Tuesday, June 21, 2016

शिवसेनेची पन्नाशी


हिंदुत्वासाठी अखंडपणे शेवटच्या श्‍वासापर्यंत धडधडणारी तोफ म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! मराठी टक्का कसा घसरतोय आणि प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी अमराठी लोकांनी कसा उच्छाद मांडलाय याची सातत्याने यादी दिल्यानंतर दादांनी म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारले, ‘‘आणखी किती काळ फक्त याद्याच देणार? यांच्यासाठी एखादी संघटना, पक्ष काढणार की नाही?’’ आणि या सवालातूनच 19 जून 1966 ला शिवसेना ही मराठी माणसांची संघटना स्थापन झाली. अवघ्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका छोट्याशा खोलीत शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फोडला गेला आणि बघता-बघता हा इवलासा वेलू अखंड अशा सिंधूत रूपांतरीत झाला. या शिवसेनेने आपली पन्नाशी पूर्ण केली असली तरी त्याचे तारूण्य चिरकाळ टिकणारे आहे.
‘कॉंग्रेसने अनेक शिक्षणसंस्था स्थापन केल्या. साखरकारखाने काढले. दूध संस्था काढल्या; शिवसेनेने नेमके काय केले?’ असा एक पुळचट सवाल काही समदु:खी लोकांकडून केला जातो. शिवसेनेने काय केले? याचे मूल्यमापन व्हायचे तेव्हा होईलच; मात्र शिवसेनेने मराठी माणसाचा स्वाभिमान जागवला हे मात्र सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यात शिवसेनेचा वाटा सर्वाधिक आहे.
भारतीय राजकारणात आपली छाप पाडणारा शिवसेना हा एकमेव बलाढ्य प्रादेशिक पक्ष आहे. बाळासाहेब काय बोलायचे किंवा ‘सामना’त कोणत्या विषयावर अग्रलेख होतोय याकडे दिल्लीश्‍वरांचे कायम लक्ष असायचे. 1989 साली सुरू झालेले सामना हे एकमेव वृत्तपत्र आहे की ज्याच्या अग्रलेखावरून देशभर विविध माध्यमातून कायम नरम-गरम बातम्या होतात. मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी शिवसेनेने कायम आक्रमक भूमिका घेतली. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणार्‍या शिवसेनेने कधीही जातीवाद केेला नाही. त्यामुळेच शिवसेनेत सर्वच जातीधर्माचे लोक नेतृत्व करताना दिसतात. ‘किंगमेकर‘ असलेल्या बाळासाहेबांनी तळागाळातून आलेल्या अनेक नेत्यांना ‘चेहरा’ दिला आणि हेच बाळासाहेबांचे मोठेपण ठरावे.
आपल्याकडे लेच्यापेच्या भूमिका घेणार्‍या सुमार नेत्यांची वाणवा नाही. ज्यावेळी बाबरी मस्जीद पाडली गेली त्यावेळी असंख्य कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू होते. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असतानाच मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी देशाने ऐकली. ‘‘बाबरी मस्जीद पाडण्यात जर माझ्या शिवसैनिकाने पुढाकार घेतला असेल तर मला त्यांचा अभिमानच वाटतो.’’ सर्व पक्षांनी हात वर करून कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडलेले असताना बाळासाहेबांची ही भूमिका सकारात्मक ठरली. कोणत्याही परिणामांचा विचार न करता विचारांचा परिणाम घडविणारे बाळासाहेबांसारखे नेते विरळाच. ‘मराठी माणूस’ हा बाळासाहेबांच्या कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. सत्ता हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. म्हणूनच बाळासाहेबांनी अनेकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवले. कमजोर लोकांच्यात स्वाभिमान जागवून प्राण फुंकले. शिवसेना ही तरूणांना पेटवणारी एक आग आहे हे कायम कृतीतून दाखवून दिले.
युतीच्या काळात ‘गाव तिथे एसटी’, ‘झुणका भाकर केंद्र’ असे लोककल्याणकारी उपक्रम केवळ आणि केवळ शिवसेनेनेच राबवले. भारतीय जनता पक्ष सेनेपुढे कायमच फिका पडलेला असायचा. महाराष्ट्रात भाजपला कवडीचीही किंमत नसताना बाळासाहेबांनी त्यांना डोक्यावर घेऊन खरा महाराष्ट्र दाखवला. वाजपेयी सरकारच्या काळात शिवसेनेच्या खासदारांची संख्या लक्षवेधी असूनही शिवसेनेकडे मंत्रीपदे मात्र नगण्यच होती. बाळासाहेबांनी कधीही त्याचा बागुलबुवा केला नाही. स्वर्गीय प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथराव मुंडे अशा नेत्यांनी युती अभेद्य ठेवली; मात्र सध्या काही निष्प्रभ घोडे अकारण फुरफुरत आहेत. सेनेला सातत्याने कमी लेखण्याचे उद्योग भाजपकडून सुरू आहेत.
शिवसेनेच्या पाठिंब्यावरच सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांच्यासारख्या बुजूर्ग नेत्याने मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेच होते. कमळाबाई कुंकू एकाचे लावते आणि मधुचंद्र दुसर्‍यासोबतच साजरा करते हे एव्हाना मराठी माणसापासून लपून राहिलेले नाही. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अनेक करंटेपणाकडे दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवले आहे. ‘अति तेथे माती’ असे झाल्यास मात्र सेना कोणत्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडेल आणि ‘जाणत्या’ नेत्याचे बोल खरे ठरतील.
महाराष्ट्रात भाजप ‘जलयुक्त शिवार’सारख्या प्रभावी योजना राबवत आहे. याचवेळी ‘शिवजलक्रांती’ही जोरात सुरू आहे. श्रेयवादात अडकलेले भाजप नेते त्यावरून राजकारण करत असतानाच शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात मदत, सामुदायिक विवाह सोहळे, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे अशी विधायक कामांची जंत्री सेनेकडून सुरूच आहे. युती तुटल्यानंतर सेनेचे बारा वाजणार असे मनसुबे तेव्हाच्या आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणि एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने रंगवले होते. शिवसेनेच्या झंझावातापुढे हे सगळे अंदाज खोटे ठरले आणि शिवसेनेने महाराष्ट्रात मोठी बाजी मारली. नरेंद्र मोदी यांच्या वावटळीतही सेना भक्कमपणे तग धरून आहे.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काहीजण अकारण तुलना करतात. उद्धव यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करणार्‍यांना त्यांनी कायम कानफाडले आहे. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यासारखे नेते सेनेनेच घडवले. तरीही त्यांनी शिवसेनेशी फितुरी करत कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. या गद्दारांचा सेनेवर यत्किंचितही परिणाम झाला नाही. 2005 ला राज ठाकरे यांनी घरभेदीपणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेबांनी ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असे भावनिक आवाहन केले होते; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. इतके होऊनही शिवसेना अभेद्यच आहे.
महाराष्ट्राबाहेर उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली इतकेच काय तर जम्मू काश्मीरमध्येही शिवसेनेचे कार्य आहे. यातील अनेक ठिकाणी पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकेत शिवसैनिक प्रतिनिधीत्व करतात. अमराठी भागात भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी लढणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्या-त्या राज्यातील भूमिपुत्रांना योग्य त्या संधी मिळायलाच हव्यात अशी शिवसेनेची भूमिका आहे. हिंदुत्व आणि मराठी माणूस हा त्यांचा श्‍वास आहे. म्हणूनच भाजपला आणि पर्यायाने हिंदुत्वाला फटका बसायला नको या प्रांजळ हेतूने शिवसेनेने वेगळे अस्तित्त्व असूनही परराज्यात अनेक ठिकाणी निवडणुकांचे राजकारण केले नाही. उद्धव ठाकरे आणि पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्यात त्या क्षमता आहेत. लोकांच्या अडचणी त्यांना कळतात. आदित्य ठाकरे या तरूणाची सामाजिक प्रश्‍नांची समज आणि त्याचा आवाका निश्‍चितच मोठा आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची प्रादेशिकतेची वस्त्रे गळून पडतील आणि हा राष्ट्रीय पक्ष म्हणून लोकमान्य ठरेल असे वाटते.
‘मला मारणारे मेले, मी अजून ठणठणीत आहे’ असे आचार्य अत्रे यांनी त्यांच्या तत्कालीन विरोधकांना ठणकावून सांगितले होते. त्याचप्रमाणे शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलणार्‍यांचे नामोनिशाण मिटले आहे. ज्यांनी राज्याचे नेतृत्व केले ते कणकवलीतल्या एखाद्या किडूकमिडूक ग्रामपंचायतीचे सरपंचही होऊ शकणार नाहीत अशी व्यवस्था नियतीने केली आहे. मराठी माणसांच्या भवितव्यात मोलाचा वाटा उचलणारी मराठमोळी शिवसेना इथल्या दर्‍याखोर्‍यातून, पर्वत रांगातून, नद्या नाल्यातून इतकेच काय मराठी माणसांच्या नसानसातून प्रवाहीपणे वाहत राहील. शिवसेनेने मागच्या पन्नास वर्षात मराठी माणसासाठी आणि मुंबईसह अखंड महाराष्ट्र रहावा यासाठी जे कार्य केले आहे त्याबद्दल महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

No comments:

Post a Comment