या चारित्र्याची कल्पना सहजपणे येते. महत्त्वाचे म्हणजे म. द. हातकणंगलेकर सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी आबांची तळमळ आणि त्यांनी केलेली प्रचंड धडपड या पुस्तकात आली आहे. मुंबईहून हेलिकॉप्टरनं निघताना उत्तम कांबळे यांच्यासाठीि स्वत: आबांनी केलेला चहा, मदंना काहीही करून साहित्य संमेलनाध्यक्ष कराच अशी घातलेली गळ यातून त्यांची गुरूभक्ती दिसून येते. सांगलीच्या साहित्य संमेलनात, सगळ्यांचा कडवा विरोध झुगारून देत उत्तम कांबळे यांच्यासारख्या प्रगल्भ संपादकास आणि दिलदार मित्रास दिलेले स्वागताध्यक्ष पद यावरही कांबळेंनी प्रकाश टाकलाय. एकंदरीत साहित्य संमेलन निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजकीय हस्तक्षेप कसा होतो याची थोडक्यात झलकच या पुस्तकातून दिसून येते. केवळ आर. आर. पाटील यांच्यासारखा अत्यंत प्रामाणिक नेता प्रतिभावंत संमेलनाध्यक्ष व्हावा यासाठी धडपडत असतो.
हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर वाचक ते खाली ठेवणार नाहीत. हृदयाला भिडणारे प्रसंग, ओघवती भाषा, आबांसारखं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवताना थेट काळजातून आलेले शब्द हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. सुप्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले असून प्रकाशकांनी पुस्तकात आबांच्या काही रंगीत चित्रांचाही समावेश केला आहे. उत्तम कांबळे आणि आर. आर. पाटील यांच्या मैत्रिचा सुगंध या पुस्तकातून दरवळतोच; मात्र वाचकांना अंतर्मुखही करतो.

