Monday, September 28, 2015

नाना, महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे…

त्यानं काही दिवसांपूर्वी सिंहगडाजवळ शेत घेतलं अन् मग एकदा त्याला एकानं विचारलं की, ‘‘तू शेतावर काय लावतोयस रे?’’ हा म्हणाला, ‘‘लाकडं. माझी मी उगवतोय. हो! नाहीतर हे सगळे दोस्त लोक ओल्या लाकडावर जाळायचे. धूर डोळ्यात गेल्यावर यांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि जळताना भला वाटायचं की माझ्यासाठी रडतायत. असले नालायक आहेत. त्यामुळं मी माझ्यासाठी सुकी लाकडं आणणार. धूर कमी. त्यामुळं मला जळताना कळेल की खरा कोण आणि खोटा कोण? काय सांगावं, तिथेसुद्धा कदाचित मी उठेन मुस्काटीत मारायला.’’ त्याचं हे उत्तर फटकळ आहे; मात्र खूप काही सांगणारं. माणूस येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. त्याला या गोष्टीचं पक्कं भान आहे. त्याला पक्कं माहिती आहे, माणसाच्या गरजा किती असतात, किती असाव्यात! त्याच्याकडे तरी काय होतं एकेकाळी? नववीत होता तो त्यावेळी. वय तेरा वर्षे. त्या वयात पोटासाठी नोकरी केली त्यानं. मुंबईत दादरच्या समर्थ विद्यालयात शिकायचा. दुपारी घरी यायचा माहिमला. असेल ते खायचा व नोकरीसाठी आठ किलोमीटर चालत जायचा. पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचा. हातात कला होती. पेंटींग छान करायचा. नोकरी पेंटींगचीच. सिनेमाची पोस्टर्स करायचा. वय होतं का त्याचं ते नोकरी करण्याचं? मात्र पर्यायच नव्हता. वडिलांना कोणीतरी फसवलं म्हणून त्यात त्यांचं सगळंच गेलं. त्याआधी दोन वेळची भ्रांत नव्हती; मात्र आता एका वेळेचीही भ्रांत निर्माण झाली. कोवळं वय. आईवडिलांकडे हट्ट करण्याचं. खेळण्याबागडण्याचं; मात्र संकट आलं तेव्हा तो कोवळ्या वयातही डगमगला नाही. लढला सरळ! परिस्थितीशी दोन हात केले. मुख्य म्हणजे मन कटू करून घेतलं नाही स्वत:चं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर जी लढण्याची ताकत मिळाली ती त्याच दिवसातून मिळाली. पुढं काय घडलं मग? हिंदी चित्रपटसृष्टीतला ‘बाप माणूस’ झाला तो पुढं वीस एक वर्षानंतर! भलेभले त्याच्या अभिनयाला सलाम करू लागले. आत्मविश्‍वास थक्क करणारा होता त्याचा! एका टप्प्यावर तर अमिताभ बच्चनपेक्षा जास्त मानधन घेत होता म्हणे तो! चिकार लोकप्रिय झाला; मात्र एक गोष्ट कधीही विसरला नाही तो. महिना पस्तीस रूपये पगार व एक वेळचं जेवण यावर केलेली नोकरी. प्रसंगी मुंबईच्या फुटपाथवर झोपून काढलेले दिवस! त्याच्या वाईट दिवसात अनेकांनी त्याला आधार दिला. विजया मेहता, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, मंगेश कुळकर्णी, मोहन तोंडवळकर, दिलीप कोल्हटकर ते अगदी अशोक सराफपर्यंत. या कुणालाही तो विसरला नाही. ‘पाहिजे जातीचे’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘महासागर’ ही त्याची सुरूवातीची नाटकं. मग आलं त्याचं ‘पुरूष’ हे नाटक. ‘पुरूष’ तर त्याच्यावरच बेतलेलं. खलनायकी भूमिका होती ती; मात्र आख्खं नाटक त्यानंच उचलून धरलेलं. कितीतरी चर्चेत राहिलेलं ते नाटक; मात्र त्यावेळी