अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच साहित्य परिषदेच्या निवडणुकीचेही संकेत मिळाले आहेत. इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी त्यांची कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडून कशी कुचंबणा होत आहे हे परखडपणे सांगितले आहे. प्रा. द. मा. मिरासदार हे सुद्धा वैद्य बाईंच्या राजकारणाला कंटाळूनच परिषदेतून बाहेर पडल्याचे त्यांनी कबूल केले आहे. मिरासदारांनी राजीनामा दिल्यानंतर ‘चपराक’ने हे वास्तव वाचकांसमोर आणले होते. मात्र त्यावेळी द. मा. स्वतःच शांत राहिल्याने त्या विषयांवर फारशी चर्चा झाली नव्हती. शेजवलकरांनी ही कोंडी फोडल्यानंतर मिरासदारांनीही ते मान्य केले आहे.
माधवी वैद्य या कशा भ्रष्टाचाराच्या डबक्यात रूतत गेल्या आहेत, त्यांनी कसे सूडाचे राजकारण केले, त्यामुळे साहित्याची आणि साहित्य परिषदेची कशी हानी झाली हे ‘चपराक’ने सातत्याने वाचकांसमोर मांडले आहे. आता दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच सर्वसाधारण सभेत तशी स्पष्ट भूमिका घेऊन ‘चपराक’च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी फक्त घुसमट व्यक्त केली नसून या परिस्थितीतून कशाप्रकारे मार्ग काढता येईल हेही ठामपणे मांडले आहे. ‘महाराष्ट्रातील सुविख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ’ अशी ओळख असलेल्या शेजवलकरांच्या बोलण्यातील तथ्य लक्षात घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
मुळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि साहित्याचा तसा फारसा संबंध राहिला नाही. नवोदितांच्या प्रतिभेला वाव मिळेल असे तिथे किंवा त्यामाध्यमातून काही घडत नाही. एकमेकांच्या कुचाळक्या करणे, मिरवण्याची हौस भागवून घेणे, मिळालेल्या निधीवर डल्ला मारणे, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची तुंबडी भरणे हे व अशा प्रकारचे उद्योग तिथे खुलेआमपणे चालू असतात. तीन पानांची संहिता लिहिण्यासाठी तीस हजार रूपये, अनावश्यक विमानप्रवास, परिसंवादात जावयाची वर्णी, बालगोपाळांसाठी काढलेल्या दिवाळी अंकात स्वतःच्याच नातवंडांचे फोटो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराला प्रचारासाठी मदत, स्तुतीपाठक आणि भाटांचे हीत जोपासताना अस्सल प्रतिभावंतांची केलेली उपेक्षा या व अशा अनेक कारनाम्यातून डॉ. माधवी वैद्य यांनी त्यांचे गुण-अवगुण दाखवून दिले आहेत.
घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही या बाईंनी संमेलनाध्यक्षांची अशीच उपेक्षा केली होती. व्यासपीठावर त्यांनी डॉ. सदानंद मोरे यांना चक्क मागे ढकलले आणि त्यांच्या पुढे येऊन राजकारण्यांच्या बाजूला थांबल्या. तेव्हा संमेलनात ‘महामंडळाच्या अध्यक्षांची नथ दिसली पण त्यामागचे नाक दिसले नाही’ या शब्दात आम्ही संमेलनाध्यक्षांची केविलवाणी अवस्था सांगितली होती. मात्र आपले लोकही निलाजरे आहेत. पद आणि प्रतिष्ठेसाठी कितीही अवमान सहन करतील. निवडून येण्यासाठी राजकारण्यांची चमचेगिरी करणारे, लाळघोटेपणा करणारे आणि निवडून आल्यानंतरही स्वाभिमान गहाण ठेवणारे असे अध्यक्ष मिळाल्यानेच मराठी भाषेची वाताहत झाली आहे.
श्रीपाल सबनीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साहित्य परिषदेत एक पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. सदानंद मोरेही तिथे आले होते. मागच्या वर्षी सबनीसांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याने मोरेंनी यावेळी त्याची परतफेड केली हे उघड होते. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ अशातला हा मामला होता. मात्र या परिषदेत पत्रकारांनी सबनीसांना विचारले की, ‘‘राजकीय मदत घेणार का?’’ त्यावर त्यांनी ‘‘साहित्यात कोणीही वर्ज्य नसते, मात्र मी माझे अवमूल्यन करून घेणार नाही. राजकारणी व्यासपीठावर असले तर फरक पडणार नाही मात्र माझी खुर्ची कुणी ढकलत ढकलत मागे नेली तर ते मला चालणार नाही’’, अशा शब्दात सदानंद मोरे यांना टोलवले होते.
यावर्षीच्या साहित्य संमेलन निवडणुकीत पहिल्या फळीतील एकही साहित्यिक नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोणीही झाले तरी मराठी भाषेला तसा काहीच फरक पडणार नाही. अर्थात, मोठा आणि कार्यक्षम लेखक संमेलनाध्यक्ष झाल्याने मराठीत आजवर काही मोठे परिवर्तन घडलेय असेही नाही. मात्र आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर असे प्रतिभावंत ज्या खुर्चीवर बसले होते तो वारसा फारच भुक्कड लोकांकडे येऊन ठेपला आहे. नाहीतर फ. मुं. शिंदे सारखे किरकोळ प्रतिभेचे अनेक हौसी नकलाकार संमेलनाध्यक्ष झालेच नसते. या पदाची प्रतिष्ठा कधीच लयास गेली आहे. आता केवळ एक सोपस्कार उरलाय. ‘नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे संमेलने पार पडत आहेत. त्यापासून मराठी भाषेला, मराठी माणसाला नक्की काय मिळते याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे विधान करतो. त्याला साहित्यातील अशा प्रवृत्ती कारणीभूत आहेत.
असो! असे म्हणतात की, माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये! माधवी वैद्य यांच्या राजकारणाचे बळी ठरलेल्या प्रा. मिलिंद जोशी यांच्याविषयी डॉ. शेजवलकरांनी गौरवोद्गार काढले आहेत. जोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, अशी अपेक्षाही शेजवलकरांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. मिलिंद जोशी परिषदेतून बाहेर पडल्यानंतर परिषदेचे वाटोळे झाले हेही त्यांनी सूचित केले आहे. प्रशासनावर पकड असलेला, स्वतः साहित्यिक आणि फर्डा वक्ता असलेला जोशी यांच्यासारखा नेता परिषदेला मिळाला तरच काहीतरी आशादायक चित्र दिसू शकेल. येणार्या निवडणुकीत मिलिंद जोशी यांनी पुन्हा सक्रिय व्हावे आणि परिषदेला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी भूमिका डॉ. शेजवलकर यांच्यासारख्या अभ्यासू, व्यवस्थापन क्षेत्रात मानदंड ठरणार्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या सद्गृहस्थाने घेतली आहे. त्याचे समर्थन करायलाच हवे.
माधवी वैद्य, सुनील महाजन यांनी परिषदेची, महामंडळाची आणि एकूणच साहित्य क्षेत्राची केली तेवढी शोभा पुरे झाली. आता यात परिवर्तन घडावे आणि साहित्य क्षेत्रात मराठीचा विजयध्वज सर्वत्र डौलात फडकावा, एवढीच यानिमित्ताने माफक अपेक्षा!
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२