प्रकाशक : सुरेश एजन्सी, पुणे (020-24470790)
पाने : 87
मूल्य : 120

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, July 16, 2016

शंभरीच्या तरूणाची लेखनगाथा

‘वय देहाला असतं मनाला नाही. मनानं तरूण असणारी माणसं कधीच वृद्ध होत नाहीत. जीवन सुरेल आहे, आपल्याला ते सुरात गाता आलं पाहिजे. जग सुंदर आहे, डोळ्यात जीव ओतून ते पाहता आलं पाहिजे. नाविन्याच्या खिडक्या उघड्या ठेवून जगत गेलं की जगण्याचं कधी ओझ होतं नाही...’
असं कोण म्हणतयं? तर वयाच्या शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले दुर्गानंद गायतोंडे! कोण हे गायतोंडे? तर ते लेखक आहेत. 29 मार्च 1919 चा त्यांचा जन्म. जन्मस्थळ हुबळी. कराची आणि मुंबईतून त्यांनी एम. ए., एल. एल. बी. केलं. केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर नोकरी केली. ब्रिटिश, डच आणि अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यात  बर्‍याच वरच्या हुद्यावर त्यांनी नोकरी केली. त्यानिमित्त नागपूर, सिमला, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि दुर्गापूर येथे त्यांचे वास्तव्य होते. 1980 ला ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर शांत बसतील ते गायतोंडे कसले. त्यांनी देशातल्या अनेक कंपन्यात व्यवस्थापक आणि कामगारांसाठी कार्यशाळा घेतल्या. त्याकाळात त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली. वयाच्या नव्वदीनंतर त्यांना मराठी पुस्तके लिहिण्याची प्रेरणा झाली. मग त्यांनी लेखन, समाजकार्य, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण आणि आर्थिक मदत, अध्यात्म क्षेत्रात संशोधन चालू ठेवले. या आदर्श कर्मयोग्याची वयाच्या नव्वदीनंतर मराठीतील चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
विषयांची विविधता, अभ्यासपूर्ण लेखन आणि थेट भिडणारी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वेगळेपण. म्हणूनच ‘वय देहाला असतं, मनाला नाही’ असं ते ठामपणे सांगू शकतात. साहित्यात वय, जात, धर्म, प्रांत असे निकष नसतात. ते असूही नयेत; मात्र दुर्दैवाने असे घटक प्रकाशन क्षेत्रात आल्याने हे क्षेत्र काळवंडत चाललं आहे. अशा परिस्थितीत दुर्गानंद गायतोंडे यांच्यासारख्या लेखकांचा आदर्श नवोदितांनी घ्यायला हवा.
गायतोंडे यांच्या पुस्तकांच्या शीर्षकावरूनही त्यांच्या लेखन सामर्थ्याचे वैविध्य सहजपणे ध्यानात येईल. ‘सुंदरा मनामध्ये भरली,’ ‘आभास’, ‘विनोदाच्या फुलझड्या’, ‘गूढ’, ‘कवडसे’, ‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’, ‘ओंकारमय व्हा’, ‘भावलेल्या व्यक्ती’, ‘थरार’, ‘अंतरीच्या नानाकळा’, ‘पुनर्जन्मा ऐक तुझी कहाणी’, ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ ही त्यांची काही पुस्तके! हा सर्व संच पुण्यातील ‘उत्कर्ष प्रकाशन’च्या सुधाकर जोशी यांनी आत्मियतेने प्रकाशित केला आहे. गायतोंडे यांच्यासारखे ज्येष्ठ आणि अनुभवी लेखक व ‘उत्कर्ष’सारखी मान्यवर प्रकाशन संस्था यामुळे मराठीत सकस साहित्याची भर पडली आहे.
गायतोंडे म्हणतात, ‘मी संशोधनाचा भोक्ता आहे. आपल्याकडे सर्व शास्त्रात आणि विज्ञानात सतत संशोधन चालू असतं; पण अध्यात्मात तसं काही दिसून येत नाही. एखादा अपवाद असेलही; पण त्याने जे काही निष्कर्ष काढले असतील ते माझ्या वाचनात आले नाहीत.’
‘‘सत्ययुगात हनुमानाची अनेक देवळे आणि हजारो भक्त होते. द्वापारयुगात देवही कमी झाले आणि भक्तही कमी झाले आणि आता कलियुगात तर कहरच झाला. नावापुरतीच देवळं उरली आणि नावापुरतेच भक्त राहिले आहेत. परवा रात्री तर एक चोवीस वर्षांची मुलगी देवळात आली आणि मला म्हणाली, हाय हनु!’’ अशी हनुमानाची आत्मनिवेदनात्मक दंतकथा सांगत गायतोंडे यांनी समाज किती बदलला आहे. हे दाखवून दिले आहे. त्यातूनच त्यांनी ‘पुनर्जन्मा, ऐक तुझी कहाणी’ आणि ‘संशोधनात्मक ओंकारमय व्हा’ ही पुस्तके लिहिली. त्यांनी 56 प्रश्‍नांची उत्तरे 35 व्यक्तिंकडून घेतली आणि त्याचे निष्कर्ष त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. ‘वयानुसार डोळे साथ देत नसले तरी ही ‘ओम’ची श्रद्धा आहे’ असे त्यांना वाटते.