त्यातून तरी त्याला काय मिळत होतं? पन्नास रूपये मिळायचे एका प्रयोगाचे. त्याची बायको निलकांती. ती तेव्हा बँकेत अधिकारी होती. तिला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळायचे; मात्र तिनं याची उमेद खचू दिली नाही. मुळात नाटकात तो टिकून राहिला तो तिच्याच प्रोत्साहनामुळं. हा या सगळ्यांचे ऋण मानतो. ऋणानुबंध तो विसरत नाही. आईवडिलांचे ऋणही तो विसरला नाही. वडील माळकरी. अत्यंत सज्जन! वडिलांनी एकच सांगितलं होतं, ‘नाना, कधीही कोणाकडून पैसे घेऊ नकोस आणि कुणाला दिलेस तर लक्षात ठेऊ नकोस.’ वडिलांचे हे शब्द. ते त्यानं आयुष्यात प्रमाण मानले. आपण समाजाला जे काही देऊ ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. फूल असो वा फुलाची पाकळी, सत्पात्री गेली पाहिजे. त्याचे ढोल वाजवायचे नाहीत. आव आणायचा नाही. कसलाही दांभिकपणा टाळायचा. या गोष्टी त्यानं लक्षात ठेवल्या. त्यानं देवाकडे दोन वेळची भाकरी मागितली होती. त्याच्या करोडो पटीनं देवानं त्याला सर्व काही दिलं ही त्याची भावना. ‘‘माझी ओंजळ तेवढीच आहे. ती मोठी नाहीच झाली. ती भरलेलीच आहे’’ तो म्हणतो. पैशांचा त्याला तिटकारा नाही; मात्र पैसा हे त्याच्यासाठी सर्वस्व कधीच नव्हतं. म्हणूनच पैशानं विकत मिळणारी सुखं. ती विकत घेण्याच्या भानगडीतच तो कधी पडला नाही. ‘‘मला गाडी-घोड्यांची किंवा मोठ्या घराची हौस नव्हती. तू माझा मित्र आहेस. मी तुझी किंमत लावायची म्हटलं तर लावता येईल का?’’ तो मित्रांना सरळ विचारतो. त्याच्या या विचारण्यात मोल माणसांचं आहे. पैशाचं नाही.
तो रमला माणसांमध्ये. त्याला माणसं प्रिय! तो बाबा आमट्यांकडे खेचला गेला तसा बाळासाहेब ठाकर्‍यांकडेही. त्यात त्याला काही विरोधाभास वाटत नाही. त्याच्या मते ही दोन्ही माणसं खूप मोठी होती. खूप निखळ होती. तो कुठल्याच जातिधर्मात अडकून पडलेला नाही. ‘मुरूड-जंजिरा’ हे त्याचं गाव. सहावीपर्यंत तो तिथं शिकला. रात्री बेरात्री उठून तो समुद्रावर जाऊन बसत असे. त्या समुद्रानं त्याला भेद शिकवला नाही. ‘‘मुरूडला समोर नेहमीच समुद्र असायचा. त्यामुळं जे काही पहायचं ते भव्यच पहायचं अशी सवयच लागली’’ तो सांगतो. त्याच्या मते समुद्र हा उदात्त असतो. खळखळता असतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनाचा कोतेपणा गळून पडतो. 1968 साली तो ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये होता मुंबईच्या. त्याचं चित्रकार असणं हा केवळ योगायोग नाही. त्याच्या कॅनव्हासवर त्यानं एका चांगल्या राज्याचं चित्र रेखाटलं आहे. एक नागरिक म्हणून त्याला एक बर्‍यापैकी ‘सिस्टिम’ हवी आहे. माणसांचं जगणं निदान सुसह्य करेल अशी सिस्टिम. दुसरीकडे आपणही या राज्याचे, या देशाचे नागरिक आहोत व आपलीही काही जबाबदारी आहे हे तो मानतो. जात, धर्म नंतर. ‘‘मला ‘कुराण’मधली खूप आयतं बोलता येतात. माझ्या गळ्यात ताईत आहे व कृष्णसुद्धा’’ तो सांगतो.
