Saturday, July 2, 2016

स्वर्गीय अनुभूती



नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥


ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना खड्या आवाजात सुरू होती. कुठं? हिमालयात!!
कोण म्हणत होतं?
पुण्यातले प्रा. क्षितिज पाटुकले आणि त्यांचा सहकारी विनायक.
हिमालयातील सतोपंथ इथल्या एका गुहेत या मंडळींनी आश्रय घेतला होता. कमालीची थंडी. पाऊस पूर्णपणे थांबलेला. आकाश स्वच्छ झालेलं. नवमीचा चंद्र उगवलेला. प्रसन्न वातावरण. त्यात प्रा. पाटुकले यांनी एका काठीला भगवा ध्वज लावला आणि सुरू केली ही प्रार्थना. मग काय व्हावं? काही मिनिटातच समोरच्या गुहेतून एक साधू आरडाओरडा करत पळत आले. त्यांच्या एका हातात त्रिशूळ तर दुसर्‍या हातात चिमटा. ‘कौन बोल रहा है ये प्रार्थना? कौन है वो? कौन है वो?’ त्यांनी त्वेषाने विचारले. त्यांचा आरडाओरडा पाहून सगळेजणच गार पडले. भीतीने कुणालाच काही कळेना. या आकस्मिक संकटाने सर्वांचीच पाचावर धारण बसली. सगळेजण आपापल्या तंबूत गडप होऊन बसले. त्रिशूळ नाचवत साधुचा थयथयाट सुरूच होता. सगळेच गोंधळलेले. स्वर्गाच्या दारावर संघाची प्रार्थना म्हणणे हा असा कोणता गुन्हा, हेही पाटुकलेंना कळेना. ते गुहेतून बाहेर आले आणि साधुला विनम्रतेने वंदन करत त्यांनी सांगितले, ‘‘महाराज मैने यह प्रार्थना कहीं है।’’ साधुने विचारले, ‘‘कौन हो तुम?’’ बाकी सगळ्यांनी तंबुतून डोकी बाहेर काढली. आता हलकल्लोळ होणार! पाटुकले म्हणाले, ‘‘मेरा नाम क्षितिज है. मै महाराष्ट्र में पुणे से आया हूँ और यह प्रार्थना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की है. जो बचपन से संघ की शाखा में कहँता आया हूँ....’’
पुढच्या क्षणी अनपेक्षितपणे त्या साधुने त्रिशूळ आणि चिमटा भिरकावून दिला. पाटुकलेंना कडकडून मिठी मारली आणि ते अत्यानंदाने रडू लागले. ते म्हणाले, ‘‘मैं अठरा साल से यहॉं रह रहा हॅूं. यही पर तपःसाधना कर रहा हूँ. बचपन मे मैं भी संघ शाखा में जाता था. मैं हरियाना से हूँ. आज इतने सालों बाद मैने यह प्रार्थना सुनी. मुझे मेरा बचपन याद आ गया. मुझे बहोत आनंद हो रहा है.’’
सगळ्यांचे जीव भांड्यात पडले. सर्वजण तंबुबाहेर आले आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत टाळ्यांचा कडकडाट केला. या समूहासोबतच त्या रात्री ते साधू राहिले. त्यांचे नाव स्वामी चैतन्यनाथ. ते महावतार बाबाजी यांचे शिष्य. त्यांच्याकडे बाबाजींचा सहा फूट लांबीचा एक केस होता. चारी युगांची कहाणी, काळाचा महिमा, सनातन हिंदू धर्माची वैशिष्ट्ये याबाबत मग त्यांनी रात्रभर मार्गदर्शन केले. ‘‘कलीयुगातील कलीचा पाय पृथ्वीवर पडला असून हिमालयातील हजारो साधू संतांनी तो आपल्या तपश्‍चर्येच्या आणि साधनेच्या जोरावर उचलून धरला आहे. आम्ही जरी हिमालयात राहत असलो तरी आधुनिक जगातील इत्यंभूत गोष्टींचे ज्ञान आम्हाला आहे,’’ असे त्यांनी त्यावेळचे संदर्भ देऊन सांगितले.
अशी रोचक आणि रोमहर्षक माहिती वाचण्यास मिळते प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या ‘स्वर्गारोहिणी-स्वर्गावर स्वारी’ या पुस्तकात. पाटुकले हे अर्थशास्त्र, पंचकोषात्मक योग, व्यवस्थापन, वैदिक विज्ञान, भारतीय गोवंश या क्षेत्राचे अभ्यासक आहेत. त्याला त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांची जोड दिलीय. ‘स्वर्गारोहिणी’ हे त्यांचे अकरावे पुस्तक. यापूर्वी त्यांच्या ‘कर्दळीवन - एक अनुभूती’ या पुस्तकाने एक लाख प्रतींच्या विक्रमी विक्रीचा उच्चांक केला. मराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, संस्कृत, तेलगू, तमिळ भाषेसह बे्रल लिपीतही हे पुस्तके गेले. म्हणूनच त्यांनी ‘स्वर्गारोहिणी’ हे पुस्तकही एकाचवेळी प्रिंट, ई बुक, मोबाईल बुक आणि ऑडिओ बुक अशा चार प्रकारात प्रकाशित केले आहे.
हिमालय ही भारताची आध्यात्मिक राजधानी आहे, असे म्हणतात. बदरीनाथला देवाचे एकदा नाव घेतले की, जगात इतरत्र एक लाख वेळा नाव घेतल्याच्या बरोबरीचे आहे. स्वर्गारोहिणीच्या वाटेवर हे पुण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढत जाते. आपल्याकडील अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या श्रद्धा आहेत की, द्रौपदीने देह ठेवला तिथे एक नाव दहा लाखाच्या बरोबरीचे. सहदेवाच्या ठिकाणी एक नाव एक कोटीच्या, नकुलाच्या ठिकाणी दहा कोटीच्या, अर्जुनाच्या ठिकाणी एक अब्जाच्या, भीमाच्या ठिकाणी दहा अब्जाच्या बरोबरीचे आणि त्यापुढे तर अनंत, मोजता येणार नाहीत इतके.... जिथून पांडव स्वर्गाकडे गेले, जिथे रावणाने स्वर्गाकडे जाणारा पूल बांधला, जिथे हिमालयातील सर्वोच्च दैवी अनुभूती येते ते ठिकाण म्हणजे स्वर्गारोहिणी! इथं जायचं कसं? याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन करतानाच आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला हा संशोधनपूर्ण ग्रंथ आहे. आचार्य स्वामी गोविंददेव गिरी तथा किशोरजी व्यास यांचा या पुस्तकाला आशीर्वाद लाभला आहे. श्री बदरीनाथ-केदारनाथ मंदिर समितिचे प्रमुख श्री. बलदेव सिंह यांची प्रस्तावना हेही या पुस्तकाचे विशेष आहे.
स्वर्गारोहिणी - रामायण आणि महाभारत, भौगोलिक स्थान आणि परिसर, टे्रक अर्थात परिक्रमा, महात्म्य आणि इतिहास, कैलास मानस सरोवर आणि पंचकैलास, पंचबदरी, पंचकेदार आणि पंचप्रयाग, चारधाम आणि देवभूमीतील तीर्थाटने, कुंड, तलाव आणि हिमनदी, ट्रेक्स आणि साहसी खेळ आणि देवभूमी उत्तराखंड अशा दहा प्रकरणाद्वारे प्रा. क्षितिज पाटुकले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक, परिश्रमपूर्वक हा ग्रंथ सिद्धीस नेला आहे. अनेक वाचकांना हिमालयातील या पवित्र स्थानाची माहिती असण्याचीही शक्यता नाही; मात्र पाटुकले यांनी अत्यंत प्रासादिक शैलीत या पुस्तकाद्वारे वाचकांची हिमालय सफर घडविली आहे. पुस्तकातील रंगीत छायाचित्रे तर काही काळासाठी आपल्याला त्या परिसरातच घेऊन जातात.
‘स्वर्गारोहिणीची ऐतिहासिक, भौगोलिक, पौराणिक व व्यावहारिक माहिती प्रदान करताना लेखकच तन्मय झाले नाहीत तर वाचकही क्षणभर स्थळकाळ विसरतो’ अशा शब्दात किशोरजी व्यास यांच्यासारख्या अधिकारी पुरूषाने आशीर्वाद दिले आहेत.
साधक, जिज्ञासू, भाविक आणि सामान्य वाचकालाही वाचावेसे वाटेल, संग्राह्य ठेवावे वाटेल आणि स्वर्गीय अनुभूती मिळेल असे हे पुस्तक आहे. एका महत्त्वपूर्ण विषयाची अभ्यासपूर्वक दखल घेतल्याबद्दल प्रा. क्षितिज पाटुकले यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
लेखक - प्रा. क्षितिज पाटुकले
प्रकाशक - कर्दळीवन सेवा संघ, पुणे (9822846918)
पाने - 200, मूल्य - 400/-


* घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

8 comments:

  1. दादा सुंदर सुरुवात! आणि अभ्यासपुर्ण शेवट छान परीक्षण मांडलेत तुम्ही !!

    ReplyDelete
  2. दादा सुंदर सुरुवात! आणि अभ्यासपुर्ण शेवट छान परीक्षण मांडलेत तुम्ही !!

    ReplyDelete
  3. सुरेख पुस्तक परिचय . वाचनाची उत्सुकता वाढली आहे

    ReplyDelete
  4. "स्वर्गरोहिणी - स्वर्गावर स्वारी" या पुस्तकाचे परिक्षण वाचून त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. हिमालयातील साधूंबाबत मला बरेच वाचावयास मिळाले आहे. त्यांच्याकडे असलेल्या सिद्धी आणि त्यांचे चारशे ते पाचशे वर्षांचे वय थक्क करणारी आहेत. एका साधकाने मानसरोवरला जाताना भेटलेल्या अशा साधूंची माहिती ज्या पुस्तकात दिली होती त्या पुस्तकाचे परिक्षण माझ्या "श्री साईसागर" अंकातही छापले आहे. शिर्डी संस्थाने त्यांच्या"श्री साईलीला" मासिकात काही वर्षांपूर्वी हिमालयातील सफरीवर लेखमाला दिली होती. तीसुद्धा वाचनीय होती. आजकाल धार्मिक क्षेत्रातील भ्रष्टाचार, भगवी वस्त्रे अंगावर चढवून साधूचा आव आणणारे भामटे यामुळे आपल्या धर्माबद्दल अनेकांच्या मनात असलेले गैरसमज वरील पुस्तकामुळे दूर होण्यास मदत होईल असे मला वाटते.

    ReplyDelete
  5. अत्यंत वाचनीय परीक्षण!

    ReplyDelete