त्यांच्या ‘आभास’ या पुस्तकाचे मनोगत तर प्रत्येक नवोदित लेखकाने पुन्हा पुन्हा वाचायला हवे. यात त्यांनी नवशिक्या लेखकांची आणि प्रकाशकांची कथा व व्यथा प्रांजळपणे मांडली आहे. नव्वदीनंतरही मराठी प्रकाशकांचे त्यांना दुर्दैवी अनुभव आले. मराठी भाषेच्या संवर्धनाचा ठेका आपणच घेतलाय अशा अविर्भावात मिरवणार्‍या पुण्या-मुंबईतील प्रकाशकांना दुर्गानंद गायतोंडे यांनी दिलेली ही सणसणीत चपराकच आहे. ‘एक वर्ष बिझी आहोत’,  ‘पु. ल. देशपांड्यांचं पुस्तक हाती घेतलं आहे; नंतर आपलंच घेऊ’,  ‘तुम्ही पुस्तक दिलं होतं हे आठवतचं नाही’,‘या वर्षाचे कॅलेंडर भरले आहे. तुम्ही जानेवारीत येता का?’,  ‘प्रकाशन हा आमचा जोडधंदा आहे. त्यामुळे पैसे दिले तर पुस्तक करू’ ही व अशी सगळी उत्तरे त्यांना वयाच्या नव्वदीनंतर ऐकायला मिळाली. मग त्यांची गाठ पडली ‘उत्कर्ष प्रकाशन’च्या सुधाकर जोशी यांच्याशी. जोशीकाकांनी मात्र प्रकाशकांच्या या उर्मटपणाला अपवाद ठरत गायतोंडे यांची पुस्तके सुबकरित्या प्रकाशित केली आहेत.
‘भावलेल्या व्यक्ती’ या पुस्तकात त्यांची 62 वर्षांची सहचरी मीरा,  राजदूत आप्पासाहेब पंत, महात्मा गांधींच्या निकटच्या सहकारी सुशिला पै, उत्तम आणि मिश्किल शिक्षक बापू प्रभावळकर, परिस्थितीवर मात करणारी शरयु कुंटे, चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसरचा एका बाईने केलेला अंध:पात अमरसिंग, मालकाच्या घरात स्वत:चं बाळंतपण करणारी कुमारिका शेवंता माळी आणि इतर चार जणांचा समावेश केला आहे. ‘कवडसे’ या पुस्तकातही भारताचे न्यायमूर्ती यशवंत चंद्रचुड, कुमार गंधर्वांची पहिली पत्नी भानुमती कोमकल्ली, असंख्य लोकांचे श्रद्धास्थान माताजी निर्मला देवी, सी. पी. आयचे जनरल सेक्रेटरी ए. बी. बर्धन, आंतरराष्ट्रीय कंपनी नीतीचे सर्वेसर्वा एच. प्रॅट आणि इतर चार जणांची ओळख करून दिली आहे.
कथा, रहस्यमय कादंबरी, विनोदी लेख, गूढ लेखन, संशोधनात्मक, अध्यात्मिक, व्यक्तिचित्रणात्मक अशा चौफेर विषयांवर सशक्तपणे लेखणी चालविणार्‍या दुर्गानंद गायतोंडे यांचा पुण्याच्या महापौरांच्या हस्ते सत्कार झाला आहे. शारदा ज्ञानपीठ आणि सिक्कीमच्या राज्यपालांनीही त्यांचा गौरव केला; मात्र इतके मोठे योगदान देऊनही आपल्या राज्यसरकारला त्यांचा विसर पडलेला दिसतोय. फुटकळ लेखकांना अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार देऊन गौरविणार्‍या वशिलेबाज सरकारने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थांनी त्यांची दखल घ्यावी असे वाटते.
दुर्गानंद गायतोंडे यांच्याकडे पाहून व्यक्तिश: मला लोककवी मनमोहन नातू यांची आठवण येते. प्रतिभावंतांची उपेक्षा हा विषय युगानुयुगे चालतच आलेला आहे. त्या प्रवृत्तीला फटकारताना मनमोहन म्हणाले होते, ‘उद्याचा कालिदास अनवाणी पायाने जात असेल; तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’  शंभरीच्या घरात असलेल्या आणि मुख्य म्हणजे अजूनही लिहिते असलेल्या दुर्गानंद गायतोंडे यांची दखल किमान आपल्याकडील साहित्य संस्थांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वयाची बंधने झुगारून देत आजही अखंडपणे साहित्यसेवा करत असल्याबद्दल गायतोंडे यांचे अभिनंदन करतो.
(दुर्गानंद गायतोंडे यांच्या सर्व मराठी पुस्तकांसाठी संपर्क ‘उत्कर्ष प्रकाशन’ पुणे-9822410037)

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

राष्ट्रवादीची ‘रसिक’ता!