नाना पाटेकर! काही माणसं घरातलीच वाटतात. तसा हा माणूस. आता पुन्हा चर्चेत आलाय तो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या! हा विषय त्यानं उचलून धरल्यामुळं. विदर्भ, मराठवाड्यात परिस्थिती भिषण! तिथं हा फिरतोय. त्याला शक्य ते सर्वकाही करतोय. मकरंद अनासपुरेही मराठवाड्यातला. त्यालाही माहीत आहे, दुष्काळ ही काय चीज असते ते! मात्र नानाची आर्थिक मदत किती जणांना पुरणार? किती काळ पुरणार? तरीही त्याचं महत्त्व मोठं आहे. माणसांची उमेद मारून टाकतो दुष्काळ. नानाच्या प्रयत्नांमुळे ही उमेद टिकून राहिल माणसांची. होणार्‍या आत्महत्या टळू शकतात त्याच्या या कामामुळं. ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ हा व्यवस्थेपुढचाच प्रश्‍न नाही फक्त. तो तुम्हा आम्हा नागरिकांपुढचा देखील प्रश्‍न आहे.
नानाचं वेगळेपण एवढंच, त्यानं हा प्रश्‍न आपला मानला. प्रश्‍न आपलेच आहेत सगळे अवतीभवती निर्माण झालेले. आपणच ते प्रत्येकवेळी राजकारण्यांवर ढकलतो का? ती एक सोय आहे का? पळवाट आहे का? आपली जबाबदारी टाळण्याची? ‘राजकारणातली विश्‍वासार्हता संपली’ हे म्हणायला ठीक आहे; मात्र आपल्या विश्‍वासार्हतेचं काय? हा लेख लिहिताना रात्रीचे आठ वाजतायत. नारायण पेठेतल्या ऑफिसमध्ये बसून हे लिहितो आहे. दुसर्‍या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसच्या भिंती व खिडक्यांच्या काचा. थरथरतायत त्या. का? खाली गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू आहे. सहज खिडकी उघडली. खाली नजर टाकली तर विशी-तिशी-चाळीशीतली जमात नाचण्यात धुंद आहे! त्यात मुलीही आहेत. एक मुलगी. अंगात आल्यासारखं नाचतेय ती! काय सिद्ध करायचं असतं या सगळ्यातून समजत नाही. हायकोर्टाचे सगळे निर्णय धाब्यावर बसवून चाललेला हा उन्माद! भयानक आहे तो! आपल्याच राज्यातल्या एका भागाला ‘मराठवाडा’ म्हणतात. एका भागाला ‘विदर्भ’ म्हणतात. तिथं मागच्या काही वर्षात तीस एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही आत्महत्या चालू आहेत हे या नर्तक व नृत्यांगनांच्या गावी आहे की नाही माहीत नाही.
तर वातावरण हे असं आहे. कुणाला कुणाचं पडलेलं नाही फारसं. मग नानाचं वेगळेपण का जाणवणार नाही? शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर त्यानं काम सुरू केलं. त्याची स्वत:ची विश्‍वासार्हताच मुळात मोठी! आज माणसं मुख्यमंत्री निधीला पैसे देत नाहीत तर नाना व मकरंदकडे मदतीचे पैसे देताहेत. नानाला यातून प्रसिद्धी नकोय. त्याच्या सहकार्‍यांनाही ती नकोय. हा अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रापुढचा प्रश्‍न आहे. प्रत्येकानं तो आपला प्रश्‍न मानला पाहिजे. निदान तशी जाणीव तरी आपण ठेऊ शकतो. या क्षणी इतकंच म्हणता येईल, ‘नाना, तू माणूस विश्‍वासार्ह आहेस व महाराष्ट्र नेहमीच तुझ्या सोबत आहे.’
- महेश मांगले

९८२२०७०७८५
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
२८ सप्टेंबर २०१५

1 comment:

  1. खूप छान,वाचनीय लेख॰लेखक मांगले सर यांचे हार्दिक अभिनंदन,आगे बढो सर॰ लेख प्रकाशित केल्याबद्दल चपराकचे संपादक पाटील सर यांचेही मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete