लेखक - विनोद श्रा. पंचभाई प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092) पाने - 120, मूल्य 120 |
माणूस निर्भय आणि निर्मळ असेल तर त्याचे विचार निश्चितपणे प्रकाशमार्गी असतात. जे जगतो, जसं जगतो तसं बिनधास्तपणे कागदावर उतरवणारे लेखक कमी होत चाललेत. विनोद श्रा. पंचभाई हे अशा अपवादभूत लेखकांपैकी एक आहेत. आपल्यावर रूसलेल्या प्रेयसीची समजूत काढत तिला अलगदपणे आपल्या कुशीत घ्यावे, तितक्याच सहजतेने सर्व मनोवृत्तीच्या वाचकांचा ते ठाव घेतात आणि त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. मुद्देसूद आणि ओघवत्या शैलीतील प्रभावी मांडणी, अधेमधे कविता, संत कबीरांचे दोहे, राष्ट्रसंत तुकडोजींच्या ओव्यांची साखरपेरणी यामुळे त्यांच्या लिखाणाला अवीट गोडी प्राप्त झाली आहे.
‘थोडं मनातलं’ हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह ‘चपराक’ने प्रकाशित केला आहे. परमेश्वर कुठे आहे, इथपासून ते जीवनातील रागलोभ, बालपण, सण-समारंभ, संस्कार आणि संस्कृती, गुरू-शिष्य, शेजारी, वाचनसंस्कृती अशा सर्व विषयांवरील चिंतन त्यांनी या लेखातून प्रकट केले आहे. हे लेख थेट काळजाला जाऊन भिडतात. विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीनही पातळ्यांवर यशस्वी झेप घेण्यासाठीचा संकल्प दृढ करतात. माणसाला हलवून सोडणारे आणि विचार करायला भाग पाडणारे हे साहित्य मनावर असलेले मणामणाचे ओझे कमी करण्यास मदत करते.
या पुस्तकातील लेख म्हणजे कुणा व्यास-वाल्मीकींची कवीकल्पना नाही. जीवनाच्या विविध टप्प्यांवर एका सामान्य माणसाला पडलेले, पडणारे प्रश्न त्यांनी पोडतिडिकेने मांडले आहेत. निकोप समाजनिर्मितीसाठी सामान्य माणसाला नेहमी काही ना काही प्रश्न पडायला हवेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्याने प्रयत्नही करायला हवा! विनोद पंचभाई यांनी एका वेगळ्या पातळीवर मानवी मनाचा झालेला गुंता या पुस्तकात ठामपणे मांडलाय.
आपले मन कठोर करणे, मोह टाळणे हे आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे असे सांगणारे पंचभाई म्हणतात, तुमच्या कुटुंबावर तुमचे मनापासून प्रेम असेल तर अनावश्यक मोह टाळा! येणारी संभाव्य संकटे टाळायची असतील तर स्वतः व्यसनापासून दूर रहा आणि इतरांनाही त्यासाठी परावृत्त करा. माणसातील देव कुणालाही दिसत नसल्याची खंत व्यक्त करून ते अपेक्षा व्यक्त करतात की तो कधीतरी म्हणेल, ‘तुझमे रब दिखता है....!’
पंचभाईंच्या लेखनात कधी त्यांच्यातला सुहृदयी देशभक्त डोकावतो, कधी प्रेमळ पिता दिसतो, कधी एखादा समाजसेवक, तत्त्ववेत्ता आढळतो, प्रबोधनाची मशाल हाती घेऊन अंधार्या राती गस्त घालणारा जागल्या दिसतो तर कधी उफाळलेल्या सात्विक संतापातून ‘माणूस खरंच बुद्धिमान प्राणी आहे का?’ असा सवाल करणारा सामान्य माणूसही दिसतो. मात्र या प्रत्येक लेखात त्यांनी आशावादाचे बीज पेरलेय. कसदार धान्याची टपोरी कणसं देण्यासाठी आधी एखाद्या बीयाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं, हे जगरहाटीचं सूत्र त्यांना कधीचच कळून चुकलंय.
या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, ‘‘आज नेते-अभिनेते न होता खर्याअर्थाने ‘जेते’ व्हा. कुठल्याही भोंदूबाबाला आदर्श न मानता ज्यांनी तुम्हाला हे जग दाखवले त्या स्वतःच्या आईबाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. जीवनात सच्चा आनंद मिळवण्यासाठी देवानंद न होता विवेकानंद व्हा. सुखरामकडे न बघता रामनामातच सुख शोधा!’’ शिवाय ‘जेते’ व्हा असे सांगतानाच त्यांनी एका लेखात ‘जगज्जेता’ सिकंदर ‘जाताना’ मात्र ‘मोकळ्या’ हातानींच गेला होता, याचीही आठवण करून दिलीय. पंचभाईंची हीच वस्तुनिष्ट भूमिका झापडबंद आयुष्य जगणार्या अनेकांना मात्र भानावर आणते.
