Tuesday, December 8, 2015

चक्रव्यूहातील महाराष्ट्र? की महाराष्ट्रातला चक्रव्यूह? सीमाभागातील सुखदु:खांचा लेखाजोखा

'चौथा स्तंभ'च्या प्रकाशन सोहळ्यात रोपाला पाणी घालताना बेळगावचे पहापौर किरण सायनाक. यावेळी सुप्रसिद्ध लेखक सुनीलकुमार लवटे, प्रा. श्रीकांत नाईक, लेखक सुभाष धुमे आणि 'चपराक'चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील 
तो एक चक्रव्यूह होता का? म्हणजे काय? चक्रव्यूह नाही म्हणणार तुम्ही त्याला तर आणखी काय म्हणणार? पण मग अशावेळी सत्य कुणाच्या बाजूनं असतं? चक्रव्यूह ज्यानं रचला त्याच्या की जो चक्रव्यूहाशी लढतो आहे त्याच्या? बेळगावात पाऊल ठेवायचा अवकाश, मनात असे विचार सुरू होतात. महाभारतात एक खूपच विलक्षण वाक्य आलंय. काय आहे ते वाक्य? ‘‘जिथं कपट आणि कारस्थानं असतात तिथं कधीही सत्य नसतं.’’ हा चक्रव्यूहसुद्धा असाच निर्माण झाला. कारस्थानातूनच! कोण होते याचे निर्माते? तर तो चक्रव्यूह रचला कर्नाटकच्या सत्ताधार्‍यांनी. त्यात अडकला बेळगाव, कारवार, निपाणी व आजूबाजूचा असा पंचवीस एक लाखांचा मराठी प्रदेश. बरं, हा चक्रव्यूह किती भयंकर असावा? तर गेली साठ एक वर्ष तो आपल्याला भेदताच येत नाहीये. दि. 1 नोव्हेंबर 1956. या दिवशी म्हैसूर (आत्ताचं कर्नाटक) राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून हा सीमाभाग कर्नाटकातच आहे. मगरीच्या जबड्यात पायच अडकावा अशी सगळी परिस्थिती! ज्यांनी तो पाय सोडवायचा ते दुर्दैवाने काठावर! पण मग अशा कारस्थानांच्या विरूद्ध उठाव करणार नाही ती सामान्य जनता कसली? कपट पाहून उसळणार नाही ते तिचं मग रक्त कसलं? मग ती धडपड सुरू झाली. प्राणांतिक धडपड! सीमाभागातल्या जनतेची. अगदी बाबूराव ठाकूरांपासून ते किरण ठाकूर व त्यापुढची पिढी! सगळेच या चक्रव्यूहाशी लढत राहिले. आता हा प्रश्‍न आहे सुप्रिम कोर्टात! कर्नाटकचे पुढारी मात्र चाणक्याचेही बाप! नऊ वर्ष सुप्रिम कोर्टात खटला पडून राहिला. सुनावणीच झाली नाही. यामागं कालहरणाचे डावपेच नसतीलच असं कोण म्हणेल? अखेर सुनावणी सुरू झाली. सुप्रिम कोर्टाने मनमोहन सरीन यांची नियुक्ती केली. सरीन जम्मू काश्मीरच्या हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश. सुप्रिम कोर्टानं सांगितलं, जे सांगायचंय व पुरावे द्यायचेत ते सरीनांकडे द्या. हे महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही सरकारांना सांगितलं. मग कर्नाटक सरकारची पळापळ सुरू झाली. साठ वर्षांची दडपशाही! आता त्यांना ही दडपशाही लपवायची आहे, तीही सुप्रिम कोर्टात.
‘‘आपल्या ‘चौथा स्तंभ’ या पुस्तकाचं प्रकाशन बेळगावला आहे’’ काही दिवसापूर्वी घनश्याम पाटील म्हणाले. स्वस्थता पाटलांच्या रक्तात नाही. परवाच नाशिकला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आता बेळगावला. सीमाप्रश्‍नाचा मीही अभ्यास करतोच आहे. शिवाय ‘चपराक प्रकाशन’चं पुस्तक. घरातलं काम. दि. 27 ऑगस्ट 2015. मी व पाटलांनी ‘चौथा स्तंभ’ या पुस्तकाचे गठ्ठे रिक्षात घातले. निरोप द्यायला ‘चपराक’चे सहसंपादक माधव गिर आले होते. संध्याकाळची वेळ. रिक्षा थेट सुखसागरनगरकडे. तिथं महादेव कोरे वाट पाहत होते. ते पाटलांचे खूप जुने स्नेही. कोरेंच्या कारमधून आम्ही गेलो ते येवलेवाडीत. प्रमोद येवले हा पाटलांचा कॉलेजमधला यार दोस्त! तो रियल इस्टेट क्षेत्रात काम करतो. पाटील पत्रकार. हेवा वाटावा अशी दोघांची मैत्री! येवलेंच्या प्रशस्त बंगल्यात चहापाणी झालं. मग प्रमोदनं त्याची मारूती स्वीफ्ट बाहेर काढली. हायवेला लागताच स्वीफ्ट विमानाच्या वेगाने धावू लागली. प्रमोदचं ड्रायव्हींग मात्र अत्यंत सावध! एका क्षणासाठी नजर रस्त्यावरून ढळत नव्हती. आम्ही गप्पात रंगलो. पाटलांकडे उत्तमोत्तम कविता, गझलांचा संग्रह! मग त्यांनी मोबाईलला ‘खुलजा सिम सिम’चा आदेश दिला व मोबाईल बोलू लागला.
मुझे ऐसे अश्क की है तलाश
जिसे मेरे अक्स की है तलाश
मुझे कोई छू न सके जहॉं
मुझे ऐसे तख्त की है तलाश
जो मुझे वजूद दिला सके
किसी ऐसी बज्म की है तलाश
मुझे धडकनों में मिला सके
मुझे ऐसे शख्स की है तलाश
मैं छुपा सकूँ गम-ए-दिल जहॉं
मुझे ऐसे जश्‍न की है तलाश
तेरे नामसे भी न धड़के दिल
मुझे खुद की नब्ज की है तलाश
मेरे दिल में कोई न चाह हो
मुझे ऐसे वक्त की  है तलाश
बने फिर से खाक से आदमी
किसी ऐसी रस्म की है तलाश

एक बाई शांत, संथ आवाजात कविता म्हणत होत्या. ‘‘या अपर्णा कडसकर’’ पाटील सांगतात. ‘‘आपल्या परिचयाच्या आहेत. सांगवीत राहतात’’ पाटील. हिंदीत अशी कविता करणारी माणसं महाराष्ट्रात आहेत? मनात सुखद विचार येतो. तेवढ्यात पाटलांनी पुन्हा ‘खुलजा सिम सिम’ म्हटलेलं असतं.
तोपर्यंत पाटलांनी पुढच्या कवितेला हाक मारलेली असते.
माझ्या गावात राहतो तिकडं
राब राबणारा माझा बाप
राब राबून मातीत तेथे
त्याच्या कातड्याला पडलाय राप...
तो मातीत गाळतोय घाम
त्याचा लाटतात सारे दाम
नाही राहण्यास चांगले धाम
त्याच्या मुखात तरीही राम
तो भाकरीशी खातोय ठेचा
तुम्हा पुरवून साखर तूप...
इथं तुमची लाखाची भाषा
त्याला पैशाची नाही आशा
त्याच्या हाताच्या पुसल्या रेषा
वेच वेचुन रानातल्या काशा
तुम्ही सुखात राहता येथे
त्याच्या दुःखाला नाही माप...
इथं बुटात लागतात मोजे
तिथं पायाला कुरूपाचे ओझे
घटं हाताला रोजच ताजे
त्याला दुपार सदाच भाजे
जगण्यापरीस देखील आता
त्याला मरण वाटतंय सोपं...
त्याला सुखाचं हाय बघा वाण
त्याला उन्हाचं लाभलंय दान
नाही तालात जगायचं भान
त्याची कर्जात सापडली मान
पुण्य साधून देखील फेडतोय
कुण्या जन्मातलं तो पाप...
त्याला लाभावी सदिच्छा थोडी
गोड गुळाची भाकरीला गोडी
गायी गुरानं फुलावी वाडी
गहू जोंधळ्यानं भरावी गाडी
दैन्य सरुन जीवाचे सारे
त्याची सुखात नांदावी खोप...
माझ्या गावात राहतो तिकडं
राब राबणारा माझा बाप.

हे कवी असतात माधव गिर. ‘चपराक’चे सहसंपादक. कविताच जगणारा माणूस! पाटलांचं वय तीस. अठराव्या वर्षी त्यांनी ‘चपराक’ सुरू केलं. मधे बारा वर्ष गेली या काळात ‘चपराक’ने किती लेखक, कवी जोडले गणती नाही! गाडी कराडमध्ये येते. तिथं तुषार उथळे पाटील वाट पाहत असतात. उथळे पाटील ‘चपराक’चे व्यवस्थापक. मग एका हॉटेलमध्ये जेवण होतं. मग ठरतं, आजचा मुक्काम कराडमध्येच. जवळच बर्‍यापैकी लॉज मिळतं. प्रमोद लॉजच्या आवारात त्याची ती देखणी गाडी पार्क करतो. आम्ही आमच्या रूम गाठतो. झोपण्यापूर्वी मी ‘शिवसहस्त्रनामावली’ म्हणतो. मनात एक भावना असते, सगळं काही घडवून आणणारा ‘तो’ आहे. बारा साडे बारा वाजतात. झोप लागते. शांत झोप.
दि. 28 ऑगस्ट. पहाटेचे पाच वाजलेले. पाटलांनी हाक मारली. जाग आलेलीच होती. उठल्यावर चहा हवाच असतो. पाटलांनी चहाची ऑर्डर दिलेली. प्रमोदनं गरम पाण्याची बादली आणून ठेवली. तुषार पुढच्या तयारीला लागला. तिशीबत्तिशीतली ही लेकरं! सकाळपासूनच अशी सगळी काळजी घेत असतात. अशा वेळी उगीचच प्रौढ झाल्यासारखं वाटत राहतं आपल्याला. ‘शिवकवच’ म्हणत आंघोळ आटोपली. सगळे आवरून तयार होते. साडेसहाच्या आसपास गाडी बेळगावच्या दिशेने निघालीसुद्धा. पहाटेची प्रसन्न वेळ! गार वारा! गप्पांची मैफल! पाटील, तुषार, कोरे धमाल किस्से सांगतात. मी व प्रमोद ऐकत राहतो. एके ठिकाणी नाश्ता व चहा होतो. तेवढ्यात मी किरण गावडेंना एसएमएस करतो ‘‘दादा, व्हेरी गुड मॉर्निंग! नऊ वाजेपर्यंत बेळगावात येतो आहे.’’ किरण गावडे कोण? तर गेली पंचवीस वर्ष सीमालढ्यात लढणारा बेळगावातला एक कार्यकर्ता! पाहताक्षणी प्रेमात पडावं असं व्यक्तिमत्त्व! अतिशय दिलेर!! इथल्या त्या दुष्ट चक्रव्यूहाशी लढताना हा माणूस नेहमीच पुढं होता. किरण ठाकूरांच्या गळ्यातला ताईत! पाचच मिनीटात गावडेंचा फोन येतो, ‘‘खानापूरला थोडं काम आहे. ते उरकून प्रकाशनाच्या ठिकाणी भेटतो.’’ गावडेसुद्धा तिकडं रियल इस्टेटच्या क्षेत्रात काम करतात. किरण ठाकूरांच्या अनेक संस्था. त्याचंही काम ते पाहतात. तर आता गाडी बेळगावच्या जवळ आलेली असते. समोर बेळगाव दिसू लागतं. नितांतसुंदर शहर! लोकमान्य रंगमंदीर. तिथं प्रकाशनाचा कार्यक्रम असतो. आम्ही पत्ता विचारत सभागृहाकडे जातो. मग लक्षात येतं, हे रंगमंदीर किरण ठाकूरांचंच आहे. मूळात किरण ठाकूर हीच एक मोठी संस्था आहे. ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ ही ठाकूरांची संस्था. तिच्या देशभर 195 शाखा. नुसत्या गोव्यातच 46 शाखा. सुमारे पंधराशे कोटींच्या ठेवी व बाराशे कोटींच्या आसपास कर्जवाटप! नुसत्या गोव्यातच 550 कोटींपेक्षा जास्त ठेवी! सगळा अवाढव्य कारभार! कारभाराला मात्र शिस्त व विश्‍वासार्हता! कुणीही डोळे झाकून विश्‍वास ठेवावा! शिवाय ठाकूरांचं ‘तरूण भारत’ हे वृत्तपत्र आहेच. सीमाभागात प्रत्येक घरात असतं हे वृत्तपत्र. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधूदूर्ग इथं वृत्तपत्राचा चांगला खप. गोव्यात तर हे वृत्तपत्र चक्क पहिल्या क्रमांकावर! हजारो कर्मचार्‍यांनी हे काम उभं केलेलं! आता तर ठाकूरांचं ‘तरूण भारत’ मुंबई-पण्यातही आलंय. ठाकूरांना सीमाभागात सगळे ‘मामा’ म्हणतात. मामा जगभर फिरतात; मात्र सीमाभागावर त्यांचं बारीक लक्ष असतं. हा माणूस सीमाभागातल्या जनतेची काळजी घेणारा. सीमालढा लढणारा त्याचवेळी शेकडो तरूणांच्या आयुष्याशी जोडला गेलेला. साहित्यावर प्रेम करणारा व पत्रकारितेत तर अफाट उंची गाठणारा!

