Monday, September 21, 2015

संगमनेरच्या पत्रकारांचा आदर्श

पत्रकार संघाच्या उपहारगृहात काही पत्रकार गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात एका सद्गृहस्थाने त्यातील एका पत्रकाराला विचारले, ‘‘हजार रूपयांचे सुट्टे आहेत का हो?’’ पत्रकाराने ताबडतोब सांगितले, ‘‘माझ्याकडे पैसे तर नाहीत पण मला हा प्रश्‍न विचारून माझा गौरव केल्याबद्दल धन्यवाद!’’
यातील विनोदाचा भाग सोडला तरी पत्रकारांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच आहे. विशेषत: तालुका व गाव पातळीवर काम करणारे पत्रकार याला अपवाद नाहीत. अर्थार्जनाला कधीही महत्त्व न देता सतत कार्यरत राहणारे पत्रकार निष्ठेने सामाजिक बांधिलकी मात्र पार पाडतात. तुटपुंजे मानधन मिळत असूनही दुष्काळाविषयी संवेदनशीलता दाखवत संगमनेर येथील पत्रकारांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. पत्रकार राजाभाऊ वराट, नंदकुमार सुर्वे, श्याम तिवारी, वसंत बंदावणे, रियाज सय्यद, प्रकाश टाकळकर, प्रकाश आरोटे, शेखर पानसरे, विजय भिडे, निलिमा घाडगे, नितीन ओझा आदींनी पुढाकार घेऊन नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला हातभार लावण्याचा विचार केला. त्यासाठी पत्रकारितेचा गैरवापर करत इतरांकडून पैसे उकळून ते मदत म्हणून देण्याऐवजी संगमनेरातील पत्रकारांनी प्रत्येकी हजार रूपये काढले. किमान अकरा हजार रूपये देण्याचा त्यांचा मानस होता.
महाराष्ट्रात अनेक पत्रकार दुष्काळाविषयी तळमळीने लिहित असतात. प्रशासकीय यंत्रणेकडे आणि राज्यकर्त्यांपुढे समस्या मांडत असतात; मात्र संगमनेर पत्रकार मंचचे सदस्य पुढे आले आणि महाराष्ट्रातील पत्रकारांपुढे त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला. पत्रकारितेसाठी ही गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने विचारमंथन करण्यासाठी ‘दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता’ या विषयावर संगमनेर पत्रकार मंचाने आमचे व्याख्यान ठेवले. ‘चपराक’च्या  सदस्यांसह आम्ही कार्यक्रमास गेलो. पत्रकारांच्या या स्तुत्य आणि विधायक उपक्रमाचे कौतुक केले. प्रतिकात्मक स्वरूपात खारीचा वाटा म्हणून ‘चपराक’तर्फे पाच हजार रूपये त्यांच्याकडे सुपूर्त केले आणि मदतीचा हा आकडा 36 हजारावर गेला. संगमनेरातील पत्रकारांच्या वतीने 21 हजार, पेटीटचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांच्याकडून पाच हजार, आधार फाउंडेशनकडून पाच हजार आणि ‘चपराक’चे पाच हजार असे एकूण छत्तीस हजार रूपये ‘नाम फाउंडेशन’साठी जमल्यानंतर अनेकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत दुष्काळग्रस्तांसाठी हातभार लावण्याचा संकल्प केला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून संवेदनशीलता जपत उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आपला एखादा भाऊ अडचणीत असेल तर त्याला मदत करणे आपले कर्तव्यच ठरते. मराठवाडा, विदर्भ दुष्काळामुळे होरपळतोय. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, कर्जामुळे त्रस्त झालेला शेतकरी नैराश्यातून, वैफल्यातून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबतोय त्याला शक्य तितकी मदत करणे, त्याचे मनोबल उंचावणे हे आपले कर्तव्यच आहे. राजकीय यंत्रणा ढिम्म असली तरी सध्या थोडेफार आशादायी चित्रदेखील आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांचा आशावाद वाढलाय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सव्वाशे कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करतात आणि दुसरीकडे मराठवाड्यातील बांधवांकडे मात्र साफ दुर्लक्ष करतात, ही शोकांतिका आहे. अशावेळी फक्त वाचाळवीरतेचे दर्शन घडविण्याऐवजी, बोरूबहाद्दर कारकुनी करण्याऐवजी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार’. त्यामुळे प्रत्येकाने दुष्काळग्रस्तांसाठी शक्य तितकी मदत करायला हवी. तुम्ही तुमच्यावर ताण येईल असे काही करू नकात; मात्र शक्य तेवढी मदत नक्की करा. अनावश्यक खर्च टाळा. हजार, पाचशे, दोनशे, शंभर ज्याला जेवढे शक्य होईल त्याने तेवढी मदत अवश्य करावी. मदत कितीची असते यापेक्षा त्यामागच्या भावना या सर्वश्रेष्ठ आणि मानसिक समाधान देणार्‍या असतात.
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूने पाच लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे दिले आहेत. अक्षयकुमारसारख्या खिलाडूवृत्तीच्या कलाकाराने तब्बल नव्वद लाख रूपये दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केले आहेत. हिंदी माध्यमातील रजत शर्मा यांच्यासारखे पत्रकार ‘शेखावत फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी काहीतरी भरीव कार्य उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
यासगळ्यात अनेक सेलिब्रिटीज मागे पडतात. आजपर्यंत समाजाने ज्यांना भरभरून दिले आहे असे कलाकार पुढे यायला हवेत. ‘खाना’वळीने (आमीर, शाहरूख, सलमान, सैफ अली आदी) पुढाकार घेतला तर आणखी मोठी रक्कम उभी राहू शकेल. अजित पवार यांच्यासारख्या नेत्यावर सत्तर हजार करोड रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. छगन भुजबळ यांनी सत्तावीसशे करोड रूपये हडप केल्याची चर्चा आहे. ‘जेल भरो आंदोलन’ पुकारून लोकांची टाळकी भडकविणार्‍या थोरल्या साहेबांच्या संपत्तीचा अंदाज आम्हाला नाही. तो आकडा कदाचित आम्हाला लिहिता तर येणार नाहीच पण कॅलक्युलेटरवर मावेल याचीही शक्यता नाही. अशा बड्या आसामींनी गेंड्याची कातडी बाजूला सारून शेतकर्‍यांसाठी काहीतरी करायला हवे. निरर्थक आंदोलने आणि त्याची अमाप जाहिरातबाजी यात ही मंडळी जेवढा पैसा खर्च करतात तेवढ्यात किमान चार गावे दत्तक घेणे सहज शक्य आहे.
शेतकर्‍यांना रोख स्वरूपात केलेली मदत ही तात्पुरती मलमपट्टी ठरेल असे अनेकजण सांगत आहेत. त्यात तथ्य असेलही! पण जखम भळभळत असताना ही मलमपट्टीही जीव वाचवण्यास पुरेशी ठरेल. शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यायला हवीत. वीज आणि पाणी याची त्यांना सोय करून द्यायला हवी. रोजगार हमीची कामे गरजूंना शेतीतच उपलब्ध करून द्यायला हवीत. ज्यांच्याकडे अवजारे आणि इतर साधने नाहीत त्यांना ती सहजी उपलब्ध करून द्यायला हवीत. बळीराजा वाचला तरच आपले अस्तित्व शिल्लक राहणार आहे.
ग्रामीण भागात रोजगार नसल्याने अनेक तरूण दिशाहीन होत आहेत. त्यांच्यापुढे कोणतेही ध्येय नसल्याने ते कट्टरतावादाकडे वळत  आहेत. राजकारणी लोक चुकीच्या कामासाठी त्यांचा उपयोग करून घेत आहेत. यातूनच भविष्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आणखी हवे’चा हव्यास सोडून अशा गरजूंना प्रामाणिकपणे मदत करायला हवी. उद्याच्या उज्ज्वल राष्ट्रासाठी हे गरजेचे आहे. संगमनेरातील पत्रकारांनी हा सुज्ञपणा दाखवला आहे. आपणही त्यासाठी पुढाकार घ्या, जमेल तेवढा हातभार लावा. आपला खारीचा वाटा सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

- घनश्याम पाटील
चपराक, पुणे 
७०५७२९२०९२ 


1 comment:

  1. असे आमच्या कडे पहिल्यांदा घडले....
    पाहुणा बोलावुन एखादा कार्यक्रम करणे फारच खर्चिक झाले आहे...
    पाहुण्याची बडदास्त ठेवणे हाच एक कार्यक्रम होऊन बसतो...
    पाहुण्यांची येण्या जाण्याची व्यवस्था,दिवसभराची शाही बडदास्त आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे मान आणि धन यातच आयोजकांची धावपळ होते...
    दुष्काळनिधी व पत्रकारांना मार्गदर्शन करण्या साठी संपादक घनश्याम पाटील यांना बोलावले आम्ही सुद्धा वरिल प्रमाणेच तयारीत होतोच...
    पण पाटील यांनी कोणताही बडेजाव दाखवला नाही..खास ठेप नाही...आणि ऊलट आम्हालाच त्यांनी दुष्काळ निधी साठी पाच हजार रूपये रोख दिले..
    काय बोलणार...काय प्रतिक्रीया देणार...
    फक्त एव्हढेच सांगेन " हे आमच्या कडे पहिल्यांदाच घडले "....

    ReplyDelete