विविध क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या पूजनीय आणि ऋषितुल्य व्यक्तिंच्या कार्याचा वसा नवीन पिढीसमोर यावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूजन गौरव सोहळ्याचे आयोजन करते. यंदाच्या ‘गुरूजन’ सोहळ्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. शरद हर्डीकर, कायदेतज्ज्ञ भास्करराव आव्हाड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘गुटखाकिंग’ रसिकलाल धारिवाल यांची निवड केली आहे. या सगळ्या मान्यवरात धारिवालांचे नाव घुसडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्याच्या साहित्य संमेलनात ‘गुटखावाल्याची देणगी नको’ म्हणून धारिवालांचे वीस लाख रूपये परत करण्यात आले होते. त्याच शहरात त्यांचा ‘गुरूजन’ म्हणून सत्कार होणे क्लेशकारक आहे.
आपल्या ‘कार्यकतृत्वाने’ विख्यात असलेले पुण्यातील नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. लोकसभा निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजेच एनसीपी ही ‘नॅशनल करप्ट पार्टी’ असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. मोदी यांच्या या विधानातील सत्यता अनेकवेळा सिद्ध होऊनही पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत या पक्षाचे प्राबल्य आहे याला काय म्हणावे? श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे म्होरके असलेले शरदराव पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मुळात बाबासाहेब इतिहास संशोधक, अभ्यासक अथवा शिवशाहीर नाहीत असे राष्ट्रवादीवाले बेंबीच्या देठापासून ओरडत सांगत असतात. याच बाबासाहेबांचाही यापूर्वी राष्ट्रवादीने अशाच गुरूपौर्णिमेनिमित्तच्या सोहळ्यात ‘गुरूजन’ म्हणून सत्कार केलेला आहे. यापूर्वी बाबासाहेबांसह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ विजय भटकर, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, दाजीकाका गाडगीळ यांचा गौरव राष्ट्रवादीने केला आहे. यातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात हिमालयाच्या उंचीची! त्या जोडीला आता रसिकलाल धारिवाल यांच्यासारख्या गुटखाकिंगचे नाव जोडल्याने राष्ट्रवादीची मूळ प्रवृत्तीच दिसून येते.
कोणी कोणता व्यवसाय करावा याला आपल्याकडे बंधने नसली तरी ‘माणिकचंद’सारख्या गुटख्याने अनेकांच्या आयुष्याचे मातेरे केले आहे. ज्या पक्षाचे स्थानिक नेते या सोहळ्याचे आयोजन करत आहेत त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना म्हणजेच शरद पवार यांनाही या गुटख्याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभरच्या व्यग्रतेत अनेकवेळा हा गुटखा चघळण्याची सवय असल्याने त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला. सुदैवाने योग्य उपचार झाल्याने कॅन्सरमुळे माणूस ‘कॅन्सल’ होत नाही हे त्यांच्याबाबत दिसून आले; मात्र दुर्दैव हे की याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आपल्या कार्यकतृत्वाची प्रामाणिक छाप उमटविणारे आर. आर. तथा आबा पाटील यांचा कॅन्सरने बळी घेतला. असे सगळे असताना एखाद्या ‘गुटखाकिंग’चा ‘गुरू’ म्हणून सत्कार करणे हे कुणालाही न पचणारे आहे.
गुटख्यासारख्या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात आणि प्रसंगी त्यात जीवही जाऊ शकतो इतकी अक्कल रसिकलाल धारिवाल यांच्यासारख्या लोकांकडे बघून येते; म्हणूनही त्यांची या गौरव सोहळ्यासाठी निवड केली असावी. हा ‘बोध’ देणारे धारिवाल राष्ट्रवादीसाठीच नव्हे तर समाजासाठीही गुरूच म्हणावे लागतील!! राष्ट्रवादी भ्रष्टवादी झालाय (किंवा सुरूवातीपासूनच आहे) हे सत्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही. छगन भुजबळ, अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे अशा नेत्यांकडे बघितल्यास त्याची प्रचिती यावी. महाराष्ट्रातील ‘पॉवर’फूल पक्ष म्हणून अनेकजण राष्ट्रवादीकडे बघतात. त्यामुळे अशा धनदांडग्यांचा गुरूही ‘गब्बर’च असायला हवा. रसिकलाल धारिवाल यांच्या गौरवाने ही बाब अधोरेखित झाली आहे.
यशवंतराव चव्हाणांसारख्या लोकनेत्यासोबत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणार्‍या शरद पवार यांनी साबरमती आणि बारामती या दोन्ही संस्कृतींचा परिचय वारंवार घडवून दिला आहे. ‘मुँह में राम बगल में छुरी’ अशा प्रवृत्तीच्या मंडळींचाच या पक्षात भरणा आहे. सत्तेत असताना आणि नंतरही अनेक ठिकाणी, अनेक प्रकरणात राष्ट्रवादीची भ्रष्टवादी वृत्ती दिसून आलेली आहे. विजय मल्ल्या, शशी थरूर अशा लोकांची मैत्री एकेकाळी अभिमानाने मिरवणारे शरद पवार रसिकलाल धारिवालसारख्या गुटखाकिंगवर कौतुकाचा वर्षाव करताना कचरणार नाहीत. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे काही ‘सुविद्य’ आमदार त्यांची तळी उचलायला सोबत आहेतच.
पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे. विद्येचे माहेर घर असा या शहराचा लौकिक आहे. राजकीय उलथापालथी, घोटाळे, भ्रष्टाचार, अरेरावी, दादागिरी, जुलूमशाही हे सगळे सगळ्याच पक्षात थोड्याफार प्रमाणात चालते; मात्र आपण सांस्कृतिक क्षेत्रात किती भरीव योगदान देतोय हे दाखविण्यासाठी साहित्य संमेलनात लूडबूड करणे, साहित्य संस्थांच्या कारभारात दखल घालणे, सांस्कृतिकतेच्या नावावर माणिकचंदच्या रसिकलाल धारिवाल यांचा ‘गुरू’ म्हणून गौरव करणे हे सारेच या शहराच्या प्रतिमेला कलंकित करणारे आहे. भटकर, माशेलकर, पुरंदरे यांच्या बरोबरीने धारिवालचा इतिहास गिरवावा लागणे यापेक्षा शरमेची बाब कोणती असू शकते?
अशा अनेक कारनाम्यांमुळे देशात आणि राज्यात राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांना धूळ चाखावी लागली आहे. या नैराश्येतून शरद पवार यांच्यासारखे जबाबदार नेतेही सुटले नाहीत. हातची सत्ता गेल्यानंतर वेळोवेळी त्यांनी जी बालिश विधाने केली ती उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलीच आहेत. त्यांच्याच संस्कारात वाढणारे शहरातील नेते त्यांचाच कित्ता गिरवत अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ हे मोदींचे स्वप्न पूर्ण होईल की नाही हे आम्हास ठाऊक नाही; पण राष्ट्रवादीच्या अशा अनेक ‘पराक्रमा’मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मात्र बुडण्याच्या मार्गावर आहे हे या सर्वातून लख्खपणे दिसून येत आहे. 

-घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, July 9, 2016

समाजमनाचा आरसा

लेखक - विनोद श्रा. पंचभाई
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)
पाने - 120, मूल्य 120


माणूस निर्भय आणि निर्मळ असेल तर त्याचे विचार निश्‍चितपणे प्रकाशमार्गी असतात. जे जगतो, जसं जगतो तसं बिनधास्तपणे कागदावर उतरवणारे लेखक कमी होत चाललेत. विनोद श्रा. पंचभाई हे अशा अपवादभूत लेखकांपैकी एक आहेत. आपल्यावर रूसलेल्या प्रेयसीची समजूत काढत तिला अलगदपणे आपल्या कुशीत घ्यावे, तितक्याच सहजतेने सर्व मनोवृत्तीच्या वाचकांचा ते ठाव घेतात आणि त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. मुद्देसूद आणि ओघवत्या शैलीतील प्रभावी मांडणी, अधेमधे कविता, संत कबीरांचे दोहे, राष्ट्रसंत तुकडोजींच्या ओव्यांची साखरपेरणी यामुळे त्यांच्या लिखाणाला अवीट गोडी प्राप्त झाली आहे.
‘थोडं मनातलं’ हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह ‘चपराक’ने प्रकाशित केला आहे. परमेश्‍वर कुठे आहे, इथपासून ते जीवनातील रागलोभ, बालपण, सण-समारंभ, संस्कार आणि संस्कृती, गुरू-शिष्य, शेजारी, वाचनसंस्कृती अशा सर्व विषयांवरील चिंतन त्यांनी या लेखातून प्रकट केले आहे. हे लेख थेट काळजाला जाऊन भिडतात. विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीनही पातळ्यांवर यशस्वी झेप घेण्यासाठीचा संकल्प दृढ करतात. माणसाला हलवून सोडणारे आणि विचार करायला भाग पाडणारे हे साहित्य मनावर असलेले मणामणाचे ओझे कमी करण्यास मदत करते.
या पुस्तकातील लेख म्हणजे कुणा व्यास-वाल्मीकींची कवीकल्पना नाही. जीवनाच्या विविध टप्प्यांवर एका सामान्य माणसाला पडलेले, पडणारे प्रश्‍न त्यांनी पोडतिडिकेने मांडले आहेत. निकोप समाजनिर्मितीसाठी सामान्य माणसाला नेहमी काही ना काही प्रश्‍न पडायला हवेत आणि त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा त्याने प्रयत्नही करायला हवा! विनोद पंचभाई यांनी एका वेगळ्या पातळीवर मानवी मनाचा झालेला गुंता या पुस्तकात ठामपणे मांडलाय.
आपले मन कठोर करणे, मोह टाळणे हे आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे असे सांगणारे पंचभाई म्हणतात, तुमच्या कुटुंबावर तुमचे मनापासून प्रेम असेल तर अनावश्यक मोह टाळा! येणारी संभाव्य संकटे टाळायची असतील तर स्वतः व्यसनापासून दूर रहा आणि इतरांनाही त्यासाठी परावृत्त करा. माणसातील देव कुणालाही दिसत नसल्याची खंत व्यक्त करून ते अपेक्षा व्यक्त करतात की तो कधीतरी म्हणेल, ‘तुझमे रब दिखता है....!’
पंचभाईंच्या लेखनात कधी त्यांच्यातला सुहृदयी देशभक्त डोकावतो, कधी प्रेमळ पिता दिसतो, कधी एखादा समाजसेवक, तत्त्ववेत्ता आढळतो, प्रबोधनाची मशाल हाती घेऊन अंधार्‍या राती गस्त घालणारा जागल्या दिसतो तर कधी उफाळलेल्या सात्विक संतापातून ‘माणूस खरंच बुद्धिमान प्राणी आहे का?’ असा सवाल करणारा सामान्य माणूसही दिसतो. मात्र या प्रत्येक लेखात त्यांनी आशावादाचे बीज पेरलेय. कसदार धान्याची टपोरी कणसं देण्यासाठी आधी एखाद्या बीयाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं, हे जगरहाटीचं सूत्र त्यांना कधीचच कळून चुकलंय.
या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, ‘‘आज नेते-अभिनेते न होता खर्‍याअर्थाने ‘जेते’ व्हा. कुठल्याही भोंदूबाबाला आदर्श न मानता ज्यांनी तुम्हाला हे जग दाखवले त्या स्वतःच्या आईबाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. जीवनात सच्चा आनंद मिळवण्यासाठी देवानंद न होता विवेकानंद व्हा. सुखरामकडे न बघता रामनामातच सुख शोधा!’’ शिवाय ‘जेते’ व्हा असे सांगतानाच त्यांनी एका लेखात ‘जगज्जेता’ सिकंदर ‘जाताना’ मात्र ‘मोकळ्या’ हातानींच गेला होता, याचीही आठवण करून दिलीय. पंचभाईंची हीच वस्तुनिष्ट भूमिका झापडबंद आयुष्य जगणार्‍या अनेकांना मात्र भानावर आणते.
‘बालपण देता का बालपण?’ या लेखातील टिंकूचे मनोगत तर प्रत्येकाला हेलावून सोडणारे आहे. आजोबांनी लहानपणी सांगितलेल्या स्वच्छंदी जगण्याच्या सुरस कथा ऐकून ट्विंकल तसे जगण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला खेळायला ना मैदान मिळते ना आईवडिलांचा पाठिंबा! सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी होत चाललेले असताना अशा अनेक ट्विंकल दुर्दैवाने गावोगावी दिसतात. ‘‘मलाही मनापासून वाटतं, आपण आपल्या आजोबांसारखं मनसोक्त मजेत भटकावं, खेळावं, खूप खूप मजा करावी, दमायला होईपर्यंत मैदानात पळावं. मग दूऽऽर जाऊन सूर्यास्त बघत बसावं. आपल्याला शोधत मग मम्मीनं आपल्याजवळ यावं, लाडानं आपल्याला जवळ घ्यावं, डोळे भरून तिनं माझ्या डोळ्यात बघावं, खरंच राहून राहून इतक्यात मला असं मनापासून वाटतंय!’’ हे टिंकूचे आत्मकथन वाचताना आपसूकच डोळे पानावतात. नव्या पिढीला आपण काय देतोय, याची आत्मजाणीव निर्माण होते. केवळ भाषेचे फुलोरे म्हणून या लेखांचे कौतुक नाही; तर समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम विनोद श्रा. पंचभाई यांनी ताकतीने केले आहे. हे लेख वाचून कित्येकांना नवी दृष्टी मिळेल. हरवलेली दिशा गवसेल! समाजातील विसंगती, दुटप्पीपणा, ढोंग याचा पर्दाफाश करण्यात पंचभाईंची लेखणी बर्‍यापैकी यशस्वी ठरलीय!
‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने गरीब, दुर्लक्षित, वंचित, वनवासी यांचे प्रश्‍न त्यांनी ठामपणे मांडले आहेत. शासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचारांमुळे मदतकार्यात येणारे अडथळे ते दाखवून देतात. चौफेर फटकेबाजी करणारी आणि विविध विषयांना स्पर्श करणारी त्यांची लेखणी वाचकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते.
‘प्रामाणिकपणा म्हणजे काय रे भाऊ?’ असे उपहासाने विचारतानाच ते इथल्या व्यवस्थेचे बुरखे टरटरा फाडतात. ‘उनकी बेईमानीमे आप पुरी इमानदारी से साथ निभाओ’ अशा परिस्थितीमुळे मनात नकळत ठिणगी पेटायला लागते पण आपल्यासमोरील अनेक मजबुरीमुळे त्याचे भडक्यात रूपांतर होत नाही, इकडे ते जाणीवपूर्वक लक्ष वेधतात. ‘घेण्यादेण्याचे’ व्यवहार करताना खाणार्‍याचे पुन्हा नवे घोटाळे करण्यासाठी केवळ ‘खाते’ बदलले जाते, हे वास्तव त्यांनी मांडले आहे. मात्र असे जरी असले तरी ‘जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों’ या गाण्याची आठवण करून देण्यासही ते विसरत नाहीत. एक अगतिकता, तगमग यापेक्षाही स्वतःतील चांगुलपण शाबूत ठेवण्यासाठीची त्यांची धडपड या लेखनातून दिसून येते.
माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने बर्‍याचवेळा तो एकटा असूनही अनेकांत असतो. आपण अनेकांत आणि अनेकांसाठी असतो, हे मात्र कित्येकदा त्याला कळत नाही. म्हूणनच त्यांनी ‘एकटा’ या लेखाचा समारोप करताना लिहिले आहे, ‘मै तो अकेलाही चला था, लोग मिलते गए, और कारवॉं बनता गया।’
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा संदर्भ देऊन लिहिलेला ‘एक पत्थर तो तबियत से उछालों यारो’ हा लेख तर प्रत्येक तरूण - तरूणींनी वाचायलाच हवा! एकदा वेळ निघून गेली तर त्याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी या लेखातून दिलाय. अशक्य ते शक्य करून दाखवण्याचे अफाट सामर्थ्य आजच्या युवा पिढीत आहे. त्यांना फक्त अचूक व योग्य दिशा ठरवण्याची गरज आहे एवढेच...! असे निरीक्षण त्यांनी मांडले आहे आणि ते रास्तही आहे.

--
घनश्याम पाटील
संपादक, चपराक 

भ्रमणध्वनी : ७०५७२९२०९२

फुटू द्या धुमारे साहित्याचे...

लग्नाच्या गाठी या स्वर्गातचं जुळलेल्या असतात, असे म्हणतात. स्वर्ग-नरक या कल्पना आपण काही काळासाठी बाजूला ठेवू. मात्र यावर आमचे संमित्र समीर नेर्लेकर म्हणतात,लग्नाच्या गाठी जर स्वर्गात जुळत असतील तर तिथल्या काराभारात काहीतरी गोंधळ आहे. नाहीतर इतकी लग्ने तुटलीच नसती.’
 या विषयावर डोक्याचा
केमिकल लोचा’ करून घेण्याऐवजी काहीतरी मार्ग काढता येईल  का? हे पाहणे समाजातील धुरीणांचे काम आहे. पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक तीन-चार महिन्यांपूर्वी पार पडली. लेखणी आणि वाणीवर प्रभूत्व असणारे प्रा. मिलिंद जोशी हे या निवडणुकीत मोठ्या मतांनी निवडून आले. त्यांच्या परिवर्तन आघाडीने दणदणीत विजय मिळवला. साहित्य संस्था समाजाभिमुख व्हाव्यात’ हे ठासून मांडतानाच जोशी यांनी समाजही साहित्याभिमुख व्हावा’ अशी भूमिका घेतली होती. समाजातील साहित्य संस्थाही बदलल्यात आणि समाजही बदलतोय. महाराष्ट्र साहित्य परिषदेने विवाह प्रश्‍नी लक्ष घालावे’ अशी मागणी एका विवाह मंडळाने परिषदेकडे केली आहे. याविषयी त्यांनी लग्न हा सध्या समाजातील महत्त्वाचा प्रश्‍न झाला आहे. अपेक्षा, मुलामुलींचे व्यस्त प्रमाण यामुळे लग्न जमवताना प्रचंड अडचणी येत आहेत. साहित्य हे समाजाचा आरसा मानले जाते. त्यामुळे समाजातील विवाह या महत्त्वाच्या प्रश्‍नासाठी आता साहित्य संस्थांनीच पुढाकार घेतला पाहिजे’ अशी मागणी त्यांनी चक्क पत्र लिहून केली आहे. हे पत्र मसापच्या दप्तरी दाखल करण्यात आले असून त्याला काहीच उत्तर देण्यात आलेले नाही, असे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी सांगितलेय.
परिषदेत परिवर्तन घडल्यानंतर ही मंडळी काहीतरी विधायक आणि रचनात्मक काम उभे करतील अशी अपेक्षा होती. ती बर्‍यापैकी पूर्णत्वासही येत आहे. परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह आमूलाग्र बदललेले आहे. येथील साहित्यिकांच्या फोटोंवरील धूळ झटकण्याचे कामही वर्षानुवर्षे होत नव्हते. एखादी आई आपल्या बाळाला घेऊन या सभागृहात आली तर मध्यरात्री ते बाळ झोपेतून घाबरून उठावे असा सारा मामला. 1990 च्या दरम्यान ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांनीही जाहीरपणे सांगितले होते की,
जी काही मदत लागेल ती घ्या. मात्र या इमारतीचे सुशोभिकरण करा.’ तरीही केवळ इच्छाशक्ती अभावी ही सूचना कोणी गंभीरपणे घेतली नाही. प्रा. मिलिंद जोशी परिषदेच्या इतिहासातील सर्वात तरूण कार्याध्यक्ष आहेत. उत्तम जनसंपर्क असणारे प्रकाश पायगुडे हे प्रमुख कार्यवाह म्हणून तर अल्पावधीत प्रकाशन क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या आमच्या मायीराजे म्हणजेच सुनीताराजे पवार कोषाध्यक्ष म्हणून त्यांच्या सोबतीला आहेत. ऍड. प्रमोद आडकर वास्तू देखभाल आणि अतिथी निवास व्यवस्था विभागाचे कार्यवाह आहेत. या सर्वांनी साहित्य परिषदेच्या वास्तूचे रूप पालटले आहे. आईसोबत आलेल्या तान्हुल्याची भीती नाहीशी व्हावी इतपत काम या मंडळींनी केले असले तरी त्या आईच्या मनात साहित्याविषयी असलेला गोडवा आणखी वृद्धिंगत व्हावा यासाठी काम करणे हे या चमूंचे प्रमुख कर्तव्य आहे. अनेक उमलते अंकूर या इमारतीत उमलण्याआधीच खुडून टाकण्यात आलेत. डॉ. ग. ना. जोगळेकर, डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. द. मा. मिरासदार डॉ. प्र. चिं. शेजवलकर अशा मान्यवरांनी परिषदेचे नेतृत्व केले आहे. प्रा. मिलिंद जोशी कर्णधार असलेल्या सध्याच्या कार्यकारणीत डॉ. रावसाहेब कसबे यांच्यासारखा विचारवंत अध्यक्ष आहे. डॉ. तारा भवाळकर, निर्मला ठोकळ, चंद्रकांत शेवाळे असे उपाध्यक्ष तर डॉ. शिवाजीराव कदम, उल्हासराव पवार, यशवंतराव गडाख यांच्यासारखे विश्‍वस्त परिषदेवर असल्याने परिषदेची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे.
मुळात महाराष्ट्र साहित्य परिषदेची सध्याची इमारत टिळक रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी आहे. जवळपास 110 वर्षे डौलात उभ्या असलेल्या या इमारतीवर अनेकांचा डोळा आहे. ही इमारत पाडून तेथे नव्याने सुसज्ज इमारत बांधावी इथपासून ते शहाराच्या जवळपास नव्या जागेत नवी इमारत उभारावी इथर्पंतच्या अनेक सूचना वेळोवेळी आल्या आहेत.