'लोकमान्य ग्रंथालयाची माहिती देताना अशोक याळगी.
मग हे ‘लोकमान्य रंगमंदीर’ आहेे काय नेमकं? तर पूर्वी हे ‘रीझ थिएटर’ होतं. चित्रपटाचं टॉकीज. त्याचे मालक होते रावसाहेब हरीहर. ते कानडी गृहस्थ. माणूस रसिक. मराठी कलाकारांना प्रोत्साहन देणारा. अनेक गायक वादकांची कदर करणारा. पु. ल. देशपांडे त्यांचे मित्र. त्यावेळी पु. ल. बेळगावमध्येच राहत. रीझ टॉकीजचं आवार. तिथं पु. ल. खुर्ची टाकून बसत. ‘दूधभात’ हा मराठी चित्रपट. त्याचं संवादलेखन पु. ल. नी इथंच केलं. ही सगळी माहिती आम्हाला देत होते प्रसाद प्रभू. ‘तरूण भारत’चे पत्रकार. बेळगावचं राणी पार्वतीदेवी कॉलेज. तिथं पु. ल. मराठीचे प्राध्यापक होते. आजही ते कॉलेज आहे. बेळगाव हे रसिकांचं शहर! वेडी(?) माणसं राहतात इथं. किरण ठाकूर यांनी रिझ थिएटर विकत घेतलं. का? तर मराठी भाषा, साहित्य, मराठी सांस्कृतिक कार्यक्रम यांना हक्काची जागा असावी म्हणून. हा व्यवहार झाला 2009 साली. बेळगावातली ही मध्यवर्ती जागा. बेळगावातलं राजकारण ठाकूर कोळून पिलेले. कानडी सत्ताधारी एकेक कट रचत होते. मराठी शाळा त्यामुळं बंद पडत होत्या. कानडीची सक्ती होत होतीच, शिवाय बेळगावातला कानडी टक्का वाढावा अशीही कारस्थानं होत होती. ठाकूरांकडे आर्थिक ताकत होती. तिचा सदुपयोग त्यांनी अत्यंत शांतपणे व मुत्सद्दीपणे हे कानडी आक्रमण रोखण्यासाठी केला. रिझ थिएटरचं मग ठाकूरांनी ‘लोकमान्य रंगमंदीर’ करून टाकलं. त्याच्याच आवारात लोकमान्य मल्टी. को-ऑप. सोसा.चं अप्रतिम ऑफिसही बांधलं. रिझ थिएटर खूप जूनं. आजही ते तसंच आहे. जून्या काळातच घेऊन जातं ते आपल्याला. आता तिथं सर्व मराठी कार्यक्रम होतात. अगदी हक्काची जागा!
विजय नाफडे हे गृहस्थ. बेळगावलाच राहतात. या थिएटरमध्ये ते सातत्यानं एक कार्यक्रम करतात. जून्या चित्रपटांशी संबंधित. जूने हिंदी चित्रपट दाखवणं, त्यांच्या आठवणी जागवणं असा तो प्रकार. जूनी हिंदी गाणी. त्याच्याशी संबंधितही अनेक कार्यक्रम ते करतात. बलराज सहानी, कमाल अमरोही, गीता दत्त, शंकर जयकिशन, साहिर लुधियानवी, मीना कुमारी, लता मंगेशकर यांच्याशी संबंधित हे कार्यक्रम असतात. इतरही अनेक जुने कलाकार. त्यांची पोस्टर्स थिएटरमध्ये कायमस्वरूपीच लावून ठेवलेली. ‘‘नाफडेंना भेटता येईल का आपल्याला?’’ मी प्रसाद प्रभूंना विचारतो. ‘‘येईल की; पण त्यांना भेटायचं म्हणजे एक दिवस पाहिजे’’ प्रभू. अर्थ स्पष्ट होता. जुन्या चित्रपटांचा चालता बोलता कोषच असला पाहिजे तो माणूस. अशा माणसांना भेटणं हे तास दोन तासांचं काम नाही. मी जगदीश कुंटेंना फोन करतो. कुंटे ठाकूरांचे विश्‍वासातले सहकारी. ‘दै. तरूण भारत’चा व्याप सांभाळतात. पत्रकार व व्यंग्यचित्रकार देखील. ‘‘संध्याकाळी पाचच्या दरम्यान भेटू. त्याआधी तुम्ही अशोक याळगींना भेटून घ्या’’ ते सांगतात. दुसर्‍या क्षणी एसएमएस येतो. कुंट्यांनी याळगींचा मोबाईल क्रमांक पाठवलेला असतो.

साधारण साडेदहाचा सुमार. प्रभू आम्हाला प्रशांत बर्डेंच्या घरी घेऊन गेले. बर्डे बेळगावातले ज्येष्ठ पत्रकार. सध्या आजारी आहेत. तिथंच ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे व त्यांचे अनेक सहकारी असतात. बेळगावातली पत्रकार विकास अकादमी. धुमे तिचे अध्यक्ष आहेत व बर्डे तिच्या कार्यकारी मंडळात. घनश्याम पाटलांच्या उपस्थितीत घरातच बर्ड्यांचा सत्कार केला जातो. बेळगावमध्ये पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची परंपराच आहे. अगदी बाबूराव ठाकूरांपासून चालत आलेली. त्याकाळी महाराष्ट्रातून बेळगावात कार्यकर्ते येत. अगदी आचार्य अत्र्यांपासून क्रांतीसिंह नाना पाटलांपर्यंत. मग बाबूराव ठाकूर सगळ्यांच्या राहण्या-जेवण्याची काळजी घेत. बर्डेंच्या घरात जाताक्षणीच आमच्यापुढं नाश्ता आला; मात्र आमचा नाश्ता झालेला; पण चहाला कोण नाही म्हणतो? पाटलांच्या शब्दात सांगायचं तर आपण सगळी ‘चहाबाज’ माणसं!
इथून लोकमान्य रंगमंदीरात आलो. प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी स्थानापन्न झालो. बेळगावकरांच्या रसिकतेचा पावलोपावली अनुभव येत असतो इथं. प्रकाशनापूर्वी जुन्या हिंदी चित्रपट गीतांची संगीतधून ऐकवली जात होती. ‘रसिक बलमा तोसे दिल क्यूँ लगाया’, ‘वो जब याद आये, बहुत याद आये, गमे जिंदगीके अंधेरेमे हमने चरागे मोहब्बत जलाये बुझाये’, ‘बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया है’ या चित्रपटांच्या संगीतधून. आपल्याकडे बर्‍याचदा कुठल्याही कार्यक्रमापूर्वी उगीचच माशा मारत बसावं लागतं. तेवढ्या वेळात मनाला तृप्त करणारं, हुरहूर लावणारं काही ऐकवता येतं हे आवर्जून लक्षात घेणारे बेळगावकरंच. आत येण्यापूर्वी बाहेरच्या शोकेसकडे नजर गेली तर तिथेही एक कविता.
पाऊस आला, पाऊस रूसला, लपून बसला
वारा पुसतो आकाशाला
किती शोधला नाही गवसला
पाहिलंस का तू मेघाला?
रखरखलेली वसुंधरा ही
पाण्यासाठी आसुसलेली
शुष्क वृक्ष अन् सुकल्या वेली
शेतामधल्या वाफ्यामधली
बीजपेरणीही पुरी करपली
तहानलेल्या विहीरी आटल्या
नद्या आपुले पात्र विसरल्या
तळी, कालवे, ओढे, नाले
पाण्याविन सारे तळमळले
मग यानंतर होतं काय? तर
सुसाट वारा चमकत बिजली
गर्दी ढगांची नभी दाटली
थेंबी थेंबी पाऊस आला
गंध मातीचा जगी पसरला
उधानलेल्या आनंदाला
सुख सौख्याचा बहर आला
सुख सौख्याचा बहर आला

प्रकाशनाच्या कार्यक्रमाला चांगली गर्दी झालेली. सुत्रसंचालन प्रसाद प्रभूच करत होते. कुंडीतल्या एका रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. हा पर्यावरण संभाळण्याचा संदेश. तो किती महत्त्वाचा हे सांगायलाच नको. बेळगावमधली पत्रकार विकास अकादमी. ती बाबूराव ठाकूरांच्या नावाने पत्रकारांना पुरस्कार देते. आधी हे पुरस्कार देण्यात आले. दै. हिंदूचे विजय पाटील, लोकमतचे भिमगोंडा देसाई, तरूण भारतचे युवराज पाटील, प्रजावाणी व डेक्कन हेरॉल्डचे छायाचित्रकार चेतन कुलकर्णी यांना हे पुरस्कार देण्यात आले. मग दोन पुस्तकांचं प्रकाशन. ‘फ्लॅश बॅक’ व ‘चौथा स्तंभ’. बेळगावचे महापौर किरण सायनाक, कवी व लेखक सुनिलकुमार लवटे, या दोन्ही पुस्तकांचे लेखक सुभाष धुमे,  घनश्याम पाटील आदी मंडळी व्यासपीठावर होती. कुंतीनाथ कल्पनी हे कन्नड पत्रकार. त्यांनाही पुरस्कार देण्यात आला. प्रकाशनाच्या कार्यक्रमात डॉ. लवटे खूप सुंदर बोलले. ‘‘बेळगावच्या महापौरपदाच्या वेदना त्या खूर्चीवर बसल्यावरच कळतात’’ ते म्हणाले. कार्यक्रमानंतर मी व महादेव कोरेंनी डॉ. लवटेंशी संवाद साधला. लवटे हा कमालीचा संवेदनशील माणूस! त्यात लेखक व कवीदेखील. सध्याच्या एकूण परिस्थितीबद्दल ते बोलले. माणसं माणसांपासून तुटताहेत हा त्यांचा मुद्दा होता. ‘‘आता कुणी कुणाला ‘घरी चला’ असंही म्हणायला तयार नाही. आधी सांगून वेळ घेतल्याशिवाय कुणाकडे जाण्याची सोय नाही. पूर्वी पत्रकार सुद्धा घरी येत, चहापाणी होत असे त्यातून पत्रकार मुद्दे घेत. आता असं होत नाही’’ लवटे म्हणाले. पुण्यावर तर त्यांचा रागच होता. ‘‘पुणं हे सर्वात अमानुष शहर आहे. तिथं माणसं नाही, यंत्रं राहतात’’ ते पुढं म्हणाले. लवट्यांचं बोलणं खोडून काढता येणं कठिण होतं. लवटे कोल्हापूरचे. याबाबतीत पुणे असं अप्रिय का झालंय हे ज्याचं त्यानं ठरवावं. कार्यक्रमात सर्वांचीच भाषणं झाली. घनश्याम पाटीलही बोलले. ‘चौथा स्तंभ’ हे चपराक प्रकाशनचं 80 वं पुस्तक. पाटलांनी किती लेखक, कवींना लिहितं केलं असेल याची कल्पना यावी. चपराकचा दिवाळी अंकसुद्धा असतोच. ‘‘दिवाळीच्या वेळी मिठाईच्या बॉक्सबरोबर दिवाळी अंकसुद्धा भेट दिले पाहिजेत’’ पाटील म्हणाले. विचार करण्यासारखं वाक्य होतं ते. मिठाईच्या बॉक्सबरोबर दिवाळी अंक! दुधात केशर! हे घडलं पाहिजे. माणसं वाचती होणं फार महत्त्वाचं असतं कुठल्याही समाजात. आपल्याकडे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात कमीच. दिवाळी अंक वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतात. त्याचा विचार व्हायला हवा. काही वेळा तो होत नाही. विशेषत: डोक्यात नुसत्या जाहिराती असतात काही जणांच्या. त्यांचे अंकही बेकार! खरा संपादक अर्थकारण सांभाळतोच; मात्र काही अस्सल छापायच्या मागं असतो. बर्‍याचदा ते त्याला लेखकाकडून काढून घ्यावं लागतं.
एक सांगायचं राहूनच गेलं. प्रकाशनानंतर सायनाकांशी बोललो. सीमाप्रश्‍नाबद्दल विचारलं. त्यांनी वेगळाच मुद्दा मांडला. ‘‘आता कर्नाटकचेच दोन राज्य होतील. उत्तर व दक्षिण कर्नाटक. बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने जी विधानसभा बांधलीय ती त्यासाठीच. उत्तर कर्नाटकसाठी. हेच होणार बघा तुम्ही’’ सायनाक म्हणाले. त्यांचं ते वाक्य खटकत राहिलं. हेच होणार असेल तर साठ-साठ वर्ष माणसं लढताहेत कशासाठी? आणि महापौरांनी तर सामान्य जनतेसोबतच असलं पाहिजे. त्यांनी कर्नाटक सरकारची री ओढून कसं चालेल? महापौरांनी आम्हाला महानगरपलिकेत यायचं निमंत्रण दिलं. त्याआधी आम्ही लोकमान्य ग्रंथालय पाहयला गेलो. किरण ठाकूरांनी उभं केलेलं हे ग्रंथालय. बेळगाव शहराबाहेरचा एक सुंदर जुना दगडी वाडा! तो ठाकूरांनी विकत घेतला. तिथं सुंदर ग्रंथालय उभं केलं. हजारो ग्रंथांचा तो सुंदर संसार! प्रत्येकानं तिथं जाऊनच तो पहावा. ग्रंथालयात दोन दालनं आहेत. एक जी. ए. कुलकर्णी दालन व दूसरं कमल देसाई दालन. हे दोघे प्रसिद्ध मराठी साहित्यिक. त्यांची पुस्तकं, हस्तलिखितं, पत्रं तिथं आहेत. जी. ए. उत्तम चित्रकारसुद्धा होते. त्यांची चित्रे तिथं आहेत. ते राहत धारवाडला. बेळगावमध्येही त्यांचं घर होतं. गोंधळी गल्लीत. बेळगावात त्यांचा जीव अडकला होता. त्या घराचा फोटोही आहे इथं. आता बेळगाव खूप आधुनिक झालंय. जी. ए. च्या घराचा तो फोटो मात्र आपल्याला पंचवीस-तीस वर्ष मागं घेऊन जातो. या ग्रंथालयाचे काम पाहतात अशोक याळगी. सत्तरीला टेकलेले वय; मात्र उत्साह भन्नाट! तरूणांना लाजवेल असा! याळगी ग्रंथालयाचा कानाकोपरा दाखवतात. तळहाताच्या फोडाप्रमाणे हे ग्रंथालय जपलंय याळगींनी. याळगी स्वत: मराठी व कानडी साहित्याचे उत्तम जाणकार. मराठीतले उत्कृष्ट लेखक व अभ्यासक! हे ग्रंथालय त्यांचा जीव की प्राण! ग्रंथांलयाच्या मागे प्रशस्त आवार. तिथं अधुनमधून सांस्कृतिक कार्यक्रम होतात. छोटी कविसंमेलनंसुद्धा. जवळच एक सुंदर विहिर! इतकी खोल की डोळे फिरावेत! पहिल्या मजल्यावर मुख्य ग्रंथालय. ज्ञानेश्‍वर, तुकोबा व समर्थांचे फोटो व त्यांची वचनं. पहिल्या मजल्याकडे जाताना ती समोरच लावलेली. याळगी अखंड बोलत असतात. माहिती देत असतात. या ग्रंथालयाला अनेक मोठ्या लोकांनी भेटी दिलेल्या. त्यात डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भीमराव गस्ती, गिरीश कुबेर, अरूणा ढेरे, पुष्पा भावे अशी अनेक मंडळी आहेत. ग्रंथालयातील अभिप्राय पुस्तिका. त्यातल्या नेमाडे सरांच्या शुभेच्छा सांगण्यासारख्या. दि. 5 ऑक्टोबर 2014. या दिवशी ते ग्रंथालयात आलेले. ‘‘आज लोकमान्य ग्रंथालयातला वेळ माझ्या कायम स्मरणात राहिल. आपली संस्कृती टिकवण्याचं हे महत्त्वाचं वेड आहे. माझ्या या कार्यकर्त्यांना शुभेच्छा!’’ नेमाडे सर अभिप्रायात म्हणतात. याळगींचे मित्र श्री. सुधीर जोगळेकर. ते सावलीसारखे याळगींबरोबर वावरत असतात. पन्नाशीचा शांत व अत्यंत नम्र माणूस! ते फारसं बोलत नाहीत; मात्र त्यांच्या डोळ्यात कौतुक असतं, इतकी तरूण मुलं ग्रंथालयात आल्याचं. ग्रंथालयात हर तर्‍हेचे ग्रंथ. अगदी गो. स. सरदेसाईंच्या मराठी रियासतीच्या आठ खंडापासून ते अपर्णा वेलणकरांच्या ‘शांताराम’ पर्यंत. ग्रंथालयाचं पहिल्या मजल्यावरील दालन. तिथं आम्ही थोडा वेळ विसावतो. याळगी कॉफी व बिस्किटं मागवतात. मग घनश्याम पाटील अभिप्राय पुस्तिकेत अभिप्राय लिहितात. त्यांचा साहित्याच्या क्षेत्रातला अधिकार मोठा. त्यांनी अभिप्राय लिहिणं संयुक्तिकच; मात्र तिथलं वातावरण पाहून मलाही राहवत नाही. मग मीही अभिप्राय लिहितो. दरम्यान किरण सायनाकांचे दोन-तीन फोन येतात. श्री. व्यंकटेश जाधव यांना ते फोन करत असतात. जाधव मग आम्हाला आग्रह करतात, ‘‘महापौर वाट पाहताहेत. लवकर चला.’’ मात्र याळगी आम्हाला सहजासहजी सोडायला तयार नसतात. ते तिथून आम्हाला उचलतात व सरळ एका भन्नाट माणसाकडे घेऊन जातात. रिटायर्ड असिस्टंट कमांडंट शंकर चाफाडकर! बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये आयुष्य वेचलेला माणूस! तेव्हा त्यांच्या हातात बंदूक होती. ते त्यांचं कर्तव्य होतं. त्याकाळी त्यांनी पदवी घेतली. नंतर लगेचच ते शिपाई म्हणून बीएसएफ मध्ये भरती झाले. पदोन्नती मिळाली. पुढं निवृत्ती. नंतर या माणसानं काय करावं? तर स्वत:च्या सुंदर अशा छोटेखानी फ्लॅटमध्ये एक अप्रतिम ग्रंथालयच निर्माण केलं. मागच्या दहा एक वर्षातला हा त्यांचा अचाट उद्योग! काय गरज होती पदराला खार लावून हे करण्याची? मात्र एका लष्करी माणसाला ग्रंथांचं महत्त्व पटलं होतं. लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचं महत्त्व! ग्रंथांवर अतूट प्रेम या माणसाचं! बायको, मुलं काही नाही. ‘‘हीच माझी बायका पोरं’’ हॉलमधील ग्रंथांकडे बघत ते म्हणतात. घरातली ग्रंथांची शोकेसमधली चौफेर मांडणी अत्यंत शिस्तबद्ध! सगळ्या ग्रंथांचं पद्धतशीर वर्गीकरण. चरित्र, आत्मचरित्र, काव्य, कादंबर्‍या, वैचारिक, मराठी ग्रंथ, इंग्रजी ग्रंथ! ग्रंथांची अक्षरश: लयलूट!! अलीबाबाची गुहाच!! बरं, माणूस लष्करातला तर कठोर तरी असावा की नाही? तसंही दिसत नाही. कमालीचा प्रेमळ माणूस! सुमारे पाच हजार ग्रंथांच्या संसारात रममाण झालेला! कोणीही केव्हाही त्यांच्याकडे जाऊ शकतो. तिथं बसून कितीही वेळ वाचू शकतो. अट एकच, त्यांच्या हातचा चहा प्यायचा व पुस्तकं बाहेर मात्र न्यायची नाहीत. आपल्या समाजात अशी माणसं नसती तर? जग अशा माणसांमुळं सुंदर वाटू लागतं. सायनाकांचे इकडे पुन्हा फोन येतात; मात्र आम्हाला सहजासहजी सोडतील ते चाफाडकर कसले? त्यांनी कॉफी ठेवलेली असते. आम्ही किचनमध्ये डोकावतो तर तिथंही ग्रंथांचा प्रपंच! दोन छोट्या बेडरूम. तिथंही तेच. आमचं डोकंच चालत नाही. बरं, हा माणूस स्वत:ही वाचतो. उगीच केलेली शोबाजी नाही ही. ग्रंथांशी संबंधित सुविचार सुंदर अक्षरात भिंतींवर ठिकठिकाणी लावलेले. ‘‘लायब्ररी इज द हॉस्पीटल फॉर माइन्ड(ग्रंथालय हे मनाचे आरोग्य केंद्र होत.)’’ त्यातलाच एक सुविचार. एका बेडरूमच्या भिंतीवर आणखी एक विलक्षण दृश्य दिसतं. 88 संमेलनाध्यक्षांचे फोटो भिंतीवर लावलेले. अगदी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांपासून ते डॉ. सदानंद मोरेंपर्यंत. खरोखर आश्‍चर्य! एकेका फोटो साठी या माणसानं किती यातायात केली असेल? भिंतीवर अजून दोन फोटो श्रद्धेनं लावलेले. एक शिवशाहिर बाबासाहेब पुरंदर्‍यांचा व दुसरा डॉ. भालचंद्र नेमाडेंचा. ‘‘पुन्हा तुमच्याकडे निवांत वेळ काढून येतो’’ आम्ही त्यांना म्हणतो. निघण्यापूर्वी मी चाफाडकर, याळगी व जोगळेकरांचे पायच धरले. अशी माणसं होणार आहेत का परत? मनात हेच काहूर होतं त्यांचे पाय धरताना!
तिथून आम्ही थेट आलो ते बेळगाव महानगरपालिकेत. महानगरपालिकेची ती प्रशस्त, भव्य इमारत! तिच्याकडे पाहतो तेव्हा जाणवतं, बेळगाव चक्रव्यूहात आहे! किती लढे पाहिलेत या शहरानं! किती वेळा ही महापालिका बरखास्त करण्यात आली! हे कानडी सत्ताधार्‍यांचे उद्योग! मात्र आजही इथं झेंडा फडकतो तो महाराष्ट्र एकीकरण समितीचाच. महाराष्ट्र एकीकरण समिती हे काय प्रकरण आहे? तर 1946 सालीच हिची स्थापना झाली होती. उद्देश एकच, हा सगळा सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा. त्याच्याही आधी काय घडलं होतं? ते 1921 साल होतं. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी. तिनं तेव्हा 15 प्रांतिक कॉंग्रेस कमिट्यांची स्थापना केली. त्यावेळी बेळगाव जिल्ह्याचा समावेश कर्नाटक प्रांतिक कमिटीत करण्यात आला. दुखणं तिथूनच सुरू झालं. मग सीमा भागातले कार्यकर्ते एकत्र आले. त्यात डॉ. गो. शा. कोवाडकर, वि. ना. मिसाळ, वसंतराव हेरवाडकर, बाबूराव देसाई ही मंडळी होती. त्यांनी म. ए. समिती स्थापन केली. याचा अर्थ चाळीसच्या दशकापासून हा लढा सुरू आहे. लढ्याला अद्यापही अंत नाही अशी परिस्थिती! दुसरीकडं कर्नाटकच्या सत्ताधार्‍यांनी सगळीकडून फास आवळत आणलेला! बेळगावचं नामकरण त्यांनी बेळगावी केलंच. मराठा लाईट इन्फट्रीचं मोठं लष्करी कार्यालय. ते बेळगावमध्ये आहे. मराठी शाळा आहेत. शिवाजी गार्डन सारख्या बागा आहेत. या मराठमोळ्या खुणा कानडी सत्ताधार्‍यांना सलतात, मग त्यांनी ठरवलं, मूळावरच घाव घालावा. केलं ‘बेळगावी’. एका मोठ्या मेडीकल इन्स्टिट्यूटच्या फलकावर बेळगावी असाच उल्लेख होता. बर्‍याच ठिकाणी तो तसा आहेच. हा सगळा जुलमाचा रामराम!
तर लिहित होतो महापौरांच्या भेटीबद्दल. सायनाक महाराष्ट्र एकीकरण समितीचेच महापौर; मात्र म. ए. समितीत सगळं काही आलबेल नाही. आम्ही गेलो तर सायनाकांची मिटींग चालू होती. थोडा वेळ वाट पहावी लागली. तेवढ्यात चहा झाला. नंतर सायनाकांशी बोललो. सायनाकांचं बोलणं मिठास! जिभेवर नुसती साखर! त्यांना समजलं, आम्ही बेळगावजवळ बांधलेली विधानसभा बघायला जाणार आहोत. ‘‘एकदम मस्त बांधलीय विधानसभा! बघण्यासारखी आहे!’’ सायनाक म्हणाले. ‘‘मी तुम्हाला म्हटलो होतो ना! तसंच होणार बघा! लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून’’ ते मला म्हणाले. काय म्हणाले होेते ते मला? तर भविष्यात कर्नाटकची दोन राज्यं होतील. उत्तर व दक्षिण कर्नाटक. मग उत्तर कर्नाटकसाठी ही नुकतीच बांधलेली विधानसभा उपयोगी येईल. प्रश्‍नच पडला आम्हाला! सायनाक कौतुक कुणाचं करत होते? तर कर्नाटक सरकारचं. विधानसभा बांधल्याबद्दल. कर्नाटकचे सत्ताधारी. ते सीमाप्रश्‍नाच्या संदर्भात सरळ कधीच वागले नाहीत. त्यांनी ही विधानसभा बांधली. त्यामागचं कारण काय? तर त्यांना बेळगावला कर्नाटकच्या उपराजधानीचा दर्जा द्यायचा आहे. तसं करून बेळगाव व सीमाभाग कायमचा गिळायचा हा हेतू. त्यासाठी सीमाभागाच्या उरावर ही टोलेजंग विधानसभा बांधलेली. त्यासाठी फक्त (?) तीनशे साठ कोटी रूपये खर्च केले. बरं, ही विधानसभा बांधून कुणाकडून घ्यावी त्यांनी? तर पुण्यातल्या बी. जी. शिर्के यांच्या कंपनीकडून! शिर्केंना इतरही सरकारी कंत्राटं मिळतात म्हणे कर्नाटकमध्ये. मग त्यांनी थेट विधानसभाच बांधून दिली. कसला सीमालढा अन् कसलं काय? सीमालढा महत्त्वाचा की तीनशे साठ रूपयांचं कंत्राट महत्त्वाचं? पण सायनांकांनाही असंच वाटत होतं की काय? तसं वाटत असेल तर काळ कठीण आहे! सीमाभागात हे चाललंय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे सगळे प्रकार घातकी!! दुसरीकडे माणसं लढताहेत! किरण ठाकूर लढताहेत! त्यांचा ‘दै. तरूण भारत’ लढतोय. ही गल्लीतली लढाई नाही. काल परवाची लढाई नाही. पाच तपांची लढाई आहे. साठ वर्षांचा लढा आहे. दुसरीकडे आहेत चार-चारशे कोटींची कंत्राटं!! त्यात सायनाकांचं ते वाक्य. काय होणार आहे या सीमालढ्याचं? महापालिकेतून किरण गावडेंना फोन केला. व्यापात होते; मात्र भेटतो म्हणाले.
तिथून निघालो ते विधानसभा बघायला. बेंगलोरच्या दिशेने हायवेनं आम्ही निघतो. बेळगावपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर आलो. समोर पाहतोय तर डाव्या बाजूला एका छोट्या डोंगरावर एक भव्य इमारत! आमच्याबरोबर व्यंकटेश जाधव होते. तरूण भारतचे पत्रकार. अतिशय सहकार्यशील माणूस. सकाळपासून आमच्याबरोबरच होते. जाधव विधानसभेच्या सुरक्षारक्षकांशी बोलले. तिथला बंदोबस्त कडेकोट! विधानसभेचं आवार प्रचंड! त्याला चारी बाजूनं कपांऊंड. सुरक्षारक्षक मोजकेच; मात्र सावध व जागरूक. मुख्य दरवाजातून आम्हाला आत जाऊ देण्यात आलं. समोर उंचच्या उंच भव्य इमारत! इमारतीच्या आत जायची परवानगी मात्र मिळाली नाही. ‘‘त्याला जिल्हाधिकार्‍यांची परवानगी लागते’’ जाधव म्हणाले. थेट जिल्हाधिकार्‍यांची परवानगी! अधला मधला मार्गच नाही. मग आम्ही संपूर्ण विधानसभेला चालतच वळसा घातला. तिनशे साठ कोटींचा तो देखावा खरोखर पहावा ैअसा! मात्र कौतुकानं पहावा असा आहे काय? बरं, ही जागा ताब्यात घेतानाही खुनाखुनीचे प्रकार घडले. ही खाजगी जागा. ती ताब्यात घेताना जागा मालकांना कर्नाटक सरकारने पैसे दिले. त्याच्या देवघेवीतून बेळगावातल्या एका पुढार्‍याचा मुडदा पडला. इमारतीपुढं उभं राहून फोटो काढले तर अंगावर पाल पडल्यासारखं वाटत राहिलं. ‘‘आम्ही कधीही इकडं येत नाही. आम्हाला आवडत नाही’’ जाधव म्हणाले. हा काही जाधवांचा कानडी द्वेष नाही किंवा त्यांचा खुनशीपणा तर अजिबात नाही. त्यांचा संताप आहे तो हे सगळं वर्षानुवर्ष सोसावं लागत आहे त्याबद्दल. हा संताप कटकारस्थानांबद्दलचा आहे. कपट व कपटातून निर्माण होणारं क्रौर्य त्याबद्दलचा हा संताप आहे. साम-दाम-दंड-भेद! यात कानडी सत्ताधारी पटाईत! माणसं विकत घेण्यात वस्ताद! आता प्रश्‍न सुप्रिम कोर्टात आहे अन् सगळ्या सीमाभागाचा जीव टांगणीला लागलेला! अकरा कोटींचा महाराष्ट्र या सगळ्याकडे कसं पाहतोय तेही महत्त्वाचं. मध्यंतरी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मागणी केलीय. ‘सीमाप्रश्‍नासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र मंत्रालय हवं.’ संजय राऊत हे धडाडीचे पत्रकार! अभ्यासू खासदार! सीमाप्रश्‍नावर ते सातत्यानं लिहिताहेत. अनेक वर्ष लिहिताहेत. कित्येक लेख, अग्रलेख त्यांनी या विषयावर लिहिलेत व कानडी सत्ताधार्‍यांच्या कपटावर हल्ले चढवले आहेत. त्यांची ही मागणी महत्त्वाची. पण मग हे मंत्रालय होणार कधी? सीमाप्रश्‍नाची सुप्रिम कोर्टातली सुनावणी संपल्यानंतर? तिकडे कर्नाटकने कधीच मोर्चेबांधणी केलीय. फली नरीमन नावाचा वकील. त्याची कर्नाटक सरकारनं नियुक्ती केलीय. सुप्रिम कोर्टात महाराष्ट्राविरूद्ध लढण्यासाठी. हा नरीमन पक्का महाराष्ट्र द्वेष्टा आहे. कर्नाटकची ही नियुक्ती फार बोलकी. आपण त्यातून सावध होतो की नाही हाच खरा प्रश्‍न. कालपरवा पर्यंत हा नरीमन कर्नाटकची बाजू सुप्रिम कोर्टात मांडत होता. यापूर्वी हा प्रश्‍न इंदिरा गांधींकडे गेला तेव्हा त्यांनी महाजन आयोगाची नियुक्ती केली. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी. ते साल होतं 1966. महाजन हे सुप्रिम कोर्टाचे माजी न्यायाधिश. या माणसानं सीमाप्रश्‍नाची माती केली. प्रश्‍न सोडवणं राहिलं दूर, या माणसानं महाराष्ट्राची अवस्था ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी करून टाकली. संपूर्ण अहवाल कर्नाटकच्या बाजूनं दिला. हे असं का? त्यामागचं कारण काय? हे आपण बोलायचं नाही. का? कारण महाजन हे सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश होते व इतकी मोठी माणसं कधीच चुकत नाहीत किंवा विकली जात नाहीत असं आपण गृहीत धरायचं. प्रश्‍न इथल्या व्यवस्थेचा आहे. एक प्रश्‍न साठ वर्ष सुटत नसेल तर सामान्य माणसांचा इथल्या व्यवस्थेवर विश्‍वास राहिल की उडून जाईल? इथं तर सगळा तोंड दाबून बुक्क्यांचा मार! सगळीकडून कोंडी झालेली माणसं मग व्यवस्थेला शिव्याशाप द्यायला लागतात. याचा विचार व्यवस्थेने नाही तर कुणी करायचा? राजानं मारलं व पावसानं झोडपलं तर जायचं कुठं अशी परिस्थिती.
विधानसभा बघत असतानाच किरण गावडेंचा फोन येतो. कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचा एक दवाखाना आहे. तिथं ते थांबायला सांगतात. दवाखान्याजवळ पुणे-बेंगलोर हायवे. तिथं आम्ही गावडेंची वाट पाहत थांबतो. बराच वेळ आम्ही वाट पाहतो. मग एक लांबलचक मोठी कार रस्त्यावरील समोरच्या बाजूला येऊन थांबते. त्यातून एक पन्नाशीकडे झुकत चाललेला कार्यकर्ता उतरतो. झपाट्यानं रस्ता ओलांडून तो आमच्याकडे येतो. चेहर्‍यावर स्मितहास्य. हातात बेळगावच्या सुप्रसिद्ध मिठाईचे, कुंद्याचे काही बॉक्स. ते तो मोठ्या प्रेमानं माझ्याकडे देतो. मला राहवत नाही. मी त्याचे चरणस्पर्श करायला जातो; मात्र तो तसं करू देत नाही. मला सरळ मिठीत घेतो. किरण गावडे! किरणदादा! आता चष्मा लागलाय त्याला व खुरट्या दाढीचे केसही पांढरे होत चाललेले! काळ्याचे पांढरे झाले तरी सीमाप्रश्‍नावर आजही लढतो आहे. त्याच्यासारख्यांनी हा प्रश्‍न अर्धवट सोडलेलाच नाहीये. लाठ्याकाठ्या खाऊन झाल्या. कारागृहातल्या यातनाही भोगल्या; मात्र किरणदादा लढत राहिला. आजही किरण ठाकूरांबरोबर सावलीसारखा वावरतो तो. काही दिवसांपूर्वी तर कर्नाटक सरकारने आणखी एक दुष्ट प्रयत्न केला. किरण ठाकूर व किरणदादावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे बालंट ठेवलं. ही माणसं या सगळ्याला सामोरी गेली. किरणदादाला बेळगावमध्येच भेटलो होतो यापूर्वी. तो दिवस होता दि. 26 जुलै 2013. सीमाप्रश्‍नाच्या अभ्यासासाठीच गेलो होतो तेव्हा बेळगावला. त्या दिवशी सकाळी नऊ वाजले होते. लॉजच्या रूमचा दरवाजा वाजला. समोर हा उभा. ती पहिली भेट. तेव्हाही हातात मिठाईचा बॉक्स होताच त्याच्या. पहिल्या भेटीतच जाणवलं, माणूस ताकतीचा कार्यकर्ता आहे. त्यानंतर ही भेट. बरोबर दोन वर्षांनी झालेली. अधूनमधून फोन व्हायचे इतकंच. त्यामुळेच की काय दादा घडाघडा बोलत राहिला. सीमाप्रश्‍नाबद्दल, त्यातल्या राजकारणाबद्दल. बोलण्यात नुसती पोटतिडीक! सीमाभागात म. ए. समितीचे आमदार ैआहेत. महापौर आहेत; मात्र गणित कुठंतरी चुकतंय. दादा बर्‍याच गोष्टी सांगत राहिला. ‘‘बेळगाव शांत आहे तोपर्यंत शांत आहे’’ मध्येच तो म्हणाला. ही धमकी नव्हती किंवा अहंकारही नव्हता त्याचा. बेळगावच्या रस्त्यावर सीमाप्रश्‍नाच्या लढाया त्यानं लढल्या होत्या. त्याला त्याच्या शहराचा स्वभाव माहीत होता. त्याला एक आत्मविश्‍वास होता. बेळगाव हे शहर कुणापुढंही झुकणारं नाही. मग अशा आणखी चार विधानसभा बांधल्या तरी बेळगावला फरक पडत नाही. ‘‘आता सुप्रिम कोर्टात काही चांगलं घडायला हवं’’ मी त्याला म्हणालो. ‘‘कर्नाटकचे पुढारी समजतात तितकं सोपं नाही त्यांनुसद्धा’’ तो म्हणाला. बोलत राहिलो बराच वेळ. घनश्याम पाटील तर त्या दिवशी आजारीच होते. उभं राहवत नव्हतं अशी परिस्थिती! तरीही किरणदादाचं सगळं बोलणं ते तासभर उभं राहून ऐकत राहिले. शेवटी ते महाराष्ट्राचं दु:ख होतं. ते ऐकून घेण्याशिवाय आमच्या हातात तरी काय होतं? थोड्यावेळानं त्याचा निरोप घेतला. ‘‘एकदा चपराकच्या कार्यालयात ये पुण्याला आलास की’’ मी म्हणालो. संध्याकाळची वेळ. अंधार पडलेला. गाडी पुण्याच्या दिशेने बेफाम धावू लागली. ‘‘ही माणसं हे सगळं सहन कसं करत असतील?’’ महादेव कोरे म्हणाले. कोरे लिंगायत समाजातले. कन्नड भाषिक; मात्र सीमाभागाचं दु:ख जाणणारे. त्यांचा निम्मा जीव इकडं तर निम्मा तिकडं अडकलेला! मात्र मराठीवर उत्कट प्रेम! महाराष्ट्रातच त्यांचं आयुष्य गेलेलं. मराठी त्यांची सख्खी मावशीच. ‘माय मरो मावशी जगो’ उगीच म्हणत नाहीत. कोर्‍यांना मात्र सीमाभागाची वेदना नेमकी कळली होती हे महत्त्वाचं. पुण्यात आलो तेव्हा रात्रीचे दीड वाजले होते.
दुसर्‍या दिवशी सकाळी आठची वेळ. पत्र्या मारूती चौकात उभा होतो. चहाच्या नेहमीच्या ठेप्यावर. हातात कटींग चहा व मनात नुसत्या बेळगावच्या आठवणी! अश्रूच आले दाटून! नुसती हुरहूर! काहीच कळेना.
संध्याकाळी घनश्याम पाटील नारायण पेठेतल्या माझ्या ऑफिसवर आले व त्याच चौकात चहा घ्यायला गेलो तेव्हाही अवस्था तशीच होती. ‘‘दादा, मी आता किरण ठाकूर व किरण गावडेंना पत्र लिहिणार आहे’’ मी पाटलांना म्हणालो. ‘‘उत्तम’’ पाटलांनी प्रतिसाद दिला. पत्रात या मोठ्या माणसांना मी अशी काय अक्कल शिकविणार होतो? मात्र मला पत्र त्यांनाही लिहायचं आहे व ‘बेळगाव’ नावाच्या त्या देखण्या, उमद्या व बंडखोर शहरालादेखील!!

लोकमान्य ग्रंथालयाच्या आवारात डावीकडून सुधीर जोगळेकर, महादेव कोरे, अशोक याळगी, 'चपराक'चे संपादक घनश्याम पाटील, प्रमोद येवले, लेखक महेश मांगले आणि व्यंकटेश जाधव
- महेश मांगले 
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक दिवाळी अंक २०१५)

Friday, November 13, 2015

‘चपराक’चा विक्रमी महाविशेषांक

  1. 'चपराक' दिवाळी अंकाचे प्रकाशन करतानाडावीकडून संपादक घनश्याम पाटील, प्रा. मिलिंद जोशी, समीर नेर्लेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे, डॉ. भास्कर बडे, सुधीर गाडगीळ, ज्ञानेश्वर तापकीर आणि चंद्रलेखा बेलसरे.
वाचनसंस्कृती कमी होतेय, दिवाळी अंकाचा दर्जा हरवत चाललाय, त्याच्यात साचलेपण आलेय अशी ओरड सुरू असतानाच ‘चपराक’ने प्रत्यक्ष कृतीशीलतेतून या वाचाळवीरांना चपराक देत तब्बल 468 पानांचा महाविशेषांक प्रकाशित केला आहे. यंदाच्या दिवाळी अंकात सर्वात मोठा अंक प्रकाशित करण्याचे धाडस ‘चपराक’ने केले आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय साहित्य आणि नामवंत लेखकांबरोबरच नवोदितांच्या अस्सल साहित्याला दिलेले व्यासपीठ यामुळे दिवाळी अंकाच्या आश्‍वासक परंपरेत ‘चपराक’ने भर घातली आहे. या विक्रमी अंकाने दिवाळी अंकाच्या वाटचालीत नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
‘चपराक’चा यंदाचा अंक फक्त चाळायचा म्हटला तरी किमान दोन तास लागतील. कोणताही लेख, कथा, कविता वाचून झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतका गुणात्मक दर्जा टिकवलाय. लेखकांच्या श्रेयनामावलीवर नजर फिरवली तरी या अंकाचे सामर्थ्य लक्षात येईल. सर्व विषयांचा धांडोळा घेणारे अभ्यासपूर्ण लेख, अंकाची उत्तम मांडणी, सुबक छपाई, आकर्षक मुखपृष्ठ यामुळे वाचक या अंकाच्या प्रेमातच पडतात. मराठीत सातशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होत असताना आशय आणि गुणवत्ता या आघाडीवर ‘चपराक’ अव्वल ठरला आहे.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर, मिलिंद जोशी, सदानंद भणगे, पराग करंदीकर, प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, ह. मो. मराठे, नागनाथ कोत्तापल्ले, संजय सोनवणी, श्रीराम पचिंद्रे, वासुदेव कुलकर्णी,  डॉ. न. म. जोशी, शेखर जोशी, प्रा. द. ता. भोसले, प्रदीप नणंदकर, महेश मांगले, प्रशांत चव्हाण, डॉ. भास्कर बडे, सरिता कमळापूरकर, चंद्रलेखा बेलसरे, श्रीपाद ब्रह्मे, स्वप्निल पोरे, बी. एन. चौधरी, उमेश सणस, रवींद्र शोभणे, डॉ. सुनीलकुमार लवटे, समीर नेर्लेकर, डॉ. विद्या देवधर, डॉ. सच्चिदानंद शेवडे अशा एकाहून एक 143 साहित्यिकांचा या अंकात समावेश आहे. महाराष्ट्रातील वीस जिल्हे आणि इंदोर, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद,  गोवा, बेळगाव आणि थेट दुबईतील साहित्यिकांचाही या दिवाळी अंकात समावेश आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांचा साहित्य संमेलनाच्या समकालीन वास्तवावर लिहिलेला खुसखुशीत लेख, ह. मो. मराठे यांची व्यंग्यकथा, नागनाथ कोत्तापल्ले आणि व्यंकटेश कल्याणकर यांच्या सारांश कथा, ज्योती कदम यांनी मराठवाड्याच्या तर श्रीराम पचिंद्रे यांनी गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची करून दिलेली ओळख, सुधीर गाडगीळ यांचे अमेरिकेतील मराठी मित्र, भाऊ तोरसेकर यांनी घेतलेला राष्ट्रीय राजकारणाचा वेध तर त्यांच्या पत्नी सौ. स्वाती तोरसेकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी मुस्लिम प्रश्‍नावर केलेली अभ्यासपूर्ण मांडणी हे सारेच वाचनीय आहे. प्रभाकर येरोळकर, डॉ. मुग्धा जोर्वेकर, शांताराम डफळ, मनिषा वाणी, माधव गिर, दत्तात्रेय वायचळ, नागेश शेवाळकर यांच्या कथा वाचनीय आहेत.
बण्डा जोशी, अजय कांडर, माधव गिर, रेणु पाचपोर, सविता करंजकर, आमीन सय्यद, विद्या बयास, मुरारीभाऊ देशपांडे, आबा महाजन, हणमंत चांदगुडे, ईश्‍वरचंद्र हलगरे, बाळासाहेब कारले, रूक्मिणी येवले, गोविंद केळकर, वसंत गोखले, देविदास फुलारी, महेश मोरे आदी 48 कवींच्या कविता या अंकाची शोभा वाढवतात. प्रा. बापू घावरे, अरविंद गाडेकर आणि महादेव साने यांची व्यंग्यचित्रे, समीर नेर्लेकर यांनी रेखाटलेली चित्रे आणि मुखपृष्ठ व व्यंकटेश कल्याणकर यांनी केलेली आकर्षक मांडणी हेही या अंकाचे सामर्थ्य आहे.
106 वर्षाच्या दिवाळी अंकाच्या परंपरेत दिवाळी अंकांनी मराठीला अनेक नामवंत लेखक दिले. केवळ मराठी भाषेतच दिवाळी अंकाच्या माध्यमातून अक्षर दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा टिकून रहावी, वृद्धिंगत व्हावी या दृष्टिने ‘चपराक’चे कायम प्रयत्न आहेत. संपादक घनश्याम पाटील हे गेल्या चौदा वर्षापासून ‘चपराक’चा दिवाळी विशेषांक प्रकाशित करतात. इतकेच नाही तर अन्य दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी राज्यस्तयीय दिवाळी अंक स्पर्धेचेही आयोजन केले आहे. स्वतः दर्जेदार अंक प्रकाशित करणे आणि इतर अंकांचीही आत्मीयतेने दखल घेणे, त्यांना कौतुकाची थाप देणे यामुळे घनश्याम पाटील आणि ‘चपराक’ यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘साहित्य चपराक’चा हा दिवाळी विशेषांक त्यांनी चपराकच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन विक्रीसाठीही उपलब्ध करून दिला आहे. 

या अंकासाठी संपर्क : 020-24460909/7057292092

Saturday, October 31, 2015

साहित्य धर्म वाढवावा!

सध्या महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय. शेतकर्‍यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्यात. त्यांची जगण्याची उमेद नाहीशी होतेय. अशा हलाखीच्या काळात दुष्काळग्रस्तांच्या आयुष्यात थोडीशी झुळूक यावी यासाठी काहींनी पुढाकार घेतलाय. तो स्तुत्य आहे. धान्याअभावी, पाण्याअभावी जिथे जिथे दुष्काळ पडेल तिथे मदतीचा हात देऊन त्यांना बाहेर आणता येते; मात्र विचारांचा दुष्काळ पडला तर माणुसकीचा खून पडतो. त्यामुळे ज्यांना निसर्गाने तडाखे दिलेत त्यांच्यासाठी सहकार्याचा हात पुढे करतानाच ‘चपराक’ने वैचारिक दुष्काळ संपुष्टात यावा यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘चपराक’चे विविध उपक्रम आणि प्रस्तुत दिवाळी विशेषांक हे त्याचेच प्रतीक आहे. अनावश्यक राजकारणाला फाटा देऊन साहित्य धर्म वाढीस लागला तरच पुन्हा एकदा वैचारिक क्रांती घडेल आणि आपण अक्षरदिवाळी उत्साहात साजरी करू शकू असे आम्हास वाटते.
साहित्य क्षेत्र सध्या अनेक अपप्रपृत्तींनी बरबटलेय. साहित्यिक वातावरण कलुषित झालेय. साहित्य रसिकांवर सांस्कृृतिक बलात्कार होतोय. मात्र प्रत्येकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय. विचारांच्या लढाईची भाषा करणारे सदैव आपल्याच धुंदीत असतात आणि साहित्यबाह्य विषयांवरून खल करत चमकोगिरी करतात. ज्यांचा साहित्याशी कसलाही संबंध नाही ते लोक साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होतात, साहित्य संमेलने गाजवतात आणि वर आपणच साहित्यक्षेत्राचे कसे तारणहार आहोत याचे ढोलही पिटतात. हे सारेच क्लेषकारक आहे. प्रकाशाचा सण साजरा करत असताना अंधार आपसूकच दूर होतो. यंदाच्या दिवाळीत तरी साहित्य आणि प्रकाशन विश्‍वातील तिमीर संपावा आणि साहित्यिकांत नवचैतन्य निर्माण व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतो.
साहित्यातही मूठभर लोकांची मक्तेदारी निर्माण झाल्याने सामान्य माणूस साहित्यापासून दूर जातोय. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ अशी खोटी आवई उठवत वर हे लोक सर्वांना वेठीस धरतात. नगद रक्कम मोजून पुस्तके विकत घेणार्‍या वाचकांशी प्रतारणा करतात. संकुचित वृत्तीच्या या समदुःखी लोकांनी ग्रंथ व्यवहाराचे वाटोळे करण्याचा विडा उचलला आहे. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना चपराक देताना आम्ही यांचे ढोंगही सातत्याने चव्हाट्यावर आणले आहे. सत्याला डावलण्याची हिंसा करण्याचे पाप जे कोणी करतात त्यांच्यासाठी आमच्या हातात सदैव हंटर आहे. लेखणीच्या माध्यमातून त्याचे फटके देताना आम्ही कधीही कचरणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची आमची तयारी आहे. तत्त्व, तळमळ, आणि तिडिक या त्रिसुत्रीच्या जोरावर संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून आम्ही कार्यरत आहोत; पुढेही राहू! वाचकांशी इमान राखताना साहित्य धर्म वाढावा यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असतील.
‘चपराक’ हे विविध प्रश्‍नांवरून वेळोवेळी ठाम भूमिका आणि सत्याचा कैवार घेणारे नियतकालिक आहे. आमची नाळ वाचकांशी जोडली गेलीय. मराठीत एक प्रभावी मासिक देताना आम्ही सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके समारंभपूर्वक प्रकाशित केली आहेत. मागच्या वर्षभरातील प्रमुख कार्यक्रम आणि ‘चपराक’ची परखड भूमिका पाहता त्यातील सत्य वाचकांच्या लक्षात येईल. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘चपराक दिवाळी विशेषांक 2014’चे प्रकाशन झाले. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘चपराक’च्या दुसर्‍या साहित्य महोत्सवात विविध साहित्य प्रकारातील आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लेखकांची तब्बल बारा पुस्तके आम्ही एकाचवेळी प्रकाशित केली. मराठीतील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांनी आमच्या या उपक्रमाची गौरवाने दखल घेतली.
भाऊ तोरसेकर हे मराठी पत्रकारितेतील एक अव्वल नाव. आचार्य अत्रे यांच्याच ‘मराठा‘तून त्यांच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला. विविध प्रश्‍नांवर तुटून पडताना भाऊंची लेखणी तळपत असते. सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ नावाचे, पानापानावर धादांत खोटी माहिती देणारे पुस्तक लिहिले. ‘ग्रंथाली’या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले. या पुस्तकातून लेखकांनी शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यापुढे लाळघोटेपणा करताना स्वतःला जे वाटते ते सत्य म्हणून कसे घुसडले आहे याची चिकित्सा केली. लेखक आणि प्रकाशकांनी भाऊंना लेखी पत्र लिहून दिलगीरी व्यक्त केली आणि नव्या आवृत्तीत त्याची दुरूस्ती करू असे सांगितले. मात्र त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होऊनही काहीच घडले नाही. सर्व प्रकारचा लाभ घेत, समाजात उजळ माथ्याने मिरवत, रग्गड पैसा कमवत लेखक आणि प्रकाशक वाचकांची दिशाभूल करत होते. हा खोटेपणा असह्य झाल्याने  भाऊंनी ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले आणि ‘चपराक‘ने आपल्या वृत्तीप्रमाणे ते प्राधान्याने प्रकाशित केले. वाचकांनी या पुस्तकाचे जोरदार स्वागत केले आणि सुहास पळशीकरांसारख्यांचे बुरखे टरटरा फाटले. विशेष म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. निकम हे फक्त वकील नाहीत, तर ते न्यायासाठी लढणारे देशभक्त वकील आहेत. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणे ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट होती.
‘चपराक’चा हा चौदावा दिवाळी विशेषांक. वाढत्या चंद्रकलेप्रमाणे उत्तमोत्तम आणि वाचनीय दिवाळी विशेषांक प्रकाशित करणे ही आता आमची स्वभाववृत्तीच झाली आहे. एखादा अंक पूर्ण करताना किती परिश्रम करावे लागतात हे स्व-अनुभवातून आम्ही जाणू शकतो. त्यामुळेच सर्वोत्तम दिवाळी विशेषांकाचा गौरव करण्याची परंपरा आम्ही याच वर्षापासून सुरू केली आहे. ‘चपराक’ची राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा पूर्णपणे यशस्वी झाली. राज्यातून आणि राज्याबाहेरूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नांदेड येथील दै. ‘उद्याचा मराठवाडा’, सोलापूर येथील दै. ‘संचार’, मुंबईचा साप्ताहिक ‘विवेक’, पुण्यातील ‘आपले छंद‘, आणि ‘ग्राहकहित’ या दिवाळी विशेषांकांचा गौरव ‘चपराक‘ने केला. खास अंधासाठी मुंबईतून ब्रेल लिपीत प्रकाशित होणार्‍या ‘स्पर्शज्ञान‘ या अंकालाही विशेष पुरस्कार दिला. आपल्याच क्षेत्रातील चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करणे यापेक्षा मोठा आनंद कोणता बरे असू शकेल?
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागले. यंदाचे संमेलन संत नामदेव महाराज यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पंजाब येथील घुमान या गावात घ्यायचे ठरले. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. सदानंद मोरे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली. अमराठी भागात संमेलन होणार असल्याने पुस्तक विक्री होणार नाही, असा ग्रह काही प्रकाशकांनी करून घेतला आणि या संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘एकही मराठी प्रकाशक या संमेलनाला जाणार नाही‘ अशी आडमुठी भूमिका त्यांनी घेतली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी साहित्य महामंडळ आणि प्रकाशकांतील ही कोंडी फोडणे गरजेचे होते. ‘धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा’ हे आचार्य अत्रे यांचे सूत्र आचरणात आणत आम्ही पुढाकार घेतला आणि ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी आम्ही तिथे नक्की जाऊ’ अशी भूमिका घेतली.
आमच्या या सकारात्मक भूमिकेची दखल सर्व वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी घेतली. प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली; मात्र मराठीतील एका संस्मरणीय संमेलनासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. संमेलन ‘अखिल भारतीय’ असल्याने कधीतरी राज्याबाहेर झाले तर असा काय फरक पडणार? पण धर्माचा धंदा करणार्‍यांना त्याचे काही सोयरसुतक नसते. आम्ही हा धर्म जपत आवाज उठवला. घुमानचे संमेलन यशस्वी करण्यात हातभार लावला. ‘चपराक’च्या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री घुमानला झाली. त्यातून अनेक लेखक मिळाले, नवे मित्र मिळाले. इतकेच काय नंतर पुण्यात वसंत व्याख्यानमालेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी ‘चपराक’ने घुमानबाबत घेतलेल्या भूमिकेचे जाहीर कौतुक केले.
याच वर्षात आम्ही शांताराम डफळ यांचा ‘अस्तित्व’, सरिता कमळापूरकर यांचा ‘माझी कविता’, प्रल्हाद दुधाळ यांचा ‘सजवलेले क्षण’ हे काव्यसंग्रहही धडाक्यात प्रकाशित केले. कवितासंग्रह कोणीही प्रकाशित करायला धजावत नाही, असे सांगितले जात असताना या वर्षात ‘चपराक‘ने जवळपास दहा कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत.
‘चपराक’चा तिसरा साहित्य महोत्सव 8 ऑगस्ट 2015 रोजी नारायण पेठेतील केसरी वाड्यात संपन्न झाला. यात पुस्तकांची संख्या होती पंधरा! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे या संमेलनाला उपस्थित होते. पंधरा-पंधरा पुस्तके एकावेळी प्रकाशित करूनही जर कोणी ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असा कांगावा करत असेल तर वाचकांनीच आता त्यांना झोडपून काढले पाहिजे. उत्तमोत्तम विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी लेखक आणि प्रकाशक काय परिश्रम घेतात हे पाहणे गरजेचे आहे. वाचक कमी होताहेत असे म्हणण्यापेक्षा ते वाढावेत यासाठी काय प्रयत्न होतात हे बघितले पाहिजे.
‘चपराक’च्या चमुने या वर्षात पंजाब येथील घुमान, मराठवाड्यातील लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, परभणी, त्यानंतर  नाशिक, बेळगाव, नगर, संगमननेर असे दौरे करून वाचकांचा कौल जाणून घेतला. नवनवे लेखक शोधले. रमेश पडवळ यांच्या ‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे लोकार्पण नाशिकला झाले. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, नाशिकातील प्रसिद्ध उद्योजक आणि व्याख्याते गिरीश टकले असे मान्यवर उपस्थित होते. गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या ‘चौथा स्तंभ’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन बेळगावला झाले. जिथे जिथे मराठी वाचक आहे तिथे तिथे पोहोचण्याचा आणि त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याचा, त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मराठी वाचकांना जास्तीत जास्त दर्जेदार मजकूर द्यायचा आणि शक्य तितक्या लेखकांना लिहिते करायचे या उद्देशाने यंदा दिवाळीचा महाविशेषांक करायचे ठरले. संपादकीय बैठक घेऊन सर्वानुमते आम्ही तो निर्णय जाहीर केला आणि सुरू झाली या अंकाची तयारी. पुस्तक प्रकाशनाचा व्याप, सततचा प्रवास, साप्ताहिक आणि मासिकाचे नियमित अंक हे सारे सांभाळून दिवाळी अंकाचे काम करायचे होते. त्यातही एखादा विषय घेऊन अंक केला तर त्या विषयात ज्यांना अभिरूची नाही ते तिकडे ढुंकूनही पाहत नाहीत. विषय घेऊन अंक केल्यानंतर व्यवसाय होतो पण त्यात सर्वसमावेशकता येत नाही. त्यामुळे  मराठीतील नव्या जुन्या लेखकांना एकत्र आणत त्यांच्याकडून जे सर्वोत्तम आहे ते लिहून घ्यायचे ठरले.
आम्ही काम सुरू केले आणि बघता बघता हा डोंगर कधी उभारला ते लक्षातच आले नाही. भाऊ तोरसेकर, ह. मो. मराठे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, सुधीर गाडगीळ, पराग करंदीकर, श्रीराम पचिंद्रे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, सदानंद भणगे, डॉ. भास्कर बडे, अंजली कुलकर्णी, प्रा. द. ता. भोसले, वासुदेव कुलकर्णी, श्रीपाद ब्रह्मे, प्रा. बी. एन. चौधरी, डॉ. सुनीलकुमार लवटे, अरूण खोरे, शेखर जोशी, स्वप्निल पोरे, प्रशांत चव्हाण, सुभाष धुमे, स्वाती तोरसेकर, सरिता कमळापूरकर अशा मान्यवरांचे साहित्य धडाधड आले. सागर कळसाईत, व्यंकटेश कल्याणकर, डॉ. मुग्धा जोर्वेकर, हणमंत कुराडे, सतीश देशपांडे, अर्चना डावरे, पवन घटकांबळे या तरूणांनीही खिंड लढवली. नवोदित आणि प्रस्थापित यांच्यातील भेद दूर व्हावा इतके ताकतीचे ही मंडळी लिहित आहेत.
‘चपराक’च्या सदस्य सौ. चंद्रलेखा बेलसरे, माधव गिर, महेश मांगले, समीर नेर्लेकर, विनोद श्रा. पंचभाई, मच्छिंद्र कामंत यांनीही आपल्या सशक्त लेखणीची झलक दाखवून दिली आहे. यंदाचा आपला महादिवाळी विशेषांक प्रकाशित होणार हे कळताच देशभरातून प्रचंड साहित्य आले. वेळेअभावी आणि जागेअभावी अनेकांच्या साहित्याला न्याय देता आला नाही याची खंत आहे. मात्र त्याला पर्याय नाही. काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. त्यामुळे ज्यांच्या साहित्याचा अंकात समावेश करता आला नाही त्यांनी नाराज न होता सातत्याने लिहित रहावे. पुढच्या अंकातून ते साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करू!
या महाविशेषांकातील अंकाचे वैविध्य तरी पहा! फक्त अंक चाळायचे म्हटले तरी निदान तासभर सहज जाईल. भाऊ तोरसेकर यांनी देशाचे राजकारण उलगडून दाखवले आहे. सध्या प्रकाशकही  अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत उतरले असल्याने प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘रद्दीवाले आणि बारवालेही’ या निवडणुकीत उतरले तर काय होईल याविषयी खुसशुशीत शैलीत लिहिले आहे. साहित्यातील या समकालीन वास्तवावरील त्यांचे भाष्य जरूर विचारात घेण्यासारखे आहे. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ हे महिनाभराच्या अमेरिका दौर्‍यावरून नुकतेच पुण्यात परतले. त्यांना त्यांच्या अमेरिकेतील मराठी मित्रांविषयी लिहिण्याचा प्रेमळ आग्रह आम्ही केला आणि कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी रात्रभर जागून ‘माझे अमेरिकेतील मित्र’ हा लेख पूर्ण करून दिला. वासुदेव कुलकर्णी याचा सातार्‍यावरील लेख, ज्योती कदम यांनी मराठवाड्याच्या तर श्रीराम पचिंद्रे यांनी गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची करून दिलेली ओळख, विद्या देवधर यांनी हैद्राबादच्या मराठी माणसांविषयी लिहिलेला लेख, थेट दुबईहून प्रदीप मार्कंडेय यांनी रक्तदानाचा पाठवलेला एक अनुभव, ‘चपराक साहित्य महोत्सवा’तील बाबासाहेबांच्या भाषणाचा संक्षिप्त भाग, मराठी चित्रपटाविषयी उमेश सणस आणि चित्रपट निर्माते विकास पाटील यांचे लेख, स्वाती तोरसेकर यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा लेख, आसावरी इंगळे यांनी लिव इन रिलेशनशिप सारख्या विषयावर, बी. एन. चौधरी यांनी लैंगिक शिक्षणावर तर पवन घटकांबळेसारख्या तरूणाने महिलांच्या मासिक पाळीवर लिहिलेले लेख विचारप्रवर्तक आहेत. या विषयावर अजूनही मोकळेपणाने चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे.
अंकातील कथा, कविता आणि व्यंग्यचित्रांनीही वाचनीयता वाढवली आहे. प्रा. बापू घावरे, अरविंद गाडेकर यांची व्यंग्यचित्रे नवा विचार देणारी आहेत. सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि चित्रकार समीर नेर्लेकर यांनी सर्व लेखांच्या शीर्षकांचे सुलेखन केले आहे. आतील चित्रे आणि साजेसे मुखपृष्ठ त्यांनीच साकारले आहे. व्यंकटेश कल्याणकर यांनी अल्पावधीत उत्कृष्ट मांडणी केली. ‘चपराक’च्या ‘सुप्रिमो’ शुभांगी गिरमे, ‘छोटा भीम’ तुषार उथळे पाटील, माधव गिर, महेश मांगले, मोरेश्‍वर ब्रह्मे, बजरंग लिंभोरे यांनी अंकासाठी शब्दशः दिवसरात्र एक केला. ‘चपराक’वर नितांत प्रेम करणारे ज्ञानेश्‍वरभाऊ तापकीर, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक मच्छिंद्र कामंत यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि काही जाहिराती मिळवून दिल्या. त्यामुळेच एक छोटासा बिंदू बघता बघता अथांग सिंधूसारखा कधी झाला ते कळलेच नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील लेखकांचे साहित्य तर या अंकात आहेच; पण महाराष्ट्राबाहेरील प्रतिभावंतांनीही लेखन सहभाग घेतला आहे. त्यात प्रामुख्याने हैदराबादच्या डॉ. विद्या देवधर, बेळगावचे सुधीर जोगळेकर, सुरतच्या मनिषा वाणी, अहमदाबादच्या आसावरी इंगळे, इंदूरचे विश्‍वनाथ शिरढोणकर, गोव्याचे श्रीराम पचिंद्रे, दुबईचे प्रदीप मार्कंडेय आदींचा समावेश आहे. वाचक कमी होत आहेत, लेखनसंस्कृती नष्ट होतेय असे म्हणणार्‍यांना ही चपराक आहे.
पत्रकारांचा समाजातील सर्व क्षेत्रातल्या लोकांशी नियमित संबंध येतो. त्यांचे अनुभवविश्‍व दांडगे असते. त्यामुळे त्यांनी सातत्याने नवनव्या विषयावर लिहावे असा आमचा आग्रह असतो. आलेल्या प्रेसनोटवरून बातमी करण्याच्या काळातही अनेक पत्रकार उत्तमोत्तम लिखाण करतात. ‘पत्रकारांच्या लेखणीत शाई नाही तर घाई असते’ असे म्हणतात. त्यामुळे प्रतिभा असूनही अनेक पत्रकार इतर विषयांवरील लेखनाकडे दुर्लक्ष करतात. मात्र ‘चपराक’ने पत्रकारांना कायम लिहिते केले आहे. विविध वृत्तपत्रातील अनेक पत्रकारांचे या अंकातील साहित्य बघितल्यावर वाचकांना त्याची खात्री पटेल. कोणतीही संस्था, संघटना, राजकीय पक्ष, विचारधारा यांच्या दावणीला बांधले न जाता जे चांगले अकाहे ते ‘चपराक’ने स्वीकारले आहे आणि जे चुकीचे आहे ते अव्हेरले आहे. भविष्यातही आमची हीच भूमिका कायम असेल.
मराठी मासिकांचा आवाज वाढावा यासाठी प्रत्येकाने किमान दोन मासिके आपल्या घरी सुरू करायला हवीत. त्यातही कोणतीही विचारधारा न लादणार्‍या, सत्य धाडसाने मांडणार्‍या आणि साहित्य आणि संस्कृतीचे जतन करणार्‍या मासिकांना प्राधान्य द्यायला हवे. ‘चपराक’च्या माध्यमातून आम्ही नेकीने हे काम करतोय आणि वाचकांचाही त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रस्थापितांचे शब्दधन आणि नवोदितांचे मोकळे मन यांचा सुंदर मिलाफ साधल्याने ‘चपराक’चा वाचकवर्ग सर्वदूर निर्माण झाला आहे. अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्यापासून ते राज्याच्या जबाबदार मंत्र्यापर्यंत सर्वांच्या हातात सध्या ‘चपराक’ दिसतोय. साहित्याच्या क्षेत्रात ‘चपराक’ची भूमिका महत्त्वाची ठरतेय. कारण चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून आमची वाटचाल सुरू आहे. यात आमचे सर्व लेखक, वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतक यांचा सहभाग आहे. आपणा सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनामुळेच ‘चपराक’चा इवलासा वेलू गगनावरी जात आहे.
भविष्यात ‘चपराक’ चे आणखी नवे उच्चांक आणि नवनवे मापदंड तयार होतील. जे उत्तम लिहितात पण ज्यांना व्यासपीठ मिळत नाही त्यांनी ‘चपराक’शी संपर्क साधावा. तुमच्या साहित्यात गुणात्मक दर्जा असेल तर ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची. रामदास स्वामींनी ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे सांगितले आहे; मात्र त्यांना ‘दिसामाजी काहीतरी ‘चांगले’ लिहावे’ असे अपेक्षित होते. सध्या ‘काहीतरीच’ लिहिणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने आणि साहित्य क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा उंचावल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. पैसे घेऊन वाटेल तसे रद्दड साहित्य प्रकाशित करणार्‍या प्रकाशकांनी, त्यामुळे प्रसिद्धीची हौस भागवणार्‍या लेखकांनी, लेखकांचा कस सुधारावा यासाठी कसलेच प्रयत्न न करणार्‍या साहित्य संस्थानींच मराठीचे वाटोळे केलेय. हे चित्र बदलायचे असेल तर अभ्यासू आणि लिहिण्याची क्षमता असणार्‍यांनी पुढे यायला हवे. आम्ही अशा लेखकांच्या शोधात आहोत.
लिहिणं हा आपला धर्म आहे. त्याअर्थी आपण समानधर्मी आहोत. फक्त आता या धर्मात काही सुधारणा करायला हव्यात. पुरस्कार मिळवण्यासाठी आणि ते पुन्हा परत करण्यासाठी या क्षेत्रात यायची गरज नाही. अनेक क्षेत्रांना कीड लागली असल्याने ती साहित्य क्षेत्राकडेही आलीय. हा संसर्ग थांबला पाहिजे. लेखकांनी सत्यासाठी, न्यायासाठी, सामाजिक प्रबोधनासाठी लिहायला हवे. साहित्याचा आजवरचा फार मोठा वारसा आहे. फार मोठी परंपरा आहे. अनेक चमत्कार घडविण्याची ताकत फक्त आणि फक्त शब्दांत आहे. कित्येकांचे आयुष्य बदलणार्‍या, त्यांना दिशा दाखवणार्‍या, त्यांच्यात चैतन्य निर्माण करणार्‍या, माणुसकीची शिकवण देणार्‍या चिरंतन साहित्याशिवाय दुसरे काहीच शाश्‍वत नाही. आपले ‘लिहिणे‘ समाजाच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलते हे कायम लक्षात ठेवायला हवे. मोठमोठ्या साहित्यिकांचे हे भान सुटल्यानेच ते कुणापुढे तरी मिंधे होतात आणि राजकारणाचा घटक बनून स्वतःचे अस्तित्व संपवतात.
त्यामुळे लिहिते व्हा! अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करा! जे उदात्त, व्यापक, मंगल आहे अशा सद्गुणांची पूजा बांधा. अन्याय-असत्यावर प्रहार करा. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना चपराक देताना मुळीच कचरू नका. निर्भयता हा लेखकाचा सर्वात मोठा गुण असतो. निर्भयपणे निर्मळ विचार मांडा. हा साहित्यधर्म वाढला तरच संस्कृती आणि संस्कार जपता येतील. नवनवे महापुरूष त्यातूनच जन्माला येतील. त्यासाठी तुम्हाला खंडीभर शुभेच्छा!
तसेच, ही दिवाळी आपणास सुखसमृद्धीची, आनंद, ऐश्‍वर्यदायी, आरोग्यदायी जावो याही अंतःकरणापासून शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील 

संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Monday, October 5, 2015

परिषदेत बदल घडवा!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच साहित्य परिषदेच्या निवडणुकीचेही संकेत मिळाले आहेत. इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी त्यांची कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडून कशी कुचंबणा होत आहे हे परखडपणे सांगितले आहे. प्रा. द. मा. मिरासदार हे सुद्धा वैद्य बाईंच्या राजकारणाला कंटाळूनच परिषदेतून बाहेर पडल्याचे त्यांनी कबूल केले आहे. मिरासदारांनी राजीनामा दिल्यानंतर ‘चपराक’ने हे वास्तव वाचकांसमोर आणले होते. मात्र त्यावेळी द. मा. स्वतःच शांत राहिल्याने त्या विषयांवर फारशी चर्चा झाली नव्हती. शेजवलकरांनी ही कोंडी फोडल्यानंतर मिरासदारांनीही ते मान्य केले आहे.
माधवी वैद्य या कशा भ्रष्टाचाराच्या डबक्यात रूतत गेल्या आहेत, त्यांनी कसे सूडाचे राजकारण केले, त्यामुळे साहित्याची आणि साहित्य परिषदेची कशी हानी झाली हे ‘चपराक’ने सातत्याने वाचकांसमोर मांडले आहे. आता दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच सर्वसाधारण सभेत तशी स्पष्ट भूमिका घेऊन ‘चपराक’च्या विश्‍वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी फक्त घुसमट व्यक्त केली नसून या परिस्थितीतून कशाप्रकारे मार्ग काढता येईल हेही ठामपणे मांडले आहे. ‘महाराष्ट्रातील सुविख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ’ अशी ओळख असलेल्या शेजवलकरांच्या बोलण्यातील तथ्य लक्षात घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
मुळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि साहित्याचा तसा फारसा संबंध राहिला नाही. नवोदितांच्या प्रतिभेला वाव मिळेल असे तिथे किंवा त्यामाध्यमातून काही घडत नाही. एकमेकांच्या कुचाळक्या करणे, मिरवण्याची हौस भागवून घेणे, मिळालेल्या निधीवर डल्ला मारणे, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची तुंबडी भरणे हे व अशा प्रकारचे उद्योग तिथे खुलेआमपणे चालू असतात. तीन पानांची संहिता लिहिण्यासाठी तीस हजार रूपये, अनावश्यक विमानप्रवास, परिसंवादात जावयाची वर्णी, बालगोपाळांसाठी काढलेल्या दिवाळी अंकात स्वतःच्याच नातवंडांचे फोटो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराला प्रचारासाठी मदत, स्तुतीपाठक आणि भाटांचे हीत जोपासताना अस्सल प्रतिभावंतांची केलेली उपेक्षा या व अशा अनेक कारनाम्यातून डॉ. माधवी वैद्य यांनी त्यांचे गुण-अवगुण दाखवून दिले आहेत.
घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही या बाईंनी संमेलनाध्यक्षांची अशीच उपेक्षा केली होती. व्यासपीठावर त्यांनी डॉ. सदानंद मोरे यांना चक्क मागे ढकलले आणि त्यांच्या पुढे येऊन  राजकारण्यांच्या बाजूला थांबल्या. तेव्हा संमेलनात ‘महामंडळाच्या अध्यक्षांची नथ दिसली पण त्यामागचे नाक दिसले नाही’ या शब्दात आम्ही संमेलनाध्यक्षांची केविलवाणी अवस्था सांगितली होती. मात्र आपले लोकही निलाजरे आहेत. पद आणि प्रतिष्ठेसाठी कितीही अवमान सहन करतील. निवडून येण्यासाठी राजकारण्यांची चमचेगिरी करणारे, लाळघोटेपणा करणारे आणि निवडून आल्यानंतरही स्वाभिमान गहाण ठेवणारे असे अध्यक्ष मिळाल्यानेच मराठी भाषेची वाताहत झाली आहे.
श्रीपाल सबनीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साहित्य परिषदेत एक पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. सदानंद मोरेही तिथे आले होते. मागच्या वर्षी सबनीसांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याने मोरेंनी यावेळी त्याची परतफेड केली हे उघड होते. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ अशातला हा मामला होता. मात्र या परिषदेत पत्रकारांनी सबनीसांना विचारले की, ‘‘राजकीय मदत घेणार का?’’ त्यावर त्यांनी ‘‘साहित्यात कोणीही वर्ज्य नसते, मात्र मी माझे अवमूल्यन करून घेणार नाही. राजकारणी व्यासपीठावर असले तर फरक पडणार नाही मात्र माझी खुर्ची कुणी ढकलत ढकलत मागे नेली तर ते मला चालणार नाही’’, अशा शब्दात सदानंद मोरे यांना टोलवले होते.
यावर्षीच्या साहित्य संमेलन निवडणुकीत पहिल्या फळीतील एकही साहित्यिक नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोणीही झाले तरी मराठी भाषेला तसा काहीच फरक पडणार नाही. अर्थात, मोठा आणि कार्यक्षम लेखक संमेलनाध्यक्ष झाल्याने मराठीत आजवर काही मोठे परिवर्तन घडलेय असेही नाही. मात्र आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर असे प्रतिभावंत ज्या खुर्चीवर बसले होते तो वारसा फारच भुक्कड लोकांकडे येऊन ठेपला आहे. नाहीतर फ. मुं. शिंदे सारखे किरकोळ प्रतिभेचे अनेक हौसी नकलाकार संमेलनाध्यक्ष झालेच नसते. या पदाची प्रतिष्ठा कधीच लयास गेली आहे. आता केवळ एक सोपस्कार उरलाय. ‘नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे संमेलने पार पडत आहेत. त्यापासून मराठी भाषेला, मराठी माणसाला नक्की काय मिळते याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे विधान करतो. त्याला साहित्यातील अशा प्रवृत्ती कारणीभूत आहेत.
असो! असे म्हणतात की, माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये! माधवी वैद्य यांच्या राजकारणाचे बळी ठरलेल्या प्रा. मिलिंद जोशी यांच्याविषयी डॉ. शेजवलकरांनी गौरवोद्गार काढले आहेत. जोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, अशी अपेक्षाही शेजवलकरांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. मिलिंद जोशी परिषदेतून बाहेर पडल्यानंतर परिषदेचे वाटोळे झाले हेही त्यांनी सूचित केले आहे. प्रशासनावर पकड असलेला, स्वतः साहित्यिक आणि फर्डा वक्ता असलेला जोशी यांच्यासारखा नेता परिषदेला मिळाला तरच काहीतरी आशादायक चित्र दिसू शकेल. येणार्‍या निवडणुकीत मिलिंद जोशी यांनी पुन्हा सक्रिय व्हावे आणि परिषदेला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी भूमिका डॉ. शेजवलकर यांच्यासारख्या अभ्यासू, व्यवस्थापन क्षेत्रात मानदंड ठरणार्‍या आणि स्वच्छ प्रतिमेच्या सद्गृहस्थाने घेतली आहे. त्याचे समर्थन करायलाच हवे.
माधवी वैद्य, सुनील महाजन यांनी परिषदेची, महामंडळाची आणि एकूणच साहित्य क्षेत्राची केली तेवढी शोभा पुरे झाली. आता यात परिवर्तन घडावे आणि साहित्य क्षेत्रात मराठीचा विजयध्वज सर्वत्र डौलात फडकावा, एवढीच यानिमित्ताने माफक अपेक्षा! 

- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

Monday, September 28, 2015

नाना, महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे…

त्यानं काही दिवसांपूर्वी सिंहगडाजवळ शेत घेतलं अन् मग एकदा त्याला एकानं विचारलं की, ‘‘तू शेतावर काय लावतोयस रे?’’ हा म्हणाला, ‘‘लाकडं. माझी मी उगवतोय. हो! नाहीतर हे सगळे दोस्त लोक ओल्या लाकडावर जाळायचे. धूर डोळ्यात गेल्यावर यांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि जळताना भला वाटायचं की माझ्यासाठी रडतायत. असले नालायक आहेत. त्यामुळं मी माझ्यासाठी सुकी लाकडं आणणार. धूर कमी. त्यामुळं मला जळताना कळेल की खरा कोण आणि खोटा कोण? काय सांगावं, तिथेसुद्धा कदाचित मी उठेन मुस्काटीत मारायला.’’ त्याचं हे उत्तर फटकळ आहे; मात्र खूप काही सांगणारं. माणूस येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. त्याला या गोष्टीचं पक्कं भान आहे. त्याला पक्कं माहिती आहे, माणसाच्या गरजा किती असतात, किती असाव्यात! त्याच्याकडे तरी काय होतं एकेकाळी? नववीत होता तो त्यावेळी. वय तेरा वर्षे. त्या वयात पोटासाठी नोकरी केली त्यानं. मुंबईत दादरच्या समर्थ विद्यालयात शिकायचा. दुपारी घरी यायचा माहिमला. असेल ते खायचा व नोकरीसाठी आठ किलोमीटर चालत जायचा. पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचा. हातात कला होती. पेंटींग छान करायचा. नोकरी पेंटींगचीच. सिनेमाची पोस्टर्स करायचा. वय होतं का त्याचं ते नोकरी करण्याचं? मात्र पर्यायच नव्हता. वडिलांना कोणीतरी फसवलं म्हणून त्यात त्यांचं सगळंच गेलं. त्याआधी दोन वेळची भ्रांत नव्हती; मात्र आता एका वेळेचीही भ्रांत निर्माण झाली. कोवळं वय. आईवडिलांकडे हट्ट करण्याचं. खेळण्याबागडण्याचं; मात्र संकट आलं तेव्हा तो कोवळ्या वयातही डगमगला नाही. लढला सरळ! परिस्थितीशी दोन हात केले. मुख्य म्हणजे मन कटू करून घेतलं नाही स्वत:चं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर जी लढण्याची ताकत मिळाली ती त्याच दिवसातून मिळाली. पुढं काय घडलं मग? हिंदी चित्रपटसृष्टीतला ‘बाप माणूस’ झाला तो पुढं वीस एक वर्षानंतर! भलेभले त्याच्या अभिनयाला सलाम करू लागले. आत्मविश्‍वास थक्क करणारा होता त्याचा! एका टप्प्यावर तर अमिताभ बच्चनपेक्षा जास्त मानधन घेत होता म्हणे तो! चिकार लोकप्रिय झाला; मात्र एक गोष्ट कधीही विसरला नाही तो. महिना पस्तीस रूपये पगार व एक वेळचं जेवण यावर केलेली नोकरी. प्रसंगी मुंबईच्या फुटपाथवर झोपून काढलेले दिवस! त्याच्या वाईट दिवसात अनेकांनी त्याला आधार दिला. विजया मेहता, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, मंगेश कुळकर्णी, मोहन तोंडवळकर, दिलीप कोल्हटकर ते अगदी अशोक सराफपर्यंत. या कुणालाही तो विसरला नाही. ‘पाहिजे जातीचे’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘महासागर’ ही त्याची सुरूवातीची नाटकं. मग आलं त्याचं ‘पुरूष’ हे नाटक. ‘पुरूष’ तर त्याच्यावरच बेतलेलं. खलनायकी भूमिका होती ती; मात्र आख्खं नाटक त्यानंच उचलून धरलेलं. कितीतरी चर्चेत राहिलेलं ते नाटक; मात्र त्यावेळी त्यातून तरी त्याला काय मिळत होतं? पन्नास रूपये मिळायचे एका प्रयोगाचे. त्याची बायको निलकांती. ती तेव्हा बँकेत अधिकारी होती. तिला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळायचे; मात्र तिनं याची उमेद खचू दिली नाही. मुळात नाटकात तो टिकून राहिला तो तिच्याच प्रोत्साहनामुळं. हा या सगळ्यांचे ऋण मानतो. ऋणानुबंध तो विसरत नाही. आईवडिलांचे ऋणही तो विसरला नाही. वडील माळकरी. अत्यंत सज्जन! वडिलांनी एकच सांगितलं होतं, ‘नाना, कधीही कोणाकडून पैसे घेऊ नकोस आणि कुणाला दिलेस तर लक्षात ठेऊ नकोस.’ वडिलांचे हे शब्द. ते त्यानं आयुष्यात प्रमाण मानले. आपण समाजाला जे काही देऊ ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. फूल असो वा फुलाची पाकळी, सत्पात्री गेली पाहिजे. त्याचे ढोल वाजवायचे नाहीत. आव आणायचा नाही. कसलाही दांभिकपणा टाळायचा. या गोष्टी त्यानं लक्षात ठेवल्या. त्यानं देवाकडे दोन वेळची भाकरी मागितली होती. त्याच्या करोडो पटीनं देवानं त्याला सर्व काही दिलं ही त्याची भावना. ‘‘माझी ओंजळ तेवढीच आहे. ती मोठी नाहीच झाली. ती भरलेलीच आहे’’ तो म्हणतो. पैशांचा त्याला तिटकारा नाही; मात्र पैसा हे त्याच्यासाठी सर्वस्व कधीच नव्हतं. म्हणूनच पैशानं विकत मिळणारी सुखं. ती विकत घेण्याच्या भानगडीतच तो कधी पडला नाही. ‘‘मला गाडी-घोड्यांची किंवा मोठ्या घराची हौस नव्हती. तू माझा मित्र आहेस. मी तुझी किंमत लावायची म्हटलं तर लावता येईल का?’’ तो मित्रांना सरळ विचारतो. त्याच्या या विचारण्यात मोल माणसांचं आहे. पैशाचं नाही.
तो रमला माणसांमध्ये. त्याला माणसं प्रिय! तो बाबा आमट्यांकडे खेचला गेला तसा बाळासाहेब ठाकर्‍यांकडेही. त्यात त्याला काही विरोधाभास वाटत नाही. त्याच्या मते ही दोन्ही माणसं खूप मोठी होती. खूप निखळ होती. तो कुठल्याच जातिधर्मात अडकून पडलेला नाही. ‘मुरूड-जंजिरा’ हे त्याचं गाव. सहावीपर्यंत तो तिथं शिकला. रात्री बेरात्री उठून तो समुद्रावर जाऊन बसत असे. त्या समुद्रानं त्याला भेद शिकवला नाही. ‘‘मुरूडला समोर नेहमीच समुद्र असायचा. त्यामुळं जे काही पहायचं ते भव्यच पहायचं अशी सवयच लागली’’ तो सांगतो. त्याच्या मते समुद्र हा उदात्त असतो. खळखळता असतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनाचा कोतेपणा गळून पडतो. 1968 साली तो ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये होता मुंबईच्या. त्याचं चित्रकार असणं हा केवळ योगायोग नाही. त्याच्या कॅनव्हासवर त्यानं एका चांगल्या राज्याचं चित्र रेखाटलं आहे. एक नागरिक म्हणून त्याला एक बर्‍यापैकी ‘सिस्टिम’ हवी आहे. माणसांचं जगणं निदान सुसह्य करेल अशी सिस्टिम. दुसरीकडे आपणही या राज्याचे, या देशाचे नागरिक आहोत व आपलीही काही जबाबदारी आहे हे तो मानतो. जात, धर्म नंतर. ‘‘मला ‘कुराण’मधली खूप आयतं बोलता येतात. माझ्या गळ्यात ताईत आहे व कृष्णसुद्धा’’ तो सांगतो.
नाना पाटेकर! काही माणसं घरातलीच वाटतात. तसा हा माणूस. आता पुन्हा चर्चेत आलाय तो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या! हा विषय त्यानं उचलून धरल्यामुळं. विदर्भ, मराठवाड्यात परिस्थिती भिषण! तिथं हा फिरतोय. त्याला शक्य ते सर्वकाही करतोय. मकरंद अनासपुरेही मराठवाड्यातला. त्यालाही माहीत आहे, दुष्काळ ही काय चीज असते ते! मात्र नानाची आर्थिक मदत किती जणांना पुरणार? किती काळ पुरणार? तरीही त्याचं महत्त्व मोठं आहे. माणसांची उमेद मारून टाकतो दुष्काळ. नानाच्या प्रयत्नांमुळे ही उमेद टिकून राहिल माणसांची. होणार्‍या आत्महत्या टळू शकतात त्याच्या या कामामुळं. ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ हा व्यवस्थेपुढचाच प्रश्‍न नाही फक्त. तो तुम्हा आम्हा नागरिकांपुढचा देखील प्रश्‍न आहे.
नानाचं वेगळेपण एवढंच, त्यानं हा प्रश्‍न आपला मानला. प्रश्‍न आपलेच आहेत सगळे अवतीभवती निर्माण झालेले. आपणच ते प्रत्येकवेळी राजकारण्यांवर ढकलतो का? ती एक सोय आहे का? पळवाट आहे का? आपली जबाबदारी टाळण्याची? ‘राजकारणातली विश्‍वासार्हता संपली’ हे म्हणायला ठीक आहे; मात्र आपल्या विश्‍वासार्हतेचं काय? हा लेख लिहिताना रात्रीचे आठ वाजतायत. नारायण पेठेतल्या ऑफिसमध्ये बसून हे लिहितो आहे. दुसर्‍या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसच्या भिंती व खिडक्यांच्या काचा. थरथरतायत त्या. का? खाली गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू आहे. सहज खिडकी उघडली. खाली नजर टाकली तर विशी-तिशी-चाळीशीतली जमात नाचण्यात धुंद आहे! त्यात मुलीही आहेत. एक मुलगी. अंगात आल्यासारखं नाचतेय ती! काय सिद्ध करायचं असतं या सगळ्यातून समजत नाही. हायकोर्टाचे सगळे निर्णय धाब्यावर बसवून चाललेला हा उन्माद! भयानक आहे तो! आपल्याच राज्यातल्या एका भागाला ‘मराठवाडा’ म्हणतात. एका भागाला ‘विदर्भ’ म्हणतात. तिथं मागच्या काही वर्षात तीस एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही आत्महत्या चालू आहेत हे या नर्तक व नृत्यांगनांच्या गावी आहे की नाही माहीत नाही.
तर वातावरण हे असं आहे. कुणाला कुणाचं पडलेलं नाही फारसं. मग नानाचं वेगळेपण का जाणवणार नाही? शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर त्यानं काम सुरू केलं. त्याची स्वत:ची विश्‍वासार्हताच मुळात मोठी! आज माणसं मुख्यमंत्री निधीला पैसे देत नाहीत तर नाना व मकरंदकडे मदतीचे पैसे देताहेत. नानाला यातून प्रसिद्धी नकोय. त्याच्या सहकार्‍यांनाही ती नकोय. हा अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रापुढचा प्रश्‍न आहे. प्रत्येकानं तो आपला प्रश्‍न मानला पाहिजे. निदान तशी जाणीव तरी आपण ठेऊ शकतो. या क्षणी इतकंच म्हणता येईल, ‘नाना, तू माणूस विश्‍वासार्ह आहेस व महाराष्ट्र नेहमीच तुझ्या सोबत आहे.’
- महेश मांगले

९८२२०७०७८५
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
२८ सप्टेंबर २०१५

Saturday, September 26, 2015

‘सत्तांतर’ उलगडणारा ग्रंथ

'चपराक'ने प्रकाशित केलेल्या 'कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट' या सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर लिखित पुस्तकाचे परीक्षण आजच्या दैनिक 'संचार'ने 'इंद्रधनू' पुरवणीतून करून दिले आहे. संचार आणि श्री. प्रशांत जोशी यांना मन:पूर्वक धन्यवाद! हे पुस्तक आपण आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळावरून विकत घेवू शकाल.

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय मोलाचे वाटते. यातील विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत आलेच पाहिजेत.
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन विद्वान प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ आहे.
हेनरिख हायने नावाचा जर्मन कवी, विचारवंत म्हणतो, ‘‘आपल्यालाच सत्य गवसते आहे असा ज्यांना भ्रम होतो, असे लोक तेच सत्य सिद्ध करण्यासाठी बेधडक खोटेपणाचा मार्ग चोखाळू शकतात.’’
‘सत्तांतर’ हा ग्रंथ केवळ वाचकांची दिशाभूल करणारा नाही तर, तो एक फ्रॉड आहे, कारण केवळ पैसा मिळवणे एवढेच त्या लेखकांचे उद्दिष्ट नव्हते तर अभ्यासू विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्फत नव्या पिढीला संपूर्णत: चुकीची माहिती शिकवूण समाजाला भरकटायला लावणारे आहे. हे भरकटणे म्हणजे फार मोठा पुरोगामीपणा, आधुनिकता, वैचारिक दृष्टेपणा आहे अशी समजूत दृढ करायला लावण्याचा अत्यंत दूषित वैचारिक भ्रष्टतेचा कळस करणारा प्रकार आहे.
‘तपशील चुकीचा असेल तरी आमचा थिसिस खरा आहे’, असा युक्तीवाद करून या लेखकद्वयांनी विद्यापीठीय शिक्षणात असेच शिक्षण दिले जाते की काय अशी शंका निर्माण करण्याइतपत वैचारिक दारिद्र्य प्रगट केले आहे. ‘ग्रंथाली’ या प्रतिष्ठित संस्थेने असा विकृतीपूर्ण ग्रंथ भाबड्या, बेसावध, निरागस ग्रंथप्रेमी वाचकांच्या गळ्यात मारून धंदा केलाच, परंतु वर आपण फार मोठे सत्कर्म करीत आहोत अशी शेखी मिरविण्याचे औचित्य दाखविले आहे. ग्रंथालीने केलेला हा फ्रॉड आहे. त्यांनी कोंबडं कितीही झाकले तरी या म्हातारीची गोष्ट लोकांना सांगितलीच पाहिजे, या कळकळीने हे पुस्तक नव्हे ही चिरफाड ‘चपराक’ने मांडली आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन!
हे लेखक आणि प्रतिष्ठित प्रकाशक विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या मेंदूशी खेळ करीत असल्याने शिक्षणमंत्री, कुलगुरू यांनीसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीच पाहिजे.
इतिहासाची मांडणी अलिप्तपणे न करता आपल्याला जो दृष्टिकोन, जीवनध्येय किंवा जीवन तत्त्वज्ञान लोकाच्या गळी उतरवायचे आहे, त्या दृष्टिकोनातून खर्‍याचे खोटे करून किंवा काल्पनिक घटना घडवून त्याचा इतिहास लिहिला जात आहे. अलीकडे हा एक धंदा पुरोगामी चळवळीच्या नावावर सुरू आहे. प्रतिष्ठा व त्यातून मिळणारी समाजमान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबांचा, लोककल्याणाचा कळवळा घेणारी दांभिक सत्ताकेंद्रही त्याला पाठिंबा देण्यात मग्न झालेली आहेत. त्यामुळे असे प्रयत्न करणारे इतिहासकार, लेखक समाजात उजळ माथ्याने प्रतिष्ठित म्हणून मिरवले जात आहेत. ही तर भयानक गुन्हेगारी स्वरूपाची गोष्ट आहे आणि याचा केवळ निषेध नव्हे तर न्यायालयीन चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
विकृत स्वरूपाचे इतिहास लेखन आणि त्याचे दूरगामी परिणाम हे कमी अधिक प्रमाणात समाजालाच भोगावे लागतात. सामान्य चूक भीषण अपघात घडवू शकते म्हणून त्या चुकीचे परिणाम किती गंभीर होतील याचा विचार करणे महत्त्वाचे असते. शरद पवार कॉंग्रेस पक्षात नामोहरम झाले म्हणून महाराष्ट्रातील निरंकुश सत्ता गमवावी लागली तसेच महाराष्ट्रातील राजकारण हे जाती-जमाती यांच्या हितसंबंधातून पुढे सरकत असते हे त्यांचे सिद्धांत आहेत.
‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाचे दोन लेखक, प्रकाशक यांनी खरं तर या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल केलेला गुन्हा मान्य करून ताबडतोड जनतेची विशेषत: वाचकांची व विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. हे पुस्तक मागे घेतले पाहिजे. या पुस्तकाच्या प्रती नष्ट करायला पाहिजेत. तसेच विद्यापीठाच्या पातळीवर एखादी तज्ज्ञांची समिती नेमून याची गंभीर चौकशी केली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या कृत्यांना, फसवणूक करणार्‍यांना जरब बसेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून 1985 पर्यंत व पुढे 1995 पर्यंत महाराष्ट्रातील जनता सातत्याने कॉंग्रेस विरोधात राहूनही आणि तसे सावध संकेत सातत्याने मिळूनही कॉंग्रेस सत्तेत राहिली आणि विरोधी पक्ष सत्तेपर्यंत पोहचू शकले नाहीत याचे उत्तम पुरावे दिलेले आणि अखिल भारतीय राजकारणाचा संदर्भ देऊन केलेेले मुद्देसुद विवेचन श्री. तोरसेकरांनी पुस्तकात मांडून ऐतिहासिक सत्य अलिप्त पत्रकाराच्या भूमिकेतून या पुस्तकात मांडले आहे. ते मुळातूनच वाचायला हवे.
कॉंग्रेस पक्षाची चौकट यशवंतरावांनी कशी बांधली व नेतृत्व मराठा समाजाच्या हाती कसे राखले याची माहिती देऊन श्री. तोरसेकर लिहितात, ‘तीन दशकात कॉंग्रेस कधीही सदृढ वा सशक्त राजकीय संघटन म्हणून निवडणूक जिंकू शकला नाही. दुबळा विरोधी पक्ष आणि पांगळे विरोधी राजकारण हेच कॉंग्रेसचे बळ राहिले.’
‘धोरण, कार्यक्रम, योजना, विचार अथवा जातीय हितसंबंधांच्या कारणास्तव कॉंग्रेसकडे कुठलाही कार्यकर्ता आकर्षित होऊ शकला नव्हता. तर सत्तेकडे जाण्याचा सोपा मार्ग, स्वार्थ साधायची संधी म्हणून कार्यकर्ते व नेते कॉंग्रेसकडे येत राहिले. पक्ष व संघटना न राहता सत्तालंपट स्वार्थसाधू  हावरटांची टोळी बनत गेली.
त्यात समस्त मराठा-कुणबी जातीलाही स्थान नव्हते. तर घराणेशाही स्थापन झालेली होती. बारामतीचे पवार, सांगलीचे वसंतदादा, पुसदचे नाईक, नाशिकचे िंहरे, नांदेडचे चव्हाण, माळशिरसचे माहिते-पाटील, लातूरचे देशमुख... यांच्या पलीकडे कुण्या मराठ्याला या रचनेत, सत्तावर्तुळात स्थान नव्हते.’ हळूहळू साखर कारखानदारीच्या माध्यमातून अशी नवी घराणी तयार झालेली होती. पण पळशीकर-व्होरांच्या अभ्यासात या कशाचीही दखल घेतलेली नाही.
वस्तुस्थितीचे अत्यंत सुस्पष्ट विश्‍लेषण श्री. तोरसेकरांनी मांडलेले आहे. ते लिहितात, ‘समाजवादी, कम्युनिष्ट, शेकाप आदी डावे पक्ष पुस्तकी, निष्क्रिय तोंडाळ असे कागदावरले पक्ष उरले आहेत. लोकामध्ये पुरोगामी-प्रतिगामी या गुळगुळीत शब्दांना महत्त्व उरलेले नाही. फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ही वस्तुस्थिती नव्हे तर बहुजनांना भुलविण्यासाठी वापरले जाणारे खोटी नावे बनली आहते. (पृष्ठ क्र. 33)
तोरसेकरांनी प्रकरणश: या लेखकद्वयांनी मांडलेले लेखन उद्ध्वस्त करून त्याचा खोटेपणा, चुकीची विधाने यांचा सोदाहरण परामर्श घेतला आहे.
शिवसेना कधी स्थापन झाली, कसकशी आपले वर्चस्व वाढवत गेली याचा थांगपत्ता नसावा किंवा शिवसेनाच ठाऊक नसावी असे म्हणणे भाग आहे. स्थापनेपासूनच शिवसेनेने मुंबईवर आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलेले आहे (पृष्ठ क्र. 55) हे तोरसेकरांनी ठणकावून सांगितले आहे.
समजूत आणि समज यावर आधारित मते नेहमीच फसवी कशी असतात याचे सोदाहरण विश्‍लेषण, ‘आत्याबाईला मिशा असत्या तर’ या प्रकरणात वाचायला मिळते. लेखकांची पाहणी, तर्कट, अनेक निष्कर्ष हे कसे फसवे आहेत हे वाचणे हा ज्ञानाबरोबरच करमणुकीचा विषय या लेखकांच्या लिखाणामुळे कसा बनला हे मुळातून वाचकांनी वाचलेच पाहिजे.
भाऊ तोरसेकरांनी ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ याची चिरफाड करून आपले काम थांबवले नाही तर नंतरच्या पानांमध्ये त्यांनी अतिशय सविस्तर महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्तांतराचं विश्‍लेषण करून केवळ शवविच्छेदन करून न थांबता वाचकांना मोलाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे झाकणार्‍या म्हातारीला उघडं केल्यानंतर कोंबडं नक्की काय आहे हे वाचकांना समजते.
शेवटच्या 8-10 पानात तोरसेकरांनी त्यांचा या संबंधितांशी झालेला पत्रव्यवहार दिलेला आहे आणि ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकातील चुकांची पान क्रमांकासहित यादी दिलेली आहे.
11 ऑगस्ट 1997 साली दिनकर गांगल यांनी तोरसेकरांना लिहलेल्या मोहक पत्रात ‘तुमच्या अनुभवाचे पुस्तक होते का ते पाहू या का?’ असे लिहिले आहे.
तसे ते पुस्तक झालेले दिसत नाही. असो तोरसेकरांच्या या पुस्तकाने एक महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी केली आहे म्हणून त्याचे मूल्य फार आहे. विशेषत: राजकारणात ज्यांना रस आहे, जे विद्यार्थी आहेत, पत्रकार आहेत त्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे संदर्भ मुल्यही या पुस्तकास आहे.
कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे (7057292092)
पृष्ठ - 148, मूल्य - 150
-सुधाकर द. जोशी.
9860777440



Monday, September 21, 2015

संगमनेरच्या पत्रकारांचा आदर्श

पत्रकार संघाच्या उपहारगृहात काही पत्रकार गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात एका सद्गृहस्थाने त्यातील एका पत्रकाराला विचारले, ‘‘हजार रूपयांचे सुट्टे आहेत का हो?’’ पत्रकाराने ताबडतोब सांगितले, ‘‘माझ्याकडे पैसे तर नाहीत पण मला हा प्रश्‍न विचारून माझा गौरव केल्याबद्दल धन्यवाद!’’
यातील विनोदाचा भाग सोडला तरी पत्रकारांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच आहे. विशेषत: तालुका व गाव पातळीवर काम करणारे पत्रकार याला अपवाद नाहीत. अर्थार्जनाला कधीही महत्त्व न देता सतत कार्यरत राहणारे पत्रकार निष्ठेने सामाजिक बांधिलकी मात्र पार पाडतात. तुटपुंजे मानधन मिळत असूनही दुष्काळाविषयी संवेदनशीलता दाखवत संगमनेर येथील पत्रकारांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. पत्रकार राजाभाऊ वराट, नंदकुमार सुर्वे, श्याम तिवारी, वसंत बंदावणे, रियाज सय्यद, प्रकाश टाकळकर, प्रकाश आरोटे, शेखर पानसरे, विजय भिडे, निलिमा घाडगे, नितीन ओझा आदींनी पुढाकार घेऊन नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला हातभार लावण्याचा विचार केला. त्यासाठी पत्रकारितेचा गैरवापर करत इतरांकडून पैसे उकळून ते मदत म्हणून देण्याऐवजी संगमनेरातील पत्रकारांनी प्रत्येकी हजार रूपये काढले. किमान अकरा हजार रूपये देण्याचा त्यांचा मानस होता.
महाराष्ट्रात अनेक पत्रकार दुष्काळाविषयी तळमळीने लिहित असतात. प्रशासकीय यंत्रणेकडे आणि राज्यकर्त्यांपुढे समस्या मांडत असतात; मात्र संगमनेर पत्रकार मंचचे सदस्य पुढे आले आणि महाराष्ट्रातील पत्रकारांपुढे त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला. पत्रकारितेसाठी ही गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने विचारमंथन करण्यासाठी ‘दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता’ या विषयावर संगमनेर पत्रकार मंचाने आमचे व्याख्यान ठेवले. ‘चपराक’च्या  सदस्यांसह आम्ही कार्यक्रमास गेलो. पत्रकारांच्या या स्तुत्य आणि विधायक उपक्रमाचे कौतुक केले. प्रतिकात्मक स्वरूपात खारीचा वाटा म्हणून ‘चपराक’तर्फे पाच हजार रूपये त्यांच्याकडे सुपूर्त केले आणि मदतीचा हा आकडा 36 हजारावर गेला. संगमनेरातील पत्रकारांच्या वतीने 21 हजार, पेटीटचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांच्याकडून पाच हजार, आधार फाउंडेशनकडून पाच हजार आणि ‘चपराक’चे पाच हजार असे एकूण छत्तीस हजार रूपये ‘नाम फाउंडेशन’साठी जमल्यानंतर अनेकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत दुष्काळग्रस्तांसाठी हातभार लावण्याचा संकल्प केला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून संवेदनशीलता जपत उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आपला एखादा भाऊ अडचणीत असेल तर त्याला मदत करणे आपले कर्तव्यच ठरते. मराठवाडा, विदर्भ दुष्काळामुळे होरपळतोय. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, कर्जामुळे त्रस्त झालेला शेतकरी नैराश्यातून, वैफल्यातून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबतोय त्याला शक्य तितकी मदत करणे, त्याचे मनोबल उंचावणे हे आपले कर्तव्यच आहे. राजकीय यंत्रणा ढिम्म असली तरी सध्या थोडेफार आशादायी चित्रदेखील आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांचा आशावाद वाढलाय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सव्वाशे कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करतात आणि दुसरीकडे मराठवाड्यातील बांधवांकडे मात्र साफ दुर्लक्ष करतात, ही शोकांतिका आहे. अशावेळी फक्त वाचाळवीरतेचे दर्शन घडविण्याऐवजी, बोरूबहाद्दर कारकुनी करण्याऐवजी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार’. त्यामुळे प्रत्येकाने दुष्काळग्रस्तांसाठी शक्य तितकी मदत करायला हवी. तुम्ही तुमच्यावर ताण येईल असे काही करू नकात; मात्र शक्य तेवढी मदत नक्की करा. अनावश्यक खर्च टाळा. हजार, पाचशे, दोनशे, शंभर ज्याला जेवढे शक्य होईल त्याने तेवढी मदत अवश्य करावी. मदत कितीची असते यापेक्षा त्यामागच्या भावना या सर्वश्रेष्ठ आणि मानसिक समाधान देणार्‍या असतात.
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूने पाच लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे दिले आहेत. अक्षयकुमारसारख्या खिलाडूवृत्तीच्या कलाकाराने तब्बल नव्वद लाख रूपये दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केले आहेत. हिंदी माध्यमातील रजत शर्मा यांच्यासारखे पत्रकार ‘शेखावत फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी काहीतरी भरीव कार्य उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
यासगळ्यात अनेक सेलिब्रिटीज मागे पडतात. आजपर्यंत समाजाने ज्यांना भरभरून दिले आहे असे कलाकार पुढे यायला हवेत. ‘खाना’वळीने (आमीर, शाहरूख, सलमान, सैफ अली आदी) पुढाकार घेतला तर आणखी मोठी रक्कम उभी राहू शकेल. अजित पवार यांच्यासारख्या नेत्यावर सत्तर हजार करोड रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. छगन भुजबळ यांनी सत्तावीसशे करोड रूपये हडप केल्याची चर्चा आहे. ‘जेल भरो आंदोलन’ पुकारून लोकांची टाळकी भडकविणार्‍या थोरल्या साहेबांच्या संपत्तीचा अंदाज आम्हाला नाही. तो आकडा कदाचित आम्हाला लिहिता तर येणार नाहीच पण कॅलक्युलेटरवर मावेल याचीही शक्यता नाही. अशा बड्या आसामींनी गेंड्याची कातडी बाजूला सारून शेतकर्‍यांसाठी काहीतरी करायला हवे. निरर्थक आंदोलने आणि त्याची अमाप जाहिरातबाजी यात ही मंडळी जेवढा पैसा खर्च करतात तेवढ्यात किमान चार गावे दत्तक घेणे सहज शक्य आहे.
शेतकर्‍यांना रोख स्वरूपात केलेली मदत ही तात्पुरती मलमपट्टी ठरेल असे अनेकजण सांगत आहेत. त्यात तथ्य असेलही! पण जखम भळभळत असताना ही मलमपट्टीही जीव वाचवण्यास पुरेशी ठरेल. शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यायला हवीत. वीज आणि पाणी याची त्यांना सोय करून द्यायला हवी. रोजगार हमीची कामे गरजूंना शेतीतच उपलब्ध करून द्यायला हवीत. ज्यांच्याकडे अवजारे आणि इतर साधने नाहीत त्यांना ती सहजी उपलब्ध करून द्यायला हवीत. बळीराजा वाचला तरच आपले अस्तित्व शिल्लक राहणार आहे.
ग्रामीण भागात रोजगार नसल्याने अनेक तरूण दिशाहीन होत आहेत. त्यांच्यापुढे कोणतेही ध्येय नसल्याने ते कट्टरतावादाकडे वळत  आहेत. राजकारणी लोक चुकीच्या कामासाठी त्यांचा उपयोग करून घेत आहेत. यातूनच भविष्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आणखी हवे’चा हव्यास सोडून अशा गरजूंना प्रामाणिकपणे मदत करायला हवी. उद्याच्या उज्ज्वल राष्ट्रासाठी हे गरजेचे आहे. संगमनेरातील पत्रकारांनी हा सुज्ञपणा दाखवला आहे. आपणही त्यासाठी पुढाकार घ्या, जमेल तेवढा हातभार लावा. आपला खारीचा वाटा सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

- घनश्याम पाटील
चपराक, पुणे 
७०५७२९२०९२