‘बालपण देता का बालपण?’ या लेखातील टिंकूचे मनोगत तर प्रत्येकाला हेलावून सोडणारे आहे. आजोबांनी लहानपणी सांगितलेल्या स्वच्छंदी जगण्याच्या सुरस कथा ऐकून ट्विंकल तसे जगण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला खेळायला ना मैदान मिळते ना आईवडिलांचा पाठिंबा! सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी होत चाललेले असताना अशा अनेक ट्विंकल दुर्दैवाने गावोगावी दिसतात. ‘‘मलाही मनापासून वाटतं, आपण आपल्या आजोबांसारखं मनसोक्त मजेत भटकावं, खेळावं, खूप खूप मजा करावी, दमायला होईपर्यंत मैदानात पळावं. मग दूऽऽर जाऊन सूर्यास्त बघत बसावं. आपल्याला शोधत मग मम्मीनं आपल्याजवळ यावं, लाडानं आपल्याला जवळ घ्यावं, डोळे भरून तिनं माझ्या डोळ्यात बघावं, खरंच राहून राहून इतक्यात मला असं मनापासून वाटतंय!’’ हे टिंकूचे आत्मकथन वाचताना आपसूकच डोळे पानावतात. नव्या पिढीला आपण काय देतोय, याची आत्मजाणीव निर्माण होते. केवळ भाषेचे फुलोरे म्हणून या लेखांचे कौतुक नाही; तर समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम विनोद श्रा. पंचभाई यांनी ताकतीने केले आहे. हे लेख वाचून कित्येकांना नवी दृष्टी मिळेल. हरवलेली दिशा गवसेल! समाजातील विसंगती, दुटप्पीपणा, ढोंग याचा पर्दाफाश करण्यात पंचभाईंची लेखणी बर्यापैकी यशस्वी ठरलीय!
‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने गरीब, दुर्लक्षित, वंचित, वनवासी यांचे प्रश्न त्यांनी ठामपणे मांडले आहेत. शासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचारांमुळे मदतकार्यात येणारे अडथळे ते दाखवून देतात. चौफेर फटकेबाजी करणारी आणि विविध विषयांना स्पर्श करणारी त्यांची लेखणी वाचकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते.
‘प्रामाणिकपणा म्हणजे काय रे भाऊ?’ असे उपहासाने विचारतानाच ते इथल्या व्यवस्थेचे बुरखे टरटरा फाडतात. ‘उनकी बेईमानीमे आप पुरी इमानदारी से साथ निभाओ’ अशा परिस्थितीमुळे मनात नकळत ठिणगी पेटायला लागते पण आपल्यासमोरील अनेक मजबुरीमुळे त्याचे भडक्यात रूपांतर होत नाही, इकडे ते जाणीवपूर्वक लक्ष वेधतात. ‘घेण्यादेण्याचे’ व्यवहार करताना खाणार्याचे पुन्हा नवे घोटाळे करण्यासाठी केवळ ‘खाते’ बदलले जाते, हे वास्तव त्यांनी मांडले आहे. मात्र असे जरी असले तरी ‘जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों’ या गाण्याची आठवण करून देण्यासही ते विसरत नाहीत. एक अगतिकता, तगमग यापेक्षाही स्वतःतील चांगुलपण शाबूत ठेवण्यासाठीची त्यांची धडपड या लेखनातून दिसून येते.
माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने बर्याचवेळा तो एकटा असूनही अनेकांत असतो. आपण अनेकांत आणि अनेकांसाठी असतो, हे मात्र कित्येकदा त्याला कळत नाही. म्हूणनच त्यांनी ‘एकटा’ या लेखाचा समारोप करताना लिहिले आहे, ‘मै तो अकेलाही चला था, लोग मिलते गए, और कारवॉं बनता गया।’
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा संदर्भ देऊन लिहिलेला ‘एक पत्थर तो तबियत से उछालों यारो’ हा लेख तर प्रत्येक तरूण - तरूणींनी वाचायलाच हवा! एकदा वेळ निघून गेली तर त्याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी या लेखातून दिलाय. अशक्य ते शक्य करून दाखवण्याचे अफाट सामर्थ्य आजच्या युवा पिढीत आहे. त्यांना फक्त अचूक व योग्य दिशा ठरवण्याची गरज आहे एवढेच...! असे निरीक्षण त्यांनी मांडले आहे आणि ते रास्तही आहे.
--
घनश्याम पाटील
संपादक, चपराक
भ्रमणध्वनी : ७०५७२९२०९२