परंपरा’ हे कारण देत या वास्तूत कोणतेही बदल करण्यास अनेक सभासदांचे आक्षेप आहेत; तर काळाबरोबर चालताना नवे बदल स्वीकारायला हवेत अशी भूमिकाही काहीजण घेतात.
तरूणांनी साहित्य परिषद आणि त्या अनुषंगाने विविध उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी नवे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या
साहित्यसेतू’ या संस्थेच्या माध्यमातून तरूणाईला परिषदेशी जोडून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संकेतस्थळ, फेसबुक, ट्वीटर, ब्लॉग आणि यू ट्युब चॅनेल अशा समाजमाध्यमांद्वारे परिषद प्रथमच काळाबरोबर चालतेय. वाचक आणि लेखकांची ऑनलाईन नोंदणी परिषदेने त्यांच्या संकेतस्थळावर सुरू केली आहे. त्यामुळे सभासदांची, लेखक-वाचकांची माहिती सर्वांनाच उपलब्ध हाईल. वाचक आणि लेखक यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टिने हे पाऊल स्वागतार्ह आहे.विविध महाविद्यालयातील वाड्मयीन मंडळे साहित्य परिषदेला जोडून घेणार’ हे निवडणुकीच्या प्रचारात प्रा. मिलिंद जोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठ्या विश्‍वासाने सगळ्यांना सांगितले. त्यांच्या जाहीरनाम्यातही तरूणाईच्या मु्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. परिषदेत सक्रिय होताच या नव्या कारभार्‍यांनी अनेक नव्या उपक्रमांचा धडाका लावला आहे. (खरेतर यात नवे कुणीही नाहीत. प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनीताराजे पवार हे तिघेही पूर्वीच्या कार्यकारणीत होते. बदल फक्त नेतृत्वात झालाय) कॉफीक्लब’सारखे अनेक बंद पडलेले चांगले उपक्रम नव्याने मसाप गप्पा’सारख्या कार्यक्रमांद्वारे सुरू करण्यात आले आहेत.
हे सर्व पाहता एखाद्या विवाह मंडळाला परिषदेच्या सभागृहात अक्षदा उधळाव्याशा वाटल्या आणि एखाद्या वधूपित्याला याच वास्तूत कन्यादान करावेसे वाटले तर त्यात आश्‍चर्य ते काय? एकेकाळी कवी मन्मथ बेलूरे यांच्या ढोलकीवर मधू कांबीकर यांच्यासारख्या विख्यात नृत्यांगिणीने परिषदेच्या व्यासपीठावर नृत्य केलेच होते. या घटनेचे आम्ही साक्षीदार असल्याने परिषदेने विवाह जमविण्यात पुढाकार घेतल्यास आश्‍चर्य वाटू नये. तरूणांचे संघटन करतानाच त्यांच्या संसाराची अन् पर्यायाने कुटुंबाची चिंता वाहणे हे परिषदेचे कर्तव्यच असावे असा विचार संबंधितांनी पत्र लिहिताना केला असावा. यातून सामान्य माणसाचा साहित्य परिषदेवर आणि नव्या पदाधिकार्‍यांवर असलेला विश्‍वासच दिसून येतो.
अनेक नवकवी आणि कवयित्री सातत्याने एका व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात गुलाबी संबंध प्रस्थापित होऊन ते यशस्वीरित्या पूर्णत्वास गेले तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही. बाई आणि बाटलीच्या मागे असलेल्या तथाकथित सारस्वतांची लफडी सर्वश्रूत आहेतच. म्हणूनच हे क्षेत्र जितके बदनाम झाले त्याहून आजच्या पिढीला ते अधिक किळसवाणे वाटते. एखाद्या वधू-वर सूचक मंडळाच्या कार्यालयात जेवढी गर्दी असते त्याच्या काही अंशीही उपस्थिती साहित्य संस्थांत आणि त्यांच्या उपक्रमांत नसते. तरूणाईच्या
सर्व प्रकारच्या’ गरजा लक्षात घेणे दूरच; मात्र त्यांच्यात साहित्यिक अभिरूची निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीला हातभार लागावा, त्यातील लिहित्या हातांना बळ देऊन त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, त्याच त्या लेखक, कवी-कवयित्रींचा  रतीब घालण्याऐवजी समाजातील नव्याने फुटणार्‍या धुमार्‍यांची दखल घ्यावी असे काही केले तरी पुरेसे!
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. मायबोली आणि मायभूमीविषयी वाटणारी आदराची भावना परिषदेसारख्या संस्थांविषयी निर्माण व्हावी. यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टी असलेला खमक्या नेता या संस्थेला लाभलाय.
येथील राजकारण दूर करू’ असे ते सातत्याने सांगतात. खरेतर कोणत्याही संस्थेतील राजकारण कधीही दूर होत नसते. फारतर तेथील गलिच्छ राजकारण त्यांना टाळता येईल. त्यांनी इतके जरी केले तरी भविष्यात साहित्य परिषदेसारख्या संस्थांविषयी आणि पर्यायाने मायमराठीविषयी नव्या पिढीच्या मनात आत्मियता निर्माण होईल. 
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, July 2, 2016

स्वर्गीय अनुभूती



नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥


ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना खड्या आवाजात सुरू होती. कुठं? हिमालयात!!
कोण म्हणत होतं?
पुण्यातले प्रा. क्षितिज पाटुकले आणि त्यांचा सहकारी विनायक.
हिमालयातील सतोपंथ इथल्या एका गुहेत या मंडळींनी आश्रय घेतला होता. कमालीची थंडी. पाऊस पूर्णपणे थांबलेला. आकाश स्वच्छ झालेलं. नवमीचा चंद्र उगवलेला. प्रसन्न वातावरण. त्यात प्रा. पाटुकले यांनी एका काठीला भगवा ध्वज लावला आणि सुरू केली ही प्रार्थना. मग काय व्हावं? काही मिनिटातच समोरच्या गुहेतून एक साधू आरडाओरडा करत पळत आले. त्यांच्या एका हातात त्रिशूळ तर दुसर्‍या हातात चिमटा. ‘कौन बोल रहा है ये प्रार्थना? कौन है वो? कौन है वो?’ त्यांनी त्वेषाने विचारले. त्यांचा आरडाओरडा पाहून सगळेजणच गार पडले. भीतीने कुणालाच काही कळेना. या आकस्मिक संकटाने सर्वांचीच पाचावर धारण बसली. सगळेजण आपापल्या तंबूत गडप होऊन बसले. त्रिशूळ नाचवत साधुचा थयथयाट सुरूच होता. सगळेच गोंधळलेले. स्वर्गाच्या दारावर संघाची प्रार्थना म्हणणे हा असा कोणता गुन्हा, हेही पाटुकलेंना कळेना. ते गुहेतून बाहेर आले आणि साधुला विनम्रतेने वंदन करत त्यांनी सांगितले, ‘‘महाराज मैने यह प्रार्थना कहीं है।’’ साधुने विचारले, ‘‘कौन हो तुम?’’ बाकी सगळ्यांनी तंबुतून डोकी बाहेर काढली. आता हलकल्लोळ होणार! पाटुकले म्हणाले, ‘‘मेरा नाम क्षितिज है. मै महाराष्ट्र में पुणे से आया हूँ और यह प्रार्थना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की है. जो बचपन से संघ की शाखा में कहँता आया हूँ....’’
पुढच्या क्षणी अनपेक्षितपणे त्या साधुने त्रिशूळ आणि चिमटा भिरकावून दिला. पाटुकलेंना कडकडून मिठी मारली आणि ते अत्यानंदाने रडू लागले. ते म्हणाले, ‘‘मैं अठरा साल से यहॉं रह रहा हॅूं. यही पर तपःसाधना कर रहा हूँ. बचपन मे मैं भी संघ शाखा में जाता था. मैं हरियाना से हूँ. आज इतने सालों बाद मैने यह प्रार्थना सुनी. मुझे मेरा बचपन याद आ गया. मुझे बहोत आनंद हो रहा है.’’
सगळ्यांचे जीव भांड्यात पडले. सर्वजण तंबुबाहेर आले आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत टाळ्यांचा कडकडाट केला. या समूहासोबतच त्या रात्री ते साधू राहिले. त्यांचे नाव स्वामी चैतन्यनाथ. ते महावतार बाबाजी यांचे शिष्य. त्यांच्याकडे बाबाजींचा सहा फूट लांबीचा एक केस होता. चारी युगांची कहाणी, काळाचा महिमा, सनातन हिंदू धर्माची वैशिष्ट्ये याबाबत मग त्यांनी रात्रभर मार्गदर्शन केले. ‘‘कलीयुगातील कलीचा पाय पृथ्वीवर पडला असून हिमालयातील हजारो साधू संतांनी तो आपल्या तपश्‍चर्येच्या आणि साधनेच्या जोरावर उचलून धरला आहे. आम्ही जरी हिमालयात राहत असलो तरी आधुनिक जगातील इत्यंभूत गोष्टींचे ज्ञान आम्हाला आहे,’’ असे त्यांनी त्यावेळचे संदर्भ देऊन सांगितले.
अशी रोचक आणि रोमहर्षक माहिती वाचण्यास मिळते प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या ‘स्वर्गारोहिणी-स्वर्गावर स्वारी’ या पुस्तकात. पाटुकले हे अर्थशास्त्र, पंचकोषात्मक योग, व्यवस्थापन, वैदिक विज्ञान, भारतीय गोवंश या क्षेत्राचे अभ्यासक आहेत. त्याला त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांची जोड दिलीय. ‘स्वर्गारोहिणी’ हे त्यांचे अकरावे पुस्तक. यापूर्वी त्यांच्या ‘कर्दळीवन - एक अनुभूती’ या पुस्तकाने एक लाख प्रतींच्या विक्रमी विक्रीचा उच्चांक केला. मराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, संस्कृत, तेलगू, तमिळ भाषेसह बे्रल लिपीतही हे पुस्तके गेले. म्हणूनच त्यांनी ‘स्वर्गारोहिणी’ हे पुस्तकही एकाचवेळी प्रिंट, ई बुक, मोबाईल बुक आणि ऑडिओ बुक अशा चार प्रकारात प्रकाशित केले आहे.
हिमालय ही भारताची आध्यात्मिक राजधानी आहे, असे म्हणतात. बदरीनाथला देवाचे एकदा नाव घेतले की, जगात इतरत्र एक लाख वेळा नाव घेतल्याच्या बरोबरीचे आहे. स्वर्गारोहिणीच्या वाटेवर हे पुण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढत जाते. आपल्याकडील अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या श्रद्धा आहेत की, द्रौपदीने देह ठेवला तिथे एक नाव दहा लाखाच्या बरोबरीचे. सहदेवाच्या ठिकाणी एक नाव एक कोटीच्या, नकुलाच्या ठिकाणी दहा कोटीच्या, अर्जुनाच्या ठिकाणी एक अब्जाच्या, भीमाच्या ठिकाणी दहा अब्जाच्या बरोबरीचे आणि त्यापुढे तर अनंत, मोजता येणार नाहीत इतके.... जिथून पांडव स्वर्गाकडे गेले, जिथे रावणाने स्वर्गाकडे जाणारा पूल बांधला, जिथे हिमालयातील सर्वोच्च दैवी अनुभूती येते ते ठिकाण म्हणजे स्वर्गारोहिणी! इथं जायचं कसं? याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन करतानाच आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला हा संशोधनपूर्ण ग्रंथ आहे. आचार्य स्वामी गोविंददेव गिरी तथा किशोरजी व्यास यांचा या पुस्तकाला आशीर्वाद लाभला आहे. श्री बदरीनाथ-केदारनाथ मंदिर समितिचे प्रमुख श्री. बलदेव सिंह यांची प्रस्तावना हेही या पुस्तकाचे विशेष आहे.
स्वर्गारोहिणी - रामायण आणि महाभारत, भौगोलिक स्थान आणि परिसर, टे्रक अर्थात परिक्रमा, महात्म्य आणि इतिहास, कैलास मानस सरोवर आणि पंचकैलास, पंचबदरी, पंचकेदार आणि पंचप्रयाग, चारधाम आणि देवभूमीतील तीर्थाटने, कुंड, तलाव आणि हिमनदी, ट्रेक्स आणि साहसी खेळ आणि देवभूमी उत्तराखंड अशा दहा प्रकरणाद्वारे प्रा. क्षितिज पाटुकले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक, परिश्रमपूर्वक हा ग्रंथ सिद्धीस नेला आहे. अनेक वाचकांना हिमालयातील या पवित्र स्थानाची माहिती असण्याचीही शक्यता नाही; मात्र पाटुकले यांनी अत्यंत प्रासादिक शैलीत या पुस्तकाद्वारे वाचकांची हिमालय सफर घडविली आहे. पुस्तकातील रंगीत छायाचित्रे तर काही काळासाठी आपल्याला त्या परिसरातच घेऊन जातात.
‘स्वर्गारोहिणीची ऐतिहासिक, भौगोलिक, पौराणिक व व्यावहारिक माहिती प्रदान करताना लेखकच तन्मय झाले नाहीत तर वाचकही क्षणभर स्थळकाळ विसरतो’ अशा शब्दात किशोरजी व्यास यांच्यासारख्या अधिकारी पुरूषाने आशीर्वाद दिले आहेत.
साधक, जिज्ञासू, भाविक आणि सामान्य वाचकालाही वाचावेसे वाटेल, संग्राह्य ठेवावे वाटेल आणि स्वर्गीय अनुभूती मिळेल असे हे पुस्तक आहे. एका महत्त्वपूर्ण विषयाची अभ्यासपूर्वक दखल घेतल्याबद्दल प्रा. क्षितिज पाटुकले यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
लेखक - प्रा. क्षितिज पाटुकले
प्रकाशक - कर्दळीवन सेवा संघ, पुणे (9822846918)
पाने - 200, मूल्य - 400/-


* घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२